समज १ (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by दाद on 24 October, 2012 - 21:08

आई ओरडणार आता.
पीटीच्या सरांनी जास्त वेळ प्रॅक्टीस घेतली.... त्याला मी काय करू? त्यांना सांगू? आई ओरडेल सातच्या आत घरात गेले नाहीतर?...
आईला सांगितलं तरी काही उपयोग नाही. कितीही सांगितलं तरी तिचं चालूच असतं. सातच्या आत घरात यायलाच पाहिजे... अशी चालू नकोस, तशी बसू नकोस, आता मोठी झालीस....

एकदा म्हणायचं लहान राहिलीस का आता? मोठी झालीयेस. जरा विचार कर आपला आपण...
परवा आपणहून कबड्डीसाठी नाव घातलं तर म्हणे... घरात कुणी मोठं आहेत की नाही? आम्हाला विचारायचस तरी. अजून लहान आहेस म्हणून सांगतेय. अगदिच शिंग फुटल्यावर....
एकाच वाक्यात एकदा लहान काय मोठी काय.... वैतागचय.

बाबा नाही बोलायचे, अगदी परवा परवा पर्यंत. पण आईने एकशे पंचवीस वेळा म्हटल्यावर त्यांनीही म्हणायला सुरूवात केलीये.. राणी, जरा जपून!

आत्ता जपून काय? जपून खो-खो की जपून कबड्डी? तिकडे शाळेत त्या डुडायडू बाई... डोजबॉल जोरात फेकला नाही तर, आईने जेवायला घातलं नाही काय आज? असं विचारतात.... ती परी आणि तिचा ग्रूप... खेळणार नाहीच पण हसणार मात्र फिदिफिदी... परी कसली? चेटकिण आहे, झालं.

आयला... विसरलेच! आईने देसाईंकडे बेसन सांगायला सांगितलं होत. किती किलो? दीड की अडीज?
चला.... परत उलटपावली देसायांच्या किराणा आणि भुसार....
भुसार म्हणजे काय?... दुकानाच्या बाहेर कायम बायका पाखडत बसलेल्या असतात... भुसा उडवत... वैतागच आहे च्यायला....

च्च! आईचं हे अजून एक. च्यायला-बियला बोलायचं नाही.... म्हणजे दादाने म्हटलेलं एकवेळ चालतं पण मी नाही. हा दाद्या-पाद्या तरी असा आहे ना.... नको ते शब्द घेऊन येतो घरी....

त्याचे मित्र आले की काय धम्माल असायची.... काय एकेक शब्द... कोट्या....
पप्या, आणि अश्क्या. कुणाची उंची जास्तं वरून परवाच मस्ती चालली होती. तेव्हा उभं केलं दोघांना दोन बाजूंना आणि पट्टी लावायला गेले डोक्यावर खुणेसाठी....

तर आलीच आमची कालीमाता, 'तुझं काय काम इथे... चल बघू घरात....'
मी जरा मजेत असलेलं बघवतच नाही तिला हल्ली. तिने काहीही बोललेलं ऐकूनच घ्यायचं म्हटल्यावर काही अर्थच नाही.
'आमच्यावेळी आम्हाला, तुझ्या वयाची होत्ये तेव्हा.....' ही रेकॉर्ड एकदा सुरू झाली की शाळेची असते तशी तासाची घंटा असती तर काय बरं झालं असतं.... असं वाटतं.

साधं गाणी ऐकत कॉटवर पालथी पडल्येय, पाय हलवत तर म्हणे सरळ उठून बस. फ़्रॉक वगैरे तर कध्धीच घालायचा सोडला... आत्ता स्कर्टची कसली मस्तं फॅशन आहे.... तरी स्कर्ट घालायचा नाही, स्लीव्हलेस नाही. सारखा सारखा येऊन जाऊन तो पंजाबी, त्यावरची ती मॅड ओढणी....

उज्वला काय मस्तं एकाच खांद्यावर घेते... आमच्याकडे दोन बाजूंना पिना लावायला लागतात....

अस्सा राग येतो म्हणून सांगू....
मोठी माणसं एकदम मोठीच जन्माला आली की काय? विसरलीत आपला छळ. का बिलकुलच विसरली नाहीत? त्यांच्या छळाचा आमच्यावर सूड? छळवाद आहे नुसता!

मगाशी धक्का लागला असं दाखवून मुद्दाम धक्का मारणारा तो.... मला कळत नाही असं वाटतं की काय या मुलांना! इतकी बावळट वाटले की काय. मला नाही पर्वा असल्या धक्क्यांची आणि पोरांचीही. च्यायला, कबड्डीत ह्याच्यापेक्षा दसपट लागतं.

परवा आईबरोबर बाजारात जात होते. समोरून आला एक किडमिड्या... लक्षात आलंच माझ्या की हा धक्का मारणार... मुद्दामच खांदा मीच जरा जोरात पुढे केला.... त्यालाच लागलं... कळवळून वळला... तशी खुन्नस देत उभी राहिले....
दुसर्‍या तिसर्‍या आईला काय आनंद झाला असता.... पण आमची आई नाही. माझा हात धरून तिथेच बडबडत, ओढत निघाली. काय इज्जत राह्यली?

गेल्या शुक्रवारी क्लासहून घरी येताना तसलाच एक रोडसाईड रोमिओ... अगदी घराच्या वळणावर... येऊन दादाला सांगितलं तर निघाला होता माझा हात धरून 'चल दाखव कोण तो... साल्याला..'
आईने थांबवलं म्हणून.....मी तर निघालेच होते, दाखवायला. चांगला झोडपून काढ म्हणावं.

