‘अलंग हुकला पण मंडण सर’

Submitted by दुर्गभूषण on 1 November, 2012 - 11:00

नळीची वाटच्या अविस्मरणीय ट्रेक नंतर कुठे जावे आता असा प्रश्न सर्वांना पडला होता. कुणी म्हणत होते राजगड-तोरणा करूयात तर कुणी लोणावळा-भीमाशंकर तर कुणी ढाक-बहिरी, पण सर्वांचे एकमत काही होत नव्हते. एक दिवस असेच सर्वजण एका गटगसाठी जमलो आणि सगळ्यांच्या तोंडून एकच नाव बाहेर पडले ‘ अलंग, मदन, कुलंग’. लगेच मिरोन ने अरुण सावंत सरांना दूरध्वनी केला. ते म्हणाले मागच्या वेळेला मी प्रयत्न केला होता नाही जमले पण तू बघ प्रयत्न करून. आम्ही म्हटले ठीक आहे नाही जमले तर नाही पण आपण अलंग च्या पायथ्याला तर जावून येवू. आलीच वेळ तशी तर आपल्याला भर पावसात झोपायची सवय आहेच (मागील कोकणकड्याचा अनुभव)
३० ऑगस्ट २०१२ अखेर तो दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे मी, सुजीत, अंबरीष, उज्वला, स्वाती आणि मिरोन आम्ही रात्री कल्याण स्थानकात जमलो. गुरुवार असल्याने ट्रेन मध्ये ट्रेकर असणारे फक्त आम्हीच होतो. मिरोन ३८ किलोची अवजड भलीमोठी पाठपिशवी घेवून आला होता. सर्कशीत नवीन प्राणी आल्यासारखे डब्यात सर्वजण आमच्याकडे बघत होते. कसारा ला पोहचल्यावर ठरवलेली जीप घेवून प्रकाश काका हजर झाले. या खेपेस माणसे कमी आणि सामान जास्त अशी स्थिती होती म्हणून सर्व सामान मागच्या सीटवर टाकून पुढे स्वतःला कोंबून घेतले. कसारा स्टेशन मागे टाकून गाडी मुख्य रस्त्याला लागली. कसारा घाट पार झाल्यानंतर गाडीने आता वेग घेतला होता. घोटी मागे पडले होते आणि वळणावळणाचा रस्ता सुरु झाला. पहाटेचे २ वगैरे वाजले असतील, गाडीत बाकीचे एव्हाना पेंगायला लागले होते. पाऊस नव्हता पण धुके खुप होते. साधारण १०-१५ फूटांपलिकडले काहीच दिसत नव्हते. गाडी चालवताना प्रकाश काका मधेच मान अशी मागे करायचे कि अशी शंका यायची हे झोपतात कि काय ? मग मी अंबरीश सोबत जोरजोरात गप्पा मारायला सुरुवात केली. भल्या पहाटे आंबेवाडीत पोहचलो तेव्हा अख्खे गाव साखरझोपेत होते. तिथल्याच देवळात मुक्काम ठोकला. लगेच घोरण्याच्या भेंड्या सुरु झाल्या.
पहाटे लवकर उठून बाहेर आलो तेव्हा अलंग-कुलंग-मंडण रांग हळूहळू दर्शन देवू लागली होती. पूर्ण रांग तांबूस रंगाच्या रंगात न्हावून निघाली होती. मी आतमध्ये येवून सर्वाना जबरदस्ती उठवले आणि भोरू ला फोन लावला. ‘भोरू’ म्हणजे आमचा वाटाड्या हे वेगळे सांगायला नकोच. एक सतत हसतमुख राहणारे व्यक्तिमत्व, पैशाने जरी गरीब तरी मनाने श्रीमंत. भोरू कडे वर जाणार्‍या वाटांबद्दल चौकशी केली. भोरूच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झालेले असल्यामुळे त्याने येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. “ माझा भाव चंदर येईल तुमच्यासंग ” इति भोरू. पण तो तुम्हाला अलंगच्या प्रस्तराच्या खालील गुहेपर्यंतच सोडेल. आता यादिवसात वर चढणे शक्य नाही. मीच काय गावातील कुणीच ते कातळ चढून जावू शकत नाही. आम्ही लगेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो पण म्हटले ठीक आहे एवढे आलोत वर जावून तर बघू. ताजेतवाने होवून भोरूच्या घरी गेलो. तिथेच भोरूच्या बायकोने केलेल्या चहा आणि पोह्यांचा आस्वाद घेतला आणि अनावश्यक सामान तिथेच सोडून कूच केले. भोरुने आमच्यासोबत त्याचा भाऊ चंदर आणि त्याचा साथीदार हरचंद यांना पाठविले होते. गाव मागे टाकून आम्ही अलंगकडे चालू लागलो.
सकाळ पासून दिसणारी एएमके रांग आता धुक्यामध्ये अदृश्य झाली होती. बाजूचे कळसुबाई शिखरसुद्धा धुक्यात लुप्त झाले होते.

