शिवपार्वतीचा, मला भावलेला मानवी चेहरा

Submitted by दिनेश. on 16 November, 2012 - 12:11

शिव पार्वती, ही जरी दैवते असली, तरी इतिहासात या खर्‍याखुर्‍या व्यक्ती होऊन गेल्या असाव्यात असे मला
वाटते. पण त्या इतिहासावर, दंतकथेची अनेक पुटे चढल्याने, अनेक संदर्भ सत्याशी फारकत घेतल्यासारखे
वाटतात.
या दंतकथांमागे काही सत्यांश असेल का ? असे माझ्या मनात नेहमी येते. या संदर्भात काही संशोधन / लेखन
नक्कीच झाले असेल, पण माझ्या मर्यादांमूळे ते ग्रंथ माझ्या वाचनात आले नाहीत. खुपदा पुस्तकांच्या
दुकानातही, असे ग्रंथ सहज समोर मिळतील, असे नसतातच. शिवाय त्यांचे वाचक मर्यादीत असल्याने,
त्यांच्या आवृत्त्याही कमीच निघत असाव्यात.

गेल्या काही वर्षांत मला, अनेक माहितीपट बघता आले. त्यात बायबलमधील अनेक घटनांचा, त्या काळातील
भूगोलाशी, भूगर्भातील हालचालींशी सांगड घालायचा प्रयत्न केलेला दिसला. हे सगळे, करताना शक्य तितक्या साधनांनी, तो काळ समोर आणायचा प्रयत्न केला पण त्याने कुठलीही घटना, निर्विवादपणे सिद्ध होत नाही, हेसुद्धा नमूद करण्यात आले.

मुसलमानांना पवित्र वाटणार्‍या, कुराणाबाबत, मात्र असे माहितीपट मी बघितले नाहीत. ( मला सापडले नाहीत.)
आपल्या दंतकथा / पुराणकथांबाबतही काही माहितीपट आहेत. पण ते तितकेसे प्रभावी वाटत नाहीत.

सध्या, स्वप्ना सातत्याने, देवोंके देव, महादेव या मालिकेसंदर्भात जे मजेशीर निरिक्षण नोंदवत असते, त्यावरुन
जे मनात आले ते लिहितोय. अर्थात हे माझ्या मनात आलेले विचार आहेत, यांना कुठलाही ठोस संदर्भ नाही.
( असल्यास तो इथल्या प्रतिसादातून कळेलच.)

तर असेच काही विचार

१) अन्न

त्या मालिकेत, खुपदा खीर केलेली दाखवतात. असे स्वप्नाने लिहिलेय. प्रत्यक्ष कैलास पर्वत, कितीही सुंदर
दिसत असला, तरी त्यावर वास्तव्य शक्यच नाही. ( त्या पर्वतावर, गिर्यारोहण करण्यास अनुमती नाही.)
त्यांचे वास्तव्य त्या परीसरात, असू शकेल.
खीर करण्यासाठी, तिथे बार्ली / जव सारखे धान्य त्या काळात असू शकेल. सध्या जरी गहू, तिथे पिकत
असला, तरी तो नंतर, तूर्कीमधून आला. त्या ऊंचीवर लवकर शिजण्यासाठी, बार्ली / जव हिच धान्ये असावीत.
थोडाफार तांदूळही असेल.
दूधासाठी याक / मेंढी अशा प्राण्यांचे दूध असेल. त्या परीसरात, त्या काळात गायी नसाव्यात. नंदी हा त्या
काळातही दुर्मिळ आणि जोपासण्यास, कठिण असावा, म्हणून त्याला इतके खास स्थान मिळाले असावे.
रानटी घोड्याचेही दूध असू शकेल. आजही मंगोलिया मधे, रानटी घोडीचे दूध पितात.

साखर मात्र नसणारच. मूळात खीर गोड असायची शक्यता कमीच आहे. कदाचित मध वापरत असतील, पण
तोही मर्यादीत प्रमाणातच. आजही गिरीजन / वनवासी मुद्दाम गोड पदार्थ करून खात नाहीत. निसर्गात
मिळणार्‍या गोड पदार्थांवर, ते भागवतात.

शंकराला बेल प्रिय, म्हणजे बेलाची झाडे असणार. बेलाची फळे आजही बंगालात आवडीने खाल्ली जातात,
त्यामूळे बेलफळही खाण्यात असावे. ( तिकडची बेलफळे आकाराने मोठी, भरपूर गराची आणि गोड असतात.)
हिमाचल प्रदेश, सिमला या भागात, आज सफरचंदाचे अमाप पिक येत असले, तरी ते झाड मूळचे, तिथले
नाही. सफरचंदाचे मूळ स्थान, म्हणजे सध्याचे कझकस्थान. तिथूनही ते फळ, थेट आलेले नाहीच.

बटाटाही, फार नंतर, दक्षिण अमेरिकेतून आला. पार्वतीचे अपर्णा नाव, बोराच्या संदर्भात आहे, त्यामूळे बोरे
नक्कीच असणार.

शंकराला धोत्राही प्रिय. पण तो काही खाता येत नाही. पण कदाचित बियांचा चिलीमीत वापर होत असावा.
भांग असेल तर खसखस, बडिशेप असणार. बदामही असू शकतात. पण आपण आज ठंडाई करताना, मिरी
वापरतो, त्या एवजी पिंपळी असणार.

