इंग्रजी कॉन्व्हेंट मुळे गुन्हे वाढले ?

Submitted by रमेश भिडे on 3 January, 2013 - 12:06

दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा दाखला देत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीवर छडी उगारली आहे. इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. आत्महत्या, हत्या, बलात्कारासारख्या घटनांना असंस्कृतपणाच कारणीभूत आहे, असा संताप सिंग यांनी व्यक्त केलाय.

शाळा, महाविद्यालये यांचा आत्महत्या व हत्यांशी थेट संबंध असल्याचे नमूद करून सिंग यांनी आपला दावा अधिक स्पष्ट करण्यासाठी क्राईम मीटरच समोर ठेवला. ते म्हणाले, ' मुंबईत १५० हत्या झाल्यास त्याच्या आठ पट घटना या आत्महत्यांच्या असतात. गंभीर बाब म्हणजे हे आत्महत्या करणारे सर्वच्या सर्व सुशिक्षित असल्याचेच आढळून आले आहे. एखाद्या अशिक्षित व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना कधीही घडलेली नाही. ' सिंग यांनी पुण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले, ' मी पुण्यात असताना तेथे तर आयटी क्षेत्रात काम करणारे तसेच इंजिनिअर्सनीही नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडल्या. '

आत्महत्या करणा-या व्यक्ती या इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांत शिकलेल्या असतात, असा दावा सिंग यांनी केला. ही पार्श्वभूमी असतानाही बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवण्याचा असतो, अशी नाराजी सिंग यांनी व्यक्त केली.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास इथली शिक्षण पद्धतीच कारणीभूत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दिल्लीत जी भयंकर घटना घडलीय तसेच मुंबईतही ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्याला मी संस्कृती मानत नाही. हा केवळ असंस्कृतपणा आहे. हे जे काही घडतय ते असंस्कृतपणाचे दुष्परिणाम आहेत. आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सध्या जे काही शिकवले जाते त्यात कुठेही संस्कार पहायला मिळत नाहीत. मुळात त्यात जीवनाचे महत्वच मुलांना समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे सगळा घात झालाय, असे सिंग म्हणाले. हे सगळं थाबवायचं असेल तर शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे स्पष्ट मतही सिंग यांनी मांडले. सिंग यांनी याआधी २००९ मध्येही आपल्या ब्लॉगमधून शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले होते.

संदर्भ- मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणही दिलं जावं असं काही म्हटलं असतं तर एक वेळ पटलं असतं. इंग्रजीचा काय संबंध?!
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं काय?

माझ्यामते शिक्षणामुळे,टिव्ही, इंटरनेट्मुळे गुन्हे वाढले आहेत. तेव्हा हे सगळं बंदच करायला हवं. हव्यात कशाला शाळा? तसंही काय उजेड पडतोय शिकून?

कॉन्व्हेंट / इंग्रजी शाळांमध्ये काय बलात्कार , हत्या कसं करायचं शिकवतात का ? तसं असतं तर पाश्चात्य देशात सगळीकडे बलात्कार आणि हत्याच हत्या दिसल्या असत्या. सिंग साहेब बहुदा कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करताहेत. कायद्याचा धाक लोकांना वाटला पाहीजे आणि पुढार्‍यांची लुडबुडही थांबली पाहीजे तर काही शक्य आहे.

<< . इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. >>
याच्याशी 100% सहमत .

यावेळी अत्याचारी अशिक्षीत होते सगळे.. की ते इंग्रजी शाळेत शिकून आले होते?
आत्महत्या करायला माध्यम लागत नसावे.

"इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते."
- हे शब्दशः खरे नसले तरी मुद्दा बरोबर आहे.
+१

मला वाटते कालपरवा दिल्लीत 11वी मध्ये शिकणार्‍या मुलीवर उच्चभ्रू वस्तीतील दोन मुलांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेचा संदर्भ असावा या वक्तव्याला ! 31 डिसेंबर च्या पार्टीत ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध मिसळून दोन आयटी अभियंत्यांनी हे कृष्णकृत्य केले .

