एका लाडक्याचा पन्नासावा वाढदिवस

Submitted by अशोक. on 5 October, 2012 - 01:50

आज ५ आक्टोबर २०१२. एरव्ही निरुपद्रवी वाटणारी ही तारीख, पण माझ्या दृष्टीने [तसेच जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात रसिकांच्या दृष्टीनेही] या तारखेला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. बरोबर ५० वर्षापूर्वी... म्हणजेच ५ आक्टोबर १९६२ रोजी एका 'पात्रा'ने इंग्लंड आणि अमेरिकेत चंदेरी पडद्यावर जन्म घेतला आणि त्याच्या जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली. एकमेव व्यक्ती असेल की जी आपल्या कामापोटी समोरच्या व्यक्तीचा थंड डोक्याने वध करूनही पाहाणार्‍यांच्या मनात त्याच्याविषयी 'खूनी' असे चित्र निर्माण करीत नाही, उलटपक्षी त्या कृत्याबद्दल त्याच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त करते.

जगभरातील सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे पात्र म्हणजे अर्थातच "जेम्स बॉण्ड...." एमआय६ या ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस खात्यातील सर्व अधिकार्‍यांचा लाडका गुप्तहेर...कोड नंबर ००७. या नामाचे जनकत्व जाते याला पुस्तकरुपाने वाचकांसमोर आणणार्‍या इअ‍ॅन फ्लेमिंग या लेखकाकडे, जो दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश नेव्हीचा एक ऑफिसर होता. लेखनाची आवड अर्थातच होती आणि नेव्ही संदर्भात गुप्तहेरी करण्याच्या चर्चा सुरू असायच्या त्याचवेळी फ्लेमिंगच्या मनात अशा एका नेव्हल ऑफिसरला 'जन्म' द्यावा की जो बाहेरून सरकारी सेवा करीत आहे, नेव्हीची...पण प्रत्यक्षात तो ब्रिटिश सीक्रेट सर्व्हिसचा एजन्ट आहे. नेव्हीत सिग्नल्ससाठी कोडींगचा वापर होत असल्याने फ्लेमिंगने आपल्या मानसपुत्राला ००७ हा क्रमांक दिला आणि पुत्राचे नामकरण केले 'जेम्स बॉण्ड'. हेच नाव का ठेवले ? तर फ्लेमिंगच्या आवडीनिवडीमध्ये 'पक्षी निरिक्षण' हा भाग होता. त्याने त्या संदर्भात बरीचशी भटकंतीही केली होती. पक्षी निरिक्षण या विषयावरील त्याच्या काळात खूप गाजत असलेल्या पुस्तकाचे नाव होते : Birds of West Indies.. Field Guide आणि या पुस्तकाचा अमेरिकन लेखक होता 'जेम्स बॉण्ड'. पुस्तकाच्या प्रेमात पडलेल्या फ्लेमिंगला हे Masculine नाव आपल्या तितक्याच रफटफ नायकासाठी खूप भावले होते, आणि तिथेच त्याने डॉ.नो या आपल्या पहिल्या कादंबरीसाठी नायकाचे नाव निश्चित केले 'जेम्स बॉण्ड'.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा हा अतिशय आवडता नायक. त्याला कारण असे की, खुद्द केनेडी युद्धकाळात PT109 या युद्धनौकेवर नाविक म्हणूनच कार्यरत होते, युद्धातही भाग घेतला होताच. पुढे राजकारणात पडल्यानंतर विरंगुळ्यासाठी त्यानी बाँड सीरिज वाचण्यासाठी घेतली आणि त्यातील नायकाचे शारीरिक वर्णन, उंची राहणीमान आणि कामे ही जवळपास केनेडी या व्यक्तिमत्वाला शोभतील अशीच, शिवाय जेम्स बाँडदेखील एक नेव्हल ऑफिसर. खास केनेडी आणि कुटुंबियांसाठीही डॉ.नो आणि फ्रॉम रशिया वुईथ लव्ह चित्रपटांचे प्रीमिअर शोज् ब्रोकोली साल्ट्झमन या निर्मात्यांनी आयोजित केले होते.

