ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(पैलवान लोकं आरशासमोर हुबं र्‍हाऊन मुक्या घंटा का हलवतात हो? पूर्वी मुद्गलं फिरवताना आरसे न्हवते म्हणे)
टीप : मुकी घंटा = डम्ब बेल.

Proud

शारुक ला देशप्रेमाचा किडा चावलाय का ? अमेरिकेत विमानतळावर रोखल्यापासून, आपण किती देशप्रेमी आहोत, ते ( सिनेमातल्या रोल्स मधून ) दाखवतोय ते.

नंदिनीजी आणि साधनाजी खरच निसर्ग सौंदर्य बघून पैसे वसूल केले तसेही सकाळी 9.00 चा शो होता सो 200 रु. लंडन+लेह बघून झाले. अनुष्का पेक्षाही मला कॅट आवडली (बघायला). नवरा फुल सेंटी होवून पिक्चर बघत होता पण मला शाहरुक दाढीच्या वाढलेल्या खुंटामुळे व वाढलेल्या वयामुळे हीरो म्हणून बघायला नाही आवडला.
मी दिवाळीत फटाके फोडायलाही खूप घाबरते नवर्‍यालाही जास्त फोडू देत नाही आणि ईथे तर शाहरुख बॉम्ब एका मागोमाग एक निकामी करताना बघून काळीज हलले. मी लवंगी फटाके ही कधी एवढ्या सहजतेने हाताळले नाही.

Lol

जबरदस्त परिक्षण आहे
================

>>>पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं<<<

>>>आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.<<<

>>>त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात!<<<

>>>तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. <<<

>>>ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.<<<

>>>पोरकटशिरोमणी शप्पथ<<<

>>>विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं<<<

>>>ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात<<<

Rofl

लोकांना वाचताना मजा येईल असं परीक्षण लिहिता यावं, केवळ यासाठी चित्रपट पाहता का? एक जान है हम, किंवा स्टुडंट ऑफ..... चं पॅकेज काय असणार हे हे थेटरात जायच्या खूप आधी ओळखता येतं. मग एक जान ऐवजी सन ऑफ सरदार का नाही पाहिलात? किंवा अय्याला टांग का दिलीत?

मयेकर, त्यांनी कुठला चित्रपट पहायचा हे आपण कसे ठरवणार? कदाचित असे चित्र्पट पाहण्याचा छंद असेल त्यांना. (मला स्वत:ला आहे अजूनही. सध्या बघता येत नाही इतकंच!)

किंवा अय्याला टांग का दिलीत? >> मयेकरजी Uhoh अय्या हा चित्रपट टांगच काय? त्यापुढचीही काही स्टेप असेल तर तो देण्याच्या लायकीचा आहे. (हेमावैम)
परवा टिव्हीवर लागला होता.. जबरदस्ती पाहण्याचा (निष्फळ) प्रयत्न केला, पण हाय रे किस्मत.. भयंकर बोर का काय, तेच व्हायला लागलं.

ती दाताडी तर जाम डोक्यात जाते Angry काय ते कपडे, काय तो नाच, त्याला काय अभिनय म्हणायचं? वेळ भरू प्रसंग चिक्कार आहेत अय्यात.

दक्षे, त्या कल्कीचं कवतिक करता आणि मराठी दातेबाई डोक्यात जाते काय ? अशानेच मराठी निर्माते कावतात आणि म्हणतात, आम्हाला शिकवू नका Happy

