रंगिला रे...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

"लहानपण देगा देवा" हे बरेचदा मोठं झाल्यावरच समजतं. लहानपणी मात्र नावडत्या विषयांचा अभ्यास, आवडत्या मित्रांचं शाळा सोडून जाणं, आवडत्या विषयाचा खूप अभ्यास केल्यानंतरही थोडक्यासाठी पहिला नंबर हुकणं, एक ना अनेक त्रास! सगळं नकोसं होऊन जातं. आठवी-नववीमधे गेल्यावर मोठं झाल्यासारखं वाटतंही, पण 'लहानपणी थोडं बरं होतं नाही का' असंही वाटू लागतं. दहावीबद्दल तर 'नो-कमेंट्स!' सायकलवर टांग मारून घर ते क्लास ते शाळा आणि नंतर घर ते क्लास ते कॉलेज(ज्यु) अशी तंगडतोड सुरु होते, तेव्हा कायनेटिक किंवा स्प्लेंडर्स वरुन जाणारी कॉलेजची पोरं भारी वाटू लागतात. त्यांच्या आयुष्यातला आराम खुणावु लागतो. आपणही लवकर मोठं होऊन त्यांच्यासारखंच सुखी होऊन जावं असं वाटू लागतं.

पण मोठं होताना ह्या सगळ्यातला फोलपणा समजू लागतो. सायकलीच्या जागी बाईक येते खरी, पण अपेक्षित जागातली अंतरंही वाढलेली दिसतात. गोष्टींचं हाताबाहेर असणं आणि त्याचं प्रमाण प्रमाणाबाहेर असणंही समजत जातं. स्पर्धेत टिकण्यासाठी कधीकधी नाईलाजाने का असेना तडजोडी केल्या जातात, मनाविरुद्ध वागावं लागतं. शिक्षण होत आलं की मग नोकरीधंदा - तिथेही आवडीच्या गोष्टी घडणं अवघडच! मग जमेल तसं मार्गक्रमण करत रहावं. पुन्हा मग गोष्टी सार्‍या गोष्टी मनासारख्या होतील, मनाविरुदध वागावं लागणार नाही असं स्वप्न पाहिलं जातं..

* * *

आमच्याइथं पाऊस तसा फार. आडवातिडवा आला पाऊस, की घराच्या भिंती ओलसर होणं ठरलेलं. फार दिवस सलग येत राह्यला, की मग भिंती अर्थातच थोड्याश्या बुरसटल्यागत होणार. आता हे होऊ नये यासाठी लागणारे उपाय करणं होत रहातंच, पण पुढच्या पावसाळ्यात परत येरे माझ्या मागल्या. पण बिल्डींग तशी जुनी झालीये हेही खरंच. मागच्या महिन्यात एक मुंगेरीलाल भेटला. त्याच्याकडे नटवरलाल ऊर्फ धृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती निलकंठ धुमकेतु बारिशकरच्या पावसाचा अँटीडोट होता म्हटला. मुंगेरीलालवर विश्वास टाकून कंत्राट दिलं. दहाएक दिवस एकट्यानं घर रंगवत राहिला आणि जादूच झाली! आतल्या एका खोलीला थोडासा बदामी रंग आणि स्वैपाकघर व बाहेरच्या खोलीला पिस्ता कलर द्यायचं ठरलं होतं. मुंगेरीलालनं काम अगदी चोख केलं होतं!

ठरल्याप्रमाणं सगळं काम संपवून मुंगेरीलाल गेला आणि घर आवरायला घेतलं. बाहेरच्या खोलीत बिछान्याखाली एक लोखंडी संदूक आहे. काही कागदपत्रं शोधण्यासाठी ती उघडली. बर्‍याच फाईल्स होत्या, एकेक फाईल उघडून पाहणं आलंच. 'आवडता मित्र' शाळा सोडून दुसरीकडे गेल्यावर वैतागून त्याला पत्रं लिहीली होती, त्यावर आलेली त्याची उत्तरं एका फाईलमधे सापडली. वडिलांची बदली झाल्यामुळे दहावीच्या वर्षी तो आमची शाळा सोडून दुसर्‍या गावी गेला होता. त्याच्या पत्रातले माझ्या आवडत्या-नावडत्या विषयांचे उल्लेख, त्याचे मार्क्स - माझे मार्क्स आणि हेल्दी कॉम्पिटीशन, एन सी सी चे कॅम्प्स, बॅडमिंटनचं वेड! काय नव्हतं त्यात?

