एक मी अवतार होतो कुंभकर्णाचा!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 November, 2012 - 00:37

गझल
एक मी अवतार होतो कुंभकर्णाचा!
अन् मला आजार झाला झोप नसण्याचा!!

रात्रभर झोपून सुद्धा झोप ना होते!
रात्रभर जागाच असतो शीण दिवसाचा!!

सारल्या बाजूस मोठ्या नोक-या आम्ही.....
शिक्षकी पेशाच हा आधार जगण्याचा!

निवडणूकीचा सुरू हंगाम झाला की,
आव त्यांचा थेट असतो कार्यकर्त्याचा!

संपले तारुण्य, वार्धक्यातही आलो....
सांगते आयुष्य आता अर्थ प्रेमाचा!

प्रश्न तिन्हिसांजेस खेळू लागती झिंमा!
रोज ताळेबंद लिहितो मीच दिवसाचा!!

मीच डोळेझाक केली...हा गुन्हा माझा!
फायदा झाला जगाला अंध असण्याचा!!

फूल होणे हा कधी अपराध होतो का?
रोज मी करतो गुन्हा हा फूल होण्याचा!

आपल्यासाठीच झिजतो चहुकडे जो तो....
चंदनाचे खोड जाणे अर्थ झिजण्याचा!

वाटते आहे जगाला मी नवा आहे.....
बांधला मीही मनाशी चंग रुळण्याचा!

ऐन तारुण्यास होता शाप मृत्यूचा!
मनगटाने मिळवला उ:शाप जगण्याचा!!

पुण्यवंताचे कितीही सोंग घ्या तुम्ही;
एक दिवशी तो घडा भरतोच पापाचा!

मोल माझे काय आहे? काय मी सांगू?
सांगता येणार नाही भाव सोन्याचा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सदोष व्यक्तिगत अभिरुची मुळे असेल कदाचित ;अनेक खयाल सपक चवीचे अळणी वाटले क्षमस्व
रात्रभर जागाच असतो शीण दिवसाचा!!>>>>>>हा एकच खयाल आवडला

मनगट>>>> बागेश्री +१ ;पण वरची ओळ प्रस्तावना म्हणून चपखल/पर्फेक्ट मॅच वाटत नाही
तारुण्य व मनगट ही जोडी परस्पर पूरक आहे शाप अन उ:शाप परस्पर विरोधी !!
दैव /नशीब अन मनगट असे काहीसे हवे

अजून एक बदल सुचतो आहे जास्तच चपखल वाटतो आहे

ऐन तारुण्यात भाळी शाप मरण्याचा
मनगटाने मिळवला उ:शाप जगण्याचा

(अरेच्या हा तर एक स्वतन्त्र मतला /मतला ए सानी झाला)

न आवडल्यास क्षमस्व !!
दुसर्‍याच्या 'बनाबनया' शेरास स्वतः च्या आवडीचा पर्याय देणे खूप सोपे काम असते पण मुळात तो ओरीजनल शेर ज्यास सुचलेला असतो तेव्हाच्या त्याच्या मनाच्या प्रसवकळा कितीही प्रयत्न केला तरी सामाननुभूतीच्या पातळीवर उपभोगता येत नाहीत हे तितकेच खरे !!!

पुनश्च क्षमस्व !!

पर्यायी शेराबाबत काही बोलला नाहीत सर!!

आवडला नाही बहुधा !
आमची चिन्तनशैली सदोष असल्याचे आणि आपली अत्यन्त निर्दोष असल्याचे आपण अपल्या अनेक पर्यायी शेरातुन वारम्वार व आवर्जून दाखवून दिले आहेत आजवर तरीही गुस्ताखी केली ..माफी असावी
__________________

मूळ धागा मालकास जास्त वाईट वाटू नये व भेटीस येणार्‍या वाचकानी फुकटची मजा घेवू नये म्हणून वरील प्रतिसादान्मध्ये मुद्दाम स्माईलीज टाकलेल्या नाहीत याची कृपया नोन्द घ्यावी

