"ते" - ३

Submitted by मुरारी on 27 December, 2012 - 03:44

भाग १: http://www.maayboli.com/node/38066
भाग २: http://www.maayboli.com/node/38133

आणि आणि देवा रे .. बाजूला कोणीच नव्हत.. आजूबाजूला रान माजलेलं होतं. तोंडात माती गेलीये .. समोर तीच ती भयाण गढी . शिरीष कुठे गेला? ते बस स्थानक ? ते गाव ? काहीच कळेनासं झालेलं .. मी त्या माणसामागे पळतोय.. आता मला मला पर्यायच नाहीये .. कोणीतरी वाईट पाठलागावर सुटलेलं आहे .. मी एका टेकाडावर चढलोय ... मी काय करतोय मला कळत नाहीये.. तो माणूस आता समोरच बसकण मारून रडतोय .. भयानक पाऊस सुद्धा पडतोय.. त्याला जाऊन विचारू का.. मदतीसाठी त्याला हाक मारावीच लागेल.. पण तोच कुठल्यातरी संकटात सापडलेला आहे.. परमेश्वरा कुठे अडकलोय मी.. मी तसाच चालत पुढे गेलो. तो तसाच बसून होता.. माझं समोर लक्ष गेलं.. भयानक समुद्र लाटांच तांडव करत गर्जत होता . मी त्याला हलवलं.. " अहो प्लीज मला मदत करा .. माझा मित्र दिसेनासा झालाय .. मी कुठेय मला माहिती नाही.. मला प्लीज वाचवा.. ".. पण त्याला मी काय बोलतोय ते ऐकू येत नाहीये.. तो चालू लागलाय टोकाला .. अहो थांबा.. मी मागे धावतोय . विजांचा कडकडाट काही थांबत नाहीये .. अरे हा कुठे जातोय ? समोर काहीच नाहीये .. मी ओरडून माझा आवाज त्याच्या पर्यंत पोचत नाहीये.. अचानक वीज चमकली आणि त्याच वेळी त्याने मागे पहिले ... माझ्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली .. त्या समोरच्या माणसाचा चेहरा.. तो चेहरा माझाच होता..
तो मीच होतो??? ... दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला समोरच्या उधाणलेल्या समुद्रात झोकून दिलं... मी हादरून बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हतो

