२१ डिसेंबर

Submitted by कवठीचाफा on 8 December, 2012 - 04:43

फोटोकॉपी मशीन समोर उभ्या राहिलेल्या प्रोफेसर देवधरांनी विचारांच्या भरात आकडा पंच केला 'एकवीस'. मशीनचा झूSS असा आवाज सुरू होताच ते भानावर आले, आणि त्यांना आपली चूक उमगली. हल्ली बरेचदा त्यांचं असंच व्हायचं, ते एकवीस डिसेंबरचं मनावर घेतल्यापासून.

देवधरांना बहुतांशी शास्त्रज्ञ मॅड सायंटिस्ट म्हणायचे, म्हणजे देवधर खरंच वेडे वगैरे नव्हते पण पराकोटीचा आनंद आणि पराकोटीची निराशा यांच्यामधली भावना त्यांना कधी माहीतच नव्हती. एखाद्या लहानश्या यशाबद्दल ते इतके आनंदी व्हायचे की जवळपास ओळखीतल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सेलिब्रेट करायचे, त्याच्या उलट एखाद्या मामुली अपयशानं पार खचून जायचे आणि कधी कधी तर संशोधनच अपूर्ण सोडायचे.

२००९ च्या मध्यावर त्यांच्या डोक्यात हे खूळ शिरलं. २१ डिसेंबर २०१२ ला जग नष्ट होणार, कारण काय ? तर मायन कॅलेंडर ज्यानं २६००० वर्षांची दिनदर्शिका बनवलीय त्यांच्या त्या कॅलेंडरवर २१ डिसेंबर २०१२ नंतरचा दिवसच नाहीये.

खरं सांगायचं तर, हा त्या वेळेचा फारच चर्चेत आलेला विषय होता. त्या अनुषंगानं पृथ्वीची भ्रमणगती, उल्कांचं सध्याचं स्थान, चंद्राचं बदलतं गुरूत्वबल या सगळ्यांचा अभ्यासही सुरूच होता. देवधरांच्या डोक्यात आलेली कल्पना म्हणजे कहरच असणार होती, आणि ती तशीच होती. देवधरांनी भविष्यात जाऊन नक्की काय घडणार आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न सुरू केला. प्रत्यक्षात हे अशक्य आहे याचा अंदाज पूर्वीच घेतला गेला होता, पण असल्या साध्या गोष्टींची फिकीर करतील तर ते देवधर कसले ?

कित्येक दिवस टेबलावर, समोरच्या फळ्यावर किचकट गणितांखेरीज काहीही दिसत नव्हतं. लहान मोठ्या चमत्कारिक वाटणार्‍या साधनांनी त्यांची प्रयोगशाळा भरून गेली होती. अखेरीस ते चिडले, वैतागले. कुठेच असं लूपहोल सापडत नव्हतं की ज्याचा वापर करून भविष्यात डोकावता येईल. इतरवेळी देवधरांनी सगळं सोडून प्रयोगशाळेला कुलूप घातलं असतं आणि कित्येक दिवस त्या फसलेल्या गणितांचंच दुःख करत बसले असते, पण सध्या त्यांच्या मनातली इच्छा फारच प्रबळ होती.

कधी नव्हे ते प्रोफेसरसाहेब आज चक्क आरामात कॉफीचे घुटके घेत, हातातल्या सिगारेटचा धूर खेळवत व्हरांड्यात बसले होते. आराम करत असल्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या डोक्यात बरीच चक्र फिरत होती.

`का आपण भविष्यकाळात जाऊ शकत नाही ?'

तो घडलेला नसतो आणि वर्तमानकाळावर अवलंबून असतो.

मग वर्तमानात घडलेल्या गोष्टी आपल्याला माहीत असतातच की,

अर्थात, पण त्यावरून फक्त नजीकच्या भविष्यकाळापर्यंतच आपण पोहोचू शकतो फार फार तर काही आठवडे

इतका तर आपण अंदाजही लावू शकतोच, पण सोप्या शब्दात नेमकं कारण काय ? ज्यामुळे आपल्याला भविष्यात जाता येत नाही..

सोपं करूनच सांगायचं तर भविष्यकाळ अनिश्चित असतो, आणि अनिश्चित घटनांची गणितं मांडता येत नाहीत

म्हणजे निश्चित घटनांना गणितात पकडता येतं ?

अर्थातच, जे जे निश्चित ते ते सिद्ध होणारच.

