'मायनी' माई मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

फार फार फार्फारचफार पूर्वी एक मायन आटपाट नगर होतं. तिथे एक मायन राजा होता. त्याला एक राणी (मायना[१]) व मायनी[२] नावाची मुलगी होती. मायनी जन्माला येण्याअगोदर कालगणना अस्तित्वात नव्हती. पण मायनी जन्माला आल्यावर तिचा सोळावा वाढदिवस (तेव्हाही सोळाव्या वरसाला फारचफार महत्त्व होते!) नक्की कधी करायचा, असा गहन प्रश्न पडल्याने राजाने लगेचच कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय घेतला.[३] या प्रोजेक्टसाठी आधी स्थानिक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले पण ते सगळे क्यांडिडेट इंटरव्ह्यूत फेल गेले. मग शेजारच्या राज्यातून एम१(मायन१) व्हिशावर (कमी पैशात) एकास घेण्यात आले. हा तरुण तिथल्या प्रख्यात विद्यापीठात शिकलेला, गोल्ड मेडलिस्ट, होतकरू, हॅंडसम तरुण होता. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हे देदीप्यमान यश त्याने मिळवले होते. त्याने ताबडतोब प्रोजेक्ट किकऑफ केला.

इकडे राजकन्या हळूहळू मोठी होत होती. होता होता ती सोळा वर्षांची झाली. तरुणाने केलेल्या अचूक दिनदर्शिकेमुळे अचूक दिवशी राजकन्येचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. त्याच दिवशी तिची आणि कॅलेंडर-तरुणाची ओळख करून देण्यात आली. ये मुलाकात कौनसा मोड लेगी, ये किसे पता था? 'सोळावं वरीस धोक्याचं' म्हणतात ते उगीच नाही. राजकन्या अगदी धाडकन कॅलेंडरतरुणाच्या प्रेमात पडली. पार्टीमध्ये तिला गाणे म्हणावयाचा आग्रह होताच तिने-
'मायनी माई[४] मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा.
जोगन हो गई तेरी दुलारी मन जोगी संग लागा.'
हे गाणे म्हटले. भोळ्या राजाराणीला तेव्हा काही संशय आला नाही.

हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. 'तू जब जब मुझको पुकारे, मै दौडी आऊ नदिया किनारे' म्हणत राजकन्या त्याला भेटायला पळत पळत येऊ लागली. राजाराणीला वाटे, ऑलिम्पिकात पळण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी म्हणून सराव करते आहे. त्यांनी तिला कधीच अडवले नाही.

एके दिवशी वाळवंटातल्या मायन देवळातल्या वेदीच्या चबुतर्‍यावर ते दोन प्रेमी जीव बसले होते.[५] तिने त्याच्या डोळ्यांत पाहून म्हटले,
'कॅट आणि सल्लूपेक्षा आपल्या वयातला फरक तसा कमीच आहे नाही? 'कुछ तो लोग कहेंगे'च. पण तू लक्ष देऊ नकोस...'
अशा प्रकारे त्यांच्या गप्पा चालू असताना देवळातल्या पुजार्‍याच्या फोनमुळे ही बातमी कळलेला राजा तिथे आला. "परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन ये मायन कुलके तीन स्तंभ है..." त्याच्या दमदार आवाजातल्या वाक्यामुळे दोघेही एकदम दचकून भानावर आले. चिडलेल्या राजाने दोघांची ताटातूट केली. कॅलेंडर तरुणाचा व्हिसा ताबडतोब रद्द करून त्याला वाळवंटामार्गे पायी त्याच्या देशात परत पाठवण्यात आले.[६] कॅलेंडर तरुण मायन राज्यात फारच लोकप्रिय असल्याने जनतेचा रोष टाळण्यासाठी राजाने युक्ती केली. डॉटकॉम बबल आणि सबप्राईम क्रायसिस या दोन्ही गोष्टींमुळे एकदमच जागतिक मंदी आल्याचे जाहीर करण्यात आले व तरुणाची नोकरी याच मंदीमुळे तडकाफडकी गेल्याने त्याचा व्हिसा रद्द झाला, अशी माहिती आरटीआयअंतर्गत माहिती मागवणार्‍या लोकांना पुरवण्यासाठी तयार केली गेली. राजकन्येचे लग्न दुसर्‍याच एक राज्याच्या राजकुमाराशी लावून दिले गेले.

