‘’ हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ ” - वाचनाचा एक समृद्ध अनुभव

Submitted by भारती.. on 24 November, 2012 - 12:53

‘’ हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ ” - वाचनाचा एक समृद्ध अनुभव

खूप खूप वर्षांतरी हातात घेतलेलं तुमचं पुस्तक, नेमाडे. तसं हे पुस्तक २०१० मध्येच आलेलं, पण माझ्या हातात अलिकडेच आलं ते.आताही फार निवांतपणा नव्हताच वाचनात, पण मला लिहितं करण्याचं सामर्थ्य आजही जाणवलं तुमच्या शब्दांच्या तीव्र रसायनामध्ये.

तुमची अत्यंत एकेकालीन चाहती मी. मला तुमच्या पांडुरंग सांगवीकरचं कोसला तितकंसं आवडलं नव्हतं, पण 'बिढार' , 'जरीला ' आणि ' झूल' या चांगदेव पाटील कथित कादंबरीत्रयावर मी फिदा होते . फिदा तुमच्या शैलीवर.

तुमची ती शैली , जी शब्दबंबाळ नसतानाही हृदयमोहिनी होती अशी शैली, जी वास्तव तपशीलांना क्षणात अद्भुताच्या स्तरावर हिंडवून आणत होती. एक आयुष्याच्या वाळवंटात अथक चालत जाणारा प्रतिभावंत साक्षात सामोरा आणत होती ..

चेकॉव्हच्या नाटकांसारखं कंटाळवाणं जगण्याचं वास्तव अन त्याच्याच आतून आतून उमडणारे कथानकांचे रहस्यमय झरे..माणसांच्या गाठीभेटी, कवितात्म रोमांच संपवून पुनःपुनः एकटेपणाच्या वर्तमान समेवर येणारे , विसावणारे आत्मसंवाद. वादांच्या,विद्वेषांच्या कटू विनोदांच्या विरत जाणार्‍या गलबल्यातून जागणारे, आयुष्याच्या आशयक्षेत्राचा शोध घेणारे आत्मसंवाद.

कादंबरी चतुष्ट्याच्या अंती 'हिंदू' ची घोषणा तेव्हाच तर झाली होती..

पण 'हिंदू' आली नाही, खूप खूप वर्षे लोटली. वास्तव अवास्तवपणे बदलत गेलं.बाजारपेठा विस्तारल्या, जग आकसून जवळ आलं. माहिती तंत्रज्ञान महास्फोट ते मोबाइल फोन्स,फेसबुक,संपर्कसाधने वगैरे वगैरे चावून चर्‍हाट झालेल्या उलाढाली .

पण जगणं का कोण जाणे, आतून बदलल्यासारखं वाटलं नाही. तुमची पुस्तकं बुकशेल्फवरून हलवावीशी वाटली नाहीत. 'हिंदू'चा विसर मात्र पडत चालला. तुमच्या प्रतिभेकडे जुन्या तोलामोलाचं सांगण्यासारखं काही राहिलं असेल का अशी कधीतरी शंका आली अन विरून गेली. तुमचं युनिव्हर्सिटीतलं अस्तित्व साहित्यकार नेमाडेंच्या स्मारकासारखं वाटू लागलं दुरून पहाताना, क्वचित ऐकताना. तुमच्यातला समीक्षक-संस्कृतीअभ्यासक तरी टिकून आहे ना, बेश झाले, असं स्वतःला समजावलं झालं.

तुमच्या भाषेत सांगायचं तर, 'सामसूम. किती एक शतकांची . नि:शब्द.'

आणि तीस वर्षे की जास्त काळ घेऊन 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' आली. ही ती 'हिंदू' नव्हती. चांगदेवच्या आत्मकथनाची कादंबरी. हिचा कर्ता पुरुष होता तरुण, खंडेराव विठ्ठल.अध्यापक नव्हे,मानववंश संशोधक. पुरातत्वज्ञ. महाराष्ट्राच्या दोन महादैवतांचं नाव एकवटून घडवलेला हा घसघशीत नायक, पुनः एकदा 'कारा' च (अविवाहित.. हे कसलं आकर्षण तुम्हाला तरुण अविवाहितच नायकाचं कळलं नाही, जे आयुष्य उलटल्यावरही टिकून राहिलं?! ), त्याची ठसठशीत विद्वत्ता आणि त्याच्या हृदयातली कवितेची मऊ सुगंधी भूमी.