जेम्स बाँड ही 'आयकॉनिक इमेज' तयार झाली ती अगदी पहिल्या चित्रपटापासून...डॉ.नो. आणि जगभरातील प्रेक्षकांनी त्याला इतके डोक्यावर उचलून धरले की साहजिकच युनायटेड आर्टिस्टच्या टीमने तात्काळ फ्लेमिंगच्या सार्‍या 'बाँण्ड' कादंबर्‍यांचे हक्क विकत घेतले आणि जाहीर केले की 'बाँड मालिका अक्षय राहील...". सुरुवातीला वाटले होते की फ्लेमिंगने लिहिलेल्या एकूण १२ कादंबर्‍यांवरील चित्रपट निघाले की ही मालिका थांबणार. पण तसे होणे शक्यच नव्हते. निर्मात्यांनी कादंबर्‍यांसमवेत 'जेम्स बाँड' हे पात्राचे नावच 'कॉपीराईट' करून घेतले आणि फ्लेमिंगच्या मृत्युनंतर {१९६४ मध्ये फ्लेमिंगचे निधन झाले होते} त्याच्या वारसांना योग्य ते मानधन देऊन नव्या लेखकांच्या टीमकडून 'जेम्स बॉण्ड' हे पात्र केन्द्रस्थानी ठेवून पुढील चित्रपट तयार करण्याचे कार्य चालूच ठेवले. आजमितीला २३ बाँडपट पडद्यावर झळकले असून जगभरातील चित्रपटक्षेत्रातील हे एकमेव असे उदाहरण आहे की, या सीरीजमधील एकाची चित्रपटाने आर्थिक अपयश पाहिलेले नाही.

'हॅरी पॉटर' सीरीजच्या मागोमाग बाँडचित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला आहे. पॉटर सीरिज थांबली आहे, पण आमचा जेम्स बाँड पन्नाशीनंतरही थकायला तयार नाही....तो कायमस्वरुपी 'तरुण'च राहिला पाहिजे...त्याने नेहमी 'पॉश' कपडे घातले पाहिजेच, हातात 'ओमेगा' घड्याळच असले पाहिजे ['ओमेगा' ने जाहिरातासाठी जबरदस्त फी निर्मात्यांना दिली आहे], नित्यनेमाने जेम्स बाँडने क्लब्जमध्ये जाऊन तिथे उंची मद्य...विशेषतः मार्टिनीचे घुटके सुशेगातपणे घेण्याची त्याची अदा ट्रेडमार्क झाली आहे...शिवाय मदनिका त्याच्या सहवासासाठी जणू काही वाटच पाहात राहिल्या आहेत, असा 'करिश्मा' त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती असलाच पाहिजे...अशी जेम्स बाँडप्रेमींची लाडकी मागणी असते...जी ती भूमिका साकारणारा प्रत्येक नायक पूर्ण करतोच.

५ आक्टोबर २०१२ या दिवशी 'जेम्स बॉण्ड' ५० वर्षाचा झाला म्हणून लंडनच्या डार्लिंग किंडर्सलय लि. {डीके नावाने प्रसिद्ध} पब्लिशर्सनी 'JAMES BOND : 50 YEARS OF MOVIE POSTERS" या शीर्षकाने अतिशय देखणे असा 'बाँड स्मृतीगंध' प्रकाशित केला असून त्याची भारतीय रुपयात किंमत २५००/- रुपये आहे..पुस्तकातील पहिल्या पानापासून ते शेवटच्या {आगामी 'स्कायफॉल'} चित्रपतापर्यंत 'बाँड चित्रपटांच्या पोस्टर्स'चा मन हरखून टाकणारा चित्ररुपी इतिहास देखण्या आर्टपेपरवर आणला गेला आहे. पहिल्या डॉ.नो पासून 'पोस्टर्स कसे आणि तसे का असले पाहिजेत ?" या प्रश्नावर वेळोवेळी संबंधितांमध्ये कशी चर्चा होत गेली आणि विविध देशात {भाषेच्या गरजेनुसार} त्यांच्या प्रसिद्धीची मांडणी कशी करावी लागेल ? अमुकच शब्द पोस्टर्समध्ये का आले पाहिजेत ? त्यांची रचना कशी करावी ? रंगसंगती कोणत्या तर्‍हेने असली पाहिजे [लाल आणि पिवळ्या रंगाचा पोस्टर्समध्ये खूप वापर करण्यामागील भूमिका मांडणे]....'फ्रॉम रशिया वुईथ लव्ह' या नावाने भारतात तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नसल्याने [भारताची रशियासमवेत असलेली मैत्री विचारात घेता] मग इथल्याच 'शिवकाशी प्रेस'कडून खास भारतीय मनाला रुचेल असे 'फ्रॉम ००७ वुईथ लव्ह' या नावाने नव्याने पोस्टर्स करून घेणे...बाँडच्या ललना दाखविताना विश्वभरातील सार्‍या खंडांचे त्या प्रतिनिधीत्व करतात असे दाखविण्यासाठी मदनिकांची त्यानुसार कपडे आणि केशरचना, देहरचना दाखविण्याची पोस्टर्स, ब्लॅक अँण्ड व्हाईट पोस्टर्स करायची झाल्यास ती कशी असली पाहिजेत याचा उहापोह. प्रत्येक चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टर्समागील इतिहास आणि ते तसे का तयार करण्यात आले त्याची कारणमीमांसाही त्यासोबत देण्यात आली आहे.

