लिमिटेड ममता!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पाळणाघर म्हणा, अथवा डेकेअर अथवा कोणतंही नाव द्या- आपण कामाला जाताना मुलाला अन्य कोणाकडे सोपवणं हे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही आईसाठी एक अवघड काम! त्या पाळणाघराची बाई आपल्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देईल ना, त्याला नीट खायला-प्यायला देईल ना, त्याला झोपवेल ना, त्याला बरं नसलं तर औषध-पाणी करेल ना? हजार प्रश्न! माझ्यावरही माझ्या आठ महिन्यांच्या मुलाला पाळणाघरात ठेवायची वेळ आली, तेव्हा माझीही अवस्था फार बिकट झाली होती. एक तर आम्ही राहतो, त्या भागात हे एकच पाळणाघर. त्यामुळे इथे आपलं, किंवा आपल्या मुलाचं पटलं नाही तर??? हा यक्षप्रश्न! बिचकत बिचकतच मी त्या पाळणाघरात चौकशी करण्यासाठी गेले.

’पाळणाघर’ म्हटल्यावर आपल्या घरी आलेल्या बायकांची मनस्थिती कशी असते, हे ’काकूंना’ माहिती असणारच ना! थोडंसं हसून स्वागत केलं तर आलेल्या बाईला धीरच येईल, हे काय वेगळं सांगायला हवं? पण बाईंचा चेहरा कोरा! "मी गेली वीस वर्ष पाळणाघर चालवत आहे. सगळीच मुलं थोडा त्रास देतात, नंतर रुळतात. ठेवा तुम्ही मुलाला. त्याचं खाणंपिणं, कपडे, सगळं पाठवा सोबत. दोन दिवस रडेल, मग राहील. अगदीच आक्रस्ताळा असेल, तर सांगेन तुम्हाला. पण जरा रडला, तर मऊ पडू नका.." बाई रोखठोक!

मला तसाही पर्याय नव्हताच. निमूटपणे सर्व सूचना मनात साठवून घेत लेक दुसर्‍या दिवसापासून काकूंकडे जायला लागला. या बाबतीत तो अगदीच गुणी. त्याला माणसांची आवडच. त्यामुळे जरी लहान असला, तरी त्याला तिथे सरावायला काहीच वेळ लागला नाही- या गोष्टीचं मला, आमच्या घरातल्यांना इतकं कौतुक! पण काकू निर्विकार! "रहातात हो मुलं, सांगितलं होतं मी तुम्हाला.." इतकंच म्हणून त्यांनी विषयावर पडदा पाडला. यथावकाश, लेक मोठा व्हायला लागला, शीशूशाळा, प्लेग्रूप इत्यादींबरोबर पाळणाघर अर्थातच चालू होतं. त्याला कळायला लागलं, तसं तिकडचं एकएक सांगू लागला.. तिथल्या मुलांबद्दल, त्यांचे खेळ, भांडाभांडी, खाऊबद्दल वगैरे. काकूंकडे मुलं चिकारच होती. त्यातली काही अगदी तान्ही होती- अगदी तीन महिन्यापासूनची. त्यातल काही मुलं कधीमधी काकूंच्या कडेवर, मांडीवर दिसत. एरवी त्या मुलांपासून लांबच असायच्या.. मुलांना बघायला दोन ’ताया’ होत्या. त्याच मुलांचं बघायच्या, काकू सूपरव्हिजन करायच्या. फार क्वचित कोणत्याही मुलाचं कौतुक केलं असेल त्यांनी. माझा लेक त्या पंगतीत असावा असं मला वाटायचं, कारण तो खरंच काहीच त्रास देत नसे. पण, तो इतका भाग्यवान नव्हता, हेच खरं!

पाळणाघर चालू केलं, त्या अर्थी मुलांची थोडी तरी आवड हवी असा माझा तरी समज होता. मुलांना सांभाळणं, त्यांचं सगळं व्यवस्थित करणं हे निव्वळ व्यावसायिक होऊ शकत नाही. या ’व्यवसायात’ human touch असावाच लागतो- अशी माझी मतं काकूंचं वागणं बघता चुटकीसरशी बदलली. एकूण मुलगा तिथे रहात होता. प्रेम, ममता जरी तिथे नव्हती, तरी दुर्लक्षही नव्हतं. मुलांवर लक्षं असायचं त्यांचं, पण त्यांनी कधी ते फारसं अंगाला लावूनही घेतलं नाही, एक प्रकारचा कोरडेपणा म्हणा, की अलिप्तपणाच अनुभवला त्यांच्या वागण्यातून. मुलांमध्ये बसावं, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांना खेळ वगैरे शिकवावे, किंवा नुसतं त्यांच्या विश्वात रममाण तरी व्हावं वगैरे त्यांना पटण्यासारखं नव्हतं. मुलं नुसतीच त्यांचे आई-वडील येईस्तोवर पाळणाघरात असायची- ना आनंदी, ना दु:खी, नुसतीच वाट पहाणारी. पाळणाघर बदलावं असा विचार अनेक वेळा मनात आला. पण सर्वांना सोयीचं पडेल असं पाळणाघर जवळ नव्हतं आणि लांबून का होईना, पण मुलावर लक्ष रहातंय म्हणून तो तिथेच जात राहिला.

