तेजोभंग

Submitted by प्रकाश कर्णिक on 31 December, 2012 - 04:51

tejobhang.jpgहरीअप्पा प्रभुदेसाई नेहमी प्रमाणे बरोबर गजर होण्याच्या काही क्षणच अगोदर जागे झाले. खरं तर आज तरी असं होण्याचं काही कारण नव्हतं. त्यांनी आजचा पहाटे पाचचा गजर लावला होता जरी नेहमी ते साडे पाचला उठत. त्यांना आपल्या शिस्तीचं कौतुक वाटलं. ते जागे पण उजव्या कुशीवर झाले होते याचा अर्थ आजचा दिवस चांगला सुरु झाला असा त्यांनी कयास बांधला. आपल्या शिसवी पलंगावरून त्यांनी पाय खाली घेतले आणि ते उठून बसले. पलंगावरील त्यांच्या डाव्या बाजूच्या खिडकीकडे त्यांनी नजर टाकली पण बाहेर अजून अंधारच होता. समोर भिंतीवर पाहून त्यांनी श्रीदेव रवळनाथच्या फोटोला नमस्कार केला आणि तोंडावर हात फिरवून ते उठून उभे राहिले. पन्नाशीच्या जवळपासही त्यांची सहाफूटी शरीरयष्टी अजुनही ताठ होती याचं सर्व श्रेय हरीअप्पा पुर्वजांच्या पुण्याईला देत. वडील वासुदेव आणि आई देवकी जरी अकाली गेले असले तरी आजोबा आणि आजीनी त्यांचं संगोपन केलं होतं आणि आजोबांच्या वृद्धापकाळातील ठणठणीत प्रकृतीवरून तरी हा निष्कर्ष ते सिद्ध करू शकत होते. पण आजोबा जाऊन दोन वर्षे झाली आणि त्यांच्या पाठोपाठ आजीनंही वर्षभरात इहलोक सोडला. आज आजीचं पाहिलं वर्षं श्राद्ध होतं.

हरीअप्पांनी पलंगावर नजर टाकली. शारदा गाढ झोपली होती. तिच्या गोऱ्यापान चेहेऱ्यावर निरागस भाव होते. त्यांचा स्वतःचा रंग सावळा होता त्यावरून ते शारदाला विनोदाने म्हणत “मी श्रीकृष्ण आणि त्याचे दुसरे स्वरूप रवळनाथ यांच्या पठडीतला आहे म्हणून सावळा पण तू आहेस नं गोरी माझ्या आजीसारखी. तुझ्यामुळे तर आपला संतोष गोरा झाला.” शारदा अजुनही तितकीच सुंदर दिसत होती जशी त्यांनी पहिल्यांदा फर्गुसन कॉलेजच्या प्रांगणात तिला पाहिलं होतं. स्थूलपणा आणि केसातली रुपेरी छटा सोडली तर तिच्यात फारसा बदल झाला नव्हता पण हरीअप्पांचे केस मात्र पांढरे होण्याच्या आतच गायब झाले होते. दोन वर्षं सायन्स मधे आपटी खाऊन आजोबांच्या त्यांनी डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला पूर्णविराम दिल्यावर निदान घराण्यातला पहिला पदवीधर होण्याच्या सन्मानासाठी बीएला प्रवेश घेतला होता तेंव्हा त्यांच्या एका मित्रानं शारदा गोगटेशी ओळख करून दिली होती. शारदाने त्यांच्याकडे तिच्या घाऱ्यानिळ्या डोळ्यांनी वर पासून खाल पर्यंत न्याहाळून प्रश्न केला “हरीअप्पा? हे काय नाव झालं? आमच्या पुण्यात अप्पा, अण्णा, दादा आणि भाऊ अशी जोडाक्षरं जाऊन एक पिढी उलटली आहे” त्यावर हरीअप्पांनी ओशाळून खुलासाही केला “ते काय आहे की मी माझ्या पणजोबां सारखा नवसानं झालो म्हणून मला त्यांचं नाव ठेवलं गेलं.”
“असं तर. तुमच्याकडे मुलं नवसानं होतात. बरं आहे, तसदी घ्यायला नको.” एक मित्र बोलला त्यावर सगळे हसले. “एवढंच नाही तर आमच्याकडे देवाला कौल लावतात. माझ्या अगोदर तीन बहिणी आहेत आणि मुली होणार असाच कौल प्रत्येक वेळी मिळाला होता असं आजोबा सांगतात.” हरीअप्पा चिडून बोलले, त्यावर दुसरा मित्र म्हणाला “म्हणजे सुप्रीम कोर्टात अपील म्हण ना, काय?”
शारदा म्हणाली “माझा नाही असल्या गोष्टींवर विश्वास. माझे वडील वकील आहेत आणि ते म्हणतात की देवाच्या दरबारात तर सर्व काही कायद्यानुसार होतं. माणसांनाच फक्त न्याय मागायला लागतो, कोर्टात.”
हरीअप्पा म्हणाले “छान. म्हणजे निदान तू देवावर तरी विश्वास ठेवतेस म्हणायचं.”

या गोष्टीला आता अडीच दशकं होऊन गेली होती. शारदा त्यांच्या अनेक मतांशी कधीच सहमत झाली नाही पण बरीच वर्षं अपत्य नं झाल्यानं आजीच्या आग्रहास्तव तिने आणि हरिअप्पांनीं रवळनाथाकडे गाऱ्हाणं घातलं आणि नवस बोलल्यावर संतोष जन्मला होता. शारदाचं मत त्यानंतर बदललं की नाही याची हरीअप्पांना कधीच शहानिशा झाली नाही परंतु शारदानं त्यांच्याशी तात्विक वाद घालणं मात्र सोडून दिलं आणि त्यांच्या कुठल्याही पारंपारिक आणि वैचारिक भूमिकेला तिने आडकाठी आणली नाही. पण आजी गेल्यापासून सर्व बदलून गेलं होतं आणि शारदा अधिकच अबोल आणि अलिप्त झाली होती.

