वत्सल सुधा : पूर्वार्ध

Submitted by अवल on 20 December, 2012 - 08:40

( माझी आजी, माझ्या आईची सावत्र आई म्हणजे सौ. सुधा प्रधान ( पूर्वाश्रमाची वत्सला गुप्ते) हिची कथा मी लहानपणापासून आईकडून ऐकत आले. तिच्या आयुष्यातल्या अनेक घटना सर्वसामान्य स्त्री पेक्षा खूप वेगळ्या. त्या सगळ्यांसमोर मांडाव्या वाटल्या. म्हणून हे लिखाण. यातल्या महत्वाच्या ठळक घटना जशाच्या तशा मांडल्या आहेत. माझी आई, मोठा मामा यांनी त्या आपल्या आठवणींतून सांगितल्या आहेत. १९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी तिची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती. त्या काळातले एक वेगळे व्यक्तित्व आणि एक फार वेगळे आयुष्य जगलेली ही एक कर्तबगार, कणखर अन वेगळीच स्त्री. )

१९१५ साल असावे, वत्सलाचा जन्म कर्जतच्या गुप्त्यांच्या घरी झाला. मातृसुख तिला फार लाभले नाही. लहानपणीच तिची आई गेली. वत्सला दिसायला अतिशय सुरेख होती, त्या काळातल्या पद्धतीने तिचे वयाच्या अकराव्या वर्षीच लग्न झाले. लग्न झाल्यावर सासरी, दहिवली या गावी ती गेली. इथपर्यंतचे तिचे आयुष्य त्या काळातल्या सर्वसामान्य मुलीचेच होते.
तिच्या आयुष्याला इथेच कलाटणी मिळाली.

सासरी गेल्यावर अकरा वर्षाच्या वत्सलाला तिथले वातावरण बरोबर वाटले नाही. तिथे राहणे, संसार करणे आपल्याला धोकादायक होईल हे लक्षात आल्या बरोबर आठव्या दिवशीच ही अकरा वर्षाची मुलगी तडक माहेरी परत आली. तिने सासरची परिस्थिती घरच्यांना सांगितली. इतर नातेवाईकांनी तिच्यावर परत सासरी जाण्याचे दडपण आणण्याचा प्रयत्न केला परंतु वडिल अन मोठे भाऊही तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. तिच्या सासरी परत न जाण्याच्या निर्णयाला त्यांनी मान्यता दिली. खंबीरपणे त्यांनी तिला आधार दिला.

लग्न होई पर्यंत वत्सला फक्त चौथी पास होती. ती परत आल्यावर काही काळ या सर्व धक्क्यातून सावरावयात गेला. समाजाचा विरोध, वाईट नजरा, काही प्रमाणात बोलणी या सर्वांतून वत्सला तावून सुलाखून निघाली. परंतु ती तिच्या मताशी ठाम होती.

सतरा वर्षाची होई पर्यंतीकाळ असाच गेला. वत्सलाला आपण स्वतःच्या पायावर उभी राहावे असे वाटत होते. त्यामुळे तिने पुढे शिकण्याचे ठरवले. मोठे भाऊ, वहिनी अगदी प्रेमाने वागवत असले तरी तिच्या स्वाभिमानी वृत्तीला नुसते बसून राहणे पटत नव्हते. म्हणुन मग तिने शिकवण्याचे ठरवले. परंतु मध्ये बरीच वर्षे अशीच गेली होती. केवळ तीन महिन्याच्या अभ्यासावर तिने चौथीची परीक्षा दिली अन त्यात पहिला नंबर मिळवला. पुढे ती फायनल पर्यंत शिकली. अन लगेचच शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. त्या नंतर तिने टिचर्स ट्रेनिंग कोर्स नाशिक येथे के. त्या सुमारास सौ. सुधाताई अत्रे (प्र. के. अत्रे यांच्या पत्नी ) तिथे मेट्रन होत्या. त्यांना वत्सलाचे भारी कौतुक होते. त्यांच्याकडे नॉनव्हेज केले की त्या आवर्जून वत्सलला जेवायला बोलवत. टिचर्स ट्रेनिंग झाल्यानंतर लगेचच वत्सला कर्जतच्या शाळेत शिक्षिका म्हणून शिकवायला लागली.