आणि एक दिवस सोडायला गेल्यावर काकूंच्या काकांनी सांगितलं, की काकूंची तब्येत बरी नाहीये, त्यांचं पोटाचं ऑपरेशन करावं लागणार आहे, तर उद्यापासून पाळणाघर बंद राहील! त्यांच्या तब्येतीची चिंता वाटलीच, पण व्यक्तीगत स्वार्थापायी ’मुलाचं काय करायचं?’ ही मोठी चिंता मानेवर बसली. दुसरं घरापासून बरंच लांब असलेलं पाळणाघराबद्दल ऐकून होते. ’लांब’ म्हणून त्याचा विचार कधी केला नव्हता. पण आता इलाज नव्हता, म्हणून जाऊन आले तिकडे. मुद्दाम लेकाला सोबत घेऊन गेले होते. त्याला ती जागा आवडली, कारण तिथे sand pit, doll's house होतं, आणि मला ते चालवणार्‍या मावशी आवडल्या कारण त्या छान बोलल्या. दुसर्‍या दिवसापासून मुलाचं ते रूटीन सुरू झालं! तो तिथेही लगेचच रुळला. उन्हाळी सुट्टी असल्याने खूप मुलंही होती, दोन ओळखीचीही निघाली, त्यामुळे गडी खुशही झाला!

काही दिवसांनंतर असं वाटलं की काकूंच्या तब्येतीची चौकशी करावी. त्यांचं ऑपरेशन होऊन साधारण एक महिना झाला होता. थोडी तब्येत सुधारली असेल, हिंडत्या-फिरत्या झाल्या असतील या अंदाजाने मी आणि लेक गेलो विचारपूस करायला एका संध्याकाळी. दार काकूंनीच उघडलं. दार उघडल्याबरोब्बर पुन्हा चेहरा गूढ! मी मुलाच्या निमित्ताने आज पाच वर्ष जातेय त्यांच्याकडे.. पण आजवर मला त्यांच्या चेहर्‍याकडे बघून, त्यांना मुलं आणि त्यांच्या आया आलेल्या आवडतात/ चालतात की नाही याचा पत्ता लागलेला नाही!!

मी गेल्यागेल्याच तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्यांना थोडं हायसं वाटलं! मग स्वत:बद्दल बोलू लागल्या.. ऑपरेशन, नंतरची काळजी, औषधं, पथ्य सगळंच.. मग म्हणाल्या, ’आता पाळणाघर बंदच ठेवणार आहे. मुलांना बघायचं म्हणजे फार त्रास होतो.. फार लक्ष द्याव लागतं. आता मुलं (त्यांना दोन मुलगे) म्हणत आहेत, इतकी वर्ष दुसर्‍यांच्या मुलांना पाहिलंस, आता जरा स्वत:च्या मुलांकडे बघ!’ ही हिन्ट मी घेतली आणि ’तब्येतीची काळजी घ्या’ असं सांगून त्यांचा निरोप घेतला!

बाहेर पडले तेव्हा माझं डोकं गरगरत होतं. चहापाण्याची मी त्यांच्याकडून अपेक्षा करतच नव्हते, पण जी काही दहा मिनिटं आम्ही त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांनी साधी चौकशी, की ’अचानक पाळणाघर बंद करावं लागलं, तुमच्या मुलाची काय सोय केली आहेत आता तुम्ही?’ केली नाही! माझा मुलगा निदान मोठा तरी आहे, पण जी वर्षा-दोन वर्षांची मुलं होती, त्यांना दुसर्‍या जागी रुळायला किती वेळ लागला असेल? त्यांची कसलीच जबाबदारी नव्हती हेही मान्य, पण किमान उपचार म्हणून एक साधी चौकशीही नाही? आणि सर्वात चाट मी अजून एका गोष्टीने पडले.. माझा मुलगा माझ्या बरोबर होता, तोच तर आमच्यामधला मूळ दुवा होता.. नाहीतर कशाला माझा आणि त्यांचा संबंध येणार होता? पण माझ्या मुलाची एका शब्दाने चौकशीही केली नाही!! रोज जात होता तो त्यांच्याकडे, पण त्याच्याकडे ढुंकून पाहिलंही नाही त्यांनी! प्रेम, माया नाही पण साधा शिष्टाचारही नाही? इतकं मश्गूल असावं एखाद्याने आपल्याचमध्ये? इथे येताजाता ओळखीच्या मुलाशीही आपण एखाददुसरा शब्द बोलतो, त्याच्या गालाला हात लावतो, काहीतरी gesture दाखवतो.. इथे माझा मुलगा जवळजवळ त्यांच्या डोळ्यादेखत मोठा झाला होता.. त्याच्याशी ’सुट्टीचा काय करतोस आता? शाळा कधी सुरू?’ असे निरर्थकच, म्हटले तर, पण आवश्यक असे प्रश्नही नाहीत?? त्यांचा आणि माझ्या मुलाचा आता संबंध संपला, पाळणाघर आता बंद झालं म्हणून इतकं टोक? जी काही बांधिलकी होती, ती केवळ पाळणाघराच्या वेळात आणि पैशापुरतीच होती? इतकी लिमिटेड?