काही काळाने या सगळ्या गोष्टी थोड्या स्थिरावल्यावर राजाने कॅलेंडर प्रोजेक्टावर नजर टाकली. २१डिसेंबर, २०१२पर्यंतचे कॅलेंडर खोदून तयार होते. राजाने नवीन टीम तयार करून त्यांना कॅलेंडर प्रोजेक्ट पुढे चालू ठेवायची आज्ञा केली.

"पण महाराज, आपले राज्य अजून सीएमेम लेव्हल १लाच आहे. त्यामुळे कशाचेच काही डॉक्युमेंटेशन नाहीये. ह्या प्रोजेक्टवर तुम्ही आधी रिसोर्स क्रंचच्या नावाखाली तो एकच माणूस ठेवला होता आणि त्याच्यामुळेच हा प्रोजेक्ट चालू होता. आता हा पुढे चालू ठेवणे काय खरं नाही." एक रिसोर्स भीतभीत बोलला. त्याने नुकतेच पेपर टाकले होते आणि सध्या त्याचा नोटिस पिरियड चालू असल्याने त्याला एवढे बोलण्याचे धैर्य आले होते.[७]

मग जागतिक मंदी, बजेट कमतरता, रिसोर्स क्रंच, प्रोजेक्ट रेड झोनमध्ये जाणे, नवीन टीममधल्या चौघांना कालसर्पयोग असणे अशी अनेक कारणे देऊन राजाने प्रोजेक्ट गुंडाळला. पण '२१ डिसेंबर २०१२' ही शेवटची तारीख खोदलेले ते कॅलेंडर मात्र उरले.

आणि त्यावरून काही हजार वर्षांनी सुरू झाली २०१२च्या जगबुडीची वर्ल्डवाईड, ब्लॉकबस्टर कहाणी! यात मायनी आणि कॅलेंडर तरुणाची प्रेमकथा मात्र हरवूनच (अथवा, वाहूनच) गेली.[८]

बोला पुंडलीकवरदाहारीविठ्ठल..

१. याचाच एक पाठभेद 'मैना' असाही आढळतो. राजाच्या राणीचे नाव मैना आणि एका भूभागाचे नाव 'पेरू' ही बाब लक्षणीय आहे.
२. 'इनी मीनी मायनी मो' हे बालगीत पहिल्यांदा तान्ह्या मायनीसाठीच म्हटले गेले म्हणून तिचे नाव त्या गाण्यात आहे.
३. 'कॅलेंडर छापणे' हा वाक्प्रचार कुठून आला ते चाणाक्ष, विचक्षण वाचकांस कळलेच असेल.
४. माई = मायन आई. मायनी माई = मायनीची आई. वडिलांना डॅडा म्हणत असत.
५. हा शीन आम्ही 'हम दिल दे चुके सनम'मधून कॉपी केलेला है. मायन राजकन्येला ऐश्वर्या रायसारका ड्रेसबी दिलेला है.
६. हिते आम्ही 'तडप तडप के इस दिल से आह निकलती रही..' हे गाणेसुद्धा कॉपी करून टाकले आहे.
७. ही मूळची मायन काळातली घटना. ही नंतर काहीशी बदलून 'नौकरी'वाल्यांनी आपल्या जाहिरातीत वापरली.
८. व्हाय धिस 'कॅलेंडरतरुण', 'कॅलेंडरतरुण' डी? त्याला नाव का नाही? क्वेच्चनका आन्सर बोले तो, आदमी की पैचान उसके नामसे नही, कामसे होती हय..

