सहजीवन

Submitted by सौ. वंदना बर्वे on 17 November, 2012 - 04:41

"वेगळं व्हायचय मला", असं ठणकावून सांगत वेगळी चूल मांडणाऱ्या सुवर्णाचं गृहप्रवेशाचं आमंत्रण फोनवरून आलं. सुवर्णाने आयुष्यात कधीही, किमान पंधरा मिनिटे बोलल्याशिवाय कधी फोन खाली ठेवला नाही. परवाही तसच झालं. साधं गृहप्रवेशाचं आमंत्रण, अर्धा तास काढला. तिचा स्वभाव आधीपासून माहित असल्याने तिचा फोन म्हटलं की आमचे हे सुध्दा अर्ध्या-एक तासाची निश्चिंती झाली असं म्हणत पुस्तकात डोकं खूपसून बसतात. तेवढीच माझी बडबड ऐकावी लागत नाही . सुवर्णा हे तसं अजब रसायन आहे. पटलं तर अगदी जीवापुढे करणार नाही पटलं तर जीव गेला तरी ढुंकूनही नाही बघणार. टोकाची मनस्वीता हा स्वभावातला दोष असतो. तरीही तिच्या गुणदोषांसकट ती खूप चांगली आहे. तिच्या मतांच्याबाबतीत ती आग्रही आहे, स्पष्ट आहे.

नवरा, सासू सासरे, याबाबतीतली तिची मते अगदी ठाम आहेत. प्रत्येक घरात असलेले वाद-विवाद तिच्या घरातही व्हायचे. तिचा नवराही कमावता व हिलाही बऱ्यापैकी नोकरी आहे. नवीन लग्न झालं, नवलाईचे दिवस संपत आले. सुवर्णा परत नोकरीवर रुजू झाली. राहिलेलं पेंडींग काम उरकण्यात तिचा दिवस भुर्रकन उडून जायचा. संध्याकाळी ही दमलेली चिमणी घरट्यात परतली की थेट स्वयंपाकघरात घुसायची. तिच्यासारखाच दमून आलेला नवरा चहाची व सोबत काही खायला यायची वाट पहात आई वडिलांसोबत सोफासेटवर गप्पागोष्टी करीत पहुडलेला असायचा. सुवर्णाने एक दोनदा पाहिलं. मग सासू सासऱ्यांचा पुढ्यातच त्याला विचारलं,

"मला थोडीशी मदत कराल का?"
त्यावर तो बोललाच नाही. सासूबाईच म्हणाल्या,
"त्याने का म्हणून करावी मदत, तो किती दमतो!"
"मी नाही दमत?" सुवर्णाने फणकाऱ्यानेच विचारले.
"घरातली कामे ह्या घरच्या सुनाच करतात. आम्ही नाही केलं? तसही पुरूषांना काय कळतं त्यातलं?"
"मी सगळं कर, मला चहा आणून दे, रात्रीचं जेवण कर असं कुठे सांगते. मी फक्त मदत कर एवढच तर सांगते."
"बाईला का लागते मदत घरकामात?" सासूबाई.

हे असं बराचवेळ सुरू होतं. शब्दाने शब्द वाढत गेला. सासरे आणि नवरा यांनी दोघीनांही आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही वाद विकोपाला गेलाच. पहिली ठिणगी तिथेच पडली होती.

संसारात ही पहिली ठणगीच तर टाळायची असते. उपाय, काळजी ठिणगी आधी आणि सगळं भस्मसात झाल्यानंतर. मधे उरते ती फक्त न संपणारी फटाक्यांची माळ. ती जीवघेणी नसली तर असह्य असते.

संसाराची गरज म्हणून असू दे किंवा करियर म्हणून असू दे. आजकाल मुलींचं नोकरी करणं अपरिहार्य आहे. लग्नाआधी घरी आल्यावर आईच्या हातचा गरम चहा आणि दमलेल्या मुलीला घरकामापासून दूर ठेवण्याची आईची प्रेमळ सवय पुढे जावून एक पक्का विचार बनते. एका अर्थाने ते बरोबरही आहे. पूर्वीच्या काळात जेथे संसाराच्या आर्थिक व्यवस्थेची बाजू ही पुरुषाकडे असायची व स्त्रीवर्गाकडे त्याचा विनियोग ही सर्वसाधारण विभागणी होती. स्त्रीचं कमावणं ही तेंव्हा गरज नव्हती. तिचं क्षेत्र मर्यादित स्वरूपात होतं. वेदकालात तर स्त्रीला विदूषी व्हायचय की संसारी असा पर्याय उपलब्ध असायचा. आज तशी परिस्थिती नाही. आज संसार चालविण्याकरीता स्त्रीचं शिक्षण आणि कार्यकर्तृत्व दोनही पणाला लागतात. स्त्रीला घराबाहेर पडावच लागतं. वेदकालविपरीत आजच्या स्त्रीला विदूषी आणि संसारी दोनही भुमिका पार पाडाव्या लागताहेत.

