सविताची वेदना

Submitted by सौ. वंदना बर्वे on 6 November, 2012 - 13:27

आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात. फक्त माणसच भेटतात असं नाही तर त्यांचे अनुभवही भेटतात. तो अनुभव आपल्या अनुभवांशी, विचारांशी पडताळून पाहण्याचा मोह आवरू म्हणता आवरत नाही. माझ्या सारख्या स्त्रिया टिव्ही मालिका बघतात तेंव्हा नेमकं काय बघतात? अनेक पुरुषांचं टिपिकल उत्तर असेल भरजरी साड्या व भरजरी भानगडी. स्त्री ही मुळातच संवेदनशील असल्याने, ती त्या मालिकेमधल्या पात्रांशी समरस होते. त्यांचे प्रोब्लेम्स तिला आपले वाटतात. समरस व्हायला संवेदनाच असून भागत नाही, वेदनाही असावी लागते.

माझ्या छोटीला हेडगेवारमध्ये पोहोचवायला जाते तेंव्हा बसमध्ये अनेक अनुभव ऐकायला मिळतात. तिला शाळेत सोडली की मग मोकळा वेळ असतो तेवढ्यात आम्हा मैत्रिणींचे गप्पांचे फड रंगतात. त्यातून अनुभवांचं वेचण आणि माझ्या मनाला पडलेले ओरखडे मी आपणासोबत शेअर करणार आहे. ह्या सर्व गप्पात बहुतांशी अनुभव हे "स" वर्गातले असतात. म्हणजे सासू, नणंद, जाऊबाई वगैरे, वगैरे. साधारणत: एकत्र कुटुंबातले. मला मनाला भिडतात ते अनुभव मात्र ज्याच्यासाठी आपण सर्वस्व वेचतो त्या आपल्या सौभाग्याचे.

परवा अश्याच गप्पा रंगात आल्या होत्या. पण सविताचं काही लक्ष नव्हतं. हल्ली बऱ्याचदा ती हरवलेलीच असते. आमच्यापैकी कुणीतरी तिला हटकलं व ती भानावर आली.

"किदें गो किदे जाले?" निलम
"कांय ना"
निलमने मला कोपरखळी मारली. ह्यातल्या कांय शब्दामधलं "कां" आणि "य" अंतर जितकं मोठं तितका प्रॉब्लेम मोठा, हे आमच्या निलमचं लॉजिक.
"हास गो पापया. शितलान जोक सांग्ला"
"हय, हांवे आयकूंक ना"
"खंय पाविल्ले?"
मग एकदम अचानक तिच्या शेजारीणीला आठवण झाली. तिनं सगळा भांडाफोड केला. बिचाऱ्या सविताचा चेहरा बघवेनासा झाला.
"आगो तिचो घो फक्त फेसबूकार पडिल्लो आस्ता".

झालं. सगळ्याजणी फेसबूकवर चर्चा अगदी तोंडाला फेस येइपर्यंत करू लागल्या. सविताचं दु:ख तिथच उरलं.

सविताचा प्रेमविवाह. पाच सहा वर्षे झाली लग्नाला. तो तिच्यासाठी खूप जीव टाकायचा. घरच्यांचादेखिल प्रेमाला विरोध वगैरे नसल्याने लग्न सुरळीत पार पडलं. पहिली दोन वर्षे अगदी स्वप्नातल्या सारखी गेली. सविताच्या पदरी एक मुलगी आली. इथुन पुढे हळूहळू अडचणींना सुरूवात झाली. मुलीच्या संगोपनाकरिता असलेली नोकरी तिने सोडली. घरच्यांचं, मुलीचं करण्यात दिवस कसा जात असे तिलाच कळायचं नाही.

त्याच्यात बदल होवू लागला. तो कमालीचा विचित्र वागू लागला. घरात पाउल टाकल्या टाकल्या कंप्युटरच्या पुढ्यात जावून बसू लागला. चहा, रात्रीचं जेवण तिथेच. दिवसभरातल्या घरच्या कामामुळे, दगदगीमुळे सविता पडल्यापडल्या झोपायची. तो कधी येवून झोपायचा तिला कळायचही नाही. सकाळी उठून पुन्हा रहाटगाडगं सुरूच. हा बदल घडत असताना सुरूवाती सुरूवातीला वाद व्हायचे, नंतर तेही बंद झाले. वाद संपले आणि संवादही.

सविताच्या मोठ्या अपेक्षा नाहीत. परवा त्याला आवडतो म्हणून तिने मुद्दाम शिरा केला होता. वर काजू, पिस्ता बदामही सजवले होते. अत्यंत रूक्षपणे त्याने तो खाल्ला आणि ऑफिसला निघून गेला. शिऱ्याबरोबर आयुष्यातला गोडवाही नाहिसा झाला. आधी शिरा केला की कौतुकाचे वर्षाव व्हायचे. माझी आवड किती जपतेस असं सविताला म्हणत तो खूपच हळवा व्हायचा. लहान मुलासारखा सविताच्या कुशीत शिरून रडायचा.