***********************************************************************
भयानक ओरडत मी जागा झालो, माझ्या ओरडण्याने शिर्यापण हादरला, मी कुठे आहे याचा अंदाज घेण्यातच काही क्षण गेले . पाउस तसाच रिपरीपत होता. मी त्याच कळकट जागेत होतो. इतकं भयंकर स्वप्न पडलेलं होतं , कि मी अजूनही थरथर कापत होतो. शिर्याने जवळ येऊन विचारले , अरे पशा झालाय काय ? कसला बेक्कार ओरडलास बे ? चेहरा बघ तुझा काय डेंजर दिसतोय , ठीक आहेस न ? काय दिसलं स्वप्नात ? प्रश्नांचा भडीमार करता करता त्याने पाण्याची बाटली पुढे सरकवली , तीन चार घोटात रिकामी करून मी त्याला दिली . थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही , पत्र्यावर ताडताड वाजणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत तसेच बसून राहिलो , मग मीच तोंड उघडलं, शिऱ्या हि काही साधी स्वप्न नव्हेत , आता तर माझी खात्रीच झाली आहे , इतके दिवस एकच एक भाग दिसायचा , आज पहिल्यांदाच त्याच्याही पुढचं काहीतरी दिसलं, हे ऐकून शिऱ्या माझ्याजवळ आला , त्याला स्वप्न सांगितलं तसा त्याच्या चेहरा एकदम बदलला , उगाच अंधारात बघत तो धूर काढत बसला, मी वेळ पहिला अजून अडीचच वाजत होते . भयंकर थंडी वाजत होती , त्याला म्हणालो मी गाडीत झोपून पाहतो .
सकाळी जाग आली तीच गडबड , गोंगाटाने. दोन तीन लहान पोर काचेतून माझ्याकडे बघत होती . मी डोळे उघडताच एकदम गलका करत पळून गेली . चक्क १० वाजलेले होते , तो नाका बर्यापैकी गजबजलेला होता. शिऱ्या तेवढ्यात आलाच समोरून . झाली का झोप? "हम्म लागली कशीबशी" आळस देत मी गाडीबाहेर आलो . दोघांनी मग कडक चहा मारला , रात्रीचा विषय मीही काढला नाही आणि त्याने देखील . परत पत्ता विचारून निघालो. आता चढ सुरु झालेला होता, दोन्ही बाजूंनी गच्च झाडी , अचानक मी विषय काढला . 'शिऱ्या हा चढ संपल्यावर पुढे काय असेल तुला अस वाटत ?'
त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं . मग दोन सेकंद विचार केल्यासारखं केलं आणि म्हणाला , पशा हा "चढ" संपला न कि . कि , कि "उतार" लागेल, आणि खो खो हसत सुटला . त्याला दोन चार शिव्या घातल्यावरच तो गप्प बसला , तरी ब्येन खुसखुसत होतंच. मी त्याला म्हणालो ह्या चढावर जेंव्हा आपण पोहोचू तेंव्हा समोरच एक तिकटी लागेल , तिकटी म्हणजे तीन रस्ते . एक रस्ता खाली गढीकडे , एक तसाच विरुद्ध बाजूला पोळ गावात , आणि एक सरळ , तो रस्ता असा नसेलच ,पायवाट म्हणू हवतर , ती सरळ कड्याच्या शेवटाला संपेल .त्यापुढे अथांग समुद्र .आयला पशा हे पण तुला स्वप्नात दिसलं का काय ? शिऱ्या अजूनही मस्करीच्याच मूड मध्ये होता, पण मी काही न बोलता खिडकी बाहेर बघत बसल्यावर तोही शांत झाला. दहा मिनिटातच तो घाट संपला आणि जे दृश्य मला अपेक्षित होतं, तेच समोर आलं. समोर एक बोर्ड होता "पोळ. १ किमी" आणि उजवीकडे कडे एक बाण केलेला होता . समोरून भन्नाट वारा येत होता. थोडंच पुढेगेल्यावर आम्ही तिकटी वर पोचलो . शिऱ्या माझ्याकडे बघतच बसला . दोघेही गाडीतून उतरलो . समुद्राचा आवाज येत होता . उजवीकडे खाली नारळ , पोफळीच्या बागांमध्ये वसलेलं छोटस २०,२५ उम्ब्र्याचं पोळ. समोरचा रस्ता सरळ समुद्राकडे , आणि डावीकडे खाली ती गढी दिसली . अचानक धडधड वाढली , अंग ताठ झालं. अतिशय