दुसर्‍या वर्गातील लोकलचा प्रवास सुखाने कसा कराल ?

Submitted by मिरिंडा on 21 November, 2012 - 12:33

आपल्यापैकी बहुतेक जण मुंबईतील लोकल प्रवासाचा केव्हा ना केव्हा अनुभव घेतातच. जे हा अनुभव नियमित घेत नाहीत त्यांच्या साठी हा लेख म्हणजे मनोरंजन किंवा नियमित प्रवासासाठीचे प्रशिक्षण ठरू शकेल असे वाटते. लेखकाच्या किमान पस्तिस ते चाळीस वर्षाच्या अनुभवाचे हे सार आहे. कदाचित हा लेख वाचल्यावर आपल्याला यात काही विशेष असे वाटणार नाही , परंतु रोजच्या रोज जाऊन आपल्या संवेदना बोथट झाल्या असण्याची शक्यता आहे, त्यांना जरा झळाळी आणण्याचे काम झाले तरी पुष्कळ साध्य झाले असे मला वाटेल. थोडक्यात नियमित प्रवाशांसाठी हा एक प्रकारचा " रिफ्रेशर्स कोर्स " ठरेल. असो इतकी प्रस्तावना पुरे असावी. आपण एखाद्या टर्मिनसला (मराठी शब्द नक्की माहित नाही ) गाडी पकडत असाल तर ह्या लेखात लिहिलेल्या आसन पद्धतींचा अनुभव आपण घेऊ शकता. तसेच हा विषय नसंपणारा असल्याने काही नवीन पद्धतीही आपण प्रचारात आणू शकता. समजा तुम्ही ठाण्यासारख्या अथवा बोरिवली किंवा कल्याण सारख्या स्थानकावरून मुंबईकडे जाणारी धीमी गाडी पकडत असाल आणि तुम्हाला बसायला जागा मिळाली असेल तर तुमची बसण्याची पद्धत काय असावी ते पाहा. खालील प्रकार आपण योग्य रितीने वापरू शकता. :- खिडकीजवळिल जागा मिळाली असल्यास कसे बसाल जेणे करून ठाणे मुंबई प्रवास आपणास सुखाचा होईल. ह्याच पद्धती मध्ये जागा मिळाली असल्यासही आपण वापरू शकता. तसेच ह्या पद्धतींचे दिग्दर्शन आठ माणसे बसण्याचा बाकडा (म्हणजे बेंच) असल्यास जास्त चांगल्या रितीने होते.असा अनुभव आहे. तीन माणसे बसण्याच्या बाकड्यावर जास्त अनुभव येत नाही अस वाटतं. असो. आता पद्दती पाहा.

१)पायांचा इंग्रजी "व्ही " अक्षरासारखा आकार करून बसणे. :

या पद्धतीत लाज न बाळगता पाय फाकवून पायात "व्ही "अक्षरासारखा आकार करून बसावे. आपण बारिक असलात तरीही मख्ख चेहेरा करून बसावे. कोणी ही कितीही विनवण्या केल्या तरी स्थितप्र्ज्ञासारखा चेहेरा करून बसणे आवश्यक आहे. भावनेच्या आहारी जाऊ नका आणि सरकू नका. गाडी सुटण्या आधी गर्दी वाढत गेली तरीही याप्रमाणेच बसावे. आपण जाडजूड बंधू असाल तर प्रश्नच मिटेल. कोणी ही तुम्हाला सरकायला सांगणार नाही . जरी सांगितलं तरी खाऊ की गिळू अशा नजरेने बघावे . आपण बारीक असाल आणि आपल्याजवळ ब्रिफकेस असेल किंवा एखादी खांध्यावर लावण्याची धोपटी (हल्ली कॉलेज मध्ये वगैरे नेण्याची पद्धत आहे) असेल तरी ती सामान ठेवण्याच्या जागी न ठेवता मांडीवर आडवी ठेवा. म्हणजे बरेचसे प्रश्न संपतात. आपण व्यापलेल्या जागेचा कोणालाही अंदाज येत नाही व सरकावे लागत नाही. असे बस्ल्याने फारच उत्तेजक परिश्थिती निर्माण झाल्यास , म्हणजे भांडण वगैरे, तर बाजूची हात ठेवण्याची जागा दाखवावी व सरकण्यास आपण असमर्थ असल्याचे दाखवावे. आपण बारिक असल्यास ही कसरत थोडी महागात पडते. अशा वेळी नुसतेच सरकल्यासारखे करावे. जर भांडण वाढलं तर मराठीत न बोलता (समोरचा मराठी भाषीक असला तरी) हिंदीतच बोलावे. म्हणजे प्रभाव पडतो. दुसऱ्या वर्गात चुकूनही इंग्रजी वापरू नये. त्या ऐवजी शिवराळ शब्दांचा वापर कुशलतेने करावा. या पद्धतीत थोडे अनैसर्गिक स्थितीत बसावे लागते. घरी गेल्यावर पावलाचे सांधे व पाठ दुखणे वगैरे चिल्लर दुखण्यांना सामोरे जावे लागते. पण क्षणिक सुखापुढे या दुःखाला काहीच अर्थ नाही.

