एका लाडक्याचा पन्नासावा वाढदिवस

Submitted by अशोक. on 5 October, 2012 - 01:50

आज ५ आक्टोबर २०१२. एरव्ही निरुपद्रवी वाटणारी ही तारीख, पण माझ्या दृष्टीने [तसेच जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात रसिकांच्या दृष्टीनेही] या तारखेला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. बरोबर ५० वर्षापूर्वी... म्हणजेच ५ आक्टोबर १९६२ रोजी एका 'पात्रा'ने इंग्लंड आणि अमेरिकेत चंदेरी पडद्यावर जन्म घेतला आणि त्याच्या जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली. एकमेव व्यक्ती असेल की जी आपल्या कामापोटी समोरच्या व्यक्तीचा थंड डोक्याने वध करूनही पाहाणार्‍यांच्या मनात त्याच्याविषयी 'खूनी' असे चित्र निर्माण करीत नाही, उलटपक्षी त्या कृत्याबद्दल त्याच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त करते.

जगभरातील सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे पात्र म्हणजे अर्थातच "जेम्स बॉण्ड...." एमआय६ या ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस खात्यातील सर्व अधिकार्‍यांचा लाडका गुप्तहेर...कोड नंबर ००७. या नामाचे जनकत्व जाते याला पुस्तकरुपाने वाचकांसमोर आणणार्‍या इअ‍ॅन फ्लेमिंग या लेखकाकडे, जो दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश नेव्हीचा एक ऑफिसर होता. लेखनाची आवड अर्थातच होती आणि नेव्ही संदर्भात गुप्तहेरी करण्याच्या चर्चा सुरू असायच्या त्याचवेळी फ्लेमिंगच्या मनात अशा एका नेव्हल ऑफिसरला 'जन्म' द्यावा की जो बाहेरून सरकारी सेवा करीत आहे, नेव्हीची...पण प्रत्यक्षात तो ब्रिटिश सीक्रेट सर्व्हिसचा एजन्ट आहे. नेव्हीत सिग्नल्ससाठी कोडींगचा वापर होत असल्याने फ्लेमिंगने आपल्या मानसपुत्राला ००७ हा क्रमांक दिला आणि पुत्राचे नामकरण केले 'जेम्स बॉण्ड'. हेच नाव का ठेवले ? तर फ्लेमिंगच्या आवडीनिवडीमध्ये 'पक्षी निरिक्षण' हा भाग होता. त्याने त्या संदर्भात बरीचशी भटकंतीही केली होती. पक्षी निरिक्षण या विषयावरील त्याच्या काळात खूप गाजत असलेल्या पुस्तकाचे नाव होते : Birds of West Indies.. Field Guide आणि या पुस्तकाचा अमेरिकन लेखक होता 'जेम्स बॉण्ड'. पुस्तकाच्या प्रेमात पडलेल्या फ्लेमिंगला हे Masculine नाव आपल्या तितक्याच रफटफ नायकासाठी खूप भावले होते, आणि तिथेच त्याने डॉ.नो या आपल्या पहिल्या कादंबरीसाठी नायकाचे नाव निश्चित केले 'जेम्स बॉण्ड'.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा हा अतिशय आवडता नायक. त्याला कारण असे की, खुद्द केनेडी युद्धकाळात PT109 या युद्धनौकेवर नाविक म्हणूनच कार्यरत होते, युद्धातही भाग घेतला होताच. पुढे राजकारणात पडल्यानंतर विरंगुळ्यासाठी त्यानी बाँड सीरिज वाचण्यासाठी घेतली आणि त्यातील नायकाचे शारीरिक वर्णन, उंची राहणीमान आणि कामे ही जवळपास केनेडी या व्यक्तिमत्वाला शोभतील अशीच, शिवाय जेम्स बाँडदेखील एक नेव्हल ऑफिसर. खास केनेडी आणि कुटुंबियांसाठीही डॉ.नो आणि फ्रॉम रशिया वुईथ लव्ह चित्रपटांचे प्रीमिअर शोज् ब्रोकोली साल्ट्झमन या निर्मात्यांनी आयोजित केले होते.