प्रचंड अस्वस्थ झाले मी तिथून बाहेर पडले तेव्हा. माणसांचे अजब नमूने नेहेमीच अनुभवायला मिळतात आपल्याला, पण एक पाळणाघर चालवणारी बाई असं वागू शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं! शेवटी, मला गरज असताना त्यांनी माझ्या मुलाला त्यांच्याकडे ठेवून घेतलं, दिलेल्या पैशाचा मोबदला व्यवस्थित चुकवला असंच म्हणायचं. पैशाने त्यांचं लक्ष माझ्या मुलासाठी मी विकत घेतलं होतं हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं! त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करून मी तो विषय कायमचा संपवून टाकला!

विषय: 
प्रकार: 

पूनम छान लिहीलय.भा.पो. आणि XXX शहरात असल्या एरंडेल छापाच्या लोकांची कमी नाही. फुक्कटचे हसायला लोकं महाग का असतात ? स्वभावाला औषध नसते. पण गोड बोलून केसाने गळा कापणा-यापेक्षा बरे असंही कधी कधी वाटत.
एवढी तरी बांधिलकी आहे, कामात चोख असावे हेही उलट मला त्याच शहरात आढळले. उगीच घोर फसवणूक नाही. होज्जायेग्ग्गा जी, लो अभी कर लिये देते है आणि गायब - हे करत नाहीत.
स्वच्छ भांडतात. असो.

चांगलं लिहिलंयस.
लिमिटेड, मोजून-मापून ममता कसली?
लिमिटेड बांधिलकीच ही.
ममता काही दिसली नाही मला त्यांच्या वर्णनात.

छान लिहिलं आहेस. पण पैशासाठी काही करताना अनेकदा ममता, प्रेम, आदर इ. गोष्टी सहज विसरल्या जातात. त्याला इलाज नाही.

पूनम, छान लिहिले आहेस. अंशुमान चे म्हणणे १००% पटले. व्यावसायिक बांधिलकी म्हणणे योग्य ठरेल.

लेख आवडला.
पैश्याने त्यांचं लक्ष माझ्या मुलासाठी मी विकत घेतलं >>> हे आणि एवढंच खरं. बाकी मुलांना ममता मिळाली तर बोनसच. आर्फीचे पटले.

    ***
    Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.

    पुनम अग स्वभावाला औषध नसतं. व्यवसायिक बांधिलकीतही माणुसकीचा ओलावा जपता येतो. मी हा अनुभव घेतलाय. माझ्या घराच्या मागेच एका बंगल्यात एक बाई पाळणाघर चालवतात. त्या शिस्तप्रिय कार्यक्रमच सांगतात चौकशीला गेल्या गेल्या. प्रोफेशनल असाव पण बोलण्या वागण्यात आपलेपणा असावा, त्याचाच अभाव आढळला त्यांच्या कडे मग जरा लांब दुसर्‍या पाळणाघरात ठेवल होत लेकीला तिथे थोडी पहील्या बाईंपेक्षा शिस्त कमी होती पण आपले पणा भरपुर होता.

    पैशासाठी काही करताना अनेकदा ममता, प्रेम, आदर इ. गोष्टी सहज विसरल्या जातात. त्याला इलाज नाही.>> चिनुक्स तू म्हणतोस तस असेल कदाचित पण आई म्हणुन पाळणाघराकडुन असलेल्या अपेक्षांत "मायेने सांभाळ" हे प्रेफरंस मधे वरच्या स्तरावर असत. आणि व्यवसाय कोणताही असो व्यावसायीक नियम पाळुन देखील माणुसकी जपली तर चांगलच आहे की. जर एखादी/द्या ने व्यवसायिक शिस्तिच्या पलीकडे जावुन थोडे जिव्हाळ्याचे संबंध ठेवले तर पैशाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही पुढे जावुन एक चांगला बंध नाही का निर्माण होणार त्यांच्या आणि मुलात/पालकांत

    त्याला इलाज नाही>> हे आपल आपल्या साठी अ‍ॅक्सेप्ट करण्याच्या सोयिसाठी, पण अस असल की वाईट तर वाटतच

    -------------------------------------------------------------------------------
    Donate Eye - Bring Light to Blind

    पूनम खरच असा अनुभव आला की त्रास होत असेल. आम्हाला हा अनुभव नाही हे एक प्रकारे बरंच आहे.

    खरच पाळणाघरात मुलांना ठेवायचे म्हणजे एका आईचे काय होते ते चांगलेच अनुभवते आहे. नशीबाने माझ्या मुलीला ज्या काकुंकडे ठेवते त्या खरच खुप मायेने करतात. पण कधीतरी सुट्टिच्या दिवशी जरा १ - २ तास सांभाळायला सांगितले कि लगेच ह्यांना बाहेर जायचे असते. काहि काहि गोष्टि दुर्लक्ष करायला लागतात. तरीदेखिल रोज जो पर्यंत लेक दिसत नाहि तोपर्यंत जीव नुसता टांगणीला लागतो.
    ====================================
    कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

    << XXX शहरात असल्या एरंडेल छापाच्या लोकांची कमी नाही. >>
    हा मनुष्यस्वभाव आहे. त्याचा कुठल्याहि शहराशी काहीSहि संबंध नाही.