मग भूतकाळात जाणं नक्की शक्य आहे, कारण तो तर निश्चित आहेच

नक्की आहे

अरे मग बसलोय काय आपण ? चला त्या बाजूनं प्रयत्न करू . मनाचे दोन भाग पाडून त्यांच्यात चाललेल्या प्रश्नोत्तरांचा खेळ संपवत देवधर उठले आणि थबकले.

भूतकाळात जाऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार कसं होतं ? २१ डिसेंबर २०१२ ला नक्की काय होणार ? एक शक्यता होती नव्हे तीच एक शक्यता होती. ज्यांनी हे कॅलेंडर बनवलं त्यांची भेट घेऊन त्यांनाच विचारता येणार होतं.

आता भूतकाळात, ते ही मायन काळात जाऊन माया लोकांशी बोलून २०१२ ला काय घडणार याचा शोध घेणं तुम्हाला संयुक्तिक वाटतं काय ? नक्कीच नाही, पण देवधरांना तसं योग्य वाटत होतं, याचाच अर्थ आता ते हा प्रयत्न नक्की करणार होते.

तीच प्रयोगशाळा, तेच टेबल फक्त आजूबाजूच्या कागदांचे संदर्भ बदललेले. सर्वसाधारण माणसाच्या डोक्याच्या मैलभर अंतरावरून जाणारी गणितं तिथं झराझर मांडली जात होती, पुन्हा खोडली जात होती.

पृथ्वीपासून दूर प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगात प्रवास करता आला तर आपण नक्की भूतकाळापर्यंत पोहोचू शकतो. मी नाही आईन्स्टाईन म्हणतो असं किमान देवधर तरी सांगायचे.

म्हणजे सोपय हो, तुम्हाला पृथ्वीला एक आठवडा आधी पाहायची असेल तर तुम्ही पृथ्वीपासून नेमक्या त्या जागी जाऊन थांबायचं ज्या ठिकाणी पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश एका आठवड्यानं असेल. अर्थात इतक्या लांबून पृथ्वीचा आकार दिसणार काहीच नाही. देवधरांच्या भाषेत पाहू, म्हणजे जर तुम्हाला एक आठवडा आधीच्या पृथ्वीवर पोहोचायचंय तर प्रकाशाच्या वेगापेक्षा दहापट वेगात पृथ्वीपासून दूर जायचं आणि बरोबर वेग आणि काळाचा अंदाज घेत त्याच वेगात मागे फिरायचं. म्हणजे एक आठवडा आधीचं दृश्य पृथ्वीपासून दूर व्हायच्या आतच तिथे पोहोचायचं. फारच सोपय की नाही ?

यातली एकमेव लहानशी अडचण म्हणजे प्रकाशाच्या वेगाला मागे टाकणं. हे असलं चॅलेंज म्हणजे देवधरांच्या डोक्याला चांगलाच खुराक. आता प्रकाशाचा वेग कधी वाढतो ? एकमेव कारण विद्युत चुंबकीय क्षेत्र.

दुसर्‍याच दिवसापासून देवधरांच्या प्रयोगशाळेत प्रचंड साहित्य येऊन पडायला सुरुवात झाली. काही खास जाडीच्या तारांची भेंडोळी, काही लोखंडी बार्स ते ही वेगवेगळ्या आकारातले.

दीड वर्ष प्रोफेसर देवधरांचं दर्शन कुणालाच झालं नाही, कायम ते त्यांच्या प्रयोगशाळेतच व्यस्त असायचे. अनेक लहानमोठे यशापयशाचे खेळ झाल्यानंतर त्यांना ते कालयंत्र तयार करण्यात यश आलं. वस्तू विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आणून तिचं ऊर्जेत रूपांतर करून तिला प्रकाशाच्या वेगापेक्षाही कित्येकपट जास्त वेगात पाठवणं त्यांना शक्य झालं. अर्थात यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज होती पण ती त्यांनी अणू संयोगातून मिळवली, कशी ? ते त्यांनाच ठाऊक, आपल्यासारख्या सामान्य माणसाला अणू म्हटलं की फक्त बॉम्बं आठवतो.