शारदा एक तर गोगटे वकीलांची एकमेव कन्या आणि ती सुध्दा पुण्यासारख्या सुधारक आणि वैचारिक स्वात्यंत्र्य असलेल्या पुरोगामी शहरात वाढलेली अतिशय तर्कशुद्ध विचारसरणीची. शिक्षणात अग्रेसर, समाजवाद आणि जर्नालिझम घेऊन उच्च पदवीधर झालेली शारदा त्यांना कशी वश झाली याचं हरीअप्पाना आश्चर्य वाटे. शारदाला पुण्याचं स्वात्यंत्र लग्नानंतर गावात मिळालं असत तर तिनं कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र पण घातलं नसतं पण हरीअप्पांच्या नशिबानं आजीसमोर इतका पुरोगामीपणा शारदानं दाखवला नव्हता. रंग, रूप किंवा शिक्षणात नैपुण्य जरी नसलं तरीही हरीअप्पा शरीरयष्टीनं उत्कृष्ट आणि टेनिस खेळण्यात पारंगत होते. त्यांचा स्वभाव म्हणावं तर कर्मठ आणि गर्विष्ठ होता आणि म्हणावं तर परंपरावादी आणि अभिमानी होता हे पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावर विसंबित होतं. त्यांचा आपल्या ज्ञातीचा जाज्वल्य अभिमान कधीकधी दुसऱ्या जाती जमाती विषयी असलेली तुच्छता दर्शवून जात असे. पण हरिअप्पानी कधीही दुसऱ्यांविषयी अपशब्द काढले नव्हते हे खरे. हरीअप्पा हे पूर्णतः आत्मकेंद्रित होते. मी, आम्ही आणि आमचे याच्या पुढे जाण्यात त्यांना निरुस्साह असे.
कॉलेजात त्यांना बोलकं करायला त्यांचे मित्र एकमेकांना खूण करून हमखासपणे मासळी किंवा कोंकणी या दोन शब्दांचा वापर करत आणि मग मजा पहात. त्यांचं लग्न होई पर्यंत शारदानं सुध्दा त्यांच्या या कमकुवतपणाचा फायदा घेतला होता.
मासळीचा उल्लेख जरी झाला तर हरीअप्पा म्हणत “पुण्यात कसली आली आहे मासळी. आमच्याकडे या मग तुम्हाला खायला घालतो एक एक पदार्थ. माझी आजी एकदम मस्त जेवण करते. तुम्ही पुणेरी लोकं आपलं सुधारस किंवा फार तर श्रीखंडावर भागवा तोपर्यंत.”
त्यांच्या या वक्तव्यावर एकदम गदारोळ माजे. शारदा मधेच म्हणे “अरे तुम्ही स्वताला ब्राम्हण समजता, अंगावर दोरा जानवं म्हणून चढवता आणि मांसाहार करता? चक्क ढोंगीपणा नाही का हा? नाहीतर आम्ही पहा, पूर्णतः शाकाहारी, घासफूस खाणारे म्हणा हवं तर.”
हरीअप्पा परत बळी पडत आणि समजवायचा प्रयत्न करत “ते असं आहे की जेंव्हा परशुरामाने वरुणाचा पराभव करून सागराला घेतलेली जमीन परत द्यायला सांगितलं तेंव्हा पासून मासळी खाण्याची मुभा मिळाली आम्हाला, नवीन नाही काय हे.”
त्यावर त्यांचा मित्र देशपांडे कोटी करत म्हणाला “सागराने सगळी जमीन खारट केली ज्यावर नारळा शिवाय काही पिकणं शक्य नव्हतं म्हणून थोडी समुद्रातील भाजी म्हणजे मासे भरपाई म्हणून देऊ केली असावी. बहुतेक पाककृतीचा ग्रंथ पण दिला असणार तेंव्हा”
सगळेजण हसायला लागले तेव्हड्यात ढसाळनं प्रश्न विचारला “परशुराम म्हणजे आपल्या आईचा मर्डर केलेला दाढीवाला नव्हे?”
कोणीतरी म्हणालं “अरे तोच तो. फार डेंजर माणूस होता. त्यानं म्हणे नुसत्या कुऱ्हाडीनं हजार वेळा जेनोसाईड केला.”
“हिटलरच म्हणा की राव“ शेळके उद्गारला “किंवा हिटलरच त्याचा अवतार असेल.”
‘हो असेल सुध्दा, कारण परशुरामाला मरण नाही जसा अश्वथामा अमर आहे.” पंडित गंभीरपणे म्हणाला
“मी एक दलित कवीची कविता वाचलेय तीचं नाव आहे अश्वथामा म्हणजे दलित, जो देवाचा शाप घेऊन जगाच्या अंतापर्यंत फिरत राहील असं कवी म्हणतो.” ढसाळ म्हणाला
“ए, तुम्ही लोकं काय रे एवढं सिरीअस बोलता? आपण मच्छी बद्दल बोलत होतो.” देशपांडेनं मुद्यावर यायचा प्रयत्न केला.
“देशपांडे, पण तुझं काय? तुला खाताना पाहिलंय म्हणून विचारतो.” हरीअप्पानी प्रश्न केला
“मी पक्का खाणारा! सगळं खातो. आपले नखरे नाहित, काय? आई मुरुडची, दिघे. तिला कोळीणीची हाळी ऐकू येताच अंगात एकविरा संचारते. बाबा अर्धवट, आज खाऊ का नको असा प्रश्न सदैव त्याना पडलेला असतो ऑथेल्लो सारखा.” देशपांडे म्हणाला
“ऑथेल्लो नव्हे रे गाढवा हँम्लेट आणि त्याच्या अगोदर अर्जुन, शेक्सपिअरनं चोरलय महाभारतातून” पंडितनं दुरुस्ती केली
“हो तेच ते. आम्ही लोकांनी जानवं केंव्हाच खुंटीला अडकवलं आणि खायला सुरुवात केली. आता फँशन म्हणून काही लोकं करतात मुंज मुलांची पण बहुतेक सर्वजण लग्नाच्या अगोदर एक अपरिहार्य विधी म्हणून करतात झालं आणि ते सुध्दा लग्न वैदिक पद्धतीनं केलं तर.” देशपांडेनं माहिती दिली.
“काय हो. ते गुढग्यात बेडकी भरतात म्हणे. आमच्यात पद्धत असती तरी मी काय मुंज केली नसती.” शेळकेनं अंगावर शहारा दिला.
“आणि कसं काय तो दोरा आयुष्यभर सांभाळायचा? झोपेत कूठं अवघड जागी अडकला तर आयुष्याचं नुकसान व्हायचं. दोरा खूप धारधार असतोय.” ढसाळनं चिंता व्यक्त केली.
“आणि मग पोरांसाठी नवस कराय लागायचा.” शेळके म्हणाला आणि सर्वजण खिदळायला लागले.
“ए गपा रे, मुली बरोबर आहेत याचं भान ठेवा” हरीअप्पा गुरगुरले
शारदा म्हणाली “उपनयन ही काही पुरुषांची मक्तेदारी नाही तर स्त्रिया सुध्दा मुंज करू शकतात. गार्गी आणि मैत्रेयी या दोन पंडिता होऊन गेल्या आणि पुण्यातल्या कितीतरी मुलीनी केलीय”
“हो का? मग तू का नाही केलीस.” पंडीत चेष्टेत म्हणाला
“मला तरी आता त्यात काही रेलेवंस वाटत नाही. मला वाटतं ती एक जाहिरातबाजी होती, म्हणजे जानवं घालून फिरणं हा अंगावर लावलेला फलक म्हणा - मी एक कर्मकांड शिकलेला माणूस आहे आणि मला पूजा अर्चा करायच्या सल्यासाठी बोलवा व फी द्या वगैरे. आजकल काळे कोट घालून वकील असतात, गळ्यात उगीच स्टेथोस्कोप घालून मेडिकलचे विद्यार्थी फिरत असतात तसं. अगदी आपल्या वैशालीत वेटर नाही युनिफॉर्म घालत? आता कोणी काहीही शिकू शकतो, खुल्लमखुल्ला तेंव्हा काय गरज आहे कसल्याही जानव्याची?” शारदा म्हणाली
“आणि लग्न झालेल्या बायका सुध्दा मंगळसूत्र त्यासाठीच घालतात, ट्रेसपासर्स विल बी प्राँसिक्युटेड चा बोर्ड जणू ” शेळके बोलला
“अगदी बरोबर. त्या विद्यार्थी संमेलनात बरीच पोरं गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरत होती आपण कुणी मोठ्ठे आहोत असं भासवायला. तसच काहीसं” ढसाळ म्हणाला
“आनी शिक्षणाचं म्हणाल तर कुनी काय बी शिकतंय. आपलं हे ढसाळ इंग्रजी लिटरेचर शिकतंय. याच्या पुऱ्या खानदानात इंग्रज कधी आला आणि कधी गेला याचा कुणाला पत्ता लागला नाही” शेळके म्हणाला आणि परत सगळे खिदळायला लागले.
शेळके चेकाळला होता “आणि तुमी काय शिकताय हरीअप्पा? म्हणजे तुमचे शिक्षणाचे बेत बदलत असतात म्हणून विचारतो.”
“मी पण मराठी सोडून समाजशास्त्र घ्यावं म्हणतो” हरीअप्पा पुटपुटला
“आनी शेतकी सोडून तुमी इथं काय करता, शेळकेदादा?” शारदानं उपहासपूर्वक विचारलं
“आमी काय, असंच! आमाला कूठं पदवी मिळवायचीय? आम्ही कोल्हापुराकडेच बरे कारण आम्हाला गुळ आणि साखर बनवण्याचे तंत्र चांगले माहित आहे, कळले का मिस गोगटे? काय बेचव आहे हो ही तुमची पुणेरी भाषा. मला आमची गुळावानी गोड कोल्हापुरीच आवडते” शेळके म्हणाला