२) समुद्रमंथन

आजचा हिमालय, हा भारतीय उपखंड, गोंडवनातून वेगळा होऊन, आशियाला थडकल्यामूळे तयार झालाय.
म्हणजे हे दोन भूभाग टक्करले आणि तिथे ज्या घड्या पडल्या, ते हिमालय.
अर्थात हे सगळे, मानव या खंडात यायच्या आधी घडले असणार. हा भाग पुर्वी समुद्राच्या खाली असल्याने,
तिथे अजून शंखशिंपल्यांचे जीवाष्म सापडतात. या जीवाष्मांमुळेच, एव्हरेस्टला, सागरमाथा असे नाव
पडले असावे.

आणि समुद्रमंथन म्हणजे कदाचित त्या भागाचे ट्रेझर हंट असेल. आज फक्त जीवाष्म सापडत असले, तरी
त्या काळात, तिथे रत्ने सापडल्याची शक्यता आहे. एखाद्या उंच पर्वताच्या भोवती, हे झाले असेल.
हायकिंगसाठी, वेलींपासून केलेला एखादा जाड रोप वापरला असेल, आणि त्यातून वासुकी सर्प, वगैरे
कल्पना निघाल्या असतील. एखाद्या बारकाश्या भूकंपाने, जर तो पर्वत त्या काळात हलला असेल, तर
मंथनाची कल्पना आणखी दृढ झाली असेल. तिथे काही दुर्मिळ,सुंगंधी वनस्पती देखील आढळल्या असतील.
आजही तिथे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहेच, शिवाय ब्रिटिश संशोधकांना पण तिथे अनेक दुर्मिळ वनस्पति
सापडल्या होत्या.

अशीच एखादी औषधी वनस्पति, किंवा शिलाजित सारखे औषध, अमृत म्हणून गौरवले गेले असेल का ?
च्यवनप्राशातल्या मूळ रेसिपीमधले काही घटक, त्या काळातही दुर्मिळ होते. त्यातली एखादी वनस्पति
तिथे विपुल प्रमाणात सापडली असेल का ? आणि तशी असेल, तर तिच्यावरुन भांडणे होणे, सहज शक्य आहे.

मग हलाहल म्हणजे काय ? माझ्या डोक्यात एक विचित्र कल्पना आली. भारतात नैसर्गिक खनिज तेलाचे
साठे असम ( आसाम नाही, असम च ) मधे, दिग्बोई ( Dig Boy ) ला सापडले. भूगर्भातील हालचाली
बघता, तिथे एका ठिकाणी क्रूड ऑईल सापडले असण्याची शक्यता आहे.
विचित्र वासाचे, चिकट असे ते रसायन म्हणजे काय, असे त्या लोकांना नक्कीच वाटले असेल. आणि कदाचित,
शिवाने त्याची परिक्षा केली असेल, चाखूनही बघितले असेल.
निळसर काळे, असे हलाहलाचे वर्णन, क्रूड ऑईलला बरोबर लागू पडते. शिवाय मानवी शरीराला, अगदी
तोंडावाटे प्यायले तरी अपायकारक नाही. कदाचित शिवाने ते अंगाला लावूनही बघितले असेल, त्यावरुन
निलकंठ वगैरे कल्पना, पुढे आल्या असतील.

३) शस्त्रे

सीतास्वयंवरात रामाने, शिवधनुष्य मोडल्याने, परशुराम संतप्त झाला, असा कथाभाग आहे. परशुरामाचे
नाव, कोकण ते गोवा, या प्रांताचा निर्माता म्हणूनही घेतात. सागराकडून त्याने हा भूभाग मिळवला, असा
संदर्भ आहे.

कदाचित मानववस्ती कोकणात नंतरच्या काळात झाली असावी. गगनबावडा, आंबाघाट आणि फोंडाघाट, या
तिन्ही घाटात, प्रत्येकी असा एक भाग येतो, कि जिथून खुप खाली पण दूरवर भूभाग दिसतो.
अर्थातच हे घाट नंतर झाले, पुर्वी तिथे ऊभे कडेच असणार. या परीसरात आजही घनदाट जंगल आहे, त्याकाळात तर असणारच आणि हिंस्त्र श्वापदेदेखील असणार.
त्यामूळे या कड्यावरून खाली उतरण्याचे धाडस, परशुरामाने केले असेल का ? या कामात घनदाट अरण्य
साफ करण्यासाठी आणि अंगावर चालून आलेल्या हिंस्त्र श्वापदांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी
परशू नक्कीच कामाला आला असणार. अर्थात हे काम एकट्याचे नसणार, पण त्याने त्या गटाचे नेतृत्व
नक्कीच केले असणार.

पण परशूच्या काही मर्यादा आहेत, ते दूरवर फेकून मारता येणार नाही. त्यामूळे पळत जाणार्‍या आणि
दूरवरच्या, जनावराची शिकार करण्यासाठी, भाला जास्त उपयोगी.

शिवाचा त्रिशुळ त्यासाठी, भाल्यापेक्षाही प्रभावी. भाल्याने एकच जखम होणार पण त्रिशूळाने, तीन जखमा
होणार. कदाचित खास डिझाईनमूळे, ते फेकतानाही फिरत वगैरे असणार.
शिवाचे चित्र, धनुष्यासोबत क्वचितच दिसते. पण शिवधनुष्य हा शब्द रुढ असल्याने, त्या शस्त्राची निर्मिती /
संकल्पना देखील शिवाने, केली असेल का ?
धनुष्यबाण तर शिकारीसाठी, त्रिशूळापेक्षाही प्रभावी. तर परशूपेक्षा जास्त प्रभावी शस्त्रे असणारा, शिव हा
म्हणूनच, परशूरामाने गुरुस्थानी मानला असेल का ?