जवळपास पावणेदोन वर्षाच्या मेहनतीनंतर ते अतिभव्य असं कालयंत्र त्यांच्या प्रयोगशाळेत पूर्णत्वाला जाऊन उभं राहिलेलं होतं. प्रत्यक्ष चाचणी अजून झालीच नव्हती. कालयंत्राचं काम अत्यंत सोप्या पद्धतीनं सांगायचं तर, मघाशी म्हटल्याप्रमाणे वस्तू विद्युतचुंबकीय क्षेत्रात आणून तिचं ऊर्जेत रूपांतर करायचं इथपत सोपं आहे पण ती नेमकी हव्या त्या कालखंडात कशी पोहचवायची ? त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्गही त्यांनाच सुचू शकला असता. ऊर्जेला एखाद्या ठिकाणावरून परावर्तित करून तिला पुन्हा पृथ्वीवर पाठवायची. एकदा का त्या ऊर्जेमागची विद्युतचुंबकीय ताकद संपली की ती वस्तू पुन्हा मूळ रूपात येणार. आता मायन काळात जायचं म्हटल्यावर देवधरांनी बरीच गणितं करून कृत्तिका नक्षत्रातल्या एका तार्‍यावर त्याचा मोहरा पक्का करून ठेवला.

कालयंत्र सिद्ध झाल्यानंतर देवधरांना जणू नवी ऊर्जा मिळाली. आतापर्यंत टेबलावर असलेल्या गणिती गिचमिडीची जागा आता माया संस्कृतीच्या चिन्हांच्या भाषेची उकल असलेल्या कागदांच्या पसार्‍यानं घेतली. आता ज्यांच्या संस्कृतीत जायचं त्यांची भाषा अवगत असणं गरजेचं होतंच म्हणा. शेवटचंच म्हणून जाब विचारण्यासाठी त्यांनी आत्ता त्या मायन कॅलेंडरची कॉपी करायला घेतलेली, तीच विचारांच्या तंद्रीत एकवीसवेळा काढून पसारा आणखी वाढवून ठेवला होता.

सगळं मार्गी लागल्या नंतर देवधरांनी यंत्राची चाचणी घ्यायचा निर्णय घेतला. अर्थात ते स्वतः त्यात आधी बसणार नव्हतेच, न जाणो पुन्हा ऊर्जेचं वस्तुमानात रूपांतर झालंच नाही तर ? असला भलताच धोका पत्करण्याइतकेही ते मॅड नव्हते. सर्वात आधी त्यांनी जवळपासची हाताला लागेल ती वस्तू त्यात ठेवली, त्यांच्याच कालयंत्राच्या पसार्‍यातून उरलेला तुकडा होता तो. सगळी काळजी घेत त्यांनी यंत्र सुरू केलं आणि काही मिनिटांच्या फरकातच त्यांच्या समोरून तो तुकडा नाहीसा झाला. यंत्र काम करत होतं. पुन्हा त्याच उत्साहात त्यांनी आणखी वजनदार तुकडा त्यात ठेवला आणि पुन्हा यंत्र सुरू केलं. यावेळी बराच वेळ गेला पण तरीही तो तुकडा नाहीसा झालाच. खरंतर आता त्यांचीच त्यात शिरण्याची प्रबळ इच्छा झाली होती, पण तरी त्यांनी त्यावर ताबा ठेवत टेबलाशेजारची खुर्ची उचलून यंत्राच्या पोकळीत ठेवली, पुन्हा तोच खटाटोप यंत्र चालू झालं काही मिनिटं करता करता काही तास गेले पण काहीच घडलं नाही, मात्र कालयंत्रातल्या तांब्याच्या तारांवर प्रचंड ताण येऊन चुंबकीय शक्ती कमी होत गेली. काहीतरी चुकलं खरं, एकतर या कालयंत्राचा अती वारंवारतेनं केलेला वापर म्हणा किंवा त्यातल्या विद्युतचुंबकीय क्षेत्रात तितकी ताकद नसल्यानं म्हणा खुर्चीसारखी अवजड वस्तू रूपांतरित करणं शक्य होत नव्हतं.

देवधरांनी प्रयोग उलट्या दिशेनं सुरू केले. आधी मोठा तुकडा.. अं हं नाहीच गेला, मग पुन्हा एक लहानसा तुकडा तो ही नाही. आता आणखी किती लहान वस्तू यात टाकायची ?

देवधरांची मन:स्थिती साफ बिघडली, इतके दिवस रोखून ठेवलेली चिडचिड पुन्हा सुरू झाली. एक शेवटची संधी म्हणून त्यांनी जवळचा कागद उचलून कालयंत्रात ठेवला आणि ते सुरू केलं. इथेही निराशाच पदरी पडली तासभर उलटून गेला तरी कागदही ऊर्जेत प्रक्षेपित होईना !

