
सदमा, चांदनी, लम्हे, चालबाज या आणि अशा कित्येक चित्रपटातुन अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची नंबर वन नायिका श्रीदेवी. बोनी कपूरशी लग्न झाल्यावर अंदाजे एक तप चित्रपटसृष्टीपासुन दूर राहिल्यानंतर तीने "इंग्लिsh विंग्लिsh" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. या चित्रपटाचे प्रोमोज पहिल्यांदा पाहिल्यानंतरच खास चित्रपटातगृहात जाऊन बघण्याचा निर्णय केला होता. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पण रीलीजच्या दुसर्याच दिवशी पाहुन आलो हा चित्रपट आणि तो पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच. 
हि कथा आहे शशी गोडबोले (श्रीदेवी) या पुण्यात राहणार्या मध्यवर्गीय सुखवस्तु घरातील एका स्त्रीची. नवरा (आदिल हुसैन), मुलगा सागर, मुलगी सपना आणि सासुसोबत तिचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला असतो. नवरा चांगल्या पदावर कामाला, मुले चांगल्या शाळेत शिकायला, लग्न, उत्सव प्रसंगी मोतीचूराचे लाडु बनवण्याचा तिचा व्यवसाय असं सारं काही व्यवस्थित असुनही एक गोष्ट शशीला खटकंत असते ते म्हणजे तिला इंग्रजी बोलता न येणं. यावरून तिला स्वतःच्याच घरी बर्याच वेळा अपमानित व्हाव लागत असे. छोट्या छोट्या प्रसंगातुन इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारा तिचा कोंडमारा तिचा यात दाखवला गेलाय. अगदी मुलीच्या शाळेतला प्रसंग असो किंवा "आप मेरी पढाई लोगी? आपको अंग्रेजी पडना आता है?" या मुलीच्या बोलण्यातुन मिळणारे शालजोडीतले यातुन फक्त इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारी घुसमट दाखवली. नवरा आणि मुलीच्या इंग्रजी बोलण्यामुळे आणि ते न समजल्याने ती त्यांच्या बाहेरच्या जगात कुठेही फिट नसते. तिचं एकच मागणं असतं कि प्रेम तर कुटुंबातुन मिळतंय पण पाहिजे ती फक्त थोडी आपुलकी.
अशावेळी अचानक तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा एक प्रसंग घडतो आणि सुरूवात होते ती तिच्या एका नव्या प्रवासाची. तिला तिच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी न्युयॉर्कला जावे लागते. सुरुवातीला तिला काही कारणास्तव एकटीलाचा सर्वांच्या आधी अमेरीकेत जावे लागते. तिचा हा पहिलाच विमानप्रवास. यावेळी व्हिसा काढण्याच्या प्रसंगापासुन इमिग्रेशन पर्यंत केवळ इंग्रजी न बोलता येत असल्याने शशीची होणारी तारांबळ, विमानप्रवासात तिला भेटणारा, अगदी न्युयॉर्कपर्यंत तिची मदत करणारा आणि "इन गोरे लोगोंसे डरना छोड दो और इन्हे तुमसे डरने दो" आणि विमान प्रवासाचा पहिला अनुभव "पहला experience है तो उसे अच्छी तरह से एन्जॉय करो, क्यो कि ये फिरसे नही आयेगा" असा मोलाचा सल्लाही देणारा "तो" हे सगळे प्रसंग मनाची पकड घेतात.
पुढे शशी जेंव्हा अमेरीकेत येते तेंव्हा तिच्यासोबत अशा काही घटना घडतात कि ती कुणाच्याही नकळत चार आठवड्यात इंग्रजी शिकवण्याच्या क्लासेसला जाते. इथे तिच्यासारखेच स्पेन, फ्रान्स, पाकिस्तान, चीन अशा इतर देशातुन इंग्रजी शिकण्यासाठी आलेले मित्र भेटतात. यातील क्लासमधल्या गमती बघताना हा चित्रपट पूर्वीची जुनी टिव्ही मालिका "जबान संभालके" च्या दिशेने जातोय कि काय असं काही क्षण वाटत. इथुनच मग पुढे सुरू होतो तो शशीचा अस्खलित इंग्रजी बोलण्याचा प्रवास.