धुक्यात हरवून गेलेली डोंगररांग

madan (1).jpg

चंदरशी गप्पा मारत असताना कळले कि कालच म्हणजे गुरुवारी पुण्याहून ४ ट्रेकर्स बायकांना घेवून आले होते. बायका म्हणजे बाइका दुचाकी... तर त्यांना मदन च्या खिंडीत सोडून आलो ते लोक वर पोहचले कि नाही ते माहित नाही. आम्ही म्हटले आयला म्हणजे आपल्यासारखे वेडे लोक भरपूर आहेत की. वाटेत एक मोठा ओढा लागला वाटले सामान द्यावे टाकून आणि मस्तपैकी पाण्यात डुंबावे पण एवढा वेळ नव्हता, अंधार पडायच्या आत वर पोहोचायचेच होते. सर्वात पुढे चंदर हातात कोयता घेवून झाडेझुडपे खुरडत वाट बनवत होता. पाऊस पडत नव्हता पण प्रचंड उकडत होते हवेत खूप उष्मा होता. थोडेसे चालल्यावरसुद्धा धाप लागत होती. साधारण तासभर चालल्यावर आम्ही पहिला ब्रेक घेतला, पाणी पिऊन थोडे ताजेतवाने होवून पुढे कूच केले. पहिली चढण पार केली कि एक पठार लागते त्यानंतर सरळ चालत राहावे लागते. सपाटी लागल्यामुळे चालण्याचा वेग थोडा वाढवला. साधारण अर्ध्या तासात आम्ही एका कातळात कोरलेल्या मारुतीराया पाशी येवून ठेपलो. वाट बरोबर असल्याची हि खुण होती. मारुतीरायाला वंदन करून पुढे चालू लागलो. आता दाट झाडीतून जाणारी वाट सुरु झाली. कधी चढण तर कधी उतरण असे करत आम्ही अलंगच्या पायथ्याशी पोहचलो. आता मोठी पंचाईत झाली रस्त्यात एक मोठे झाड उन्मळुन पडुन वाट बंद झाली होती. पण चंदरने हातातल्या कोयत्याने झाडी तोडून डाव्या बाजुने एक अगदी सरळ वर जाणारी वाट तयार केली. या वाटेने वर चढताना प्रचंड दमछाक होत होती. खालून अलंगचा प्रस्तर आणि त्यावरील झेंडा स्पष्ट दिसत होता. आता आम्ही अलंग च्या प्रस्तराच्या खालच्या गुहेत पोहचलो होतो.
अलंगच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत काढलेले प्रकाशचित्र सोबत हरचंद आणि चंदर
madan (125).jpg

तिथे पहिले अलंगला जावे कि मंडणला यावर मोठा खल केला. अलंगपेक्षा मंडणचा प्रस्तर थोडा सोपा आहे पहिले तिथे प्रयत्न करून बघू आणि नाही जमले तर परत या गुहेत येवून रात्र काढू असे ठरले. मग चंदर आणि हरचंद ठरल्यानुसार आमचा निरोप घेवून परत जायला निघाले. आम्ही आमच्याजवळचा एक भलामोठा काळा दोर तिथेच रस्त्यात टाकून दिला. एवढे माहित होते कि आमच्या शिवाय दुसरे कोणी इथे येणार नाही. सुजित, उज्वला आणि मी आम्ही तिघांनी हा ट्रेक नुकताच म्हणजे उन्हाळ्यात केला होता त्यामुळे तसा रस्ता पाठच होता. त्यामुळे आता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. रस्त्यात ठिकठिकाणी पानांना सुंदर असे सुरवंट चिकटलेले होते. पण त्यांना हात लावायचा मोह मात्र झाला नाही. थोड्याच वेळात आम्ही अलंग आणि मंडण मधल्या खिंडीत येवून पोहचलो होतो. इथले दृश्य अगदी विलक्षण असे होते. डाव्या बाजूस प्रचंड धुके होते त्यामुळे अलंगच्या बाजूची दरी काहीच दिसत नव्हती. एका बाजूला धुक्याची चादर आणि एका बाजूस ऊन असे विलक्षण दृश्य होते. मागे कळसुबाईचे शिखर पण मधूनच दर्शन देत होते.

