‘’ हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ ” - वाचनाचा एक समृद्ध अनुभव

Submitted by भारती.. on 24 November, 2012 - 12:53

‘’ हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ ” - वाचनाचा एक समृद्ध अनुभव

खूप खूप वर्षांतरी हातात घेतलेलं तुमचं पुस्तक, नेमाडे. तसं हे पुस्तक २०१० मध्येच आलेलं, पण माझ्या हातात अलिकडेच आलं ते.आताही फार निवांतपणा नव्हताच वाचनात, पण मला लिहितं करण्याचं सामर्थ्य आजही जाणवलं तुमच्या शब्दांच्या तीव्र रसायनामध्ये.

तुमची अत्यंत एकेकालीन चाहती मी. मला तुमच्या पांडुरंग सांगवीकरचं कोसला तितकंसं आवडलं नव्हतं, पण 'बिढार' , 'जरीला ' आणि ' झूल' या चांगदेव पाटील कथित कादंबरीत्रयावर मी फिदा होते . फिदा तुमच्या शैलीवर.

तुमची ती शैली , जी शब्दबंबाळ नसतानाही हृदयमोहिनी होती अशी शैली, जी वास्तव तपशीलांना क्षणात अद्भुताच्या स्तरावर हिंडवून आणत होती. एक आयुष्याच्या वाळवंटात अथक चालत जाणारा प्रतिभावंत साक्षात सामोरा आणत होती ..

चेकॉव्हच्या नाटकांसारखं कंटाळवाणं जगण्याचं वास्तव अन त्याच्याच आतून आतून उमडणारे कथानकांचे रहस्यमय झरे..माणसांच्या गाठीभेटी, कवितात्म रोमांच संपवून पुनःपुनः एकटेपणाच्या वर्तमान समेवर येणारे , विसावणारे आत्मसंवाद. वादांच्या,विद्वेषांच्या कटू विनोदांच्या विरत जाणार्‍या गलबल्यातून जागणारे, आयुष्याच्या आशयक्षेत्राचा शोध घेणारे आत्मसंवाद.

कादंबरी चतुष्ट्याच्या अंती 'हिंदू' ची घोषणा तेव्हाच तर झाली होती..

पण 'हिंदू' आली नाही, खूप खूप वर्षे लोटली. वास्तव अवास्तवपणे बदलत गेलं.बाजारपेठा विस्तारल्या, जग आकसून जवळ आलं. माहिती तंत्रज्ञान महास्फोट ते मोबाइल फोन्स,फेसबुक,संपर्कसाधने वगैरे वगैरे चावून चर्‍हाट झालेल्या उलाढाली .

पण जगणं का कोण जाणे, आतून बदलल्यासारखं वाटलं नाही. तुमची पुस्तकं बुकशेल्फवरून हलवावीशी वाटली नाहीत. 'हिंदू'चा विसर मात्र पडत चालला. तुमच्या प्रतिभेकडे जुन्या तोलामोलाचं सांगण्यासारखं काही राहिलं असेल का अशी कधीतरी शंका आली अन विरून गेली. तुमचं युनिव्हर्सिटीतलं अस्तित्व साहित्यकार नेमाडेंच्या स्मारकासारखं वाटू लागलं दुरून पहाताना, क्वचित ऐकताना. तुमच्यातला समीक्षक-संस्कृतीअभ्यासक तरी टिकून आहे ना, बेश झाले, असं स्वतःला समजावलं झालं.

तुमच्या भाषेत सांगायचं तर, 'सामसूम. किती एक शतकांची . नि:शब्द.'

आणि तीस वर्षे की जास्त काळ घेऊन 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' आली. ही ती 'हिंदू' नव्हती. चांगदेवच्या आत्मकथनाची कादंबरी. हिचा कर्ता पुरुष होता तरुण, खंडेराव विठ्ठल.अध्यापक नव्हे,मानववंश संशोधक. पुरातत्वज्ञ. महाराष्ट्राच्या दोन महादैवतांचं नाव एकवटून घडवलेला हा घसघशीत नायक, पुनः एकदा 'कारा' च (अविवाहित.. हे कसलं आकर्षण तुम्हाला तरुण अविवाहितच नायकाचं कळलं नाही, जे आयुष्य उलटल्यावरही टिकून राहिलं?! ), त्याची ठसठशीत विद्वत्ता आणि त्याच्या हृदयातली कवितेची मऊ सुगंधी भूमी.

इतक्या वर्षांचा उपास फिटला.

तर या खंडेरावाला शोधायचाय मानववंशांच्या जाणिवांचा इतिहास.. हवेवर हवेने लिहिलेल्या प्राचीन हकीकती ! कोण कुठून कुठे गेले ? कुठे कसे वंशसंकर झाले ? जेते कोण / जीत कोण ? नगररचनांच्या, भांड्यांच्या ,नर्तकींच्या अलंकारांच्या मागे कोणाकोणाच्या जाणिवा श्वसत होत्या ? त्यांचे विकासविनाश कसे झाले? काय शाबूत राहिले ?काय झिजून गेले? जुन्या लिपींचे, चिन्हांच्या चित्रखुणांचे काय झाले ? त्यांचे अर्थ किती कसे लावावेत? इथे आजच्याच कवितांचे अर्थ लावताना धापा लागताहेत.

.. असे प्रश्नोपनिषद, नेमाडे, इतक्या कलात्मकतेने तुम्ही पुनः समोर आणलेत.जुन्या वस्त्रांचे दिमाख मिरवावेत तशी तुमच्या महाकादंबरीची पानं डोळ्यांसमोर झगमगली.तितक्याच काळजीपूर्वक जुनेरांच्या चिरगुटांमधले कऴकट काळो़खही सांभाळून पोचवलेत तुम्ही. तुमच्यातला यशस्वी कादंबरीकार अन त्याच्याही मागे लपलेला एक कवी यांचे हे कारभार.बाकीचे नेपथ्य मानववंश,भारतीय उपखंडातले पुरातत्व अन तत्त्वज्ञान, जातीव्यवस्था अन शोषणाचे आकृतीबंध वगैरे भरपूर वादग्रस्त विधानांना पोसणारे.तुम्हालाही आवडच या सगळ्याची पूर्वापार.

