रावसाहेब

Submitted by शाबुत on 13 October, 2012 - 11:39

निर्धार

रावसाहेब जाधव प्लेटफार्मच्या अगदी शेवटच्या टोकाला एका बाकळ्यावर बसला होता. आजुबाजुला कोणीही नव्हतं, एवढ्या लांब दुपारच्या तापत्या उन्हात कोणी येईलच कशाला? त्याच्या अंगावरुन घामाच्या धारा निथळत होत्या, कारण उन्हं अंगाला चटके देत होतं, तरी रावसाहेबाला आता कशाचीही पर्वा वाटत नव्हती.

तो एकटक दुरवर, हरवल्यासारखा पाहत होता. आपल्याच विचाराच्या तंद्रीत त्याला जगाचा विसर पडला होता. समोरच्या रुळावरुन गाड्या जोराचा आवाज करत येत-जात होत्या, त्यानं सारा प्लेटफार्म हलत होता, पण आता रावसाहेबाच्या मनात कसलीही धडधड होत नव्हती.

उद्याच्या पेपरात बातमी छापुन आली की " अकोल्याच्या रेल्वेस्टेशन वर एका पोलीसाची आत्महत्या". तिच्या खाली त्याचं नाव, गाव येईल, नंतर ती बातमी गावापर्यत वाऱ्याच्या वेगानं पसरत जाईल, त्यामुळे त्याच्या घरातले उर फुटेस्तवर रडतील. आताच्या ट्रेनीग-सेन्टर मधील तरुण पोलीस मित्राच्या डोळ्याच्या कळा ओल्या होतील, तसच नियमिट पेपर वाचणारा समाज त्या दिवसापुरती हळहळ व्यक्त करील. या सर्व गोष्टीचं रावसाहेबाला आता काहीही वाटणार नव्हतं, कारण "आप मरे गये - डुब गयी दुनिया।" हे तत्व जिवनाला कधीही लागु पडु शकतं.

आतापर्यंत याच स्टेशनवरुन तो आतापर्यंत कितीतरी वेळा आपल्या गावी गेला होता. कितीतरी वेळ गाडीची वाट पाहत बसला होता, पण आता रावसाहेब कोणाचीही वाट पाहत नव्हता, कारण आज त्याला आपलं काळं तोंड गावात घेऊन जायाचं नव्हतं. मी असाच गावात गेल्यावर लोक जास्तीत जास्त काय म्हणतील? याचाही विचार रावसाहेबानं केला होता. आई-वडील-बहीण याचंही त्याला काहीच वाटणार नव्हतं, आज सकाळीच त्याचं सारं जग संपलं होतं, जेव्हा त्यानं धावत्या गाडीखाली उडी मारण्याचा निर्णय घेतला होता. एकादा ठरविलेलं काम पुर्ण केल्याशिवाय राहत नाही, असं रावसाहेबानं आजपर्यंत कितीतरी जणांना, कितीतरी वेळा छाती ठोकुन सांगितलं होतं, कारण स्वत:च्या कष्टानं रावसाहेबानं हे सगळं मिळवलं होतं.

------ याच जोरावर तो गावातल्या राव्याचा रावसाहेब झाला होता, पोलीसात भर्ती होऊन ट्रेनिग पुर्ण केलं होतं. एका खेळ्यातल्या अशिक्षित आई-वडीलांच्या पोटी जन्म घेऊन, रोज चार किलोमीटर पायपिट करीत शिक्षण पुर्ण केलं होतं, म्हणुन पहील्याच प्रयत्नात पोलीसात नोकरी मिळवनं ही त्याच्या दुष्टीनं साधी गोष्ट राहली नव्हती.

------- पण आज सकाळीच ते सगळंच मातीमोळ झालं होतं. हे सारं त्याच्या डोळ्यासमोर घडत होतं, तेव्हा तेर रावसाहेबाला जागेवरुन हलताही आलं नाही. जे मिळवलं होतं ते शेवटच्या क्षणी निसटलं, आता ते काहीही करुन उभ्या जन्मात मिळवता येणार नाही, तेव्हा आता जगायचं तरी कशासाठी? ह्याच प्रश्नाचं त्याला उत्तर सापडत नव्हतं.