“भाषेचा विषय निघाला म्हणून विचारतो हरीअप्पा. तुमचा कोंकणी –मराठी वाद गाजतोय हल्ली “ पंडितने खडा टाकला
“आमची कोंकणी ही एक आद्य आणि पुरातन भाषा आहे. मराठी आणि कोंकणी दोनीही भाषा स्वतंत्रपणे उगम पावल्या पण मराठीवादी मानायला तयार नाहित.” हरीअप्पाना चेव आला
“पण हरीअप्पा, दोन्ही वाद तुम्हीच लोकं घालता आहात आणि उगीचच स्वताचं महत्व वाढवता आहात. विचार या शेळकेला आणि ढसाळला त्यांना काही पर्वा आहे का? करोडो मराठी भाषिकांना काय फरक पडतो तुम्ही मुठभर माणसं काय म्हणता ते? आणि काय रे हरीअप्पा? तुम्ही काय केलंत कोंकणीसाठी? ना लिपी, ना व्याकरण ना साहित्य. तुमचा पत्र व्यवहार मराठीत चाले. आता हळूहळू इंग्रजीत होईल. मला कोंकणीत पीएचडी केलेली हाताच्या बोटावर मोजता येणारी तुमची माणसं दाखवं मग मी तुमचं कोंकणी प्रेम मान्य करीन.” देशपांडे तावातावाने बोलला.
शारदा मधेच बोलली “नकारे हरीअप्पाच्या पाठी लागू तो एकटा आहे म्हणून. मला पण वाटतं की कोंकणी स्वतंत्रपणे जन्मली. मराठी आणि कोंकणी या दोन्ही भाषांची माता प्राकृत होय आणि साधारण तेराव्या शतकाच्या सुमारास दोन्ही भाषा स्वतंत्र झाल्या. पण हरीअप्पाच्या सगळ्या गाववाल्यांनी मराठी भाषेचा स्वीकार करून मराठी भाषा खूप समृध्द केली, तीचं अतोनात कौतुक केलं, तिला जीवापाड जपली याबद्दल मराठी भाषिकांनी ॠणी असायला हवं. मला बाकीबाब बोरकरांच्या मराठी कविता आवडतातच पण कोंकणी कविता फार सुमधुर आहेत.”
“तुला कळतात त्यांच्या कोंकणी कविता?” हरीअप्पानं आतुरतेनं विचारलं
“कोंकणी शब्द कठीण आहेत पण त्यांचा नाद मला आवडतो “शारदा म्हणाली
“फार छान भाषण दिलंस शारदा पण मी अर्थशास्त्र मेजर घेतलय म्हणून सांगतो. भाषावाद, प्रांतीय वाद, जातीयवाद आणि अगदी धर्मवाद फक्त तीन गोष्टींसाठी निर्माण होतात. आयडेंटिटी, सर्वायवल आणि डॉमिनंस.“ देशपांडे म्हणाला
“मला पण तसच वाटतं” पंडीत म्हणाला “कोंकणीला स्वतंत्र अस्तिव हवं, मान्य आहे. पण तिचा टिकाव कसा लागणार? म्हणजे काही दशकांतच इंग्रजी भाषेपुढे मराठीची बोली भाषा होईल का ही भीती वाटते तर अगोदरच तो दर्जा असलेल्या कोंकणीचं काय होईल?”
“अरे पंडीत, कशाला जगाच्या चिंता करतोस? सरस्वती नदी लुप्त झाली तरी मासे खाऊन प्रजोत्पत्ती केलीच ना तशीच कोंकणी नाहीशी झाली तरी हरीअप्पांकडे नवसाचा रामबाण उपाय आहे. काळजी करू नकोस.” देशपांडेनं जोक केला.
“देशपांडे, कोणीतरी म्हटलं होतं ‘टवाळा आवडे विनोद‘ हे तुझ्या बाबतीत खरं वाटतं. तू का फक्त खाणे आणि ‘पिणे‘ या तुझ्या दोन प्रिय विषयांना धरून बोलत नाहीस?” शारदा म्हणाली
“देशपांडे कसला ऐकतोय? रामदासांनी बहुतेक त्याला पाहून जी मुर्खांची लक्षणे सांगितलीत त्यातलच एक जे तू म्हणालीस “ पंडीत बरळला.
“पंडीत, ते जाऊ देत, खूप जुने झाले रामदास. पण काय रे. तू म्हणे विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल नाटकात नाना फडणवीसांची भुमिका करतोयस आपल्या गँदरिंग मधे? अगदी शोभून दिसेल हो तुला.” देशपांडेनं सूड घेतला.
“देशपांडे, पुण्याची बामणं होती का रे पेशवाईत? म्हणजे चालू, जशी नाटकात दाखवलीत तशी?” ढसाळनं त्याला बराच काळ सतावत असणारा प्रश्न केला
“का न्हाई असणार. मानसंच नव्हं शेवटी. किती येळ सुद्धपना दाखवनार? मला साधं शुद्ध बोलून थकवा येतो.” शेळके म्हणाला “ पण पुण्याची मात्र कमाल हां. अरे एक काय बाजीराव आणि मस्तानीचं लफडं झालं, सारं पुणं खुश. आमच्या सरदारांच्या फौजा असायच्या, जनानखानाच म्हणा! आणि सामान्यांना तमाशा होताच.”
“बाळानो, तुम्हाला या हरीअप्पांची कर्तबगारी माहित नाही कारण तेंडुलकरांनी सोयीस्कर रित्या तो विषय टाळलाय.” देशपांडे म्हणाला
“काय रे, काय केलंय हरीअप्पानं?” सगळे काळजीनं हरीअप्पांकडे बघू लागले
“अरे, एक संपूर्ण स्वयंचलित संस्था तयार केली आहे.” देशपांडेनं गूढ स्वरात सांगितलं “जशे मठ असतात ना तशीच एक सोय”
“असं? म्हणजे काय ?” शारदा म्हणाली “ए देशपांडे, जास्त उत्कंठा वाढवू नकोस.’
“त्या संस्थेचं नाव आहे देवदासी!” देशपांडेनं फुगा फोडला
“देशपांडे, उगाच गैरसमज पसरवू नकोस “ हरीअप्पा रागावून बोलले “ती एक समाजव्यवस्था आहे. संस्था नव्हे! आणि आम्ही व आमचे मठ मनुस्मृती मानतात. जेनेटीक्स, तुला नाही कळायचं, मोठ्ठ सायन्स आहे.”
“सज्जनहो, थांबा. शांत व्हा. महाराष्ट्राला सामाजिक पिळवणूक नवीन नाही.” शेळकेनं वातावरण थंड करायचा प्रयत्न केला. “खंडोबाची मुरळी किंवा जोगतीण म्हणजे तरी काय?”
“मी श्रीकृष्णाची कथा वाचलेय” शारदा म्हणाली “ दुष्ट असुर राजाचा वध केल्यावर श्रीकृष्णाने त्याच्या कैदेतल्या सोळा हजार स्त्रियांची सुटका केली. त्या स्त्रियांचा समाजात स्वीकार व्हावा आणि प्रतिष्ठा मिळावी म्हणून श्रीकृष्णाने त्यांच्याशी औपचारिक विवाह केला. सामाजिक दृष्टया किती प्रगतीशील होता तो काळ, नाही?”
“हो, नाहीतर तुमचे पुणे. विधवा मुलींचे केशवपन करून त्यांचा छळवाद आणि शोषण करत, हल्ली पर्यंत.” देशपांडे म्हणाला
“आपला समाज आहेच मुळी दांभिक आणि दुटप्पी.” पंडीत म्हणाला
“बरं झालं तू म्हणालास पंडीत. हेच जर मी म्हणालो तर सामाजिक प्रक्षोभ असं नाव देतील “ ढसाळ म्हणाला
अरे पण झालं काय पंडीत तुला राग येण्याइतकं. देशपांडेचं समजू शकतो. त्याला सगळ्याचाच राग येतो.” हरीअप्पानी विचारलं
“हे पहा नं. जगात सगळ्यात जास्त गाई आपल्या देशात आहेत. त्यांना आपण मातेसमान मानतो पण दूध देईनाश्या झाल्या की रस्त्यावर सोडून देतो कागद आणि कचरा खायला. परत येता जाता भटकणाऱ्या आणि उपाशी गाईला हात लावून नमस्कार करायला तयार. स्त्रियांची परिस्थिती याहून काही वेगळी नाही.”
“जाऊ दे रे. असल्या नं सुटणाऱ्या प्रश्नांनी डोकं सणकतं. देशपांडे तू कुठल्या गावचं बेणं?” शेळकेनं विषयांतर केलं.
“आमची मुंबई!” देशपांडे म्हणाला
“मुंबई हे काय कुणाचं गाव होतं का? सगळे साले निर्वासित“ शेळके उद्गारला
“तू बरोबर आहेस. आम्ही मुळात देशोधडीला लागलेली माणसं कुठून तरी मध्य भारतातून महाराजांची नोकरी करायला आलो आणि स्वराज्यात इथले देशपांडे झालो. आमचं भांडवल म्हणजे आमचं इमान आणि शौर्य.” देशपांडे अभिमानानं म्हणाला
“माहिती आहे ओ शूर वीर. एक बाजीप्रभू झाला त्या भांडवलावर आहात पण ते आता संपत आलं. सरकार, महिना अखेर आली आणि बाबांनी पाठवलेलं भांडवल संपलय. अजून आठवडा काढायचाय.” शेळके जागा होत म्हणाला
“डोन्ट वरी. मी आहे नं “ हरीअप्पा म्हणाले
“भाटकार हरीअप्पा, तुम्ही किती करता हो आमच्यासाठी! डोळ्यात अश्रू उभे राहतात. जरा आताच्या कॉफीचं बिल भरा पाहू.“ देशपांडेनं बिल पुढे केलं.