सिंधूसंस्कृतीच्या अभ्यासाचा कॅनव्हास घेतल्याने आणखीन एक झाले नेमाडे, भारत आणि पाक म्हणून जे दोन भूभाग नकाशावर दिसतात, त्यांच्या सीमांच्या धारदार पात्यांची तुम्ही रेशीमपाती केलीत. तुम्ही प्रत्ययास आणलेल्या अद्भुताचा हा आणखी एक विलास. खर्‍या अन शिवाय कवीमनाच्या अभ्यासकाकडून कराची अन मुंबईतली साम्यस्थळं कळली. दिलवरच्या धाब्यावरची रंगीत गर्दी, उर्दू शेरोशायरी अन पंजाबी कव्वाल्यांची उधळमाधळ.यातच महानुभाव मठातल्या संन्यासिनी तिरोनी आत्याचा शोध घेण्याचा खंडेरावचा प्रयत्न.गाव सोडून वडिलधार्‍यांनी नवसात बोललेला संन्यास घेऊन ऐन तारुण्यात महानुभावांच्या मार्गाने काबूलपर्यंत निघालेली, फाळणीत हरवलेली तिरोनी आत्या. पण बिचारी कशाने? घरोघर संसार करणार्‍या का नाहीत बिचार्‍या ? खराच प्रश्न.

या सर्व तुमच्या कथानकातल्या खानदेशीय स्त्रिया. त्यांची नावेही मानववंशांचा मोठा दीर्घ प्रवास सांगणारी.तिरोनी हा त्रिवेणीचा अपभ्रंश, हरखू हा (खंडेरावच्या लभानी- खंडेरावाच्या मते खर्‍या हिन्दुस्तानी आर्यवंशाचे लोक- प्रेयसीचे नाव ) शरयूचा अपभ्रंश. मोहेन-जो-दारो कडून खानदेशात उतरत आली माणसे. शब्द अन त्यांची अर्थ यथाशक्ति सांभाळत. असो. असे सगळे गुंताडलेले संदर्भ एका विशाल भारतीय उपखंडाचा एकात्म जीव दाखवणारे. 'इंडियनपाकी' सौहार्द.

खंडेरावाला तरुण पुरातत्वसंशोधक दाखवल्यानेही एक झाले नेमाडे, उत्खनन अर्धेच टाकून त्याला मृत्युशय्येवरील वडिलांकडे मोरगावला पिटाळणे तुम्हाला सोपे गेले.
एकूणच सगळे सोपे गेले.
लाहोर ते खानदेशातलं मोरगांव.
पाकिस्तान ते भारत.
आठवणी ते वर्तमान.
प्रवासातली ग्लानी ते जागृती.
मानववंशांच्या कथा ते अद्यतन भ्रष्टाचारांच्या कथा.
गावगाड्यातल्या जातीजमातींच्या, बाराबलुत्यांच्या, हिंदू शैलीतील 'प्रेमाने केलेल्या 'शोषणाच्या कथा, ऐतिहासिक कथा. वना अरण्यांच्या, पशुवंशच्छेदनांच्या लोककथा.
केवढं जाळं विणलंत.स्थलकालाच्या पटावर फिरवलंत विराट जत्रेत पाळण्यात बसवावं तसं जिवाला. दमवलंत. पण विस्कळित नाही म्हणणार मी तरी त्याला. ही समृद्ध अडगळच तर मांडायची होती तुम्हाला.

तसा तुमचा पिंड कथेकर्‍याचाच नेमाडे, एरवी कथेला नावं ठेवता तुम्ही .म्हणून हे शैलीदार कवितात्म लिहून तुम्ही काळोखे कोनाडे तयार केलेत व्यामिश्र अर्थांचे,स्मरणगंधांचे. सोप्या कथांच्या भोवतालात.सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या स्त्री प्राक्तनाच्या कथा,एखाद्या बाईच्या सकवार हातानं , पाझरत्या मनानं लिहिलेल्या.

या कथा जशा खंडेरावाच्या आयुष्यात घडलेल्या,तशा त्याने आज्यापणज्यांकडून ऐकलेल्या. गरती स्त्रिया अन लभाणी ग्रामवधूंच्या.बाईने बाईचा केलेला छळ अन बाईने बाईला केलेली मदत. एक अपौरुषेय महाभारत सतत घडणारं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये.
तिरोनीआत्या,सिंधूमावशी,सधन,गरीब शेतकर्‍यांच्या घरातल्या स्त्रिया एकजात गरीबच पण. कामावलेल्या, लेकुरवाळ्या,काही कोवळ्या वयात बाळंतपणात अज्ञानाने दगावणार्‍या सुमनताईसारख्या. लग्नगाठ बांधून दिल्यावर नशिबाचा वाट्याला आलेला भोग निमूट सोसणार्‍या.अकालवैधव्य सोसणारी ,नणंदांनी सासूने पिडलेली सुंदर असहाय सोनावहिनी. अन्यायाविरुद्ध लढणारी नशिबाला प्रत्युत्तर करणारी एखादीच चिंधूआत्या. अन युरोपीय डॉ.मंडी- या सर्वजणींचा अभ्यास करणारी मुक्त विदुषी. लंडन विद्यापीठातील प्राचीन भारतीय पुरातत्वाची प्राध्यापिका.आत्मनिर्भर .. इथे पुनः त्या युरोपीय स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेची सांस्कृतिक,सामाजिक,खाजगीत जीवनातली तुम्ही दिलेली कारणं.खास तुमच्या संवादशैलीत उलगडत जाणारी.