खरच अति झालं आणि हसु आलं.. कशाचा कशाला संबंध लावायचा त्याची हाइट आहे ही.. अत्यंत मूर्ख अर्टिकल आहे हे मटा चं !
कॉन्व्हेंट स्कुल एज्युकेशन ला नावं ठेवताना हे विसरूनच गेले आहेत बातमी लिहिणारे कि स्त्रिंयां वर होणार्‍या कि सगळ्या अन्यायचं-गुन्ह्यांचं मुळ हे सो कॉल्ड भारतीय कल्चर(?) आहे .. पण नाही. एवढं सगळं झालं तरी मेरा भारत महान .. अवघड आहे !

काहिच्या काहि!
<< . इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. >> Rofl
कळत नाहि कुठल्या संस्कारांचि गोष्ट करत आहात ते. संस्कार फक्त शाळेतुनच होत नाहित. कुठले संस्कार ते तर लिहा इथे.

शिक्षणाने अहंकार वाढतो असे त्या वंदनाताई सांगतायेत. अता शिक्षणाने गुन्हेगारी वाढतीये असे हे साहेब म्हणतायेत. नकोच असे शिक्षण
चला आपण सगळे अशिक्षित आणि गरीब होऊया. नवा भारत घडवूया .

पूर्णपणे 'रूल आऊट' व्हावा असा हा मुद्दा नाही. तसेच, फक्त कॉन्व्हेंटचाही संबंध नाही. लेखाची सुरुवात कॉन्व्हेन्ट शिक्षणपद्धती अशी होऊन शेवट एकंदर शिक्षणपद्धती असा झालेला दिसतो. कोणत्याही माध्यमाच्या शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन आवश्यक झालेले आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कॉन्व्हेन्ट स्कूल्समध्ये भारतीय समाजाने अनेक शतके अनुभवलेली संस्कृती बर्‍यापैकी प्रमाणात अमान्य / दुर्लक्षित / नगण्य असते व आपोआपच मुले पाश्चात्य, अधिक मोकळ्याढाकळ्या व काहीश्या धीट संस्कृतीशी (सहसा माध्यमांद्वारे) अधिक परिचित होतात. मात्र ही मुले 'रिअल लाईफ'मध्ये भारताच्या जुन्या संस्कृतीला सामोरे जातात व त्यामुळे सांस्कृतीक दरी, अपेक्षांमधील दरी इत्यादी प्रकार घडू शकतात. याचा थेट संबंध निर्भयावरील बलात्कार प्रकरणाशी कसा हा प्रश्न पडणे साहजिक आहेच. पण शारिरीक संबंधांच्या अपेक्षा व्यक्त करण्यामागील धीटपणा जो कदाचित पाश्चात्य संस्कृतीत असेलही / असावा वगैरे, तो धीटपणा या संस्कृतीत वर्ज्य / विनयभंग स्वरुपाचा समजला जातो याचे भान सुटणे हा त्याचा एक परिणाम असू शकत असेलही. निर्भयाच्या बाबतीत निव्वळ डॉमिनेशन व पाशवी अत्याचार झाले. ते कॉन्व्हेंटमुळे झाले म्हणणे हास्यास्पद आहे. पण प्रादेशिक दृष्टीने (भारत, अमेरिका, थायलंड, अरबस्तान हे उदाहरणार्थ प्रदेश म्हणून पाहिल्यास) भारतात दिल्या जाणार्‍या कोणत्याही शिक्षणप्रणालीत वा माध्यमात सेक्स एज्युकेशनचा समावेश अपरिहार्य वाटत आहे आणि जर माध्यमामुळे विद्यार्थी भारतबाह्य संस्कृतीशी (जसे धीट पाश्चात्य संस्कृती) अधिक जवळीक दाखवत असतील तर तेथे अधिक कटाक्षाने तो सिलॅबसचा भाग बनवला जायला हवा ही अपेक्षा अगदीच गैर नसावी.

