गाडा

Submitted by समीर चव्हाण on 5 January, 2013 - 00:58

तिला नव्हता वेळ पोरांकडे लक्ष द्यायला
चपात्यांच्या थप्प्याखाली गाडली गेली तिची वर्षे
आहे ते बरे आणि दिवस चालले खरे
सणासुदीला कपडे-लत्ते नाही ना हौस-मौज
उसनवारी पाचवीला पुजलेली
महिनाखेरीची चणचण जणू काही नशिबाने ठेवलेली

वीतभर पोटासाठी कोसभर जळव जीव
लांबलचक राशनच्या रांगेत रहा उभं
चार-आठाण्यासाठी दुकानदाराशी कर घिसघिस
फावल्या वेळेत लावत बस ठिगळांवर ठिगळं
अहोरात्र हात चालूच ठेव
पोरं थकून येतील त्यांना वाढ
नवरा पिऊन येईल त्याला आवर
सवड मिळाल्यास गिळून घे दोन-चार घास
आणि काढत बस सगळ्यांची उष्टी-खरकटी
त्रागा झालाच तर कर आदळ-आपट
तळतळाट झालाच तर उलथव मुडदे, हासड शिव्या
दिवस निघाला भडवा
तर रात्र कीव करीत म्हणतेय
`झोप, उद्याचा गाडा तुझी वाट बघतोय'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह.....

फार आवडलं हे काव्य.....

मला अनंतजींची ही कविता स्मरली.... काहिशी अश्याच धाटणीची...

===============================================
कपडे करा
भांग पाडा
गाडी स्टार्ट करा, निघा
गावभर मोकाट फिरा
ही टपरी तो ठेला
चहावर चहा
एखादी सिग्रेट
ह्याला भेटा त्याला बोला
ह्याला ठोका
त्याला झोडा
दिवसभर थकून भागून
संध्याकाळी घरी या
कमावून आणा न आणा
कुणीही विचारणार नाही
( सध्या तुमच्या अस्तित्वाला
अमरवेलीहून अधिक अर्थ नाही )
भाजी पोळी तयार असेल
तडस लागेतो चापून खा
नऊ साडे नऊला पुन्हा निघा
पूनम किंवा ब्लु नाईल किंवा रेड हेवन
चार पाच पेग पोटात ढकला
चार दोन फंडे चखना म्हणून गिळून घ्या

रात्री उशिरा परतून या
सुटलेल्या आगगाड्यांच्या आठवणी काढीत
झोपून राहा
झोपून राहा भडव्यांनो
सूर्य पार डोक्यावर येईतो
कुणी तुम्हाला उठवणार नाही

सध्या तुम्ही मेलात तरी हरकत नाही.

( २००६)

--डॉ.अनंत ढवळे.

==================================

कविता आवडली, विंदा आठवले.
कर कर करा.
मर मर मरा.
दळ दळ दळा
मळ मळ मळा
तळ तळ तळा
तळा आणि जळा.
हे दीर्घसे 'स्त्रियांचे स्थानगीत'..

धन्यवाद.
माझी अनुभूती किमान पंचवीस वर्षे मागची आहे.
आत्ताही थोड्याफार बदलाने असे घडत असावं असे वाटतं.

समीर