रावसाहेबाला आताही कोणत्याही ट्रेन खाली उडी मारता आली असती. एकदा आयुष्य संपवायचच ठरल्यावर ते माणुस कधीही, कुठेही, कसही संपवु शकतो, फक्त त्याच्यात तेवढी हिंमत पाहीजे, ती त्याच्यात पुरेपुर होती. शेवटचा विचार एवढाच होता की अंधारात उडी मारली तर तो कोणालाही दिसणार नव्हता, "त्यानं माझ्या समोरच उडी मारली हो!" अशी बघणाऱ्या कोणात्याही जिवाची हळहळ व्यक्त होणार नाही. तो जर सज्जन असला तर तो माझ्यासाठी काहीही करु शकला नाही, या विचारानं त्याची मान खाली जाणार नाही, म्हणुन आपण अंधारातच उडी मारायची हा निर्णय रावसाहेबाच्या बुध्दीनं त्याला दिलेली शेवटची साथ ठरणार होती.

----- आपलीच खोट असतांना दुसऱ्यावर चिडुन, रागावुन काय उपयोग? रावसाहेब समजदार होता. त्याचं सारं शरीर दणकट असतांना आज एका पायाच्या अंगठ्यामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली होती. त्याच्या एका पायाला अंगठाच नव्हता, त्यानं त्याच्या धावण्याच्या गतीत काहीही फरक पडणार नव्हता, पण ते पोलिसांच्या भर्तीच्या नियमात बसत नव्हतं, ही गोष्ट त्याला आधीच माहीती होती.

पोलिस भर्ती वेळेस ती गोष्ट अधिकाऱ्याच्या लक्षातच आली नाही आणि नंतरच्या दोन वर्षाच्या ट्रेनींग पिरीयडच्या काळात रावसाहेबानं ती गोष्ट मोठ्या खुबीनं लपवली होती. होस्टेलमधे सगळ्या समोर तो आपल्या पायातले सॉक्स कधीच काढच नसे, झोपतांनाही त्याच्या पायात सॉक्स असत, तसचं आंघोळीला जातांना पायात सॉक्स घालुनच तो जात असे, याविषयी कोणी जर त्याला विचारलं तर मला अशी सवयच आहे असं तो सांगत असे. अकोल्याला उन्हाळ्यात किती तापतं, त्यानं अंगाला घाम येतो, त्यामुळे पायातल्या सॉक्सचा वास तर विचारायलाच नको, त्यासाठी तो दिवसातुन तिन-चार वेळा सॉक्स बदलत असे. रावसाहेबाच्या बॅगेत पंधरा-विस सॉक्सच्या जोड्या नेहमी असत.

आपण फसवतो आहोत हे रावसाहेबाला माहीती होतं, पण नशीबानं मिळालेली नोकरी त्याला सोडावी असं वाटत नव्हतं, नाहीतर त्यानं गावात जावुन काय केलं असतं, दुसऱ्या शेतात मजुरीनं वखर वाहायचं काम करावं लागलं असतं. आपलं ट्रेनींग सपलं, तो डुटीवर जॉईन्ट झाला की तो लगेच गावी जाणार होता, नंतर एखादा छोटासा अपघात दाखवुन त्यात आपल्या पायाचा अंगठा कापावा लागला असं डॉक्टरचं सर्टीफिकेट तो आणणार होता. त्यानं तशी एका डॉक्टरशी बोलुन ठेवलं होतं, पण हे सारं जिथल्या तिथे राहलं, कारण आजची घटना घडली तेवढी अजब.

पोलिसाच्या तुकडीचं दोन वर्षाचं ट्रेनींग संपल्यानंतर शेवटच्या परेडसाठी पोलिस कमिशनर आले, त्यांना सलामी देण्यासाठी रावसाहेब रावसाहेब आपल्या तुकडी समोर हातात तलवार घेऊन चालत होता. सगळ्यांच्या हालचाली शिस्तीत होत होत्या. तुकडीतल्या सगळ्यांचेच एका वेळेस हात पुढे जात होते, नंतर पाय पुढे पडत होते. त्या तुकडीत मधल्या एका जवानाच्या हाताताला रुमाल बांधलेला आहे, हे उंचावर मानवंदना स्विकारणाऱ्या कमिशनरच्या लगेच लक्षात आलं. त्याने परेड संपल्यानंतर त्या युनिटच्या ट्रेनिंग अधिकाऱ्याला बोलवुन त्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्या तुकडीला बोलावले. कमिशनरने त्या पोलिसाला हाताचा रुमाला सोडायला सांगितला, तर त्याच्या एका हाताचं मधलं बोट तुटलेलं होतं, तेव्हा कमिशनर त्या अधिकाऱ्यावर जाम चिडला, त्यानंतर साऱ्या युनिटची परत चेकिग घेण्याचा निर्णय झाला तेव्हा रावसाहेबाला घाम आला.