पुढचा विचार असा की सेक्स एज्युकेशन हेही प्रादेशिक संस्कृतीनुसार बदलू शकेल. म्हणजे, 'सेक्स म्हणजे काय' इतकेच ते एज्युकेशन नसेल, तर त्या त्या प्रदेशातील संस्कृतीनुसार 'सेक्ससंदर्भातील' अलिखित विधिनिषेधही शिकवले जातील. म्हणजे, भारतात जर सेक्स एज्युकेशन सिलॅबसचा भाग बनलाच, तर फक्त सेक्स म्हणजे काय, तो कसा करावा, कधी, कोणासह करावा एवढेच शिकवून शाळा थांबणार नाहीत तर आपल्या संस्कृतीत त्या संदर्भात साधारणपणे काय अपेक्षा असतात याचेही भान देतील. यातूनच कॉन्व्हेंटवर टीकेची झोड का उठवली गेली असावी याचे एक सहज न पटणारे, पण एक 'शक्य' असलेले कारण मिळू शकेल.

यातून अजिबात असे म्हणायचे नाही की बलात्कार समर्थनीय आहे, त्याला शिक्षणपद्धतीच फक्त जबाबदार आहे, कॉन्व्हेंटच जबाबदार आहे, निर्भयावर अत्याचार करणार्‍यांना वरील प्रतिसाद लागू आहे वगैरे! बलात्कार हा फाशीच्या शिक्षेच्याही पुढचा अपराध आहे, पण हजारोजण आपापले विश्लेषण आपापल्या दृष्टिकोनातून आज सळसळून सांगत आहेत त्या प्रवाहात हेही एक कारण असेल की नाही याबाबत फक्त एक मत सांगणार्‍याच्या त्या मताबाबत मनातील विचार नोंदवले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आकडेवारीचे माहिती नाही, पण मला जे वाटते ते लिहित आहे

पुर्वी म्हणजे ८० ते ९० च्या दशकापर्यंत जशा प्रकारचे शिक्षक होते तसे नंतरच्या काळात राहिले नाहीत. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करून राजकारण्यांनी शिक्षणक्षेत्राचा व्यवसाय करून टाकला या दोन मोठ्या कारणांमुळे गेल्या काही पिढ्यांमधे (भले ते भारी भारी ठिकाणी शिकले असोत) संस्कारांचे प्रमाण कमी दिसते.
आणखी एक कारण म्हणजे विभक्त कुटूंब पद्धती.

शाळेत जाणार्‍या मुलांवर जास्त संस्कार हे शाळेतच होत असतात. त्यामुळे सिंग यांचा मुद्दा बर्‍याच प्रमाणात पटण्यासारखा आहे. आणि सिंग यांनी अशी विधाने करताना काही विचार करूनच केली असतील ना ? की नाही ?

सगळे बलात्कारी कॉन्वेंटशिक्षित आहेत बरं का काकू बाई!!!

>> कॉन्व्हेन्ट स्कूल्समध्ये भारतीय समाजाने अनेक शतके अनुभवलेली संस्कृती बर्‍यापैकी प्रमाणात अमान्य / दुर्लक्षित / नगण्य असते व आपोआपच मुले पाश्चात्य, अधिक मोकळ्याढाकळ्या व काहीश्या धीट संस्कृतीशी (सहसा माध्यमांद्वारे) अधिक परिचित होतात

नक्की कशामुळे प्रॉब्लेम आहे? कॉन्व्हेन्ट्समुळे की माध्यमांमुळे? माध्यमं सगळ्याच मुलांना सारखीच उपलब्ध असतात की!