madan (134).jpg

आता आम्ही मंडणच्या पायऱ्यापाशी येवून पोहचलो. पायऱ्या भरभर चढून आता आम्ही आंतरजालावरील अतिशय प्रसिद्ध अशा वळणावर येवून पोहचलो. मी नुकताच मंडण केल्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने तो सहज पार करून जाईन म्हणून पुढे गेलो पण ते अंतर माझ्या अंदाजापेक्षा थोडे जास्त निघाले. खडकावरच्या शेवाळामुळे पाय टेकवायचा धीर होत नव्हता. मी वेळीच माघार घेतली. आता मिरोन त्याच्या लांब टांगांचा वापर करून आरामात पलीकडे गेला. त्याने तिथे पलीकडे जावून दोर लावला. स्वतःला एका ठिकाणी सेल्फ अंकर करून घेतले आणि दोरामध्ये अडकवून प्रत्येकाला व्यवस्थित पलीकडे पार केले.madan (249).jpgmadan (259).jpg

आता हा दोर आपल्याला येताना लागेल म्हणून आम्ही तिथेच तसाच सोडला आणि पुढे चालू लागलो. आम्ही आता मंडणच्या प्रस्तरापाशी येवून ठेपलो होतो, ह्याची उंची साधारण ३०-४० फूट तरी आहे. माझा आधी अंदाज होता कि ती फारतर १५ फूट असेल. मिरोन माझ्याकडे पाहून ओरडला “अरे हे काय १५ फूट आहे ?“ असो आता काही झाले तरी वर चढून जायचेच होते. मग हळूहळू प्रस्तरारोहणचे सर्व सामान बाहेर निघू लागले. मोठा दोर, कॅरबिनर, हारनेस वगैरे वगैरे. मिरोनने आधी पूर्ण प्रस्तराचे व्यवस्थित निरीक्षण केले. कुठल्या बाजूने, कुठून, कसे चढता येईल याचे मनात काही आडाखे बांधले. चक्क उन पडले होते तरीसुद्धा कातळ ओला होता. सर्वत्र शेवाळ होते. साधारण १५ फुटांवर एक लोखंडी खुंटी होती. कातळाच्या पायथ्याशी एक कडी ठोकली होती त्याला स्लिंग बांधून मिरोनने स्वतःला सुरक्षित करून घेतले. आता हातातला मोठा दोर गोफ सारखा एका हातात पकडून त्याने त्या खुंटी कडे फेकला. एकदा दोर तिथे अडकला कि आपले अर्धे काम झाले इति मिरोन. एक, दोन , तीन, चार, तब्बल २०-२५ प्रयत्न करून झाले पण व्यर्थ दोर काही तिथे अडकायचे नाव घेईना. सुजितनेही खूप प्रयत्न केले पण नाही . मी मिरोनला म्हटले कि माझ्या खांद्यावर उभा राहा आणि तिथून थोडा प्रयत्न कर. मग मला तिथे सुरक्षित करून तो माझ्या खांद्यावर उभा राहिला. मला तशी दहीहंडीची सवय असल्यामुळे त्याचे वजन जाणवत नव्हते पण तो पडला तर ? या भीतीने मी खाली थरथरायला लागलो. मिरोन वरून खेकसला “अरे थरथरायला तर मी पाहिजे तू कशाला थरथरतो आहेस ?” मिरोन खाली उतरला आणि अजून एखादा मार्ग आहे का याची चाचपणी करू लागला.
madan (184).jpgmadan (137).jpgmadan (5).jpg