वैभव
नशिबाने कितीही कातिल खेळी केल्या तरिही स्वबळावर मृत्यू थोपवून उशा: प मिळवलाच.. अशा मूळ शेराचा अर्थ लावून घेऊन मला मज आली.. असे म्हणते Happy

बागेश्री तसा अर्थ उघडच आहे या शेराचा मलाही लागला तो !
मी शेरावर अधिक सन्सकरण करता येते का ते आजमावत होतो ...याकामी मला माझ्या पर्यायीगझल-गुरुजीन्कडूनच प्रेरेणा मिळते माझे स्वतःचे असे त्यात काही नसते

माझ्या भूमीकेबद्दल तुझ्या मनात गैरसमज नसावा यासाठी सान्गतो आहे इतकेच
असो
आपण दोघे या शेरावर आता अधिक बोलुया नकोत असे मला म्हणायचे आहे

टीपः माझे पर्यायीगझल-गुरु म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात आपले देवसरच बरका बागेश्री !!!
अर्थात अजूनही मला एखद-दुसराच शेर पर्यायी करता येतो फुल्ल गझलच पर्यायी करता यावी इतकी कृपा त्यान्नी मजवर अजून केलीली नाही Sad
भस्मासुरासारखा मी शन्कराच्याच डोक्यावर हात ठेवेन अशी भीती त्याना वाटत असावी Wink

तारुण्यातच आम्हास मृत्यूला सामोरे जायचा जणू शाप मिळाला होता!
पण, मनगटाच्या जोरावर, म्हणजेच आमच्या कर्तुत्वाच्या जोरावर जणू आम्हास जगण्याचा उ:शाप मिळाला!
जणू आमच्या मनगटाने जगण्याचा उ:शाप मिळवला!
आता यात परस्पर पूरक वा विरुद्ध हा प्रश्न कुठे येतो?

टीप: आमचे प्रत्यय आपणांस सपक/आळणी भासल्याबद्दल क्षमस्व!
वैभवा आम्ही आमचे शेर/गझल गायब केले नाहीत वा करणारही नाही, कारण तो आमचा स्वभाव नाही, भले पूर्ण गझलेस कुणी पर्याय देवो!
उलट पूर्ण गझलेस कुणी पर्याय देत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू व शेर काळजास हात घालणारे असतील तर लवून वंदनही करू व मुशाय-यात या गझलेसोबत ते पर्यायी शेर शायराच्या नावासकट सन्मानपूर्वक पेशही करू!

पर्यायी शेरांमधून आम्ही आमचा सौंदर्यबोध वृद्धींगत करण्याचा प्रयास करू.....जर त्यांची उंची तेवढी वाटली तर! मग पर्याय कोण देत आहे हे आमच्या दृष्टीने गौण असेल, शेर महत्वाचा असेल!
प्रा.सतीश देवपूरकर

इतके बोलण्यापेक्षा आत्ता वर दिलेया पर्यायी शेराचा सौन्दर्यबोध उलगडून दाखवू शकलात तर अवश्य दाखवावा ही विनन्ती

वैभवा! तुझा पर्यायी शेर आवडला, पण आमचा मूळ शेर बदलावा इतका खचीतच नाही! क्षमस्व!
काही हरकत नाही! प्रयत्न जारी ठेव!
संपूर्ण गझलेस पर्याय द्यायचा प्रयत्न करावा!
चांगला वाटला तर ही गझल तुझी! (थट्टेने म्हणतोय रे बाबा!)
पर्यायी पूर्ण गझल लिही हे मात्र थट्टेने म्हणत नाही, होशोहवासमधे बोलत आहे!
तेवढा खेळकरपणा आमच्यात आहे अजून!