काही वर्षांनी वत्सलाला ठाण्याला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिचे काका ठाण्याला वकील होते. त्यांच्याकडे राहून तिने आपली ठाण्यातली शिक्षिकेची नोकरी सुरू ठेवली.

कालांतराने तिचे वडिलही गेले. धाकट्या भावंडांची जबाबदारी तिने उचलली. त्यांची शिक्षणे, लग्न तिने लाऊन दिली. नंतर ती मुलुंडच्या शाळेत नोकरीला लागली. तिथे वर चढत चढत हेड मिस्ट्रेस झाली.

१९४७च्या सुमारास ठाण्यातील रेव्हेन्यु खात्यातील डि. वाय. प्रधान यांच्या प्रथम पत्नीचे अकाली अन अचानक निधन झाले. १३, ११, ९, ६, ४ अशा वयातली पाच लहान मुले आई विना पोरकी झाली. डि. वाय यांचा स्वभाव अतिशय कडक होता. त्यामुळे या लहान लहान मुलांना आता कोण आई म्हणुन लाभेल असा विचार वत्सलाबाईंच्या मनात आला. आपल्या काकींजवळ त्यांनी हे बोलून दाखवले. तेव्हा तूच का करत नाहीस असे काकींनी विचारले. काकींनी पुढाकार घेतला अन डि. वाय. प्रधान आणि वत्सलाबाई यांची गाठ त्यांनी घालून दिली.

प्रधानांनी आपले कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन झाले आहे तेव्हा तुम्हाला स्वतःचे मूल होणार नाही अन या पाचही मुलांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असे सांगितले. तसेच प्रथम पत्नीची आई अन प्रधानांचे वयस्कर वडिल हेही आपल्याच घरी राहतील याचीही कल्पना दिली. प्रधानांनी इतक्या स्पष्टपणे सर्व सांगितले त्यावरून त्यांच्या स्वच्छ मनाची कल्पना वत्सलाबाईंना आली. तसेच प्रधानांबद्दल समाजात तेव्हा फार चांगले मत होते. अतिशय सचोटीची व्यक्ती म्हणुन ते आदराने ओळखले जात. त्यात या पाच मुलांचा विचार करून वत्सलाबाईंनी लग्नाचा निर्णय घेतला.

परंतु या लग्नात एक अडचण होती. ती म्हणजे वत्सला बाईंचे आधीचे लग्न. जरी त्या सासरी फार राहिल्या नसल्या तरी लग्न झाले होते. या सुमारास नुकताच मुंबईच्या विधी मंडळात घटस्फोटाचा कायदा संमत झाला होता. त्यामुळे जो पर्यंत घटस्फोट होत नाही तो पर्यंत दुसरे लग्न मी करणार नाही असा विचार प्रधानांनी मांडला. नियम, कायदे यांना अतिशय महत्व देणारे गृहस्थ असल्याने प्रधानांचा हा विचार रास्तच होता. ठाण्याचे त्या वेळचे प्रसिद्ध वकील मा. माधवराव हेगडे यांनी वत्सलाबाईंची केस घेतली. मुख्य प्रश्न होता तो आधीच्या नव-याला शोधून त्याची घटस्फोटासाठी सही घेण्याचा. वत्सला सासर सोडून आल्या नंतर वर्षभरात त्या व्यक्तीने दुसरे लग्न केले होते. अन त्या नंतर दोन वर्षांनी ती व्यक्ती परागंदा झाली होती. त्या मुळे त्या व्यक्तीला शोधणे अन त्यांच्याकडून घटस्फोटाच्या अर्जावर सही घेणे ही एक अवघड बाब झाली होती. हे काम माधवराव हेगडे यांनी चोख केले. या सर्व खटल्याचे काम मा. श्री माधवराव हेगडे यांनी काहीही मानधन न घेता केले, हे विषेश! त्या प्रथम पतीनेही कोणतीही खळखळ न करता सही दिली. अन घटस्फोट पार पडला.

जानेवारी १९४८ मध्ये वत्सलाबाई यांचे डि. वाय. प्रधान यांच्याशी दुसरे लग्न झाले. अन त्या सौ. सुधा दत्तात्रय प्रधान बनल्या. त्या वेळच्या "लोकमान्य" या वृत्तपत्रात " एका घटस्फोटित महिलेचा दुसरा विवाह संपन्न" अशी बातमी पहिल्या पानावर झळकली होती. असा रितीने सुधाबाईंचा संसार सुरू झाला.
(उत्तरार्ध : http://www.maayboli.com/node/39824)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल आणि अंशा, तुमची आजी म्हणजे एक धडाडीची स्त्री होती! नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व!

