चारचौघी - १

Submitted by बेफ़िकीर on 7 January, 2013 - 06:05

निर्भयावर बलात्कार व अत्याचार झाल्यानंतर एका मासिकाने माझ्याकडे 'बलात्कारी माणसाची बलात्काराची मानसिकता कशी तयार होते' यावर एक विस्तृत लेख मागीतला होता. तो लेख बराच मोठा झाला व त्यात या मानसिकतेमागील तांत्रिक बाबी, जसे निसर्ग, इतिहास, संस्कृती, सामाजिक बदल यांच्या अनुषंगाने त्या मानसिकतेचा आढावा घेतला गेला. तो लेख त्या मासिकाने स्वीकारलाही. पण लेख माझ्याकडे मागेपर्यंत या विषयावर काही लिहिण्याचे मनात नव्हते. मात्र लेख लिहून झाल्यानंतर असे वाटू लागले की याहीपेक्षा विस्तृत कथानक, ज्यात स्त्रीच्या मनस्थितीतील बारकावे व भावनिक गरजा टिपल्या जातील, लिहिले जावे. चित्रपटात दाखवतात तसा किंवा निर्भयावर झाला तसा थेट बलात्कार, येथपासून ते 'आपल्यावर जो झाला तो नेमका बलात्कारच होता का याबाबत स्त्री स्वतःच ठाम नसणे' या दोन टोकांमध्ये बलात्कारीत स्त्री कोठेही असू शकते. लेखामध्ये पुरुषाची मानसिकता कशी घडते यावर भर होता, तर कथानकात स्त्री या प्रकाराकडे कसे बघते व तिच्या आयुष्यात हे प्रकार का, कधी व कोणाकडून होऊ शकतात तसेच तिच्या मनावर याचे काय परिणाम होऊ शकतात यावर भर असावा असे वाटू लागले. एक 'आम' जीवन जगत असताना हे प्रकार वाट्याला येण्यामागे निव्वळ दुर्दैवच असते आणि ते प्रकार मनातून झटकून टाकताही येत नाहीत आणि विवशपणे कायद्याकडून पुरेपूर न्यायाची अपेक्षा करत बसावे लागते इतपत नकारात्मक घोडदौड आपल्या समाजाने केल्याचे आपण जाणतोच. या कथानकात उपाय सांगण्याचा हेतू नाही. या कथानकाद्वारे स्त्रीजगतातील सर्वात भेसूर भयकारी अन्याय काय परिणाम घडवून आणतो याचे डिटेलिंग द्यायची कल्पना आहे. कदाचित याद्वारे 'अधिक काळजी घेणे' हा पुन्हा स्त्रीकडूनच अपेक्षित असलेला अन्याय्य उपाय समोर आल्यासारखेही वाटेल, पण हे वास्तवाचे चित्र आहे, अवास्तवतेला व खोट्या ठरणार्‍या सूड-शेवटाला यात स्थान मिळू नये असा प्रयत्न आहे.

'चारचौघी' या कथानकात एका वर्किंग वूमेन्स होस्टेलवर एकाच रूममध्ये राहणार्‍या चारजणींच्या आयुष्यात शोषणाचे कशी विविध प्रकारची स्वरूपे थैमान घालतात हे शक्य तितक्या प्रभावीपणे व वास्तवपणे दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल.

मायबोली प्रशासनाचे 'माझे आजवरचे लेखन व हेही लेखन प्रकाशित करण्यास मोठ्या मनाने परवानगी दिल्याबद्दल' मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

=================================

"नेव्ही रोडला कुठे मॅडम?"

