सदमा, चांदनी, लम्हे, चालबाज या आणि अशा कित्येक चित्रपटातुन अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची नंबर वन नायिका श्रीदेवी. बोनी कपूरशी लग्न झाल्यावर अंदाजे एक तप चित्रपटसृष्टीपासुन दूर राहिल्यानंतर तीने "इंग्लिsh विंग्लिsh" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. या चित्रपटाचे प्रोमोज पहिल्यांदा पाहिल्यानंतरच खास चित्रपटातगृहात जाऊन बघण्याचा निर्णय केला होता. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पण रीलीजच्या दुसर्याच दिवशी पाहुन आलो हा चित्रपट आणि तो पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच.
हि कथा आहे शशी गोडबोले (श्रीदेवी) या पुण्यात राहणार्या मध्यवर्गीय सुखवस्तु घरातील एका स्त्रीची. नवरा (आदिल हुसैन), मुलगा सागर, मुलगी सपना आणि सासुसोबत तिचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला असतो. नवरा चांगल्या पदावर कामाला, मुले चांगल्या शाळेत शिकायला, लग्न, उत्सव प्रसंगी मोतीचूराचे लाडु बनवण्याचा तिचा व्यवसाय असं सारं काही व्यवस्थित असुनही एक गोष्ट शशीला खटकंत असते ते म्हणजे तिला इंग्रजी बोलता न येणं. यावरून तिला स्वतःच्याच घरी बर्याच वेळा अपमानित व्हाव लागत असे. छोट्या छोट्या प्रसंगातुन इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारा तिचा कोंडमारा तिचा यात दाखवला गेलाय. अगदी मुलीच्या शाळेतला प्रसंग असो किंवा "आप मेरी पढाई लोगी? आपको अंग्रेजी पडना आता है?" या मुलीच्या बोलण्यातुन मिळणारे शालजोडीतले यातुन फक्त इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारी घुसमट दाखवली. नवरा आणि मुलीच्या इंग्रजी बोलण्यामुळे आणि ते न समजल्याने ती त्यांच्या बाहेरच्या जगात कुठेही फिट नसते. तिचं एकच मागणं असतं कि प्रेम तर कुटुंबातुन मिळतंय पण पाहिजे ती फक्त थोडी आपुलकी.
अशावेळी अचानक तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा एक प्रसंग घडतो आणि सुरूवात होते ती तिच्या एका नव्या प्रवासाची. तिला तिच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी न्युयॉर्कला जावे लागते. सुरुवातीला तिला काही कारणास्तव एकटीलाचा सर्वांच्या आधी अमेरीकेत जावे लागते. तिचा हा पहिलाच विमानप्रवास. यावेळी व्हिसा काढण्याच्या प्रसंगापासुन इमिग्रेशन पर्यंत केवळ इंग्रजी न बोलता येत असल्याने शशीची होणारी तारांबळ, विमानप्रवासात तिला भेटणारा, अगदी न्युयॉर्कपर्यंत तिची मदत करणारा आणि "इन गोरे लोगोंसे डरना छोड दो और इन्हे तुमसे डरने दो" आणि विमान प्रवासाचा पहिला अनुभव "पहला experience है तो उसे अच्छी तरह से एन्जॉय करो, क्यो कि ये फिरसे नही आयेगा" असा मोलाचा सल्लाही देणारा "तो" हे सगळे प्रसंग मनाची पकड घेतात.
पुढे शशी जेंव्हा अमेरीकेत येते तेंव्हा तिच्यासोबत अशा काही घटना घडतात कि ती कुणाच्याही नकळत चार आठवड्यात इंग्रजी शिकवण्याच्या क्लासेसला जाते. इथे तिच्यासारखेच स्पेन, फ्रान्स, पाकिस्तान, चीन अशा इतर देशातुन इंग्रजी शिकण्यासाठी आलेले मित्र भेटतात. यातील क्लासमधल्या गमती बघताना हा चित्रपट पूर्वीची जुनी टिव्ही मालिका "जबान संभालके" च्या दिशेने जातोय कि काय असं काही क्षण वाटत. इथुनच मग पुढे सुरू होतो तो शशीचा अस्खलित इंग्रजी बोलण्याचा प्रवास.
