सहजीवन

Submitted by सौ. वंदना बर्वे on 17 November, 2012 - 04:41

"वेगळं व्हायचय मला", असं ठणकावून सांगत वेगळी चूल मांडणाऱ्या सुवर्णाचं गृहप्रवेशाचं आमंत्रण फोनवरून आलं. सुवर्णाने आयुष्यात कधीही, किमान पंधरा मिनिटे बोलल्याशिवाय कधी फोन खाली ठेवला नाही. परवाही तसच झालं. साधं गृहप्रवेशाचं आमंत्रण, अर्धा तास काढला. तिचा स्वभाव आधीपासून माहित असल्याने तिचा फोन म्हटलं की आमचे हे सुध्दा अर्ध्या-एक तासाची निश्चिंती झाली असं म्हणत पुस्तकात डोकं खूपसून बसतात. तेवढीच माझी बडबड ऐकावी लागत नाही . सुवर्णा हे तसं अजब रसायन आहे. पटलं तर अगदी जीवापुढे करणार नाही पटलं तर जीव गेला तरी ढुंकूनही नाही बघणार. टोकाची मनस्वीता हा स्वभावातला दोष असतो. तरीही तिच्या गुणदोषांसकट ती खूप चांगली आहे. तिच्या मतांच्याबाबतीत ती आग्रही आहे, स्पष्ट आहे.

नवरा, सासू सासरे, याबाबतीतली तिची मते अगदी ठाम आहेत. प्रत्येक घरात असलेले वाद-विवाद तिच्या घरातही व्हायचे. तिचा नवराही कमावता व हिलाही बऱ्यापैकी नोकरी आहे. नवीन लग्न झालं, नवलाईचे दिवस संपत आले. सुवर्णा परत नोकरीवर रुजू झाली. राहिलेलं पेंडींग काम उरकण्यात तिचा दिवस भुर्रकन उडून जायचा. संध्याकाळी ही दमलेली चिमणी घरट्यात परतली की थेट स्वयंपाकघरात घुसायची. तिच्यासारखाच दमून आलेला नवरा चहाची व सोबत काही खायला यायची वाट पहात आई वडिलांसोबत सोफासेटवर गप्पागोष्टी करीत पहुडलेला असायचा. सुवर्णाने एक दोनदा पाहिलं. मग सासू सासऱ्यांचा पुढ्यातच त्याला विचारलं,

"मला थोडीशी मदत कराल का?"
त्यावर तो बोललाच नाही. सासूबाईच म्हणाल्या,
"त्याने का म्हणून करावी मदत, तो किती दमतो!"
"मी नाही दमत?" सुवर्णाने फणकाऱ्यानेच विचारले.
"घरातली कामे ह्या घरच्या सुनाच करतात. आम्ही नाही केलं? तसही पुरूषांना काय कळतं त्यातलं?"
"मी सगळं कर, मला चहा आणून दे, रात्रीचं जेवण कर असं कुठे सांगते. मी फक्त मदत कर एवढच तर सांगते."
"बाईला का लागते मदत घरकामात?" सासूबाई.

हे असं बराचवेळ सुरू होतं. शब्दाने शब्द वाढत गेला. सासरे आणि नवरा यांनी दोघीनांही आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही वाद विकोपाला गेलाच. पहिली ठिणगी तिथेच पडली होती.

संसारात ही पहिली ठणगीच तर टाळायची असते. उपाय, काळजी ठिणगी आधी आणि सगळं भस्मसात झाल्यानंतर. मधे उरते ती फक्त न संपणारी फटाक्यांची माळ. ती जीवघेणी नसली तर असह्य असते.

संसाराची गरज म्हणून असू दे किंवा करियर म्हणून असू दे. आजकाल मुलींचं नोकरी करणं अपरिहार्य आहे. लग्नाआधी घरी आल्यावर आईच्या हातचा गरम चहा आणि दमलेल्या मुलीला घरकामापासून दूर ठेवण्याची आईची प्रेमळ सवय पुढे जावून एक पक्का विचार बनते. एका अर्थाने ते बरोबरही आहे. पूर्वीच्या काळात जेथे संसाराच्या आर्थिक व्यवस्थेची बाजू ही पुरुषाकडे असायची व स्त्रीवर्गाकडे त्याचा विनियोग ही सर्वसाधारण विभागणी होती. स्त्रीचं कमावणं ही तेंव्हा गरज नव्हती. तिचं क्षेत्र मर्यादित स्वरूपात होतं. वेदकालात तर स्त्रीला विदूषी व्हायचय की संसारी असा पर्याय उपलब्ध असायचा. आज तशी परिस्थिती नाही. आज संसार चालविण्याकरीता स्त्रीचं शिक्षण आणि कार्यकर्तृत्व दोनही पणाला लागतात. स्त्रीला घराबाहेर पडावच लागतं. वेदकालविपरीत आजच्या स्त्रीला विदूषी आणि संसारी दोनही भुमिका पार पाडाव्या लागताहेत.

