छोट्या छोट्या गोष्टी

Submitted by सोनू. on 25 November, 2012 - 15:30

प्रत्येकाला आपले एक घर हवे असते. अशावेळी बरेचदा काही गोष्टी आपल्या मनात घर करून बसतात, आपल्या होणार्या घरासाठी... कधी काही आवडले म्हणून तर कधी कसली कमतरता जाणवली म्हणून..  मोठ्या मोठ्या गोष्टी आपण साग्रसंगीत करूच पण त्या छोट्या छोट्या कल्पनांची यादी करण्यासाठी हा धागा.. कारणांसकट ..... 
जसे
 १- बेडरूमच्या दिव्यांची बटणे पलंगाच्या दोन्ही बाजूला व दाराजवळ पाहीजेत. दिवे कोणी मालवावे यावर वाद नको. रिमोटवर चालणारे दिवे ही नकोत कारण कोणताही रिमोट जाग्यावर मिळत नाही. 
२- न्हाणीघराचे दरवाजे फायबरचे असावेत. पाण्याने खराब न होण्याचा फायदा आहेच, पण आतले दिवे मालवायचे विसरल्यास लगेच कळते.
३- टेरेस वरील पाण्याच्या टाकीलाही छत हवे, उन्हाळ्यात दुपारी थंड पाण्याने आंघोळ करायला जावी तर गरम पाणी नको अंगावर पडायला
४- गरम पाणी फक्त न्हणीघरातील शाॅवर व बेसिनमधेच नाही, तर स्वयंपाकघराच्या बेसिनला व टाॅयलेटच्या हॅंडशाॅवरलाही आले पाहीजे. थंडीत बरे ..
५- पलंगाला लागून एक टेबल असलेच पाहीजे. पुस्तक, चष्मा, फोन, पाण्याची बाटली, लिपगार्ड, इ. वस्तुंचे संग्रहालय करायला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुळशी वृंदावन आणि कमळाच्या हौदासाठी सेम पिंच. कोकणात घर बांधेन म्हणजे कौलारूच बांधेन (नाहीतर त्या गळक्या भिंती पावसाळ्यात वैताग देतात)
मी विटांचे नाही बांधणार. जांभ्याच्या चिरांनी बांधायचे. अशा घराला बाहेरून प्लास्टर करायचे नाही. छान लूक येतो (आणि घर रंगवायचे पैसे वाचतात Proud .

कुठल्याशा सिनेमामधे मी अंगणामधे एक कारंजं पाहिलं होतं. नेहमीसारखं उडणारं नव्हे तर पितळी कळशीमधून सतत भरून वाहणारं पाणी असलेलं. ते डोक्यात फिट्ट बसलय. तसलं कारंजं करायचं आहे.

>>मायबोलीकर सईच्या घरी, दरवाज्याला बाहेर एक पेन आणि नोटपॅड असे. ती घरात नसताना जर कुणी आले, तर निरोप ठेवायची छान सोय होती.

आणि ती घरात असताना कुणी नको ते आले तरी सई साठी छान सोय होती नाही...? Happy (शेवटी पुणेकर!)
~सई दिवे.

स्वतंत्र घर असेल, तर घराच्या बाहेरच एखादा नळ असावा. घरात यायच्या आधीच पाय धुवून, चेहर्‍यावर पाण्याचा हबका मारुन आले, तर मस्त वाटते.
बागेतल्या झाडांना पाणी घालायला पण सोयीचे होते.

( योग्या, तो पण अनुभव घेतलाय, तिच्याघरी )

रूमबायरूम जाऊ :
बाथरूम.