संपूर्ण चित्रपट कुठेही इंग्रजी भाषेला अति महत्व देणारी एखादी डॉक्युमेंटरी न वाटता सहज आपल्या आजुबाजुला घडत असलेली एखादी गोष्ट वाटते आणि याचे श्रेय जाते ते कथा/पटकथा/संवाद आणि दिग्दर्शन करणार्या गौरी शिंदेला. हा संपूर्ण चित्रपट शशी म्हणजेच श्रीदेवी भोवती फिरतो. तरीही सुलभा देशपांडे, आदिल हुसैन, मेहदी नेबु, या कलाकारांनी आपआपल्या भुमिकेत छाप पाडली आहे. दोन्ही छोट्या मुलांचे कामही झक्कास आहे. श्रीदेवीच्या अभिनयाबाबत तर मी पामर काय बोलणार मुलीच्या बोलण्याने उदास होणारी प्रसंगी चिडणारी आई, रेस्टॉरन्टच्या त्या प्रसंगाने भेदरलेली भारतीय स्त्री, मुलाच्या हट्टापायी केलेला मायकल जॅक्सनचा थोडासा डान्स, नवर्याने कौतुक करावे यासाठी आसुसलेली बायको, सासुची काळजी घेणारी सुन, न्युयॉर्कमधे साकारलेली विद्यार्थीनी, इंग्रजी क्लासमधला युवक तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी बोलतो तेंव्हाचा तो प्रसंग इत्यादी सारं काही श्रीदेवीने आपल्या सहज सुंदर अभिनयातुन साकार केलंय.
या चित्रपटाचे संगीतही श्रवणीय आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सहजच ओठावर रेंगाळतात. विशेषतः
"नवराई माझी लाडाची लाडाची गं, आवड हिला चंद्राची चंद्राची गं"
बदला नजारा, गुस्ताख दिल आणि Manhattan हि गाणीही मस्त आहेत,
"बर्फी" चित्रपटानंतर पाहिलेला अजुन एक सुंदर चित्रपट. कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.
कलाकार : श्रीदेवी, अदील हुसैन, सुलभा देशपांडे, मेहदी नेबू, प्रिया आनंद
दिग्दर्शन/कथा/पटकथा/संवाद : गौरी शिंदे
निर्माता : सुनील लुल्ला, राकेश झुनझुनवाला, आर बाल्की
संगीत : अमीत त्रिवेदी
गीत : स्वानंद किरकीरे
तटि: चित्रपट रीव्ह्यु लिहिण्याचा जास्त अनुभव नाही (देऊळ सोडला तर) पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच हा प्रयत्न.
वरील सर्व प्रचि आंतरजालाहुन साभार.
मस्त रिफ्रेशींग मुव्ही आहे..
मस्त रिफ्रेशींग मुव्ही आहे.. एकदा तरी बघावाच.
वेस्टर्न चिक फ्लिक असती तर
वेस्टर्न चिक फ्लिक असती तर नायिकेन एक समर रोमान्स पदरी पाडून मग जीवनाची वाटचाल सुरू ठेवली असती. पण इथे भारतीय संस्कृती, लग्नबंधनातील गोडी हे पॅरामिटर्स आहेत म्हणून दिग्दर्शिकेने दाखिवलेले नाही. ते सूटही होते सिनेमात.
शी डेव्हील नावाचा इंग्रजी सिनेमा जरूर बघा. मेरील स्ट्रिप रोझॅन बार आहेत. ह्यावरून बीबी नं वन आला होता.
हेवन फॉर्बिड.
चित्रपट आवडला खटकणार्या
चित्रपट आवडला
खटकणार्या बाबी
१) श्रीदेवीचे हिंदी : श्रीला (शशी गोडबोलेला) ईंग्रजी पेक्षा हिंदी शिकवणी असावी असे वाटते
२) गोडबोले परिवार अजिबात मराठी वाटत नाही (एक सुलभा देशपांडे सोडल्या तर परिवार पंजाबी मद्रासी काँबो वाटते )
३) राजमा आणिक नवभारत टाईम्स (मराठी कुटुंबात )
४) नवराई माझ्या लाडाची गाण्यावर पंजाबी नृत्य
५) चित्रपट रेवतीच्या 'फ्रेंड' आणि जबान संभालके चे मिश्रण वाटते
तो छोटा मुलगा किती गोड
तो छोटा मुलगा किती गोड आहे...