२) पायांचा इंग्रजी "ए" अक्षरासारख आकार करून बसणे.

ही पद्धत वाजवी पेक्षा जास्त उंच माणसांसाठी चांगली आहे. दोन्ही गुडघे व मांड्या एकमेकांना चिकटून ठेवल्यास व खालील पाय ए अक्षरासारखे ठेवल्यास ही आसनस्थिती घेण सोपे जाते. याने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. याचा फायदा म्हणजे गर्दी असल्यास कोणीही तुम्हाला सरकायला सांगत नाही. कारण वरवर पाहता तरी सरकायला मोकळी जागा दिसत नाही. तसेच अगदी शेजारी बसणाऱ्या माणसाची फार उत्तम रितिने अडचण करू शकता. त्याला सीट वर जागा दिसत असुनही (जी इतरांना सहज दिसत नाही) तो ती व्यापू शकत नाही. परिणामी त्याला अवघडल्या स्थिती त बसावे लागते व कृत्रिम गर्दीही निर्माण करता येते.शेजारी बसणारा मराठी आहे असे वाटल्यास (खात्री करायला जाऊ नका) सर्व अटी तंतोतंत पाळा. कारण आपल्याच माणसाला त्रास देणे हा आपला बाणा आहे. बाचाबाची झालीच तर कोणतीही उत्तरे कृपा करून इंग्रजी अथवा मराठीत देऊ नका, त्याने तुम्हाला कमीपणा येईल. शिवराळ भाषा प्रकरण हात घाई वर आल्यासच अधून मधून पेरा. तसेच आजुबाजूच्या गर्दीतील मराठी माणसांकडे पाहू नका . तुम्हाला पाठिंबा मिळणार नाही याची खात्री बाळगा. याने एक फायदा होतो , तो म्हणजे आपली लढाई आपण कशी लढावी ते प्रशिक्षण आपणास मिळेल. त्यातून गर्दीत एखादा ओळखीचा मराठी असेल तरी तो हळूच हसेल पण पाठिंबा देणार नाही. त्यातून तुम्ही त्याच्या जातीचे अथवा पोटजातीचे अथवा गाववाले असाल तर थोडी फार आशा आहे.(असं लिहायला वाईट वाटत आहे.) बाकी घरी गेल्यावर पाय दुखणे , कंबर दुखणे हे चिल्लर आहे.

३)पायांचा इंग्रजी "डब्ल्यू " करून बसणे.