"एलाईट डिस्टिलरीच्या ऑफीससमोर"

"हाप रिटन पडेल"

"काय? आत्ता? साडे नऊ वाजलेत"

"परतीला काय मिळत नाही तिकडून"

"सॉरी... मीटरप्रमाणे घेणार असलात तर येते"

"र्‍हाउद्या मंग"

रिक्षावाल्याच्या फाडकन तोंडात मारावी असे विचार तिच्या मनात येत होते. पण पोलिसांना बोलावण्यासाठी साधा आवश्यक तो नंबरही तिच्याकडे नव्हता. तो नंबर परवा कधीतरी पेपरमध्ये जाहीर झाल्याचे तिला आठवले. पण आपल्याला तो नंबर कधी आवश्यक वाटेल असे तिला वाटलेच नव्हते. रोज साडे सातला ती रूमवर असायची. ऑफीस ते एलाईट डिस्टिलरी अशी थेट बस होती. आज ऑफीसमध्ये उशीर झाला म्हणून ती बससाठी थांबली नव्हती असे नव्हे. आज रूमवर जया बाहेरून सगळ्यांचे जेवण आणणार होती. निमित्त होते तिचा साखरपुडा नुकताच झाल्याचे. अर्थात, जयाच्या साखरपुड्यासाठी पार बुलढाण्याला कोणीच गेलेले नव्हते. त्यामुळे पार्टी रूमवर ठरलेली होती. जयाचा वूड बी मुंबईला होता. बुलढाण्याला माहेर आणि सासर होते. जयाच्या पार्टीसाठी जरा तरी वेळेवर पोहोचावे म्हणून ती रिक्षा बघत होती. कारण यापुढची बस थेट दहाला होती म्हणजे रूमवर पोचायला साडे दहा ते पावणे अकरा होणार. म्हणजे त्यावेळी तिघी जेवून आपली वाट बघत असतील. त्यातही निलि तर पेंगून बेडवर आडवीच झालेली असणार. 'लवकर निजे लवकर उठे' या निलीच्या सुविचारावर तिघीही हसायच्या. आजच नेमका ऑफीसमध्ये उशीर झाला यावर पुन्हा एकदा वैतागून ती भसीनवर मनातल्या मनातच भडकली. त्यात हा रिक्षेवाला अडवणूकीचे धोरण स्वीकारून निर्लज्जपणे तिथ्थेच उभा होता गंमत बघत. त्याला समजलेले होते की या पोरीला इतक्यात काही बस नसणार आणि दुसरी रिक्षा मिळाली तरी 'हाप रिटन' मागणारच. रस्ताही सामसूम होत चाललेला होता. झपाझप पावले उचलत या रिक्षेपासून काही अंतरावर जायला लागणार होते. कारण हा निर्लज्ज इथेच उभा राहणार आणि आपली गंमत बघत बसणार हे तिला समजलेले होते. ती निकरावर आल्याप्रमाणे रूमच्या दिशेच्या रस्त्याला लागली आणि पावले झपाझप उचलू लागली. मागे वळून पाहण्याचा मोह होत होता की रिक्षेवाला तिथेच थांबून लक्ष देत आहे की निघून जात आहे. पण तो मोह तिने आवरला. तेवढ्यात निलिचा एस एम एस आला.

"व्हेअर यू?"

निलिचे एक तर इंग्लिश विचित्र होतेच, त्यात पुन्हा स्वतःच्याच एस एम एस भोवती ती अवतरण चिन्हे काढायची. त्याही परिस्थितीत तिने फस्सकन हसून उत्तर पाठवले.

"आय कमिंग थर्टी मिन"

आपणही अवतरण चिन्हे काढलेली पाहून निलि बावळट चेहरा करून बसेल हे लक्षात येऊन ती पुन्हा मनाशीच हासली. मागून आवाज आला तसे तिने प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मागे वळून पाहिले. ती कार होती. रिक्षा मागेच जागच्याजागी होती. हिने मागे पाहिले तसे कार जवळ येऊन थांबली. आतला माणूस दिसायला पॉलिश्ड वाटत होता. त्याने मान झुकवून हिचे एका नजरेत निरिक्षण करत विचारले.

"लिफ्ट?"