हरीअप्पांना त्यांचे कॉलेजचे दिवस नेहमी काल परवा घडलेल्या घटनांप्रमाणे स्पष्ट आठवत. पुणं त्यांना खूप आवडलं होतं. पुण्याची थंडी, ती शारदा बरोबर घेतलेली वैशालीतील वाफाळलेली कॉफी, तिने प्रत्येक गोष्टीत घातलेला वादविवाद, ते दोस्त आणि सिंहगडावरील पिकनिक जेंव्हा हरिअप्पांनी तिला प्रपोज केलं होतं या सगळ्या गोष्टी त्यांना एखादा सिनेमा परत परत पहावा अश्या ठळकपणे आठवत. त्यांचे आजी आणि आजोबा व त्यांची एवढी मोठ्ठी प्राँपर्टी सांभाळण्याची जबाबदारी अशी बंधनं नसती तर ते गावी परत आले नसते आणि पुणं हेच त्यांचं गाव झालं असतं. पुण्यात आणि गावात खूप अंतर होत. अंतर म्हणजे दूरी नाही तर दोन जगातील तफावत!
पुणं कसं एक स्वछंद शहर होतं! अगद पगड जातीचे लोक, शुद्ध अशुद्ध भाषा, धनिक आणि फाटकी, तरुण आणि वृद्ध, सुशिक्षित आणि अशिक्षित अश्या अनेक फरकाची माणसं एकसंध पद्धतीनं इथं रहात आणि वावरत होती. थंडीत रंगीबेरंगी पेहेरावातल्या तरुण मुला मुलींचा ताफा दुचाकीवरून सकाळच्या विरळ धुक्यातून जाताना पाहायला खूप मोहक वाटे. मफलर आणि कानटोपी घालून वृद्ध प्रभात फेरीला जात तेंव्हा त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा असे. संध्याकाळी भेळ खात सारस बागेत फिरणे अथवा कट्ट्यावर बसून नुसत्या गप्पा मारण्याची मजा काही वेगळीच होती. एवढया मोठ्ठ्या शहरात निर्बंध पण अँनाँनिमस जीवन जगणं खूप सोपं होतं पण तेच हरीअप्पांना मान्य नव्हतं.