ही आसन स्थिती अनैसर्गिक असली तरी बरी आहे. मात्र यात पायांवर मोठी बॅग अथवा ब्रिफकेस असणे आवशयक आहे. येथेही एक काळजी घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, आपल्याला बॅग सामान ठेवण्याच्या जागेवर ठेवायला सांगतील , जी आधीच भरगच्च भरलेली असते. ती तेथे ठेवण्याचे तर राहू द्याच , पण नुसते डोळे मोठे करून सांगणाऱ्या कडे पाहा व स्वस्थ बसा. त्यातून वाद झालाच तर हिंदी भाषेतच (मुंबईचे हिंदी) खरपूस समाचार घ्या, व आपली बॅग वर ठेवल्याने कशी हरवली हे सांगा. तसेच आपल्या बॅगेत सरकारी महत्त्वाचे कागद असल्याचे सांगा . जरी तुमच्या बॅगेत वर्तमान पत्र व लंच बॉक्स असला तरी, हेच स्पष्टिकरण योग्य ठरते. आजूबाजूला पाठिंब्यासाठी पाहू नका (कारण आसन पद्धत दोन मध्ये आहे). आपले बोलणे चालूच ठेवा. बोलणाऱ्याला आपण कोठून बोललो अशी लाज वाटली पाहिजे. शिवराळ भाषा वापरू नका. प्रकरण हातघाईवर येईल, जागा जाईल व सुखाच्या प्रवासाला मुकाल.

४)ही आसन स्थिती मधल्या सीटवर बसण्यासाठी उत्तम आहे.पायांमध्ये इंग्रजी "आय" अथवा "टी " (काही लोक त्याला टी का म्हणतात माहित नाही. ) करून बसणे

जर आपल्याला एव्हढीच जागा मिळत असेल की दोन पायात फारच थोडे अंतर ठेवता येत असेल किंवा ते चिकटवून ठेवावे लागत असतील तर पाय व मांड्या एकमेकांना चिकटवून बसावे. परंतु आपण दोन्ही पावले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला विशिष्ट कोनात (४५ अंशाचा कोन करून , अंदाजे) ठेवावीत म्हणजे शेजारच्या माणसाला त्याच्या पावलावर दाब जाणवेल व तो जरासुद्धा पाय हालवू शकणार नाही. अशी स्थिती आपण उतरेपर्यंत सोडू नये. यासाठी मुंबई पर्यंत जाण्याची गरज नाही. साधारण माटुंग्या पर्यंत ही मजा चाखता येते. पश्चिम व हार्बर साठी योग्य स्थानके ठरवावीत. ही स्थिती शेवटपर्यंत न सोडल्यास आपल्याला दुसऱ्याचे दुःख ते आपले सूख आहे हे जाणवते. अशा रितिने आपले सूख काल्पनीक असले तरी चालेल. यात काल्पनीक सूख म्हणजे, " कसा साल्याला पायपण हालवता येत नाही " असे वाटणे. यात दोन्ही पावलात कोन जमत नसल्यास एकच पाऊल विशिष्ट कोनात ठेवावे. अर्थातच हेतू वरीलप्रमाणेच आहे. येथे बसताना दुसऱ्याला नीट बसून न देणे हा हेतू साद्ध्य झाला पाहिजे. भांडणा करिता नियम व अटी पूर्वी लिहिल्याप्रमाणे आहेत. यात आणखीन एक उपस्थिती घेता येते. ही स्थिती अवघड असली तरी बरीचशी कृतिशील आहे. गर्दीत आपल्या ओळखीचा दुसरा माणूस असल्यास त्याला मांडीवर बसण्यास सांगावे. त्याला वर्तमान पत्र असल्यास पसरून वाचण्यास सांगावे. नसल्यास हरकत नाही. थोडे फार अश्लील हासणे व बोलणे मात्र जरुर आहे. आपल्या कंपार्टमेंटमध्ये स्त्री अथवा एखादी मुलगी असल्यास जास्त चांगले. कोणीही हरकत घेतल्यास पूर्ण दुर्लक्ष करावे. अचकट विचकट बडबड करीत राहावे. तसेच जमल्यास चावट गाणी म्हणावीत अथवा मोबाईल वर वाजवावीत अथवा मांसाहारी विनोद करावेत. म्हणजे इतर वयोवृद्ध माणसेही डोळे मारीत हासतील.
५)खिडकी जवळ जागा मिळाल्यास थोडे तिरके बसावेः-