परशूरामाच्या हातून मातेची हत्या झाली, हे सत्य असावे. त्यानंतर त्याला फार अपराधी वाटले असावे, आणि
त्याने, पूर्वेकडे वाटचाल केली असावी. याला कारण असे, कि ब्रम्हपुत्र ( पुत्रा नाही. पुत्र चे स्त्रिलिंगी रुप पुत्रा
होत नाही. इंग्लिश स्पेलिंगचाही तो चुकीचा उच्चार आहे. शिवाय ती नदी नाही, नद आहे.) नदावर कुठेही
तीर्थक्षेत्र नाही. भारतातल्या बहुतेक गावात, जर नदी असेल तर तिचावर घाट असतो, किमान स्नान
करण्यासाठी एखादी ठराविक जागा असते, आणि तिला तीर्थक्षेत्राचा मान असतो.

ब्रम्हपुत्र च्या बाबतीत तसे नाही. त्याच्यात, तीर्थ म्हणून स्नान करायची प्रथा नाही. याचे स्वाभाविक कारण
असे कि, तीरावरून अंदाज आला नाही, तरी त्याची खोली आणि रुंदीही भयानक आहे. त्याच्यात लाल रंगाचे
पाणी, प्रचंड वेगात वहात असते. त्याच्या काठची माती भुसभुशीत आहे. नवखा माणूस, जर त्या प्रवाहात
शिरला तर तो बुडण्याची, वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे.

पण सरळ सांगून लोक ऐकणार नाहीत, म्हणून या नियमाला परशुरामाच्या कथेची जोड दिली जाते. मातेच्या
रक्ताने माखलेला परशु, त्याने या प्रवाहात धुतला, म्हणून ते पाणी, अपवित्र. शिवाय ब्रम्हपुत्र चे दुसरे नाव,
लोहित असेही आहेच.

अर्थात याला एक बारीकसा उ:शापही आहेच. तिथेच परशुराम कुंड नावाचे तीर्थ आहे. आणि त्यात स्नान केले
तर, मातृॠणातून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे.

आता कर्मभूमी कोकण, प्रत्यक्ष दुर्दैवी घटना घडली ते माहूर आणि प्रायश्चित्तासाठी आसाम, या मधे शिवाचा
प्रभाव असलेले क्षेत्र येते. आणि त्या भटकंतीमधे, कदाचित त्याचा, शिवाशी परिचय झाला असणार.

४) गीत संगीत

शिवाचा संबंध नृत्य गायन कलेशी लावला जातो. नटराज म्हणून जी मुद्रा आहे, ती स्थिर असली, तरी तिच्यात
सुंदर आकृतीबंध दिसतो. नर्तकाने ती मुद्रा साकार केली, कि आपोआप शरीराचा एक तोल, साधल्यासारखे
वाटते.

तांडव प्रकार, म्हणजे जोरकस तालावर केलेला एखादा नृत्यप्रकार असावा. आजही असम परिसरात जे बांबू
नृत्य केले जाते, त्यातला ताल तर जोरकस असतोच पण तो सादर करायला कमालीचे, कौशल्य लागते.
( मधुमति चित्रपटातल्या, लता, मन्ना डे च्या, बिछुआ गाण्यात शेवटी हा ताल, सलील चौधरींनी वापरलाय.
चित्रपटात जरी टिपर्‍या दाखवल्या असल्या, तरी तो ताल, असमीच आहे. ) या तालाची निर्मिती, शिवाने
केली असेल का ?

आजही प्रचलित असणार्‍या अनेक रागांचे श्रेय, शिवाला दिले पाहिजे. भैरव ( तू है मेरा प्रेम देवता, मोहे भूल गये
सावरीया ) शंकरा ( दे हे शिवा मोहे ऐसा वर, तूजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले ) शिवरंजनी ( मेरे नैना सावन
भादो, बहुत दिन बीते ) मल्हार ( या रागाचे तर अनेक प्रकार आहे, मेघमल्हार, मियाँ मल्हार, सूर मल्हार,
गौड मल्हार, दूर्गा मल्हार, बैरागी मल्हार, रामदासी मल्हार.... ) या सर्व रागांच्या नावातच शिवाचे नाव आहे.

शिवाचे डमरू हे पण एक तालवाद्यच म्हणावे लागेल. हे सर्व संगीतप्रकार तर आजही लोकप्रिय आहेत.

५) पार्वती.

पार्वती, एक नि:संशय शूर स्त्री होती. तिने एखाद्या बलाढ्य रानरेड्याचा, एकटीने वध केला असावा. शिवाय
वेळप्रसंगी, समुहाचे संरक्षण देखील केले असावे. तिची किर्ती नक्कीच दूरवर पसरलेली असणार.

तिचे शिवावरचे प्रेम, त्यासाठी तिने केलेली मनधरणी, त्याचा अपमान झाल्याने तिने यज्ञात केलेले आत्मसमर्पण, त्यानंतर तिच्या शवाला डोक्यावर घेऊन, शिवाने केलेला विलाप, हे एक विलक्षण प्रेमकथेचे
घटक आहेत.