इथेच मुलभूत फरक निर्माण होतो. जेंव्हा आपण कुटुंबाच्या भरण पोषणाकरिता स्त्रीचं नोकरी किंवा व्यवसाय करणं स्विकारतो त्याच वेळी तिच्यावर असलेल्या परंपरागत जवाबदाऱ्या विभागणं स्विकारीत नाही. बायकोने जर नोकरी केली पाहिजे, संसाराला हातभार लावला पाहिजे, तर नवऱ्याने तिला दररोजच्या कामात मदतही अवश्य केली पाहिजे. संसाराचा गाडा हाकताना दमछाक दोघांचीही होते. विश्रांतीची आवश्यकता दोघांसही आहे. हे समजून उमजून जाणिवेने वागणारी किती जोडपी असतील? अनुरूप जोडप्यासारखं लाखात एक.

वाढते वाद विकोपाला जावून कटूता निर्माण होण्यापेक्षा आधीच वेगळं होणं चांगलं, ह्या विचारापर्यंत सुवर्णा व तिचे यजमान पोहोचले. नवा फ्लॅट बघणं सुरू झालं. आर्थिक ओढाताणीचा प्रश्न नव्हता. सगळं जुळत गेलं. खरं सांगायचं तर मला हा सुवर्णाचा व तिच्या नवऱ्याचा निर्णय तितकासा पटला नाही. कदाचित माझ्यावर झालेले एकत्र कुटुंबाचे संस्कारही असतील. पण त्यांचं असं विभक्त होणं मनाला कुठेतरी चलबिचल करून गेलं. भले भांडणं असतील, मतभेद असतील पण स्वतंत्र, वेगळं राहणं हा पर्याय होवू शकतो का?

मोठ्या एकत्र कुटुंब पध्दती पासून फारकत घेत घेत आपण हम दो हमारे दो इथपर्यंत पोहोचत आलो आहोत. आता त्यातही आपण आणखीनच विभक्त होत जाणं विपर्यस्त आहे. स्वत:च्या अपत्याला त्याला कळू लागतं त्या वयात स्वत:पासून दूर करून, अपत्याचा विकास एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून होवू देण्याइतका आपला समाज आजच्या घडीस प्रगल्भ नाही. आपण नात्यांच्या कोषात राहणे पसंत करतो.

स्वत:चे अहंकार, पूर्वग्रह, आत्मकेंद्रीत वृत्ती, स्वत:भोवती आखलेली आखूड वर्तूळं हे संसारातल्या सहजीवनाला संपवतात. त्याचबरोबर त्याची दुसरी बाजूही अधोरेखित व्हायला हवी. स्वत:चं शिक्षण, कला, एखाद्या विषयातलं नैपुण्य हे केवळ घरचं कोण बघणार ह्या प्रश्नाखाली चिरडलं जाणही योग्य नाही. स्त्रीने संसारासाठी असं करणं अपेक्षित असतं. बहुतांशी स्त्रीच्याच वाट्याला हा सो कॉल्ड "त्याग" येतो. तिच्यातले अंगभूत नैसर्गिक गूण, त्यावर लग्नाआधी तिने घेतलेली मेहनत ओळखून त्याअनुसार तिच्यासाठी संसारात जागा निर्माण करणं, तिला वाव देणं किती नवऱ्यांना जमतं? असे जोडीदाराचे प्रोत्साहन, पाठबळ मिळाल्यावर करियर आणि संसार दोन्हीकडे यशस्वी होणारी स्त्री हा विभक्तीतून आणखी विभक्त होत जाणाऱ्या कुटुंबाचा सुवर्णमध्य आहे.

उमेदीच्या काळात नवरा बायकोला संसारासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांचं तेवढसं काही वाटत नाही. बुध्दी, शक्ती, कार्य, कर्तृत्व सगळं पाठीशी असतं. इतरांची तेवढीशी आवश्यकता नसते. किंबहूना इतरांचं असणं अडचणीचं होतं. हा कष्ट सोसण्याचा संसार फुलविण्याचा काळ ओसरला की संध्या-छाया हृदयास भिववू लागतात. इतर सगळे पाश गळून पडू लागतात. आणि इथे खरा नवरा बायकोचा संसार सुरू होतो.

सहजीवनाचा अर्थ इथे उमगतो.

नाती हवीहवीशी वाटू लागतात. मूल आपल्याजवळ असावं असं वाटू लागतं. मूल तरूण झालेलं असतं. त्याच्या कार्यकक्षा रुंदावू लागलेल्या असतात. त्याचा संसार सुरू होतो. त्यात ह्या वृध्द नवरा बायकोना स्थान नसतं. किंबहूना स्थान असणं अडचणीचं असतं.

अपूर्णत्वाकडून अपूर्णत्वापर्यंतची प्रदक्षिणा पूर्ण होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्कारांच्या बाबतीत म्हणायचे तर आजी-आजोबांकडे आपले मुल सोपवायचे आजच्या काळात म्हणजे दिवसभर टीव्ही सिरियल्सच्या संस्कारांचे बाळकडू मिळणार हे गृहित धरणे. >>>

माझ्यासाठी सुदैवानी बरोबर उलटे. लेक दिवसभर आईकडे असते आणि तिथे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघायला बंदी आहे. Happy

Pages