विचित्रच वाटत होतं. स्वप्नात जी गढी मला दिसायची , जो प्रदेश दिसायचा तोच आत्ता खराखुरा समोर होता. कसला योगायोग म्हणावा याला ? नक्की नियतीच्या मनात काय असावे ? शिऱ्या अजूनही गप्पच होता. तो सरळ त्या पायवाटेने समोर चालत गेला . मी त्या गढीच निरीक्षण करायला लागलो . गढी जवळ जवळ पूर्णच जळलेली होती (ते अपेक्षित होतंच ) मोठ्ठा फरक हा जाणवत होता कि , एका बाजूला इतकी नारळ , पोफळी, आंबा असताना या बाजूला काहीच वृक्ष नव्हते . विचित्रच खुरटी कधीच न पाहिलेली झाडी माजलेली होती , आणि जे काही मोजके वृक्ष होते ते हि काळपट हिरव्या रंगाचे. भयानक वेली फोफावल्या होत्या . अर्धी एक गढी त्यानेच झाकलेली होती . आजूबाजूला एक तुटलेलं कुंपण दिसलं , गढीच्या मागे पुन्हा टेकड्या होत्या , हिरव्या बशीत ठेवलेल्या एखाद्या पदार्थासारखी ती वस्तू दिसत होती . मग नजर आजूबाजूला फिरवली तर अजून एक गोष्ट लक्षात आली , आजूबाजूचा भाग एका रेषेत कापल्या गेल्या सारखा होता , लहानपणी लोणार सरोवर पाहिलेलं त्याची आठवण झाली , फरक हाच कि ते उल्कापाता मुळे गोल आकारात तयार झालेलं होत , इथे मात्र गोल आकार तुटून "शिव पिंडी सारखा " एक पट्टा थेट समुद्राला जाऊन भिडत होता , सर्वच विचित्र .
लांबवर शिऱ्या हातवारे करून मला बोलवत होता , त्यामुळे विचारांची शृंखला तुटली , मी हि चालत त्याच्यामागे निघालो . कड्याच्या टोकाला पोचलो आणि हादरलोच (अपेक्षितच होतं , तरीही धक्का हा बसलाच ) शिऱ्या विचारत होता , हाच कडा तुला दिसलेला का? होय काल दिसलेली
जागा हि हीच होती. याच जागेवरून त्या माणसाने ( का मीच ?) उडी मारलेली होती , इतक्या गोष्टी एकच वेळेत डोक्यात पिंगा घालत होत्या कि आता मला गरगरायला लागलं. पाउसही भरून आलेला होता, वारा तुफान वाहत होता, शिऱ्या म्हणाला यावर नंतर विचार करू , भूक लागलीये खूप ,गावात जाऊया चल. आम्ही परत मागे आलो , गाडीत बसलो आणि पाउस सुरु झाला , इतका कि काही फुटांवरचे सुद्धा दिसेनासे झाले, काचेवर बसलेल्या धुक्यात खालची गढी दिसेनाशी झाली, गावात आलो, गाव काय म्हणायचे याला जेमतेम पाच पंचवीस घर तीही विखुरलेली . गाडी एका झाडाखाली लावून उतरून आम्ही जरा इकडे तिकडे फिरलो , दोन चार कुत्री आमच्याकडे पाहून भुंकली , पण माणसांचा वावर काही दिसलं नाही , तसंही एवढ्या पावसात बाहेर कोण पडणार म्हणा ? एका घरापाशी आलो. म्हटलं इथे विचारून पाहूया .दोनदा दार वाजवल्यावर एक साधारण पन्नाशीचे काका बाहेर आले , आमच्याकडे पाहून त्यांना खासच आश्चर्य वाटलेले दिसत होते. आम्ही आमची ओळख करून दिली , त्यांचे नाव " सतीश बापट " ! अगदी ठेवणीतले कोकणी घर होते ते , पावसाचा आवाज ऐकत आम्ही झोपाळ्यावर बसून राहिलो. जुजबी बोलणं झालं , अजूनही
आम्ही त्या गावात कसे हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर होताच. पण आम्ही आधी जेवणाची सोय होईल का असे विचारले, अर्थात काय होतील ते पैसे आम्ही देऊच हेही सांगितले , त्यावर ते मोठ्याने हसले , म्हणाले त्याची चिंता नको , भाऊ असते आणि तुम्ही हा पैशाचा विषय काढला असता तर काही खैर नव्हती तुमची , असो भाऊ म्हणजे माझे वडील , दत्त मंदिरात गेलेत नैवेद्य घेऊन येतीलच एवढ्यात. मग आम्ही बसून राहिलो , आतून काकूंनी परत चहा आणून दिला .