"नो, थँक्स"

ही पुन्हा मान खाली घालून ताडताड चालू लागली. कार सुळ्ळकन निघून गेली. तिला राग आला त्या कारवाल्याचा! मी रिक्षेची वाट पाहत आहे, मागे पाहिले की लगेच थांबलाच. तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली. ही थांबली आणि हात केला. रिक्षावाल्याने लांबूनच उर्मटपणे चालत्या रिक्षातूनच 'नाही' अशी मान हालवली आणि त्याच वेगात तो निघून गेला.

मगाचच्या रिक्षेवाल्यासमोर शरणागती पत्करावी की उलटे चालत जाऊन बसस्टॉपवर थांबावे हा निर्णय तिला घेता येत नव्हता. पावले मात्र रूमच्या दिशेने पडत होती. असे चालत राहिलो तर सव्वा तासाने पोचू हे तिच्या लक्षात आले. नुसताच वेळेचा प्रश्न नव्हता. यावेळी इतक्या लांब चालत जायचे म्हणजे एक नवीनच प्रश्न होता. अधेमधे बार्स होते, पानाचे ठेले होते, देशी दारूचे अड्डे होते, हॉटेल्स होती, रस्त्याने फिरणारी टोळकी असणार होती. निव्वळ एखाद्या टारगट ग्रूपने एखादी कमेंट पास केली तरी आपल्याला घाम फुटतो आणि तीळपापड होतो हे तिला माहीत होते. ऑफीसने रात्री ज्या बायकांना कामावर उशीरा थांबवतात त्यांच्यासाठी व्हेइकल का ठेवू नये हा प्रश्न ती उद्या एच आर ला विचारणार होती. पण ते उद्या! आत्ता काय!

आत्ता रिक्षा! एक रिक्षा 'सार दिन रस्तेपे खाली रिक्षेसा पीछे पीछे चलता है' च्या थाटात मागे येऊन हळूच थांबली.

"कहाँ जाना?"

"नेव्ही रोड"

निदान ही रिक्षा वेगळी होती.

"नेव्ही रोडपे किधर?"

"एलाईट के ऑफीसके सामने"

"बैठिये?"

हिने विचार केला. अगदीच हाफ रिटरन मागू लागला तर पोचल्यावर वाद घालता येईल. कोणालातरी मदतीला बोलावता येईल. आत्ताच आपण त्याला 'हाफ रिटर्न वगैरे देणार नाही हां' असे सांगून त्याच्या मनात कदाचित नसलेलाच पैशाचा मोह कशाला निर्माण करावा? पण घाईघाईत रिक्षेत बसली तर दोन गोष्टींचे पश्चात्ताप झाले. एक म्हणजे या रिक्षेत दर्प येत होता. बहुधा तो प्यायलेला होता. ती उतरणारच होती तेवढ्यात दुसरा पश्चात्ताप झाला. मागून मगाचचा रिक्षेवाला रिक्षा घेऊन गिधाडासारखा आडवा आला आणि या रिक्षेवाल्याला टर्रेबाजीच्या आवेशात विचारू लागला.

"स्टँडपे खडा है मै कबसे"

आता मात्र ही खरोखर भडकली. चवताळून म्हणाली.

"खडे हो तो क्या? मै आयी थी ना? हाफ रिटर्न कौन देगा इस वक्त?"

"हां तो वापसी नै मिलती ना?"

"उसको मै क्या करू? साडे नौ बजे है सिर्फ! मुझे ये ऑटो मिलगयी है"

हा दारुडा रिक्षेवाला मधे काही बोलतच नव्हता. तो आत्ता बोलला.

"बाईजी हाप रिटन तो पडेगाच"

हिचा तीळपापड झाला. सरळ चालत निघावे असा विचार करून ती ताडकन उतरली आणि रस्त्यावरून चालू लागली. आता तिचा वेग मगाचच्या दुप्पट असेल. येणारे जाणारे वाहन तिच्याकडे आणि तिच्या वेगाकडे चकीत होऊन पाहात पुढे जाऊ लागले. आणि एका क्षणी संकट संपले. मागून आवाज आला तसे तिने घाईघाईत मागे पाहिले. मागच्या एका वळणावर कार वळत होती. १४९६! बदामी कलर! शेव्हरलेट! भसीन! भसीन असला तर?