अरे माणसाचे मन म्हणजे एक अथांग सागर असतो, ज्यात विचारांची अगणित रत्ने असतात.
आवश्यक असते ती सखोल व प्रामाणिक परिश्रमाची व सबूरीची! चिंतनरूपी मंथनाची!
अरे एखाद दुस-या शेराचे/गझलेचे काय घेवून बसलास?
आम्हास तर प्रत्येक शेरावर, ज्याच्यात मुळात काही दम आहे, मग तो कुणाचाही का असेना, तादात्म्य पावायला, चिंतन करायला खूप आवडते! कोणतीही गझल/कुणाचीही गझल आम्ही वरवर वाचत नाही किंवा तिला उथळ लेबल आम्ही तात्काळ लावत नाही! ब-याच चिंतनानंतर आम्ही मनाशी ठरवतो काय हवे होते व काय लिहिले आहे ते!

कुठलीही गझल, कुणाचीही गझल वाचताना मूळ शायराच्या हृदयात स्फुरलेल्या काव्याचा आम्ही आमच्यापरीने वेध घेण्याचा प्रयत्न करतो. साधते असेच नाही. केवळ अभिव्यक्तीतील त्रुटींमुळे मूळचे काव्य झाकोळले जात असेल तर, वेगळ्या अभिव्यक्तीत तोच शेर लिहिण्याचा प्रयत्न करतो.
आता तू म्हणशील एवढा उपद्व्याप कशाला करायचा माणसाने?
तर त्याला उत्तर असे आहे वैभावा! हा आमचा चिंतनाचा, लिखाणाचा रियाज असतो. ती एक आमची गझलेची आराधना असते!

प्रत्येकास पर्यायी शेर हल्ली आम्ही देत बसत नाही, कारण ब-याच जणांचा गैरसमज होतो. कुणी दुखावला जावू शकतो. पण या सर्व प्रक्रियेत आम्हाला एक बौद्धिक व प्रतिभात्मक व्यायाम मिळतो! असो!
कधी घरी आलास तर आम्ही कसा आभ्यास वा रियाज करतो ते तुला आमच्या डाय-यांवरून पहायला मिळेल! अर्थात तुझी इच्छा असेल तर!

माफ कर! पण आमच्या रक्तातच व हाडातच एक शिक्षक असल्याने असे कधी तरी बरळतो आम्ही!
कुठे कुठे शेरलिखाणची आमची संपूर्ण चिंतनप्रक्रिया जशी घडली तशी आम्ही देतो ते काही आगावपणामुळे नसून आमच्या चिंतनपद्धतीत जर काही बेसिक चुका असतील तर त्या कुणी निदर्शनास आणून द्याव्यात म्हणून!
इतरांना याचा उपयोग होतो की नाही, माहीत नाही, पण आम्हास त्याचा(आमच्या चिंतनप्रवासाचा.....आमच्याच शेरावरचा) खूप उपयोग होतो, हे तुला अत्यंत नम्रपणे व हृदयाच्या गाभ्यातून सांगत आहोत!
फारच बोअर बहुतेक आम्ही करत आहोत! तेव्हा थांबतो!
............प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा,
ऐन तारुण्यास होता शाप मृत्यूचा!
मनगटाने मिळवला उ:शाप जगण्याचा!!
.....प्रा.सतीश देवपूरकर

ऐन तारुण्यात भाळी शाप मरण्याचा
मनगटाने मिळवला उ:शाप जगण्याचा <
<<<<वैभव वसंत कुलकर्णी(वैभवा)

दोन्ही शेरांचा मथितार्थ एकच!

फरक फक्त हा की, आम्ही होता शब्द वापरला व तू भाळी असा शब्द वापरलास!
आम्ही मृत्यूचा म्हटले, व तू मरणाचा म्हटलेस......फरक काहीच पडत नाही, उलट हा एक अजून मतला तयार होतो जे आम्हास नको होते!
आमच्या शेरात भाळी शब्द आम्ही का वापरला नाही तर तो आम्हास अव्यक्त ठेवणे प्रशस्त वाटले!
शाप वा उशा:प म्हटले की, नशीब, भाळ, कपाळ, विधिलिखित वगैरे शब्द अगदीच एव्हिडन्ट आहेत, ज्यांना
अव्यक्त ठेवणे आम्हास ठीक वाटले. हा प्रत्येकाच्या शैलीचा/रुचीचा प्रश्न आहे.