पण कल्पनाशक्ती खुंटते, ती तिच्या देहाचे, विष्णूने, सुदर्शनचक्राच्या आधारे केलेले तूकडे. ते जिथे पडले,
तिथे निर्माण झालेली, शक्तीस्थळे.. या कथाभागापुढे.

हि शक्तीस्थळे इतक्या दुरवर पसरलेली आहेत, कि तेवढ्या ठिकाणी, असे मृतदेहाचे तूकडे पडणे अशक्य आहे.
पण तिची किर्ती मात्र नक्कीच पोहोचली असावी. आणि तिच्या आठवणीप्रीत्यर्थ लोकांनी, या स्थानांची
निर्मिती, केली असावी.

तरीपण या कथाभागाचे थोडेफार साधर्म्य जाणवते ते, तिबेट परीसरात आजही प्रचलित असलेल्या, स्काय
बरीयल या प्रथेत. या स्काय बरीयल मधे, मृतदेहाचे तूकडे करून, आकाशात भिरकावले जातात. त्या परीसरातील शिकारी पक्षी, ते घेऊन जातात.

आपल्याला जरी हे वर्णन, क्रूर वाटत असले, तरी तिथल्या लोकांना, या प्रथेची सवय आहे. शिवाय ही प्रथा
पडण्यामागची, प्रॅक्टीकल कारणेही आहेत. तेवढ्या ऊंचीवर, विरळ हवेत, मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खणणे
प्रचंड कष्टाचे आहे, शिवाय सरणासाठी लाकडेही उपलब्ध नसतात.

सध्या देहाचे तूकडे करण्यासाठी, कुर्‍हाड आणि हातोड्यासारखी अवजारे वापरतात, पण हेच काम, सुदर्शन चक्रासारख्या हत्याराने ( रोटरी ब्लेड ) लवकर करता येईल. तसे काही झाले असेल का ?

शिव पार्वतीसारख्या लोकप्रिय, कलासक्त, शूर युगुलाच्या बाबतीत दंतकथांची पुटे चढल्याने, त्यांचा मानवी
चेहरा हरवल्यासारखा वाटतो. त्या दोघांना तर आदीपुरुष आणि आदीमायेचा मान आहे.
आपल्या आधुनिक इतिहासातील दैवताला, छत्रपति शिवाजी महाराजांनादेखील, आपण शिवाचा अवतार मानतो.

या कथा म्हणजे पुटाचा ओवा वाटतात. ( पुटाचा ओवा, ओव्यावर लिंबाच्या रसात खललेया सैंधवाचे सात थर
देऊन करतात. ) होणारे रसायन, उत्कृष्ठ असले, तरी आतमधे ओवा आहे, असे म्हणण्याने, काय नुकसान होणार आहे ?

इथे मी लिहिलेय, ते केवळ माझा कल्पनाविलास आहे. याबाबतीत जर कुणी, काही वाचले असेल, तर मला
अवश्य संदर्भ द्या.

हा धागा धार्मिक नाही, कुणाच्याही धार्मिक भावना दूखवायचा, अर्थातच हेतू नाही. पण कुणी दूखवून घ्यायच्याच ठरवले, तर माझा नाईलाज आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑक्टोपसी मधे ते सुदर्शन चक्रासारखे धारदार पाते योयो प्रमाणे दोरीवर फिरवत गळा कापण्यासाठी फेकलेले दाखवले आहे. तसेच एक धागा ओठापर्यंत सोडून त्यावरून विषाचा थेंब सोडलेलाही. जुन्या शस्त्रांबद्दल वाचतांना ते आठवले.

बाकी कल्पनाविलास चांगला आहे. कल्पना अनेक अन अनेक प्रकारांनी करता येतात. एवरेस्ट अन वासुकी - मंथन इ. मात्र जमले नाही असे वाटते.

भारीये.

गोंडवाना थिअरीचा काळ मानवाच्या कितीतरी आधीचा असला पाहीजे. गोंडवाना काळात डायनोसोर असावेत. अंटार्क्टिका खंडावर मुख्य भूभागात सापडलेल्या काही डायनासोर्सच्या अवशेषांशी मिळतेजुळते अवशेष बर्फाखाली दबलेले सापडले. नीट लक्षात नाही पण बर्फाचे आयुष्य आणि दोन्ही अवशेषांचे वयही मिळतेजुळते आहे. मानव (त्याबरोबर देवही ) हिमालयात कधी आले असावेत ?

दिनेशदा, सगळ्याच देवांचा अन एकूण पुराणांचा अन महाकाव्यांचाही रॅशनली विचार करणे कठीण आहे.. आतला ओवा शोधणे खूपच सोपे त्यामानाने. ..
शिव हाच हिमालयाचाच मानवी चेहरा असे वाचले आहे, म्हणून त्याच्या जटांतून (हिमशिखरांमधून ) गंगा वहाते, त्याच्या मस्तकावर ( पुनः हिमपर्वतश्रेणींवर) चंद्र विराजतो हे लक्षणार्थाने समजून येते. . पण शिव हा हिंदू दर्शनांप्रमाणे आद्यदैवतांपैकी एक. तो द्रविडांचा आर्यांनी मागाहून स्वीकारलेला देव असेही एक मत..
तालांचे,कलांचे तो आदिदैवत एकीकडे, दुसरीकडे संहाराचे रौद्रकर्म त्याच्यावर सोपवलेले.. या द्विधा भूमिकांमधून त्याचे कधी नटनर्तन, कधी तांडवनृत्य .
रच्याकने, आत्मसमर्पणाचा कथाभाग सतीचा होता, जिने पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला.
ही एक गोड अन गूढ प्रेमकथा आहे ,अपत्यसंभवाचे मोठेच गौडबंगाल हे उपकथानक त्यातच. देवांना शिवपार्वतीचा विवाह व्हायला हवा होता ते त्यांचा पुढे जन्माला येणारा पुत्र तारकासुराचा वध करेल असे विष्णूने सांगितल्याने. पण जे घडले ते केवळ अतर्क्य. शिवपार्वतीला बायॉलॉजिकल पुत्र झालेलाच नाही. कार्तिकेय शिवाचा अयोनीसंभव पुत्र आहे, पार्वतीपुत्र नाही अन गणेश केवळ पार्वतीपासून निर्माण झालाय . हे तर्काने कसं समजून घ्यायचं ? यावर एक सुंदर नृत्यनाट्य लिहिणे सोपे त्यापेक्षा. उगीच का कालिदासाने कुमारसंभव लिहिलं?