रस्त्यात कारकडे बघत असे कसे थांबायचे या विचाराने लज्जित होऊनही ती थांबली. कारचा आवाजही न होता कार जवळ येऊन थांबली. आतल्या माणसाने आवाज न होणारी काच खाली केली. जाडजूड मुंडके बाहेर काढले आणि चकीत आवाजात म्हणाला......

"जोऽऽऽ?"

पद्मजा कुलश्रेष्ठ! पॉप्युलरली नोन अ‍ॅज 'जो'! डेप्युटी मॅनेजर क्लेम्स प्रोसेस, सनराईज लॉजिस्टिक्स! अनमॅरिड! अ ब्युटीफुल लेडी इन हर अर्ली थर्टीज!

तोंडभरून हासत जो म्हणाली.

"सर, कूड यू प्लीज ड्रॉप मी अ‍ॅट द ऑफीस ऑफ एला...."

"श्योर... तू चालत का चालली होतीस? बस आत"

जो सुळ्ळकन आत सरकली आणि भसीनने काच वर केली. काच वर जायच्या आधी डावीकडच्या आरश्यात जो ला मागचे दोन्ही रिक्षेवाले दिसले आणि तिने हुश्श केले.

"व्हाय वेअर यू वॉकिंग?"

"बस, रिक्षा काही मिळतच नव्हते"

"आय अ‍ॅम सो स्सॉरी जो... मी तुला थांबवतानाच आधी विचारायला हवे होते की यू हॅव व्हेइकल ऑर नॉट... आणि बोलली का नाहीस? मीच ड्रॉप केले असते की? यापुढे केव्हाही अशी चालत जात जाऊ नकोस. इन फॅक्ट थांबावे लागले तर सरळ मला किंवा सुब्रमण्यमला सांगत जा हक्काने. एक तर आम्ही सोडू किंवा गाडी अ‍ॅरेंज करू. धिस एरिया... यू नो!!!"

"येस सर... थँक यू सर"

"कुठे म्हणालीस?"

"एलाईट"

"ओक्के"

"तुम्हाला थोडी वाकडी वाट करावी लागेल सर"

"मी सरळ वाटेने चाललो असतो तर या पोझिशनला पोचलोच नसतो जो"

खळखळून हासत जो ने समोरचा रस्ता निरखायला सुरुवात केली. जी काय गजबज होती ती टवाळखोरांचीच होती. आता आपण पंधराच मिनिटांत रूमवर असणार या विचाराने जो ने गार वारा खाण्यासाठी काच किंचित खाली केली. तेवढाच भसीनच्या तोंडाला येणारा गोल्ड फ्लेकचा नकोसा वास कमी झाला. याच भसीनने मगाशी तब्बल बत्तीस क्लेम्स लेट झाल्यावरून तोंडभरून शिव्या दिल्या होत्या हा राग जो विसरली. रूमवर गेल्यावर चापून खायचे आधी की आधी शॉवरखाली उभे राहायचे हा विचार एक सेकंदही टिकला नाही तिच्या मनात. कोणाशीही 'आलेच' या शिवाय एक शब्दही न बोलता ती बाथरूममध्ये शिरून गार पाण्याखाली उभी राहणार होती. दिवसभरच्या अंगावर खेळलेल्या नजरा, सहेतूक स्पर्श, रस्त्याने एकट्या चाललेल्या बाईकडे बघणार्‍यांच्या मनातील साडीला चिकटलेले विचार हे सगळे एकदाचे धुवून टाकले की बहुधा जयाने पिझ्झा आणला असेल त्यावर ताव मारण्याचे तिने ठरवले. अचानक मधे कुठलेतरी वाहन आल्यामुळे भसीनने किंचित अर्जंट ब्रेक मारताना चौथ्या गिअरवरून दुसरा गिअर टाकला आणि त्याची बोटे जो च्या उजव्या मांडीवरून वरपासून खालपर्यंत फिरली. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जो आणखीन सावरून बसली तेव्हा भसीन त्याच्या साईडची काच खाली करून वाहन मधे आणणार्‍याला चार खडे बोल सुनावत होता. त्यांच्यात किंचित अर्ग्यूमेन्ट्स झाल्यावर कार पुन्हा सुरू झाली.