जेम्स बाँड ही 'आयकॉनिक इमेज' तयार झाली ती अगदी पहिल्या चित्रपटापासून...डॉ.नो. आणि जगभरातील प्रेक्षकांनी त्याला इतके डोक्यावर उचलून धरले की साहजिकच युनायटेड आर्टिस्टच्या टीमने तात्काळ फ्लेमिंगच्या सार्‍या 'बाँण्ड' कादंबर्‍यांचे हक्क विकत घेतले आणि जाहीर केले की 'बाँड मालिका अक्षय राहील...". सुरुवातीला वाटले होते की फ्लेमिंगने लिहिलेल्या एकूण १२ कादंबर्‍यांवरील चित्रपट निघाले की ही मालिका थांबणार. पण तसे होणे शक्यच नव्हते. निर्मात्यांनी कादंबर्‍यांसमवेत 'जेम्स बाँड' हे पात्राचे नावच 'कॉपीराईट' करून घेतले आणि फ्लेमिंगच्या मृत्युनंतर {१९६४ मध्ये फ्लेमिंगचे निधन झाले होते} त्याच्या वारसांना योग्य ते मानधन देऊन नव्या लेखकांच्या टीमकडून 'जेम्स बॉण्ड' हे पात्र केन्द्रस्थानी ठेवून पुढील चित्रपट तयार करण्याचे कार्य चालूच ठेवले. आजमितीला २३ बाँडपट पडद्यावर झळकले असून जगभरातील चित्रपटक्षेत्रातील हे एकमेव असे उदाहरण आहे की, या सीरीजमधील एकाची चित्रपटाने आर्थिक अपयश पाहिलेले नाही.

'हॅरी पॉटर' सीरीजच्या मागोमाग बाँडचित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला आहे. पॉटर सीरिज थांबली आहे, पण आमचा जेम्स बाँड पन्नाशीनंतरही थकायला तयार नाही....तो कायमस्वरुपी 'तरुण'च राहिला पाहिजे...त्याने नेहमी 'पॉश' कपडे घातले पाहिजेच, हातात 'ओमेगा' घड्याळच असले पाहिजे ['ओमेगा' ने जाहिरातासाठी जबरदस्त फी निर्मात्यांना दिली आहे], नित्यनेमाने जेम्स बाँडने क्लब्जमध्ये जाऊन तिथे उंची मद्य...विशेषतः मार्टिनीचे घुटके सुशेगातपणे घेण्याची त्याची अदा ट्रेडमार्क झाली आहे...शिवाय मदनिका त्याच्या सहवासासाठी जणू काही वाटच पाहात राहिल्या आहेत, असा 'करिश्मा' त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती असलाच पाहिजे...अशी जेम्स बाँडप्रेमींची लाडकी मागणी असते...जी ती भूमिका साकारणारा प्रत्येक नायक पूर्ण करतोच.

५ आक्टोबर २०१२ या दिवशी 'जेम्स बॉण्ड' ५० वर्षाचा झाला म्हणून लंडनच्या डार्लिंग किंडर्सलय लि. {डीके नावाने प्रसिद्ध} पब्लिशर्सनी 'JAMES BOND : 50 YEARS OF MOVIE POSTERS" या शीर्षकाने अतिशय देखणे असा 'बाँड स्मृतीगंध' प्रकाशित केला असून त्याची भारतीय रुपयात किंमत २५००/- रुपये आहे..पुस्तकातील पहिल्या पानापासून ते शेवटच्या {आगामी 'स्कायफॉल'} चित्रपतापर्यंत 'बाँड चित्रपटांच्या पोस्टर्स'चा मन हरखून टाकणारा चित्ररुपी इतिहास देखण्या आर्टपेपरवर आणला गेला आहे. पहिल्या डॉ.नो पासून 'पोस्टर्स कसे आणि तसे का असले पाहिजेत ?" या प्रश्नावर वेळोवेळी संबंधितांमध्ये कशी चर्चा होत गेली आणि विविध देशात {भाषेच्या गरजेनुसार} त्यांच्या प्रसिद्धीची मांडणी कशी करावी लागेल ? अमुकच शब्द पोस्टर्समध्ये का आले पाहिजेत ? त्यांची रचना कशी करावी ? रंगसंगती कोणत्या तर्‍हेने असली पाहिजे [लाल आणि पिवळ्या रंगाचा पोस्टर्समध्ये खूप वापर करण्यामागील भूमिका मांडणे]....'फ्रॉम रशिया वुईथ लव्ह' या नावाने भारतात तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नसल्याने [भारताची रशियासमवेत असलेली मैत्री विचारात घेता] मग इथल्याच 'शिवकाशी प्रेस'कडून खास भारतीय मनाला रुचेल असे 'फ्रॉम ००७ वुईथ लव्ह' या नावाने नव्याने पोस्टर्स करून घेणे...बाँडच्या ललना दाखविताना विश्वभरातील सार्‍या खंडांचे त्या प्रतिनिधीत्व करतात असे दाखविण्यासाठी मदनिकांची त्यानुसार कपडे आणि केशरचना, देहरचना दाखविण्याची पोस्टर्स, ब्लॅक अँण्ड व्हाईट पोस्टर्स करायची झाल्यास ती कशी असली पाहिजेत याचा उहापोह. प्रत्येक चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टर्समागील इतिहास आणि ते तसे का तयार करण्यात आले त्याची कारणमीमांसाही त्यासोबत देण्यात आली आहे.