१. बाथरूमची खिडकी नीट बंद करता येईल अशी. 'लोव्हर्स' नकोत. मला जाम थंडी वाजते.
२. बाथरूम मधे भरपूर उजेड पाहिजे.
३. फ्लश 'ड्युएल' प्रकारचा. (लहान + मोठा) = पाणी बचत
४. स्पेशल शेविंग मिरर.
५. घरात एकापेक्षा अधिक टॉ+बा आहेत, सबब कमोड / आंघोळीची जागा एकत्र असलेले चालते. धुणी भांड्यांची जागाही वेगळी आहे.
६. खिडकीत मनीप्लाण्ट Wink

शॉवर क्युबिकल, बाथटब नको Happy
(फार हौस आली तर ४ दिवस हॉटेलात जाऊन टबात बुचकळून यावे. घरच्या या दोन वस्तूंचा मेण्टेनन्स अन साफसफाई वात आणते. शॉवर क्युबिकल ला क्षार जमतात, नळ्या बंद पडतात, अन टबाचा उपयोग मेनली धुण्याचे कपडे ठेवण्यासाठी होतो.. )

इथे बाथटबच्या वरच शाॅवर असतो. त्यातच उभे राहून शाॅवर घ्या किंवा बादली भरून पाट घेउन बसा. टब रोजच वापरला जातो व सर्वात महत्वाचे म्हणजे आजुबाजूला ओल होत नाही. कोणाकोणाला असे टब मधे उभे राहणे विचित्र वाटू शकते. पण मला हा प्रकार फारच आवडला. 

नीधप
माझ्या घरी हे करून घेतले आहे-म्हणजे रुन्द बैठक -खिडकीची उन्ची वाढवलेली- मागच्या भागात पोलिस ट्रेनिन्ग सेन्टर असल्याने खूप झाडी आहे- त्यामुळे बागेत बसल्यासारखे वाटते.फक्त ते झालरवाले पडदे करायचे धाडस केले नाही.
सकाळे त्या झाडान्वर भारद्वाज पक्षान्ची जोडी येते Happy

मला अजिबात अंगण असलेले घर नको. आताच आलेये सासूबाईंकडून. तिथे मोठ्ठ घर, अंगण. आणि रोज सकाळी थंडीत अंगण झाडून मला झालेली सर्दी अजून जाइना. मला हवा मोठा फ्लॅट. जिथे कमीत कमी धूळ येणार. ( सो . झटाक -पूस ही आठवड्याची- पंधरवाड्यातील काम). बाकी कोठीघर, वाचनाची स्पेशल रूम .... कधी होतील?

मस्त धागा, या छोट्या छोट्या गोष्टी बर्‍याच उपयुक्त ठरतील.
घरात एक बुकशेल्फ साठी भिंत असावी अस वै.म. आणि ओपन टेरेस असेल तर शेड मारून मस्तपैकी खोलीवजा आरामाची जागा करता येईल. 'बी' खिडकीबद्द्ल अनुमोदन Happy फार भारी वाटतं पावसाळ्यात, तिथे बसून गरम चहाचा कप आणि हातात पुस्तक किलिंग काँबो.

आमच्या society मध्ये बिल्डरने प्रत्येकाच्या flat मध्ये बाथरूम मध्ये sintex टाकी बसवून दिली आहे,
त्याचं connection बाथरूम, संडास व स्वयंपाकघरातही दिलेले आहे. corporation चं पाणी फक्त सकाळी १/२ तास येत व ते ह्या टाकीत पडतं. तेव्हढ दिवसभर पुरतं.
पण ती टाकी साफ करणं फार अवघड आहे.

स्वयंपाकघरातून टीव्ही दिसेल अशी सोय हवी..

किंवा सरळ परदेशात असते (आता आपल्याइथेही असते म्हणा) असे ओपन किचन..
नाहीतर आपण किचनमध्ये असलो कि बाहेरच्या (हॉलमधल्या) सगळ्या गप्पा, मौज-मजा आणि टीव्हीवरचे प्रोग्राम मिस करतो..

खूप जणांना आपले किचन असे कोणालाही दिसतेय हि कल्पना आवडणार नाही. पण मला स्वत:ला तरी पाहुणे आले कि छान गप्पा मारायच्या सोडून किचनमध्ये जावेसे वाटत नाही...