गावाकडची गोष्टच वेगळी होती. प्रभुदेसाई एक फार मोठ्ठ प्रस्थ होतं. भाटकार म्हणून पिढ्यानपिढ्याचा वारसा तर होताच पण हरीअप्पांचे आजोबा शाळा कॉलेजांचे संस्थापक, मंदिरांचे विश्वस्त आणि अनेक उद्योगांचे मालक होते. गावी घर कसलं, अनेक खोल्यांचा महालच होता ज्यातल्या सगळ्या खोल्या हरिअप्पांनी पण पहिल्या नव्हत्या. अनेक नोकरचाकर होते आणि हरीअप्पांना हा सारा व्याप आजोबा आणि आजी कसे सांभाळतात याचा अचंबा वाटे. पण आजोबांनी त्यांना पुण्याला जाण्या अगोदर सांगितलं होतं की लवकरच सर्व जबाबदारी हरीअप्पांच्या खांद्यावर पडणार आहे. हरीअप्पांचं घराणं प्रतिष्ठित तर होतच पण त्याचा समाजावर पगडा होता. लग्ना नंतर शारदाला हे सगळं अनोळखी होतं. कुठल्यातरी मध्ययुगीन कालात आपण येऊन पोहोचलो असा भास तिला होत असे याची जाणीव हरीअप्पांना होती. अनेक रीती रिवाजांप्रमाणे हरीअप्पा माणसांच्या प्रकारांची ओळख पण ते देत. तो भट, हा मुंडकार, हा गावडा तो खारवी अशी माहिती ते पदोपदी देत आणि वर सांगत खारवी म्हणजे तुमच्या भाषेत कोळी. त्यावर शारदा चिडून म्हणे, “का रे तुम्ही सतत माणसांना लेबलं लावत असता? परवा त्या शेणवीची मुलगी कोणा पंजाब्याचा हात धरून पळून गेली आणि केंकरेचा पोरगा कँथाँलिक मुलीला बायको म्हणून घरी घेऊन आला ते तुम्हाला मान्य आहे, कोणी श्रीमंत गोरा मिरांडा किंवा रोड्रिग्ज दिसला तर म्हणता आमच्यापैकी पण धर्म वेगळा. मात्र तुम्हाला कोणी गंवस वा गुरव भेटला की मात्र तुम्ही आकडू होता. दांभिक कुठले.” हरीअप्पांनी किती वेळा शारदाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला “माणसं आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्मफला नुसार वेगवेगळी जन्मतात. जसे सर्व चतुष्पाद प्राणी एकच नसतात आणि उडणारे पक्षी एका प्रकारचे नसतात किंबहुना माकडांच्या जाती वेगवेगळया असतात तशीच द्विपाद माणसं वेगवेगळी असतात.”
शारदाचं उत्तर तयार असे ” माणसं वेगळी जन्मतात यात वादच नाही पण म्हणून काही एका जमातीच्या माणसांना स्वताला श्रेष्ठ समजण्याचा हक्क नाही. हरीअप्पा प्रत्येक माणूस आपल्या कर्मानं श्रेष्ठ होतो जन्मानं नाही. कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? हिटलर सारखा विचार करू नका. जग तुमच्या विचारांना हसेल नाहीतर दक्षिण आफ्रिकेवर जसा अँपरथाईड मुळे बहिष्कार घातला तसा घालतील. निदान आपल्या संतोषवर तरी असल्या विचारांचा प्रभाव मी होऊ देणार नाही.”
हरीअप्पांना शारदा पोपटपंची करते असं वाटे. पुण्यात कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी दशेत असे क्रांतीकारी विचार असणं फँशनेबल होतं पण प्रत्यक्ष आयुष्यात हे शक्य आहे का? अशा वेळी त्यांना शारदाला महाभारतातील कर्णाचे उदाहरण द्यावे असे वाटे. हरीअप्पांच्या मते कर्ण तेजपुंज धनुर्धर झाला याचं कारण त्याचा जन्म उच्च कुळात झाला होता. परंतु अनेक वेळा वाद घालून झाल्यावर हरीअप्पांना माहित होतं शारदा रागानं काय म्हणणार ते “महाभारतातील एक उदाहरण देऊन उगीच दिशाभूल करू नका. मी जातपात मानत नाही आणि हरीअप्पा तुम्ही एवढे कर्मठ, पुरातन मतवादी, सनातनी आणि बुरसटलेले असाल हे मला लग्ना अगोदर माहित असतं तर नक्की मी त्या बावळट ढसाळ बरोबर सुध्दा लग्न केलं असतं.” हरीअप्पा खळखळून हसून वादाला विराम देत. सरकत्या काळानुसार दोघांनीही वादांवर पडदा टाकला होता कारण दोघांच्याही विचारातील तफावत कधीही भरून निघणार नव्हती.
हरीअप्पांना शारदाच्या साधेपणाचं आश्चर्य वाटायचं पण इतक्या वर्षात त्यांना खात्री पटली होती की शारदाची मतं वरवरची नसून पूर्णपणे खंबीर तर आहेतच पण तिच्या अंतर्मनावर बिंबली आहेत. शारदाच्या मतात आणि वागण्यात फरक नाही हे पण त्यांना उमगलं होतं पण त्यांनी तिला कधीही आडकाठी केली नाही.
शारदा इतक्या सहजपणे इतर जमातीतील स्त्रियांमध्ये मिसळून जाई की त्यांना वाटे जर शारदा निवडणुकीत आपल्या विरुध्द उभी राहिली तर आपला पराभव निश्चित होईल.