ही पद्धत खिडकी जवळ जागा मिळाली असल्यासच वापरावी. या स्थितीत तुम्हाला आपले गुडघे जुळवून अथवा थोडे अंतर ठेऊन हात ठेवण्याच्या टोकाला चिकटवून बसावे लागते. ज्यामुळे एक प्रकारची लहानशी त्रिकोणी जागा आपल्या डाव्या अथवा उजव्या बाजूला (लांब बाकडा असेल तर आपल्या डाव्या बाजूला) शिल्लक राहाते. ती जागा तुम्हीही वापरीत नाही व दुसऱ्यासही वापरू देत नाही. अशी राखीव जागा दुसऱ्याला दिसतही नाही. तिथे बॅग अथवा कोणतेही इतर सामात ठेऊ नये. कारण ते काढायला सांगतील आणि तुम्हाला सरकावे लागेल. हा त्रिकोण एवढाच शिल्लक राहतो जो तुम्हालाच दिसतो. यातील सूख म्हणजे तुमच्या शेजाऱ्याला नीट बसायला न मिळणे. त्याला थोडे तिरके बसावे लागते. व पर्यायाने सर्वांनाच थोडे तिरके बसावे लागते. यात शेजारी बसलेल्या माणसाच्या पाठी ला बाक येऊन ती दुखू लागते व तो अवघडल्यासारखा बसतो. घाबरू नका तुम्हाला शेजारचा माणुस सरकायला सांगणार नाही. तो फक्त तुमच्या तिरके बसण्याकडे त्रासिक चेहऱ्याने पाहील, पण बोलणार नाही. अतिगर्दीच्या वेळी हे तंत्र फारच सुखावह ठरते. गर्दी नसताना यात फारसे सूख नाही. जर कोणाच्या लक्षात आले तर अत्यंत शिवराळ भाषेत त्याला प्रत्युत्तर देण्यास हरकत नाही.

६)सीटखाली बॉक्स असताना बसण्याची पद्द्धत : -

सीट खाली बॉक्स असेल आणि आपण खूप उंच अथवा जाडजूड असाल तर आपले पाय एकमेकांना मांड्यांपासून चिकटवून बसावे व पायात बऱ्यापैकी कोन ठेऊन समोरील सीटवर बसलेल्या माणसाला कमित कमी जागा पाय ठेवण्यास द्यावी. त्या अति लहान जागेत आपले काही प्रवासी बंधू उभे राहतात. त्यांची ही थोडी का होईना पंचाईत करू शकता. एकाच वेळेस दोघांची अडचण करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यामुळे दोन्ही प्रवासी वैतागतात.( रेल्वेला सीटखाली अशी बॉक्स बसवण्याची फार वाईट खोड आहे. कधी त्यातील कंप्रेसर विमानाच्या पंख्यासारखा आवाज करतो. अशा रितिने रेल्वे प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव अगदी फुकट देते) तुमच्या पायाजवळील जागेत कोणीही उभे राहू शकत नाही. अतिगर्दीच्या वेळेस हे सूख मिळू शकते. तुम्हाला पाय मागे घेण्यास कोणीही सांगत नाही . कारण एकतर तुम्ही उंच व जाडजूड असता व बाकड्यामधील जागा तुमच्या लांब पावलांमुळे व्यापलेली असते. कोणीही जास्त बोलल्यास त्याला सीटखालील बॉक्स दाखवून आपण पाय मागे घेण्यास अगदी असमर्थ आहोत व रेल्वे किती हरामखोर आहे असा भाव तोंडावर आणावा. हे अनुभवानेच जमेल. अथवा आपण ग्रुपमध्ये असलेल्या बंधूंशी संपर्क ठेवल्यास ते आपल्याला याचे ऐन गर्दी च्या वेळेस प्रात्यक्षिक करून दाखवतात असेही ऐकले आहे. (नक्की माहित नाही. )त्यातूनही आपले भांडण झालेच तर ? उभ्या माणसाकडे जळजळीत कटाक्ष टाकाव किंवा हिंदी भाषेत त्याचा खरपूस समाचार घ्यावा. शिवराळ भाषेची फारशी गरज पडणार नाही. सहप्रवासी आपली बाजू नसांगता घेतील. कारण ही करामत रेल्वेने ठेवलेल्या बॉक्सची आहे.