प्रॉडक्शन डिझाईनिन्गसाठी 'ऑस्कर' मिळविलेल्या डेनिस गॅसनर [ज्याने 'कॅसिनो रॉयल' आणि आगामी 'स्कायफॉल' चे डिझाईन केले आहे] याच्या संपादकत्वाखालील टीमने या पुस्तकाची रचना आणि सादरीकरण केले आहे.

[या निमित्ताने १९६२ पासून अगदी पुढील महिन्यात प्रकाशित होत असलेल्या 'स्कायफॉल' पर्यंतच्या बाँडपटांची आणि ते पात्र साकार करणार्‍या नायकांची नावे इथे देत आहे :

१. डॉ. नो ~ १९६२ ~ शॉन कॉनेरी
२. फ्रॉम रशिया वुईथ लव्ह ~ १९६३ ~ शॉन कॉनेरी
३. गोल्डफिंगर ~ १९६४ ~ शॉन कॉनेरी
४. थंडरबॉल ~ १९६५ ~ शॉन कॉनेरी
५. यू ओन्ली लिव्ह ट्वाईस ~ १९६७ ~ शॉन कॉनेरी
६. ऑन हर मॅजेस्टिज सीक्रेट सर्व्हिस ~ १९६९ ~ जॉर्ज लेझन्बी
७. डायमंडस आर फॉरेव्हर ~ १९७१ ~ शॉन कॉनेरी
८. लिव्ह अ‍ॅण्ड लेट डाय ~ १९७३ ~ रॉजर मूर
९. द मॅन वुईथ द गोल्डन गन ~ १९७४ ~ रॉजर मूर
१०. द स्पाय व्हू लव्हड मी ~ १९७७ ~ रॉजर मूर
११. मूनरेकर ~ १९७९ ~ रॉजर मूर
१२. फॉर यूवर आईज ओन्ली ~ १९८१ ~ रॉजर मूर
१३. आक्टोपसी ~ १९८३ ~ रॉजर मूर
१४. अ व्ह्यू टु किल ~ १९८५ ~ रॉजर मूर
१५. द लिव्हिंग डेलाईट्स ~ १९८७ ~ टिमोथी डाल्टन
१६. लायसेन्स टु किल ~ १९८९ ~ टिमोथी डाल्टन
१७. गोल्डन आय ~ १९९५ ~ पीअर्स ब्रॉस्नन
[कायद्याच्या झगड्यामुळे 'बॉण्ड निर्मिती' मध्ये सहा वर्षाचा खंड पडला होता]
१८. टुमारो नेव्हर डाईज ~ १९९७ ~ पीअर्स ब्रॉस्नन
१९. द वर्ल्स इज नॉट इनफ ~ १९९९ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२०. डाय अनादर डे ~ २००२ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२१. कॅसिनो रॉयल ~ २००६ डॅनिअल क्रेग
२२. क्वांटम ऑफ सोलॅस ~ २००८ ~ डॅनिअल क्रेग
२३. स्कायफॉल ~ २०१२ ~ डॅनिअल क्रेग

{याशिवाय शॉन कॉनेरी अभिनित 'नेव्हर से नेव्हर अगेन' हा स्वतंत्र निर्मित एक बॉण्डपट झळकला होता....१९८३ मध्ये}

५० वर्षाच्या या 'तरुणा'चा इतिहास सांगायला एक लेख खूप अपुरा आहे याची मला जाणीव आहे, पण जसे जेम्स बॉण्ड कायमचे 'अमर' असे पात्र झाले आहे तद्वतच त्याच्यावरील विविध रसिकांच्या लेखमालाही सातत्याने जालावर येत राहतील याची खात्री असल्याने, 'वन अ‍ॅण्ड ओन्ली वन ००७ जेम्स बाँड' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा लेख आटोपता घेतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक.,

छान माहीती आहे. लेखामागील परिश्रम आणि विषयाची आवड जाणवते.