मॅजिकल रिऍलिझम अगदीच नाही कसा म्हणावा या कथाकथनांत ? त्या अंगाने तसं अनेकदा लिहिलेय तुम्ही,एक-दोन ठिकाणी तरी प्रत्यक्षतेने आलाय तो. जसा खंडेराव-यक्ष संवादात.यक्षप्रश्न असा-'अनन्य मौल्यवान आहेर कोणता ?' यावर खंडेरावाचे उत्तर -' 'पिंजार्‍याच्या सकीनाने दिला होता तो.' ही अजून एक कथा . 'औरतां किदरबी एकच्चे' म्हणणार्‍या सकीनाची. (इथे हेही नोंदवलं पाहिजे की अशा मुस्लीम गरीब स्त्रियांचंही फार सहृदय चित्रण केलंय तुम्ही. कमरुन्निसासारख्या कमनशिबी. गरिबी, अज्ञान, बाईपण..मुस्लीम संदर्भातलं. असो. )

अशा या कृषिप्रधान संस्कृतीत, सधन शेतकरी महानुभावी बहुजनसमाजी जाणिवा पेलत वाढलेला खंडेराव, एकुलता एक सगळीकडून कुटुंबात. जिवलग मोठ्या भावाच्या अकालनिधनामुळे एकटा पडलेला मनाने. पण कर्तव्यग्रस्त नुसताच.प्रस्थापितांना, समाजातल्या शोषणकर्त्यांना नावं ठेवताना त्याने ब्राह्मणद्वेष्टी विधानं जागोजाग केली आहेतच, पण तो आपल्या सधन शेतकरी परंपरांनाही बरोबर ओळखून चितारतो.
'कृषिसंस्कृती आप्पलपोटी संस्कृती..'- कारण ती वनसंस्कृती, भटक्या संस्कृतीच्या पोटावर पाय ठेवून फोफावलेली आहे हे मत प्रत्यक्ष अनुभवलेल्या या व्यक्तिगत सलामधून आले असावे.

त्याच तीव्र प्रामाणिकतेने खंडेराव स्वतःच्या आतल्याही शोषणपरंपरांचं भान असलेला असा आहे . रेनी नावाच्या धनगर मुलीकडे अन हरखू या गावातील लभानी सुशिक्षित युवतीकडे आकर्षित होऊन अर्थातच प्रेमजीवनात असफल होणारा. बहुजनसमाजातल्याही जातीय उतरंडीला ओलांडून जाऊ न शकणारा. भाष्यापलिकडे, वाद घालण्यापलिकडे ठोस काहीही करू न शकलेला न-नायक.

शेवटच्या पर्वात पुनः जुनी विद्यापीठीय भंकस,भ्रष्टाचार,स्थानिक पत्रकारिता वगैरे जुने वळण घेतलेतच तुम्ही नेमाडे, पण तोपर्यंत क्षुधा पूर्ण शमली होती. दुधाची तहान शतशतकांच्या घट्ट बासुंदीवर भागवल्यावर पुनः हे पाणचट ताक समोर.

वडिलांच्या प्रेतयात्रेने संपते ही अनेकलेल्या एकाच्या जाणिवेची महाकादंबरी. शोभेश्या इतमामाने. वारकरी पंथाच्या निळूकाकांपासून ते महानुभावी पारायणांपर्यंत ते खाजासाहेबाच्या पीरापर्यंत सर्वांचा मान राखत ही महायात्रा थांबत थांबत, शोक पचवत रिचवत अखेरच्या मुक्कामाला जाते.

आता नवा कुटुंबप्रमुख खंडेराव.
नव्या प्रश्नांनी व्याप्त, व्याकूळ.
नव्या स्वप्नांच्या भोवर्‍यात गरगरत त्यांच्या मनोरम रचनांचे अर्थ जाणून घेऊ पहातोय.

हे असं स्वप्न-सुषुप्ती-जागृतीच्या सीमारेषेवर शेवटी आणून सोडलंत, बरं केलंत नेमाडे.
मोकळंमोकळं केलंत गुंत्यातून, गुंत्याची जाणीव देऊन. त्या समृद्ध अडगळीचा वारसा पसार्‍याने समोर ठेवून.

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद भारतीताई या लेखाबद्दल मला हे पुस्तक वाचायचेच होते अनेक समज गैर-समज आहेत याबद्दल असे ऐकले आहे
माफ करा लेख न वाचताच प्रतिसाद दिलाय आता निवान्तपणे वाचून 'अभिप्राय' देता आला तर प्रयत्न करीन
पुनश्च धन्स

धन्यवाद भारतीताई.
हिंदु मला अतिशय आवडलेली कादंबरी.
मलाही अनेक कथा उपकथांचा समावेश असलेलं महाभारत वाटतं.

सगळीकडे मध्यंतरी हिंदुला नांवे ठेवायची लाटच आली होती.
यातल्या भाषाशास्त्राच्या चमत्कृतीपण मस्त आहेत. उदा ए टु झेड अक्षरे असलेले इंग्रजी वाक्य. अ ते ज्ञ शब्द असलेलं मराठी वाक्य.
मंडीचं आणि या खंडेरावचं पुढे जुळतं की काय असं वाटत रहातं.
मात्र सांगवीकरसारखा खंडेरावही गावात परत गेलाय आणि विरासत सिनेमासारखा विरासत चालवू लागलाय हा एक कोसलाशी समान धागा आहे.
आईचे चित्रण करताना इतर लेखकांसारखे अतिइमोशनल न करता अगदी वस्तुनिष्ठ आहे.

मला अतिशय आवडलेली ही कादंबरी आमच्या घरातले झोप इनिशिएट करायचे हमखास साधन म्हणून का नावाजतात ते कळत नाही. Happy

वैभव, वाचाच एकदा.. तसे वादग्रस्तच असते नेमाड्यांचे लेखन, पण मी मात्र त्यातला आत्मसंवाद ओळखते म्हणून कदाचित मला आवडते त्यांची शैली.

साती :))
>>मला अतिशय आवडलेली ही कादंबरी आमच्या घरातले झोप इनिशिएट करायचे हमखास साधन म्हणून का नावाजतात ते कळत नाही>>>>
एवढे आकार हल्ली झेपत नाहीत ग! दमछाकत संपवावे लागतात. बाकी तुझ्या भावना अगदी पटल्या. अर्वाचीन मराठी महाभारत म्हणूया. पण हे प्रत्यक्ष नायकाच्या आयुष्यातल्या , त्याने आपल्या बर्‍या-वाईट कृतींनी प्रवर्तित केलेल्या घटनांपेक्षा परिस्थितीवरच्या भाष्यांचं,स्मरणातल्या कथांचं महाभारत आहे !

लेख आवडला. हिंदू ही एक मॅजिकल कादंबरी आहे. अप्रतिम काव्यात्म भाषा; भारतीय इतिहास आणि समाज -जातीपातींची गुंतागुंत यांची जबरदस्त समज आणि आपण वर म्हणालात त्याप्रमाणे सशक्त कथानक - विशेषतः कादंबरीतली स्त्री पात्रे.