(( १) गोडबोले परिवार (आणि तिच्या बहिणीचाही ) अजिबात मराठी वाटत नाही (एक सुलभा देशपांडे सोडल्या तर परिवार पंजाबी मद्रासी काँबो वाटते )
३) राजमा आणिक नवभारत टाईम्स (मराठी कुटुंबात )
४) नवराई माझ्या लाडाची गाण्यावर पंजाबी नृत्य ))+१
पण पिक्चर आवडला.
काल पाहिला.. एकदम मस्त आहे
काल पाहिला.. एकदम मस्त आहे चित्रपट. एकदा पाहणे अगदी मस्ट
रिव्यु वाचुन/ट्रेलर पाहुन तिच्या मुलीबद्दल थोडे निगेटीव मत झालेले पण चित्रपट पाहताना तिचे वागणे नैसर्गिक वाटते. श्रीचा मुलगा अफलातुन.. थोडे लिस्पिंग करत बोलणा-या त्या लहानुग्याला सतत बघत बसावेसे वाटत होते.
पण श्रीचा आवाज मात्र नेहमीसारखा सतवत होता. चेहरा योग्य जागी योग्य भाव दाखवणारा पण आवाज मात्र कधीकधी अगदीच कोरडा तर कधी अधुनमधुन कोरडा... जरा आवाजाकडे लक्ष दिले असते तर मला परत पाहावासा वाटला असता हा चित्रपट.
शी डेव्हील नावाचा इंग्रजी सिनेमा जरूर बघा. मेरील स्ट्रिप रोझॅन बार आहेत.
येस्स.. सुंदर चित्रपट. बीबी न. १ आधी पाहिलेला.
सगळ्यांना तो फ्रेंच अॅक्टर
सगळ्यांना तो फ्रेंच अॅक्टर आवडला, काम चांगलंच केलं आहे त्याने... पण ते कॅरॅक्टर मला फारसं पटलं नाही. हा क्लासला का येतो या प्रश्नाचं उत्तर 'शशी साठी येतो' असं देतो तिथेच पटेनासं झालं ते कॅरॅक्टर.. साधी छानशी मैत्री असूच शकत नाही का? डायरेक्ट यांना फिलिंग्ज कशी निर्माण व्हायला लागतात? तू त्या क्लास इंग्रजी शिकायला येतोस ना मग ते कारण सांग ना.... बरं, शशीचा क्लास बुडू नये म्हणून याची केवढी धडपड.. का? तर ती त्याला आवडते म्हणून, क्लासमेट म्हणून नाही, त्या चायनीज मुलीला केला असता का याने असाच तासनतास फोन जर तिचे क्लास बुडले असते तर? गम्मत दाखवायला म्हणून गच्चीत नेतो तर बाबा निखळ मजाच नाही, तिथे सुद्धा हा काहीतरी चान्स मारायला बघणार.. अरे काय हे? जरा चांगली बाई दिसली की लगेच लटकायला कसा लागला हा? तू फ्रान्स मधून कशाला आलायस बाबा? तुझं आयुष्यात उद्दिष्ट काय आहे? काही नाही..... ही आवडली की आपलं रोज क्लास सुटल्यावर हिच्या मागे मागे जायचं... बावळटपणा नुसता!
मला मेह्दी नबु प्रचंड आवडला.
मला मेह्दी नबु प्रचंड आवडला. ते कॅरॅक्टर जाम भावलं खरंतर. मला नाही वाटलं कुठेही तो चान्स मारायचा प्रयत्न करतोय. हा तिच्या बरोबर वेळ घालवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आणि ती आवडतेय हे त्याने प्रांजळपणे कबुलही करून टाकलंय.त्याच शशी कडे पाहन सुधा किती छान आहे.त्यात ओढ , आकर्षण जाणवतं पण लालच नाहीये.