अत्यंत निराश मन:स्थितीत देवधर प्रयोगशाळेच्या बाहेर पडले, धाडकन दरवाजा ओढून घेऊन सरळ रस्त्यापलीकडे असलेल्या आपल्या घराकडे चालायला लागले, विचारांची तंद्री तशीच होती, मनातली निराशा वाढतच चाललेली. या नादात रस्त्यावरून भरधाव वेगात येणार्‍या ट्रक कडे त्यांचं जरा उशीराच लक्ष गेलं, अर्थात बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नक्कीच होता.

" देवाशप्पत सांगतो साहेब, मी गाडी बाजूला घेतलेली पण त्याच माणसानं गाडीसमोर उडी मारली " ट्रकचा ड्रायव्हर पाचच मिनिटानंतर तिथल्या पोलिसाजवळ गयावया करत होता. आपल्या ट्रकखाली येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली व्यक्ती ही जगातले सगळे शास्त्रज्ञ ज्यांना मॅड म्हणतात ते प्रोफेसर देवधर असल्याचं त्याच्या गावीही नव्हतं. प्रकरण त्याला फारच महागात जाणारं होतं हे नक्की, इतक्यातच देवधरांच्या प्रयोगशाळेतून काळ्याकुट्ट धुरांचे लोट बाहेर यायला लागले आणि पोलिसाचं लक्ष विचलित झालं, देवधरांना हॉस्पिटलमधे पोहचवण्यासाठी अँब्युलन्स मागवून त्यानं अग्निशामन दलाला फोन लावला.

अग्निशमनदल नक्कीच वेळेत पोहोचलं होतं पण प्रयोगशाळेत घडत असलेल्या साखळी प्रक्रियेला फारच जास्त घाई होती. अग्निशमनदलाची गाडी शेवटच्या वळणावर असतानाच प्रयोगशाळेत प्रचंड स्फोट झाला आणि समोर पसरला तो फक्त दगडविटांचा ढिगारा. त्यातही बर्‍याच ठिकाणी अतिउष्णतेनं वितळल्याच्या खुणा दिसत होत्या.

'अज्ञात कारणांनी स्फोट' इतक्या त्रोटक सबबीखाली तपास थांबवल्या गेला. नाहीतरी कुणाला त्याचं नेमकं कारण ठाऊक होतं म्हणा, कारण एव्हाना प्रोफेसर देवधर जबरदस्त धक्यामुळे स्मृती हरवून बसलेले.

माहीत झालं असतं तर तो एक प्रचंड मोठा धक्का ठरला असता, सगळ्या जगासाठीच. देवधरांनी कालयंत्रात टाकलेल्या कागदाचं ऊर्जेत रूपांतर करता करता आधीच क्षीण झालेल्या त्या तारांच्या भेंडोळ्यावर आणखी ताण येत राहिला आणि शेवटी त्यांच्यातच शॉर्टसर्किट होऊन आग लागली, त्याच्यासोबतच देवधरांचा छोटेखानी अणूसंयोगाचा प्लांटही उडाला आणि त्याच्याचसोबत ती प्रयोगशाळा. मात्र कालयंत्रानं शेवटच्या क्षणी त्याचं काम पूर्ण केलं होतं. तो कागद ऊर्जेत रूपांतरित होऊन कृत्तिका नक्षत्रातल्या त्या ठरावीक तार्‍याकडे रवाना झाला होता.

*******

इस.पूर्व ३४००, आजचे मेक्सिको

त्यांच्या त्या चौरसाकृती पिरामीडचं काम वेगात सुरू होतं. अचानक आकाशातून वीज चमकावी त्याप्रमाणे काहीतरी येऊन त्या बांधकामाजवळ आदळलं. त्याने कुतूहलानं त्या लालबुंद धारदार वस्तूला हात लावला आणि किंचाळत मागे सरला. पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला तो लोखंडाचा तुकडा वस्तुमानात रूपांतरित होऊन पृथ्वीच्या वातावरणात शिरताना प्रचंड तापला होता.

ही लहानशी घटना सोडली तर त्यांचं काम पुन्हा सुरळीत चालू झालं, पण अजून काही घडायचं होतं.. दोनच दिवसात आणखी एक तप्त धातूचा वेडावाकडा आकार त्या बांधकामावर कोसळला. यावेळी सगळेच सावध होते.

