परका (भाग ४)

Submitted by चौकट राजा on 10 December, 2012 - 01:09

भाग १ - http://www.maayboli.com/node/39477
भाग २ - http://www.maayboli.com/node/39482
भाग ३ - http://www.maayboli.com/node/39503

वरून पुढे चालु
*****************************************************
"या मिस्टर अँड मिसेस देसाई. प्लीज हॅव अ सीट. मीट डॉ. सामंत. हे माझे जुने मित्र आहेत आणि मला तुमच्या केससाठी मदत करणार आहेत."

"डॉ. राव, काय झालयं मला?"

"मि. देसाई, खरं सांगायचं तर मलाही अजून नीट अंदाज येत नाहिये."

"डॉक्टर, ब्रेनशी संबंधित काही आहे का? हे बघा, जे काही असेल ते मला स्पष्ट सांगा. ब्रेन ट्युमर तर नाहिये ना मला?"

"नाही नाही. ट्युमर असता तर तुमच्या कॅट स्कॅन मधे ते दिसलं असतं. हे बघा, तुमचे कॅट स्कॅनस... अगदी नॉर्मल दिसतयं सगळं."

"मग मला हे ब्लॅकाआउटस, डोकेदुखी आणि विचित्र स्वप्न का पडतायत?"

"माझ्या मते तुमचा आजार शरिरिक नसून मानसिक आहे. आणि म्हणूनच मी डॉ. सांमंतांना इथे बोलावलयं. ते सायकिएट्रीस्ट आहेत."

"डॉक्टर मला वेड लागलेलं नाहिये."

"छे छे.. मी अजिबात तसं म्हणत नाहिये. डॉ. सामंत, मे बी यु शुड एक्सप्लेन हिम."

डॉ. सामंत एवढा वेळ विवेककडे एकटक बघत होते. हातातल्या नोटस वर नजर फिरवत त्यांनी विवेकला विचारलं, "मि. देसाई, मी तुम्हाला नुसतं 'विवेक' म्हणालो तर चालेल?"

"हो."

"बरं विवेक, तुमच्या आजारासंदर्भात डॉ. राव आणि तुमच्या मिसेस, दोघांनीही तुम्हाला न सांगितलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जी स्वप्न वाटतात, ती स्वप्न नसून ते खरच घडत असतं!"

विवेकसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता.

"म्हणजे मी खरच रस्त्यात मारामारी केली आणि तुरुंगात गेलो होतो?"

"हो. दोन दिवस झाले त्याला. एवढच नाही तर तो पूर्ण वेळ तुम्ही स्वतःला दुसरीच कोणीतरी व्यक्ती समजून वागत होता."

"म्हणजे स्किझोफ्रेनिया किंवा मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसऑर्डर सारखं ...?"

"तशासारखं, पण ते दोन्ही आजार तुम्हाला झालेले नाहीत."

"मला काही कळत नाहिये."

"सांगतो. विवेक, स्किझोफ्रेनियामधे माणसाला भास होतात. प्रत्यक्षात नसलेल्या किंवा काल्पनिक लोकांचं बोलणं ऐकु येतं, त्यांच्याशी संवाद केला जातो वगैरे. आणि मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसऑर्डर मधे माणूस स्वतःचं एक नवीनच व्यक्तीमत्व जन्माला घालतो. बहुतांश वेळा हे व्यक्तिमत्व काल्पनिक असतं किंवा आयुष्यात आधी कधीतरी त्याला भेटलेल्या माणसाशी त्याचं साधर्म्य असतं किंवा क्वचित प्रसंगी स्वतःचचं हवसं वाटणारं एक रुप असतं. ह्या आजाराच्या निदानासाठी अजूनही ठोस अशी लक्षणं किंवा सिंप्टमस माहिती नाहित. जो काही अभ्यास झाला आहे तो वेगवेगळ्या केस स्टडीज वरून निष्कर्श काढून केला गेला आहे. तुमची केस ह्या दोन्ही प्रकारांपेक्षा वेगळी आहे कारण तुम्ही कधीकधी दुसर्‍या एका खर्‍याखुर्‍या माणसाचं आयुष्य जगता आहात."

"कोण आहे तो माणूस?"

"त्याचं नाव केदार वर्तक."

"पण अशा कोणालाही मी ओळखत नाही."

"आणि त्यामुळेच तुमची केस वेगळी आहे असं मी म्हणतोय. त्यातल्या त्यात मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसऑर्डरच्या जवळपास जाणारी तुमची केस आहे. पण स्किझोफ्रेनिया नक्कि नाही.
विवेक, तुमच्या आयुष्यात अलिकडेच असं काही घडलं होतं का कि ज्यामुळे तुम्ही खुप दु:खी झाला होता किंवा ज्यामुळे तुम्ही खुप डिस्टर्ब झाला होत, रात्रीची झोप उडाली होती वगैरे?"