कार्तिकेय शिवाचा अयोनीसंभव पुत्र आहे, पार्वतीपुत्र नाही अन गणेश केवळ पार्वतीपासून निर्माण झालाय >>>>

त्या काळातही टेस्ट ट्युब बेबी किंवा तत्सम तंत्र अवगत होतं का? लोक सर्रास वापर करतिल आणि निसर्गाचा समतोल ढळेल म्हणुन ते तंत्र नंतर बंदिस्त करण्यात आलं असावं.....

लोक सर्रास वापर करतिल आणि निसर्गाचा समतोल ढळेल म्हणुन ते तंत्र नंतर बंदिस्त करण्यात आलं असावं.....<<

ये बात कुछ हजम नही हुई..

एव्हरेस्ट बाबत एक खुलासा....
...तो मूळ शब्द आहे सरगमाथा..म्हणजे स्वर्गाचे शिखर...त्याचा अपभ्रंश होउन सगरमाथा झाले आणि त्याचा आणखी अपभ्रंश होऊन सागरमाथा...
सागराचा आणि एव्हरेस्टचा अर्थाअर्थी काही संबंध नाहीत....

बाकी तुमचे तर्क चांगले आहेत...अमिशच्या शिवा ट्रायॉलॉजीमध्येसुध्दा त्यांनी बरेचसे असे तर्क दिले आहेत...

त्या काळातही टेस्ट ट्युब बेबी किंवा तत्सम तंत्र अवगत होतं का? लोक सर्रास वापर करतिल आणि निसर्गाचा समतोल ढळेल म्हणुन ते तंत्र नंतर बंदिस्त करण्यात आलं असावं.....
>>प्लीज, अशी काहीबाही विधाने करू नका. अन्यथा या बाफचं रूपांतर पण इतर बाफसारखं होईल.

जेव्हा एखाद्याला आपण "देवपण" देत जातो तेव्हा त्या व्यक्तीमधलं माणूसपण कमी होत जातं. देवांचे संसार आपल्यासारखे कसे असतील? ते तर देव. म्हणजे काहीतरी वेगळं चमत्कारपूर्ण होताना दाखवलं असावं. तसंच आपल्याकडे "लैंगिक संबंध" ही न बोलायची गोष्ट असल्याने साक्षात देवांना मुलं होताना ती अशीच नैसर्गिक रीत्या न होताना दाखवली असावी असा माझा अंदाज.

नंदिनी
छान पोस्ट. पुराणातली भाषा ही अलंकारिक आणि उपमा / रूपके यांनी भरपूर असल्याने अर्थ लावणे हे तसे सोपे काम नाही.

अलंकार आणि रुपके ही नंतर चढली असावीत.. कधी कधी त्या काळात सर्वमान्य आणि सर्वज्ञात असणार्‍या, शब्दाचा संदर्भ आणि अर्थही मग हरवतो..

बायबलमधल्या रेड सी च्या दुभंगण्याबाबत, अनेक अर्थ लावलेले मी बघितले. त्यात सुनामी, जोरदार वारा, भूकंप या पासून, रेड सी चा शब्दांचा अर्थ इथपर्यंत तर्क होते. अर्थात आपलेच खरे, हे कुणीच म्हणाले नाही.

मी असे म्हणत नाही, कि सगळेच ख्रिश्चन असा अर्थ लावलेला मान्य करतात. ( बायबलवर नितांत श्रद्धा ठेवणारेच अधिक आहेत. ) पण त्या धर्मात निदान काही जणांना तरी असा शोध घ्यावासा वाटला, हे महत्वाचे.
( आणि फक्त तेवढ्या कारणावरुन त्यांना धर्माच्या बाहेर काढले जात नाही.)

मला खरेच असे भाबडेपणाने वाटते. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उमेदीचा काळ,
तुरुंगवासात आणि स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लढण्यात गेला. त्यांना जर जास्त उसंत लाभती, तर
त्यांनी अशा विचारांचा, पाठपुरावा नक्कीच केला असतात.

काल्पनीक असला तरी वरिल लेखात बराच विचार आहे. लेख चांगला आहे Happy
नंदिनी. टेस्ट ट्युब बेबी हे तंत्र असावे - गांधारीचे १०० पुत्र कौरव हे त्याचेच उदाहरण असावे असे वाटते. अर्थात तसा पुरावा कोठेही नाही. पण मग असे १०० पुत्र होणे हेही अशक्यच ना.

दिनेशदा - आजही प्रचलित असणार्‍या अनेक रांगाचे श्रेय, >>> यात तेवढे रांगाचे ऐवजी रागांचे हवे का?