अशूदादाच्या लग्नात, गेल्याच महिन्यात आम्ही सगळ्या मावस, मामे बहिणी साड्या नेसलो होतो. चांगल्या साठेक पिना लावून माझं पार्सल बांधलं होतं तरी येता-जाता माझा पदर सारखा करायची काही गरज आहे का?.... नाही तर ती आई कसली? तिथेही मावश्यांची चर्चा माझ्या उंचीची, बांध्याची... 'म्योठ्ठी दिसत्ये न्यायी वयाच्या मॅनॅने.....'

मग घरी आल्यावर तो दृष्ट काढणे-बिढणे प्रकार.....
...........................
मी तरी अशी आहे ना.... काय बरं दादाचा शब्द? हा.... भिन! तंद्रट!
विचारांच्या तंद्रीत देसायांचं दुकान मागे राहिलं.... शुभाच्या घरापर्यंत आले की. आता इथे रस्त्यातच वळले तर किती बावळट दिसेन.... त्यापेक्षा जिमखान्याच्या कट्ट्याला वळसा घालून.....
कसली कसली भुक्कड पोरं बसलेली असतात कट्ट्यावर.... आता मारतिल शिट्ट्या, काहीतरी यडचाप सारखं बोलतिल....

..............................
जाइये... आप कहा जायेंगे... ये नजर लौटके फिर आयेगी.....

.....बघितलाय त्याला दादाच्या टोळक्यात एक्-दोनदाच. मुद्दाम माझ्याशीच बोलला होता.... मॅथ्स काय, हिस्टरी काय.... कसलातरी विषय काढून.

माझ्यापेक्षा फूटभर तरी उंचच असेल. कट्ट्यावर दुसरं कुणीच नव्हतं.... हा एकटा काय करत असेल तिथे?
चक्क हाक मारली नावाने.... बरोबरय... नावानेच हाक मारेल.... तो काय राणी म्हणणारय?
पण त्याच्या तोंडी राणी बरं.... की मानसी बरं?

....श्शी काय विचार करतेय मी... कुठून बुद्धी झाली कट्ट्यावरून जायची..... गाढवपणाच..
म्हणे तुझ्याशी जरा बोलायचंय..... कित्ती ब्रेव्ह ना....

कितीही जोरजोरात श्वास घेतले तरी धाप जात नाहीये. छातीवर हात ठेवून किती वेळ अशी खोलीत बसणारय मी? अजून धडधड थांबत नाहीये. श्शी... हे काय... कानाच्या पाळ्याही लाल झाल्यात. खेळते तेव्हाचं ठीकय पण आत्ता गालपण तापलेत.... चोळले तरी लालच....
आईशप्पथ... चक्रमच, मी. चोळले तर अजून लाल नाहीका होणार? गाढवे?

........ असेल काहीतरी दादाला निरोप... म्हणून थांबले आणि जवळ गेल्ये. तर.... तर.... नुसतच डोळ्यात बघितलं.... किती खोल.... तो काही बोलायच्या आधीच.....

.... मी वळले झर्रकन अन भराभरा चालत सुटल्ये..... तर मागून ही गाण्याचे लकेर.... धुंद घोगर्‍या आवाजात.....
जाइयेsss... आप कहा जायेंगेsss...

नको नको म्हणता... वळून बघितलंच मी शेवटी.... अगदी वळणावर हं... पण.... ते ही निसटतं.... पूर्णं वळून नाहीच... मान न वळवताच, डोळ्यांच्या कोपर्‍यातून....

सुटल्ये तिथून जी.....ती घरात शिरून थेट खोलीत येऊन थांबल्ये..... पण गाण्याचे सूर पाठ सोडत नाहीयेत.... सूर म्हटले की शब्द आलेच.... मॅडसारखे पाठोपाठ....

दू ऽऽऽरतक आपके पीछे पीछे...

पण.... पण हे म्हटलच नव्हतं त्याने... आपल्याच तिरक्या डोक्यात....

नुसते गाण्याचे शब्द आठवले तरी... तो आवाज.... ते डोळे.... उंची, भरदार खांदे.... कमरेवर हात....

श्शी... नेहमीची, मानेवरची केसांची सुटलेली बट.... मेली हुळहुळतेय.... ती तरी अश्शी लाघट.... कित्ती बांधली पोनीटेलमध्ये तरी.....
(.....तिचे नव्हते शहारे आले कधी... हं?....)

...................

अरे देवा... आई हाक मारतेय... बेसन..... (जाईयेss.... आप कहाss... )

दुकानात बेसन सांगायचं राहिलंच की...... (दूsssरतक आपके पीछे पीछेsss... )

आत्ता? संध्याकाळी ह्यावेळी? नाही गं बाई ह्या काळोखात जायची मी....

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हायला , मी ही जुन्या माबोवर वाचल्याच आठवत नाहिये Uhoh
मॅडछापच आहे मी . काहीच कस आठवत नाहिये? Wink

अगदी अगदी हेच वाटायच तेंव्हा Happy

एकदम झकास ! मला तर पु.भा. भावेंची "सतरावे वर्ष" ही नितांत सुंदर कथा आठवली, देवाशप्पथ !

दाद......किती छान लिहितेस ग तु.......मी तु म्हंटलं म्हणून चिडू नकोस्.....मोठा भाऊ समज....खरच्...खूप तरल आणि तरी किती खोल्......लिहित रहा....