६)आपल्या अंगाची अथवा तोंडाची घाण ही आपली खास पात्रता आहे, हे लक्षात घ्या. :

अंगाला येणारी आंबट , कुजकट, कडवट घाण, तसेच तोंडाला येणारी घाण (कदाचित रात्रीची उतरलेली नसेल, किंवा नुकतीच थोडीशी मारून आला असल्यास) न धुतलेले कपडे किंवा कशीही वाढलेली दाढी, यापैकी कोणतीही अवस्था असल्यास, आपण बसण्यास व चिकटून उभे राहण्यास शंभर टक्के पात्र ठरता. आपल्याला कोणतीही जागा मिळालेली असो, तुम्ही बसल्यावर एखादा बाजूचा माणूस जागा सोडून गर्दी असली तरी उभे राहणे पसंत करेल. म्हणजे आपला हेतू साध्या झाला असे समजावे. तुमचा प्रवास नक्कीच सुखाचा होईल. या सर्व प्रकारच्या घाणीसाठी खास प्रयत्न करावे लागत नाहीत. ती एक नैसर्गिक देणगी आहे. नशा पाणी करण्यासाठी मात्र आपल्याला थोडे पैसे खर्च करावे लागतात.

७) ऋतू प्रमाणे वागायला शिका :- ही खर तर पद्धत नाही. पण परिस्थिती आहे. पावसाळ्यात जर तुमच्या अंगावरचा रेन चीटर(हा रेनला ची ट करण्यापेक्षा सहप्रवाशांना जास्त चीट करतो. )ओला असेल तर न काढता भर गर्दीत तसेच लोकांना चिकटून उभे राहा अथवा बसा. बसायला क्षमतेपेक्षा जास्त असणारी सीट फार महत्त्वाची ठरते. खिडकीची सीट उपयोगाची नाही. आजूबाजूच्यालोकांचे कपडे ओले होतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. येथे निर्ल्लज पणाची गरज आहे. बाजूचे लोक बडबड करतील किंवा तुम्हाला टोमणे मारतील किंवा थेट बोलतीलही. अशा वेळी आपण काळे असल्यास फारच फायदेशीर आहे. तुम्हाला कोणतीच भाषा येत नसल्याचा दक्षिण भारतीय माणसाचा भाव तोंडावर आणावा. हिंदीत बोलणे चालू झाल्यास किंवा चालू असल्यास फक्त "नो हिंदी, वोन्ली ...... (कोणत्याही दक्षिणेतल्या भाषेचे नाव घ्या) किंवा वोन्ली इंग्लिश " असे म्हणा. इंग्रजीत बोलणे चालू झाल्यास आपले इंग्रजी भन्नाट असू द्या. म्हणजे आपले "बी. पी. " वाढणार नाही. बाजूचा माणुस कंटाळून भर गर्दीतही उभा राहील. वेळ पडल्यास मुद्दा सोडून बडबड करा. राजकारणाची मदत घ्या. कोणत्याही मराठी नेत्याचे नाव घेऊ नका . आपला हेतू फक्त सुखाचा प्रवास किंवा दुसऱ्याचा त्रास एवढाच मर्यादित ठेवा. जर प्रकरण मारामारीवर गेले तर प्रथम तुम्ही मारा. नंतर दहा हात खाल्लेत तरी चालेल. कारण प्रथम मारतो तो लोकांच्या लक्षात् राहतो आणि कधी कधी जिंकतोही. मारामारी हिंदी पिक्चर स्टाइल असावी. हा आपल्या "इंप्रेशनचा " प्रश्न आहे. शक्यतोवर मारामारी वाढवण्यावर लोकांचा कल नसतो. तसे ते घाबरटही असतात. अमराठी असल्यास आपण अजिबात काळजी करू नका. बहुतेक लोक मारामारीकडे लक्ष देत नाहीत . ती इथली स्टाइल आहे. मारणारा एखाद दुसराच असेल. थंडीचे दिवस असतील तर आठाच्या ठिकाणी नऊ वसले असतील तर आपण दहावे बसा. आणि " ठंडीमे थोडी गरमी तो आनी चाहिये यार " असा शेरा डोळा मारीत इतर प्रवाशांची गैरसोय करीत मारावा. कंपार्टमेंट मध्ये महिला प्रवासी अथवा कॉलेज कन्यकांची उपस्थिती असल्यास आपल्या शेऱ्याचे चांगले स्वागत होईल. उन्हाळा असेल तर जास्त चिकटून बसा अथवा उभे राहा, जेणेकरून मुंबईचा उन्हाळा सर्वांना जाणवेल. रेल्वे आपल्याला पंखे बंद ठेऊन फुकट मदत करते , असा अनुभव आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवासाची जाणिव होते. ८)काही सामान्य सूचना : -

