परका (भाग ३)

Submitted by चौकट राजा on 5 December, 2012 - 16:14

भाग १ - http://www.maayboli.com/node/39477
भाग २ - http://www.maayboli.com/node/39482

वरून पुढे चालु
*****************************************************

"नाही हो इन्स्पेक्टर साहेब, ह्या आधी तो कधीच असा वागला नाहिये. मुळातच त्याचा स्वभाव शांत आहे. मारामारी वगैरे तर अजिबात नाही करणार तो."

"आणि तुम्ही म्हणताय कि ह्यांना तुम्ही ओळखत नाही"

"नाही."

"मग त्यांनी ह्यांच्याशी काय उगाच मारामारी केली?"

"तेच कळत नाहिये हो मलापण."

"हम्म.. दारु वगैरे काही घेतात का ते?"

"अगदी क्वचित. ती पण बरोबरच्याला कंपनी देण्यापुरती. स्वतःहून कधीच नाही."

"आणि बाकिचं काही?"

"बाकिचं म्हणजे?"

"काय बाई, समजून घ्या कि जरा. बाकिचं म्हणजे चरस, गांजा वगैरे"

"छे छे. काहितरीच काय बोलताय तुम्ही?"

"ओ बाई, सगळ्या घरच्यांना आधी असचं वाटत असतं. नंतर खरं कळालं कि धक्का बसल्याचं दाखवतात. एक टेस्ट केली कि आम्हाला सगळं कळतं तेव्हा तसलं काही असेल तर आत्ताच काय ते खरं सांगा."

"नाही हो. खरचं नाही घेत तो असलं काहीही."

"कामधंदा काय करतात?"

"घरचा छापखाना आहे. माझ्या सासर्‍यांनी सुरु केला. त्यांच्यानंतर आता हाच बघतो सगळं."

"तिथे कोणाशी काही भांडण वगैरे?"

"नाही. कधी काही म्हणाला तरी नाही. तसाही गेले काही दिवस तो फारसा गेलाच नाहिये कामावर."

"का?"

"तब्येत बरी नव्हती."

"काय झालं होतं?"

"विशेष काही नाही. ताप होता थोडा."

"डॉक्टरकडे गेला होतात का?"

"हो. ते म्हणाले उन्हामुळे असेल. दर रविवारी क्रिकेट खेळायला जातो तो. दोन तीन आठवड्यापुर्वी सोमवारी प्रेसमधुन घरी आला आणि म्हणाला डोकं खूप दुखतयं. बघितलं तर अंगात ताप होता. तेव्हा डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनाही वाटलं रविवारच्या खेळामुळे दमला असेल. मग दोन तीन दिवस घरीच होता तो. त्यानंतर जरा बाहेर हिंडायला लागला."

"कोणाला काही पैशाचं देणं-येणं होतं का?"

"नाही.. म्हणजे मला तरी माहिती नाही."

"हम्म.. ह्या जगदाळे साहेबांनी तक्रार केली आहे कि तुमच्या नवर्‍यानी ह्यांना मारहाण केली. आम्हाला आधी एफ आय आर दाखल करावा लागेल. तुमच्या नवर्‍याची ड्रग टेस्ट करावी लागेल आणि मग कोर्टात केस दाखल होईल. तोपर्यंत ते लॉकअप मधे रहातील."

"प्लीज असं नका करू हो. मी काय तो दंड आत्ता भरते पण त्याला सोडा."

"ते आमच्या हातात नाही. कोर्ट ठरवेल. हवं तर तुम्ही आधी ह्या साहेबांशी बोला. त्यांनी तक्रार मागे घेतली तर आम्हाला पुढचं काही करावं लागणार नाही. बघा.. बाहेरच्या बाहेर तुमचं मिटत असेल तर मिटवा."

हे ऐकून जगदाळे उसळला, "बाहेरच्या बाहेर कायला? आपल्याला फुल नुकसान भरपाई हवी. ओ बाई, पब्लिकमधे आपल्याला मारला त्यानं. अब्रु नुकसानीचा दावा पन लावनार आपन."

"ओ जगदाळे, माफ करा ना त्याला. चूक झाली त्याच्याकडून. मी माफी मागते त्या सगळ्याबद्दल."

"नाय नाय. आपल्याला मुकामार लागलाय सगळीकडे त्याचं काय? रक्त पन आलय बघा. सोडनार नाई आपन त्याला."

"हे बघा जगदाळे, छोट्या गोष्टीचा उगाच ईश्यु करु नका. माझे वडिल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे चांगले मित्र आहेत. आज ते बाहेरगावी आहेत म्हणून मी एकटी आलीये. कोर्टातच भांडायचं असेल तर आम्हीही भांडू शकतो. पण उगाच त्यात वेळ आणि पैसे घालवायच्या ऐवजी आपण समझोता करू असं म्हणतीये मी."

"पन आपल्याला डॉक्टरचा येवडा खर्च आलाय त्याचं काय?"

"तो मी देते ना. तुमच्या पुढच्या औषधपाण्यासाठीही देते अजून."

"हम्म.. काय आजोबा. तुमी काय म्हनता?"

"मी म्हणतो जाऊद्या जगदाळे. होते माणसाकडून चुक. माफ केल्यानी आपलाच मोठेपणा दिसतो. आणि बाई औषधाचा खर्च देतायत ना. झालं तर मग." आजोबा समजुतीच्या सुरात म्हणाले.