भरत मयेकर,

इथे, औरंगाबादला आम्हाला शुक्रवारी सुट्टी असते आणि सिनेमा पाहाणं मुंबई-पुण्याइतकं कैच्याकै महागडं नाही, त्यामुळे आणि मला पूर्वीपासूनच थेटरात जाऊन सिनेमे पाहायचा 'चसका' असल्यामुळे मी साधारणतः दर शुक्रवारी एक सिनेमा पाहातोच ! पण मी कुठलीही सुपर पॉवर नसलेला एक सामान्य मनुष्य असल्याने एका दिवसात एकाहून अधिक हिंदी सिनेमे पाहिल्यास माझं पोट बिघडेल अशी मला मनोमन भीती वाटते, म्हणून तसा प्रयत्न केला नाही. तसेच, मी एक सामान्य मराठी माणूस असल्याने मला ते फाडफाड किंवा तोंडातल्या तोंडात बोललेलं इंग्रजी समजत नाही, म्हणून कुणी ईन्टरप्रीटर सोबत असल्याशिवाय इंग्रजी सिनेमेही पाहू शकत नाही ! Sad

'अय्या' सोबत अजून कुठला तरी सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्यामुळे 'अय्या' राहून गेला..!

Wink
Happy

अय्या मी पण बघायचा प्रयत्न केला. मला जमले नाही. शोकेस वरून मागवला होता. रसप छान रिव्यू लिहीला आहे.

पण 'अय्या'कडून जरा वेगळ्या अपेक्षा होत्या. तो चित्रपट गंधमधल्या एका कथेवर आधारित होता. कोणाच्या कोणत्या चित्रपटाकडून काय अपेक्षा ठेवून चित्रपट बघायचा याचेही एक गणित असते असे मला वाटते.

भरतजी, तुम्ही पाहिला आहे का अय्या? असल्यास, त्याबद्दल जरा सविस्तर लिहा. अमा म्हणतात तसं शोकेसवरती मीदेखील अय्य बघताना कंटाळले होते. पन्नास रू. वसूल करायचे म्हणून पूर्ण पाहिला.

कोणाच्या कोणत्या चित्रपटाकडून काय अपेक्षा ठेवून चित्रपट बघायचा याचेही एक गणित असते असे मला वाटते.>> असणारच. असायलाच हवे. अन्यथा लोक पैसे देऊन चित्रपट बघण्यासाठी का बरे जातील?

नंदिनी, अपेक्षांचे गणित आधीच मांडलेले असेल तर करण जोहरच्या चित्रपटातला मध्यमवर्गीय तरुण श्रीमंत वाटला, तर त्याबद्दल भुवया उंचावायचे कारण नाही. 'मी जर आरजीव्हीसारखे चित्रपट काढले तर त्यातले अंडरवर्ल्डवाले आणि हंटमेनसुद्धा इंपोर्टेड सूटमध्येच असतील' असे त्याने म्हटले होते.

मला मुळात थेटरात जाऊन सिनेमा पहायची हौस नाही. टीव्हीवर लागला होता, तेव्हा आमच्याकडे अर्ध्यातच लावला होता. पूर्ण पाहताही नाही आला. तेवढ्यातून कळले की मराठीतली अमृता सुभाष असलेली साधीसुधी वाटलेली कथा हिंदीत ब्लो-पंप वापरून पेश केली होती. मराठीपेक्षा अगदी वेगळी ट्रीटमेंट होती. पुन्हा लागला तर पहिल्यापासून पाहायचा प्रयत्न करेन.

नंदिनी, अपेक्षांचे गणित आधीच मांडलेले असेल तर करण जोहरच्या चित्रपटातला मध्यमवर्गीय तरुण श्रीमंत वाटला, तर त्याबद्दल भुवया उंचावायचे कारण नाही. 'मी जर आरजीव्हीसारखे चित्रपट काढले तर त्यातले अंडरवर्ल्डवाले आणि हंटमेनसुद्धा इंपोर्टेड सूटमध्येच असतील' असे त्याने म्हटले होते.
<< हो. ती त्याची दिग्दर्शनाची शैली आहे म्हणून. पण म्हणून मला जर ती आवडत नसेल तर तिला मी भुवया उंचावू नयेत असं नाही. आणि मी भुवया उंचावते म्हणून केजोचे सिनेमा पाहू नयेत असे नाही. सिनेमा पाहून त्याला नावे ठेवू नयेत असेही नाही.