    वीस वर्षांपूर्वी मला प्रचंड depression आले होते. दोन वर्षात मी एकदाहि हसलो नाही, की कुणाशीहि कामाशिवाय बोललो नाही. कसाबसा त्यातून थोडाफार सावरलो. सगळ्यांनाच तशी संधि मिळत नाही.

    पूनम, खरं आहे बाई! लहान मुलांशी इतक्या कोरडेपणाने वागणारी माणसं बघितली की फार नवल वाटतं.
    चांगलं पाळणाघर मिळणं म्हणजे नशीबच आहे. याबाबतीत मी फार सुदैवी आहे म्हाणयचं.
    ========================================================
    रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण
    मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन

    ह्म्म पूनम, वाईट वाटलं वाचून.
    फक्त कदाचित याला त्यांचीही काही बाजू असेल असं एक चुकचुकून गेलं मनात.
    अर्थात ती असली तरी जे तुला अनुभवायला लागलं ते त्रासदायकच.

    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    लेख आवडला.
    ह्यावरून माझ्या लहानपणीची पाळणाघरांची एक आठवण..
    मी व माझी छोटी बहीण एका काकूंकडे सांभाळायला असताना आईची आठवण येऊन मी कधी कधी रडायचे. मी रडले की त्या काकू चक्क मला गणपतीच्या देवळाच्या गाभार्‍यात कोंडून ठेवायच्या.
    नंतर दुसर्‍या पाळणाघरात ठेवल्यानंतर तिथल्या काकू मात्र अतिशय मायेने सांभाळायच्या आम्हाला. मी रडले तरी माझी समजूत घालायच्या. खुपच चांगल्या होत्या त्या.

    वाईट वाटलं वाचून Sad आपल्याकडे चांगल्या दर्जेदार डे केअर सेन्टर्स् ची इतकी कमतरता का आहे Uhoh सगळयाच घरांमधे आईबाप दोघे कामावर जातात, आजी आजोबा असतीलच असं नाही, मग इतक्या मोठा प्रमाणावर गरज असताना कुठल्यातरी हौशी, योग्य अ‍ॅटिट्युड / प्रशिक्षण नसलेल्या, किंवा मनमानी केअर प्रोव्हायडर् वर अवलंबून रहायला लागणं खरच अवघड आहे Sad
    माझं मत - नेहमी मुलांचा फीडबॅक ग्राह्य मानावा! मूल १ -२ वर्षाचं असलं तरी त्याने दिलेले सिग्नल्स ओळखून ठरवावं डे केअर कन्टिन्यू करावं की नाही ते. हो, इतकं लहान मूल सुद्धा फीडबॅक देत असतं, ते डीटेल सांगू शकत नसलं तरी ते तिथे जायला कितपत खूष / उत्सुक आहे, केअर्गिव्हर ला कसं रिस्पॉन्ड करतं, यावरून नक्की कळतं.

    वाईट वाटलं. मी जर्सित एक गुजराती वयस्कर जोडपं पाहिलं त्याची आठवण झाली. त्या आँटी मुलं सांभाळायच्या, सगळी देशी जनता. अर्थात ते थोडं स्वस्त असणार पण मुलांना टीव्ही लावून दिला की दिवस भर मुलं एका रांगेत बसून टीव्हीच बघताना दिसायची.. Sad आँटी सुद्धा डोक्याला त्रास करून घ्यायच्या नाहीत. मुलांची मात्र मला दया यायची. हसण्या बागडण्याच वय, बाहेर थंडी आणि मुलं घरात टिव्ही समोर..
    पूनम, नि म्हणतेय तसं त्यांची सुद्धा काही बाजू असेल असं वाटलं पण काकूंनी इतकं टोकाचं वागायला नकोच. स्वतः आई असलेली बाई असं वागू शकते म्हणजे कमालच वाटते स्वभावाची! दुसरं म्हणजे आपण नाती, भावना यांचा विचार करतो आणि त्याचवेळा समोरची व्यक्ती शुद्ध व्यवहार बघते ह्याचा धक्का बसतोच, इतका निबरपणा बघायची आपल्या संवेदनशील मनाला सवय नसते त्यामुळेच हे असं होत असावं.असो!

    >>> नाती, भावना यांचा विचार करतो आणि त्याचवेळा समोरची व्यक्ती शुद्ध व्यवहार बघते ह्याचा धक्का बसतोच, इतका निबरपणा बघायची आपल्या संवेदनशील मनाला सवय नसते त्यामुळेच हे असं होत असावं.
    खूपच पटलं!

    पूनम, वाईट वाटलं वाचून. तुला त्या बाईंना कधीच ह्यामागचं कारण नाही का विचारावसं वाटंत?