इथेच मुलभूत फरक निर्माण होतो. जेंव्हा आपण कुटुंबाच्या भरण पोषणाकरिता स्त्रीचं नोकरी किंवा व्यवसाय करणं स्विकारतो त्याच वेळी तिच्यावर असलेल्या परंपरागत जवाबदाऱ्या विभागणं स्विकारीत नाही. बायकोने जर नोकरी केली पाहिजे, संसाराला हातभार लावला पाहिजे, तर नवऱ्याने तिला दररोजच्या कामात मदतही अवश्य केली पाहिजे. संसाराचा गाडा हाकताना दमछाक दोघांचीही होते. विश्रांतीची आवश्यकता दोघांसही आहे. हे समजून उमजून जाणिवेने वागणारी किती जोडपी असतील? अनुरूप जोडप्यासारखं लाखात एक.

वाढते वाद विकोपाला जावून कटूता निर्माण होण्यापेक्षा आधीच वेगळं होणं चांगलं, ह्या विचारापर्यंत सुवर्णा व तिचे यजमान पोहोचले. नवा फ्लॅट बघणं सुरू झालं. आर्थिक ओढाताणीचा प्रश्न नव्हता. सगळं जुळत गेलं. खरं सांगायचं तर मला हा सुवर्णाचा व तिच्या नवऱ्याचा निर्णय तितकासा पटला नाही. कदाचित माझ्यावर झालेले एकत्र कुटुंबाचे संस्कारही असतील. पण त्यांचं असं विभक्त होणं मनाला कुठेतरी चलबिचल करून गेलं. भले भांडणं असतील, मतभेद असतील पण स्वतंत्र, वेगळं राहणं हा पर्याय होवू शकतो का?

मोठ्या एकत्र कुटुंब पध्दती पासून फारकत घेत घेत आपण हम दो हमारे दो इथपर्यंत पोहोचत आलो आहोत. आता त्यातही आपण आणखीनच विभक्त होत जाणं विपर्यस्त आहे. स्वत:च्या अपत्याला त्याला कळू लागतं त्या वयात स्वत:पासून दूर करून, अपत्याचा विकास एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून होवू देण्याइतका आपला समाज आजच्या घडीस प्रगल्भ नाही. आपण नात्यांच्या कोषात राहणे पसंत करतो.

स्वत:चे अहंकार, पूर्वग्रह, आत्मकेंद्रीत वृत्ती, स्वत:भोवती आखलेली आखूड वर्तूळं हे संसारातल्या सहजीवनाला संपवतात. त्याचबरोबर त्याची दुसरी बाजूही अधोरेखित व्हायला हवी. स्वत:चं शिक्षण, कला, एखाद्या विषयातलं नैपुण्य हे केवळ घरचं कोण बघणार ह्या प्रश्नाखाली चिरडलं जाणही योग्य नाही. स्त्रीने संसारासाठी असं करणं अपेक्षित असतं. बहुतांशी स्त्रीच्याच वाट्याला हा सो कॉल्ड "त्याग" येतो. तिच्यातले अंगभूत नैसर्गिक गूण, त्यावर लग्नाआधी तिने घेतलेली मेहनत ओळखून त्याअनुसार तिच्यासाठी संसारात जागा निर्माण करणं, तिला वाव देणं किती नवऱ्यांना जमतं? असे जोडीदाराचे प्रोत्साहन, पाठबळ मिळाल्यावर करियर आणि संसार दोन्हीकडे यशस्वी होणारी स्त्री हा विभक्तीतून आणखी विभक्त होत जाणाऱ्या कुटुंबाचा सुवर्णमध्य आहे.

उमेदीच्या काळात नवरा बायकोला संसारासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांचं तेवढसं काही वाटत नाही. बुध्दी, शक्ती, कार्य, कर्तृत्व सगळं पाठीशी असतं. इतरांची तेवढीशी आवश्यकता नसते. किंबहूना इतरांचं असणं अडचणीचं होतं. हा कष्ट सोसण्याचा संसार फुलविण्याचा काळ ओसरला की संध्या-छाया हृदयास भिववू लागतात. इतर सगळे पाश गळून पडू लागतात. आणि इथे खरा नवरा बायकोचा संसार सुरू होतो.

