छोट्या छोट्या गोष्टी

Submitted by सोनू. on 25 November, 2012 - 15:30

प्रत्येकाला आपले एक घर हवे असते. अशावेळी बरेचदा काही गोष्टी आपल्या मनात घर करून बसतात, आपल्या होणार्या घरासाठी... कधी काही आवडले म्हणून तर कधी कसली कमतरता जाणवली म्हणून..  मोठ्या मोठ्या गोष्टी आपण साग्रसंगीत करूच पण त्या छोट्या छोट्या कल्पनांची यादी करण्यासाठी हा धागा.. कारणांसकट ..... 
जसे
 १- बेडरूमच्या दिव्यांची बटणे पलंगाच्या दोन्ही बाजूला व दाराजवळ पाहीजेत. दिवे कोणी मालवावे यावर वाद नको. रिमोटवर चालणारे दिवे ही नकोत कारण कोणताही रिमोट जाग्यावर मिळत नाही. 
२- न्हाणीघराचे दरवाजे फायबरचे असावेत. पाण्याने खराब न होण्याचा फायदा आहेच, पण आतले दिवे मालवायचे विसरल्यास लगेच कळते.
३- टेरेस वरील पाण्याच्या टाकीलाही छत हवे, उन्हाळ्यात दुपारी थंड पाण्याने आंघोळ करायला जावी तर गरम पाणी नको अंगावर पडायला
४- गरम पाणी फक्त न्हणीघरातील शाॅवर व बेसिनमधेच नाही, तर स्वयंपाकघराच्या बेसिनला व टाॅयलेटच्या हॅंडशाॅवरलाही आले पाहीजे. थंडीत बरे ..
५- पलंगाला लागून एक टेबल असलेच पाहीजे. पुस्तक, चष्मा, फोन, पाण्याची बाटली, लिपगार्ड, इ. वस्तुंचे संग्रहालय करायला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुले असतील तर त्यान्च्या हाताला येतील अशी बाथरुमची दिव्यांची बटणे असावीत. घाईच्या वेळी 'लाईट लावून द्या' हे एक काम होऊन बसते Happy

चप्पल, बूट, छ्त्री, हेल्मेट, जॅकेट ठेवायला शक्य असेल तर दाराजवळच सोय करुन घ्यावी.

खुपच लहान मुलं असतील (दोन अडीच वर्षांची) तर बाथरुम्/टॉयलेटची कडी त्यांच्या हाताला न येणारी असावी.. त्यांना पाण्यात खेळायची खुप हौस असते..

अश्विनी व चिमुरी - परस्पर विरोधी होतेय. बटणे खाली असावित म्हणजे  आपले आपले दिवे लावून बाथरूम मधे जाता येईल पण कडी उंच असेल पाण्यात खेळतात आणि घरभर पाणी करतात म्हणून. बटणे खाली आणि नळ उंच केले तर? पण मग प्रत्येक वेळी पाणी टाकायला आपल्याला स्वतः जावे लागेल. किमान त्याची घाई तरी नसेल. तरिही..

फर्निचरच्या कडा खुप शार्प नकोत. थोड्या गोलाकार असलेल्या बर्‍या. नाहीतर हाता पायांना लागण्याचा संभव. लहान मुले असतिल तर नक्कीच. टेबल ही गोलाकार कडांचे बरे.

फर्निचर शक्यतो खालुन जमिनीपासुन उंच असावे म्हन्णंजे खालुन सहज झाडु मारता ये ईल...

लहान पोरांना आंदण द्यायला एक भिंत/ भिंतीचा एक भाग असावा ज्यावर त्यांना काय वाट्टेल त्या रेघोट्या करू द्याव्यात. त्याबद्दल काही बोलू नये आणि एक रेघोटी मारली तर आपला बाब्या पिकासो झाल्यासारखंही करू नये. Wink

बाथरुम्/टॉयलेटची कडी साधारणपणे एका ठरावीक उन्चीवरच असलेली पाहिलेय मी. खूप खाली किंवा खूप ऊंच असे कधी पाहिले नाहिए. लाईट्च्या बटणाचा स्वानुभव आहे अगं! रोज माझ्या धाकट्याला कोणीतरी लाईट चालू करून द्यावा लागतो. आता तो ४ वर्षाचा आहे.

ही सूचना तशी वैयक्तिक आहे पण तरी...
मला स्वतःला घरातली रचना बदलती असायला आवडते. ठरलेल्या जागा किचन सोडल्यास कुठे तश्याच ठेवायची नॉर्मली गरज नसते. त्या दृष्टीने केबल आणि फोनचे पॉइंटस जास्तीचे करून घ्यावेत आणि मग फर्निचरला चाके लावून घ्यावीत म्हणजे दर महिन्याला नवीन ले आऊट मिळू शकतो.
तसेच खूप खर्च करून इंटेरियर डिझायनिंग मधे बरंच काय काय करून घेतले तरी त्याचा २ वर्षांनी कंटाळा येतोच पण खर्च इतका केलेला असतो की बदलण्याची हिंमत होत नाही. मिनिमलिस्टीक आणि युटिलिटेरियन असा अप्रोच + तुम्ही क्राफ्टी असाल तर हे कॉम्बो जास्त योग्य ठरते.

