मुळ्याचे पराठे

Submitted by सायो on 6 May, 2009 - 23:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

किसलेला मुळा-ज्या प्रमाणात हवा असेल त्या प्रमाणात,
बारीक चिरलेला कांदा- साधारण पाव वाटी,
मसाले- MDH चा पराठा मसाला, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पावडर.
हवा असल्यास अर्धी/एक वाटी बारीक चिरलेला पालक,
भरपूर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, १ चमचा ओवा, फोडणीकरता तेल, जिरं, हिंग, हळद,
४,५ चमचे बेसन,
पराठ्याकरता कणी़क.

क्रमवार पाककृती: 

मुळा किसून घ्यावा. कांदा, पालक, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे.
पसरट फ्रायपॅनमध्ये एक चमचा तेल गरम करुन त्यात जिरं घालावं. जिरं तडतडल्यावर हिंग, हळद घालून त्यावर कांदा परतून घ्यावा. त्यावर बाकीचे मसाले घालून जरा परतून घ्यावं. त्यावर चिरलेला पालक आणि किसलेला मुळा घालून झाकण न घालता शिजू द्यावं. हळूहळू पाणी सुटेल. त्यातच मावेल तेवढं बेसन घालून किंचित गॅस मोठा करावा म्हणजे पाणी पटकन आटेल. चवीप्रमाणे मीठ,घालून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व एखाद्या पसरट प्लेटमध्ये पसरुन गार होऊ द्यावं.
कणकेत मीठ, लाल तिखट, हिंग, हळद, ओवा घालून नीट मिक्स करुन घ्यावं. त्यात हे गार झालेलं मुळ्याचं मिश्रण भरुन अगदी किंचित पाणी घालत घालत घट्ट पीठ भिजवावं व लगेच पराठे लाटायला घ्यावेत.भाजताना दोन्ही बाजूंनी तेल्/बटर लावून पराठे भाजून घ्यावेत.

अधिक टिपा: 

मृण्मयीच्या सांगण्यावरुन पालक घालून केले. छान लागले.

माहितीचा स्रोत: 
मिनोती आणि मृण्मयीच्या टिप्सचा खूप उपयोग झाला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही वाटतेय. लाल मुळ्याची करता येइल बहुदा. करुन पाहिन.

मस्त वेगळीच कॄती आहे.. करुन पाहायलाच हवी...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

नुसत्या मुळ्याचे केलय आता पालक आणि कांदा घालुन करुन बघेन
-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

सायो- छान वाटतेय कृती. मुळा खपत नाही घरी अजिबात. आता करुन पाह्यला हवी.

मुळा मलाही आवडत नाही रैना. पण जपानमध्ये असताना आणखीन एक व्हरायटी म्हणून पराठयांकरता आणायला लागले. नेहमीची पद्धत अशी आहे की मुळा किसून त्याला मीठ, मसाले लावून थोडावेळ ठेवून पाणी सुटू द्यायचं आणि नंतर तो पिळून घेऊन कणकेचा उंडा करुन त्यात सारण भरायचं. पण त्या पद्धतीत पराठे खूप चिकटतात, फाटतात. मी वर लिहिलेल्या रेसिपीत एक कणही पाणी सुटलं नाही.

कविता, मी बटाट्याचे, मिक्स भाज्यांचे पराठे करताना तेलावर कांदा परतून घेते. त्याने मला असं लक्षात आलंय की उरलेली कणीक ठेवून दुसर्‍या दिवशी करायचे झाले तरी चिकटत नाहीत आणि कणीक काळी पडत नाही. नुसता बटाटा तेलावर परतला तर दोन्ही होतं. खरा काही संबंध नसेलही कदाचित पण मला तसं वाटलं.

मुळा जर आलं किसायच्या किसणीने किसला तर छान बारीक किसला जातो आणि पराठा फाटत नाही किंवा मुळे अधनं मधनं बाहेर डोकावत नाहीत. फक्त एकापेक्षा जास्त मुळे किसायचे असतील तर इतक्या बारीकशा किसणीने किसणं जरा अवघड आहे.

मीसुद्धा कविताप्रमाणेच नुसत्या मुळ्याचे केले आहेत. पालक आणि कांदा घालुन करुन बघेन. मुळ्याचे पराठे करताना त्यात आलं घातलं तर मुळ्याचा उग्र वास / चव तितकी जाणवत नाही.
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

किंचित आलं, लसणाची पेस्ट घातली तरी वाईट लागणार नाही.

सायोनारा, जपान मधे खरच भाज्यांचा एवढा दुष्काळ आहे की असे काही करावेच लागते.मी पण इकडे नेहेमी मुळा आणि पालक मिक्स परठे करते.
तुझी रेसिपी छान आहे. घरात दाइकोन आहेच.चला रात्री च्या स्वयपाकाची चिंता मिटली Happy
फक्त MDH चा पराठा मसाला, रजवाडी गरम मसाला दोन्ही नाही आहेत्.एव्हरेस्ट चा गरम मसाला आहे.करून पहाते.

एमबीजपान, ठिक आहे हे मसाले नसले तरी. धणे-जिरे पूड, आमचूर असला तरी चालेल.

याप्रकारे करुन बघायाला हवेत मुळ्याचे पराठे.. मी अगदी पारंपारिक पद्धतीने करते. मुळा किसुन, त्यात मिठ, गरम मसाला, किसलेलं आलं, कोथिंबीर, हिरवी मिर्ची घालते... त्याआधी एका कपड्यात बांधुन मुळ्यातलं पाणी पिळुन काढते. दोन छोटे फुलके बनवुन, त्यादोन्हीच्या आत सँडवीचसारखं सारण भरुन वरुन परत लाटते. तुटत नाही पराठा....पण जरा जपुनच करावा लागतो.