त्या युनिटचा प्रमुख म्हणुन कमिशनरनं आपला मोर्चा रावसाहेबाकडे वळवला, तेव्हा तो आपल्या अंगातली सारी शक्ती एकवटुन उभा राहला, त्याच्या हाताच्या बोटाची चेकींग झाली, नंतर कमिशनरने बुट काढुन पायाची बोट दाखवण्याची ऑडर दिली. रावसाहेबाचं डोकं सुन्न झालं होतं, दिवसा डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊ लागल्या, तरी रावसाहेबाचं शरीर यांत्रिकपणे काम करायला लागलं. त्यानं पायातले बुट काढले, नंतर सॉक्स काढले, तर त्याच्या एका पायाला अंगठाच नाही हे कमिशनर दिसलं.

कमिशनर ट्रेनिंग अधिकाऱ्यावर जाम चिडलेला दिसत होता नंतर साऱ्या युनिटची चेकिंग झाली पण या दोघाव्यतिरिक्त कोणीही दोषी आढळलं नाही. कमिशनरने या दोघांचं पुढच्या एका तासातच क्लिअरंस करायला लावलं, रावसाहेबाच्या मनाला अजुनही वाटत होतं की मी जर कमिशनरच्या चेकिंगमधे सापडलो नसतो तर इतरांना थोडीफार लाच देऊन हे प्रकरण मिटवुनही टाकता आलं असतं.

ती सकाळची घटना रावसाहेबाच्या डोक्यात गच्च बसली होती. त्याच्या आयुष्याला कलटणी देणारा प्रंसग त्याच्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. तो कॅपच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या अंगात रोडणं सरळ चालायचंही त्राण राहलं नव्हतं. होस्टेलमधील मित्र त्याला म्हणाले होते की जग खुप मोठं आहे, उद्यापासुन नवीन आयुष्याला सुरवात कर. ते शब्द धिराचे होते पण समोरचं वास्तव भयान करणारं होतं. आता रावसाहेव कोणत्या तोंडानं गावाला जाणार होता.

माणसाला आयुष्यात कोणतही काम घाईत उरकायची सवय झालेली असते. कोणात्याही माणसाला मरणंही कसं झटक्यात हवं असतं, त्यामुळे बाजुच्यांना आपल्यावर दया दाखवयाला संधी मिळत नाही.

रावसाहेबाच्या लक्षात आलं की संध्याकाळ केव्हाच झालेली आहे, आजुबाजुला काळोख पसरलेला आहे, प्लेटफ़ार्मवरचे लाईट तो हटवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याला दुरवर दिसत होतं की आताही प्लेटफार्मवर गर्दी आहे, एकढ्यात एखादी एक्सप्रेस येणार असावी. रावसाहेबानं मनगटाच्या घडाळ्यात पाहीलं, "हावडा-मुंबई" ती चालेल. एकदा मरायचंच ठरल्यावर निवडीची कोणतही गाडी चालु शकते पण ती गाडी या स्टेशनवर थांबते, तिचं इंजनही एवढ्यात कुठेतरी येईल, पण सुरवातीला तिचा वेग कमी राहील, त्यामुळे मरायला जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा कोळस्याची मालगाडीच बरी, ती लांबही असते आणि दोन इंजिनामुळे तिचा वेगही जास्त असतो.

आता रावसाहेबाचं ठरलं होतं की एक्सप्रेस सोडुन द्यायची, नंतर येणाऱ्या मालगाडीखाली उडी घ्यायची. हि एक्सप्रेस गेल्यावर मालगाडी कधीही येईल, तिचाच काय टाईम-टेबल असतो? आता या सामानाच्या सुटकेसचं करायचं काय? रावसाहेबानं मरायचा निर्णय घेतला तरी त्याच्या समोरचे प्रश्न संपत नव्हते. त्या सुटकेसकडे त्यानं पाहीलं, त्याचे वडील जेव्हा त्याचा ट्रेनिंग कॅप पाहायला आले होते, तेव्हा ती घेऊन दिली होती. तो सुटकेस घरी घेऊन गेला, तेव्हा त्याच्या बहीणीला ती उघडणं, उचलणं, ह्या दोन्ही गोष्टी जमत नव्हत्या. तिनं सुटकेसच्या कव्हरवर धाग्यांनी सुंदर गुलाबाचं फुल काढलं होतं. रावसाहेबानं त्या फुलावरुन हात फिरवला.