गांधारीचे १०० पुत्र कौरव हे त्याचेच उदाहरण असावे असे वाटते. अर्थात तसा पुरावा कोठेही नाही. पण मग असे १०० पुत्र होणे हेही अशक्यच ना.>> एकाच स्त्रीला होणे अशक्य Happy 'पर्व' मध्ये ह्याबद्दल भाष्य आहे.

रामायणातही अग्नीने दशरथाला पायसदान दिले आहे. तिनही राण्या प्रसाद ग्रहण केल्यावर गर्भवती राहिल्या. टेस्ट ट्युब बेबी तंत्राची शक्यता असेल कां?
दिनेशदा, लेख अनेक तर्कांना वाटा फोडणारा आहे.

मोनाली, सुधारली चूक..
१०० पूत्रांबाबत पर्व मधे भाष्य आहेच.

हेम, पायस हे रुपक वाटते. एकदम खीर असा अर्थ लावण्यापेक्षा, कदाचित ते वीर्यदानही असेल.
लोककथात असे अनेक थेट शब्द टाळले जातात.. ( कारल्याचा मांडव, तांदळाचे धूण .. असे अनेक दाखले आहेत. )

खुपदा असे होते ना, कि थेट शब्द वापरले तर, लोक शंका काढतात, त्यापेक्षा प्रसाद, पायस अशी लोकांना माहित असलेली रुपके वापरली, तर लोकांचा विश्वास बसतो. असे दाखले दिले, कि लोकांची तोंडे बंद होतात. ( हे लोकांची तोंडे बंद करण्याची गरज आणि रामायणातली धोब्याची कथा.. संबंध वाटतोय कि नाही ? )

तर्क करत... हे नाही, हे नसावे असे करत करत आपण, हेच असेल, किंवा असेच असावे, इथपर्यंत पोहोचू.

खुपदा असे होते ना, कि थेट शब्द वापरले तर, लोक शंका काढतात, त्यापेक्षा प्रसाद, पायस अशी लोकांना माहित असलेली रुपके वापरली, तर लोकांचा विश्वास बसतो. असे दाखले दिले, कि लोकांची तोंडे बंद होतात.>> माझापण असाच अंदाज.

आपल्याकडे बर्‍याचदा या कथा लोकांपर्यंत पोचतात, त्याच मुळी मौखिक माध्यमांतून. मौखिक माध्यम म्हटले की त्या कथेकरी बुवा अथवा जो कोणी असेल तो जे काही सांगेल ते लोकांना पटणार. तेव्हा क्रॉस चेक करायचे म्हटलेतर कसे करणार? लिखित माध्यमांचा वापर तेव्हा मर्यादितच होता. त्यामुळे चायनीज टेलीफोनच्या गेमसारखं पिढीदर पिढी यामधे नविन नविन रूपके, उपमा, दैवी चमत्कार येत गेले असणार.

नंदिनी....

"....तेव्हा क्रॉस चेक करायचे म्हटलेतर कसे करणार?..." ~ तुमच्या "पुराण" धाग्यावर प्रतिसाद देताना मी असेच मत व्यक्त केले होते की, एखाद्या प्रतिसादकाने [त्याला माहीत असलेल्या वाचनाच्या आधारे] तिथे दिलेली माहिती हेच त्या चर्चेसंदर्भातील अंतिम सत्य समजता येणार नाही. कथेकरी बुवांच्यासमोर पाराभोवती शेकड्यांनी बसलेल्या श्रोत्यांपैकी ज्यानी मनापासून ते प्रवचन श्रवण केले असेल ते जर त्यानी नंतर लिहून काढले तर ते त्याच क्षणी लिहिलेले साहित्य नसून नंतरच्या कामकाजातून कधी सवड मिळेल त्या त्या वेळी चोपडीत खरडलेले असते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायानुसार प्रवचनाच्या ठिकाणी असे जर दहा श्रावक असतील (बाकीचे नुसते एकून सोडून देणारेच असत) तर शक्यता दाट असते की दोन श्रावकांच्या त्या कथेविषयीच्या लिखाणात फरक पडणारच.

दिनेशदा यांच्या सुंदर लेखाच्या अनुषंगाने मोहन की मीरा यानी शंका उपस्थित केलीच आहे की...."त्या काळातही टेस्ट ट्युब बेबी किंवा तत्सम तंत्र अवगत होतं का?...." ~ आता याच विषयाची व्याप्ती अशा ऐकीव कथांवरून वाढवायची झाल्यास मी असे सांगू शकतो की जैविक विज्ञानाच्या कसोटीपेक्षाही 'मिथक' स्वरुपातील कथांनी अशा 'गर्भधारणे'चे जे समज विविध कथाकारांनी आपापल्या व्याख्यानातून त्या काळात पसरविले ते चौमुखी झाले. मग असे होत असताना अनेकविध प्रकारच्या शक्यतेच्या नोंदीतूनच ते समज समाजात रुजत गेले.