    स्वतःची अगदी काहीही बाजु असो, कारण असो, पण दुसर्‍याचं लहान मूल सांभाळताना सुध्दा निव्वळ व्यवहाराचा कोरडेपणा ठेवून कसं चालेल? दिवसाचे ७-८ तास घरापासून दूर असणार्‍या लहान मुलाला 'व्यवस्थीत खाल्लं, पडला झड्ला नाही' इतकंच बघायचं? ह्या वयात नवं काही शिकलं, करून दाखवलं की शाबासकी हवी असते, प्रेमानी जवळ घेऊन 'काय हवंय? काय होतंय?' विचारणारं कुणीतरी पाहीजे असतं, आणि कितीतरी आणखी...

    खरंच , बाळासाठी चांगलं पाळणाअघर, डे केअर मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट असं म्हणायला हवं!

    <<ह्या वयात नवं काही शिकलं, करून दाखवलं की शाबासकी हवी असते, प्रेमानी जवळ घेऊन 'काय हवंय? काय होतंय?' विचारणारं कुणीतरी पाहीजे असतं, आणि कितीतरी आणखी...>>

    थोडक्यात तुम्हाला बदली आई पाहिजे! तशी कुणी मिळणे खरच भाग्याची गोष्ट. नि समजा तशी कुणि मिळाली नि जरा मोठा झाल्यावर मुलगा (मुलगी) आईला म्हणू लागली की, "तू वाईट्ट आहेस, मला करायचे ते करू देत नाहीस. मला त्या दुसर्‍या आईकडेच जायचय्!"
    मग काय करणार?

    Happy Light 1

    काही व्यवसाय हे नाईलाज म्हणून करायचे व्यवसाय नाहीत हे लोकांच्या लक्षातच येत नाही. असो.
    ~~~~~~~~~

    पूनम चांगला लिहीला आहेस तुला आलेला अनुभव.
    एखादी गोष्ट अगदी आवडीने करणे, छंद म्हणुन जोपासणे आणि त्यातुन थोडा फार पैसा कमावणे आणि एखादी गोष्ट आवड असो अथवा नसो फक्त आणि फक्त पैश्यासाठीच (मन न लावता) करणे या दोन्हीतुन मिळणार्‍या output च्या दर्जामध्ये फरक हा असणारच. पहिल्या प्रकारातले लोक शेकडा दोन पाच टक्के असतील तर दुसर्‍या प्रकारातले पैश्याला पासरी.
    फक्त काही ठिकाणी आपण या दर्जाशी तडजोड करतो तर काही ठिकाणी नाही. पाळणाघर या ठिकाणी ती केली जात नाही, केली जावु नये कारण मुलांच्या संस्काराचा-आरोग्याचा-जडणघडणीचा प्रश्न असतो.

    (बाकी काम करु देत नाहीत, मुलांशी खेळायला वेळ नाही म्हणुन मुलांना दिवसभर टीव्ही समोर बसवणारे फक्त पाळणाघरवालेच नाही तर पालक सुद्धा आहेतच ना- या कंसातल्या प्रतिसादाचा लेखाशी काही संबंध नाही, फक्त वर उपासने लिहीलय त्याला अनुसरुन ही कमेंट आहे)

    १. पाळणाघर चालवणार्‍या व्यक्तीने आपल्या मुलाशी 'प्रेमाने' वागावं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं होतं? ते तितकंच महत्त्वाचं असतं तर आपण त्या बाई आजारी पडेपर्यंत त्या पाळणाघरात मुलाला ठेवलं नसतं. 'आपली कितीही गैरसोय झाली तरी चालेल, पण मुलगा आनंदात राहिला पाहिजे' असं आपण तेव्हा म्हटलं का? मग आता ही टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे?

    २. आधीही काहींनी म्हटल्याप्रमाणे त्या बाईंची काही बाजू असू शकेल की नाही? आपण ५ वर्षांच्या आतल्या १० मुलांबरोबर दिवसभर असं काही वर्षं राहिलो तर आपले चेहरे किती दिवस आणि किती प्रफुल्लित राहतील?

    ३. मुलांना पाळणाघरात ठेवताना सुरक्षितता, स्वच्छता आणि व्यवस्था (लक्ष ठेवणं, खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं इ.) यात तडजोड होवू शकत नाही. त्यानंतरच्या बाबींमधे (>>मुलांमध्ये बसावं, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांना खेळ वगैरे शिकवावे, किंवा नुसतं त्यांच्या विश्वात रममाण तरी व्हावं) आपले प्राधान्यक्रम आपण ठरवून त्याप्रमाणे निर्णय घ्यायला हवेत.

    ४. पालक म्हणून आपण तरी हे सगळं करतोच का २४*७*३६५? "घर सांभाळणं आणि बालसंगोपन - इतकंच करत नाही राहू शकत" - असं आया म्हणत नाहीत का? आपल्याच मुलांबद्दलसुद्धा?