विषय: 
प्रकार: 

धम्माल Lol
त्याने नुकतेच पेपर टाकले होते आणि सध्या त्याचा नोटिस पिरियड चालू असल्याने त्याला एवढे बोलण्याचे धैर्य आले होते.>>>>>>>>>>>>>> हे भारीये Lol

Lol

हं... अर्धवट माहितीवरून लिहिलेला अर्धवट लेख. विकीपीडीयावरून एवढी माहिती तर कुणालाही मिळेल. मायनीच्या प्रेमकहाणीमधे अजून एक महत्त्वाचा भाग होता, तो म्हणजे तिने तिच्या लग्नानंतर तिने प्रियकराचा त्याच्या देशात जाऊन घेतलेला शोध. कॅलेंडरतरूण त्याच्या देशी परत आल्यावर त्याने काकनिर्णय या नावाची एक देशी कंपनी चालू केली होती. मायनीने गायलेल्या "कागा" गाण्याची आठवण म्हणून त्याने हे नाव ठेवले होते.

तसेच, माचूपिचू पर्वताच्या आसपास गायलेलं "परबत के इस पार" आणि "बस्ती बस्ती परबत परबत" या (या बस्ती शब्दाचा आयुर्वेदिक विधीशी काही संबंध असावा का यावर काही विद्वान संशोधन करत आहेत) दोन गाण्यांचा उल्लेख अपरिहार्य आहे असं मला वाटतं.

Lol Biggrin Rofl
सगळ्या स्मायलिंची प्रॅक्टिस झाली. खुप भारि लिहिलेय श्रद्धा. हल्लि मराठि पेपर्समधे विनोदि म्हणून जे येते त्यापेक्षा फारच चांगल्या क्वलिटीचे लिखाण आहे.

श्रद्धा

_/|\_

१. याचाच एक पाठभेद 'मैना' असाही आढळतो. राजाच्या राणीचे नाव मैना आणि एका भूभागाचे नाव 'पेरू' ही बाब लक्षणीय आहे.
२. 'इनी मीनी मायनी मो' हे बालगीत पहिल्यांदा तान्ह्या मायनीसाठीच म्हटले गेले म्हणून तिचे नाव त्या गाण्यात आहे.
३. 'कॅलेंडर छापणे' हा वाक्प्रचार कुठून आला ते चाणाक्ष, विचक्षण वाचकांस कळलेच असेल.
४. माई = मायन आई. मायनी माई = मायनीची आई. वडिलांना डॅडा म्हणत असत.
५. हा शीन आम्ही 'हम दिल दे चुके सनम'मधून कॉपी केलेला है. मायन राजकन्येला ऐश्वर्या रायसारका ड्रेसबी दिलेला है.
६. हिते आम्ही 'तडप तडप के इस दिल से आह निकलती रही..' हे गाणेसुद्धा कॉपी करून टाकले आहे.
७. ही मूळची मायन काळातली घटना. ही नंतर काहीशी बदलून 'नौकरी'वाल्यांनी आपल्या जाहिरातीत वापरली.
८. व्हाय धिस 'कॅलेंडरतरुण', 'कॅलेंडरतरुण' डी? त्याला नाव का नाही? क्वेच्चनका आन्सर बोले तो, आदमी की पैचान उसके नामसे नही, कामसे होती हय.. >>>>>>>

Rofl

इश्श्य.... अगदी 'वो भूली दास्ता, लो फिर याद आ गयी' असं झालं वाचून. मागच्याच्या मागच्या जन्मी मी मायनी असेन का? मायनी --> मामी हे ट्रान्स्फॉर्मेशनही फिट बसतंय.

'मय तुझसे मिलने आई, मन दीर जाने के बहाने' असं कौटुंबिक गाणंही 'ओम जय जगदीश हरे' च्या चालीवर त्या मंदिरात लागत असे. पुढे त्या प्रेमी जीवांची खूण म्हणून दोन कबुतरांची चित्रं त्या चबुतर्‍यावर कोरून काढली होती इतपत आठवतंय.

जुल्मी परंपरेचं प्रतिक म्हणून वर्षांतून दोन दिवस एक सावलीरूपी नाग त्या मंदिराच्या पायर्‍यांवरून अजूनही सळसळत जातो.

Pages