आपला मरणाच्या बातमीनं काय वाटेल या पोरीला, कितीतरी दिवस रडतच बसेल..... नाही!. आपल्या जाण्यानं घरातले माणसं आठ दिवस रडतिल, महीनाभर दिवस दुख: करतिल, वर्षभर आठवण काढतील. प्रत्येकाला आपलं स्वत:चं अस्तित्व असतं म्हणुन ते आपल्याच जगण्याच्या नादात गुंतुन जातात. जन्माला आलेले सगळेच काळाच्या पडद्या आड गडप होतात, तसे आपही होऊ? त्यात काय एवढं.

आता ह्या सुटकेसनं वर्षभर सोबत केली होती, त्यात त्याचे आवडते दोन ड्रेस, एक सोन्याची चैन, दोनशे रुपये होते. हि सुटकेस आपल्या सोबतच घेतली तर तिचे तुकडे- तुकडे होतील, त्यातल्या वस्तु वाया जातील. आता मरतांनाही ही सुटकेस कशाला सोबत पाहीजे? या विचाराने रावसाहेबाचे गाल हसण्यासाठी फुगले.

आता ही प्लेटफार्मवर ओरडा-ओरड कशासाठी? माणसं एवढ्या जोऱ्यानं का धावत आहेत? आता हावडा एक्सप्रेस आली वाटतं, त्यात चढण्यासाठी असेल? पण एक्सप्रेस तर अजुन प्लेटफार्मवर थांबायची बाकी आहे. रावसाहेब विचारातुन बाहेर आला, अगदी नाईलाजानं बाकळ्यातुन उठला, शोधक नजरेनं गर्दीकडे पाहु लागला.

अरे, हा कोण माणुस इंजिनच्या समोर धावतोय, आपल्या पाठीवर गाठोडं घेऊन!. त्याला अंधारात इंजिनचा एवढा मोठा लाईट दिसला नाही, की त्याला माझ्यासारखंच मरायचं आहे? तसं असेल तर तिथंच थांब म्हणावं, तुला आरामात मरता येईल. या ओरडणाऱ्या माणासापैकी एकही तुला वाचवायला एकही तुला वाचवायला प्लेटफार्मवरुन खाली उडी मारणार नाही, एवढं मात्र नक्की.

रावसाहेब स्वत:शीच म्हणाला, "पण, हा जिवाची बाजी लावुन एवढा का धावतोय? आपल्या पाठीवर गाठोडं घेऊन? आता त्याला म्हणावं जिव वाचवायचा असेल तर ते गाठोडं फेकुन दे, रुळाच्या तिकडच्या बाजुला उडी मार, माणसंही त्याला तेच सांगत आहेत. नाहीतर पाठीवरचं गाठोडं फेकुन जोरात धावायला लाग म्हणावं, त्यानं जोरात धावता येईल. असं काय आहे त्या गाठोड्यात, जिवापुढे गाठोडं थोडीचं मोठं असतं.

एवढ्या वेळात एक्सप्रेसचं इंजिन धावत रावसाहेबाच्या जवळ आलं, त्याच्या समोर धावणारा तो माणुसही आला, आता तो खुपच दमलेला दिसत होता, तरी इंजिन त्याच्या मागुन धावत होतं, तेव्हा रावसाहेब त्याच्यावर ओरडुन म्हणाला,"ये फेक ते गाठोडं, बाजुला उडी मार!" त्याला रावसाहेबाचं बोलणं समजलं, त्यानं गाठोडं फेकुन दिलं पण बाजुला उडी मारायचं त्याला जमलं नाही. तो तसाच धावत रावसाहेबाच्या पुढे आला, नंतर तो इंजिन थांबलं, तो तसाच रुळावत पडुन राहीला. रावसाहेब खाली उतरला, त्यानं त्या माणसाला उचललं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो भिकारी होता, याआधी रावसाहेबानं त्याला इथंच भिक मागतांना पाहलं होतं.

रावसाहेबानं त्याला उचलुन प्लेटफार्मवर टाकलं, आता ओरडणारे माणसंही तो वाचला की नाही, हे पाहायला न येता जागेसाठी डब्यात चढायची घाई करु लागले. इंजिनचे एक डायव्हर खाली उतरला, त्यानी त्या भिकाऱ्याच्या एक कानाखाली लावत म्हणाला, " कारे हरामखोरा, तुला इंजिनचा लाईट दिसला नाही की हॉर्न ऐकु आला नाही?" तेव्हा तो भिकारी "मला ऐकु येत नाही हे तो कानाला हात लावुन त्यांना सांगु लागला."

