लिओ ऑप्टसची दंतकथा - १

Submitted by यःकश्चित on 24 December, 2012 - 06:18

सकाळचे सात वाजले होते. डिसेंबरच्या त्या बोचऱ्या थंडीत उठावेसे वाटत नसताना नाईलाजाने उठलो. रविवार असला तरीही नऊ वाजेपर्यंत आवरून तयार व्हायचे होते. कारण नऊ वाजता मि. स्मिथ भेटायला येणार होते. त्यांचे काहीतरी अत्यंत महत्वाचे काम होते हे मी त्यांच्या काळ रात्री आलेल्या फोनवरून ताडले होते. फोनवर बोलताना ते एकही वाक्य एकसंधपणे बोलले नव्हते. त्यांच्या आवाजातील धास्तावलेपणा स्पष्टपणे कळत होता. ते असे बोलत होते जसे कि त्यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर धरून त्यांना हे बोलायला भाग पाडले आहे.

मी रोजच्याप्रमाणे चहा तयार केला आणि तो चहाचा कप घेऊन दिवाणखान्यात आलो. दरवाज्याच्या फटीतून पडलेले वर्तमानपत्र उचलले आणि त्याखाली पडलेला लिफाफा दिसला. तो लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होते.

मि. डॅनी विल्सन,
मी काल रात्री आपल्याला फोन केला होता. त्याप्रमाणे मी आज आपल्याला भेटायला येणार होतो. परंतु माफ करा. काही अपरिहार्य कारणांमुळे मी येऊ शकत नाही. कृपया मला समजून घ्या.
तसेच या पत्रासोबत मी आणखी एक चिट्ठी आपल्याला पाठवली आहे. त्या चिठ्ठीतील मजकूर सांकेतिक लिपीत लिहिलेला आहे. आपण आपल्या बुद्धीचातुर्याने त्याचा अर्थ लाऊन सांगितलात तर फार उपकार होतील आपले माझ्यावर.

आशा करतो आपण त्या मजकुराचा अर्थ लवकरात लवकर सांगाल.

आपला
मि. रॉबर्ट स्मिथ

मी ती दुसरी चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीत आकृत्या व चिन्हे या पलीकडे काहीही नव्हते. ती चिन्हे कळायला मी काही भाषातज्ञ नव्हतो. मी एक खाजगी गुप्तहेर होतो. यासाठी मला कुणाची तरी मदत लागणार होती. विशेषकरून एखाद्या भाषातज्ञाची, ज्याला या भाषांतील अर्थ समजतो. अशावेळी फक्त एकच नाव डोक्यात आले "जोसेफ".

***

" सॉरी जोसेफ, मी न सांगता आलो तुझ्याकडे. पण वेळच तशी आहे. ह्या चिठ्ठीत काय लिहिले आहे हे सांगू शकशील का तू ? "

जोसेफने ती चिठ्ठी पहिलीआणि मिश्कील स्वरात म्हणाला,

" काय डॅनी, एखादी ग्रीक पोरगी पटवली दिसतंय ! "

" काय ! हे ग्रीकमध्ये आहे ? "

" अरे मित्रा, तिचं नाव तरी सांग. "

" अहो जोसेफ महाराज, काही पोरगी वगैरे नाही. हे ब्लॅकमेलिंग आहे. ", असे म्हणून मी त्याला स्मिथचा फोन आणि पत्राबद्दल सांगितलं.

" ओह्... मग तर मला पटकन अर्थ सांगितला पाहिजे."

" हो ना. चल आता लवकर त्याच भाषांतर करून सांग. "

जोसेफ शेल्फमधून काही पुस्तके बाहेर काढून तो त्या चीठ्ठीतल्या मजकुराचा अर्थ लावू लागला. मी खुर्चीवर बसून त्याची ती खोली पाहू लागलो. त्या खोलीत भिंत दिसतच नव्हती. संपूर्ण भिंतीच्या भिंती पुस्तकांच्या शेल्फ्ने भरलेल्या. टेबलावरसुद्धा कसल्याश्या चित्र विचित्र आकृत्या काढलेली कागदे पडली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात काही दुर्मिळ वस्तूही होत्या. त्या वस्तूंवरही तशाच भाषातील मजकूर लिहिला होता. मजकूर कुठला चिन्हे आणि आकृत्याच होत्या त्या.

" डॅनी, हे स्मिथ काय करतात ? "

" काही कल्पना नाही. मी अजून त्यांना भेटलेलोही नाहीये. "

" मग आत्ता लगेच त्यांना फोन लाव आणि विचार चीठ्ठीचा अर्थ कुठे आणि कसा सांगायचा ते. "

" जोसेफ ! तू इतक्या लवकर भाषांतर करशील असा वाटलं नव्हतं. पण तू तर कमालच केलीस गड्या. "

" अरे ती साधी ग्रीक होती. फक्त जे शब्द जुन्या ग्रीकनुसार वापरले होते ते मला पुस्तकात शोधावे लागले. हा पहा अर्थ. आणि यातून काय समजतं ते सांग ", असे म्हणून जोसेफने चिठ्ठी माझ्या हातात दिली.