इथे खाली पायऱ्यानवर उज्वला आणि स्वाती बसल्या होत्या आणि आमची धडपड पाहत होत्या. थोड्या वेळाने पाहतो तर काय स्वातीने तिथेच मस्तपैकी ताणून दिली होती. स्वाती मागील जन्मी नक्कीच कुंभकर्णाची बहिण असावी. कारण अशा ठिकाणे झोपणे म्हणजे... आता मला खात्रीच आहे कोकणकड्यावर त्या पावसाळी रात्री घोरणारी ती हीच व्यक्ती.
madan (213).jpg

इकडे मिरोन ने बऱ्याच निरीक्षणानंतर एक मार्ग शोधला होता. कातळाच्या उजव्या बाजूला एक चिमणी होती. मला त्या चिमणीच्या खाली उभे करून त्याने तिथून चढायला सुरुवात केली. कातळ परवडला पण चिमणी नाही इतपत चिमणी शेवाळाने भरली होती आणि चिमणीचा कावळा झाला होता, वरून पाण्याची एक बारीक धार पडत होती. आपले प्रस्तरारोहणाचे सारे कसब पणाला लावून मिरोन चिमणीच्या वर पोहचला आणि एका दगडाला त्याने स्वतःला स्लिंग ने बांधून घेतले. त्याने अर्धा कातळ सर केला होता पण आता मुख्य परीक्षा होती. मघाची ती खुंटी आता जवळजवळ आवाक्यात आली होती. पुन्हा एकदा दोरीच्या एका टोकाचा गोफ करून त्याने तो दोर खुंटी मध्ये अडकवला. आता फक्त तो कातळ चढून जायचे होते. इथे मिरोन आता प्रस्तराच्या मध्यावर उभा होता.
आता एक तास उलटून गेला होता. कंबरेला अजून एक स्लिंग बांधून त्याने स्वताला पूर्णपणे सुरक्षित करून घेतले. वरचा कातळ पूर्ण ओला होता त्याला तिथे उभे राहणे जड जात होते. स्वतःचे चढाईचे सर्व कसब आणि सर्व अनुभव पणाला लावून तो वर जायची शिकस्त करत होता. खालून मी, सुजीत, अंबरीश हि चढाई डोळ्यांच्या कॅमेरात कैद करून घेत होतो. खरच आजपर्यंत पाहिलेली ती सर्वात नेत्रदीपक चढाई होती. खाली स्वाती स्वप्नात गढून गेली होती, बहुदा ती कधीच वरील गुहेत पोहचली असावी. साधारणतः एक तास मिरोन या बाजुवरून त्या आणि त्या वरून या असे करत माथ्यावर पोहचला आणि आम्ही एकच जल्लोष केला.
madan (215).jpg
आता पुढचे काम सोपे होते. वर जावून त्याने दोर लावला आणि बाकी लोकांच्या चढाईसाठी सेटअप लावला. दुपारचे ४ वाजले होते म्हणजे जवळजवळ २ तास त्याची चढाई चालू होती. आता पाठपिशव्या आणि माणसे खेचून घेण्यासाठी त्याला कुणीतरी मदतनिस हवा होता. म्हणून सुपेकारांचे सुजित कंबरपट्टा लावून चढाईसाठी सज्ज झाले. खालून सगळेच सोपे वाटते पण स्वतः करताना कळते. सुजीतला वर चढायला तब्बल १५ मिनीटे लागली. वर पोहचल्यावर त्याने एक एक करत सर्व पाठपिशव्या वर खेचून घेतल्या. सुजीत पाठोपाठ उज्वला वर पोहचली. आता स्वाती झोपेतून जागी होवून तयार झाली होती, आता स्वाती चढणार आणि पावसाला सुरुवात झाली. आधीच ओला असलेला कातळ आता आणखीनच ओला झाला होता. पण वर चढणे भागच होते. कशीबशी स्वाती वर पोहचली, मागोमाग मी आणि शेवटी अंबरीश वर पोहचलो. पलीकडच्या कुलंग वरून लोकांच्या हाका ऐकू येत होत्या. तिथे त्या धबधब्यावर बरीच पर्यटक मंडळी जमली होती. त्यांच्या किंचाळण्याचे, खिदळण्याचे आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होते.
आता पावसाने जोर धरला होता पण निघणे भाग होते. मी पुढे आणि बाकीचे मागे असे आम्ही पुढे चालू लागलो. कातळाच्या पुढची वाट हि खूप अरुंद आहे, एका वेळेला एकाच माणूस जाईल एवढीच. पूर्ण वाटेवर तेरड्याची झाडे उगवली होती पण नवीनच तयार झालेली पायवाट दिसत होती. याचा अर्थ इथे नुकतेच कुणीतरी येवून गेले होते. मिरोन सुद्धा म्हटला कातळावर सुद्धा कुणाची तरी पावले होती. म्हणजे नक्कीच कुणीतरी आले होते. काल आलेले पुणेकर कदाचित वर पोहचले होते. (माबोकरानो कुणी गेला असाल तर कृपया प्रतिसाद द्यावा. )