"हे आजोबा म्हनाले म्हनून ऐकतोय आपन. आज्यासारखे हाय ते आपल्याला. डॉक्टरचं बील धा हजार आनि औषधाचे अजून धा. कॅश पाहिजे आपल्याला." जगदाळे म्हणाला.

"माझ्याकडे आत्ता एवढे एकदम नाहियेत. जवळच्या ए टि एम वर चला. तिथे पैसे काढुन देते तुम्हाला."

"काय बाई, तुम्ही पोलीसांचा एवढा वेळ खाल्ला. जरा आमच्या चहा पाण्याचं पण बघा कि काहितरी."

"किती द्यायचे तुम्हाला?"

"संभाजी हवालदार गेला होता ह्या केसवर. त्यालाच द्या काय ते सगळ्यांचे मिळून."

"बरं."

"माने, ह्यांच्या नवर्‍याला सोडा. काय नाव म्हणालात बाई त्याचं?"

"विवेक देसाई."

हवालदार माने आत गेले आणि एकटेच परत आले.

"साहेब, आत कोणी विवेक देसाई नाहिये."

"काय? अहो तो बघा ना समोर तर बसलाय.. पांढरा शर्ट."

"पण साहेब तो तर म्हणतोय कि त्याचं नाव केदार वर्तक आहे!!"

*****************************************************

"स्मिता, काय म्हणाले गं डॉक्टर? फोन वर काहीच बोलत नव्हतीस तु. काय झालयं गं विवेकला?"

"डॉक्टरांना पण काही कळत नाहिये नक्कि काय झालयं ते."

"घरी कधी पाठवणार आहेत गं त्याला?"

"माहिती नाही हो आई. एवढा दंगा घातला त्यानी तिथे. शेवटी झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवलाय त्याला. आधी पोलीस स्टेशन मधे असाच गोंधळ झाला. मी कसतरी ते मारामारीचं प्रकरण मिटवून त्याला घरी घेऊन यायला निघाले तर म्हणाला तो मला ओळखतच नाही. वर म्हणे कि तो विवेक नाही कोणी केदार आहे. त्यामुळे मग इन्स्पेक्टरला संशय आला आणि तो विवेकला सोडायला तयार होईना. नशीबानी विवेकच्या खिशातल्या पाकिटात त्याचा लायसेन्स होता आणि आमचा एक फोटोही होता म्हणून त्यानी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि विवेकला सोडलं. पण आता डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणुन द्यायला सांगितलय."

"अरे देवा!... डॉक्टरांकडे कशी घेऊन गेलीस मग त्याला?"

"पोलीसांनीच मदत केली. विवेक तर एवढा आरडाओरडा करत होता कि मला आवरेचना. मग त्या इन्स्पेक्टरनीच दोन हवालदार दिले बरोबर. त्यांनीच डॉक्टर रावांकडे सोडलं आम्हाला."

"अख्खा वेळ तो तुला अजिबातच ओळखत नव्हता?"

स्मिताला हुंदका आवरला नाही.

"नाही हो. सारखा 'नेहाला बोलवा' 'नेहाला बोलवा' म्हणत होता."

"कोण गं हि नेहा?"

"त्याची बायको म्हणे."

"अगोबाई! हे काय आणि भलतचं? देवा परमेश्वरा, काय परिक्षा बघतो आहेस रे बाबा आमची?" आईंनी हात जोडले.

तेवढ्यात डोअरबेल वाजली. स्मितानी दार उघडलं तर दारात माटे आजी आणि आजोबा उभे होते.

"तुम्ही ??"

"नमस्कार. मी सुधाकर माटे आणि ही माझी पत्नी पुष्पा. पोलीस स्टेशन मधून तुमचा पत्ता मिळाला. जरा बोलायचं होतं तुमच्याशी."

"ओह!.. या ना, या. बसा. ह्या विवेकच्या आई."

"नमस्कार," माटे आजी आजोबांनी अभिवादन केलं.

"आई, आज संध्याकाळी विवेक ह्यांच्याकडेच गेला होता."

"हो. त्याबद्दलच बोलायचं होतं...." आजोबा म्हणाले.

"तुम्हाला विवेकमुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल माफी मागते मी तुमची. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत बरी नाहिये. खूप गुणी मुलगा आहे हो. काय झालय त्याला सद्ध्या, काही कळत नाहिये."

"म्हणाल्या मला स्मिता बाई. त्यासंदर्भातच कदाचित तुम्हाला थोडी मदत करता येईल असं वाटलं म्हणून आम्ही आलोय."

स्मिता आणि आईंच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटलं.

"पोलीस स्टेशन मधे तुमचा मुलगा सारखा 'मी केदार वर्तक आहे' असं म्हणत होता ना. तो केदार वर्तक म्हणजे आमचे शेजारी. नेहा वर्तक त्याची बायको."

"काय सांगता? अहो मग बोलवता येईल का त्यांना? ते विवेकला ओळखत असतील. तेच काहीतरी सांगु शकतील या प्रकाराबद्दल."

"ते शक्य नाही. कारण नेहा हल्ली तिच्या माहेरी असते आणि केदार.... केदार काही दिवसांपुर्वीच अपघातात वारला."

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users