उदा. सर्वसामान्यता महाभारतातील 'कर्ण' हे असे एक पात्र आहे की ज्याच्या जन्माविषयी बहुतेकांना बरीच माहिती असते [त्यावरच्या कथाकादंबर्‍याचित्रपटनाटकमालिका....गाजतातही]. ते टाळून असे सांगतो की, भिल्ल, फासेपारधी, वासुदेव, कडकलक्ष्मी, कोरबू, दरवेशी आदी भटक्या जमातीमध्ये 'सूर्य' ही प्रमुख देवता मानली जाते....ब्रह्मा, विष्णू, महेश नाहीत. तर अशा अमर देवतेने कधी नश्वर मानवी स्त्रीशी "शरीरसंबंध" घडवून आणला असेल असे या जमातीत कदापिही मानले जात नाही. दूर डोंगराळ भागात राहाणार्‍या अशा जमातींची त्यांची स्वतःची अशी 'पुराण कथानके' (त्यातही महाभारतापेक्षा रामायणाला जास्त महत्व देणारी) आहेत, ज्याची 'लिखापढाई' अजिबात नाही....सारे काही मौखिक. बरे, यांच्या बोलीला आज या घटकेलाही 'लिपी' नसल्याने ते जे सांगतात ते उतरून घेणेही अशक्य. फक्त मुखिया म्हटल्या जाणार्‍या काही ज्येष्ठांना मोडकेतोडके का होईना पण मुस्लिममिश्रीत हिंदी आणि मराठी येत असल्याने काही खुलासे विचारले तर ते समजू शकतात. [साहित्य अकादमी, नवी दिल्ली....अशा प्रयत्नात जरूर आहे की अशा वस्त्यावस्त्यातून मौखिक स्वरूपात जिवंत असलेल्या कथानकांना शब्दरूप देऊन 'पुराणां'चे असेही नवे रुपडे पुस्तकरुपाने सादर केले जावे. अडसर आहे तो भाषा समजण्याचाच. तरीही गुजराथ आणि मध्यप्रदेश या भागातून असे एकदोन यशस्वी प्रयोग झाले आहेतही.]

तर यांच्या म्हणण्यानुसार [वा श्रद्धेनुसार....] सूर्यदेवता आणि कुंती यांचा थेट शरीरसंबंध आला नव्हता. मात्र दुर्वासाच्या वरदानाच्या महतेमुळे कुंतीने सूर्याला केलेल्या आवाहनानुसार केवळ 'सूर्यकिरण' तिच्या गर्भात प्रवेश करते झाले होते व त्यानुसार ती गर्भवती राहिली. म्हणजेच दुसरी बाजू अशी की पंडूराजाबरोबर ज्यावेळी तिचे रितसर लग्न झाले त्यावेळी ती प्रथेनुसार 'कुमारीका....व्हर्जिन' होती. मग आता इथे प्रश्न उभा राहतो की, 'कर्णा'ने जन्म कुठून घेतला ? यालाही काही कथेकरी असे उत्तर देतात की तो जीव कुंतीच्या कानातून बाहेर आला.... म्हणून नावही 'कर्ण'. तर काहींचा असा समज की तिच्या डोक्यातून तो बाहेर आला. ज्याने त्याने आपल्या मगदुराप्रमाणे अशा कथांवर विश्वास ठेवावा वा ठेवू नये. हनुमानपुत्राच्या जन्माबाबतही अशाच अतर्क्य म्हटल्या जाणार्‍या कित्येक गोष्टी पुराणात नोंदविल्या गेल्या आहेत.

मुद्दा असा की, या कथाना वा समजांना आज या क्षणी त्यातील शक्यतेविषयी कुणी आवाहन करू नये, कारण त्यातून ठोस भरीव असे काहीच निष्पण्ण होत नसते.

'शिवपार्वती' संदर्भात आपण चर्चा करीत आहोत, त्या अनुषंगाने 'रेड सी' इथे चर्चेत आल्याचे दिसले. मोझेसच्या त्या कार्याच्या सत्यतेविषयी शंका घेतल्या गेल्या नाहीत ? जरूर घेतल्या गेल्या आहेत. "मायथॉलॉजी" आणि 'आर्किऑलॉजी' हे दोन प्रमुख घटक आणि त्यांचा अभ्यास करणार्‍यांमध्ये कदापिही एकमत सापडत नाही... केवळ अशक्य अशी ती गोष्ट आहे. "प्रॉमिस लॅण्ड' च्या शोधार्थ इजिप्त साम्राज्यातून लाखोच्या जथ्याला घेऊन मोझेस बाहेर पडला....वाटेत विघ्ने आली....त्याच्या पुण्याईमुळे समुद्र दुभंगला गेला....इ. इ. अनेक रोमहर्षक कथा आपल्या वाचनात आहेत. पण इजिप्तच्या आर्किऑलॉजीला यातील एकही गोष्ट मान्य नाही. इजिप्त ते इस्त्रायल हा प्रवास ४० (चाळीस) वर्षांचा होता असे ज्यू मध्ये मानले जाते. तसे असेल तर मग इजिप्त वंशवादींच्या म्हणण्यानुसार अशा प्रवासाचा एकही पुरावा त्या संपूर्ण टप्प्यात प्रचंड अशा खोदकामानंतरही सापडत नाही. "धगधगते झुडूप" आणि त्यातून मोझेसला ईश्वराने प्रदान केलेल्या त्या दहा आज्ञा....टेन कमांडमेन्ट्स...हेही मग काल्पनिकच ठरते.....केवळ मिथ्स.

अशी उजवी-डावी मते सर्वच धर्मातील विश्वासांना लागू होत असल्याने प्रत्येक कथनासाठी पुरावा द्या असा आग्रहही चुकीचाच म्हणावा लागेल.