संपूर्ण चित्रपट कुठेही इंग्रजी भाषेला अति महत्व देणारी एखादी डॉक्युमेंटरी न वाटता सहज आपल्या आजुबाजुला घडत असलेली एखादी गोष्ट वाटते आणि याचे श्रेय जाते ते कथा/पटकथा/संवाद आणि दिग्दर्शन करणार्या गौरी शिंदेला. हा संपूर्ण चित्रपट शशी म्हणजेच श्रीदेवी भोवती फिरतो. तरीही सुलभा देशपांडे, आदिल हुसैन, मेहदी नेबु, या कलाकारांनी आपआपल्या भुमिकेत छाप पाडली आहे. दोन्ही छोट्या मुलांचे कामही झक्कास आहे. श्रीदेवीच्या अभिनयाबाबत तर मी पामर काय बोलणार
मुलीच्या बोलण्याने उदास होणारी प्रसंगी चिडणारी आई, रेस्टॉरन्टच्या त्या प्रसंगाने भेदरलेली भारतीय स्त्री, मुलाच्या हट्टापायी केलेला मायकल जॅक्सनचा थोडासा डान्स, नवर्याने कौतुक करावे यासाठी आसुसलेली बायको, सासुची काळजी घेणारी सुन, न्युयॉर्कमधे साकारलेली विद्यार्थीनी, इंग्रजी क्लासमधला युवक तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी बोलतो तेंव्हाचा तो प्रसंग इत्यादी सारं काही श्रीदेवीने आपल्या सहज सुंदर अभिनयातुन साकार केलंय.
या चित्रपटाचे संगीतही श्रवणीय आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सहजच ओठावर रेंगाळतात. विशेषतः
"नवराई माझी लाडाची लाडाची गं, आवड हिला चंद्राची चंद्राची गं"
बदला नजारा, गुस्ताख दिल आणि Manhattan हि गाणीही मस्त आहेत,
"बर्फी" चित्रपटानंतर पाहिलेला अजुन एक सुंदर चित्रपट. कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.
कलाकार : श्रीदेवी, अदील हुसैन, सुलभा देशपांडे, मेहदी नेबू, प्रिया आनंद
दिग्दर्शन/कथा/पटकथा/संवाद : गौरी शिंदे
निर्माता : सुनील लुल्ला, राकेश झुनझुनवाला, आर बाल्की
संगीत : अमीत त्रिवेदी
गीत : स्वानंद किरकीरे
तटि: चित्रपट रीव्ह्यु लिहिण्याचा जास्त अनुभव नाही (देऊळ सोडला तर) पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच हा प्रयत्न. 
वरील सर्व प्रचि आंतरजालाहुन साभार.
पण जिप्सीचा रिव्ह्यु वाचुन
पण जिप्सीचा रिव्ह्यु वाचुन प्रयत्न करेन बघायचा > +१
संवाद फेकीमध्ये विनाकारण लाडिकपणा असतो अस मलाही वाटत .पण त्याकरता उत्तम सिनेमा मात्र चुकवू नये > +१
सिनेमा छान, दिग्दर्शन सुरेख,
सिनेमा छान, दिग्दर्शन सुरेख, श्रीदेवी अ प्लेझन्ट सर्प्राईज. एकदा नक्की पहावा असा साधासुधा चित्रपट.
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे पर्फेक्ट फिट बसली असती! (श्रीदेवी फॅन्स मला हाणणार आता!
कमबॅक मूव्ही म्हणून हा चित्रपट निवडण्यासाठी मात्र श्रीदेवीचं कौतुक!)