सहजीवनाचा अर्थ इथे उमगतो.

नाती हवीहवीशी वाटू लागतात. मूल आपल्याजवळ असावं असं वाटू लागतं. मूल तरूण झालेलं असतं. त्याच्या कार्यकक्षा रुंदावू लागलेल्या असतात. त्याचा संसार सुरू होतो. त्यात ह्या वृध्द नवरा बायकोना स्थान नसतं. किंबहूना स्थान असणं अडचणीचं असतं.

अपूर्णत्वाकडून अपूर्णत्वापर्यंतची प्रदक्षिणा पूर्ण होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो मृदुला दाद +१
सहजीवन म्हणजे मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास>> हे मला पटलच पण त्यासाठी नवरा-बायको सोडून संसारात बाकी रोजच्यारोज आणखी कोणी नसेल तितका "मी ते आम्ही" प्रवास सुखकर होतो हे मा वै म

अगो +१

अगो, +१००००

एकत्र कुटुंबपद्धतीमधे प्रत्येक स्त्री-पुरूषांचे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू, वेगळ्या धारणा, वेगळा आचार विचार याला कुठे स्थान असते? स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही भूमिकांच्या चौकटी ठरलेल्या असतात. त्याच्या बाहेर जाणे हे कलहास कारणीभूत ठरते. परिणामी ठराविक चौकटींमधे व्यक्तीमत्व बसवून वाढ खुंटवून टाकणे, खंत खंत खंत... डिप्रेशन इत्यादी...
हे असं होण्याची खरंच गरज आहे का?

नवीन लग्न झाल्यावर जोडप्याने एकमेकांना ओळखणे, समजून घेणे हे सगळ्यात जास्त महत्वाचे नाही का? अगदी प्रेमविवाह असला तरीही एकाच घरात एकाच खोलीत रहाणे हे नवीन असते. माणूस तेव्हाच समजायला लागतो. आधी फक्त शक्यता आणि विश्वास असतो. ते समजून घ्यायला वेळ, उसंत, शक्यता, मोकळेपणा मिळणारच नसेल तर काय कामाची एकत्र कुटुंबपद्धती?

आपली सहनशीलता म्हणजे नक्की कुणाची? सुवर्णाच्या सासूकडे काहीच सहनशीलता दिसत नाहीये मला. कुठल्याच बाबतीत बदलाला ती तयार नाहीये. सुनेचं आणि मुलाचं आयुष्य कसं असावं हे सुवर्णाच्या सासूने ठरवलंय आणि त्यात तिला ज्यांचं आयुष्य आहे त्यांचीही ढवळाढवळ चालणार नाहीये... असं दिसतंय. अश्या परिस्थितीत माझं मला जगू द्या हो हे सुवर्णा म्हणाली तर ती असहनशील कशी होते?

एकत्र कुटुंब पद्धती ही एक व्यवस्था होती जी बरेच वर्षे भारतात अस्तित्वात होती/ आहे. एवढे वर्ष ती टिकली कारण स्त्रीचे घरातील कार्य (घर सांभाळणे, मुले जन्माला घालणे), समाजातील स्थान आणि महत्व यात फारसा बदल झाला नव्हता. आता बदल घडले. एक स्त्री ही कुणाच्या तरी घरची सून, कुणाची तरी बायको असण्याच्याही आधी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक मनुष्यप्राणी आहे. ही जाणीव झाल्यावर व्यवस्थेत बदल होणे अपरिहार्य आहे.

माझ्या मते मुलांची लग्ने होतात तेव्हा सर्वसाधारणतः आईवडील हे अजूनही कर्ते, फिरते असतात. त्यामुळे लग्नं झाल्यावर नवरा बायको दोघांनी आईवडिलांच्या पंखाखालून बाहेर पडून आपले वेगळे घर थाटावे. त्या जबाबदार्‍या अंगावर घ्याव्यात, एकमेकांना ओळखणे, समजून घेणे हे करावे. मग आईवडिलांना जेव्हा वयोमानाने गरज पडेल तेव्हा एकत्र यावे परत हवेतर.

मी ठाम ह्या मताची आहे की, एकत्र राहूनच नातं टिकते असे बिलकूलच नसते.

त्यात कुणी कर्ती व घरातली सर्वात मोठी व्यक्ती हेकेखोर असेल तर बघायलाच नको.

नीधप: उत्तम पोस्ट. व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रायवसी, पर्सनल स्पेस ह्यावर आपल्या कडे शिक्षण होणे जरुरीचे आहे.