बर भाळी असे लिहिले तरी काही बिघडणार नाही. मृत्यूला ऐवजी मरणाचा असे लिहिले तरी काही बिघडत नाही. पण इतके करून मूळ शेरात काही सौंदर्यात्मक वृद्धी होते काय? उत्तर आहे अजिबात नाही!
उलट ऐन तारुण्यास मृत्यूचा शाप (मिळाला/दिला गेला ) होता या म्हणण्यात तारुण्य या प्रतिमेचे परसोनिफिकेशन झाले आहे ज्याने मिस-याची सौंदर्यात्मक पातळी उंचावयाला निश्चितच मदत होते.
आम्हास जेवढे जमले तेवढे सौंदर्यशास्त्रीय विवेचन केले. पहा पटते का ते ............
.........प्रा.सतीश देवपूरकर

केवळ अभिव्यक्तीतील त्रुटींमुळे मूळचे काव्य झाकोळले जात असेल तर, वेगळ्या अभिव्यक्तीत तोच शेर लिहिण्याचा प्रयत्न करतो.>>>>>> असे नसते सर!!

तुमच्या मताप्रमाणे पहयचे झाल्यास तुम्ही दिलेल्या प्रत्येक पर्यायी शेराच्या मूळ शेरात अभिव्यक्ती /चिन्तन कमीच पडलेले/चुकीचेच असते ऑर..... नसतेच असे तुम्हाला म्हणायचेय का ?
अन् म्हणायचे असेलच तर मला एक सान्गा तुम्ही सार्वत्रिकपणे असे म्हणूच कसे शकता ?
या ऐवजी 'असे मला व्यक्तिशः वाटले तर...मी असे करतो अशी भूमिका तुम्ही घ्यायला हवी (अन्तःकरणात !!...फक्त प्रतिसादात असे लिहावे लागते म्हणून नव्हे )

आता परवाचाच माझा मक्ता .....

राहतोय मी गेली अठ्ठाविस वर्षे
पण रोज वाटते माझे नाही "हे" घर

इथे हे या शब्दाला दुहेरी अवतरण आहे . याचा शब्दाचा अर्थ नक्कीच साधे आपले नेहमीचे 'घर' पेक्षा जरातरी निराळा असू शकतो या बाबत तुम्ही विचार तरी केला होतात का पर्यायी देताना ?

मी =आत्मा ........."हे" घर=शरीर !! आता पहा ......मी गेली अठ्ठाविस वर्षे (माझे आत्ताचे खरेखुरे वय) या शरीरात राहतोय पण हे घर माझे नाही याची जाणीव रोज मला होते .....

हा विचार चिन्तनात कुठे कमी पडला ?
हा शेर अभिव्यक्तीत कुठे कमी पडला ?
हे घर चा सामान्य अर्थही काढता येतो ....जसा तुम्ही काढलातच ...मग हा व्यामिश्रतेत कुठे कमी पडला ?
हा अच्छा शेर वाटत नाही का ?
हा सच्चा आहे की नै? गेलाबाजर निदान हा माझा अपना शेर आहे कि नै? तुम्हाला काय वाटते आहे ?

आता तुमचा हा पर्यायी ...........

दारावर माझ्या नावाची पाटी, पण;
दररोज वाटते माझे नाही 'हे' घर!

कुठून कुठे आणलात तुम्ही माझा शेर !!
(त्यातही मूळ शेरात अवतरण आहे म्हणून अन्धानुकरणाच्या रीतीरिवाज असल्या प्रमाणे पर्यायीतही तसेच राखले आहे हे उघड उघड दिसते आहे )

मला यापेक्षा वेगळ्या धाटणीचा ( माझ्यामते ;अभिव्यक्तीला एक पर्यायी शब्द)...... पर्यायी शेर (तुमच्या पर्यायीला पर्यायी!... माझ्या मूळ शेरास नव्हे. ) सुचला आहे याच्या चिन्तन /अभिव्यक्ती इत्यादीबद्दल काहीतरी सान्गा ..............