शारदाला जाग आली आणि तिनं विचारलं “का एवढया लवकर उठलाय, सगळी तयारी झाली आहे. गुरुजी साडेसातला येणार आहेत.”
हरीअप्पा म्हणाले “ झोप तू, मी आलो भाटात फेरी मारून.”
हरिअप्पानी पायात शू चढवले, हातात काठी घेतली आणि ते बाहेर पडले. गणू बाहेर त्यांची वाट पहात होता नेहमी प्रमाणे प्रभात फेरीला जाण्यासाठी.

काल शानभाग वकील साहेबांचा फोन आला होता हरीअप्पाना आठवण करण्यासाठी की त्यांच्या आजोबा आणि आजी यांचं जॉईन्ट मृत्युपत्र त्यांच्या पूर्व सुचनेनुसार आज उघडण्यात येईल. हरीअप्पांनी वकील साहेबांना तीन वाजेपर्यंत श्राद्ध आणि ब्राम्हण भोजन पूर्ण होईल त्यानंतर कधीही मृत्युपत्र वाचन करता येईल असं सांगितलं होतं. आजीच्या श्राद्धासाठी आक्का, ताय आणि बाय पण आल्या होत्या.

दुपार पर्यंत श्राद्धाचे सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पडले. ब्राम्हण भोजनास हरिअप्पांनी अकरा प्रतिष्ठित विप्रांना तर पाचारण केलंच होतं पण मंदिराचे महाजन पण उपस्थित होते. हरीअप्पा आता आजोबांच्या जागी मंदिरात विश्वस्त होते. स्वामींना एक अलिशान गाडी या वर्षी हरीअप्पांनी भेट पण दिली होती. हरीअप्पा ज्ञातीत आता वरच्या स्थानावर होते. स्वामींनी आजीच्या श्राद्धास हरीअप्पांना पत्र लिहून एक प्रकारे कार्यसिद्धीसाठी आशीर्वाद दिला होता. शारदा आणि हरीअप्पांच्या बहिणींना आजीच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले होते. शारदा साठी आजी सासूच्या नव्हे तर आईच्या जागी होत्या.