हा कष्ट सोसण्याचा संसार फुलविण्याचा काळ ओसरला की संध्या-छाया हृदयास भिववू लागतात. इतर सगळे पाश गळून पडू लागतात. आणि इथे खरा नवरा बायकोचा संसार सुरू होतो.

सहजीवनाचा अर्थ इथे उमगत >>

म्हातारपणीच लग्न करावे काय मग ? Wink
नाही म्हण्जे तारूण्य सगळे म्हातारपणाकडे डोळे लावून काढायचे आणि आपण किन्वा साथीदार जगलाच नाही तोपर्यंत तर सगळे कष्ट वायाच की !!

खरेच , पण म्हातारपणाचे आयुष्य सुखकर व्हावे हे जसे महत्वाचे आहे तसेच तारूण्यातही आयुष्य सुंदर असायला नको का? का खस्ता खाऊन डीप्रेशन सारख्या आजारांना आहारी जायचे म्हातारपणाच्या काल्पनिक सुखासाठी ?

नीधप , अत्यंत योग्य पोस्ट.
दुर्दैवाने आपल्याकडे मुलगा,सून वेगळे राहतात म्हणजे काही अतर्क्य घटना घडल्यासारखे लोक बघतात.
हेच मुलीच्या बाबतीत असेल तर तिने वेगळे राहावे,सासरर्च्यांची उस्तवार करत बसू नये असे माहेरच्यांना वाटते.

लेख अजिबातच पटला नाही. एकत्र कुटुंबपद्धतीला फुकट ग्लोरिफाय करण्यात आलय.
बदलत्या, विकसत होत गेलेल्या समाजसंस्कृतीमधल्या ज्या अनेक गोष्टी आता कालबाह्य झाल्या, अस्तंगत झाल्या त्यांच्याबद्दल गळे काढण्यात अजूनही अनेकांना आवडत असतं त्यातला हा एक प्रकार. नॉस्टेल्जियात रमणार्‍यांनी 'आमच्यावेळी' म्हणून खुशाल गोडवे गावेत पण ती अजूनही योग्य आहे असलं काही म्हणण्याच्या भानगडीत पडू नये.

एकत्र कुटुंबपद्धती ही फक्त आणि फक्त स्त्रियांच्या तथाकथीत सहनशीलता, त्याग, अथक काम करण्याची क्षमता, घराच्या उंबर्‍याआडच माझं खरं जग मानणे इत्यादी 'गुणां'वर आधारलेली होती जे आता सन्माननीय अवगुण ठरलेले आहेत.

कुटुंबातल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र कुटुंबपद्धती आवडतेच हे गृहित धरणेही चूक. अनेकदा मुलगा, सून यांना 'जा' कसे म्हणायचे या कुचंबणेत ज्येना रहात असतात.

मुलांना सांभाळणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे याकरता तरी हवी होती एकत्र कुटुंबपद्धती म्हणणारे एक विसरतात की यातही मुले सांभाळणे आधीच्या पिढीतल्या स्त्रीकडूनच होणे अपेक्षीत असल्याने स्त्रीचे एक्स्प्लॉयटेशन आलेच. तेही पुन्हा नव्या पिढीतल्या स्त्रीकडून म्हणजे सूनेकडून होणार हे गृहित (नातवंड सोयीने कधी मुलाचे कधी सूनेचे अपत्य होऊ शकते). संस्कारांच्या बाबतीत म्हणायचे तर आजी-आजोबांकडे आपले मुल सोपवायचे आजच्या काळात म्हणजे दिवसभर टीव्ही सिरियल्सच्या संस्कारांचे बाळकडू मिळणार हे गृहित धरणे.

घरातल्या नव्या पिढीला असंख्य तडजोडी करायची आवड असेल, हरकत नसेल किंवा नाइलाज असेल, सूनेला बाहेर काही आव्हानात्मक, बौद्धीक-शारिरीक कष्ट न पडणारे काम नसेल, घरकाम करण्याची आवड असेल तरच आजच्या काळातली कुटुंबे एकत्र रहातात.

सासू, सून या दोघी करिअरिस्ट वृत्तीच्या असल्यावर घरात एकत्र कुटुंबपद्धती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सासरा, मुलगा स्विकारतील का?

या लेखातले सून ऑफिसातून आल्यावर थेट स्वयंपाकघरात जाते आणि तिचा नवरा बाहेर खुशाल गप्पा मारत बसतो, बायकोने सुचवल्यावरही गप्प रहातो, त्याच्या वतीने त्याची आई प्रत्युत्तर करते वगैरेला क्षुल्लक कारणे समजून एकत्र कुटुंबाचे तरीही गोडवे गाणे असले प्रकार पंचवीस वर्षांपूर्वीच्या ललितलेखात शोभून दिसले असते.
आणि अजूनही जर कोणत्या कुटुंबात हे होत असेल तर ते कुटुंब एकत्र का आहे (पुढे जाऊन- नवरा-बायकोही एकत्र का आहेत) माहीत नाही.