माझं वैयक्तिक मत वेगळं आहे. मला बाँडपट फारसे आकर्षक वाटले नाहीत. वस्तुस्थितीपासून बरेच दूर गेलेले वाटतात. आता असं बघा की जो हेर आहे, त्याने गर्दीत बेमालूम मिसळून जायला नकोका? इथे तर आपले साहेब बुडाखाली अलिशान गाडी आणि बगलेत धमाशान बाई मारून हेरगिरीला चाललेत! Lol

जॉन ले कॅरेय या लेखकाने इथे म्हंटलंय तसा बाँड एक आंतरराष्ट्रीय गुंड वाटतो! अगदी दा.इ.सारखा! Proud या लेखकाची Tinker Tailor Soldier Spy ही कादंबरी वाचलीत तर बाँडपट विनोदी वाटू लागतील! Biggrin तेव्हा सांभाळून!!

असं असलं तरी विषयाचं सादरीकरण खूप आवडतं. म्हणूनच न भावणार्‍या आशयाच्या कलाकृतींची जोरकस अभिव्याक्तीमुळे प्रशंसा करावीशी वाटते. अशी ही न आवडूनही आवडणारी चित्रपटमालिका आहे. या प्रकारचा थोडा वेध घ्यायचं ठरवलं. तेव्हा एक बाब जाणवली.

आपण हिंदी सिनेमा पाहतो तो डोके जरासे बाजूला ठेवूनच! भारतीय माणसाला अश्या प्रकारची करमणूक आवडते. आता आंग्लजगतातील सर्वसामान्यांचा स्वभाव काही भारतीयांपेक्षा खूप वेगळा नाही. मग तिथे मसाला हिंदी सिनेमासारखी करमणूक का नाही असा प्रश्न पडला. तर याचं उत्तर म्हंजे बाँडपट! जे जीवन सर्वसामान्य पाश्चात्य माणूस जगू इच्छितो पण जगू शकत नाही ते सारं एकत्र कोंबलं की झाला बाँडपट तय्यार! वास्तवाशी फारकत वगैरे... चलता है भाय! Happy नेमक्या याच कारणामुळे बाँडपटांची खिल्ली उडवणारा ऑस्टिन पॉवर्सही लोकांना आवडतो.

घरोघरी मातीच्याच चुली! Happy

आ.न.,
-गा.पै.

@ निंबुडा ~ थॅन्क्स फॉर द पॉईन्ट. तारीख दुरुस्त केली आहे. बाकी ठिकाणी आक्टोबर असताना नेमकी तिथेच कसे काय नोव्हेम्बर टंकले गेले, हे समजत नाही. वास्तविक लेख प्रकाशित करण्यापूर्वी मी एकदा नाही तर दोनतीनदा शुद्धलेखनासाठी तसेच अन्य रेफरन्सेस योग्य आहेत का नाही याची खातरजमा करून घेतो.

पण असो. होत अशी एखादी "निर्व्याज' चूक.

@ ज्ञानेश ~ येस्स....अगदी अगदी...मला 'रास्कल' [डार्लिन्ग रास्कल] याच नामाचे योजन करायचे होते. नंतर लक्षात आले की ती तर एक शिवी होऊ शकते, त्यामुळे वक्रोक्तीचा आधार घेऊन 'सज्जन' पद बहाल केले, त्या बाळाला.

@ भाऊ नमसकर ~ तुम्ही इंग्रजी चित्रपटप्रेमी आहात हे मला 'पॅटन' वरून समजले होतेच, त्यामुळे लेख देतेवेळी मला नक्की जाणवत होते की तुम्ही याही लेखाला हिरवा कंदील दाखविणार. धन्यवाद.

[या एकाच विषयावर खूप काही लिहिता येण्यासारखे आहे....पाहू या प्रतिसादातून एकेक पदर उलगडत गेला तर मला आनंदच होईल.]

@ गामापैलवान....~ थोड्या वेळाने सविस्तर लिहितो तुमच्या प्रतिसादाबद्दल. तो आवडला आहे हे आत्ता सांगून ठेवतोच.