madan (197).jpg
पावसाचा जोर मधूनच वाढत होता आणि कमी होत होता. अचानक सुमोरचे ढग पूर्ण बाजूला झाले आणि अलंग ने आम्हाला पूर्ण दर्शन दिले .तो हिरवागार अलंग एखाद्या देखण्या राजकुमारासारखा भासत होता. आम्ही तिथेच थबकलो, फोटो काढायचे विसरूनच गेलो.अलंग चे ते लोभसवाणे रूप दोन्ही डोळ्यात साठवून घेवू लागलो आणि तेवढ्यात एक सर आली आणि तो अदृश्य झाला. पावसाचा जोर वाढत होता म्हणून आम्ही आमचा स्पीड वाढवला. पुढे एका ठिकाणी पायवाट संपली आणि मला रस्ताच कळेना, एवढे आठवत होते कि वर पुन्हा पायऱ्या लागतात. तेवढ्यात उजव्या बाजूला वर पायऱ्या दिसल्या आणि जीव भांड्यात पडला. मघाच्या पायऱ्यापेक्षा या पायऱ्या जास्तच ओल्या आणि चिकट होत्या. पावसामुळे सगळीकडे शेवाळीचे साम्राज्य पसरले होते. एक एक पावूल अतिशय जपून टाकावे लागत होते. प्रत्येक पायरी अतिशय जपून पार करावी लागत होती. काही ठिकाणी दगडी कठडे होते तर काही ठिकाणी कठडे तुटलेले होते. पुढे एक खतरनाक असे वळण होते जिथे बाजूला कठडा नव्हता. अशा ठिकाणी पाठीवर वजनदार पाठ्पिशव्या आणि तेवढाच वजनदार दोर खांद्यावर घेवून चढणे म्हणजे एक दिव्यच होते. बाजूला आधारासाठी भिंतीला हात धरावा तर तिथेही प्रचंड शेवाळ होते. तरी सुद्धा आम्ही प्रत्येक पाउल सांभाळून टाकत एक एक पायरी चढत होतो. खांद्यावरील दोर सारखा पायात येत होता. पण त्याची तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो. सरतेशेवटी आम्ही माथ्यावर पोहचलो. माथ्यावर उंच झुडुपे वाढली होती, पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहत होत्या. आता काम होते गुहा शोधणे. गुहा काही दृष्टीक्षेपात येत नव्हती. सर्व पायवाटा आधीच बुजल्या होत्या त्यामुळे अंदाजाने वर चढायला सुरुवात केली. मंडणचा विस्तार तसा छोटा आहे. एकदाची ती गुहा सापडली आणि मी निश्वास टाकला.
madan (124).jpgmadan (206).jpg
नशिबाने गुहा आतून बऱ्यापैकी सुकी होती. पूर्ण गुहेत फक्त आम्ही ६ लोक. आम्हाला एखाद्या राजवाड्यात आल्यासारखे वाटत होते. सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवून आम्ही तिथेच एक चूल बनवली. वर येताना काटक्या गोळा करून आणल्या होत्या. आता म्यागी बनविण्याचा कार्यक्रम होता. मिरोन ने आणलेले बार्बेक्यू चे कोळसे, रद्दी पेपर आणि काटक्या असे टाकून आम्ही चूल पेटवू लागलो. पण ओल्या काटक्या कशा पेटणार. सगळीकडे धूर झाला होता आणि धुराने डोळे झोंबायला लागले. मोठ्या प्रयत्नांनंतर ते बार्बेक्यू चे कोळसे आणि रद्दी यांनी पेट घेतला. मग वर पातेले ठेवून पाणी टाकून आत त्या शेवया टाकण्यात आल्या. २ मिनिट वाली म्यागी शिजायला तब्बल पाउण तास लागला. सर्वाना सपाटून भूक लागली होती, म्हणून ताट, वाटी ह्याची तमा न बाळगता सर्व त्यावर तुटून पडले. पोटाची आग शांत झाल्यावर घोरासुरांच्या अंताक्षरीची तयारी सुरु झाली. जमिनीवर पाठ टेकताच मंडळी निद्राधीन झाली आणि घोराक्षरी सुरु झाली.
madan (194).jpg
सकाळी सर्वांनी मिळून माझ्यावर आरोप केले कि तू दुहेरी घोरत होतास, त्यामुळे ‘ घोरभूषण ‘ ही नवीन उपाधी मला जबरदस्तीने देण्यात आली. उठल्याबरोबर पटापट आवरून आम्ही अलंग मोहिमे करता सज्ज झालो निघताना पुन्हा हारनेस चढवण्यात आले कारण परत कातळावरून दोर लावून उतरायचे होते. सकाळचे ९ वाजले होते. गडावर वरती विशेष पाहण्यासारखे नाही आणि धुक्यामुळे आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे गुहेला रामराम करून आम्ही निघालो. वाटेत टाक्यांमधून पाणी भरून घेतले. बाजूलाच एक कातळात कोरलेले एक शिवलिंग आहे. तिथलीच फुले तोडून त्याभोवती सुंदर आरास केली. हे सर्व चालू असताना मी त्या टाक्यावर उभे राहून जेवणाची सर्व भांडी एकट्याने घासली ( जरी २-३ होती), आणि ते करताना समस्त स्त्री वर्गातील एकाही प्राण्याने माझ्याकडे ढुंकूनही पहिले नाही.
madan (198).jpg
लगेच आम्ही तिथून निघालो. रात्रभराच्या पावसाने पायऱ्या चांगल्याच ओल्या झाल्या होत्या. कुठलाही किल्ला अथवा डोंगर हा चढणे सोपे असते त्यामानाने उतरणे तितकेच कठीण असते याची अनुभूती आम्हास येवू लागली. त्यातसुद्धा शेवाळाने भरलेल्या पायऱ्या उतरणे म्हणजे मोठेच कठीण काम होते. पण अलंगला लवकरात लवकर पोहचणे भाग होते. त्यामुळे भराभर पण सावधगिरी बाळगूनच आम्ही खाली उतरत होतो. साधारण तासाभरात आम्ही पुन्हा कातळाजवळ येवून पोहचलो. आता उतरायला जास्त वेळ लागणार नव्हता. त्यामुळे भराभर दोर लावून पहिले मुलींना खाली पाठवले. पाठोपाठ आम्ही हि खाली उतरलो. पुन्हा एकदा तोच प्रसिद्ध टऱ्याव्हर्स पार करून दोर काढून घेतला. यावेळी मात्र तो आम्ही आरामात पार करून गेलो. आता आम्ही पुन्हा एकदा अलंग आणि मदन मधील खिंडीत पोहचलो होतो. अजूनसुद्धा खिंडीमध्ये तसेच दृश्य होते एका बाजूस धुके आणि दुसऱ्या बाजूस ऊन. आता पोटात कावळे ओरडू लागले होते. आमच्या कडचे सुके खाणे संपत आले होते. मधेच एका ठिकाणी थांबून छोटेसे गटग करण्यात आले आणि सुज्ञपणाने अलंग न करता तसेच परत जावू असे सर्वानुमते ठरले. अलंगचा प्रस्तर मदन पेक्षाही उंच आहे.