ही दारे,खिडक्या ,भिन्ती ,छ्प्पर माझे
पण तरी वाटते माझे नाही हे घर

बोला काहीतरी .............

अवान्तर :माझ्या मते पर्यायी शेर माझ्यासारखा कोणीही ऐरागैरा करू शकतो तुमच्यासारख्या खर्‍या शायराने ओरीजनल शेरच केले पाहिजेत फक्त!!!

वैभवा!
राहतोय मी गेली अठ्ठाविस वर्षे
पण रोज वाटते माझे नाही "हे" घर <<<<<<

पहिली ओळ मला फारच सपाट वाटली.
अमुक वर्षे राहतोय असे म्हटल्याने घर हे स्थान मनात येते......बरोबर!
तरीही रोज मला वाटते "हे" घर माझे नाही या उला मिस-या नंतर आम्हाला तरी प्रश्न पडला की, किती वर्षे रहात आहे यावर घर माझे वाटणे अवलंबून आहे काय?
याचे उत्तर आम्ही म्हणतो........अजिबात नाही.
का ते सांगतो.........
एखादा भाडयाच्या घरात कितीही वर्षे राहिला तरी ते शेवटी भाड्याचे ते भाड्याचेच घर!
स्वत:चे घर ही वेगळीच गोष्ट असते!
नुसते हे ला अवतरणचिन्ह व २८वर्षे राहतोय असे म्हणण्याने तू म्हणतोस तसा अध्यात्मिक अर्थ अजिबात अभिव्यक्त होत नाही!
भाड्याच्या घरावरही(भाड्याने दिलेल्या घरावरही) मालकाचेच नाव असते! भाडेकरू आपले नाव भाड्याच्या घरावर लिहू शकत नाही.

उलट आमचा शेर असा आहे.......
दारावर माझ्या नावाची पाटी, पण;
दररोज वाटते माझे नाही 'हे' घर!

या शेरात आम्ही म्हटले आहे की, दारावर माझ्या नावाची पाटी असली तरी, दररोज वाटते की हे घर माझे नाही!
या शेरात किती तरी अर्थ दडलेले दिसतात.
घर ही प्रतिमा ऐहिक वस्तूंचे प्रतिनिधित्व करते!
घर जरी मालकीचे असले तरी, वरचा बुलावा आला की, ते टाकून जावे लागणारच एकदिवशी!
याच जाणीवेतून आम्ही म्हणतो की, जरी मी या घराचे मालक असलो तरी, ते घर माझे नाहीच! (त्या परमेश्वराचेच आहे.)
मी घराचा मालक आहे हे दारावर माझ्या नावाची पाटी होती या शब्दसमूहावरून सूचीत केले आहे.
देहत्याग करताना मला ते सोडून जायचे आहे.
ही विचारांची पोच तुझ्या शेरात वैभवा दिसत नाही, जरी तुझ्या मनात तसा अर्थ असला तरी!
२८ वर्षे तू रहातोय म्हणजे तुझे वय २८ आहे व तू २८ वर्षे तुझ्या देहरूपी घरात रहात आहेस हा अर्थ अजिबात पोचत नाही! नुसते हे ला अवतरणचिन्ह केल्याने हे साधत नाही.

फार फार तर तुझ्या मनातील अर्थ असा अभिव्यक्त होवू शकतो....
या देहाचे घर अठ्ठाविस वर्षांचे......
मज, तरी वाटते माझे नाही हे घर!

इथे अवतरणचिन्हांचीही आवश्यकता नाही!
विचार कर वैभवा!

ही दारे,खिडक्या ,भिन्ती ,छ्प्पर माझे
पण तरी वाटते माझे नाही हे घर <<<<<<
फारच होतकरू व बालिश शेर वाटला!
दारे खिडक्या, भिंती, छप्पर अशी नुसती घर नामक वस्तूच्या अवयवांच्या नावांची निरर्थक यादी देवून उला मिसरा निव्वळ वाया गेला आहे! सरळ मी या घराचा मालक आहे असे म्हणण्याचे टाळून ही नामावळ काय विशेष साधते?
घर माझे आहे तरी ते मला माझे वाटत नाही इतकाच काय तो शेराचा अर्थ निघतो. कुठलाही अध्यात्मिक अर्थ अभिव्यक्त होत नाही!