मी (म्हणजे एक प्रेक्षक) थेटरामधे पैसे देऊन सिनेमा पाहतो म्हणून तर ही फिल्म इंडस्ट्री उभी आहे. (मला माझाच गाथाचित्रशतीमधला लेख आठवला) असो.

इब्लिस,

१.
>> लोकांच्या चुका काढायच्या नादात मराठीत नार्सिसिझम अन विन्ग्रजीत 'नर्सिझम' केलं आहे तुम्ही.
>> दोन चुका हसून हसून गडबडा लोळण

तुमच्या सोयीसाठी आपण selfimagenursingism म्हणूया. दिल खुश?

बाकी, आपली रंगसफेती आवडली.

२.
>> पैलवान लोकं आरशासमोर हुबं र्‍हाऊन मुक्या घंटा का हलवतात हो?

त्याचं काये की काही जिवांना आरसा समोर येताच खाली 'गा', 'ढ' आणि 'व' अशी अक्षरे दिसू लागतात. त्यामुळे त्यांना स्वत:च्या मूळ रूपाचे ज्ञान होते आणि ते मोठ्या उल्हासित चित्ताने लाथाळ्या सुरू करतात. अशा परपीडादायी जिवांच्या टाळक्यात हाणायला आमच्यासारखे पैलवान आरशासमोर मुकी घंटा हलवत उभे असतात.

मिळाली का हवी ती माहीती?

आ.न.,
-गा.पै.

अ) आपल्याला एखादा सिनेमा न आवडण्याची शक्यता जास्त आहे, हे माहीत असूनही पैसे खर्चून तो पाहण्याचं कारण काय हेच तर मी माझ्या पहिल्या प्रतिसादात विचारले आहे. "लोकांना वाचताना मजा येईल असं परीक्षण लिहिता यावं, केवळ यासाठी चित्रपट पाहता का?"
सिनेमा आवडला नाही तर तो पाहण्यात घालवलेला पैसा आणि वेळ वाया गेला असा माझा समज आहे. मग हे होणार हे माहीतच असेल तर विहिरीत का उडी मारा?
ब) विशिष्ट सिनेमाकडून विशिष्ट अपेक्षा ठेवण्याबद्दल : इराण्याच्या हॉटेलात जाताना आपण मस्त थालिपीठ मिळेल अशी अपेक्षा ठेवत नाही. (माझ्या बजेटच्या मानाने उदाहराण दिले आहे :D)

आदरणीय रसप

"मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो."

"असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत"

नंतर नंतर तर फक्त " का. आ. मू. आ." म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिण्याचा कंटाळा येईपर्यंत कंटाळावाणा चित्रपट असल्याचे दर्शविणे. लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना. खरच, आपण यथार्थ लिहिले आहे.

ग्रेट. आवडलं मला.

मस्त परिक्षण, मजा आली वाचायला. तरीही मी कधीतरी हा सिनेमा पाहिनच Happy
सारुकान हा खरतर राज सोडून बाकी काही करायच्या कुवतीचा खरच नाही हे मा वै म.
गंध मधली अमृता सुभाष वाली गोष्ट बघायला मला कंटाळा आला होता कारण फारच स्लो वाटली, त्यामुळे अय्याच्या वाटेलाच जाणार नाही.

गापै, Wink
पैलवान लोकं आरशासमोर हुबं र्‍हाऊन मुक्या घंटा का हलवतात हो?<<
आरशासमोर का करावं लागतं ते विचारलं हो. पूर्वी मुद्गलं फिरवायचे तेव्हा आरसे नसत. हे वाक्य इसरले का सोयिस्करपणे? मुद्दा आरशाचा होता. आरशात पाहिलं की नाक दिसते Wink

आनि हो, ती रंगसफेदी न्हवती. भविष्य होतं. तुम्ही खरं करून दाखवलंत.