"यू स्टे अ‍ॅट सम होस्टेल राईट?"

"येस सर, मुलवानी लेडिज होस्टेल"

"इज इट गूड?"

"येस सर"

"हाऊ मेनी ऑफ यू?"

"आम्ही चौघी राहतो सर एका रूममध्ये"

"डोन्ट टेल मी... एका रूममध्ये चौघी?"

"खूप्पच मोठी रूम आहे सर... जवळपास तीन रूम्सची एक रूम आहे ती... तशी एकच रूम आहे होस्टेलमध्ये... बाकी सगळ्या रूम्स दोन दोन च्या आहेत"

"हंहं?... अजून एखादी खोली मिळाली तर बघ ना जरा तिथे... माझ्या रिलेशनमधल्या एका मुलीला यायचे आहे या शहरात शिक्षणासाठी"

"चालेल सर... सांगते विचारून..."

पुढचा अबोल प्रवास संपला तेव्हा एलाईटचे गेटवरचे लाईट्स सोडले तर थेट होस्टेलचेच दिवे दिसत होते. मधे सर्व काही अंधःकारमय!

"थँक यू सर"

"नो नो... गुड नाईट जो"

"गुड नाईट सर"

शेव्हरलेटचा स्मूथ रिव्हर्स बघून घड्याळात बघत जो ने आपल्या खिडकीकडे मान केली. ती खिडकी भरपूर उजळलेली होती म्हणजे तिघी चकाट्या पिटत असणार. उत्साहात पावले उचलत जो चालू लागली. शंभर मीटर्स, ऐंशी, सत्तर, साठ....

"देखा? ऐसे कारवालोंको यहाँकी लडकियाँ मिलती है"

घण्ण! जो च्या पायातले त्राण गेले. अचानक आवाज कुठून आला ते तिने पाहिले. एका मोटरसायकलला टेकून तिघे उभे होते. साधारण पंचवीस फूट दूर त्या वाटेपासून! पळत सुटणे या शिवाय पर्याय नव्हता. जो खरच पळत सुटली. ते तिघे कोण होते आणि तिथे कसे काय आणि का उभे होते हेच तिला समजेना! होस्टेलच्या आजूबाजूला कोणी असे दिसले तर त्याला हटकून हाकलून लावण्याचे काम चार दणकट रखवालादारांना दिलेले होते. आता उद्या याचीही तक्रार करायला लागणार होती. 'आय अ‍ॅम बॉर्न टू बी अ व्हिक्टिम' हा विचार मेंदूतून कसाबसा झटकत धावत जो गेटपाशी पोचली. एक रखवालदार तीक्ष्ण नजरेने इकडे तिकडे पाहात होता. त्याला पाहून भडकलेली जो तीव्र आवाजात म्हणाली.

"उमाशंकर.... वो तीन लोग कौन है वहाँपर? ध्यान नही है क्या तुम्हारा?"