    ५. >> फार क्वचित कोणत्याही मुलाचं कौतुक केलं असेल त्यांनी. माझा लेक त्या पंगतीत असावा असं मला वाटायचं, कारण तो खरंच काहीच त्रास देत नसे. पण, तो इतका भाग्यवान नव्हता, हेच खरं!
    With all due respect, असं जगातल्या १००% आयांना आपल्या मुलाबद्दल वाटत असतं. ते इतरांनाही वाटलंच पाहिजे असा हट्ट का? तक्रार त्या तुमच्या मुलाशी 'प्रेमाने' वागत नव्हत्या अशी आहे की कोणत्याच मुलाशी प्रेमाने वागत नव्हत्या अशी आहे?

    आश्चर्य वाटले वाचून. त्या ताया तरी मग खेळायच्या का मुलांशी?

    रुनी- अगदी अगदी.
    चांगले पाळणाघर, चांगल्या बाया (मुलांना ज्या व्यवस्थित बघू शकतील अशा आणि तरी विश्वासार्ह, फालतू गोष्टीत कमी लक्ष घालणा-या, स्वच्छता पाळणा-या, थोडेफार शिकवू शकणा-या, मुलांना जेवू घालू शकणा-या) मिळणे फारच अवघड. त्रास तर खूपच होतो.
    पूनम- माणसं अशी का वागतात या गोष्टीचा खरच खूप त्रास होतो, आणि त्या वेळेला आपण ते तसे का ऐकुन घेतो याचाही. घेतो एवढं खरं.
    मिनू म्हणते ते पटले आणि नीधप म्हणते तेही. मैत्रेयी खरयं - फारच सतर्क राहायला लागतं मुलं काय सांगतायेत आणि जरा मोठ्ठ्या मुलांच्या बाबतीत किती खरं सांगतायेत याबद्दल.
    कविता, सखी, मेधा- कसले अनुभव एकेक. Sad
    स्वाती- तुझं पोस्ट आत्ताच वाचलं. पूनमचे पोस्ट वाचल्यापासून या विषयावरील सगळे ऐकलेले आणि काही घेतलेले अनुभव फेर धरतायत माझ्याभोवती. त्यात तुझेही मुद्दे आहेतच. जरा सुसंगत मांडता आले तर मांडते.

    पूनम, तुझे आईचे मन कळतेय. आणि त्यातूनच उत्पन्न झालेल्या 'अपेक्षा' ही.
    पण राग नसेल तर आपण हे सुद्धा पाहीले पाहिजे की नाण्याला दुसरी बाजू असतेच. नाहीतर त्या व्याक्तीची मूळची पर्सनॅलिटीच तशी असेल. कधी कधी आपण खूप अपेक्षा ठेवतो , त्याही दुसर्‍या कडून.

    त्या बाईंची भुमिका टोकाची असेल सुद्धा पण ते हे काम गेली कित्येक वर्षे करत आहेत. त्यानुसार त्यांचे वय लक्षात घेता, किंवा कदाचित 'त्याच त्याच' कामाबद्दल काही वर्षांमध्ये आलेली उदासीनता सुद्धा असु शकेल. तसे तान्ह्या लहान मुलांनापासून मुले सांभाळने हे त्रासिकच असते.
    महत्वाचे बाब हीच की, तुमचे मुलं सुरक्षित होते व राहिले त्या पाळणाघरात. नाहीतरी दिलेल्या मोबदल्यात किती पाळणाघर बेसिक सुरक्षितता ह्याची गॅंरंटी देतात किंवा काही ठरावीक रुल्स पाळतात?

    प्रेम कोणी किती द्यावे/कसे असावे हे आपल्या हातात नक्कीच नसते.(तुला हि फिलोसॉफी वाटेल पण हे खरेच असते).
    एक उदाहरण द्यायचे झालेच, इथे ५ मिनीटे उशीर झाला तर इथे $५ ५ मिनिटाला चार्ज करतात. जरी बरेच रुल्स वगैरे पाळले जातात इथेही नी टिचर्सही हसर्‍या वगैरे असल्या तरी त्याकडे 'तो' हसरा भाग एक जॉब म्हणूनच बघितला जातो बर्‍याचदा. Just a Job requirement. बाकी एकदा का वेळ झाली की त्याच टिचर्स डे केअर मधून एकदम detached mode मध्ये जातात. एकदा ५ मिनीटे उशीराबद्दल इतके भारी लेकच्रर एकवले बहिणीला की 'आम्हाला सुद्धा लाएफ आहे वगैरे. असो. सगळ्या डे केअर मध्ये असेच नसते हि नोंद घ्यावी. तेव्हा हा एक फक्त अनुभव आहे. दुसरीकडे बरेच चांगले अनुभव येवू शकतो.

    माझ्या कामा संबदित एका ६० वर्षाच्या डॉकटरशी ओळख झाली. नूऱोसर्जन होता. ३५ वर्षे लहान मुलांबरोबर काम करून सुद्धा एकदम खडुस्स वाटला सुरुवातीला. मग कळले की त्याला स्वताला पोटाचा कॅनसर होता. तर त्याचा एक मुलगा लहानपणीच ब्रेन टुमरने गेला होता त्यामुळे तो एकदम सर्व गोष्टीत उदासीन(negative) असायचा. तसा कामात उत्तम होता. एकदा गप्पा मारता मारता मी म्हटले की तुझ्या बद्दल काही रोजच्या(खडूस, हसरा नाही वगैरे) कमेंट्स एकल्या त्या का व असे का? मग त्याने हे वरचे सांगितले व खंत करत म्हणाला की , It’s my job and I must do it. I can’t emotionally involve myself with every kid going through the pain. बरेच प्रश्ण मनात आले पण मग असे काहीसे म्हणाल्यावर बोलणेच खुंटले. असो.
    विषयांतर असेल तर सॉरी.