सर्व ब्राम्हण आणि महाजन भोजनानंतर मोठ्ठ्या दिवाणखान्यात कुजबुजत बसले होते एवढ्यात वकिलसाहेब आले. सर्वजण उठून उभे राहिले आणि हरीअप्पांनी त्यांना बसण्याची विनंती केली हाच इशारा समजून सर्वांनी निरोप घ्यायला सुरुवात केली. सर्वांना निरोप देऊन हरीअप्पा अक्का, ताय आणि बायला बोलवायला आत गेले.

अक्का, ताय, बाय, शारदा सर्वजण दिवाणखान्यात जमले. हरीअप्पानी संतोषला हाक मारली आणि वकील साहेबांना म्हणाले. ” चला, सगळे जमलेत तेंव्हा तुम्ही तुमचे काम आता सुरु करू शकता. माझे तीनही मेव्हणे जर आता उपस्थित असते तर बरं झालं असतं पण तुमच्या कायद्याच्या भाषेत आजोबा आजीच्या सर्व कुटुंबाचे सदस्य इथे उपस्थित आहेत.”

वकिलसाहेब म्हणाले “ठीक आहे. हरीअप्पा, तुम्हाला माहित आहे की मी तुमच्या आजोबांना माझ्या वडिलांच्या जागी मानतो. त्यांच्यामुळे मी उच्च शिक्षण घेऊ शकलो आणि आज मी जे काही बनलो ते तुमच्या आजोबांच्या आशीर्वादाने. तेंव्हा मी प्रथम त्यांना आणि तुमच्या आजींना प्रणाम करतो. हे मृत्यूपत्र आजोबांच्या जाण्याच्या काही वर्षं अगोदरच बनवलं होतं ज्याला आमच्या कायद्याच्या भाषेत “जॉईन्ट अँन्ड म्युचुअल विल“ असं म्हणतात. हे विल मी त्यांच्या इच्छेनुसार बनवलं होतं. मीच या विलचा एक्सिक्यूटर आहे.”
हरीअप्पा म्हणाले “ वकिलसाहेब, मी पण तुम्हाला माझ्या लहान पणापासून ओळखतो. मला माहित आहे की तुम्ही माझ्या बाबांचे मित्र होता. आजोबांचा तुमच्याविषयीचा जिव्हाळा मला माहित आहे. कायदेशीर कागदपत्र वाचायची आवश्यकता नाही. तुम्ही सर्वांना समजेल असे महत्वाचे पाँईंट सांगा म्हणजे झालं.”

वकिलसाहेब म्हणाले “ माझी काही हरकत नाही पण विल बरोबर एक बंद पाकिटात तुम्हाला लिहिलेलं पत्र आहे. पाकिटावर लिहिलेल्या आजोबांच्या अक्षरावरून पत्र असेल असा माझा अंदाज आहे. हे पाकीट तुमच्या नावानं आहे.”
“वकिलसाहेब, तुम्हीच वाचा. इथं फक्त माझे जवळचे आप्त आहेत आणि तुम्ही आजोबांचे विश्वासू वकील व विलचे एक्सिक्यूटर आहात.” हरीअप्पा म्हणाले
“ठीक आहे, हरीअप्पा जशी तुमची ईच्छा” असे म्हणून वकील साहेबांनी पाकीट उघडून पत्र वाचायला सुरुवात केली.

“आमच्या काळजाचा तुकडा चि. हरीअप्पा यास शुभाशीर्वाद,
आमचे पत्र तुला वाचायला मिळेल तेंव्हा आम्ही दोघेही या जगातून जाऊन वर्षाहून अधिक काळ उलटून गेला असेल. वकीलसाहेबां कडे आमचे मृत्युपत्र द्यायचे कारण इस्टेटीचे वाटप नाही तर तुला तुझ्या जन्माबद्दल सत्य सांगून आमच्या जिवावरील भार हलका करण्यासाठी हा खटाटोप. तुझ्यावर आम्ही दोघांनी खूप प्रेम आणि माया केली हे तुला सांगायची गरज नाही पण इतके प्रेम आम्ही वासुदेवावर पण केलं नाही हे तुला सांगावेसे वाटते. आम्ही इस्टेटीचे सर्व अधिकार तुझ्याकडे सोपवत आहोत. तुझ्या बहिणी अक्का, ताय आणि बाय यांच्यावरचे तुझे प्रेम आणि माया तशीच अखंड राहो. तुला इस्टेटीतला वाटा त्यांना द्यायची ईच्छा असल्यास तू तसे करू शकतोस पण मुख्य म्हणजे त्यांच्या गरजेच्या प्रसंगी तू त्यांच्या पाठीशी उभे रहावेस. तू आता त्यांचा धाकटा भाऊ नसून मोठ्ठा भाऊ आहेस.
मुद्दयावर येतो. हरीअप्पा, तू वासुदेव आणि देवकीचा मुलगा नाहीस तर आपल्या देवळात असलेल्या सायलीचा म्हणजे देवळातल्या कुलवंतीणीचा मुलगा आहेस. तुझी खरी आई सायली होती हे सत्य तुझ्यापासून लपवून आम्ही पाप केलं आणि आमच्या प्रेमानं ते धुवायचा प्रयत्न केला तरीही तुझा सत्य जाणण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही.
बायच्या जन्मा नंतर देवकीला आणखी मूलं होणार नाहीत असं डॉक्टरनी सांगितलं. याच सुमारास सायली आमच्याकडे आली. ती गरोदर होती पण कोणी तिची तशी अवस्था केली हे तिनं कधीही सांगितलं नाही. एकोणीस वर्षांची भ्यालेली पोर ती, पण आम्हाला रवळनाथान् प्रसाद म्हणून दिल्यासारखी वाटली. सायलीला आम्ही घरात दडवून ठेवली. तुझ्या जन्मा नंतर सायलीला पैसे आणि दागिने देऊन आपल्या दूरच्या शेतावर ठेवली पण एका रात्री ती गायब झाली आणि केंव्हाच मिळाली नाही.
आम्ही प्रेमाबरोबर चांगले शिक्षण आणि संस्कार तुला दिले पण जर कुठे कमी पडलो असू तर रवळनाथ आम्हाला क्षमा करो. आपल्या घराण्याच्या रीती भाती, पूजाअर्चा तू व्यवस्थित पार पाडशील ही खात्री आहे.
संतोषवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी काळजी घे. तुझी बायको शारदा खरंच सरस्वतीचं रूप आहे. अशी बायको मिळाली हे तुझं भाग्य. तुझ्या सदाचारी आचरणानं आपल्या समाजात नाव कमव आणि गोरगरिबांची मदत कर.
तुझे
आजोबा आणि आजी “