अशोक पाटील

आभार अशोक,
हे निसटलेले दुवे, खुपच अडचण करताहेत. उदा. संपूर्ण कोकणपट्टीत कुठेच प्राचीन मानवी अवशेष सापडलेले नाहीत. पण अवशेष रहायला, व्हायला निसर्गातील अनेक घटक कारणीभूत ठरतात. निसर्गातल्या एका हालचालीने, तो संपूर्ण भूभागच उखडला जातो, आणि काही पुरावेच रहात नाहीत.

नंदिनीचा क्रॉसचेकचा मुद्दा आहेच. एका बाजूला मौखिक परंपरेचे आभार मानले पाहिजेत कारण हे संचित टिकले तरी, पण जितकी तोंडे, तितक्या अ‍ॅडीशन्स पण झाल्याच. आणि आता ते थर इतके जमलेत, कि आत सत्यांश काय आहे, त्याचाच शोध घेता येत नाही.

आपली पिढी पण त्यात आणखी भर घालतेच आहे.

महादेवावरचीच का, कुठल्याही सिरियलने हा प्रयत्न केला, असे होणारच नाही. रामायण आणि महाभारत या मालिका, यशस्वी झाल्यानंतर, आणखी तेच साचे, पुन्हा पुन्हा वापरले जाणार.

दूरदर्शनच्या सुरवातीच्या काळात असे काही प्रयत्न झाले होते. भारत एक दर्शन, अशी एक व्याकरणावरची मालिका होती ( सोहिला कपूर लिमये होती त्यात. ) शिवाय तारा अलि बेग यांनी सादर केलेली, अ पॅसेज टू इंडिया, अशी पण छान मालिका होती... पण त्या मालिका विस्मरणात गेल्या.

रोचक लेखन. दिनेशदांच्या लेखनात कसलाही अजेंडा नसतो म्हणून इथे टिपटोईंग अराऊंड करावेसे वाटते Happy Wink

उपलब्ध माहितीनुसार जितका शोध घेता येईल तितका घेणे हेच आपल्या हाती असते. त्या माहितीनुसार जी जी तर्कटे उपलब्ध असतील त्या सर्वांचा विचार करणे आवश्यक ठरते. त्यातल्या त्यात आपल्याला भावलेल्या सर्वात जास्त तर्कशुद्ध विचारावर श्रद्धा ठेवण्यास काहीच हरकत नसावी. त्याचवेळी इतरही विचारधारांचा आदर करता येणे जेव्हां शक्य होईल तेव्हां चर्चा खूपच सुंदर होऊ शकतील.

किरण, अगदी आपल्या हिंदू धर्माचे पालन करायचे म्हंटले तरी असा शोध घेणे, धर्मबाह्य ठरत नाही. गणेशपूजन म्हणजे नेतृत्वगुणाचे, सकलकलांचे, पूजन हे पटले तर, मग त्या मूर्तीला हे रुप कसे लाभले, याचा शोध, त्यासंबंधी केलेले तर्क, यातना देणारे ठरत नाहीत.

थेट पुरावे मिळणे आता कठीण आहे, त्यामूळे तर्क मांडणे, ते खोडणे आणि नवे तर्क मांडणे, हेच आपल्या हातात आहे.

दिनेशदा, लिहितांना माझ्या मनात तेच होतं. त्याहीपुढे जाऊन असं म्हणता येईल की ते आयव्हीएफ तंत्र नसून आययुआय तंत्र असावे. कर्ण व पाच पांडवांनाही हाच मुद्दा लागू पडेल. इब्लिस या मुद्द्यात अधिक भर घालू शकतील.

हो हेम,
टेस्ट ट्यूब बेबी बद्दल अनेकांचा गैरसमज दिसतोय, या प्रयोगातदेखील, माझ्या माहितीप्रमाणे फक्त, स्त्रीबीजाचे फलन, मानवी शरीराच्या बाहेर केले जाते. एकदा का ते झाले, कि गर्भाच्या वाढीसाठी ते एका स्त्रीच्या गर्भाशयातच ठेवले जाते. कृत्रिम गर्भाशयाचा प्रयोग, अजूनतरी यशस्वी झालेला नाही.

गोंडवाना आणि अजुन एक प्लेट.(नाव आठवत नाही) त्या काळात मानव अस्तित्वात होता.. Uhoh .....माझ्या मते..

सध्याचा ऑस्ट्रेलिया, भारत, मदागास्कार, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका, ( उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा, मेक्सिकोचा भाग नंतर तयार झाला. ) सगळे एकत्र जोडलेले होते. त्या काळात वनस्पति होत्या ( मध्य भारतात, निलगिरीचे जीवाष्म सापडले आहे. ) पण (होमो सेपियन ) माणूस नसावा. नाहीतर या खंडासोबत जर तो गेला असेल, तर नंतर प्रवास केला, असे सिद्ध झाले नसते.
तसाही खंडाचा हा प्रवास व्हायला लाखो वर्षे लागली.

या काळातल्या वनस्पति मात्र अजून आहेत. साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रीय फूल, प्रोटिआ, हे त्या काळातले. ( याबद्दल मी फोटोसकट लेख लिहिला होता. )

देवांनी जर मानव निर्माण केले आहेत अणि नंतर ते निघुन गेले.......असे असेल तर मग होमो सेपिअन च्य आधि आस्तित्व आहे हे मान्य करावे लागेल.....
.
मुळात देवांना चेहरामोहरा हा मानवाने आपल्या मनात येईल तसा दिला आहे...त्यामुळे भेद होउ शकतात........

Pages