इतक्या वर्षांचा उपास फिटला.

तर या खंडेरावाला शोधायचाय मानववंशांच्या जाणिवांचा इतिहास.. हवेवर हवेने लिहिलेल्या प्राचीन हकीकती ! कोण कुठून कुठे गेले ? कुठे कसे वंशसंकर झाले ? जेते कोण / जीत कोण ? नगररचनांच्या, भांड्यांच्या ,नर्तकींच्या अलंकारांच्या मागे कोणाकोणाच्या जाणिवा श्वसत होत्या ? त्यांचे विकासविनाश कसे झाले? काय शाबूत राहिले ?काय झिजून गेले? जुन्या लिपींचे, चिन्हांच्या चित्रखुणांचे काय झाले ? त्यांचे अर्थ किती कसे लावावेत? इथे आजच्याच कवितांचे अर्थ लावताना धापा लागताहेत.

.. असे प्रश्नोपनिषद, नेमाडे, इतक्या कलात्मकतेने तुम्ही पुनः समोर आणलेत.जुन्या वस्त्रांचे दिमाख मिरवावेत तशी तुमच्या महाकादंबरीची पानं डोळ्यांसमोर झगमगली.तितक्याच काळजीपूर्वक जुनेरांच्या चिरगुटांमधले कऴकट काळो़खही सांभाळून पोचवलेत तुम्ही. तुमच्यातला यशस्वी कादंबरीकार अन त्याच्याही मागे लपलेला एक कवी यांचे हे कारभार.बाकीचे नेपथ्य मानववंश,भारतीय उपखंडातले पुरातत्व अन तत्त्वज्ञान, जातीव्यवस्था अन शोषणाचे आकृतीबंध वगैरे भरपूर वादग्रस्त विधानांना पोसणारे.तुम्हालाही आवडच या सगळ्याची पूर्वापार.

सिंधूसंस्कृतीच्या अभ्यासाचा कॅनव्हास घेतल्याने आणखीन एक झाले नेमाडे, भारत आणि पाक म्हणून जे दोन भूभाग नकाशावर दिसतात, त्यांच्या सीमांच्या धारदार पात्यांची तुम्ही रेशीमपाती केलीत. तुम्ही प्रत्ययास आणलेल्या अद्भुताचा हा आणखी एक विलास. खर्‍या अन शिवाय कवीमनाच्या अभ्यासकाकडून कराची अन मुंबईतली साम्यस्थळं कळली. दिलवरच्या धाब्यावरची रंगीत गर्दी, उर्दू शेरोशायरी अन पंजाबी कव्वाल्यांची उधळमाधळ.यातच महानुभाव मठातल्या संन्यासिनी तिरोनी आत्याचा शोध घेण्याचा खंडेरावचा प्रयत्न.गाव सोडून वडिलधार्‍यांनी नवसात बोललेला संन्यास घेऊन ऐन तारुण्यात महानुभावांच्या मार्गाने काबूलपर्यंत निघालेली, फाळणीत हरवलेली तिरोनी आत्या. पण बिचारी कशाने? घरोघर संसार करणार्‍या का नाहीत बिचार्‍या ? खराच प्रश्न.

या सर्व तुमच्या कथानकातल्या खानदेशीय स्त्रिया. त्यांची नावेही मानववंशांचा मोठा दीर्घ प्रवास सांगणारी.तिरोनी हा त्रिवेणीचा अपभ्रंश, हरखू हा (खंडेरावच्या लभानी- खंडेरावाच्या मते खर्‍या हिन्दुस्तानी आर्यवंशाचे लोक- प्रेयसीचे नाव ) शरयूचा अपभ्रंश. मोहेन-जो-दारो कडून खानदेशात उतरत आली माणसे. शब्द अन त्यांची अर्थ यथाशक्ति सांभाळत. असो. असे सगळे गुंताडलेले संदर्भ एका विशाल भारतीय उपखंडाचा एकात्म जीव दाखवणारे. 'इंडियनपाकी' सौहार्द.