ही कादंबरी आपल्या समाजाला समजायला - पचनी पडायला आणखी बरीच वर्षे लागतील

मराठी भाषेतील काही लेखकांचे वैशिष्ठ्य असे झाले आहे की, त्यानी लिहिले तर ते गाजतातच पण काही लिहिले नाही तरी या ना त्या कारणाने ते सतत प्रकाशझोतात राहतातच. [उदा.पु.ल. आणि जी.ए.].... 'लेखकाचा लेखकराव' होईतोपर्यंतचा प्रवास करणार्‍यांचा मागोवा घेत गेल्यास असे सार निघू शकेल की भालचंद्र नेमाडे नामक लेखकाने ज्या कोसल्यात बसून लेखनकर्म सुरू केले त्याच कोसल्यात त्याने आपले बिढार उभे केले आणि त्याची झूल त्याने आजही आपल्या प्रवासात टाकलेली दिसत नाही, किंबहुना आख्ख्या ६०३ पानांचा 'हिंदू' चा पसारा [वा अडगळ....] वाचूनही असे कुठेच जाणवत नाही की लेखकाने पांडुरंग आणि चांगदेवाला सोडून देऊन नवी वाट चोखाळली आहे. खंडेराव भले महाराष्ट्र सोडून अन्य प्रांतात अगदी मोहेनजो-दडो भागात - पाकिस्तानात भटकला आहे, तरीही शेवटी शेवटी परत तो त्याच आपल्या भागातील विद्यापीठाच्या घाणेरड्या राजकारणात {हे मी म्हणत नाही...खुद्द रा.रा.भालचंद्रपंत नेमाडे यानीच झूल, जरीला मध्ये वारंवार असे मत प्रदर्शित केलेले दिसत्ये} प्रवेश करतो....गावातील परंपरेच्या भिंतीना धडका देतो.... आणि ज्या वडिलोपार्जित इस्टेटीबाबत वारंवार उदासिनता दाखवितो शेवटी तिथेच आपला प्रवास बिंदू थांबवितो....."हे घर नांदतं राहू दे, देवा.... ह्या घराची येल मांडवावरे चढू दे, देवा, हो देवा....."....या प्रार्थनेत सहभागी होतो.

काय सांगते मग हे देव गार्‍हाणे ? सांगते ते हेच की, नेमाड्यांची जगण्याची ही अडगळ कितीही समृद्ध असली तरी ती तशीच राहावी. राहावी का ? असे जर वाचकाने विचारले तर त्याला नेमाडे दुसर्‍या भागात उत्तर देतानाही म्हणतील, "मित्रा, मी एक वंशवृक्षपारंबी.....मूळापासून कितीही दूर गेलो तरी ओढ बुंध्याकडेच राहील."

भारती बिर्जे यानी 'हिंदू' चा दोन्ही बाजूंनी घेतलेला आढावा {मी त्यांच्या लेखाला मुद्दाम समीक्षा म्हणत नाही} वाचताना हे नक्कीच जाणवते की त्या 'इन टोटो' हिंदू कादंबरीला दुर्लक्ष करणार नाहीत. कुणीच करू नये, इतकी तिची महती नक्कीच आहे. कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वीच इतकी गाजली.....वा गाजत राहिली....की तिच्यात जणू काही आपल्याला अरेबियन नाईट्सच्या १००१ रात्रीचे भांडारच मिळणार अशी तमाम साहित्यप्रेमींची भावना झाली होती. प्रकाशनानंतर अनुकूलपेक्षा प्रतिकूल मतेच वाचायला मिळाली होती.

प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यात कादंबरी असताना नेमाड्यांना सिमला येथील इंडियन हायर एज्युकेशन कमिशनची नॅशनल फेलोशिप मिळाली आणि तेथील अनुभवाचा त्यानी 'हिंदू' साठी उपयोग करण्याचे ज्यावेळी निश्चित केले त्याचवेळी १९७३ पासून त्यांच्या डोक्यात बसलेला 'हिंदू' चा नायकच बदलून गेला. या संदर्भात कोल्हापूरमुक्कामी मी थेट भालचंद्र नेमाडे यांच्याशी अगदी रात्रभर म्हणावी अशी चर्चाही केली होती....त्यावेळी खंडेराव नसून 'नामदेव भोळे' हा चांगदेवाचा औरंगाबाद कॉलेजमधील प्राध्यापक मित्र 'हिंदू' चा नायक तय झाला होता. 'हिंदू' चे मूळ बीज आहे ते 'झूल' नंतरचा भाग आणि नामदेवाचे कार्यक्षेत्रही महाराष्ट्र प्रांताइतपतच मर्यादित ठेवण्याचा निर्णय झाला होता. पण १९८० नंतर नेमाडे 'सुस्थित' झाले, गोव्याला जाऊन राहिले, पुढे ज्या मुंबईच्या गर्दीला वैतागून तिथून बाहेर पडले होते, शेवटी तिथेच परत आले.....ज्या प्रस्थापित साहित्यव्यवस्थेचे त्यानी अगदी कोसला पासून यथोचित वाभाडे काढले होते, त्याच तंबूत मग रा.रा.नेमाड्यांनीही मुक्काम ठोकला.

पु.ल., पेंडसे, दळवी, कुसुमाग्रज, बापट, करंदीकर असली जख्खड म्हातारी {अश्लिल वाटावा असा उल्लेख केला होता, पण तो इथे देत नाही} साहित्य अकादमीच्या खुर्च्या अडवून बसली असल्याने नव्याना अजिबात पुढे येण्याची संधी मिळत नाही, असे म्हणून ज्या चित्रे, शहाणे, ओक, कोलटकर, परब आदी भडास काढणार्‍या त्या त्या काळातील युवक लेखकांनी प्रस्थापितांविरूद्ध लिटल मॅगेझिन्समधून शरसंधान केले होते त्यात नेमाडेही गांडीव घेऊन अग्रस्थानी होते. पण तरुणाई संपली आणि नेत्र पैलतिरी लागू लागल्यावर मग त्याच साहित्य अकादमीच्या खुर्च्या या "ओल्ड अ‍ॅन्ग्री यंग मेन' ना आल्हाददायक वाटू लागल्या. तिथे हे जाऊन विराजमान झाल्यावर मग तेथील उबेमुळे यांच्या विचारशक्तीतही आमुलाग्र बदल झाले....लोहाराचा भाता थंडावला....आणि मग गेली ३५ वर्षे झुलवत ठेवलेला 'हिंदू' चा रिकामा पाळणा भरणे क्रमप्राप्त आहे असे म्हटल्यावर मूळ खर्डा संपूर्णपणे बदलून नामदेवाला रामराम करून नेमाड्यांनी जो 'खंडेराव' आणला तो वर म्हटल्याप्रमाणे पांडुरंग आणि चांगदेवापेक्षा वेगळा अजिबात नाही.