मनुष्याच्या अंगी असलेल्या जिज्ञासू वृत्तीनेच त्यांनी या येणार्‍या तप्त धातूंच्या कोनावरून त्यांच्या येण्याची दिशा शोधली आणि एकूणच त्यांच्यात खळबळ उडाली. दोन्ही अस्त्रे त्यांचे देव वसलेल्या विंचवाच्या आकाराच्या तारका समूहाकडून अर्थातच कृत्तिकेकडून आलेली होती. नक्कीच त्यांच्याकडून काही चूक झाली असावी म्हणूनच त्यांचा ईश्वर कोपला असावा. ताबडतोब काम थांबवण्यात आलं.

काहीच दिवसांत त्याच बांधकामाजवळ एक अत्यंत चमत्कारिक गुणधर्म असलेल्या चौकोनी आकाराचा तुकडा मिळाला, या प्रकारचं कोणतंही द्रव्य त्यावेळी उपलब्ध नव्हतं, अर्थातच तो त्यांच्या देवाचा संदेश होता. त्यावर त्यांच्याच भाषेत काही आकृती चितारलेली होती ती सुद्धा कुठेही उपलब्ध नसलेल्या द्रव्यानंच.

कुठेही असतात तसे अतीजाणकार त्यांच्यातही होतेच. अतीशय गहन चर्चा करून त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या देवांचा देव असलेल्या सूर्यदेवाची इच्छा कदाचित त्यांचा भ्रमणकालावधी रेखून ठेवण्याची असावी, केवळ इतकंच नव्हे तर या काळाच्या मापना अखेर त्यांचा कोप होऊन बहूदा आपण नष्ट होणार. बस्स, बातमीला पसरायला वार्‍यापेक्षाही कमी वेळ लागतो. ठिकठिकाणचे असलेच जाणकार एकत्र बोलावल्या गेले, प्रचंड चर्चासत्र झडली आणि सर्वमुखी एकच निर्णय झाला. देवानं धाडलेल्या संदेशाची माहिती आपल्या येणार्‍या पिढ्यांना मिळायलाच हवी म्हणून हे रेखन सांभाळायला हवं, त्यासाठीच त्यांनी त्या संदेशातल्या रेखना प्रमाणे तंतोतंत आकृती रेखीवपणे भल्यामोठ्या एकसंघ शीळेत कोरण्यास सुरुवात केल्या गेली. भविष्यकाळ आणि भूतकाळात नकळतच एक लूप तयार होत होतं याची कुणालाच कल्पना नव्हती.

हे कुणाला माहित होतं की देवधरांनी घाईघाईत न पाहता यंत्रात मायन कॅलेंडरची फोटोकॉपी टाकलेली .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी याचा प्रिमिअर पाहिला, म्हणजे वाचला होता.. Wink

मला शेवट जाम आवडलाय... Happy लहान वाटली तरी आटोपशीर ठेवली आहे. मस्त. Happy

जमलय............
सायन्स फिक्शनचा असा वापर तूच करू शकतोस फक्त......... Happy

२१ डिसे. वाचला ना तेव्हा वाटल झाल अजून नविन १ धागा, पण पुढे लेखकाच नाव वाचल आणि लगेच वाचायला घेतलं Happy

खूप खूप आवडली.

कथा मस्तच!
अगदी अश्शीच नारळीकरांची कथा आहे ज्यात प्रसिद्ध लेण्यांत भित्तीचित्रे रंगवण्याविषयी होते.
द व्हीजीटर नावाचा फ्रेंच चित्रपटही अशाच गंमतीजंमतीचा घोळ आहे.

या प्रकारचं कोणतंही द्रव्य त्यावेळी उपलब्ध नव्हतं, अर्थातच तो त्यांच्या देवाचा संदेश होता. त्यावर त्यांच्याच भाषेत काही आकृती चितारलेली होती ती सुद्धा कुठेही उपलब्ध नसलेल्या द्रव्यानंच. >>> यात द्रव असायला हवं.
द्रव = पातळ पदार्थ. शाई, पाणी वगैरे
द्रव्य = धन.

कथा छान आहे.

स्वप्ना हे लेखक क्रमशः वाले नाहीचेत
ते तर नंदिनी (त्रिकोण) ,विशालदादा (वर्तूळ)
मला भुमिती न आवडायला यांनी अजून एक कारण दिलं

Pages