खंडेरावाला तरुण पुरातत्वसंशोधक दाखवल्यानेही एक झाले नेमाडे, उत्खनन अर्धेच टाकून त्याला मृत्युशय्येवरील वडिलांकडे मोरगावला पिटाळणे तुम्हाला सोपे गेले.
एकूणच सगळे सोपे गेले.
लाहोर ते खानदेशातलं मोरगांव.
पाकिस्तान ते भारत.
आठवणी ते वर्तमान.
प्रवासातली ग्लानी ते जागृती.
मानववंशांच्या कथा ते अद्यतन भ्रष्टाचारांच्या कथा.
गावगाड्यातल्या जातीजमातींच्या, बाराबलुत्यांच्या, हिंदू शैलीतील 'प्रेमाने केलेल्या 'शोषणाच्या कथा, ऐतिहासिक कथा. वना अरण्यांच्या, पशुवंशच्छेदनांच्या लोककथा.
केवढं जाळं विणलंत.स्थलकालाच्या पटावर फिरवलंत विराट जत्रेत पाळण्यात बसवावं तसं जिवाला. दमवलंत. पण विस्कळित नाही म्हणणार मी तरी त्याला. ही समृद्ध अडगळच तर मांडायची होती तुम्हाला.

तसा तुमचा पिंड कथेकर्‍याचाच नेमाडे, एरवी कथेला नावं ठेवता तुम्ही .म्हणून हे शैलीदार कवितात्म लिहून तुम्ही काळोखे कोनाडे तयार केलेत व्यामिश्र अर्थांचे,स्मरणगंधांचे. सोप्या कथांच्या भोवतालात.सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या स्त्री प्राक्तनाच्या कथा,एखाद्या बाईच्या सकवार हातानं , पाझरत्या मनानं लिहिलेल्या.

या कथा जशा खंडेरावाच्या आयुष्यात घडलेल्या,तशा त्याने आज्यापणज्यांकडून ऐकलेल्या. गरती स्त्रिया अन लभाणी ग्रामवधूंच्या.बाईने बाईचा केलेला छळ अन बाईने बाईला केलेली मदत. एक अपौरुषेय महाभारत सतत घडणारं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये.
तिरोनीआत्या,सिंधूमावशी,सधन,गरीब शेतकर्‍यांच्या घरातल्या स्त्रिया एकजात गरीबच पण. कामावलेल्या, लेकुरवाळ्या,काही कोवळ्या वयात बाळंतपणात अज्ञानाने दगावणार्‍या सुमनताईसारख्या. लग्नगाठ बांधून दिल्यावर नशिबाचा वाट्याला आलेला भोग निमूट सोसणार्‍या.अकालवैधव्य सोसणारी ,नणंदांनी सासूने पिडलेली सुंदर असहाय सोनावहिनी. अन्यायाविरुद्ध लढणारी नशिबाला प्रत्युत्तर करणारी एखादीच चिंधूआत्या. अन युरोपीय डॉ.मंडी- या सर्वजणींचा अभ्यास करणारी मुक्त विदुषी. लंडन विद्यापीठातील प्राचीन भारतीय पुरातत्वाची प्राध्यापिका.आत्मनिर्भर .. इथे पुनः त्या युरोपीय स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेची सांस्कृतिक,सामाजिक,खाजगीत जीवनातली तुम्ही दिलेली कारणं.खास तुमच्या संवादशैलीत उलगडत जाणारी.

मॅजिकल रिऍलिझम अगदीच नाही कसा म्हणावा या कथाकथनांत ? त्या अंगाने तसं अनेकदा लिहिलेय तुम्ही,एक-दोन ठिकाणी तरी प्रत्यक्षतेने आलाय तो. जसा खंडेराव-यक्ष संवादात.यक्षप्रश्न असा-'अनन्य मौल्यवान आहेर कोणता ?' यावर खंडेरावाचे उत्तर -' 'पिंजार्‍याच्या सकीनाने दिला होता तो.' ही अजून एक कथा . 'औरतां किदरबी एकच्चे' म्हणणार्‍या सकीनाची. (इथे हेही नोंदवलं पाहिजे की अशा मुस्लीम गरीब स्त्रियांचंही फार सहृदय चित्रण केलंय तुम्ही. कमरुन्निसासारख्या कमनशिबी. गरिबी, अज्ञान, बाईपण..मुस्लीम संदर्भातलं. असो. )