~ हे म्हटले तर भालचंद्र नेमाडे या लेखकाचे अपयश होय.

बाकी कादंबरीचा आवाका कसा आणि किती विस्तृत प्रमाणावर झाला आहे त्याची झलक भारती बिर्जे डिग्गीकर यांच्या सुंदर लेखातून प्रतीत होत आहेच.

समृद्ध असली तरी ती "अडगळ" आहे, आणि असल्यास ती सहा-साडेसहाशे पृष्ठांची करण्याची काय गरज? असा प्रश्न 'कोसला' पासून नेमाड्यांचा प्रवास पाहिलेल्या माझ्यासारख्या वाचकाला नक्कीच पडतो. मग जितके नाव मोठे तितकाच कादंबरीचा आकारही मोठा असला पाहिजे...म्हणजे धंद्याच्या दृष्टीने ते "बरे" पडते असा जो होरा रा.ज.देशमुख यानी रणजित देसाई यांच्याबाबतीत, कॉन्टीनेन्टलच्या कुलकर्ण्यांनी शिवाजी सावंतांच्याबाबतीत आणि मेहतानी विश्वास पाटील यांच्याबाबतीत मांडल्याचा मराठी वाङ्मयाची परंपरा सांगते, तद्वतच मग पॉप्युलरच्या भटकळांनी नेमाड्यांच्याबाबतीत बांधला असेल, आणि त्याला नेमाड्यानी रुकार दिला असेल तर हा 'कोसला' कारांचा फार फार मोठा पराभव होय.

असो.

अशोक पाटील

हि कादंबरी वाचुन पुर्ण केलेल्या सर्वांचे अभिनंदन ..:-)
अशोकराव नेहमीप्रमाणे उत्तम पोस्ट.

हिंदू या कादंबरीचे गुणगान गाणार्‍यांचा मी निषेध करतो. यात वैयक्तीक काहीही नाही, पण या कादंबरीचे गुणगान गाणे ही नव्या पिढीची (साधारण १९९० च्या दशकात जन्मलेल्या) दिशाभूल करणे आहे. संतापाची कारंजी उसळत असल्याने प्रतिसाद थांबवतो.

-'बेफिकीर'!

लेखकाचा व्यक्ती म्हणून झालेला प्रवास- अकादेमी पुरस्कार - साहित्यातले राज कारण या सगळ्या गोष्टी कादंबरी बाह्य आणि म्हणूनच मूल्यमापनाच्या संदर्भात महत्वाच्या नाहीत असे वाटते.

'हिंदू'ला तीव्र प्रतिक्रिया येणे क्रमप्राप्तच. वाद टाळून नेमाड्यांबद्दल लिहावे कसे ? पण मला त्यांची लेखनशैली नेहमीच विस्मित करते, लिहिण्यास उत्स्फूर्ततेने भाग पाडते. याने दिशाभूल कशी होऊ शकते ? वाचनानंद प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.. अशोकजींची प्रतिक्रिया 'हिंदू' शी निगडित काही कोडी उलगडणारी. नेमाडेंच्या लेखनाची व जीवनाचीही दिशा पकडणारी.
धन्यवाद सर्व प्रतिसादकांचे.
सर्वांच्या मतांचा आदर.

http://www.maayboli.com/node/28373
इथेही चर्चा आहे Happy

तुम्ही मस्तच लिहीता भारतीताई.

नेमाड्यांनी जो 'खंडेराव' आणला तो वर म्हटल्याप्रमाणे पांडुरंग आणि चांगदेवापेक्षा वेगळा अजिबात नाही.>> +१. भरुनच आले हे वाचून. आमचे बी ह्येच मत.

तुम्ही मस्तच लिहीता भारतीताई. >> +1 तुम्ही अगदी मनापासून लिहिले आहे.

अशोकराव तुमची पोस्ट देखील मस्त आहे हे सांगने न लगे. तुम्ही नेमाडे ह्या व्यक्तीचा मस्तच आढावा घेतला आहे.

थॅन्क्स केदार....

तुम्हीही या कादंबरीवर इथे परिक्षण लिहिले आहे याची मला बिल्कूल कल्पना नव्हती. पण वर अल्पना यानी ती लिंक दिली होती त्यावरून सारी चर्चा आत्ता वाचली. श्री.साजिरा यानीही स्पर्धेनिमित्ताने हिंदू चा घेतलेला आढावा मला माहीत होता.

असो....मी मागे एकदा इथे वा अन्यत्र म्हटले होते की फार कमी असे भाग्यवान लेखक असतात की ज्यानी चांगले लिहिले तर चर्चेत येतातच पण नाही लिहिले तरी त्यानी तसे का लिहिले म्हणून पुन्हा चर्चेच्या झोतात राहातात. रा.रा.भालचंद्र नेमाडे हे नाव त्यापैकी एक.

अशोक पाटील

भारतीताई तुमचं लेखन आणि आढावा छान आहे.
मात्र नेमाड्यांची ही कादंबरी मलाही नाही पटली, अशोककाकांच्या नेहमीप्रमाणे अभ्यासू प्रतिक्रीयेत बरंच काही आहेच. कादंबरीतल्या घटना काळातली आणि आताच्या काळातली विचारसरणीतली प्रचंड तफावत पहाता ही नसती प्रसिध्द केली तरीही चालली असती असं वाटून गेलं.....

श्री अशोक यांची प्रतिक्रिया या कादंबरीला श्रेष्ठ बनवते का? श्री अशोक यांची प्रत्येक प्रतिक्रिया स्वानुभवातून, स्वाध्यायातून, अत्यंत अकलंकित न्याय्य दृष्टिकोनातून व वास्तविकतेस धरून आलेली असते. पण 'हिंदू' तशी आहे का? की हिंदूवरची 'श्री अशोक' यांची प्रतिक्रिया मोह पाडत आहे ??????

हिंदू ही समृद्ध अडगळ आहे, पुस्तकांच्या कपाटातील!

