फासले ऐसे भी होंगे

Submitted by अमेलिया on 1 December, 2012 - 23:33

वेळ रात्रीची . जेव्हा सगळं जग निद्रेच्या उंबरठ्यावर डोलत असतं तेव्हाची असावी बहुतेक. दिवसभर सिलिकॉन व्हँलीच्या वाटा तुडवून आम्ही आमच्या पार्किंग लॉटमध्ये शिरत असतो. बाहेरच्या थंड हवेच्या अस्तरात लपेटलेली रात्र हलकेच चढत असते. इतक्यात गुलाम अलींच्या मधाळ स्वरात पुढची गझल सुरु होते. त्या सुरांचा अंमल हलके हलके चांदण्याबरोबर पसरू लागतो. अनेक वार ऐकूनही पुन्हा एकदा भोवतालच्या जगाचं भान हरपतं आणि एक अनोखी दुनिया जागी होऊ लागते ...
' फ़ासले ऐसेभी होंगे यह कभी सोचा न था ।
सामने बैठा था मेरे और वोह मेरा न था.....।'
अतिशय तरल, मोरपिसासारखा तो गान्धर्व स्वर अंतःकरण ओतून गाऊ लागतो ... हृदयाची तार न् तार छेडली जाते...
'वोह की खुशबू की तरह फैला था मेरे चार सू।
मै उसे महसूस कर सकता था छू सकता न था। '
गझल उलगडत जाते इतके अप्रतिम शब्द लेऊन... अंतराच्या गाभ्यातून साकार झालेली एकेक उत्कट मूर्तिमंत भावनाच जणू ... त्या सुरांच्या मोहिनीनं क्षणांची जत्रा थबकते जिथल्या तिथेच.
'रात भर पिछली ही आहट कान मै आती रहीं।
झाँक कर देखा गली मै कोई भी आया न था। '
दाटणार्‍या अंधाराच्या पडद्या आड मला खरंच क्षणांची पाऊले वाजल्याचा भास होतो. कधी काळी उत्कटतेनं मन भरभरून जगलेले क्षण उभे राहतात.... अन एक वादळ उफाळत राहत... उमाळून आलेला एक अश्रू थबकतोच मिटल्या पापणीशी.
'ख़ुद चढा रख्खे थे तनपर अजनबीयत के गिलाफ़ ।
वरना कब इक दुसरे को हम ने पहचाना न था ।'
खरंच इतकं परकेपण येऊ शकतं ज्याच्यावर तुटून प्रेम केलं त्याच्या-आपल्यामध्ये ? की हे आपल्यालाच आपण न ओळखल्यासारखं? मग ते सारं जीवापाड उधळून दिलेलं कुठं गेलं?
'याद कर के और भी तकलीफ होती थी अदीम ।
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था ।'
इतकं मनभरलं प्रेम विसरणं कसं काय शक्यं आहे? एकेक क्षण स्वतःला विसरून रुजवून घेतलं जे आत.. ते असं विरून, उडून कसं जाऊ शकतं? अन कोई और चारा नही असं म्हणून सोडून देता येतं? अन मग तरीही जगताही येतं?
आर्त-कातर रंगांचं एक गारूड उभं करून गझल संपते. तरीही ती नशा तशीच सार्‍या आसमंतात रुंजी घालत राहते. अदीम हाश्मींचे शब्द अजूनही वातावरणात रेंगाळत असतात. आम्ही दोघे डोळे उघडून एकमेकांकडे बघतो. एक छानसं तृप्त हसू त्याच्या चेहर्‍यावर तरळत असतं . कारचे दरवाजे उघडून काहीही न बोलता आम्ही बाहेर पडतो आणि घराच्या दिशेनं चालायला लागतो.

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. मूळ गझलेत 'रातभर उसकीही आहट' असे आहे असे वाटते.

काही इतर शेरः

अक्स तो मौजूद थे पर अक्स तनहाईके थे
आईना तो था मगर उसमे तेरा चेहरा न था

आज उसने दर्दभी अपने अलहदा कर दिये
आज मै रोया तो मेरे साथ वो रोया न था

ये सभी विरानियाँ उसके जुदा होने से थी
आँख धुंदलायी हुवी थी शहर धुंदलाया न था

ललित आवडले. वातावरण निर्मीती छान!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अंड्या, प्रि, धन्यवाद!
इब्लिस, माझीही!! Happy

बेफिकीरजी,
हे गुलाम अलीजींनी गायलेल्या गझलमध्ये नसलेले शेर इथे दिलेत त्याबद्दल शतशः आभार!
काय सुरेख आहेत हेही...
आज उसने दर्दभी अपने अलहदा कर दिये
आज मै रोया तो मेरे साथ वो रोया न था >> आई ग्ग!!! कस्लं अफाट आहे!!
तुम्हाला ललित आवडले त्याबद्दलही खूप छान वाटले... आभार!

ही गझल अगणित वेळा ऐकलीये... तरीही आता तुम्ही म्हणालात म्हणून परत ऐकली... गुलाम अलीजींनी 'पिछली ही आहट' असेच गायलेय हो... आणि खरं सांगू का, मलाही ते तसेच अधिक आवडतेय... Happy

परवा त्यांना मेहफीलीत ऐकायचा योग आला आणि वाटले की त्यांच्याविषयी काही लिहावे... अधिक काही सुचले नाही... हेच...