प्रॉडक्शन डिझाईनिन्गसाठी 'ऑस्कर' मिळविलेल्या डेनिस गॅसनर [ज्याने 'कॅसिनो रॉयल' आणि आगामी 'स्कायफॉल' चे डिझाईन केले आहे] याच्या संपादकत्वाखालील टीमने या पुस्तकाची रचना आणि सादरीकरण केले आहे.

[या निमित्ताने १९६२ पासून अगदी पुढील महिन्यात प्रकाशित होत असलेल्या 'स्कायफॉल' पर्यंतच्या बाँडपटांची आणि ते पात्र साकार करणार्‍या नायकांची नावे इथे देत आहे :

१. डॉ. नो ~ १९६२ ~ शॉन कॉनेरी
२. फ्रॉम रशिया वुईथ लव्ह ~ १९६३ ~ शॉन कॉनेरी
३. गोल्डफिंगर ~ १९६४ ~ शॉन कॉनेरी
४. थंडरबॉल ~ १९६५ ~ शॉन कॉनेरी
५. यू ओन्ली लिव्ह ट्वाईस ~ १९६७ ~ शॉन कॉनेरी
६. ऑन हर मॅजेस्टिज सीक्रेट सर्व्हिस ~ १९६९ ~ जॉर्ज लेझन्बी
७. डायमंडस आर फॉरेव्हर ~ १९७१ ~ शॉन कॉनेरी
८. लिव्ह अ‍ॅण्ड लेट डाय ~ १९७३ ~ रॉजर मूर
९. द मॅन वुईथ द गोल्डन गन ~ १९७४ ~ रॉजर मूर
१०. द स्पाय व्हू लव्हड मी ~ १९७७ ~ रॉजर मूर
११. मूनरेकर ~ १९७९ ~ रॉजर मूर
१२. फॉर यूवर आईज ओन्ली ~ १९८१ ~ रॉजर मूर
१३. आक्टोपसी ~ १९८३ ~ रॉजर मूर
१४. अ व्ह्यू टु किल ~ १९८५ ~ रॉजर मूर
१५. द लिव्हिंग डेलाईट्स ~ १९८७ ~ टिमोथी डाल्टन
१६. लायसेन्स टु किल ~ १९८९ ~ टिमोथी डाल्टन
१७. गोल्डन आय ~ १९९५ ~ पीअर्स ब्रॉस्नन
[कायद्याच्या झगड्यामुळे 'बॉण्ड निर्मिती' मध्ये सहा वर्षाचा खंड पडला होता]
१८. टुमारो नेव्हर डाईज ~ १९९७ ~ पीअर्स ब्रॉस्नन
१९. द वर्ल्स इज नॉट इनफ ~ १९९९ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२०. डाय अनादर डे ~ २००२ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२१. कॅसिनो रॉयल ~ २००६ डॅनिअल क्रेग
२२. क्वांटम ऑफ सोलॅस ~ २००८ ~ डॅनिअल क्रेग
२३. स्कायफॉल ~ २०१२ ~ डॅनिअल क्रेग

{याशिवाय शॉन कॉनेरी अभिनित 'नेव्हर से नेव्हर अगेन' हा स्वतंत्र निर्मित एक बॉण्डपट झळकला होता....१९८३ मध्ये}

५० वर्षाच्या या 'तरुणा'चा इतिहास सांगायला एक लेख खूप अपुरा आहे याची मला जाणीव आहे, पण जसे जेम्स बॉण्ड कायमचे 'अमर' असे पात्र झाले आहे तद्वतच त्याच्यावरील विविध रसिकांच्या लेखमालाही सातत्याने जालावर येत राहतील याची खात्री असल्याने, 'वन अ‍ॅण्ड ओन्ली वन ००७ जेम्स बाँड' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा लेख आटोपता घेतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक लेख खूप अपुरा आहे >>>>> अशोकराव, कबुली दिली आहेच तर मग पुर्ण करा. मगच देऊ प्रतिसाद. Happy

@ माधवी....