"नाही. असं काहिही घडलं नाहिये."

"तुमच्या लहानपणी असं काही घडलं होतं?"

"विशेष असं काही नाही."

"तुमचे वडिल वारले तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं?"

"मी नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलो होतो. त्या घटनेचं गांभिर्य कळण्याएवढा मोठा होतो. आणि तो त्यांना आलेला पहिलाच अ‍ॅटॅक नव्हता. अर्थात थोडा धक्का बसला, कारण ते एकदम कोलॅप्स होतील असं वाटलं नव्हतं. पण मी पटकन सावरलो होतो त्या सगळ्यातून."

"आय अंडरस्टँड. बरं, तुमच्या संसरात काही अडचणी? मिसेस देसाई आणि तुमचं पटतं का?"

"अजिबात काही अडचणी नाहीत. चार लोकांचा असतो तसाच आमचा संसार आहे."

"मग केदारची आणि तुमची ओळख कशी झाली?"

"सांगितलं ना, मी कोणाही केदारला ओळखत नाही."

"ओह! राईट... म्हणालात तुम्ही तसं. ठिक आहे विवेक, आपण आत्ता थांबुयात. मला तुमच्या केसचा अजून थोडा अभ्यास करायचा आहे. तुम्ही घरी गेलात तरी चालेल. आणि नेहमी रहाता तसेच रहा. फक्त खूप स्ट्रेस होईल असं काही करु नका."

"थँक यू डॉक्टर."

स्मिता, विवेक बाहेर पडले तसे डॉ. राव डॉ. सामंतांना म्हणाले, "काय वाटतं तुला?"

"नक्किच हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. तुला तर माहिती आहेच कि सगळ्यात आधी मी पेशंट खोटं बोलतो आहे का हे चेक करतो. कारण हल्ली बर्‍याच वेळा तसं असतचं. काहितरी गुन्हे लपवायला लोक ह्या आजारांच सोंग काढतातच. पण विवेक खरं बोलत होता. मी तुला त्याच्या कंडिशन बद्दल त्याला इतक्यात सांगू नको म्हणालो होतो ते त्यासाठीच. त्याला वस्तुस्थिती सांगितल्यावर बसलेला धक्का मला जेन्युइन वाटला. तो ते ऐकून अंतर्मुख झाला, विचारात पडला. आणि पेशंट नाटक करत असला तर एकाच प्रश्नाला वेगवेगळ्या वेळी उत्तर देताना कोरडेपणे बोलतो. विवेकचा रिस्पॉन्स तसा नव्हता. म्हणजे तो खोटं बोलत किंवा नाटक करत नाहिये. आता त्याची एकूण लाईफ हिस्टरी बघता, अशी कोणतीही घटना दिसत नाही कि जिचा मनावर जोरदार आघात व्हावा. पण विवेक आणि केदार ह्या दोघांचा कुठे ना कुठे त्यांचा संबंध आला होता हे नक्कि. त्यामुळे आता त्यांचे रस्ते कुठे एकत्र आले हे शोधून काढायला मला एकच रस्ता दिसतोय. मला त्या मिसेस देसाईंचा नंबर देतोस का? त्यांच्याशी आधी बोलावं लागेल."

*****************************************************

"विवेक तुम्हाला माझा आवाज ऐकु येतोय?"

"हो."

"छान. आता मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या."

"बरं."

"तुमची आणि केदार वर्तकची ओळख कशी झाली?"

"अशा कोणत्याही माणसाला मी ओळखत नाही."

"तुम्ही हे नाव आधी कुठे ऐकलं किंवा वाचलं होत का?"

"नाही."

"सुधाकर माटे ह्यांना तुम्ही ओळखता का?"

"नाही."

"मग मागच्या आठवड्यात तुम्ही त्यांच्या घरी का गेला होता?"

"मी...मला आठवत नाही"

"२४ ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास तुम्ही कुठे होता?"

"...."

"विवेक, २४ ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास तुम्ही कुठे होता?"

"मला आठवत नाही."

"केदार वर्तकच्या घरात असं काय आहे कि जे घ्यायला तुम्ही तिथे सारखे जाता?"

"मला केदार वर्तक कोण हे माहिती नाही. त्यांच्या घरी मी कधीही गेलो नाही."

"मग २२ ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही त्यांच्या घराचं दार उघडायचा प्रयत्न का करत होता?"