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे पर्फेक्ट फिट बसली असती!>>>
दुर्दैवाने माधुरी अजुनही तिच्या "धक धक" इमेज मधुन बाहेर यायला तयार नाही... तिला कोणी तरी सांगितले पाहिजे की बाई पुर्व पुण्याइ वर किती दिवस रहाणार !!!!
तिने कम बॅक ला निवडला तो ही एकदम टुकार सिनेमा "आजा नच ले " .... आणि अत्ता ही फक्त अँकरींग वर समाधान मानते आहे....
श्रीदेवी तितकी आवडत नव्हती,
श्रीदेवी तितकी आवडत नव्हती, पण हा चित्रपट बघेन. छान लिहिले आहेस.
मोकिमी, माधुरीचे आठ चित्रपट
मोकिमी, माधुरीचे आठ चित्रपट येतायेत. देढ इश्किया त्यातला एक. इश्कियाचा सिक्वेल.
अँकरिंगपण करते आहे? झलक दिखला जा मध्ये परिक्षक होती. तो शो आता संपलाय.
मोकिमी, माधुरीचे आठ चित्रपट
मोकिमी, माधुरीचे आठ चित्रपट येतायेत. देढ इश्किया त्यातला एक. इश्कियाचा सिक्वेल.
अँकरिंगपण करते आहे? झलक दिखला जा मध्ये परिक्षक होती. तो शो आता संपलाय.>>>>
बापरे आठ!!!! माधुरी एक अभिनेत्री म्हणुन फारशी आवडत नसल्याने तिच्या बद्दलची माहिती अपुरी आहे... ( तिचे फॅन आता मला बडवणार!!!!) मला तिचा प्रहार आणि दिल तो पागल है सोडले तर कोणताच सिनेमा फारसा आवडला नव्हता... ती खुप आणि खुपच सुंदर आहे... पण अभिनय करताना ती ते विसरुच शकत नाही... आणि नवे प्रयोग करायला घाबरते...
आजकाल खुप वेगळी व्हरायटी घेवुन इतर नायिका उभ्या आहेत. सध्याच्या नायिका खुप हुषार आहेत. प्रयोगशील आहेत ( उदा राणी, काजोल, प्रियांका, कोंकणा, विद्या...आणि हो आता श्रीदेवी).... काही नाही तर नीदान धाडस तरी करतात. आता बघुया पुढे काय होतय ते....
खूप छान! गौरी शिन्देनी हा
खूप छान! गौरी शिन्देनी हा सिनेमा आपल्या आईला अर्पित केला आहे. घराघरातल्या असन्ख्य आई-मन्डलीना शशी गोडबोलेची ही गोश्ट आपलीच वाटेल. मजा आली.
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे पर्फेक्ट फिट बसली असती! (श्रीदेवी फॅन्स मला हाणणार आता! कमबॅक मूव्ही म्हणून हा चित्रपट निवडण्यासाठी मात्र श्रीदेवीचं कौतुक!) >>>>>>>> नाहि नाहि, फक्त आणि फक्त श्रीच फिट होते, (मी श्रीची फॅन नाहिये
) पण ह्या चित्रपटात श्रीने कमाल केलीय. पुन्हा श्री फॅन क्लब जॉईन करावा लागणार बहुतेक
माधुरी कितीहि चांगली अभिनेत्री असली तरी तिची चित्रपटांची निवड भयानक आहे.
जिप्सी, मस्त रे! कालच पाहिला
जिप्सी, मस्त रे! कालच पाहिला हा चित्रपट. खूपच आवडला. मुळात आम्ही श्रीदेवीचे, तिच्यासाठी रेखा, जयाप्रदा डबिंग करायच्या तेव्हापासूनचे फॅन. लम्हे, चांदनी, गुमराह मुळे तर तिच्या प्रेमात. आणि काय कम बॅक केला बाईने... सणसणीत!!! तब्बल १५ वर्षांनंतर.... ना कसला तरूण दिसण्याचा अट्टाहास, ना तथाकथित हिरॉइनच्या इमेजचा हव्यास, ना कसले मॉडर्न ड्रेसेस, मॉडर्न कशाला, अमेरिकेला जाताना किंवा तिथे गेल्यावर साधा पंजाबी ड्रेस सुद्धा नाही, तर एक से एक भारी भारी साड्या, आणि खणखणीत, अजिबात ओव्हर नसलेला संयत अभिनय.. क्या बात है!! जियो श्रीदेवी!