अशोक पाटील

मस्त लेख आहे. अभिनंदन!!!

खरे ऊपकार पीअर्स ब्रॉस्नन आणि 'गोल्डनआय' च्या टीमचे मानले पाहिजेत.
टिमॉथी डाल्टनच्या रया गेलेल्या 'लायसन्स टू किल' नंतर आणि निर्माते आणि स्टुडिओ मालकांच्या ६ वर्षे चाललेल्या भांडणामध्ये रद्द झालेल्या १९९१ च्या बाँडपटानंतर 'जेम्स बाँड' एका बॅड नोटवर संपला हे सगळ्यांनी गृहीतच धरलं होतं.

नवीन बाँड, नेहमीच्या लंडनमधल्या स्टुडिओचा असहकार, बजेटची मारामार अश्या सगळ्या परिस्थितीत निर्मात्यांनी एक शेवटचा प्रयत्न करायचे ठरवले, आणि गोल्डनआयच्या यशाने बाँडला संजीवनी दिले.
हा प्रयत्न फ्लॉप झाला असता तर 'शेरलॉक होम्स आणि बॅटमॅन' सारखे बाँडपटांचे पुन्हा कोणी आणि कधी पुनरूज्जीवन केले असते देव जाणे.

मला डॅनियल क्रेग सॉलीड आवडला. तो जरा नो-नॉन्सेन्स आणि हेडस्ट्राँग बाँड वाटतो.

मामा पैलवान यांच्या पोस्टसदर्भात कांही मुद्दे मांडावेसे वाटतात-
अगदीं सॉमरसेट मॉमपासून अनेक मातब्बर लेखकानी हेरगिरीवर कादंबर्‍या लिहील्या आहेत व त्यातील कांही लिखाणाचं तरी साहित्यिक मूल्य, हेरगिरीच्या विविध पैलूंचं अधिकारवाणीने केलेलं विश्लेषण इ. इअ‍ॅन फ्लेमिंगच्या लिखाणापेक्षां वरच्या दर्जाचं ठरण्यासारखंच आहे. एकच उदाहरण जॉन ले कॅरेयच्याच " The Spy who came in from the Cold " चं ; हेरगिरीचे डांवपेंच, भावनाशून्य वातावरण व त्यांत एखाद्या हेराची होणारी ससेहोलपट प्रभावीपणी मांडलेल्या या पुस्तकाने मला भारावून टाकलं होतं. मग रिचर्ड बर्टनसारख्या कसलेल्या नटाला घेवून त्यावर त्याच नांवाचा सिनेमा काढण्यात आला. सिनेमाने कादंबरीला न्याय दिला पण मनात ठसला तो फक्त पुस्तकातलाच स्पाय ! त्याउलट , इअ‍ॅन फ्लेमिंगच्या कादंबर्‍या वाचल्या तरी माझ्या नजरेसमोर येतो तो त्या कादंबर्‍यांवर आधारलेल्या चित्रपटांतील जेम्स बाँड !! म्हणूनच ५०वा वाढदिवस साजरा केला जातोय तो कादंबरीतील नव्हे तर डॉ. नो या चित्रपटातील जेम्स बाँडचा , असं मला वाटतं.

रॉजर मूर बद्दल कोणी काहीच न लिहिल्याबद्दल जाहीर नाराजी Sad
मला आवडलेला बॉन्ड हा रॉजर मूर
आणि न आवडलेला शॉन कॉनेरी,
अजिबात शोभत नाही खुप म्हातारा वाटतो.

<< अजिबात शोभत नाही खुप म्हातारा वाटतो.>> ५०व्या वाढदिवसाला तणाबांड[बाँड] थोडाच दिसणार तो ! Wink

अशोकजी, खुप छान आणि समयोचित लेख. Happy

हा लेख जरी जेम्स बाँड या व्यक्तीरेखेबद्दल असला तरी थोडेसे विषयांतर करतो.
जेम्स बाँड ही व्यक्तीरेखा साकारणार्‍या कलाकार निवडीसाठी काही अटी आहेत, त्या सर्व अटी पुर्ण करणारा नटच निवडला जातो असे कधीतरी वाचनात आले होते पण नेमके आठवत नाही. जसे तो कलाकार ब्रिटीश (का स्कॉटिश?) असावा, वगैरे.
याबद्दल कुणाला माहिती आहे का?