घरातली कामे विभागून करण्याची सर्वच सदस्यांना सवय असेल, एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसायचे नाही, प्रत्येकाच्या खाजगी अवकाशात घुसखोरी करायची नाही, कोणीच कोणाला गृहित धरायचं नाही हे प्रत्येक सदस्याने पाळले तर कदाचित नव्या जमान्यात कम्यून धर्तीवरची एकत्र कुटुंबपद्धती रिव्हाइव्ह होऊ शकेल. जे अशक्य आहे.

हे वाह्तं पान झालंय का?
अगोचा प्रतिसाद काय होता?
शर्मिला, नीधप अनेक अनेक मोदक.

२५ वर्षांपूर्वी सासूने घर-सण-वार सांभाळून ऑफिस केलं म्हणून सूनेनेही केलं पाहीजे हा आग्रह कशासाठी? आधीच्या पिढीनेही सगळं त्यांच्या आधीच्या पिढीसारखे केले का? एकत्र कुटुंब जर चांगले बदल स्विकारत नसेल, व्यक्तिच्या विकासाला वाव देत नसेल तर त्याचा आग्रह का? जुने ते सगळेच सोने नसते.

मी सहसा रोमात असते, पण इथे नीधप आणि शर्मिलाला खास अनुमोदन द्यावेसे वाटते. मूळात नविन व्यक्तिचा घरात आदर होणार नसेल, तिच्या मताला काहीच किम्मत नसेल तर तिथे रहाणे म्हणजे शिक्शाच आहे.

बाफ वहाता झाला वाट्टं?
मला एकुणातच माबोवरही अशा चर्चा त्याचत्या रिंगणात अडकलेल्या वाटायला लागल्यात. Uhoh

नी +१, अगोचा प्रतिसाद वाचायला मिळाला नाही!
मला एकुणातच माबोवरही अशा चर्चा त्याचत्या रिंगणात अडकलेल्या वाटायला लागल्यात. >>> अगदी अगदी!

>> मोठ्या एकत्र कुटुंब पध्दती पासून फारकत घेत घेत आपण हम दो हमारे दो इथपर्यंत पोहोचत आलो आहोत. आता त्यातही आपण आणखीनच विभक्त होत जाणं विपर्यस्त आहे.

का? generalize नका हो करू. कारण सांगणार का?

>> स्त्रीला घराबाहेर पडावच लागतं. वेदकालविपरीत आजच्या स्त्रीला विदूषी आणि संसारी दोनही भुमिका पार पाडाव्या लागताहेत.
तुम्हाला स्त्रीने शिक्षण सुद्धा घेऊ नये आस वाटतंय का??? का "आजकाल" पैसे मिळवण्यासाठी स्त्रीला शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे आस वाटतंय??? आणि वेदकाल आणि आज याची तुलना कुठल्या गृहीतकांवर केलेय?

>> भले भांडणं असतील, मतभेद असतील पण स्वतंत्र, वेगळं राहणं हा पर्याय होवू शकतो का?
>>स्वत:चे अहंकार, पूर्वग्रह, आत्मकेंद्रीत वृत्ती, स्वत:भोवती आखलेली आखूड वर्तूळं हे संसारातल्या सहजीवनाला संपवतात.

संधर्भ? हे अनुमान काढण्यासाठी काही statistical method वापरलेय ला? का तुमच वैयक्तिक मत आहे?

अपूर्णत्व काही समजले नाही बाबा. पण मुल असणे म्हणजे पूर्णत्व आणि मुलासुनही घरात २ माणसे राहणे म्हणजे अपूर्णत्व हे वैयक्तिक मत मानतो. मग काही बोलायचं नाही मला.

सारांश: मुल तुमच्या जवळ राहायला हवे असेल तर त्याचे पंख कापा. आणि त्याला आजन्म तुमच्या पंखाची गरज लागेल असे काहीतरी करा. आणि हे जर करणारच असाल तर याचे भान ठेवा की तुम्ही पण कोणाचे तरी मुल आहात.

संस्कारांच्या बाबतीत म्हणायचे तर आजी-आजोबांकडे आपले मुल सोपवायचे आजच्या काळात म्हणजे दिवसभर टीव्ही सिरियल्सच्या संस्कारांचे बाळकडू मिळणार हे गृहित धरणे. >>>
१०००+ हा खूपच मस्त पॉईंट आहे Happy

Pages