एका साध्या सुध्या घरेलू स्त्री ची थोडाशी आपुलकी, थोडासा आदर मिळावा म्हणूनची घुसमट, धडपड आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी, समाधानी राहण्याचं घेतलेलं व्रत अप्रतिम दाखवलंय तिने.
बर्याच वर्षानी सहकुटुंब पाहू शकू असा सिनेमा.
छे, छे, माधुरी नाही पेलू शकणार अशी भूमिका आणि असले प्रयोग.. मी कितीही माधुरी फॅन असले तरी माझं हे प्रामाणिक मत आहे.
सही लिहिलेयस रे... आता
सही लिहिलेयस रे...
आता पाहिलाच पाहिजे...
जिप्स्या, छान लिहिलय रे. पण
जिप्स्या, छान लिहिलय रे.

पण परिक्षा जवळ आल्याने लाजेकाजेस्तव नाही पाहिला>>>>>>.नशीब तेवढ तरी कळलं
बापरे आठ!!!! माधुरी एक
बापरे आठ!!!! माधुरी एक अभिनेत्री म्हणुन फारशी आवडत नसल्याने तिच्या बद्दलची माहिती अपुरी आहे... ( तिचे फॅन आता मला बडवणार!!!!) मला तिचा प्रहार आणि दिल तो पागल है सोडले तर कोणताच सिनेमा फारसा आवडला नव्हता... ती खुप आणि खुपच सुंदर आहे... पण अभिनय करताना ती ते विसरुच शकत नाही... आणि नवे प्रयोग करायला घाबरते... >>>>>
+१००००
मी पण श्री फॅन
जिप्स्या...... हेही करायला
जिप्स्या...... हेही करायला लागलासस???? आता इतरांनी काय करायचे????????
हा चित्रपट माझ्या मस्ट सी लिस्टवर आहे.
अदिल हुसैन खुप चांगला अॅक्टर
अदिल हुसैन खुप चांगला अॅक्टर आहे.... ह्यात तो कदाचित गोडबोले वाटला नसेल पण त्याचा प्रेझेन्स नेहेमीच चांगला असतो.... त्याचं काम बघुन तो आणि के.के.मेनन बर्याचदा सारख्या जात कुळीचे वाटतात...
माधुरी त्याभूमिकेत नाही हे
माधुरी त्याभूमिकेत नाही हे फारच बरे आहे. एक तर इनोसन्स नाही. हाइट नाही. परत ते भयानक न्युजर्सी अॅक्सेंट वाले इंग्रजी आधीच मारते ती. ते ऐकायचे तर तिने पैसे द्यायला हवेत. श्रीने स्वतःच्या अभिनयातील तृटी सुधारून अजिबात नाटकी पणा न करता खरा अभिनय केला आहे.
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे पर्फेक्ट फिट बसली असती! >>> नाही वाटलं असं. भान + १. मी मुद्दाम विचार करुन पाहिला माधुरीला तिथे ठेवण्याचा पण श्रीदेवीने सार्थक केलंय त्या भूमिकेचं. आपल्या संसारात सुखी असलेली पण तरीही कुठेतरी दुखावलेली, 'आहे मनोहर तरी गमते उदास' गृहिणी तिने अगदी परफेक्ट उभी केलीय.