@ गामा पैलवान ~

प्रतिसादात तुम्ही म्हणता, "बाँडपट फारसे आकर्षक वाटले नाहीत..." इथे 'फारसे' च्या योजनेबद्दल आभार....म्हणजेच इन टोटो तुम्ही बाँडपटांना रीजेक्ट केलेले नाही असाही एक पॉझिटिव्ह अर्थ मी काढू शकतो. तसे पाहिले तर 'निखळ मनोरंजन" या संज्ञेखाली अशा धाटणीचे चित्रपट येत असल्याने त्यांच्याकडून कुणी 'कॅसाब्लांका' वा 'रोमन हॉलिडे' चा हळुवारपणा अपेक्षित धरत नाही. दीडदोन घटका तो थरार अनुभवावा आणि थिएटरबाहेर पडल्याक्षणीच ते विसरले जाणे गरजेचे होते, कारण घरी जाताना रात्रीच्या जेवणासाठी बायकोने आणायला सांगितलेली भाजी आता कुठे मिळेल याचा भुंगा डोक्यात घुमू लागतो.

"आपले साहेब बुडाखाली अलिशान गाडी आणि बगलेत धमाशान बाई मारून हेरगिरीला चाललेत !...." आता त्याच्या जनकपित्याने त्याला अशीच जीवनशैली दिली असल्याने निर्मात्यांनीदेखील त्याला तसाच सादर केला आहे, इतकेच म्हणू शकतो आपण. बरे आले आहे, नशिबी त्याच्या, तर ते सुख तो भोगणारच असेही म्हणता येईल.

जॉन कॅरेयचे मत मी वाचले आहे. अशा एका लेखकाने दुसर्‍या लेखकाच्या संदर्भात काढलेल्या उदगाराला फारसे महत्व देण्याचे कारण नाही, गामा जी. ही प्रथा तर शेकडो वर्षापासूनची असून केवळ मिस्ट्री सस्पेन्स लेखनाविषयीच मर्यादित नसून अगदी क्लासिक समजल्या जाणार्‍या साहित्यकृतीविषयीदेखील दोन भिन्न साहित्यिक 'त्याच्यापेक्षा मीच कसा शहाणा' ही टिमकी वाजवीत असतात. अगाथा ख्रिस्तीच्या लिखाणाबद्दल एका ज्येष्ठाने काढलेले उदगार पाहा : "Her stories are phony, and worst of all, they cheat." सर आर्थर कॉनन डॉयलचा मानसपुत्र 'शेररलॉक होम्स' ची टवाळी उडविणारे समीक्षक खुद्द लंडनमधीलच आहेत.
[आपल्याकडील रा.रा.भालचंद्र नेमाडे यांची अगदी आचार्य अत्रे यांच्यापासून ते आजच्या गवस यांच्यापर्यंत झाडून सार्‍या साहित्यिकांविषयी मते तुम्ही वाचली आहेत ? नसल्यास ती तुम्ही जरूर वाचा, मग तुम्हाल पटेल की जॉन कॅरेय याने फारच मवाळ मत मांडले आहे.]

"....असं असलं तरी विषयाचं सादरीकरण खूप आवडतं. ..." हे तुमचे मत मला भावले. शेवटी शाडू पाहणे आणि त्याच शाडूपासून निर्माण करण्यात आलेली मूर्ती पाहणे आनंददायक असतेच.

धन्यवाद......