थंडीमुळे समजलेली गोष्टं -
कडक थंडीमुळे कढत पाण्याच्या शाॅवरखाली बराच वेळ रहाणे छान वाटते. तोवर न्हाणीघर वाफेने भरून जाते. एक्झाॅस्ट लावला तर थंडी वाजते त्यामुळे बाहेर आल्यावरच तो सुरू केला जातो. तो बंद करायला आत गेले तर छतावरून पाण्याचे टप्पोरे थेंब टपटपत होते.
म्हणजे 'न्हाणीघराचे छत वाॅटर रेझिस्टंट रंगाने रंगवणे' क्रमप्राप्त. नुसता चुना असेल तर खाली फरशीवर पांढर्या ठिपक्यांची नक्क्षी

कडक थंडीमुळे कढत पाण्याच्या शाॅवरखाली बराच वेळ रहाणे छान वाटते. तोवर न्हाणीघर वाफेने भरून जाते. >>>>>>> कितीही बरं वाटत असेल तरी असं कधीच करु नका.. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन पुरवठा कमी होउन आपण बेशुद्ध पडु शकतो. अन हे खुप अचानक होउ शकतं, आपल्याला सावरण्याची संधीसुद्धा मिळु शकत नाही. त्यामुळे थंडी वाजत असली तरी एक्झॉस्ट चालु राहु दे किंवा खिडकी तरी उघडी राहु दे.

अवांतर प्रतिसादाकरता क्षमस्व परंतु स्वानुभव असल्याने सांगावसं वाटलं

धन्यवाद चिमुरी. स्टीमबाथ नेमके कसे असते माहीत नाही, परंतु असे होत असेल तर व्हेंटीलेशनची व्यवस्था असावी.

एक लांब रुंद बाल्कनी असावी. त्यात बरीच आवडीची झाडे लावता यावी.
दोन छोटाल्या फोल्डींगच्या खुर्च्या अन एक छोटासा टेबल असावा, तिथे बसुन चहा घेण्यासाठी.
तिथेच डार्ट बोर्ड असावा. आकाश कंदील लावायला दिव्यांच्या माळा लावायला प्ल्ग पॉईंट्स असावे!

मला काय हवाय या पेक्षा काय नकोय हे मनात पक्के आहे…तसे स्वतःचे घर पण आहे … सुन्दर हि आहे… पण आपण आपल्याला हवे तसे बनवणे म्हणजे मज्जाच वेगळी ….
घरात जेवढ्या मोकळ्या जागा म्हणजे पुढे मागे आंगण… ओपन टेरेस … असतील तेवढा स्वच्छतेचा त्रास … यांचा उपयोग तसा छान दिसायला किंवा मुलांना खेळायला तेवढा होतो एरवी घरची स्त्री घरातल्या कामात व्यस्त असते त्यामुळे तिला इथे घालवायला निवांत असा वेळ मिळत नाही … ती फक्त स्वच्छतेच्या वेळेस इथे येते जाते (बिच्चारी)

घरात बाग असावी तिथे उपयोगाची झाडे जास्त लावावी … जसे भाज्या, औषधी वगैरे … शो ची झाडे लावण्यापेक्षा कारण ज्याचा उपयोग होतो त्याचे मेंटेनन्स परवडत वर्थ वाटत … नाहीतर नुसता चांगल्या दिसण्यासाठी असलेल्या गोष्टींचा साफ सफाई आणि इतर गोष्टींमुळे आपल्यालाच त्रास होतो …अर्थात कामाच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा सुंदर करून वापरता येतातच …

घरात शक्यतोर पांढऱ्या शुभ्र टाईल्स नसाव्यात … मळखाऊ असाव्यात… बाथरूम मध्ये तर अजिबात च पांढऱ्या नसाव्यात कारण यांच्या स्वच्छतेसाठी सर्वात जास्त वेळ आणि मेहेनत लागते पण तरीही सतत घाण याच दिसतात … पाहुणे येतात तेव्हा घरच्या कर्त्या स्त्रीला ह्याचा फारच त्रास होतो …

पुस्तक लायब्ररी… म्युझिक लायब्ररी …म्युझिक प्लेयर्स … गायनाची आवड असेल तर ते Instruments …हे सर्व एकाच मोठ्या आवडीच्या खोलीत ठेवावे … जेव्हा जेव्हा हे सर्व करायची हुक्की येईल तेव्हा तेव्हा तिथेच जायचे …यात दोन फायदे आहेत …आवड पूर्ण करतांना डिस्टर्ब होत नाही … आणि हा सर्व पसारा घरभर दिसत नाही … परत पुस्तक आणि गाण्यांच्या CD घेऊन जाणाऱ्या काही 'तशा' लोकांचा त्रास कमी होतो …