मंजिरी सोमण, तुमची पोस्ट आवडूनही तुम्हाला अनुमोदन अशासाठी दिलं नाही की माधुरीने पेलून दाखवावीच अशी एखादी भूमिका अशी माझी इच्छा आहे
सिमन्तिनी, खरं आहे, काही गोष्टी तरीही खटकतात. तिचं साड्या नेसणं, अजूनही काही बारीकसारीक तपशील खटकले पण त्याकडे दुर्लक्ष करता आलं कारण त्यात जो विचार दाखवलाय तो मला प्रातिनिधीक वाटला. अगदी ह्या काळातही. माझ्या आजूबाजूला मी आजही माझ्या वयाच्या काही भारतीय मुली निश्चित बघते ज्यांना इंग्लिश वाचता येतं, समजतं पण बोलायला गेलं की वाक्यं जुळवताना त्यांना फार त्रास होतो ( हा मुद्दा जरा नीट यायला हवा होता. शशीला इंग्लिशची अक्षरओळख नाहीये असे नव्हे. ) ह्या मुली मुंबई-पुण्याच्या असण्याची शक्यता कमी आहे पण. म्हणजे मी पाहिलेल्या तरी तिथल्या नाहीयेत. माझ्या लेकाच्या शाळेतही खास पालकांसाठी इंग्लिश स्पीकिंगचा असा एक वर्ग आठवड्यातून एकदा भरतो.
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे
पण श्रीदेवीऐवजी माधुरी तिथे पर्फेक्ट फिट बसली असती! >>> नाही वाटलं असं. ++१
ह्या मुली मुंबई-पुण्याच्या असण्याची शक्यता कमी आहे पण. म्हणजे मी पाहिलेल्या तरी तिथल्या नाहीयेत.>>>
अगदी पुण्यात सुद्धा इंग्लिश न बोलता येणारी मुलं-मुली आहेत. अगदी पदवीधर-उच्चशिक्षीत ! आणि जे बोलतात तेही व्याकरणाची वगैरे नीट वाट लावून बोलतात
मुम्बईतही माझ्या काकाना हा अनुभव आहे, इंगजी जमत नसेल तर हे लोक हिंदीचा आधार घेतात (समोरचा मराठी असला तरीही) पण मराठी बोलत नाहीत.
** हे दोन्हीकडचे अनुभव नोकरी देणे निमित्ताने आलेले आहेत. असो विषयान्तर झाले! क्षमस्व!
भान +१ छे, छे, माधुरी नाही
भान +१
छे, छे, माधुरी नाही पेलू शकणार अशी भूमिका आणि असले प्रयोग.. मी कितीही माधुरी फॅन असले तरी माझं हे प्रामाणिक मत आहे. >>>> अगदी अगदी.
मी पण माधुरी पंखा (
मी पण माधुरी पंखा ( श्रीदेवीबाबत मामी आणी इतरांशी खूप्प सहमत ). मात्र मोकिमीचे पण पटले. माधुरी नवीन प्रयोग का कोण जाणे करतच नाही. नाहीतर १९४२ लवस्टोरी मनिषा कोईरालाला मिळाला नसता. परिंदानंतर विधु चोप्राने तिलाच विचारले होते आधी.
अर्थात, थोडे वेगळे पाहीजे म्हणून बघावा हा. जिप्सी किती छान लिहीलेत तुम्ही, अचुक मांडलय सगळं.
नाहि नाहि, फक्त आणि फक्त
नाहि नाहि, फक्त आणि फक्त श्रीच फिट होते, >>> भान +१ . सही काम केलयं श्रीदेवीने , अगदी हलका फुलका सिनेमा नक्की बघावा असा. आवडेश !
श्रीदेवीचे तुरळक मूवी सोडले
श्रीदेवीचे तुरळक मूवी सोडले तर बोर वाटायची ती. त्यात ते डबिंग केलेलं हिंदी एकून तर वैताग कानाला. गरागरा डोळे फिरवणे व बावळट भाव चांगले जमतात(मि. ईंडिया, चालबाज वगैरे) तिचे काही मूवी बघितले तर वाटते. इथे लावलेला खालचा फोटोतील तसेच भाव श्रीदेवीने चालबाज, मि. इंडिया व सदमात सुद्धा केलेत... सेम तो सेम.