प्रस्तर उतरताना मी
madan (119).jpg
आता अचानक काल रस्त्यातच सोडून दिलेल्या दोराची आठवण झाली. तो असेल कि नाही याची काळजी वाटू लागली. पण तो तसाच होता. पण रात्रभर पावसात भिजून त्याचे वजन अजूनच वाढले होते. आता एका माणसाऐवजी दोघांना तो वाहून न्यावा लागत होता. त्यामुळे आळीपाळीने तो खांदयावर वाहून आम्ही पुढे मार्गक्रमण करू लागलो. दुपारी २ वाजता आम्ही पुन्हा त्या मारुतीरायाच्या शिल्पापाशी पोहचलो. आता खाली आंबेवाडी गाव स्पष्ट दिसू लागले होते. आता आपण थेट परत जावे कि गावात जावून आराम करून सकाळी निघावे यावर बराच वादविवाद झाला आणि आज आराम करून उद्या पहाटेच्या येष्टी ने निघावे असे ठरले. आता वाट अगदी सरळ होती त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नव्हता. अचानक प्रचंड जोरदार पाऊस सुरु झाला, आंबेवाडी गाव, बाजूचे डोंगर अदृश्य झाले. अंबरीष पुढे चालत होता मागोमाग आम्ही. एका ठिकाणी वाटेला ३ फाटे फुटले. खाली उतरण्यासाठी एक उजवे वळण घ्यावे लागते असे लक्षात होते म्हणून उजवे वळण घेवून खाली उतरू लागलो. जोरदार पावसामुळे सगळीकडून पाण्याचे पाट वाहत होते. त्यामुळे वाट कुठली हे कळेनासे झाले. पलीकडचे डोंगर कधीच अदृश्य झाले होते. आता आपण चुकलो आहोत हे कळून चुकले. मग मघाची ती सरळ जाणारी वाट पकडूयात म्हणून आम्ही पुन्हा यु टर्न घेतला. आता पुन्हा ती मघाची सरळ वाट पकडूनच चालत होतो. साधारण १५ मिनिटे चाल झाल्यानंतर आम्ही एका छोट्या पठारावर येवून पोहचलो. काल येताना हे पठार लागले नव्हते म्हणजे आता आपण पूर्णपणे भरकटलो होतो. घड्याळात ४ वाजून गेले होते. आम्ही तिथेच थांबून दिशेचा अंदाज घेवू लागलो. पाऊस थोडा कमी झाला तसा आंबेवाडी बाजूचे नवरा नवरी सुळके व धबधबा दिसू लागला. आता ती डोंगररांग पण दिसू लागली होती. लगेच आल्या पावली मागे फिरलो आणि मघाच्या रस्त्याला परत आलो. मी आणि अंबरीश पुढे निघालो आणि रस्ता शोधू लागलो. हि तीच पायवाट होती जिथे आम्ही येवून परत फिरून गेलो होतो. अजून थोडे पुढे गेल्यावर वाट सापडली मग सर्वाना खाली बोलावले.
madan (177).jpgmadan (209).jpg
आता आम्ही डोंगर उतरून सपाटीला लागलो होतो, याखेपेस मात्र त्या ओढयात डुंबून ताजेतवाने होवू यात असेच आधी ठरले होते. ओढा पार करून पलीकडे पाठपिशव्या टाकल्या आणि आम्ही ओढयात मनसोक्त डुंबलो. पावसात भिजून मला हुडहुडी भरली होती म्हणून मी बाहेरच राहणे पसंद केले.ओढयाकडून गावाकडे परतताना सुंदर असे पूर्णाकृती इंद्रधनुष्य बघायला मिळाले.
madan (86).jpgmadan (236).jpgmadan (63).jpg