लेख वाचून अभिप्राय देण्याचा प्रयत्न करीन असे म्हणालो होतो
प्रतिसादही वाचलेत लिन्क्स अन त्यातल्या लिन्क्स ही वाचून झाल्यात प्रतिसादान्सकट
===========
नेमाडे या व्यक्तीबद्दल मला काहीच माहीत नाही
===========
कादम्बरी मी सहसा वाचत नाही वाचली तर अथ पासून इति पर्यन्त सलग नाहीच अधली मधली प्रकरणे वाचतो फक्त त्यामुळे हिन्दू च्या नशिबात मी तिला वाचणे आहे कि नाही माहीत नाही Happy
===========
कादम्बरी या साहित्य प्रकराच्या गुणवैशिष्ठ्याबद्दल मला सान्गता येणार नाही
===========
हा अभिप्राय ह्या लेखाबादल आहे

१) भारतीताई नेमाडेना व्यक्तिशः ओळखत असतील असे वाटले .वैयक्तिक परिचय त्या साहित्यिकाच्या बद्दल व त्याच्यासहित्याबद्दल वाटणार्‍या विशेष स्नेहास करणीभूत ठरू शकतो याचा प्रत्यय यावा अशी अनेक वाक्ये या लेखात आली आहेत (अख्खा लेख पत्र या फॉरमॅटमधे आहे )
२)लेखिका स्वतः एक सिद्धहस्त कवियत्री आहेत कदम्बरीकाराची शैली कावात्म आहे असे उल्लेख या लेखात आहेत ती खूप आवडते असेही लेखिकेने म्हटले आहे त्यांमुळे कादम्बरीची स्तुती करणे ..साहजिक आहे स्वाभाविक आहे हे मी स्वतः एक कवी म्हणून समजून घेवू शकतो (मी अन कवी? हा माझा गैरसमजही असू शकतो!!)
३) हिन्दुत्वास एक अडगळ म्हटले आहे वरून त्यास समृद्ध म्हणावे ही अत्यन्त आतून केलीली टवाळी आहे हिन्दुत्त्वाची (नेमाडेन्बद्दल हे वाक्य आहे)
लेखात उल्लेख आलाय की कादम्बरी उपेक्षित /बहुजन / आदिवासी इत्यादी म्हणजे हिन्दू धर्मात तथाकथितपणे मानाचे स्थान मिळू न शकलेल्या व्यकिरेखाना केन्द्रस्थानी घेवून प्रवास करते वगैरे मग हिन्दुत्त्वाबद्दल्/ वर्णव्यवस्थेबद्दल काहीतरी विद्रोही बोलावे लागले असेलही कादम्बरीकारास असे समजून चालूया त्यामुळे अशा एखाद्या समाजाची पार्श्वभूमी असलेल्या किन्वा त्या समाजान्बाबत आपुलकी /सौहार्द्र /कणव/सहानुभुती इत्यादी असलेल्या व्यक्तीस कादम्बरी आवडणे /आपलीशी वाटणे ह्या बाबीचा या लेखातील स्तुतिसुमनान्शी सम्बन्ध असण्याची कितपत शक्यता वाटते ? किन्वा असे काही कारण असेल तर ते योग्य आहे का ?याबाबत ..............................
यापुढे मुदा क्र. तीनमधे मला जे सान्गायचेय त्यावर मी भारतीताईन्शी प्रत्यक्ष भेटीत सखोल चर्चा करीन
===============

१)लेखाची लेखनशैली भाषाशैली काव्यात्मकता मुद्देसूदपणा मन्त्रमुग्ध करणारे आहेत

२)ज्यान्च्या काव्याविषयी खरेतर वाचू आनन्दे सारख्या ग्रूपमधे पानेच्या पाने लिहिण्याची गरज आहे अशी योग्यता असणार्‍या कवियत्रीने इतर साहित्यिकान्बद्दल इतके प्रेमात पाडणारे (लेखान्च्या बरका....साहित्यिकान्च्या नाही ;)).............लेख लिहावेत याबाबत भारतीताईना मानाचा मुजरा !!!
__/\___

-वैवकु

श्री.बेफिकीर....

~ मी नेहमीच उत्सुक असतो तुमच्या विविध विषयावरील प्रतिक्रिया वाचायला. भले मग त्यामध्ये माझा थेट सहभाग असो वा नसो.

भारतीताईंचा 'हिंदू' लेख आणि माझी त्यावरील प्रतिक्रिया ह्या दोन अलगअलग बाबी आहेत असे कृपया मानावे. त्यानी (पक्षी : भारती यानी) लेखासाठी पत्राचा जो फॉर्म वापरला आहे त्यामध्ये नेमाड्यांना त्यानी एक 'अपील' केल्याचे दिसत्ये. त्याना कादंबरी जितकी भावली तितकीच ती पुढे पुढे तसेच अखेरीस फसत कशी गेली याचे निश्चित्तच दु:ख झाल्याचे लेखातील भाषेवरून जाणवते. समृद्ध अडगळीचा मागोवा घेतल्यानंतर त्यानी पुढे अखेरीस तो सारांश {"...दुधाची तहान शतशतकांच्या घट्ट बासुंदीवर भागवल्यावर पुनः हे पाणचट ताक समोर......} आणला आहे तो फार प्रखर आणि रोखठोक आहे. या ठिकाणी भारती स्वत:ला नेमाड्यांच्या आंधळ्या भक्तीत गुंतवत नाहीत हे तर दिसतेच शिवाय त्याना आवडलेल्या एका चांगल्या कादंबरीतील नायकाची अखेरीस चाचपडत राहण्याची अवस्था व्यथित करते. त्यानी काय, मी काय तसेच इथे [वा मा.बो. धाग्यावर] कादंबरी वाचून प्रतिसाद देणारे अन्य सदस्य काय, त्यानी पांडुरंग आणि चांगदेव या नायकांवर निस्सिम प्रेम केले आहे, तद्वत त्याच प्रेमापोटी ते खंडेरावावरही प्रेम करू पाहात आहेत, पण त्याच्या कर्त्याने त्याला सहाशे पानातून फिरवून आणून देखील त्याने ज्या किनार्‍यवरून आपली होडी वल्हवली, तिथेच तो शेवटी येऊन थडकतो, हे पचनी जड झाले.