आठवीनववीची दोन वर्षं, शाळेच्या वर्षांमधली सर्वात आवडीची. त्यावेळी घराच्या बाहेरच्या खोलीला तोच 'पिस्ता' कलर होता आणि आतल्या खोल्यांना बदामी. ह्या खोल्यांना दिलेला रंग आणि त्यामागचा थोडकाच अर्थ असलेला विचार इतक्या प्रमाणात आनंद देईल असं अजिबात वाटलं नव्हतं. त्या फाईलमधे सापडलेल्या आठवणी अचानकपणे शाळेत-लहानपणात घेऊन गेल्या. दिवसभर क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट! घरी येऊन बाहेरच्या खोलीत परत 'टाप-टाप-टाप' करत मळलेला 'बीआरआय' बॉल भिंतीवर फेकून फिल्डींगची प्रॅक्टीस. स्वैपाकघरात बॅट घेऊन उभं राहून बाहेरच्या खोलीच्या भिंतीवर बॉलिंग आणि तिथे आपटून परत आलेल्या बॉलवर बॅटिंगची प्रॅक्टीस. घराला दिलेल्या जुन्याच रंगामुळं, त्या नव्या भिंतीवरही 'बीआरआयचे' ठसे दिसू लागले.

* * *

बर्‍याच वेळाने तिथून उठून आतल्या खोलीमधे आलो. लहानपणी जो काही अभ्यास केला तो ह्याच खोलीत. खिडकी उघडी होती आणि खोलीतला बल्ब लावलेला होता. त्या बल्बवर, वळचणीला एक चिमणा पक्षी बसलेला दिसत होता. तेव्हाही त्या दिव्यावर एक पक्षी असायचा. दिवसभर कुठे असायचा काय माहिती, पण तिन्हीसांजेच्या वेळी दिवा लागला रे लागला, की हमखास तिथे येई. मधली बरीच वर्षं जेव्हा केव्हा घरी येणं जाणं होई, तेव्हा तो पक्षी तिथे होता की नव्हता काय माहित? दुर्लक्ष नसावंच पण मुद्दाम पाहिलंही गेलं नाही. की तोही जुन्या रंगातलं काही आठवायला परत आला असेल?

त्या दिवशी काय शोधत होतो ते आता आठवत नाही, आणि काय सापडलं तेही सांगता येणार नाही...

विषय: 
प्रकार: 

मस्त !
>>> त्या दिवशी काय शोधत होतो ते आता आठवत नाही, आणि काय सापडलं तेही सांगता येणार नाही... << वा क्या बात है | खुप जुन्या दिवसात नेलस एकदम Happy

आवडले लेखन,

त्या दिवशी काय शोधत होतो ते आता आठवत नाही, आणि काय सापडलं तेही सांगता येणार नाही... << वा क्या बात है | खुप जुन्या दिवसात नेले एकदम + १००००० Happy

क्या बात है, जिओ दोस्त!
अगदी खरं सांगायचं तर अरे बापरे नॉस्टॅलजिआ का? असं आधी मनात आलं पण तू जो सूर पकडला आहेस तो छानच आहे!

अप्रतिम!!

>>आणि काय सापडलं तेही सांगता येणार नाही...>>>>> ते सापडतं हे मात्र नक्की आणि त्याने दिलेला आनंदसुद्धा नक्की!!!

त्या दिवशी काय शोधत होतो ते आता आठवत नाही, आणि काय सापडलं तेही सांगता येणार नाही... << वा क्या बात है | खुप जुन्या दिवसात नेले एकदम + १०००००
<<<<<<<<<< +१०१ असचं वाटतयं.... Happy

मस्त Happy