इंग्रजी शाळा की कॉन्व्हेंट इंग्रजी शाळा ते आधी नक्की करा. फरक आहे ! साध्या इंग्रजी शाळेत हिंदु धर्माचेच संस्कार केले जातात किंवा मग सगळ्या धर्मांतले सण, परंपरा ह्यांची माहिती दिली जाते. कॉन्व्हेंटमध्ये ख्रिश्चन धर्मातल्या गोष्टी, गाणी, सण ह्यांवर भर असतो. बाकी अभ्यासक्रम त्या त्या बोर्डाच्या / राज्याच्या / देशाच्या गाईडलाईन्सप्रमाणेच असतो. बाकी कुठल्याही शाळेत मूल्यशिक्षणच दिले जाते.

शाळेतले शिक्षक ( जे शाळेआधी समाजाचा हिस्सा आहेत ) भले बाहेरच्या प्रॅक्टिकल जगात तगण्यासाठी भ्रष्टाचार करत असतील, नियम न पाळता गाड्या चालवत असतील, स्त्रियांचा आदर करत नसतील असे मानले तरी थिओरेटिकली वर्गात चांगले वागण्याचेच धडे मुलांना देणार. आणि शाळेतली मुले जी प्रत्यक्ष आयुष्यात वेगळेच काही शिकणार आणि शाळेतले आदर्श शिक्षण केवळ पुस्तकापुरतेच राहते असे बघणार. आणि आपण शाळेवर , विभक्त कुटुंबपद्धतीवर, कमी कपडे घालून फिरणार्‍या मुलींवर, नोकरी करणार्‍या आयांवर टीका करणार पण आपल्या समाजात आता एक किमान कायदा आणि सुव्यवस्था बाणवायची अत्यंत निकड आहे. नियम असतील आणि ते पाळले जात असतील तर समाजात बर्‍यापैकी शिस्त येऊ शकते. ती आल्यावर बाकीच्या प्रश्नांवर काम करायला फुरसत मिळते हे आपल्या कधीच लक्षात नाही येणार.

पोलीसखात्याची, सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी चाललेली दिशाभूल आहे हे कुणालाही समजेल.
उद्या म्हणाल की रस्त्यांवर अपघात होतात त्यालाही शाळेतले चुकीचे शिक्षणच जबाबदार आहे.

नक्की कशामुळे प्रॉब्लेम आहे? कॉन्व्हेन्ट्समुळे की माध्यमांमुळे? माध्यमं सगळ्याच मुलांना सारखीच उपलब्ध असतात की!<<<

कशाकडे किती आकर्षित व्हायचे याचा चॉईस (इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ पॅरेंट्स गाईडन्स) शाळेतील वातावरणामुळे प्रभावित होऊ शकतो.

(मेंदी काढून आलेल्या मुलीला घरी पाठवणारी कॉन्व्हेंट शाळा हे एक उदाहरण आठवू शकेल. बेसिकली, प्रादेशीक संस्कृतीबाबत असायला हवे असलेले गांभीर्य कॉन्व्हेंटमध्ये कमी असते हे अगदीच अमान्य व्हावे असे वाटत नाही).

(टीप - तसेही, निव्वळ कॉन्व्हेंटला जबाबदार मानणे हास्यास्पद आहे असेही एक विधान माझ्या प्रतिसादात आहे)

>>शारिरीक संबंधांच्या अपेक्षा व्यक्त करण्यामागील धीटपणा जो कदाचित पाश्चात्य संस्कृतीत असेलही / असावा वगैरे, तो धीटपणा या संस्कृतीत वर्ज्य / विनयभंग स्वरुपाचा समजला जातो याचे भान सुटणे हा त्याचा एक परिणाम असू शकत असेलही. >> असहमत!

कुठल्याही संस्कृतीत विनयभंग हा विनयभंगच असतो. No means No हे समजूनच घ्यायचे नसेल तर शिक्षणाचे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो? देशातील लोकप्रतिनिधींवर रेपचे चार्जेस आणि तरीही संस्कृतीचे गोडवे ?