माझी या कादंबरीविषयी {वा एकूणच रा.रा.भालचंद्र नेमाडे या लेखकांविषयी} काही आत्मियतेची भावना आहे....अन् तसे मानणे माझा तो अधिकार असू शकतो हे तुम्हीही मान्य कराल, बेफि.... पण म्हणून मी तिला घेऊन नाक्यानाक्यावर उभे राहून तिची [असलेली/नसलेली] महती सांगत नक्कीच उभा राहाणार नाही. मी हे जरूर म्हणतो की पॉप्युलरकडून कादंबरी आल्याआल्या सलग तीन दिवस मी ती अगदी एकांतात वाचून पूर्ण केली [अगदी भ्रमणध्वनीही बंद होता] आणि गेल्या ३५ वर्षाचा ताण हलका केला.... [होय, "झूल" बाजारात आल्याच्या दिवसापासून श्री.नेमाडे आणि मी - तसेच अन्य समानधर्मी मित्र - 'हिंदू' च्या वाटचालीवर पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीतून संवाद साधत होतो, त्यामुळे त्या कारणानेही कादंबरीच्या फॉर्मविषयी उत्सुकता होतीच].

'हिंदू' वाचलेल्या १० पैकी ८ वाचकांनी त्यावर टीकेची झोड उठविली हे उघडच झाले होते. त्याचे मला काहीसे दु:ख झाले होते हे मी जरूर मान्य करतो पण ते काहीसे अपेक्षित एवढ्यासाठी होते की इतका प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावलेल्या साहित्यकृतीने वाचकांनी भूक शमविली नाही. ते कसे वा का झाले नाही याचा उहापोह इथे पुन्हापुन्हा करण्याची, मला वाटते, आवश्यकता नसावी. मी तर आता या मर्यादेत आलो आहे की, ज्याला ती आवडली त्यालाही ती का आणि कशी आवडली याचे डिसेक्शन करण्यात अर्थ नाही.

वरील एका प्रतिसादात तुम्ही थेट म्हटले आहे की, 'हिंदूचे गुण गाणार्‍यांचा मी निषेध करतो.' जरूर करावा, कारण परत तेच की घटनेने तुम्हाला तसा अधिकार दिला आहे. तरीही वैयक्तिक पातळीवर मी असे म्हणेन की विशिष्ट वाचकाचा असा निषेध करणे आत्यंतिक टोक होऊ शकते.

शेवटी 'अशोक पाटील' नामक एक अत्यंत क्षुद्र वाचकव्यक्ती सांगते म्हणून कुणी 'हिंदू' वाचण्याचा निर्णय घेत असेल/घेणार असेल यावर खुद्द अशोक पाटलाचाच विश्वास बसणार नाही.

असो....शेवटी साहित्यप्रेमापोटीच आपण मतांची ही देवाणघेवाण करीत आहोत हीच बाब आल्हाददायक आहे.

अशोक पाटील

सर्वच प्रतिक्रिया मनस्वी अन अभ्यासू वाचकांच्या, त्यामुळे वाचनीय अन माझ्याही आकलनात भर घालणार्‍या..
तीव्र मतप्रदर्शन करूनही बेफिकीर यांच्या पोस्टमधून समंजस असाच सूर आहे. .
अशोकजींचे ,रैना ,साती, अनंतजी,केदार,अल्पना,कवठीचाफा,सामोपचार,प्रत्येकाचं मत वेगळं आणि ते तसंच असलं पाहिजे. अशा प्रतिसादांसाठी खूप आभार. साजिरा यांचे अभ्यासपूर्ण परीक्षणही मी आताच वाचले.

वैभव, तुम्ही आपलेपणामुळे माझी खूप स्तुती केली आहे.स्वतःबद्दल काही खुलासे नम्रपणे केवळ भूमिकेच्या स्पष्टीकरणासाठी द्यावेसे वाटतात..
-मी समीक्षक नाही फक्त आस्वादक आहे, विशेषत्वाने कवितेची, तुम्ही बरोबर ओळखलेत,या कवितात्म शैलीच्या गाभ्यामुळे मी 'हिंदू' कडे अन एकूण नेमाड्यांकडे आकर्षित होते. काही लिहावेसे वाटते. या उत्कट कविताभक्तीमुळे मी 'विरुद्धांना पाहुणचार' करते, तुमची ही शंका-
>>एखाद्या समाजाची पार्श्वभूमी असलेल्या किन्वा त्या समाजान्बाबत आपुलकी /सौहार्द्र /कणव/सहानुभुती इत्यादी असलेल्या व्यक्तीस कादम्बरी आवडणे /आपलीशी वाटणे ह्या बाबीचा या लेखातील स्तुतिसुमनान्शी सम्बन्ध असण्याची कितपत शक्यता वाटते ? किन्वा असे काही कारण असेल तर ते योग्य आहे का ?>>
याचे हे स्पष्टीकरण -कवितेत जातीभेद नाही ! व्यक्तीगत जाणिवेच्या स्तरावर मी ब्राह्मण नाही की बहुजनसमाजीही नाही ..एका विशाल वास्तवाकडे एक अर्वाचीन मिश्र जाणीव घेऊन मी बघते आहे..
-मी नेमाड्यांना व्यक्तिशः ओळखत नाही ! लेखनाच्या फॉर्ममधली आपुलकी एका जिव्हाळ्याच्या वाचकाची आहे.
-अशोकजींनी म्हटल्याप्रमाणे मी काव्यात्म तरीही अलिप्त असा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला आहे.

-इथे मायबोलीवर फार कुठे न जाणार्‍या येणार्‍या सभासंमेलनांमध्ये सहसा उपस्थिती न लावणार्‍या मला एक 'जिव्हाळ्याचं बेट' गवसलं आहे (दादच्या शब्दात) , माझ्या या परिणतप्रज्ञ मराठी गोतावळ्याने विविध तर्‍हांच्या मराठी ललितकृतींचं /साहित्यकृतींचं रसग्रहण माझ्याबरोबर शेअर करावं हा मुख्य लेखनहेतू.