ह्या मूवीत स्वतः डायलॉग केलेत. बरी वाटतेय पण. ठिक आहे.
मूवीत श्रीदेवी सॉउथ आहे तर बहिणीच्या मुलीच्या लग्नात मराठी गाणं कसे काय?
(इतके वर्ष हिंदी सिनेमात राहून श्रीदेवी, हेमा ह्यांचे सॉउथ उच्चार सुटत नाही हिंदी वा ईंग्लिश बोलताना. .. "आई तॉट इट वीळ बी गूड्ड मूवी आफ्टर लिस्टनिंग्ग टू स्टोरी".. इती श्रीदेवी)
>>>>माधुरी कितीहि चांगली
>>>>माधुरी कितीहि चांगली अभिनेत्री असली तरी तिची चित्रपटांची निवड भयानक >>>><<
+१
पण इथे माधुरी व श्रीदेवीची का तुलना करताहेत लोकं
माधुरीचा चेहरा निरागस दिसत नाही(किंवा बावळट म्हणा) त्यामुळे काही भुमिका तिला फिट नाही होत बहुधा. कधी कधी तर ती खूपच थोराड वाटलीय( हम आपके मध्ये ते लाल मिडी ड्रेस घालून काय ते खोटं लाजणं... छ्या..)
माधुरी व श्रीदेवी ह्यांची खास फॅन नसलेली मी.(पण काही निवडक मूवीज बरे वाटलेली).
काल कौन बनेगा मध्ये श्रीदेवी
काल कौन बनेगा मध्ये श्रीदेवी आणि गौरी शिंदे ना बघितले का? श्री किती भाम्बावाल्यासारखी दिसत होती /वागत होती .का सिनेमातल्या सारखच भांबावल्यासारख अक्टिंग करत होती कि काय तीच तीच जाणे. अजिबात मोकळे पणानी बोलायला जमत नव्हत का तिला ?
त्या दोघींना महाराष्ट्रातल्या एका गावावरून पडलेल्या साडीचे नाव ओळखता आले नाही म्हणून ऑफिस मध्ये चर्चा झाली .आदेश बांदेकर गेली दहा वर्ष पैठण्या वाटतोय आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या या दोन बायकांना एका पुरुषाला याच उत्तर विचारायला लागल. काय म्हणायचं याला :))))))
थोडस विषयांतर झाल खर. त्या बद्दल क्षमस्व
या धाग्यात श्रीदेवीबद्दल
या धाग्यात श्रीदेवीबद्दल "सकारात्मक" लिहिलेल्या सगळ्या पोष्टींना +१०००
आणि आगाऊच्या पोस्टला प्रचंड अनुमोदन.
विकु, तुझ्या फॅक्लमध्ये मीपण आहेच रे
खरंतर हा चित्रपट खास श्रीदेवीसाठीच (चित्रपटाबद्दल कसलीही अपेक्षा न ठेवता
) बघायला गेलो होतो पण कथा, दिग्दर्शन, गाणी, इतर कलाकारांचा अभिनय इ. इ. सगळ्याच गोष्टी इतक्या सह्ही आहेत कि संपूर्ण चित्रपटच खुप आवडला. 
रच्याकने, श्रीदेवी आवडीची नायिका असुनही आतापर्यंत तिचे फक्त दोनच चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिले. पहिला जुदाई (कॉलेजात असताना
) आणि दुसरा इंग्लिश विंग्लिश. :-). यदाकदाचित जर श्रीचे जुने चित्रपट पुन्हा आले तर मला "लम्हे"च्या "पल्लवी"ला मोठ्या पडद्यावर पहायला नक्कीच आवडेल.