पुढील भागच्या प्रतिक्षेत!

छान लिहिलय....

ठाण्यात दोन्ही कुटुंब गुप्ते आणि प्रधान नावाजलेली आहेत. गुप्ते वकिल तर खासच.... त्या मुळे लेख जवळचा वाटतो आहे.

रच्याकने

मला वाटतय नाटक कलाकार वैजयंती चिटणीस ( पुर्वाश्रमीच्या उषा गुप्ते) पण त्याच गुप्त्यां कडच्याच
( बहूतेक) ( माझ्या आईची मैत्रिण )

वत्सला आणि तिच्या माहेरच्यांचे कौतूक वाटले.

पुढील भागाची वाट पहात आहे.

छान लिहित आहेस.उत्सुकता वाढली आहे.कथा तुझ्याच आज्जिची असलि तरी ऐकिव माहितीवर न लिहिता तु इतिहासाचि प्राध्यापक आणि बाप दाखव नाहितर श्राद्ध कर बाण्याची असल्याने पुरावे शोधले असशिल याची खात्री आहे.
या शोध प्रक्रीयेबद्दल वाचायलाही आवडेल.

धन्यवाद सर्वांना.
शोभना, हो ती मुलाखत मिळवली. थॅक्स टू चिनुक्स. कारण मला पुण्यातले शासकीय वाचनालय माहिती होते, विश्रामबाग वाड्यातले ( पोस्टाच्यावरचे) पण तिथे जुनी मासिकं नाहीत हेही माहिती होते. म्हणून हक्काने चिनुक्सला विचारले. त्यानेही तितक्याच आपुलकीने सांगितले Happy
गोखले हॉल ( लक्ष्मी रोड) च्या दुस-या मजल्यावर शासकीय ग्रंथालय: मासिक आणि वृत्तपत्र विभाग आहे. तिथे जुनी मासिकं फार छान ठेवली आहेत. तेथील कर्माचारीही मदतखोर निघाले Happy अन मला हा अंक मिळवता आला. वानगी दाखल हा फोटो :
Bai_1 copy.jpg
धन्यवाद शोभना, हा फोटो टाकावा की नाही असा विचार केला होता, पण आता तुझ्या प्रश्नामुळे टाकता आला Happy

१९२६ साली एक ११ वर्षाची मुलगी नवर्‍याला सोडून परत येते? अविश्वसनीय वाटावे अशी गोष्ट! hats off to her! नी तिच्या निर्णयाला पाठिंबा देणार्‍यांचेही तितकेच कौतुक!

१९२६ साली एक ११ वर्षाची मुलगी नवर्‍याला सोडून परत येते? अविश्वसनीय वाटावे अशी गोष्ट! hats off to her! नी तिच्या निर्णयाला पाठिंबा देणार्‍यांचेही तितकेच कौतुक!
>>>> अगदी!!!

छानच! आणखी काय लिहू Happy बाकी तू समजून घेशिलच!
इथे मला आणखी एक गोष्ट सर्व वाचकांशी शेअर करायला आवडेल ती म्हणजे माझी व अवलची आजी एकच Happy
अवलच्या ह्या प्रयत्नामुळे(अर्थातच सर्व गोष्टींच्या मूळाशी पोहोचण्याच्या तिच्या जिद्दी स्वभावामुळे) आम्हा भावंडांनाही आजीबद्दल बरीच माहिती मिळतेय.धन्स आरतीताई!

रायगड + १.

अवल, छानच लिहिलंयस. इतक्या जुन्या मासिकातला फोटो बघून आश्चर्यच वाटलं. तो फोटो इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. पुढे वाचायची उत्सुकता ....

धन्यवाद सर्वांना .
रायगड >>>१९२६ साली एक ११ वर्षाची मुलगी नवर्‍याला सोडून परत येते? अविश्वसनीय वाटावे अशी गोष्ट! hats off to her! नी तिच्या निर्णयाला पाठिंबा देणार्‍यांचेही तितकेच कौतुक! <<< अगदी ह्याच साठी मी लिहायला घेतलं Happy धन्यवाद
अंजली Happy
रोहन आणि सर्व, हो लिहितेय Happy
मामी Happy