टीप: दारावरची पाटी ही प्रतिमा घराची मालकीच सुचवते!
नुसत्या घराच्या मालकीमुळे घर आपले वाटत नसते! घरातील माणसांमुळे ते आपलेसे वाटते/होते!
देहाला/देहरूपी घराला सुद्धा हा शेर लागू होतो!
कसे ते सांगतो.....
वैभवाचा चेहरा ही वैभव मालक असलेल्या देहरूपी घराची जणू पाटीच आहे जी मालकी सूचीत करते.........होय की, नाही?
या वैभवाच्या देहरूपी शरिरात वैभव नामक मालक जरी २८ वर्षे रहात असला तरी, वैभवाला वाटत आहे की, वैभव या देहरूपी घराचा मालक नाहीच, कारण वैभव जाणतो, की वैभव नामक प्राण्यास देवाने बोलावणे पाठविले की, देहरूपी मालकीचे घर सोडावेच लागणार!
वैभवा! पहा विचार करून!

............प्रा.सतीश देवपूरकर

भाड्याच्या घरावरही(भाड्याने दिलेल्या घरावरही) मालकाचेच नाव असते! भाडेकरू आपले नाव भाड्याच्या घरावर लिहू शकत नाही.

आता पहा ह्या सुतावरून कुठवर जाता येते आहे

मी आत्मा आहे मी वैभव नावाच्या देहरूपी घरात [इथेच तुमची नावाची पाटी अर्थ लावण्यापुरती वापरली आहे..तिचा उपयोग इथेच सम्पतो] .......तर या देहात २८ वर्षे झाली मी राहतोय मला रोज वाट्ते हे घर माझे नाही माझ्या मालकीचे नाही भाड्याचे आहे हे घर !! म्हणजे मला सत्याची जाणीव रोज होते

आता या अर्थाचा शेर करून पाहू ..............

मी आत्मा आहे "वैभव" या देहाचा
माझे नाही भाडयाचे आहे हे घर

२८ वर्षे टाळून नावाची पाटी वापरली आहे .......आतातरी बरोबर आहे का पर्यायी-गुरुदेव(......पर्यायीगुरुदेव ;))!!

अवान्तरः"भाड्या" चे !!.....यात शिवीही येते आता ही कुणाला आहे ते तुम्हीच ठरवा वैवकु ला की त्याच्या
विठ्ठलाला Lol

ही गझल 'फसली' आहे.

बाकी झिम्मा असे लिहितात, 'झिंमा' नव्हे!

'झिंमा' लिहिणे म्हणजे भाऊ महाराजांच्या बोळातील बारी वाड्यात ख्रिश्चन मुलीचा जन्म झाल्यासारखा वाटतो.

-'बेफिकीर'!

शब्दकोषात झिंमा लिहिलेले आढळले जो लहान मुलींचा खेळ आहे असे म्हटले आहे.
झिम्मा व झिंमा दोन्ही रूपे बरोबर असावीत! नक्की माहीत नाही! थोरांना विचारून खातरजमा करतो व आपणांस कळवतो!
टीप: भूषणराव संपूर्ण गझल फसली आहे, की, काही वा बहुतेक शेर फसले आहेत?
फसले म्हणजे नेमके कुठे चुकले आहे?
खयालांत चुका आहेत का?
अभिव्यक्ती खुजी आहे का?
कोणती प्रतिमा सदोष आहे काय?
आमची निष्ठा लेखनातील थिटी वाटत आहे काय?
की एकंदर शेरांतील आशयच उथळ वाटत आहे?
कृपया उलगडून सांगितलेत तर आम्हास या गझलेवर फिरून चिंतन करता येईल!
भूषणराव असाच लोभ असू द्या!