अ) गाडी पकडताना म्हणजे गाडीत शिरल्यावर आपल्याला बसायला जागा सुरुवातीच्या स्थानकापासूनही मिळत नसेल तर बसलेल्या लोकांकडे "खाऊ की गिळू " या नजरेने पाहा. मग खिडकीवर बसणे, तसेच बसलेल्या प्रवाशांच्या पायात पाय घालून उभे राहणे आणि पाय घालताना " बापाची ट्रेन आहे काय रे ? पाय मागे घे की रे ...... (मूड प्रमाणे योग्य शिवी द्यावी. ) असं त्याला नीट ऐकू येणार नाही असे बडबडावे. बरेचसे लोक उलटे बसून आल्याने ते मुद्दाम खिडकी बाहेर पाहात राहतात. आणि फलाटावरील लोकांच्या जागेसाठीच्या धडपडीकडे मिष्किलपणे पाहात हसतात. त्यांचा जर ग्रुप असेल तर तुम्ही काहिही करू शकत नाही आणि करायलाही जाऊ नका. ग्रुपची ताकत जास्त असते हे लक्षात ठेवा. टोळी मधला किडकिडीत कुत्रासुद्धा जास्त भुंकतो की नाही ? उभे राहताना नेहेमी दुसऱ्यावर भार टाकून उभे राहावे. अधून मधून बसलेल्या लोकांकडे पाहात "साले काय फेविकॉल लाऊन बसलेत " असे प्रवासाच्या सुरुवातीपासूनच म्हणावे. भांडण होणार नाही , कारण तुमच्या बोलण्याचा परिणामच होणार नाही. सगळे कसे स्थितप्रज्ञ दिसतात. महाभारत जर पुढे केव्हातरी घडलं असतं तर भगवंतांनी अर्जुनाला," वत्सा , कलियुगातली नऊ चारची (केवळ उदा. आहे. ) ट्रेन पकड . आणि बसलेल्या प्रवाशांच्या मुद्रांचे निरिक्षण कर, म्हणजे तुला संसारी असूनही स्थितप्रज्ञ म्हणजे काय ते कळेल, " असं म्हंटलं असत. भगवंतांची आणि अर्जुनाची जन्माची वेळ चुकल्यासारखी वाटेल. साधारणपणे माणसे खिडकीजवळिल जागा सहसा सोडत नाहीत. अशा लोकांना ट्रेन कायमची चालतच राहावी असे वाटत असावे. दादर, मुंबई या स्थानकांवरच ती रिकामी होते. प्रवास करणारा बँकेत नाही तर ऑफिसमध्ये दिवसभर बसणारच असतो. दिवस भर फिरणारे कर्मचारी त्यांच्याकडे आशाळभुतासारखे पाहात राहतात. उभे राहणाऱ्या प्रवाशाची उतरण्याची वेळ झाली तरी त्याला जागा देऊ नका. त्याचप्रमाणे , भुतं जशी धरलेल्या माणसाला सोडत नाहीत त्याप्रमाणे खिडकी जवळील जागा सोडू नये. तुम्ही जर खिडकीजवळ उभे असाल , तर दोन माणसांच्या उभे राहण्याची जागा मोकळी सोडून उभे राहा. कोणी पुढे सरकायला सांगितले तर, " आता खिडकीतून बाहेर जाऊ का ? " असा खडा सवाल करा. तोंडावर मात्र अत्यंत रागिट भाव पाहिजेत. तसेच आपल्या अंगावर गर्दीच्या लोटाचा पूर्ण भार घ्यावा. अशा वेळी आपले दोनी हात गाडी चालणाऱ्या दिशेत ठेऊन बाजीप्रभू देशपांडे यांनी जशीखिंड लढवली त्या थाटात उभे राहावे. फक्त छाती कायम पुढे पाहिजे आणि शर्टाची वरिल दोन तीन तरी बटणे उघडी पाहिजेत. वाढलेली दाढी अतिरिक्त पात्रता ठरेल.