चित्रपट पण खूप आवडला मला. हां काही लुपहोल्स राहिलेत यात पण जसे कि मराठी घर वाटत नाही वगेरे पण एकूण अनुभव सुखद आहे. श्रीदेवी चा अभिनय अप्रतिम फक्त तिचा आवाज खटकतो.
फ्रेंच अॅक्तरच्या बाबतीत तो
फ्रेंच अॅक्तरच्या बाबतीत तो चिकटतोय असं वाटत नाही. टेरेसवरच्या दृष्यातही खरे तर तीच टेरेसच्या खोलीला घाबरून तोल जाऊन अभावितपणे त्याच्या हातांमध्ये पडते. त्यात वेळ जास्त वाटत असला तरी प्रत्यक्शात ते क्षणैकच आहे.
खरे तर फूड हा मानवांतला एक बंध आहे हीही एक थीम चित्रपटात आहे. उदा. मोतीचूर लाडू, शाळेच्या फादरबरोबरची केळ्याच्या वेफर्सबद्दल झालेली जिव्हाळ्याची चर्चा. तो फादरदेखील घरच्या वेफर्सच्या आठवणीने 'हलून' जातो.आणि फदरचा आणि तिचा याबाबतही एक अनामिक जिव्हाळा निर्माण होतो. तसे शशी आणि मेहदी यांच्यातला धागा फूडच असतो. तिने क्लासमध्ये आणलेला डबा. त्याचे रेस्टॉरन्ट काढण्याचे स्वप्न.
शशीला त्याच्या मिठीत जाणे पारम्परिक संस्कारामुळे गिल्टी वाटत असावे. त्याच्या बाजूने तसे काही थिंकिंग असेल असे वाटले नाही....
बावळट दिसण्याचा तिने कितीही
बावळट दिसण्याचा तिने कितीही प्रयत्न केला तरी ती दिसु शकणारच नाही.>>>
हा सगळ्यात मोठा विनोद
किशन कन्हैया सारखे चित्रपट पाहिलेले दिसत नाहीत तुम्ही 
अजुन पाहिला नाही पण भक्ताच
अजुन पाहिला नाही पण भक्ताच परम कर्तव्य म्हणून इथे श्रीदेवी साठी हजेरी लावणं मस्ट
श्रीदेवी आणि तिचा कॉमेडी सेन्स , नो वन कॅन मॅच इट, बॉलिवुड च्या कुठल्याच लिडिंग लेडिज मधे इतका अफाट कॉमेडी सेन्स नाही :).
मंजिरी अग तो खर तर इंग्लिश
मंजिरी अग तो खर तर इंग्लिश शिकायलाच आलेला असतो. पण तो शशी कडे आकर्षित होतो म्हणून तो ते तस कारण सांगतो.बाकी आह म्हणते त्या प्रमाणे <<त्याच शशी कडे पाहण सुधा किती छान आहे.त्यात ओढ , आकर्षण जाणवतं पण लालच नाहीये.>> हे मात्र खर
श्रीदेवी आणि तिचा कॉमेडी
श्रीदेवी आणि तिचा कॉमेडी सेन्स , नो वन कॅन मॅच इट, बॉलिवुड च्या कुठल्याच लिडिंग लेडिज मधे इतका अफाट कॉमेडी सेन्स नाही .>>>>एक नंबर, डिजे
पटत नसेल तर उदाहरणदाखल मि. इंडियामधील "चार्ली चॅप्लिन"चा सीन पहा.
आणि श्रीच्या अभिनयासाठी सदमा, लम्हे, गुमराह, चांदनी, चालबाज, खुदा गवाह, नगिना हे आणि इतर बरेचसे चित्रपट पहा.
गौरी शिंदे रॉक्स, मस्तं
गौरी शिंदे रॉक्स, मस्तं सिनेमा दिलाय तिनी श्रीदेवीला कम बॅक साठी !
श्री चं कम बॅक हे अस्सच व्हायला हवं होतं, मला अतिशय आवडला :).
'गोडबोले-मराठी कुटुंब वाटत नाही-श्रीदेवी मराठी वाटत नाही, हिंदी वरून ती साउथ इंडियन वाटते' इ. सगळ्या गोष्टी इग्नोअर माराव्या इतका बाकी सिनेमा सही जमलाय :).