उमाशंकरला ते तिघे दिसले तसा आणखी एका रखवालदाराला हाक मारत तो बाहेर धावला. आता काय होते ते बघायला जो गेटच्या आत थांबून राहिली. रखवालदाराचा आकार पाहून आणि आवेश पाहून तिकडे तिघांनी मोटरसायकल घाईघाईत चालू केली आणि ते सुसाट निघून गेले. शेवटी काय? तर उमाशंकर होता म्हणून बचावलो. आपल्यात असे काहीच सामर्थ्य नाही की आपण कोणाशी लढावे. नजरेत नजर मिसळली तरी गैरसमज करून घेणारी गिधाडे पावलापावलावर आहेत. झटक जो, हे विचार झटक! फक्त स्वतःला सेफ ठेवत जा, तितकाच प्रयत्न करत जा! बाकी जगात काय चालते यावर क्षणभरही विचार करू नकोस. स्वतःतल्या घाबर्‍याघुबर्‍या स्त्रीला गेटपाशीच झटकत आता शूर झालेली जो सेकंदात तो प्रसंग विसरून पायर्‍या चढू लागली तेव्हा तिच्या मनात विचारांचे काहूर माजलेले होते.

मला हे किती वर्षे सहन करावे लागणार आहे? केव्हापासून हे मी सहन करत आहे? अगदी लहान असताना केव्हातरी आपला मामेभाऊ आपल्याला खेळवायच्या निमित्ताने काहीतरी विचित्र करायचा हे पुसटसे आठवते. त्या आधी काही झालेले असले तर ते समजलेलेही नसेल. मामेभावाबद्दल कधी कोणाला काही बोलताच आले नाही. हिम्मत केली नाही आपण. कॉलेजमध्ये मात्र एका रोमिओला चांगले सुनावले होते. पण ती शेवटचीच वेळ. नंतर एकट्या झालो आपण! जाऊ तेथे आपली पहिली ओळख एक सुंदर, एकटी तरुण स्त्री किंवा मुलगी! नंतर बाकीचा परिचय! नाव काय, गाव काय, काम काय आणि पोझिशन काय! कुठेही असलो तरी नजरा आपल्या अंगांगावरून फिरत आहेत ही भावना तर कित्येक वर्षांपूर्वीच बोथट झाली. नकळतपणे उलट त्यातून आपलाच अहंकार कधी सुखावला जायला लागला तेही समजले नाही. आपण मनाने मेलो आहोत. अंगावर एक किळसवाणा हात पडेपर्यंत घाबरायचे आणि तो हात पडला की मदत मिळेपर्यंत भोगले जायचे यापलीकडे मी, पद्मजा कुलश्रेष्ठ म्हणजे कोणी नाही. असे का? माझ्या प्रतिकाराची साधने म्हणजे पुन्हा एखाद्या परक्या पुरुषाची मदत आणि उपकारच? म्हणजे उद्या त्याने ते उपकार सव्याज परत मागीतले तर दुसर्‍या पुरुषाची मदत अपेक्षित करायची? मी ऑन माय ओन काय करू शकते? एक लग्न? ज्यात मी सेफ आहे असे समजू म्हणाले तर तेही साफ खोटेच असल्याच्या शंभर बातम्या एका महिन्यात पेपरात येतात? विवाहितेवर बलात्कार! या बातमीतील 'विवाहितेवर' या शब्दाला काय महत्व असते म्हणे? म्हणजे असे सांगायचे असते का की फक्त एकाच पुरुषासाठी जी असल्याचे समाजाला मान्य झालेले आहे तिला इतरांनीही जबरदस्तीने भोगले. म्हणजे या शब्दाच्या वापरातही आयडेंटिटी एका पुरुषामुळे का मिळते? स्त्रीवर बलात्कार असे का छापत नाहीत? विवाहिता असल्याने ती सेफच असेल हे गृहीतक कशावर विसंबून बनवण्यात आलेले आहे? की त्यांना असे म्हणायचे असावे की विवाहिता असूनही बलात्कार झाला. म्हणजे तीच अधिक जबाबदार आहे असे तर सुचवायचे नसावे? ही आत्ताची तीन माणसे कोण होती? त्यांना मी आज पळवून लावले म्हणून ते मला लक्षात ठेवतील का? माझ्यावर सूड उगवता यावा याची संधी शोधतील का? ही काळजी माझ्या मेंदूला का पडावी? आणि पडल्यावर मी ती झटकावी तरी का म्हणून?