मलाही हे पटले की लेखात 'बॉण्ड' पटांची एक लिस्ट टाकणे गरजेचे आहे. त्यानुसार ती अ‍ॅडिशन केली आहे.

धन्यवाद.

@ कौतुकराव आणि विजयराव~
लेख खूप मोठा होत चालला आहे हे दिसत होते.....आणि आजच्या तारखेचे [५ आक्टोबर २०१२] महत्व ठेवणे प्रथम प्राधान्य असल्याने लेख प्रकाशित केला आहे. यात नक्कीच वृद्धी होत राहील.

मस्त लेख.. आपला एकदम लाडका हिरो.. बहुतेक सगळ्या चित्रपटांची पारायणं झालेली आहेत. आणि पुढचा येईल तेव्हा आधीचे सगळे परत एकदा टीव्हीवर दाखवतीलच तेव्हा परत एकदा बघितले जातील.. सगळ्यात आवडता बॉण्ड शॉन कॅनेरीच..

मामा लयी भारी लेख. Happy

नेव्हल ऑफिसरला 'जन्म' द्यावा की जो बाहेरून सरकारी सेवा करीत आहे, नेव्हीची>> हे माहिती नव्हतं.
तरीच एका चित्रपटात त्याच नेव्हीच्या बोटीवरुन त्यांच्या परंपरेनुसार त्याच समुद्रात अंतिम संस्कार केल्याच दाखवलय.

कॅसिनो रोयाल ही सुरुवातीच्या बाँड नॉव्हेल्सपैकी एक. माझ्या आठवणीप्रमाणे सर्वात जुनी. पण तिच्यावर चित्रपट मात्र खूप उशिरा आला. अशोकजी, ही माझी समजूत बरोबर आहे का?
(जेम्स बॉण्डचा पंखा) इब्लिस.

डॉक्टर.....यू आर राईट हीअर अबाऊट कॅसिनो रॉयल...अ‍ॅज नॉव्हेल. इतकेच नव्हे तर फ्लेमिंगने लिहिलेली हीच पहिली 'बाँण्ड कादंबरी..." जरी पहिला चित्रपट निघाला तो 'डॉ.नो' या कादंबरीवर.

१९६७ मध्ये कोलंबिया स्टुडिओजने बाँडची लोकप्रियता पाहून या कादंबरीवर आधारित [मूळ कथानक वेगळेच आहे....जे नंतर डॅनिअल क्रेग ला घेऊन पडद्यावर आले] असे एक 'सटायर' निर्माण केले....याच टायटलने....यामध्ये कलाकारांची जंत्रीच अवतरली होती. जेम्स बाँड पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एमआय६ मधून सेवानिवृत्त होऊन शांतपणे समुद्रकिनार्‍या लगतच्या एका बंगलीत आयुष्य कंठू लागतो, पण नित्यनेमाने त्याचे सीनिअर्स त्याच्या गळ्यात आणखीन एक स्पाय ऑपरेशन बांधू इच्छितात....असे काहीसे कथानक होते.

गन्स ऑफ नॅव्हरोनमधील 'डेव्हिड निव्हेन' या कलाकाराने वृद्ध जेम्स बाँण्ड साकारला होता या कॅसिनो रॉयलमध्ये.

दिनेश....

"स्कायफॉल" अद्यापि रीलिज व्हायचाच आहे....सबब, तुम्हीच काय पण कुणीच पाहिलेला नाही. नोव्हेम्बर २०१२ अशी तारीख 'त्या' पुस्तकात दिली आहे.

अल्टीमेट बाँड फक्त शाँ कॉनेरी!
इआन फ्लेमिंगला तो अजिबात आवडला नव्हता पण बॉडपट गाजण्यामागे कॉनेरीचे पहिला बॉड असणे फार महत्वाचे आहे.
मला बॉडपटांपेक्षा त्याचे स्पूफ 'ऑस्टीन पॉवर्स' सिनेमे जास्त आवडतात!!!

अल्टीमेट बाँड फक्त शाँ कॉनेरी!
>>> अनुमोदन. त्यानंतर मला डॅनिअल क्रेग आवडला. पीअर्स ब्रॉस्नन पण छान वाटायचा.

सर्वात फालतू बाँड साकारला टिमोथी डाल्टनने. मला अजिब्बात आवडला नाही.