श्रीदेवीचा अभिनय आवडलाच, दिसते पण अतिशय ग्रेसफुल अॅज ऑलवेज !
तिची फिगर, तिची साडी नेसण्याची स्टाइल आणि ग्रेसफुली कॅरी करण्याची कमाल फक्त श्रीदेवीच करु शकते.. नो वन कॅन मॅच हर ग्रेस !
सब्यासाचीने तिच्या साठी डिझाइन केलेल्या साड्या पण आवडल्या !
अमिताभ नी एकच प्रसंग केलाय पण जी धमाल उडवलीये त्याने थिएटर मधे शिट्ट्या न वाजतील तर नवल :).
फ्रेंच अॅक्टर्चं काम पण खूप आवडलं..रोमान्स कसा डोळ्यातून दाखवतात , ते बॉलिवुडच्या लिडिंग हिरोज नी त्याच्या कडून शिकावं.. त्याचे आणि श्रीदेवीचे प्रसंग सही जमलेत.
माझ्या कडून साडे ४ स्टार्स :).
डीजेला ३०० वडे. जय श्रीदेवी!
डीजेला ३०० वडे.
जय श्रीदेवी!
मी पण पाहिला, मलाही जाम
मी पण पाहिला, मलाही जाम आवडला.
डीज्जे +१
मी पुन्हा पहाणार. घरी येवून मोतीचूर लाडू पण खाल्ला
.रोमान्स कसा डोळ्यातून
.रोमान्स कसा डोळ्यातून दाखवतात , ते बॉलिवुडच्या लिडिंग हिरोज नी त्याच्या कडून शिकावं.. त्याचे आणि श्रीदेवीचे प्रसंग सही जमलेत.>>> +१
मला तर आत्ता मस्त शिट्टी
मला तर आत्ता मस्त शिट्टी वाजवावीशी वाटतेय .
मीही पाहिला. अनपेक्षितपणे
मीही पाहिला. अनपेक्षितपणे चांगला, हलकाफुलका, मनाची थोडी घालमेल करवणारा वाटला. श्रीदेवी ही आवाज सोडला तर ग्रेट! ती आणि तीच सगळ्या सिनेमाभर आहे पण बाकीच्यांचा अभिनयही छान!
चित्रपटात चुका काढण्यासारख्या बर्याच गोष्टी होत्या. तरीही आवडला. ब्रेकफास्टला पराठ्याऐवजी पोहे चालले असते, जेवणातील पदार्थ मराठी. पण जाऊ दे! एरवी कसल्या कसल्या बिनडोक चित्रपटात काहीही चालून जाते त्यापेक्षा यात काहीतरी मस्त पहायला मिळाले. इंग्लीश वर्गात सगळ्यांनी धमाल केलीये. बरेचदा हसून पुरेवाट झाली. श्रीदेवीच्या साड्या साध्या पण चांगल्या आहेत. मुलीच्या विचित्र वागण्याचे फार काही वाटण्यापेक्षा हिने आई म्हणून खपवून कसे घेतले असा प्रश्न पडला. मुलगा अगदी गोड. नवरा हा टिपिकल नवरा वाटला. फ्रेंच अॅक्टर बराच भाव खाऊन जातोय. त्याच्या भावना प्रमाणिकपणे सांगितल्यावर त्या राममूर्तीची प्रतिक्रिया पाहून, ऐकून खो खो हसायला आले. इतक्या साध्या सिनेमात ही उपकथा मस्त खपून गेलीये. गाणी चांगली तर आहेतच, वेगळीही आहेत. शिर्षक गीत, गुस्ताख दिल ही जास्त आवडली. नवराई माझी लाडाची हेही ठेका धरायला लावते. सगळ्या सिनेमाभर एकच व्हायला हवं होतं ते म्हणजे प्रसंग सीमलेस वाटायला हवे होते. काही ठिकाणी खटके दाबून प्रसंग बदलल्यासारखे वाटले. पण एकूण छान अनुभव. गौरी, श्रीदेवीचे खरेच अभिनंदन.