तिला फक्त कौतुकाचे दोन शब्द हवे होते. ज्यांना ती पारखी झाली होती. सहजीवनामध्ये स्त्रीला दहा सहस्र हत्तींचं बळ यायला नवऱ्याचे कौतुकाचे दोन तीन शब्दही पुरतात. "किती राबतेस सर्वांसाठी" कौतुकाचे एवढेस्से तीन शब्द तिचे सगळे श्रम सार्थकी लावतात. तक्रार त्रासाबद्दल नाही, त्या त्रासांचं त्याला काही पडलेलं नाही ह्याचाच प्रचंड त्रास होतो. ज्यांनी जन्म दिला त्यांना सोडून ज्याच्यासाठी यावं, त्यालाच आपल्या वेदनांची जाणीवही नसावी याउपर दु:ख ते काय? त्याहीपुढे जावून आपल्या सुखातही त्याला सुख वाटू नये हे दु:ख तर मनस्वी स्त्रीला जिवंतपणी जाळतं. सविताची वेदना नेमकी हिच आहे.

सौ. वंदना बर्वे
barve.vp@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका आटपाट नगरात माधव आणि सुधा प्रेमानं संसार करत होते. दोघंही एकमेकांना जपत, एकमेकांची मनं सांभाळत छानपैकी जगत होते. माधव ऑफिसमधून घरी आला की त्याच्या आवडीचा पदार्थ, गरम गरम चहा करून, छानपैकी नटून सुधा त्याचं स्वागत करत असे. एकंदरीत मस्त चाललं होतं.
पण अलिकडे काय झालं कोण जाणे.. सुधाचं माधवकडे दुर्लक्ष होऊ लागलं. सुधा सदानकदा कंप्युटरपुढे
बसलेली असे. माधव बाहेरून आला की सुधा त्याला '' मस्त आलं घालून चहा बनव बघु'' असं सांगायला लागली. तो तिच्याशी काही बोलायला लागला की, '' थांब रे जरा. तुला दिसत नाहीये का मी काहीतरी लिहितेय ते.. माझी लिंक तोडू नको!'' असं म्हणायला लागली. तर कधी '' मी गप्पा मारतेय रे इथे.'' '' मी वाचतेय काहीतरी आणि तू किती डिस्टर्ब करतोयस'' असं डाफरून बोलायला लागली.
सुधाची आईसुद्धा एकदा चिडून तिला म्हणाली, की मायबोली मायबोली करतेस आणि ''माय''शी
बोलायला वेळ नाही तुला! तेव्हा माधवला कळलं की हिला मायबोलीचं व्यसन लागलंय.
पण आता वेळ हाताबाहेर गेलीय आणि माधव पहिली पतीभक्तपरायण सुधा परत मिळवण्यासाठी
देवाला साकडं घालतोय!!

वंदना,
सविताची वेदना तुम्ही छान मांडलीय. मलाही माधवची वेदना लिहावीशी वाटली.
''एकंदरीत मस्त चाललं होतं'' हे माधवच्या दृष्टीनं जास्त असावं.
लिहिणा-या, वाचणा-या, माधवला चहा करण्याचं फर्मान सोडणा-या सुधाला पाहून आता खरं मस्त चाललंय असं वाटतंय. हे माझं वैयक्तिक मत! Happy

अनिताताई , १००००००+ !!
मी हेच लिहायला आले होते Happy मायबोलीचे व्यसन जबरदस्त आहे त्यापुढे फेसबूक कीस झाड की पत्ती Proud

माझ्या सारख्या स्त्रिया टिव्ही मालिका बघतात तेंव्हा नेमकं काय बघतात? >>
सौ. वंदना ताई , तुम्हाला कळकळीची विनंती. ते हिन्दी , मराठी डेली सोप बघणे बंद करा हो जरा. प्ली$$$$ज!!!
संसार , घर आणि नवरा या तिघांशीही दुरान्वयानेही संबंध नसलेला एखादा लेख टाका बरे.

पुर्वीच्या (एकीव) गोष्टी एकून मला तर अजूनही आश्चर्य वाटते ते जोडप्याला इतकी फुले (देवाघरची .. हो) होवून सुद्धा नवर्‍याकडे न बघता लाजून 'इकडून चहा घेणार ना..' विचारत.. हायला काय काळ होता तो.. Proud

डेलियाजी,

<संसार , घर आणि नवरा या तिघांशीही दुरान्वयानेही संबंध नसलेला एखादा लेख टाका बरे.>

Lol Lol Lol

अवश्य टाकेन. थोडा वेळ द्या.

सौ. वंदना बर्वे.

माझी आजी देखील मला हेच सांगायची आमच्यावेळी आम्ही (आजी-आजोबा) एकमेकांशी जास्त बोलायचो नाही. सर्वांसमोर किंवा मोठयांसमोर नवरयाशी बोलणे म्हणजे तर अशक्यच.... त्यामानाने आता तर खुपच चांगली परिस्थिती आहे.

पण माझी एक शंका "काकस्पर्श" चित्रपटात तर सर्वच जोडपी बरयापैकी एकमेकांशी बोलत असतात.

बाकी वंदनाताई तुमच्या मैत्रिणीला सविताला तिच्या नवरयाशी नीट आणि स्पष्ट बोलायला सांगा. अहो शेवटी तो नवराच आहे ना कोणी परका तर नाही त्यात तो तिचा पुर्वाश्रमीचा प्रियकर देखील आहे मग तर गुंता अजुन सोपा आहे सोडवायला. तिला तिच्या नवरयाकडुन काय काय अपेक्षा आहेत हे ती बोलल्याशिवाय त्याला कसे समजणार. नुसते मनात कुढत बसुन प्रश्न सोडवता नाही येणार. सविताची वेदना लवकरात लवकर बरी होवो हिच सदिच्छा Happy

Pages