जो ने रूममध्ये पाय टाकला तेव्हा निलि चक्क टक्क जागी होती आणि जोरजोरात खिदळत होती. इट वॉज टेन ट्वेन्टी! अजून निली जागी? जया लाजून चूर झाल्यासारखी जमीनीकडे बघत बसली होती. आणि अंगप्रत्यंगाचे सुस्पष्ट दर्शन होईल अश्या अर्धपारदर्शक आणि स्कीन टाईट नाईट सूटमध्ये कंबरेत अर्धवट वाकत आणि हातात पिझ्झाची प्लेट घेतलेली सिमेलिया जैन उर्फ सिम जो ला नाटकीपणे म्हणत होती.

"गुड इव्हिनिंग मॅम, यूअर पिझा... अ‍ॅन्ड यूअर पिझाबॉय"

निलि पुन्हा तोंडावर हात ठेवून खदखदून हासली. जया लाजत लाजत हासत जो कडे पाहात होती. सिम मात्र अजूनही तशीच नाटकीपणे वाकलेली होती. जो ला समजले की काहीतरी वात्रटपणा चालू आहे. मंद हासत ती पर्स फेकून टॉवेल आणि कपडे घेऊन धाडकन बाथरूममध्ये शिरली. शॉवरच्या आवाजात तिला बाहेरचे संवाद ऐकू येत नसले तरी सिमने नेहमीप्रमाणे काहीतरी टारगटपणा केलेला असणार हे तिला कळलेले होते, कारण बाहेरून निलि आणि सिमच्या हासण्याचे आवाज मात्र जोराजोरात येत होते. दहा मिनिटांनी शरीरावर साचलेली काल्पनिक वखवख बाथरूममधून ड्रेन करत जो बाहेर आली तेव्हा जया तक्रारीच्या स्वरुपात तिला म्हणाली.

"सिमला गप्प बसव गं जो"

"काय झालं काय?"

"अगं तो पिझा घेऊन येणारा मुलगा आला तेव्हा आम्ही गप्पा मारत तिघी गेटपाशीच होतो ना? तर तो मुलगा जरा स्मार्ट वगैरे होता आणि एकदम असा नीट वागत होता ना? तर या दोघी मला म्हणतायत की साखरपुडा मोड आणि त्याच्याशीच जुळव म्हणे! चांगला हॅन्डसम आहे म्हणे! काय चिडवायचे हे तरी कळते का यांना? आणि आता आपापली म्हणे फँटसी सांगा... "

सिम आता मधे पडून बोलू लागली.

"ऐक जो... त्या मुलाने अगदी जयाकडेच बॉक्स दिला... इतका हसून वगैरे बोलत होता... आणि या मुलांनाही चांगले पैसे मिळतात हल्ली"

आत्ता जो ला टारगटपणा काय आहे ते समजले. आता तीही फस्सकन हासली तशी जया वैतागलीच. ते पाहून जो तिला म्हणाली...

"अगं पतिव्रते, तुझ्या पार्टीत तूच अबोला धरलास तर पार्टी व्हायची कधी? मी म्हंटले आत्तापर्यंत ढेकरा देत असाल तुम्ही सगळ्या!"

"नो वे! आपापली फँटसी सांगितल्याशिवाय आज पिझ्झा मिळणारच नाही कोणाला! गार आधीच झालेला आहे पिझा, पण आता तो खाणेबलही राहणार नाही, तेव्हा आपापली फँटसी सांगा... पहिली जया"

खूप आग्रह झाल्यावर शेवटी जयाच्याआधी जो आणि सिमने आपापली फँटसी सांगायचे कबूल केले. निलि हासत हासत 'मी लास्ट, मी मात्र लास्ट' म्हणत राहिली.

जो बोलू लागली.

"असा एखादा माणूस, जो असावा चारचौघांसारखाच, पण विश्वासार्ह असावा, माझी काळजी घेणारा असावा, त्याच्याबरोबर ... अं... मे बी... माऊंट अबू किंवा कश्मीर... आठ दहा दिवस दोघेच... पण आधीपासून माणूस नीट माहीत असावा बाई"

जया खवळली आणि म्हणाली...