डॉ. नो मधला समुद्राचा "तो" सुप्रसिद्ध सीन आजतागायत सर्वात सेक्सी सीन म्हणून प्रसिद्ध आहे. Happy

खरंय आगाऊ....या भूमिकेसाठी फ्लेमिंगच्या मनी होता 'कॅरी ग्रॅण्ट'. त्याने हेच नाव निर्मात्यांना सुचविले होते. पण कॅरी ग्रॅण्ट त्या काळात जितके मानधन घेत असे तितके 'डॉ.नो' चे टोटल बजेटही नव्हते....त्यामुळे ते नाव पहिल्या झटक्यातच वगळले गेले. जाहिरात देण्यात आली होती भूमिकेसाठी.

खुद्द शॉन कॉनेरीलाही 'आपण बॉण्डच्या भूमिकेसाठी फ्लेमिंगला अयोग्य वाटत आहे' हे माहीत होते. त्याला कारण 'इंग्लिश' फ्लेमिंगच्या मनी असलेली 'स्कॉटिश' कॉनेरीविषयीची अढी.....इंग्लंडमध्येही ब्रिटिश, स्कॉटीश, वेल्श ही बंडाळी/भेदभाव आहेच.

विशेष म्हणजे शॉन कॉनेरी आणि इअ‍ॅन फ्लेमिंग यांच्यात जास्तीतजास्त दोन-तीन वेळा भेटी झाल्या होत्या, त्याही अन्यांच्या उपस्थितीत.

काहीही असले तरी शॉन कॉनेरीने या भूमिकेचे सोने केले आणि आजही नव्या बॉण्डच्या भूमिकेत कुणीही आले तर त्याची तुलना एकदम शॉन कॉनेरीने साकार केलेल्या भूमिकेशीच केली जाते.

आज सकाळीच अ‍ॅडेलने गायलेले स्कायफॉलचे पूर्ण टायटल साँग रसिकांना पहिल्यांदा ऐकायला मिळाले. बाँडच्या फॅन्ससाठी ही ५० व्या वाढदिवसाची भेट आहे. अ‍ॅडेलने मुलाखतीत सांगितले होते की तिला हे गाणे रेकॉर्ड करायला मिळणे ही तिच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. समीक्षकांना सुद्धा गाणे आवडल्याच्या बातम्या येत आहेत. Happy स्कायफॉल १ नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे.

आगाऊ,

>> मला बॉडपटांपेक्षा त्याचे स्पूफ 'ऑस्टीन पॉवर्स' सिनेमे जास्त आवडतात!!!

हे विधान म्हणजे 'टिळक जयंतीच्या दिवशी आगरकरांचा जाज्ज्वल्य अभिमान' (*१) अशासारखं वाटतं! Lol

पण मीही ऑस्टिन पॉवर्सचा चाहता आहे. Proud

आ.न.,
-गा.पै.

*१ - सौजन्य : मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर? -पु.ल.

बाँड खरंच लाडका हीरो. Happy
मला आपला पीअर्स ब्रॉस्नन आवडला. डॅनिअल क्रेग नाही.

५ नोव्हेम्बर २०१२ या दिवशी 'जेम्स बॉण्ड' ५० वर्षाचा झाला म्हणून >>>
इथे ५ ऑक्टोबर असं हवंय ना!

मस्त परिचय, 'बॉण्ड' माझाही आवडता नायक.

जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली.

'सज्जन' शब्दापाशी अडखळलो, पण नंतर लक्षात आले की तो शब्द अवतरणात आहे. Wink
बॉण्ड बाकी काहीही असेल, पण 'सज्जन' अजिबात नाही. किंबहुना त्याच्या व्यक्तिमत्वातली ही 'वीकेड' छटा त्याच्या लोकप्रियतेसाठी कारणीभूत असावी असे वाटते. ही इज अ लव्हेबल रास्कल !

जेम्स बाँड ही अजरामर व्यक्तीरेखा निर्माण करणार्‍या इयान फ्लेमिंग - व,अर्थातच, मुख्यतः शॉन कॉनरी - याना सलाम. देशाशी [ व पर्यायाने एमआय-५ शी ] असलेलं आत्यंतिक ईमान यामुळे बाँडच्या रगेल व रंगेलपणाला असलेली एक मोहक झालर हे सर्व सिनेमा पहाताना सतत जाणवत रहातेच.
बाँडसारखी एखादी लोकप्रिय काल्पनिक व्यक्तीरेखा, "बार्बी'सारखी जगप्रसिद्ध बाहुली इत्यादींचे वाढदिवस इतमामाने साजरे होणं यांत खास गंमत असते हे नक्की. अगणित लोकाना त्यातून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असावा. इथं तो आनंद वाटल्याबद्दल अशोकजीना धन्यवाद.

Pages