बाथरुम्/टॉयलेटची कडी साधारणपणे एका ठरावीक उन्चीवरच असलेली पाहिलेय मी. खूप खाली किंवा खूप ऊंच असे कधी पाहिले नाहिए.>>>>>> आमच्याकडे एव्हड्यात कड्या थोड्या उंचीवर बसवुन घ्याव्या लागल्या आहेत.. त्याला कारण २ वर्षे वयाचा भाचा गुपचुप बाथरुमची कडी काढुन आत जाउन गार पाण्याने आंघोळ करणे, मगाने बाथरुममधलं पाणी पिणे इ. उद्यग करायचा.. या वयाच्या मुलांकरता मी ते म्हणत होते. अर्थात वेगळ्या प्रकारची कडी बसवणे हेही करता येउ शकेल. थोडी मोठी कळती मुलं असतील तर ते लाइटची बटणं कमी उंचीवर असणं योग्यच

बेसिन किंवा सिंकचे नळ (सिंकच्या किंवा बेसिनच्या) पार मध्यावर येतील असं फिटींग असेल तर बदलून घ्या. थोडं मागेच असावेत नळ. तोंड धुताना हाथ थडकतो सारखा Sad आणि किचन सिंक मध्ये कप्/ग्लासचे लग्न वारंवार लागते. Sad

कुठल्याच खोलीच्या दरवाज्याबाहेर भिंत असू नये. बेडसारखे सामान आत नेतांना आडवे करता येत नाही त्यामुळे लैच वांधा होतो.

(जनरली passage मध्ये खोलीच दार असेल तर दार उघडल्या-उघडल्या समोर भिंत येते.)

भारतात आता चांगल्या प्रतीचे लाकडी फर्निचर खुपच महाग पडते. त्यापेक्षा लोखंडी / स्टीलचे सोयीचे पडते. पॉलिशचा खर्च नसतो. तसेच ते बोजड नसल्याने, हलवणे पण सोयीचे जाते. कसर वाळवी लागत नाही.

लहान मुलांना, बाथरुमची कडी लावायची कळते, उघडायची कळत नाही. दुसर्‍याला किंवा स्वतःला कोंडून ठेवण्याचे प्रकार फार होतात.

मायबोलीकर सईच्या घरी, दरवाज्याला बाहेर एक पेन आणि नोटपॅड असे. ती घरात नसताना जर कुणी आले, तर निरोप ठेवायची छान सोय होती.

एका घरी bathroom मधे कडीजवळ भिंतीत Exorst Fan चे बटन होते. bathroom मधे जाऊन कडी लावली की बटन दाबले जाऊन Exorst Fan चालू. बाहेर येताना कडी उघडली की बंद.

मला ती सोय खूप आवडली.

घरात प्रत्येक खोलीत एक या हिशोबाने कचर्‍याच्या लहान टोपल्या असाव्यात. अर्थात कोरडा कचरा फक्त. ती रोजच्या रोज रिकामी करुन स्वच्छता ठेवली गेलीच पाहिजे. ओल्या कचर्‍यासाठी किचन, मोरी इ. ठिकाणी असावी.
भारतात रोज झाडूपोछा जरी होत असला तरी या टोपल्या फार सोयीच्या होतात. भारताबाहेर जिथे आठवड्यातून एकदा कचरा नेला जातो तिथे तर याचा खरंच उपयोग होतो. कागद कताई नंतरचे बोळे, खेळण्याची आवरणे, एन्व्हलप, संपलेल्या रिफिली/पेन, असं लगेच फेकायला उपयोग होतो. आळशी लोकांना मेन कचराटोपली पर्यन्त फार चालावे लागत नाही. Wink

आकाशकंदील, गुढी, पणत्या ठेवायचा दाराबाहेरील स्टँड, तोरणाचे खिळे, वगैरे गोष्टींची फिटींग्स आधीच विचारपूर्वक व नीट करून घ्यावीत. गरज लागली कि ठोक खिळा हा कार्यक्रम वाचतो.

प्लग पाँईट जर खाली असतील ते आटो शटर वाले असतील ह्याची काळजी घ्या , किंवा बाजारात प्लगचे होल सिल करण्यासाठी कवर मिळतात ते लावा. मुलं हातात जे सापडेल ते प्लग मध्ये घालत असतात.

जेवणं झाल्यावर उरलेलं अन्न जनरली आपण वाट्या कुंडे यात भरून ठेवतो, त्याऐवजी चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकचे डबे (मावे सेफ) आणून त्यात अन्न काढून ठेवलं तर ते थेट फ्रिजमध्ये टाकता येतं, शिवाय गरम करायला थेट मायक्रोवेव्हमध्येही टाकता येतं. वाट्या आणि कुंड्यांमधलं अन्न गरम करताना गॅसवर करावे लागते आणि फार उद्योग होतो शिवाय त्यांच्यावर आकारापेक्षा मोठ्या किंवा छोट्या ताटल्या झाकाव्या लागतात.