"मी असं काही करत नव्हतो."

"मग २२ तारखेला संध्याकाळी तुम्ही कुठे होता?"

"मला.. मला आठवत नाही."

"१२ ऑक्टोबरला संध्याकाळी तुम्ही लायब्ररीमधे गेला होतात?"

"हो."

"तिथून कुठे गेलात?"

"तिथून मी... हॉस्पिटलमधे गेलो."

"का? घरी का नाही गेलात?"

"घरीच गेलो होतो.... नाही घरी नाही गेलो. नीट आठवत नाही काय झालं ते."

"संपतराव जगदाळे ह्याच्याशी तुमचं का भांडण झालं?"

"जगदाळे!.. तो .. त्यानी नेहाला.. त्याच्यामुळे... त्याच्यामुळे माझं...............मला आठवत नाही."

"विवेक, परत आठवायचा प्रयत्न करा. संपतराव जगदाळे ह्यांनी तुम्हाला काय काय केलं होतं?"

"मी....त्याला मी एक दिवस..."

"विवेक..... विवेक... काय होतयं तुम्हाला? शांत व्हा. मला नीट काय ते सांगा..."

"......."

"विवेक शांत व्हा. विवेक.....विवेक.... नर्स, इंजेक्शन द्या पटकन. ही इज बिकमिंग व्हायलंट."

*****************************************************

"स्मिता, विवेक आला का गं?"

"येईलच इतक्यात. प्रेसमधून निघाल्याचा फोन केला होता त्यानी थोड्या वेळापुर्वी. काणे आहेत बरोबर."

"ते बरोबर आहेत म्हणून काळजी नाही बघ. काही लागलं तर सांभाळून घेतील. गेल्या काही दिवसात त्यांची फारच मदत झाली आहे. विवेकच्या आजारपणातसुद्धा त्यांनीच सांभाळला होता छापखाना."

"हो ना. विवेक पण आता बरा आहे. महिन्यापुर्वी काय काय ते वागत होता, आता आठवतही नाही त्याला. परवा डॉक्टर सामंतांकडे जाऊन आले मी. डॉक्टर म्हणाले, आता सेशन्सला यायची गरज नाही पण औषध चालू ठेवा अजून काही दिवस."

"त्यांच्या त्या हिप्नॉटिसमनी काय जादू केली देवच जाणे बाई. पण विवेक बरा झाला."

"हो हो. फारच शहाणा करून टाकलाय त्याला डॉक्टरांनी."

"म्हणजे ग?"

"अहो आई, मागच्या आठवड्यात एका वृद्धाश्रमाला भेट देऊन आला. एवढच नाही तर त्या वृद्धाश्रमाला आता नेहमी देणगी देणार आहे म्हणे."

"असू दे गं. चांगलं काम करतोय ना? मग हरकत नाही."

इतक्यात दारातून विवेक आत आला.

"स्मिता जेवायला वाढ पटकन. खूप भूक लागलीये."

"वाढते रे. काणे नाही आले वर?"

"ते गेले खालच्या खालीच. त्यांना म्हणालो, आता मी बरा आहे रोज रोज बरोबर यायची गरज नाही. पण ते ऐकतच नाहित. तूच सांग आता त्यांना."

"बरं. सांगते. आणि उशीर का केलास रे आज?"

"अगं इंटरव्ह्युज होते आज. हल्ली सगळं काम डिजिटल झालय ना. प्रेसमधे डी टी पी करायला आणि बाकिची बारिक सारिक कामं करायला एक माणूस हवा होता."

"मिळाला का मग?"

"हो... म्हणजे मिळाली. एकदम चुणचुणीत मुलगी आहे. एक्स्पिरियन्स फारसा नाहिये पण हरकत नाही. गरजू आहे जरा. त्यामुळे काम चांगलं करेल."

"वा!. काय नाव मुलीचं?"

"नेहा वर्तक..!"

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी, हा भाग टाकायला जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. परवा सगळं लिहून काढलं आणि पोस्टायला गेलो तर नवीन धाग्याचं पान फक्त रिफ्रेश झालं आणि मजकूर गायब झाला. त्यात माबो वर सद्द्ध्या लिखाण सेव्ह करायची सुविधा बंद असल्यामुळे परत सगळं लिहावं लागलं.
पुढचा (आणि शेवटचा) भाग आता लवकरात लवकर टाकेन.

चौकट राजा.

वा मजा येतेय वाचायला.....
लवकर टाका पुढचा भाग......

छान चालु आहे...
पुभाप्र...

सगळे भाग वाचले....