    मला स्वातीचं म्हणणं पटतंय .. मलाही वाटत असतं कायम की माझा मुलगा deserve करतो तेव्हढी आदर्श आई नाही मी .. पण पाळणाघरातल्या बाई प्रेमळ असणं आणि त्यांनी ते प्रेम मुलाला जाणवून देणं ही माफक अपेक्षा आहे .. दुसरा पर्याय नाही म्हणून हे चालवून घेतलं आणि एका क्षणी त्याचा उद्वेग येऊन लेख लिहीला गेला हे समजतंय ..

    मला असं वाटतं की एखादा, सामाजिक विषयाचा किंवा कोणताही जिथे वाचक आपण relate होतोय असं वाटणारा लेख आला की वाचकांकडून त्याची कार्यकारणमिमांसा ही होतेच .. त्यातून takeways काय आहेत ह्याचीही चर्चा होणारच .. किमान माझ्यापुरतं तरी मला इतकंच वाटतंय, की असं माझ्या बाबतीत झालं असतं आणि कालांतराने माझा उद्वेग झाला असता तर ह्यापुढे अशा पाळणाघरात माझ्या मुलाने जावं की नाही, दुसरा पर्याय नसेल तर मला काय जास्त महत्वाचं आहे हे पाहून पुढचे निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करेन ..

    स्वाती माफ कर पण तुझी काहीतरी गल्लत होते आहे... तुझ्या पोस्ट्चा उद्देश कळला नाही...

    १. पाळणाघर चालवणार्‍या व्यक्तीने आपल्या मुलाशी 'प्रेमाने' वागावं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं होतं? ते तितकंच महत्त्वाचं असतं तर आपण त्या बाई आजारी पडेपर्यंत त्या पाळणाघरात मुलाला ठेवलं नसतं. 'आपली कितीही गैरसोय झाली तरी चालेल, पण मुलगा आनंदात राहिला पाहिजे' असं आपण आधीच का म्हटलं नाही? मग आता ही टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे?
    >>> अतिशय टोचलं हे वाक्य स्वाती ... बोल्ड केलेले...पाळणाघराच्या काकू ह्या अचानक आजारी पडल्या त्या काही मुलांना सांभाळल्यामुळे हळूहळू खंगत खंगत आजारी पडल्या नाहीत... एक दिवस अचानक त्यांना त्रास व्हायला लागला आणि पाळणाघर तडकाफडकी बंद करावं लागलं... एवढी अक्कल आम्हालाही आहे आणि तू जितके दिवस आम्हाला ओळखतेस त्यावरून तूला ही तसे वाटत असेल असे वाटले होते Sad आणि टिपण्णी नीट वाचलीस तर सर्व भावनेचा उद्रेक हा साधी मुलाची चौकशीही केली नाही म्हणून झाला आहे.. रस्तात एखादे बाळ किंवा गोड मुलगा दिसला तर आपण त्याच्याकडे बघून हसतो.. त्याला हाक मारतो.. इथे ज्या मुलाशी जवळजवळ ५ वर्ष संबंध आहे त्या मुलाकडे तुम्ही ढूकूनही पाहू नये ह्याचे वाईट वाटले.. मुलगा आनंदी नव्हता असे कुठेच म्हटले नाहीये. तो आनंदिही नव्हता आणि दु:खी ही कारण कर्तव्ये पार पाडलीच की सर्व काकूंनी.. आणि समजा आधी असा विचार केला नाही .. चुकले आमचे तर आता टिपण्णी करायची नाही हा तर्क काही झेपला नाही..

    २. आधीही काहींनी म्हटल्याप्रमाणे त्या बाईंची काही बाजू असू शकेल की नाही? >>> नक्कीच असेलच काही बाजू. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात्च पण ज्या बाईला इथे कुणी काळी की गोरी पाहिली नाही तिच्या दुसर्‍या बाजूविषयी कळकळ वाटली पण जी तुझी मैत्रीण आहे (म्हणजे पूनम तसे समजते. तू तसे समजतेस की नाही माहित नाही) तिची बाजू लक्षात येऊ नये ह्याचे सखेद आश्चर्य वाटले किंवा निदान तिच्या बाजूविषयी अजून जाणून घ्यावेसे वाटले नाही. तसे असते तर तू कदाचित ती बाई आजरी पडेपर्यंत पाळणाघरात ठेवले कशाला वगैरे विधान न करता अजून चौकशी केली असतीस Sad

    ३. तू म्हणतेस तेच प्राधान्यक्रम लावून निर्णय घेतला होता.. शेवटी माणुस कुठेतरी तडजोड करतोच की (म्हणूनच तू कंसात लिहिलेल्या गोष्टी नव्हत्या तरी बाकीच्या दॄष्टीने सोयीचे असे पाळणाघर निवडले होते...)