संगीत म्हणजे काव्य असे अन् काव्यातही संगीत असे
सूर छेडता संगीताचा काव्य दिसे इंद्रधनू जसे
तम इथला जाळून तीराने ज्ञानप्रकाश उजळून दिसे
भविष्य दृष्टी असे जयाला तोची माझा भक्त असे
रवी करुनी वंदन मजला प्रकाश जगी या पाडीतसे
ओळखे माझे नाव तयाला मार्ग पुढचा दावितसे

" हे काय आहे ? मला हे एखाद्या कोड्यासारखे वाटत आहे. "

" कोड्यासारखे नाही कोडेच आहे ते. तेही साधेसुधे कोडे नाही तर ते आहे महान कूटप्रश्नकार लिओ ऑप्टस यांनी रचलेल कोडं. इ.स.पू. ५व्या शतकात हे लिओ ऑप्टस त्यांच्या कोड्यांबद्दल फार प्रसिद्ध होते. ते त्या काळी कूटप्रश्न प्रतियोगिता भरवत. वर्षातून एकदा ही स्पर्धा भरवली जायची. या स्पर्धेत जगभरातून अनेक बुद्धिवंत भाग घ्यायचे. जो कोणी दिलेल्या कोड्यांच्या आधारे अंतिम चषकापर्यंत पोहोचेल त्याला ते सहा महिने या कोड्यासंबंधित प्रशिक्षण द्यायचे. "

" वा.."

" आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे दंतकथाच सांगतो ज्यात कितपत सत्यता आहे याचा मला अंदाज नाही. पण ह्या भाषांचा अभ्यास करता करता ह्या काही गोष्टी मला समजल्या. लिओ ऑप्टसनी या कोड्यांच्या स्पर्धेतून आणि इतर काही माध्यमातून आयुष्यभरात अमाप पैसा जमवला होता. आजच्या काळाप्रमाणे अंदाजे १ मिलियन अब्ज डॉलर असेल. मरते वेळेस त्यांनी तो कुठे तरी दडवून ठेवला. आजतागायत अनेक जणांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाच सापडला नाही. त्यांनी जिथे तो पैसा उर्फ खजिना लपवला, तिथपर्यंत जाण्यासाठी लिओ ऑप्टस यांनी अनेक अवघड कोडी लिहून ठेवली. त्यामुळे आजवर तो खजिना शाबूत आहे असे म्हणतात. "

एक दीर्घ उसासा सोडून जोसेफ पुढे बोलू लागला.

" ह्या कोड्यामुळे आज मला या खजिन्याबद्दल १ टक्का खरेपणा वाटू लागला आहे. जर स्मिथकडे याबद्दल आणखी माहिती असेल तर... "

जोसेफच्या चेहेऱ्यावर हवेत उडत असल्यासारखे भाव आले. मी त्या चिठ्ठ्या खिशात घातल्या आणि जोसेफला म्हणालो,

" चल जोसेफ माझ्यासोबत. आपण स्मिथकडे जाऊया. फक्त तिथे मी सांगतो तसच कर. त्याव्यतिरिक्त काही करायचं नाही. "

जोसेफला घेऊन मी निघालो.

***

दुसऱ्या क्षणाला आम्ही मि. स्मिथच्या दारात होतो, दरवाजावरची बेल वाजवून तो उघडण्याच्या प्रतीक्षेत.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुप्तहेराचे नाव "डॅनी विल्सन" आहे की "डॅनी विल्यम्स"? पत्राच्या मायन्यात तुम्ही "डॅनी विल्सन" लिहिलेय आणि शब्दखुणांमध्ये "डॅनी विल्यम्स"!

क्रमशः............:अओ:

क्रमशः वरुन आठवले की आपण सुध्दा विशाल साहेबांचे भाउ आहात...तर......आपण रांगेत आहात पुर्ण झाल्यावर वाचन होईल...;)

मैत्रेयी व निंबुडा : अनुवादित नाहीये....त्या शैलीत लिहीलीये फक्त.....

निंबुडा : गुड ओब्झर्वेशन हा Happy बादवे ते विल्सनच आहे....

आबासाहेब : हा..मध्ये जरा जमलच नाही...बट नाउ आय एम बॅक Happy

बाकी सर्वान्ना धन्यवाद...जास्त वेळ तिष्ठत ठेवणार नाही...
लवकरच पोस्टेन...

मस्तच.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

एकच सुधारणा कराल का? >>आजच्या काळाप्रमाणे अंदाजे १ मिलियन अब्ज डॉलर अस>> इथे मिलियन किंवा अब्ज पैकी एक काहीतरी हवं ना?

चौकटराजा : संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे असा दाखवायचं आहे....म्हणून तस लिहिलंय

( एकावर अठरा पूज्य द्या ना... Wink आपल्याला थोडीच फरक पडणारे Wink )

य :कश्चीत ....अहो ईतक्या सुचना येई पर्यन्त थाबु नका ना....पट पट पुढचे भाग पोस्टा .... सा सु ( सारख्या सुचना ) गिरि करणारे तुमची मस्त कथा वाचुन आनदी होतिल .....

मस्त आहे ....