बर झालं हे परिक्षण वाचून सिनेमा पाहिला गेले
कारण एक स्टार देण्याइतक्या लायकीचा असलेला हा सिनेमा केवळ शाहरुख आहे म्हणुन पाहिचा ठरवलेला
पण इतकाही वाईट वाटला नाही मला (शुन्य अपेक्षा ठेवून गेल्यामुळे असेल कदाचित).
सिनेमात करोडो चुका आहेत, ज्याला शाहरुख, कॅटरिना, अनुष्का यांपैकी कोणीही जबाबदार असूच शकत नाही.
शाहरूखने नेहमीचाच शाहरुख साकारला आहे.त्यामुळे पुर्वी त्याला शिव्या दिल्या असतील तर नव्याने देण्याची गरज नाही (सलमानच्या माकडउड्यांपेक्षा शाहरुखचा गाढवपणा केंव्हाही बेस्ट हे मा वै आणि ठाम मत!)
मी शाहरुखची डायहार्ट वैगेरे फॅन असल्याने पुन्हा ४-५ वेळा हाच सिनेमा पाहू शकते.
परिक्षण लिहिण्याची स्टाईल आवडली तरी पटलेलं अजिबातच नाही. हे ही मा वै आ ठा म!
आणि सगळ्यात महत्वाचं हा सिनेमा शाहरुख खेरिज इतर कोणीही (अगदी सगळ्यांचा लाडका अमीर खान (सलमान असता तर त्याहुनही टुकार झाला असता ) ) अ‍ॅक्टर घेऊन बनवला असता तरी असाच किंवा याहुनही खराब झाला असता तेंव्हा सिनेमासाठी शाहरुखला नावं ठेवणं हा १००% मुर्खपणा आहे हे ही मा वै आ ठा म!
भरतजी +१

रिया. Happy

रसप, मस्त परिक्षण.

शारुक आहे म्हणुन नाही पण ट्रेलर पाहुन फार आशा नाही निर्माण झाल्या चित्रपटाबद्दल व म्हणुन पहाणार नाही असे ठरवले आहे.

सलमान चे शिनेमे मात्र मी केवळ "तो त्यात आहे" म्हणुन पहात नाही. नुसतीच मारामारी, बाकी काहीच नसते त्यात. अभिनय, आवाज दुर्दैवाने त्याच्याकडे नाही. नशीब मात्र जोरदार आहे, दिसतो देखणा.

अय्या पण तेच, मुखर्जी बाई आहेत म्हणुन पाहिला नाही. परवा नवर्‍याने कळवळुन (चवथ्यांदा) सांगितले, 'अय्या हॉरीबल आहे'... सिनेमाबद्दल ह्याशिवाय त्याला प्रत्येकवेळी दुसरे काहीच बोलता येईना, इतका मानसिक धक्का बसला होता त्याला बहुतेक.
गंध ची ती गोष्ट आवडली होती.
आता तलाश मधे पण मुखर्जीबाई आहेतच (प्लस खोटीखोटी वावरणारी करीना पण आहे) पण आमीरमुळे चालवुन घेऊ अजुन काय.
अक्की मात्र माझा आवडता. विनोदाचे जबरदस्त टायमिंग्वाला. त्याचा नवीन खिलाडी पहाणार. तीस मार खान भयानक असला तरी.

(चला ह्या निमित्ताने बाकी सिनेमाबद्दल लिहायची संधी मिळाली).

>>>त्या कल्कीचं कवतिक करता आणि मराठी दातेबाई डोक्यात जाते का>>><<
त्या कल्कीला लोकं काय म्हणून सिनेमात घेतात हेच कळत नाही. जबडा हा असा पुढे, अभिनय तर बाराच्या भावात... हसल्यावर दातासकट जबडा दिसतो.. भयानक वाटते.
बाकी, दाते ला 'दाते' हे नाव एकदम योगायोग दिसतो. Proud

Pages