अशा या कृषिप्रधान संस्कृतीत, सधन शेतकरी महानुभावी बहुजनसमाजी जाणिवा पेलत वाढलेला खंडेराव, एकुलता एक सगळीकडून कुटुंबात. जिवलग मोठ्या भावाच्या अकालनिधनामुळे एकटा पडलेला मनाने. पण कर्तव्यग्रस्त नुसताच.प्रस्थापितांना, समाजातल्या शोषणकर्त्यांना नावं ठेवताना त्याने ब्राह्मणद्वेष्टी विधानं जागोजाग केली आहेतच, पण तो आपल्या सधन शेतकरी परंपरांनाही बरोबर ओळखून चितारतो.
'कृषिसंस्कृती आप्पलपोटी संस्कृती..'- कारण ती वनसंस्कृती, भटक्या संस्कृतीच्या पोटावर पाय ठेवून फोफावलेली आहे हे मत प्रत्यक्ष अनुभवलेल्या या व्यक्तिगत सलामधून आले असावे.

त्याच तीव्र प्रामाणिकतेने खंडेराव स्वतःच्या आतल्याही शोषणपरंपरांचं भान असलेला असा आहे . रेनी नावाच्या धनगर मुलीकडे अन हरखू या गावातील लभानी सुशिक्षित युवतीकडे आकर्षित होऊन अर्थातच प्रेमजीवनात असफल होणारा. बहुजनसमाजातल्याही जातीय उतरंडीला ओलांडून जाऊ न शकणारा. भाष्यापलिकडे, वाद घालण्यापलिकडे ठोस काहीही करू न शकलेला न-नायक.

शेवटच्या पर्वात पुनः जुनी विद्यापीठीय भंकस,भ्रष्टाचार,स्थानिक पत्रकारिता वगैरे जुने वळण घेतलेतच तुम्ही नेमाडे, पण तोपर्यंत क्षुधा पूर्ण शमली होती. दुधाची तहान शतशतकांच्या घट्ट बासुंदीवर भागवल्यावर पुनः हे पाणचट ताक समोर.

वडिलांच्या प्रेतयात्रेने संपते ही अनेकलेल्या एकाच्या जाणिवेची महाकादंबरी. शोभेश्या इतमामाने. वारकरी पंथाच्या निळूकाकांपासून ते महानुभावी पारायणांपर्यंत ते खाजासाहेबाच्या पीरापर्यंत सर्वांचा मान राखत ही महायात्रा थांबत थांबत, शोक पचवत रिचवत अखेरच्या मुक्कामाला जाते.

आता नवा कुटुंबप्रमुख खंडेराव.
नव्या प्रश्नांनी व्याप्त, व्याकूळ.
नव्या स्वप्नांच्या भोवर्‍यात गरगरत त्यांच्या मनोरम रचनांचे अर्थ जाणून घेऊ पहातोय.

हे असं स्वप्न-सुषुप्ती-जागृतीच्या सीमारेषेवर शेवटी आणून सोडलंत, बरं केलंत नेमाडे.
मोकळंमोकळं केलंत गुंत्यातून, गुंत्याची जाणीव देऊन. त्या समृद्ध अडगळीचा वारसा पसार्‍याने समोर ठेवून.

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई , मी 'हिंदू' वाचलेली नाही. त्यामुळे तिच्या समॄध्द -असमॄध्दतेविषयी सध्या तरी काही बोलू करू शकत नाही. पण एवढे मात्र खात्रीने सांगू शकतो की, या धाग्यावर झालेली चर्चा ही नक्कीच फार समॄध्द झाली आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या वाचकांना जाणिवांचे समॄध्द भांडार येथे गवसले आहे.

आणि आपल्या काव्यात्म , लालित्यपूर्ण भाषेला आणि एकूणच आपण घेतलेल्या सर्वांगीण आढाव्याला
मनापासून सलाम ...!!!:स्मित:

Pages