इकडे एका जागेच्या संदर्भात आलो आहोत असे सांगितले. मग त्यांनी विचारले तुम्ही एजंट आहात का ? मग शिऱ्या म्हणाला नाही हो काका , आम्ही जागा विकसित करतो, कोकणात बर्याच जागा पडीक असतात , त्यांचा वर्षानुवर्षे वापर नसतो , मग अशा जागा विकत घेऊन मुंबईतले काही व्यावसायिक त्यावर हॉटेल किंवा मोठे रिसोर्ट उभारून पर्यटन सुरु करतात .
'अच्छा,अच्छा असं आहे तर , पण या गावात कोण विकतोय जागा ? काकांचे प्रश्न संपत नव्हते . मग मीच म्हणालो इथून पुढेच आहे ती property. पण जायला यायला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आधी इथे येऊन पाहिलं , काही सोय होतेय का .खरतर आमचा महिनाभर तरी मुक्काम असेलच येथे , आमची राहायची ,खायची सोय कुठे होईल का ते हि पहायचे होते .
अरे मग तसं सांगा कि , तुमची खायची प्यायची व्यवस्था येथे होईल कि, हा पण त्याचे मात्र मी पैसे लावणार हा , काका डोळा मिचकावत म्हणाले
झोपायची सोय येथे झाली नाही तरी मी तीही करून देईन , त्याची काळजी नको.
चला जेवण तयार आहेच , तुम्ही भुकेले दिसत आहात तर जेवून घ्या आधी मग बोलूच निवांत . "अग दोन पानं घे, पावणे जेवून जाणारेत, अस सांगत ते आत गेले . चला म्हणजे राहायची खायची सोय झाली तर .
पाच मिनिटात आम्ही जेवायला बसलो , गरमागरम वरण भात , पापड, भाजी पोळी , आणि असा साधाच बेत होता, आम्ही विचारलं तुम्हीही बसा कि , तेवढ्यात काकू म्हणाल्या , नाही मामंजी आले कि आम्ही बसू नंतर , तुमच होऊ द्या .
जेवता जेवता परत विषय जागेवर आला , काकांनी परत विचारले कुठल्या गावची जागा म्हणालात ती? तेवढ्यात शिरीष पचकला , अहो याच गावची
त्या समोरच्या दरीतली गढी , आरेकर नावाचे मुंबईतले मोठे बिल्डर आहेत , ते ती गढी तोडून तिकडे मोठे रिसोर्ट बांधणार आहेत . हे ऐकल्यावर काकूंच्या हातातला पाण्याचा तांब्या जोरात फरशीवर आपटला , सर्व पाणी आमच्या अंगावर , त्या फटकन आत निघून गेल्या , इकडे काका ताडकन उठले , त्यांचा मुळातला गोरा चेहरा , लालबुंद झालेला होता .
"उठा, उठा .. आत्ताच्या आत्ता .. आधी समजल असत तर दारावरूनच हाकलून दिले असते , घरी आईबाप असतील ना , का नरकात जायची हौस आलीये . अस म्हणत त्यांनी मला जवळजवळ ताटावरून उठवलच, शिऱ्या पण माझ्यामागून उठला . त्यांनी तसच हाताला धरून मला बाहेर ढकलले .
तेवढ्यात एक खणखणीत आवाज आला 'थांब सतीश. दुपारच्या वेळी एखाद्या माणसाला जेवणावरून उठवायचे संस्कार आहेत का आपले ?
'पण भाऊ ? '
बास्स एक शब्द बोलू नकोस , यांना परत आत घेऊन जा ,
आम्ही मागे पाहिलं, साधारण ऐशी च्या आसपास असलेल एक तेजस्वी व्यक्तिमत्व आत आलं , एका हातात छत्री , एका हातात चांदीच ताट, अंगावर काळा कोट , खाली धोतर , गोरा वर्ण धारदार नाक , पांढरी शुभ्र दाढी आणि लक्षात राहतील असे भेदक डोळे. सतीश काका एकदम शांत झालेले होते , काकूही सुद्धा बाहेर आल्या , कसबस उरलेली जेवणं उरकली . तुम्ही बाहेर बसा मी आलोच अस सांगून ते आजोबाही आत गेले.
झाला प्रकार अजूनच विचित्र वाटत होता . कशाचीच कशाला संगत लागत नव्हती , गोष्टी भयानक वेगात घडत होत्या , मनाने कसलाही निष्कर्ष काढण्याच्या आत घटना घडत होत्या. आम्ही फक्त प्रेक्षक होतो . बाहेर झोपाळ्यावर बसून राहिलो , सतीश काका आत जे आत गेले ते बाहेर आलेच नाहीत. बाहेर धुक पसरलेलं होतं , चांगलाच गारठा होता , जुनाट वृक्षांवरून पाणी ओघळत खाली लाल मातीत मिसळत होतं. बाकी काही दिसत नव्हत , आता काय करायचं ? शिरीष ने मला विचारलं