किचन मोठ्ठं असावं… निदान दोन बालकन्या असाव्यात मोठ्ठी खिडकी असावी हक्काची … पाहुण्यांचे बेडरूम असावे … मुलांचे बेडरूम असावेच … स्टडी रूम असावी … आणि सगळं आगाऊ सामान डंब करायला एक आगाऊ रूम पण हवीच

१.प्रत्येक वस्तूला जागा अणि प्रत्येक वस्तू जागेवर........
२.नवीन वस्तू घरात आणताना, त्याच प्रकारची जुनी वस्तू बाहेर काढणे

धागा शोधून काढल्याबद्दल धन्यवाद इंद्रधनु.
मयी, एकूणच ' लागेल तेवढं ' हा मुद्दा का? सफाई करणे काम आऊटसोर्स केलं तर ऐसपैस प्रकार परवडू शकतो पण आईटसोर्सिंग कायमच जमेल असं नाही हे देखिल तितकंच खरं. मला व्यक्तीशः खूप सामान घरात असावं असं वाटतं. किती ती रिकामी जागा असं काहीतरी. जागा भरली की रोजची सफाई आपोआप कमी होते. कधी षठी सहामासी पूर्ण सफाई. लाद्या बाजूचा परिसर पाहूनच. जसे सोसायटीमधे डांबरी किंवा सिमेंटचे रस्ते असतील, माती अगदी गार्डनपर्यंतच मर्यादित तर लाईट कलर किंवा पांढरी लादी चालू शकेल. आजूबाजूला रोजच्या वावराच्या ठिकाणी माती असेल तर नको. माझ्या गावातल्या बंगल्यात मातीमुळे सरळ कार्पेट घालून घेतलं त्रास होतो म्हणून.

आमचे जुन्या पद्धतीचे घर आहे. इतक्यात आम्ही ज्येनांच्या सोयीसाठी घरात बाथरूम करून घेतले. आता ते बाथरूम जुन्या पाण्याच्या टाकीपासून लांब गेल्याने त्याच्या गरम पाण्याच्या नळाला प्रेशर येत नाही. आधी आम्ही टाकीची उंची वाढवण्याचा विचार करत होतो. पण एकांनी आम्हाला अर्धा एचपीची मोटार असलेला प्रेशर पंप लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे घरातील सर्वच नळांचे प्रेशर वाढेल आणि टाकीची उंची वाढवावी लागणार नाही. असे कोणी केले आहे का? यात पाण्याचा वापर आणि वीजबिल दोन्ही वाढेल याची कल्पना आहे पण ते नेमके किती वाढेल याचा अंदाज घेता येईल का? या प्रेशर पंपाची किंमत साडेचार हजार सांगितली आहे. जी टाकीची उंची वाढवण्याच्या खर्चापेक्षा कमी आहे म्हणून हा पर्याय चांगला वाटतो आहे. पण एवढे करूनही गीझरला प्रेशरने पाणी येईलच याची खात्री नाही असे होऊ शकते का?

टाकीची उंची किती? १० फुट? बाथरुमचा गिझर पाच फुटांवर असतो. आणि टाकी दहाफुट उंचीवर असेल तर दहा फुट वजा पाच फुट एवढेच प्रेशरने गिझरच्या नळाला मिळते. पंपाची आइडिया बरोबर आहे. इंडस्ट्रीत पंप लावून हवे तेवढे कमाल प्रेशर मिळवतात. पंधरा/२५ फुट वगैरे.

किमान आठ फूट फरक आहे उंचीत. पण मुख्य गोष्ट अशी की आता टाकी आणि बाथरूम यांच्या मध्ये आडवा पाईप किमान पंधरा ते वीस फूट झालाय. पूर्वी टाकीच्या शेजारीच बाथरूम होते त्यामुळे प्रेशर येत होते बऱ्यापैकी.

Pages