संध्याकाळी गावात पोहचलो तेव्हा संध्याकाळचे ६.३० झाले होते. तिथेच देवळाबाहेर पिशव्या टाकल्या आणि पहिले देवळात जावून आलो. बाहेर चंदर त्याच्या मित्रमंडळींसोबत उभा होता. आम्ही गुहेत जावून आलो यावर त्याचा विश्वासच बसेना, शेवटी त्याला गुहेतील फोटो दाखवले. चंदर भोरुला घेवून आला. भोरुलाही विश्वास बसेना पण फोटो पाहिल्यावर त्याला सुद्धा आनंद झाला. आम्ही रात्री देवळातच झोपणार होतो पण माझ्या भावाचे घर आहे बाजूला रिकामेच असते तुम्ही देवळात कशाला झोपता ? भोरुने घरातून घोंगड्या आणि चादरी आणून दिल्या आणि त्या घरात आमची व्यवस्था करून दिली. आज भोरूच्या आईचे दहावे होते तरीसुद्धा त्याने आमचे जे आदरातिथ्य केले त्याला तोड नाही. रात्री गावातीलच एक प्रसिद्ध वाटाड्या लखन ( हा लखन बहुतेक ग्रुप्स सोबत वर जात असतो )भेटायला आला होता. आंम्ही वर जावून आलो हे कळल्यावर तोही आश्चर्यचकित झाला. तो म्हणत होता आम्ही जून-जुलै पर्यंत सुद्धा लोकांना घेवून जातो पण ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये वर जाणे टाळतो खूपच चिकट असते.
madan (289).jpg
रात्री त्या घरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भजनी मंडळींची लगबग सुरु होती. सुजीत बाहेरून त्यांची पेटी घेवून आला आणि आम्ही त्यावर ‘राग बेसूर‘ आळवला. ११ वाजता मंडळी पेंगू लागली. रात्री उशिरा भजनी मंडळी आली आणि त्यांनी कार्यक्रम सुरु केला. आत पाहुणे मंडळी झोपली आहेत हे माहित असल्यामुळे त्यांनी टाळ वाजवणे पूर्णपणे टाळले. रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. सुजीतला मात्र झोप येत नव्हती, त्याने अंबरीशची घोरण्याची एक चित्रफितच काढून घेतली.
राग ‘बेसुरा’ गाताना मिरोन
madan (8).jpg
सकाळी हवेत मस्त गारवा पसरला होता, सकाळी ६.१५ ची येष्टी पकडायची असल्यामुळे सर्वांनी ५-३० चे गजर लावले होते पण गजर वाजूनही एकही जण उठायला तयार नाही. शेवटी बळेबळेच मीच उठलो. भोरूच्या घरी जावून चहा बनविण्यास सांगितला. ते लोक रात्रभर जागेच होते. सहज गप्पा मारताना भोरू कडून कळले कि त्याला सरकारच्या कुठल्या तरी योजनेत मोफत घर मिळणार आहे पण गावातल्या पुढारी लोकांनी ते अडवून ठेवले आहे. मी गरीब माणूस मी काय करणार ? ( तुमच्यापैकी कुणाला याबाबत माहित असेल तर त्याला मदत करा )
६ वाजता सर्व सामान आवरून येष्टी कडे धावलो, येष्टी मध्ये मोजकीच मंडळी होती. त्यातल्याच एका मावशीने विचारले “ कुठ मोठ्यावर गेलता काय ? आनि ह्या बाया पन गेलत्या ? आमी नाय गेलू कदी.” उज्वला आणि स्वातीला बाया म्हटल्यावर त्यांची तोंडे मात्र पाहण्यासारखी झाली होती. येष्टी चालू झाली आणि आंबेवाडीचा निरोप घेतला. पण ते गाव, भोरू, त्याचा परिवार हे सर्व मनात घर करून राहिले आहे.