कुठल्याही संस्कृतीत विनयभंग हा विनयभंगच असतो<<<

अगदी गेलेच काही महिने काही इंग्लिश सिरिअल्स पाहात आहेत ज्यात विनोदी, क्राईम रिलेटेड व गंभीर अश्याही सिरिअल्स आहेत. इफ दे आर एनी रिप्रेझेन्टेटिव्ह्ज ऑफ व्हॉट माईट बी हॅपनिंग देअर, आय अ‍ॅम नॉट एन्टायरली राँग, असे आपले वाटते.

>> No means No हे समजूनच घ्यायचे नसेल तर शिक्षणाचे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो?
नो कुठल्या भाषेत म्हटलं त्याने फरक पडत असेल. (दात विचकायचा मोह विषयाच्या गांभीर्यामुळे टाळत आहे. पण शीर्षकात मांडले गेलेले विचार हास्यास्पदच आहेत.)

स्वातीताई, मला असे वाटते की तुमचा ००.०० (मला ही वेळ दिसत आहे) चा प्रतिसाद नुकत्याच घडलेल्या घटनेच्या स्मृतीने प्रभावित आहे. थंडपणे पाहिल्यास कॉन्व्हेंटमधील मुले मुली या मराठी माध्यमातील मुले मुली यांच्यापेक्षा अधिक साहसी वर्तन करतात याचे कारण आपण त्यांची आर्थिक परिस्थिती, एक्स्पोजर, लवकर आलेले ज्ञान यांना देणार की पाश्चात्य संस्कृतीशी लवकर झालेल्या परिचयालाही किंचित महत्व देणार?

१. पुर्वीच्या शिक्षकांसारखे शिक्षक आहेत का ते सांगा ना ? मुळात शिक्षकांमधे एवढा बदल का झाला ?
२. इंग्रजी माध्यमाने अनेक नको असलेल्या गोष्टी आणल्या. आवडी निवडी बदलू लागल्या, जुन्या प्रकारचे संस्कार जाचक आणि अडगळीसारखे वाटू लागले.

सिंग साहेब कोणत्या शाळेत शिकले? आणि त्यांची मुलं / भाचे / पुतणे / नातवंड वगैरे कोणत्या शाळेत जातात याबद्दल फार उत्सुकता आहे.

<इंग्रजी माध्यमाने अनेक नको असलेल्या गोष्टी आणल्या. आवडी निवडी बदलू लागल्या, जुन्या प्रकारचे संस्कार जाचक आणि अडगळीसारखे वाटू लागले>

हे कळलं नाही. माझ्या समजुतीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांना एकच अभ्यासक्रम असतो. या 'नको असलेल्या गोष्टी' कुठल्या? आत्महत्या केलेले शेतकरी, दिल्लीत बलात्कार करणारे इंग्रजी माध्यमात शिकले होते?

>>>माझ्या समजुतीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांना एकच अभ्यासक्रम असतो. <<<

नको असलेल्या गोष्टी, यातून त्यांना 'अभ्यासक्रम' अभिप्रेत नसावा असे मला वाटते.

बहुधा वातावरण, अभिरुचीचा विकास इत्यादी अभिप्रेत असावे.

उद्या गाईच्या शेणाने सारवलेल्या जमिनी नसतात म्हणून हे सगळे होते असेही म्हणतील....
हास्यास्पदच्याही पलिकडचे आहे हे सगळे.