वकील साहेबांनी पत्र वाचून मान वर केली. त्यांच्या डोळ्यावरचा वाचायचा चष्मा नाकावरून बराच खाली घसरला होता आणि त्याचं तोंड उघडं होतं. सगळेजण अवाक होऊन हरीअप्पांकडे पहात होते. वकीलसाहेबांची नजर हरीअप्पांकडे गेली.
हरीअप्पांच्या चेहेऱ्यावर मृत्युवत कळा होती. त्यांचे खांदे पडले होते. क्षणभर त्यांची नजर भ्रमिष्टासारखी सर्वांकडे फिरली आणि नंतर डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. अश्रू जसे त्यांच्या उलटं जानवं असलेल्या उघडया अंगावर पडून त्यांना भान आलं तसा त्यांच्या तोंडून पहिला हुंदका फुटला आणि ते हमसाहमशी रडू लागले.
सर्वात प्रथम अक्का उठली. हरीअप्पांना जवळ घेऊन आक्का म्हणाली “ धाकल्या रडू नाका. मला काही फरक पडत नाही. माझं तुझ्यावरचं प्रेम तिळभर सुध्दा कमी झालं नाही हे ऐकून.” आक्कानं हरीअप्पांना प्रेमानं थोपटायला सुरुवात केली.
संतोष उठून उभा राहिला “ धिस इज क्रेझी. आजी मस्ट हँव गाँन सेनाईल. आय डोन्ट केअर अ डँम “ असं म्हणून तो बाहेर निघून गेला.
वकिलसाहेब उठले आणि नं बोलता आणलेले कागद खाली ठेऊन निघून गेले. ताय आणि बाय हरीअप्पां शेजारी बसल्या. बाय म्हणाली “हरीअप्पा, तू भाऊ म्हणून येऊन आमच्यावर ऋण केलेस. आजी आणि आजोबांनी तुला आपलसं करून आता पाच दशकं होतील. काय फरक पडतो इतक्या वर्षांपूर्वी काय घडलं त्याचा. विसर ही गोष्ट आणि पूर्ववत घरातला कर्ता म्हणून ताठ उभा रहा.”
शारदा म्हणाली “ चला, जरा विश्रांती घ्या. सकाळपासूनच्या दगदगीनं दमला आहात.”
शारदानं हरीअप्पांचा दंड धरला आणि त्यांना उठायला मदत केली. हरीअप्पा कमरेतून वाकल्या सारखे दिसत होते. शारदा त्यांना खोलीत घेऊन गेली आणि हरीअप्पा पलंगावर कलंडले. त्यांना परत एकदा हुंदक्यांची उबळ आली. शारदानं त्यांच्या डोक्याखाली उशी दिली आणि अंगावर पांघरूण ओढलं. प्रथमच हरीअप्पांच्या तोंडून शब्द फुटला “काय झालं हे.”
“काय झालं?” शारदा म्हणाली “ काही झालं नाही, उगाच का विव्हळता आहात ?”
“शारदा, तुला काहीच वाटत नाही? तू माझा तिरस्कार करत नाहीस?” हरीअप्पांनी अचंब्यानं तिच्याकडे पाहिलं
“तिरस्कार? हरीअप्पा वेडे आहात का?” शारदा त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाली “अहो मला तुमचा अतिशय अभिमान वाटतो. मी भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखा सद्गुणी नवरा मिळाला. तुमच्या आचरणात आणि आयुष्यात तिरस्कार करण्यासारखी अथवा उणीव काढण्यासारखी एक गोष्ट सापडणार नाही. आता आज वाचलेल्या आजींच्या पत्राबद्दल म्हणाल तर जी गोष्ट आजींनी मला आपले लग्न होण्यापूर्वी सांगितली आणि नंतरच माझा लग्नाला होकार त्यांनी स्वीकृत केला त्या गोष्टीबद्दल इतक्या वर्षांनी मी काय आश्चर्य व्यक्त करू?”
हरीअप्पा शारदाच्या घाऱ्या निळ्या डोळ्यात पहातच राहिले त्यात त्यांना खूप प्रेम दिसलं जे त्यांनी पूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. ते तिच्या कुशीत शिरून पुन्हा लहान मुला सारखे रडू लागले.

------------****------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. फक्त ते कॉलेजमधले डायलॉग जरा लांबण लावल्यासारखे वाटले. त्यामधे हरीआप्पांची ठाम मते दिसण्याऐवजी इतर मित्रांचीच मते जास्त दिसली म्हणून!!

प्रकाश कर्णिकांची ही पहिलीच कथा असावी ज्याचा शेवट सर्वांना समजेल Light 1

खुप छान वाटली, पण भाषावाद मध्ये लेखकाने स्वत:ची मते लादल्यासारखी आणि जास्त ताणल्यासारखी वाटली

प्रकाश कर्णिक,

कथा आवडली. Happy फक्त कॉलेजातले संवाद लांबल्यासारखे वाटतात. त्यांतून शारदेची आणि हरीअप्पाची व्यक्तिरेखा उलगडायला हवी होती.

आ.न.,
-गा.पै.