श्रीदेवी जाम बोर होते. आवाज
श्रीदेवी जाम बोर होते. आवाज डोक्यात जातो. उच्चार महान आहेत त्या बाईचे. वगैरे कारणांने पहायचा विचार नव्हता. इथे आणि जिकडे तिकडे त्याबाबत वाचून पहावासा वाटतो आहे.
मैना +१
मैना +१
श्रीदेवीचा अभिनय मस्तच जमलाय
श्रीदेवीचा अभिनय मस्तच जमलाय ह्यात शंकाच नाही. पहिल्यांदा अमेरिके पर्यंतचा प्रवास एकटीनेच करण्याच्या कल्पनेनंच घाबरणं, कॅफे मधल्या बाईने अपमानित केल्या नंतरचा राग, अगतिकता, घाबरगुंडी, आत्मविश्वास खचणं इ. इ . अफलातून व्यक्त केलंय तिने नुसत्या देहबोलीतून! कम बँक दणदणीत झालंय तिचं इतकं नक्की!
पण मूळात ती माहेरून मराठी की दाक्षिणात्य हा उलगडा नीट होतच नाहीये सिनेमात. तिचे साऊथ कडचे उच्चार खटकतात सुरुवातीला! पण नंतर सवय झाल्यावर तिकडे लक्ष जात नाही. तिने हिंदी पेपर वाचायला घेतला तेव्हा वाटले की ती मूळात साऊथची असेल व मराठी माणसाशी लग्न झाले असेल. पण तिच्या भाचीचे अमेरिकेतले लग्न मराठमोळ्या पद्धतीने दाखविले आहे. :-० म्हणजे माहेरूनही ती मराठीच आहे असे म्हणायला वाव आहे. कि मग तिच्या बहिणीनेही साऊथ कडची असूनही मराठी भ्रतार केला आहे. :-०
जिप्सी ने मटाच्या review मधला हा जो भाग वर एका प्रतिसादा दिला आहे, त्यावरून ती मूळात साऊथची आहे असे दाखविण्याचा प्रयत्न वाटतोय!
"शशी ही मराठी व्यक्तिरेखा असली तरी सगळ्यांना चहा देताना स्वतः कॉफी पिणं. इडली बनवणं. स्वरातला दाक्षिणात्य हेल. आणि केरळी व्यक्तीशी भेट झाल्यावर होणारा आनंद हे पाहिल्यावर शशी मराठी असूनही तिच्यात मराठीपण का जाणवत नाही, याचं उत्तर मिळतं. मूळच्या दाक्षिणात्य तिने गोडबोलेशी लग्न केलंय, हा संदर्भ कुठेही न बोलता अगदी सहज दिलाय. त्याचवेळी अमेरिकेत भाचीच्या लग्नाच्या वेळी सासूला फोन करून नवराई... हे मराठी गाणं लिहून घेणं आणि ते गाणंही अतिशय निखळ वाटतं"
किंवा सिनेमाच्या एडिटिंग मध्ये हा उल्लेख असणारा भाग निसटून गेला असण्याची शक्यता आहे, असं म्हणूया हवं तर!
बघितला .. आवडला .. श्रीदेवीचं
बघितला .. आवडला .. श्रीदेवीचं काम छानच आणि बाकीच्यां ची ही मस्त ..
आवडलाच. श्रीदेवी ऑस्सम! "मी
आवडलाच. श्रीदेवी ऑस्सम! "मी पन्नाशीला आले तरी कित्ती बै अजून ग्लॅमरस" या धडपडीमधे न पडता नायिकाप्रधान, पण ग्लॅमर पासून हट के, तरी ग्रेसफुल लुकिंग अस स्मार्ट कॉम्बिनेशन आहे या रोल मधे आणि श्री डिड इट विथ पर्फेक्शन.
आधी न्यूनगंड, संधी मिळताच त्यावर मात करण्यासाठे चुकत माकत धडपड, मग थोड्याशा कॉम्प्लिमेन्टस मुळे आलेला आत्मविश्वास हे इतकं मस्त दाखवलंय!