अरेरे गंभीरपणे विचार करणे दूरच पण हे विचार हास्यास्पद वाटत आहेत म्हणजे परिस्थिती जास्तच गंभीर आहे. Sad

अर्पणा, भारी आहे आर्टिकल. Happy

जमीनी शेणानी सारवलेल्या नाही हे कारण तर आहेच पण ह्याला आळा कसा बसेल ह्याचा विचार सुद्धा सिंग, माननीय लेखक आणि काही पोस्टकर्ते ह्या सगळ्या दूरदर्शी लोकांनी आधीच करुन ठेवला आहे. स्वतःची घरं शेणानी सारवून झाली की उरलेल्या शेणात स्वत:चे गंभीर विचार, गंभीर वक्तव्ये हे मिसळून त्याचे शेणखत मायबोली किंवा इतरत्र अंतरजालावर घालणे हा सगळ्यात जालिम आणि कल्याणकारी उपाय त्यांनी शोधला ह्याबद्दल त्यांचे कौतूक करावे तितके थोडे आहे.

विचारांना शेंडा बुडखा नसेल तर चालेल मात्र हे आधुनिक शेणखत मात्र असायलाच हवे!

>> उद्या गाईच्या शेणाने सारवलेल्या जमिनी नसतात म्हणून हे सगळे होते असेही म्हणतील....
+१००

हल्लीच्या आयाही नोकरी करतात, त्यांना करियर करायचं असतं म्हणून हे गुन्हे वाढीला लागलेत असं वाटत नाही कुणाला?

ऊगाच मुद्द्याभोवती फिरुन मूळ मुद्याला बगल देण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक क्शेत्रात बदल होतच रहाणार. त्यात media, education, सामाजिक आणि इतरहि सर्व आले. स्त्रियांवर होणार्या अत्याचारांबद्दल ह्या सगळ्या बदलांना जवाबदार धरण्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं. जेव्हा प्रगल्भ (तांत्रिक) माध्यमं नव्हती, शिक्शण-पद्धती आणि अभ्यासक्रम आत्तापेक्शा वेगळे होते, तेव्हा स्त्रियांवर अत्याचार होत नव्हते असं नाही. पार गुरुकुल पध्दतीतून शिकून आलेल्या दु:शासनाने सुध्धा वहिनीच्या वस्त्राला भर सभेत हात घातलाच होता. मला कल्पना आहे कि हे उदाहरण पुराण्कालीन आहे. पण, ऊठ-सूट आपल्या संस्क्रुतीचे दाखले देणार्यांसाठी हे मी लिहीतोय. मुळातच आपला स्त्रियांकडे बघण्याचा द्रुश्टिकोन हा एका पुरुश-प्रधान संस्क्रुतीतुन येतो. स्त्री ला दुय्यम समजण्यातून तिच्यावर अत्याचार करण्याची मनोभुमिका तयार होते. मुळातच हे चुकीचं आहे, हे मान्यं करून त्यात बदल घडवणं हे गरजेचं आहे. स्त्रियांच्या वेश-भुशा, केश-भुशा, समाजातला वाढलेला वावर ह्या व अशा कुठल्याही घटकांना दोष देण्यापेक्षा (हे बदल तर होतच रहाणार. नऊवारीतून स्त्रिया पाचवारीत आल्या तेव्हाही समाजधुरीणांच्या भुवया उंचावल्या होत्याच. स्त्रिया घराबाहेर पडल्या - नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने तेव्हाही लोकापवाद झालाच होता. सायकल आणी नंतर वहान चालवणार्या स्त्रियांकडे सुद्धा वाकड्या नजरेनं पाहिलं गेलच होतं) स्त्रियांना आदराने, बरोबरीने आणि योग्य असेल तेथे मोठेपणाने सुद्धा, वागवण्याचं समाज-शिक्षण होणं गरजेचं आहे.

१. पुर्वीच्या शिक्षकांसारखे शिक्षक आहेत का ते सांगा ना ? मुळात शिक्षकांमधे एवढा बदल का झाला ? >>> महेश पालक पुर्वीच्या पालकांसारखे आहेत का ? राजकारणी आधीच्या राजकारण्यांसारखे आहेत का ? पोलीस आधीच्या पोलिसांसारखे आहेत का ? असाही प्रश्न पडायला हवा.

Pages