म्हटलं ते आजोबा काय म्हणतात ते पाहू , राहायची काहीतरी सोय तर पहावीच लागेल ना
तेवढ्यात ते आजोबा हळू हळू बाहेर आले , आम्ही उठून उभे राहिलो , ते त्यांच्या एका खुर्चीत जाऊन बसले , आम्ही बाजूच्या दोन स्टूलांवर जाऊन बसलो. ते माझ्याकडे आता अधिकच रोखून पाहू लागले , मला कसतरीच वाटायला लागलं . मग अचानक 'नाही ,नाही' अशी नकारार्थी मान हलवत ते मागे सरकले , आणि त्यांनी डोळे मिटून घेतले , दत्त दत्त ,अस काहीतरी पुटपुटायला लागले. आम्ही एकमेकांची तोंड बघत राहिलो .
अचानक खाडकन त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले "तूच तो " !!!
त्यांच्या त्या आवेशाने मी दचकून थोडासा मागेच सरलो . त्यांचे ते भेदक डोळे माझ्यावरच रोखलेले होते . हळूहळू त्याचं शरीर सैल पडलं , नजर सुद्धा निवळली. तेवढ्या हालचालींनी त्यांना खोकला लागला , मी बाजूचा पाण्याचा तांब्या पुढे सरकवला. त्यांनी घोट घोट पाणी घेतलं, आणि मागे टेकून बसले . बराच वेळ ते काहीच बोलत नव्हते , मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव चाललेली असावी, चेहरा बराच चिंताक्रांत दिसत होता
मला हळू हळू अंदाज यायला लागलेला होता, भाऊंचा आणि मला स्वप्नात दिसलेल्या माणसाचा नक्कीच संबंध असणार. शिऱ्या तर कामातून गेलेलाच होता . त्याला कसलाच अंदाज येत नव्हता , मागील दिवसात त्याला बर्याच नवीन गोष्टी समजलेल्या होत्या . ऑफिस , आरेकरांच काम, अचानक मी त्याला सांगितलेले स्वप्नांचे किस्से , रात्री मला पडलेलं विचित्र स्वप्न , ह्या गूढ जागा , हे गाव आणि आता हे कुटुंब . लहानपणी आम्ही जिग सा पझल खेळायचो त्याची आठवण झाली , इतके तुकडे विखुरलेले आहेत आजूबाजूला , पण एकाचाही एकाशी संबंध लागत नाहीये . हरवलेले तुकडे शोधून ते व्यवस्थित क्रमाने जोडल्याशिवाय चित्र पूर्ण होणार नाही .
इतक्यात भाऊ मला म्हणाले 'जयदीप .. हो जयदीपच. तू परत आलायस इथे , माझा अजूनही विश्वास बसत नाहीये . दत्त दत्त '
अगदी योग्य वेळी आलास , जसा मागे आलेलास तसाच , मागच्यावेळी एकट्याने युद्ध हाती घेतलेलस, वेडा जीव , एकट्याने "त्यांच्याशी" लढायला गेलेलास ,माझं काही एक न ऐकता. किती समजावलेलं मी तुला तेंव्हा , मला डरपोक म्हणून , येथेच्छ अपमान करून तू निघून गेलास , तुझ्या ज्ञानाचा तुला ज्वर चढलेला होता , पण कित्येक गोष्टी या विज्ञानालाही उमगलेल्या नाहीत हे तू विसरलास, तुझ्या जीवाची बाजी लावून
तात्पुरते तू त्यांना थोपव्लेस. पण जयदीप ... भाऊ थरथर कापत होते.
जयदीप, जयदीप "ते" परत आलेत

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालली आहे कथा, एकदम रोमहर्षक.. Happy गॅप खूप होतोय पण.. पुढच कधी ? Happy
खालून ४ थ्या लाईनीत येथेच्छ पाहिजे, टायपो झालाय, ते बघाल का जरा ?

मस्त
आधीचेही भाग वाचले .

कथेने चांगलाच वेग घेतलाय आणि बरीच गुंतागुंतही झालीये

"ते" म्हणजे नक्की कोण याची उत्सुकता लागून राहिली आहे

त्यांच्यातून परत येऊन ईथे टाकताना वेळ लागत असेल Wink

मस्त लिहिताय, पण एव्हढा वेळ गेला की लिंक तुटते हो.