झम्पी मुव्हीत श्री देवी साउथ
झम्पी मुव्हीत श्री देवी साउथ नाहीये मराठीच आहे " शशी गोडबोले"
झम्पी मुव्हीत श्री देवी साउथ
झम्पी मुव्हीत श्री देवी साउथ नाहीये मराठीच आहे " शशी गोडबोले">>>>+१
ह्या मुली मुंबई-पुण्याच्या
ह्या मुली मुंबई-पुण्याच्या असण्याची शक्यता कमी आहे पण. म्हणजे मी पाहिलेल्या तरी तिथल्या नाहीयेत.>>>
अगदी पुण्यात सुद्धा इंग्लिश न बोलता येणारी मुलं-मुली आहेत. अगदी पदवीधर-उच्चशिक्षीत ! आणि जे बोलतात तेही व्याकरणाची वगैरे नीट वाट लावून बोलता>>
अनुमोदन !! थोडेसे अवांतर, पण पुण्या मुंबईचे असो वा खेड्यातले , मराठी मीडीयम मधून शिकलेल्यां बहुतेकांच्यात आपण ईंग्रजी मधे फाड फाड बोलू शकत नाही हा न्युनगंड खूप खोलवर रुजलेला असतो. त्यामुळे असे प्रसंग सतत टाळले जातात आणि कीतीही शिकले तरी बोलण्याचा कॉन्फीडन्स येत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. गेली ५ वर्षे अमेरिकेत नोकरी केल्यावारही कधी कधी हा न्यूनगंड डोके वर काढतो. दुसरी कोणतीही फॉरेन लँग्वेज बोलताना जसे जपानी/ जर्मन ई. हा न्युनगंड अजीबात नसतो पण ईंग्रजीला तो येतोच.
बाकी पिक्चर आवडला. श्रीदेवी ला १००% गुण.
http://m.timesofindia.com/ent
http://m.timesofindia.com/entertainment/bollywood/news-interviews/I-am-a...
ही गौरी शिंदेची मुलाखत.
मी सुद्धा माधुरी फॅन , त्यामुळे हा चित्रपट पाहेन की नाही , माहित नाही
>>>>मस्त आहे सिनेमा. तिच्या
>>>>मस्त आहे सिनेमा. तिच्या साड्या एकेक अप्रतिम आहेत. सव्यसाचीने डिझाइन केलेल्या आहेत. नवर्याचा व मुलीचा कुचकट पणा अगदी टोचतो. नवरा गोडबोले वाटत नाही पण छान काम केले आहे. चिक फ्लिक आहे.
काम फार सुरेख केले आहे तिने. १५ वर्शे कुठे होतीस ग बाई असे विचारावे वाटले. मराठी लग्न व माहोल मस्त उभा केला आहे. तिचा होऊ पाहणारा मित्र पण गोड आहे. क्लास मधील प्रसंग मजेशीर आहेत.
गुड व्हॅनिला एंटरटेन मेंट. कुठे ही जीवनातील काजळी, काळ्याबाजूचा स्पर्श नाही. न्यूयॉर्क पण फार नीट तेव्ढेच दाखविले आहे. गाणी मस्त. नवरा साडी आणतो ते जाम आवडले. छोटा सागर तर अगदी खास. अगदी घरी घेऊन जाण्यासारखा वाट्तो. >>>> अमांच्या संपुर्ण पोस्ट्ला अनुमोदन.
साड्या तर फारच आवडल्या. फ्रेंच मित्राचे डोळ्यातले भाव खुप छान वठले आहेत.
तो बाळ विमानात काय खाल्ले ते
तो बाळ विमानात काय खाल्ले ते एका दमात सांगतो आणी बहिण त्याचा कचरा करते ते अगदी खरे सारखे घेतले आहे. प्रसंग लिहायचा नाही तरीपण ते जास्तच आवडले. मी इतकी वर्षे प्रोफेशनल रायटर आहे पण मुले नक्की उच्चारांवरून टर उडवितात. आमचे पुणेरी उच्चार पडतात. बहिणीचे घर आणि ती भाच्ची पण अगदी अगदी.
माझी व नणंदेची अशीच मैत्री आहे त्याहून पटकन रिलेट होता आले.
Pages