"आमचं घर जुन्या वळणाचं आहे... कधीही न भेटलेल्याशीच आम्हा बहिणींना लग्न करावे लागणार आहे"

"बरं गं बाई.... सिम... तू?"

"ओह मी? पॅरिस... किंवा स्वित्झर्लंड... वाईन... शँपेन... दोघेही टॉपलेस... हा हा हा हा... त्याच्या मसल्सचा कट अन कट लोखंडाच्या कांबीसारखा लख्खकन चमकणारा... त्याने मला अलगद उचलावे... कानात हळूवार कुजबुजावे... मग मी माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकावेत... आणि त्याने तितक्याच अलगदपणे मला बेडवर ठेवावे..."

"बाऽऽऽस... बाऽऽऽऽस... बास झाले" - जया दामटत म्हणाली... तश्या तिघी चेकाळून हासत राहिल्या.

"आता जया..."

"मी नाही सांगणार... म्हणजे असं काही नाहीच आहे माझ्या मनात"

"ऑहॉहॉहॉहॉहॉहॉहॉ..."

"त्यात काय सांगायचंय? सगळ्या जगाचं असतं तेच आमचं असणार ना?"

"अरे वा? 'आमचं' का अगदी आता?" - जो उद्गारली

"म्हणजे हिचं आणि पिझा बॉयचं" - सिमने जयाची दांडी गुल केली... रूम पुन्हा हासण्याने हादरली... जया सिमला फटके मारत होती... सिम ते फटके चुकवत धावत होती...

खूप आग्रह केल्यानंतर जयाने धीर करून सांगितले...

"काही फँटसी वगैरे नाही... एंगेजमेन्टनंतर ते मला विचारत होते लग्नानंतर कुठे जायचे... मी काहीच बोलले नाही मग म्हणाले माथेरान किंवा महाबळेश्वरला जाऊ... माझ्या तर डोक्यात हे विचारही नसतात... आता तिथे गेल्यावर ते काय करायचं ते करतील आणि मी करून घेणार... दुसरे काय?"

जया भावी नवर्‍याचा उल्लेख 'ते' असा करत आहे यावरूनही थट्टा झाली. शेवटी पिझ्झाची बॉक्स खोलण्यात आली. गार झालेल्या पिझाचा वास रूममध्ये दरवळला आणि सर्वाधिक खोडकर असलेल्या सिमने धाडकन विचारले...

"निलीऽऽऽऽ???? तू राहिलीस की??? व्हॉट्स यूअर फँटसी???"

तिघींचे चेहरे निलीकडे वळले. नीलाक्षी कस्तुरीरंगन! पण शुद्ध मराठी बोलू, समजू शकणारी! कारण तीन पिढ्या जन्मापासून महाराष्ट्रातच! निलीचा चेहरा मात्र बाहेरच्या अंधाराकडे लागलेला होता. ती उठून गंभीरपणे टेरेसमध्ये जाऊन उभी राहिली. ती अचानक इतकी सिरियस का झाली असावी हे लक्षात न आल्याने सिमने पुन्हा विचारले.

"निली.... व्हॉट्स यूअर फँटसी"

मागेही वळून न पाहता निलीने धीरगंभीर आवाजात जे उत्तर दिले... ते ऐकून पिझाचे घास तिघींच्या घशातच अडकले..

"आय वॉन्ट टू बी रेप्ड"

=======================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि, आता प्लीज खंड नका पडू देऊ हो!
मस्त मिलिता, अर्धवट वाचून थांबायला लागलं की वाईट वाटतं पण!

एका मासिकाने माझ्याकडे 'बलात्कारी माणसाची बलात्काराची मानसिकता कशी तयार होते' यावर एक विस्तृत लेख मागीतला होता >>>>

हॅट्स ऑफ टू दॅट मासिक !!