उर्वरीत प्रकाशचित्रांसाठी खालील दुवा पहा :

https://picasaweb.google.com/110312629401799075244/sRfkkJ?authkey=Gv1sRg...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा प्रताप येउदे लवकर.. ग्रेटगिरी लै भारी ! भर पावसात इथे कसे असेल हा विचार दोनवेळा हा ट्रेक केला तेव्हा आला होता.. आता बघायला मिळतेय.. Happy

पावसाळ्यात हा ट्रेक करणे हे एक दिव्य असते. तुम्ही पुर्ण खबरदारी घेउन हा ट्रेक केला असेल याची खात्री आहे. Happy

पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा... Happy

थरारक अनुभव
छानच वृतांत आणि फोटोही.

मदनच्या ज्या प्रस्तरावर तुम्ही दोरीचा गोफ करुन अडकवायचा प्रयत्न करत होतात, अंलग आणि मदनच्या त्या अवघड प्रस्तरावर आता लवकरच लोंखडी साखळी बसविण्यात येणार आहे.

खूपच छान लिहिलेस आहेस.....वृत्त्नात आवडला ...वाचताना असताना मधेच तुझी हसवण्याची अदा ..खूपच आवडली ..मजा आली खूप ..असाच लिहित रहा .....

पावसाळ्यात हा ट्रेक करणे हे एक दिव्य असते. तुम्ही पुर्ण खबरदारी घेउन हा ट्रेक केला.निव्वळ अप्रतिम ... तुम्हा सर्वांना सलाम ........................,