प्लास्टीक ऐवजी काचेची/चिनीमतीची भांडी वापरावी अन्न ठेवायला.

सोनू. चांगला धागा.

मी जेव्हा माझं घर बांधेन (इन्शाअल्लाह) तेव्हा करण्याच्या गोष्टी:

१. किचन मोठ्ठं हवं भरपूर उजेड आणि हवेशीर हवंच. ते इटुकलंसं किचन मला आवडत नाही. शिवाय किचन आणि डायनिंग एकत्र हवं. कोठीची खोली मात्र वेगळी हवी. किचनला एक मोठी खिडकी हवीच जिच्याबाहेर मला बाग करायची आहे. या बागेमधे फुलझाडांसोबतच मी तुळस, कढीपत्ता, मिरच्या आणि कोथिंबीर इत्यादि लावणार आहे. किचनमधे गाणी ऐकण्यासाठी ऑडिओ प्लेयर आणि स्पीकर हवेतच.

२. बाथरूम्स पण चांगले मोठे हवेत. ते अटॅच्ड बाथरूम असतात तसे गल्लीबोळात काढल्यासारखे बाथरूम्स नकोत. गरमपाण्यासाठी सोलर वॉटर हीटर बसवायचे. दुसरे म्हणजे बाथरूम आणी टॉयलेट सेपरेट हवेत.

३. लिव्हिंग रूममधे टीव्ही नको. टीव्ही-सिनेमासाठी वेगळी रूम हवी. यामुळे काहीच करायचं नाही म्हणून टीव्ही बघायचा हे कमी होइल.

४. लिहिण्यावाचण्यासाठी सेपरेट खोली. इथे फ्रेंच विंडो करायची. विंडोच्या बाहेर बाग हवीच. खिडकीत बसून हातात चहाचा कप घेऊन पुस्तक वाचत असताना मृत्यू यावा.

५. बागेमधे बरीच झाडं हवीत. त्यामधे नारळ, आंबा, फणस, चिंच हे वृक्ष हवेत. जास्वंद, गुलाब, मोगरा असली फुलझाडे हवीत. हळद, आलं, कोरफड, ब्राह्मी असली "हर्बल" Proud झाडं हवीत.

६. घरासमोर मोठं अंगण हवं. अंगणामधे खेळायला जागा हवी. त्याशिवाय तिथे मी पहाटे उठून रोज योगा करणार. (हे फारच अति स्वप्न बघणं होतय का?)

तर हे असं घर कधी बांधून होइल ते माहित नाही. Happy पण व्हावं म्हणून सर्वांनी आशीर्वाद मात्र अवश्य द्या.

मुलांना बाथरूमचे दिवे सुरु करायचं कळतं पण बंद करायला ती विसरतात. त्यासाठी आत एक टायमरवाला दिवा असल्यास विशिष्ट वेळाने दिवा/आतला पंखा आपोआप बंद होतो. विशेषतः बंगलासदॄश्य घरांना ही सोय जास्त चांगली.

किचन मध्ये सिंक असल्यास शेजारी शेजारी २ सिंक असावीत. एकात खरकटी भांडी टाकता येतात एक रिकामे राहते. नाहीतर सिंकात ढिग साठतो. Sad

>>खिडकीत बसून हातात चहाचा कप घेऊन पुस्तक वाचत असताना मृत्यू यावा. <<
असं बोलू नै.
आलाच तर त्यालाही एक कप चहा घेऊन जा म्हणावं. तुम्ही नका जाऊ सोबत Happy

नंदिनी, माझेही स्वप्नातले घर थोड्याफार फरकाने असेच.. फक्त माझी चादर थोडी छोटी. एवढे पाय पसरणे कठीण. पण तुमच्यासाठी आमेन !!
एकदा बोस (Bose) च्या दुकानात होम सिस्टीम चा अनुभव घेतला होता. प्रेमात पडले तिच्या. सगळ्या खोल्यांमधे, बाथरूम मधेही मस्ट. बाथटब असेल तर टीव्ही ही पाहीजे पण तितके मुबलक पाणी उपलब्ध असेल तर हा प्रकार .. स्वतःची विहीर असेल तर बर्याच गोष्टी शक्य आहेत. 
धनश्री, खोली तिथे कचराकुंडी हा प्रकार हवाच हवा .. ते ही अगदी पलंगावरून तंगड्या लांब करून उघडता येतील अशा जागी .. आळशीपणाची हद्द आहें पण आरामच करणार ना आपल्या घरात ..!!!

नंदिनी माझ पण थोड्याफार फरकाने असच घर, फक्त घर केरळा स्टाइल मध्ये कौलारु, समोर परत मध्ये अंगण असणार. मोठ्ठ तुळशी व्रुंदावन. मधल्या अंगणाच्या मध्ये छोटासा कमळ फुलांचा हौद. आणि हो वेगळी रुम ओन्ली फॉर म्युझीक. आहाहा...

Pages