रावसाहेबाच्या लक्षात आलं की याला ऐकु येत नाही, म्हणुन बोलताही येत नाही, याला आई-बाप नसतिल म्हणुन तो भिकारी झाला, तरी तो मरायला तयार नाही. माझा तर एका पायाचा अंगठाच तुटलेला आहे, मग मी का मरावं? रावसाहेब याच विचारात परत आपल्या बाकळ्यावर जावुन बसला.

"आता काय आहे या भिकाऱ्याजवळ, जे काही गाठोड्यात होतं ते इंजिनखाली चिरडल्या गेलं, तरी तो जगण्यासाठी किती धरपडत होता. मीही याच्यासारखाच जगलो तर आणखी शिकुन, दुसऱ्या नोकऱ्या मलाही मिळवता येतील, नाहीतर गावात मजुरी करुनही पोट भरता येईल. रात्रीच्या अंधारात रावसाहेबाच्या डोक्यात एक प्रकाशाचा तारा चमकला, जगात मरण्याचा मार्ग एकच आहे - जगण्याला अनेक पर्याय आहेत, नंतर एक मालगाडी त्याच्या समोरुन धडधड करत निघुन गेली, तरी रावसाहेब बाकळ्यावरुन हलला नाही, कारण त्याच्या गावी घेऊन जाणारी पॅसेजर सकाळी येणार होती.

*******

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शामराव
मला हि कथा आवदलि. इथ बाबुराव च्या लिखानाला जास्त डिमांन्ड असल्याने नविन किन्वा चांगल लिहिना-या़अडे लक्ष जात नाहि. तेव्हा अजुन लिहा.

पोलिस भर्ती वेळेस ती गोष्ट अधिकाऱ्याच्या लक्षातच आली आणि नंतरच्या दोन वर्षाच्या ट्रेनींग पिरीयडच्या काळात रावसाहेबानं ती गोष्ट मोठ्या खुबीनं लपवली होती. >>>>>>>>>>>> अधिकाऱ्याच्या लक्षातच आली नाही हवय.

छान.
अगदी जीवन - मरणाच्या रेषेला भिडुन आली आहे कथा. ट्रेनचा उल्लेख आल्याने सगळ चित्र डोळ्यासमोर उभ राहीलं.

आजकाल मरण फार स्वस्त झालंय. तशात कुणालाच काही फरक पडणार नाही ही भावना पक्की होऊन औदसिन्य येणं हे फार दुर्दैवी. छान टिपलंय हे चित्र. पुलेशु.

वरच्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचा आभारी!
दि. २४/१०/२०१२

आज दसरा आहे,
महाराष्ट्रात दसऱ्याला फार महत्वं आहे.
याच दिवशी आपले पुर्वज हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात,
आपल्या राज्याच्या सिमा वाढवण्यासाठी, महसुल गोळा करण्यासाठी
आपापल्या शत्रांनीशी लढाईला निघत.
म्हणुन आजही खेड्यात वाजत-गाजत गावाच्या सिमेवर जावुन परत येतात.
आबाट्याची पानं सोनं म्हणुन लुटुन आणतात.

सिमा-सैन्य यावरुन आठवलं......
शिवाजी महाराज्यांच्या सैन्यातही पायी चालणाऱ्या सैनिकापेक्षा
घोड्यावर बसुन लढाई करण्याला सैनिकाला पगार जास्त होता.
कारण या जगात व्यवहार सोडुन कोणालाही जगता येत नाही
आणि यशही मिळवता येत नाही.
.......... तेव्हा
जे काही आपल्याजवळ आहे, त्याचा वापर करुन
त्यापेक्षा अधिक मिळवण्यासाठी सुरुवात करण्याचा हा दिवस आहे.
........ आज काळ बदललेला आहे, पण भावना त्याच आहेत.
क्षेत्र बदललेली आहेत पण यश-अपयश यांच्या कल्पना त्याच आहेत.
........ आणि या जगात यशाएवढं यशस्वी काहीच नसतं.

......... तेव्हा तमाम मराठी बांधवांना नविन क्षेत्रं प्रादक्रांत करण्यासाठी
........ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!............