    ४. >> ह्याचे प्रयोजन कळले नाही Sad

    ५. >> फार क्वचित कोणत्याही मुलाचं कौतुक केलं असेल त्यांनी. माझा लेक त्या पंगतीत असावा असं मला वाटायचं, कारण तो खरंच काहीच त्रास देत नसे. पण, तो इतका भाग्यवान नव्हता, हेच खरं!
    With all due respect, असं जगातल्या १००% आयांना आपल्या मुलाबद्दल वाटत असतं. ते इतरांनाही वाटलंच पाहिजे असा हट्ट का? तक्रार त्या तुमच्या मुलाशी 'प्रेमाने' वागत नव्हत्या अशी आहे की कोणत्याच मुलाशी प्रेमाने वागत नव्हत्या अशी आहे?
    >>> कुणाशीच फारश्या प्रेमाने वागत नाहीत हे दिसतच होतं पण बाकीच्या आयांचे काय म्हण्णे आहे ह्यावर हे इथे मांडणे हा उद्देश नव्हताच पूनमचा ... तिने हे स्वतःपुरते लिहिले होते.. इतरांनी प्रेमाने वागवे हा हट्ट नाहीच पण पाळणाघराच्या बाईनी तरी थोडा जिव्हाळा दाखवावा ही अपेक्षा असणे ह्यात चूक काय? आणि नाही वागल्या तर खंत वाटणारच...

    माफ कर स्वाती पण प्रामणिकपणे सांगायचे झाले तर तुझा प्रतिसाद मला biased वाटला .. दुसरी कुठली तरी जुनी खसखस निघाली असे वाटून गेले... तसे नसेलही कदाचित .. मला दिसलेल्या नाण्याची बाजू मला अशी दिसली... पण तसे नसेल तर ह्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल मी तुझी आधीच माफी मागतो..

    तुझी मते ही जनरल न वाटता थेट पूनमवर हल्ला केलेली वाटली म्हणून हा पोस्ट्प्रपंच
    -------
    हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

    दुसरं म्हणजे आपण नाती, भावना यांचा विचार करतो आणि त्याचवेळा समोरची व्यक्ती शुद्ध व्यवहार बघते ह्याचा धक्का बसतोच, इतका निबरपणा बघायची आपल्या संवेदनशील मनाला सवय नसते त्यामुळेच हे असं होत असावं.असो!
    >>> पूनमने का व काय लिहिले आहे हे उपास ने अगदी योग्य शब्दात मांडले आहे... ह्यात काकूंवर टिका करण्यापेक्षा स्वत:च्या भावनांना वाट करून देणे जास्त होते आणि म्हणूनच एखादे ललित वगैरे न टाकता तिने हे रंगिबेरंगीवर टाक्णे पसंत केले

    -------
    हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

    >> जी तुझी मैत्रीण आहे (म्हणजे पूनम तसे समजते. तू तसे समजतेस की नाही माहित नाही) तिची बाजू लक्षात येऊ नये ह्याचे सखेद आश्चर्य वाटले किंवा निदान तिच्या बाजूविषयी अजून जाणून घ्यावेसे वाटले नाही. तसे असते तर तू कदाचित ती बाई आजरी पडेपर्यंत पाळणाघरात ठेवले कशाला वगैरे विधान न करता अजून चौकशी केली असतीस

    >> तुझा प्रतिसाद मला biased वाटला

    म्हणजे माझा प्रतिसाद तुला 'चुकीच्या दिशेने' बायस्ड वाटला. तो पूनमच्या बाजूने बायस्ड असायला हवा होता. पूनम मैत्रिण असण्यानसण्याचा प्रांजळ मताशी संबंध काय?

    >> तसे नसेल तर ह्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल मी तुझी आधीच माफी मागतो..
    हे लिहिलंस ते बरं केलंस. माफ करायचं की नाही यावर विचार करत्ये.

    रंगीबेरंगीवर टाकलंय म्हणूनच ते चांगलं ललित आहे की नाही अशी चर्चा त्यावर होत नाहीये. त्यात मांडलेल्या मतांवरच होत्ये.

    बरी/वाईट कशी का होईना पण माझ्या लिखाणावर मतं द्या - अशा प्रकारचे जोगवे जे लोक मागतात, त्यांनी मतभेद व्यक्त केल्यावर त्याला 'बायस्ड' म्हणून लेबल करावं हा मोठाच विनोद आहे.

    ...

    हे रंगीबेरंगी वर लिहिलय हे मला लक्षातच आल नाही. मला वाटल चर्चा चालु आहे. असो. मी माझी पोस्ट मागे घेते.कारण मला स्वातीला म्हणायच होत तसच काहीस म्हणायच होत

    रंगीबेरंगीवर लिहिले असेल तर कमेंट्स देवू शकत नाहीत का?(खरेच माहीती नाही म्हणून विचारतेय.)
    तसे असेल तर मग पूनम सॉरी, तुझ्या वैयतीक जागेत लिहिल्याबद्दल.

    Pages