ब) आपण विवाहित तरूण असल्यास , गाडी सुटल्यावर (कोणतेही स्थानक चालेल. ) फलाटा वरील आकर्षक कन्या पाहून सरळ कोणत्याही नावाने हाक मारावी. त्या नावाची कोणी ना कोणी कन्या मागे वळून पाहतेच. असले आंबट शोकीन समाधान आपल्याला मिळतं. हाच खेळ खिडकीजवळ बसून केला तरी चालतो आणि तो जास्त सुरक्षितही ठरतो. अशी हाक मारताना आ पण दोन मुलांचे बाप आहोत याची जाणिव ठेऊ नका. जर या प्रकाराला एखाद्या वृद्ध, अथवा प्रौढ माणसाने (ज्याना हा खेळ जमत नाही किंवा करण्याचे धाडस होत नाही ) हरकत घेतली तर अत्यंत हलक्या दर्जाची व घाणेरडी शिवी मोठ्याने हासडावी. म्हणजे तो माणूस गप्प बसतो. तुम्हाला नाही तरी त्याला लाज असते. याचा फायदा घ्या. लक्षात ठेवा , उर्मट बोलणं, आपल्यापेक्षा मोठया माणसाची रेवडी उडवणं ह्या तुमच्या अतिरिक्त पात्रता आहेत. जर ग्रुप मध्ये असाल तर अशा रितीने बसा की मध्ये उभे राहण्यास जागा राहणार नाही. भांडण होणार नाही . झाल्यास तो एकटा पडेल . विजय तुमचाच होईल. असो.

क) जर एखादा उत्तर भारतीय त्याच्या कुटुंबासहित प्रवास करित असेल (त्याचे कुटुंब नियोजना पलिकडले असते) तर त्याच्या नावाने शिमगा करा. म्हणजे डब्यातील सर्वच प्रवासी हासत हासत आपल्याला पाठिंबा देतील. तसच जर एखादं अविवाहित जोडपं किंवा कॉलेज कुमार आणि टंच कॉलेज कुमारी वेगवेगळे चाळे करीत बसलेले आढळतात. अशा वेळी पाहण्याची पंचाइत होते. अशी पंचाईत करून घेण्यापेक्षा त्यांचे चाळे बघत राहा.त्याने हरकत घेतली आणि भांडण झालच तरी "तुमको चाळा (मुंबई हिंदी) करनेमे शरम नही तो हमको देखनेमे कैसी शरम?" असे ठणकावून विचारा. मराठित बोलू नका . चाळे करणारा मराठी असला तरी.

ड)आपण जर लेडिज फर्स्ट क्लासच्या लगतच्या डब्यात (दुसऱ्या वर्गाच्या) बसला असलात तर कोणतीही कारवाई , भांडण मारामारी, शिव्या , भजनं , पोझिंग(सेल्फ डिस्प्ले) मोठ्या आवाजातच व्हायला पाहिजे. अशा दुसऱ्या वर्गाच्या डब्यांना व्हिडिओ कोच म्हणतात. म्हणजे प्रथम वर्गातील स्त्रियांवर आपला चांगलाच प्रभाव पडतो असे खोटे समाधान मिळेल.