व्यक्तीगत जाणिवेच्या स्तरावर मी ब्राह्मण नाही की बहुजनसमाजीही नाही>>>>
मला हेच वाक्य मनापासून अपेक्षित होते ...........मला खात्री होती की हे असेच असणार !! मी लहर फिरली म्हणून चाचपडून पाहत होतो मझ्याच मनातल्या खात्रीला ............बाकी काही नाही

माझ्या या परिणतप्रज्ञ मराठी गोतावळ्याने विविध तर्‍हांच्या मराठी ललितकृतींचं /साहित्यकृतींचं रसग्रहण माझ्याबरोबर शेअर करावं हा मुख्य लेखनहेतू.>>>
मला महीत आहे भारतीताई पण यातून तुमच्याकरवी माझ्यासारख्यान्वर फर मोठे उपकार होत आहेत याची तुम्हाला माहिती द्यावी हाच इथे तुमची स्तुती करण्यामागचा माझा हेतू होता

धन्यवाद भारतीताई

[१] मोठा गाजावाजा करून 'हिंदु' प्रसिद्ध झालं होतं. लगोलग माझ्या एका मित्रवर्यांनी मोठ्या प्रेमानं मला हे पुस्तक भेट पाठवलं. त्यामुळे मी मोठ्या उत्सुकतेनं ते वाचायला घेतलं. Empires of the Indus [Alice Alignon] हे पुस्तक मला अफाट आवडलं होतं आणि जो भेटेल त्याच्याकडे मी त्या पुस्तकाची तारीफ करत होतो, कदाचित त्यामुळेच मला 'हिंदु' ची भेट आली असावी. मी ते वाचायला घेतलं खरं पण लवकरच तो एक वेट-लिफ्टिंगचा व्यायाम वाटायला लागला! मी त्या पुस्तक-नगावर चढाईचे अनेक [अयशस्वी] प्रयत्न केले. दर वेळी ते बाजूला टाकताना मला वाईट वाटायचं पण ते नेमाड्यांपेक्षा माझ्या मित्राबद्दल! माझ्या दुसर्‍या एका मित्रानं प्रकाशन-पूर्व सवलतीत ते विकत घेतलं होत! हे समजल्यावर आम्ही भेटलो की एकमेकांना क्षेमकुशल विचारत होतो! त्याचेही आटोकाट प्रयत्न सुरू होते. शेवटी त्याने पाचव्या-सहाव्या प्रयत्नांनंतर पराभव मान्य केला.त्यावेळी त्याचा स्कोर १३५ पानं असा होता. मी मात्र विक्रमादित्य राजाप्रमणे न थकता पुन:पुन्हा त्या वेताळाला माझ्या पाठुंगळी घेत होतो. शेवटी , २२९ वर मीही पराभव मान्य करून टाकला आणि माझ्या उपकारकर्त्या मित्राची माफी मागून मोकळा झालो. माझ्या परिचय-वर्तुळात तरी २२९ पानं हा एक उच्चांक आजवर अबाधित राहिला आहे, हे एकमेव समाधान.
[२] By the way, मी Empires of the Indus ची मात्र जोरदार शिफारस नोंदवतो. ते सिंधू नदीच्या शेवटापासून आरंभाकडे केलेल्या प्रवासाचं वर्णन आहे का या संपूर्ण भूभागाचा इतिहास - भूगोल - समाजशास्त्र - संस्कृती या सर्वांचा एकत्रित मागोवा आहे हे नक्की ठरवता येत नाही. मात्र एकदा वाचायला सुरूवात केल्यानंतर ते आपल्याला खाली ठेववत नाही. सिंधु नदी आणि लेखिका ही दोन पात्रे म्हणून उभी रहात जातात आणि आपल्याला त्यांच्यासोबत खेचून घेतात.
[३] मी अशोक पाटील यांच्या आणि बेफिकिर यांच्याही अनेक अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचल्या आहेत. पाटील यांना 'एक क्षुद्र वाचक' असं संबोधण्यामागचं प्रयोजन मला समजलं नाही.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
-बापू.

श्री.करंदीकरसर....

~ एकाच मुद्द्याबाबत आता लिहितो....सविस्तर नंतर लिहितोच.

मुद्दा ~ माझ्याविषयीचे "ते" मत मी स्वतःच तिथे प्रकट केले आहे. श्री.भूषण नेहमी माझ्यासंदर्भात अतिशय आपुलकीने आणि स्नेहाने माबोवर कौतुकास्पद लिहितात, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 'हिंदू' बाबत त्यानी प्रतिसाद देताना एके ठिकाणी "....हिंदूवरची 'श्री अशोक' यांची प्रतिक्रिया मोह पाडत आहे ??????..." असे काही प्रतिसादकांच्या मताविषयी लिहिले आहे. त्याला अनुसरून मी त्याना उद्देश्यून दिलेल्या उत्तरात, तसे काही नसावे असा सूर लावताना मी साहित्याविषयी लिहितो म्हणजे कुणी क्षीरसागर, पाध्ये, पाटणकर धर्तीचा समीक्षक वगैरे नसून एक सर्वसामान्य क्षुद्र वाचक आहे, असे प्रतिपादन केले.... इतकेच.

करंदीकर, एम्पायर्स ऑफ द इंडस च्या लेखिकेचे नाव अ‍ॅलिस अल्बिनिया (Alice Albinia) आहे. Happy

बाकी ते पुस्तक छानच आहे याबद्दल दुमत नाही

करन्दीकर अनुमोदन! तुम्ही व्यायाम अर्धवट सोडलात . मी हट्टाने तो पुरा केला- ६०३ पाने. खूप वर्षात दीर्घ वाचन केले नव्हते. म्हटले बघूया तरी. २०० पानामध्ये ते लेखकाला नीट सांगता आले असते. बाकी बोली भाषेतील शब्द, वाक्प्रचार याचे योगदान नक्कीच चांगले.

मी सध्या वाचतोय!

एकंदरित कॅलिडिओस्कोप सारखे वाटतेय. मझ्या बालपणाच्या सुट्ट्या छोट्या गावात गेल्याने बर्याच गोष्टी ओळखिच्या वाटतात. लेखन शैली वेगळीच अन गुंगवून / गुंतवून टाकणारी आहे.

बरेंच छ्ळणारे प्रश्न उल्लेखिलेले आहेत. अजूनही अनुत्तरीत.

एकंदरित उत्कृष्ट वाचनानुभव !

यक्ष,
>> लेखन शैली वेगळीच अन गुंगवून / गुंतवून टाकणारी आहे.>>
खरे आहे.. नुसते अनुभव असून भागत नाही.. शैलीमध्ये गुंगवण्याचे तंत्रमंत्र असावे लागतात ..
Enjoy !!

Pages