यात अनावश्यक ड्रामाचा मोह दिग्दर्शिकेने टाळलाय त्याचं कौतुक वाटलं. बरेच प्रसंग होते तसला भडक ड्रामा टाकण्यायोग्य
******स्पॉइलर अॅलर्ट
त्या फ्रेन्च माणसाला पण ती भारतीय मेलोड्रॅमॅटिक नारीसारखी पूर्ण झिडकारून टाकत नाही की प्रतिसाद/ उत्तेजन पण देत नाही. उलट शेवटी "थॅन्क्स फॉर मेकिंग मी फील बेटर अबाउट मायसेल्फ" असे म्हणते ते आवडलं मला.
)
ऐन लग्नाच्या दिवशी लाडूचा तो अॅक्सिडेन्ट , त्याच वेळी तिची एक्झाम ...अशा वेळी ती तेच करते जे एखादी मध्यमवर्गीय गृहिणी करेल! (अगदी 'बहु बेगम' नाही की 'नातिचरामि' पण नाही !
तसंच ती एक महिन्यात एकदम फाडफाड इन्ग्रजी बोलली असती तर अ. आणि अ. वाटलं असतं पण इथे तिचं शेवटचं भाषण करताना किंचित अडखळतच पण नवर्याला अन पोरांना शॉक देण्याइतपत पुरेसं इन्ग्रजी बोलणं हे छान घेतलंय!
बायदवे अमिताभ चा प्रसंग अनावश्यक वाटला अॅक्चुअली
त्या फ्रेन्च माणसाला पण ती
त्या फ्रेन्च माणसाला पण ती भारतीय मेलोड्रॅमॅटिक नारीसारखी पूर्ण झिडकारून टाकत नाही की प्रतिसाद/ उत्तेजन पण देत नाही. उलट शेवटी "थॅन्क्स फॉर मेकिंग मी फील बेटर अबाउट मायसेल्फ" असे म्हणते ते आवडलं मला. >> + १००००० ही तिच्या मॅच्युअर स्वभावाची झलक एकदा तो टिचर बाहेरुन ऐकत आतलं त्याच्याबद्दलचं गॉसिप ऐकत असतो तेव्हाही तिच्या बोलण्यातून दिसली होती.
अमिताभ बच्चन म्हणजे छानसं डेकोरेशन होतं गं पदार्थावरचं. म्हणजे मूळ पदार्थातला भाग नाही... फक्त डेकोरेशन, सादरीकरण खुलवणारं
अखेरीस पाहिला. आवडला. अ आणि अ
अखेरीस पाहिला. आवडला. अ आणि अ गोष्टी आहेतच, पण जौ द्या. तेवढ्या चालायच्याच.
श्रीदेवी सहन झाली हीच एक अचिव्हमेंट. साड्या सुरेख आहेत अगदी. ओव्हरअॅक्टिंग कमी आहे आणि आवाजाचा पिच बरा आहे.
उच्चार रे देवा!! दीड दशकाहुन अधिक ज्या क्षेत्रात, ज्या भाषेत काम केले तरीही ती भाषा येऊ नये.. अचंबा वाटतो कधीतरी या लोकांचा.
सहज सुंदर!! मला आवडला!
सहज सुंदर!! मला आवडला!
कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.>>
अगदी सहमत!
श्रीदेवीचा चेहरा पूर्वीइतकाच
श्रीदेवीचा चेहरा पूर्वीइतकाच चांगला आहे परंतु नाक काहीतरी विचित्र वाटले.कायतरी सर्जरी फर्जरी केलेली दिसते आहे.
श्रीदेवी चा चेहेरा तरूणपणी
श्रीदेवी चा चेहेरा तरूणपणी प्लास्टिक दिसायचा , ह्यात बोटॉक्स् मुळे तिला जबडा हलवणंही मुश्कील होत असल्यासार खं वाटलं ..
हो जबड्याच्या हालचाली काहीतरी
हो जबड्याच्या हालचाली काहीतरी विचित्र वाटल्या ख-या.
amazing movie..i just loved
amazing movie..i just loved the way Shree has made her comeback. she looks simply superb and carries her soooooooo well.. 10000 +++ for DJ's post. I always loved Shree (YES More than Mrs. Nene).. and Shree rocks here! ...
Pages