ई) प्रथम वर्गाच्या डब्ब्यातून प्रवास करणे आजपर्यंत शक्य नझाल्याने अनुभव नसताना लिहिणे चुकीचे ठरेल. परंतु काही सह कर्मचारी त्यांचे अनुभव सांगत असल्याने थोडे लिहीत आहे. प्रथम वर्गाच्या डब्यात चढतानाच आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी रेल्वे वर फार मोठे उपकार करीत आहे. या डब्यातील गर्दी सुवासिक असल्याने स्वतः पण तसे राहण्याचा प्रयत्न करा. जरी जमलं नाही तरी दुसऱ्याच्या अंगाला फार घाण येत आहे असे उभे राहा. तसेच येथिल गाद्यांवर (सिटा म्हणणं योग्य नाही. ) क्षमते पेक्षा कमी माणसे बसण्याचा प्रघात आहे. तरी या वर्गात नवीन असलात तर सरकवण्याचा आग्रह धरू नका. शिव्या इंग्रजीत असतील. चुकून ही हिंदी अथवा ब्लडी व्हर्नाक्युलर लँग्वेज (म्हणजे मराठी) वापरू नका. जर स्वतः कारवाई करायला गेलात तर "धिस शोज फ्रॉम वुइच स्कूल यू कम. " असले इंग्रजी साहित्यातील शेरे ऐकावे लागतील. नेहेमी एक तरी अजिबात न समजणारी नॉव्हेल जवळ ठेवा. जागा मिळाल्यास एकच पान पाहात राहिलात तरी हरकत नाही. अश्लील इंग्रजी मासिक ही चालेल. बाकी गाडी पकडताना म्हणजे चढताना उतरताना दुसऱ्या वर्गाच्या डब्यांकडे तुच्छतेने पाहावे. आपापसातही तुच्छता दर्शविणे हे महत्त्वाचे असावे.

सर्व पद्धती राष्ट्रीय स्तरावर वापरता येत असल्याने प्रथम वर्गही त्याला अपवाद नाही. महिलांच्या डब्यातून प्रवास करण्याची संधी नमिळाल्याने लिहिता येत नाही. तिथे एक तर तृतिय पंथी, भिकारी किंवा आर. पी. एफ . ची माणसे लागतात. प्रत्येकाने आपापली पद्धत शोधावी. नवीन पदधती चालू करता येती ल. हा विषय न संपणारा आहे. जाता जाता एवढेच सांगतो की आजकाल डब्यातील बाकड्यांची फायवर मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत . ती घरी आणून तालीम करावी. आजूबाजूच्या लोकांना त्या तालिमित सामिल करून घ्यावे. भजनी मंडळं हा स्वतंत्र विषय आहे.

(सम्पूर्ण )

पूर्व प्रकाशन मीमराठी.नेट्/नोड/४५०५)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या कंपार्टमेंटमध्ये स्त्री अथवा एखादी मुलगी असल्यास जास्त चांगले. कोणीही हरकत घेतल्यास पूर्ण दुर्लक्ष करावे. अचकट विचकट बडबड करीत राहावे. तसेच जमल्यास चावट गाणी म्हणावीत अथवा मोबाईल वर वाजवावीत अथवा मांसाहारी विनोद करावेत. म्हणजे इतर वयोवृद्ध माणसेही डोळे मारीत हासतील.

आपण विवाहित तरूण असल्यास , गाडी सुटल्यावर (कोणतेही स्थानक चालेल. ) फलाटा वरील आकर्षक कन्या पाहून सरळ कोणत्याही नावाने हाक मारावी. त्या नावाची कोणी ना कोणी कन्या मागे वळून पाहतेच. असले आंबट शोकीन समाधान आपल्याला मिळतं.

>>>> ह्या आणि असे बरेच पटले नाही. थोडक्यात लेख पटला नाही आणि आवडला नाही.

Lol छान!

"फलाटा वरील आकर्षक कन्या पाहून सरळ कोणत्याही नावाने हाक मारावी. त्या नावाची कोणी ना कोणी कन्या मागे वळून पाहतेच. असले आंबट शोकीन समाधान आपल्याला मिळतं""

असल्या एका शौकिनाला चार कानफटात वाजविल्याची रम्य आठवण जागी झाली.

तुर्र्मखान व मिलिंद यांचा प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मी बहुतेक बसत नाही. त्यामुळे आसन करण्याचा प्रश्नच आला नाही. पण त्यामुळे निरिक्षणास मदत झाली. तसच निवृत्त झाल्यावर चार पाच वर्षानी गेलो होते. तेव्हाही तीच आसने चालू असलेली दिसली. अजून नवीन आसने शोधून काढली नसावीत.

अप्रतिम लेख !

मी कॉलेजला महामंडळ (एस टी) ने प्रवास करतो !
कृपया त्या बद्दल मार्गदर्शन करा ..
Happy