@ भाऊ नमसकर ~

तुम्ही सॉमरसेट मॉमचा उल्लेख केला आहे वरील प्रतिसादात. मी अगदी रेमण्ड चँडलर, व्हॅन डाईन, गार्डनर, ऑस्टीन फ्रीमन, रेक्स स्टाऊट, एलरी क्वीन यांच्यासारख्या अगाथा ख्रिस्ती तसेच सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या तुलनेत कमी प्रसिद्ध लेखकांचे अशा विषयावरील साहित्य वाचले आहे. यातील कित्येक फ्लेमिंगपेक्षाही उजवे लिखाण करणारे होऊन गेले आहेत. तरीही फ्लेमिंगने 'जेम्स बाँड' या व्यक्तिभोवती खास असा एक ब्रिटिश सैनिकाचा 'करिष्मा' गुंफला तो युरोपीअन्सना फार भावला....दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते, लोक त्या धक्क्यापासून सावरले होते...जेते आणि पराभूतसुद्धा रोजीरोटीच्या तलाशमध्ये अडकले होते....हळुहळू जीवनशैलीचे रहाटगाडगे वंगणाशिवायही चालू लागले आणि अशा समयी दोन चार घटका मनोरंजन करू शकणारा कुणीतरी मनाला भावणारा नायक रात्रीच्यावेळी वाचण्यासाठी असावा अशी कल्पना मनी रुंजी घालत असतानाच फ्लेमिंगचा हे चिरंजीव [जे खरेच 'चिरंजीव' राहतील असे वाटते] या वाचकाच्या हाती पडले आणि त्यातील त्याची छबी त्याला खूप भावली, इतकी भावली की तो स्वतःला बाँडच्या जागी कल्पू लागला. त्यामुळे लेखन गुणवत्तेच्या प्रश्नाबाबत फ्लेमिंग जॉन कॅरेयची बरोबरी कधीच करू शकत नसला तरी त्याने त्या काळातील वाचनाची नेमकी गरज हेरली होती व त्यानुसारच आपल्या नायकासाठी कपडे शिवले.

जॉन ले कॅरेयची " The Spy who came in from the Cold " ही कादंबरी वाचण्यापूर्वी मी रिचर्ड बर्टन अभिनित तो चित्रपट पाहिला होता. रिचर्ड बर्टनच्या अनेक अजरामर भूमिकेपैकी ही एक हे नक्कीच. विशेष म्हणजे त्याला या चित्रपटासाठी "ऑस्कर नॉमिनिशेन'ही लाभले होते.....पण नेहमीप्रमाणे हुकले. दुर्दैवी रिचर्ड बर्टन....ज्याला चक्क ७ वेळा बेस्ट अ‍ॅक्टरचे नॉमिनेशन्स मिळूनही एकदाही तो ते जिंकू शकला नाही. ..... पीटर ओ'टूल, कॅरी ग्रॅण्ट प्रमाणे बर्टनही वंचित राहिला ऑस्करपासून.

....५०वा वाढदिवस साजरा केला जातोय तो कादंबरीतील नव्हे तर डॉ. नो या चित्रपटातील जेम्स बाँडचा ~ अगदी योग्य मत. आज जगभरातील प्रिंट मिडियामधून बाँडचा ५० वा वाढदिवस साजरा होतोय तो पडद्यावरील जेम्स बाँडचा. कादंबरीतील नव्हे. मी लेखात उल्लेख केलेल्या त्या पुस्तकातदेखील 'चित्रपटातील बाँडची ५० वर्षे' असेच म्हटले गेले आहे.

@ चमन ~ धन्यवाद. केसची माहिती इथे शेअर केल्याबद्दल खास आभार. मला अर्थातच त्या खटल्याची सारी माहिती आहे [वर मुख्य लेखात तसा पुसटसा मी उल्लेख केला होताच]....पण त्याविषयी इथे लिहित गेलो असतो तर मुख्य प्रयोजन जे वाढदिवसाचे आहे, तिकडे दुर्लक्ष होईल अशी भीती वाटली.

@ गिरीश ~ थोड्या वेळाने सविस्तर लिहितो तुम्ही केलेल्या चौकशीबद्दल.

हॅल्लो गिरिश जी....

काहीसा उशीर होत आहे तुमच्या प्रतिसादाला उत्तर देण्यात. तरीही.....

'जेम्स बॉण्ड' चा जनक इअ‍ॅन फ्लेमिंग हा कट्टर ब्रिटिश परंपरेचा पाईक होता तसेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रॉयल नेव्हीमध्ये नोकरी करताना त्याने युद्धभूमीवरील साहसाचाही अनुभव घेतला होता. युद्धोत्तर काळात त्याने लेखनाला सुरुवात केली असल्याने आपल्या मानसपुत्राला त्याने 'ब्रिटिश'च रंगविणे साहजिकच होते. त्याच्या [पात्राच्या] आवडीनिवडी-सवयीही ब्रिटिश धाटणीच्या - उमरावी थाटाच्या - दाखविल्या गेल्या आहेत, मुद्दामून.

साहजिकच ईऑन प्रॉडक्शन्स टीमच्या साल्ट्झमन आणि ब्रोकोली यानीही साहेबमजकूर एजंट ००७ हे इंग्लंड भूमीतीलच असले पाहिजेच अशी जरी अट मानली नसली तरी एक 'प्रथा' म्हणून स्वीकारली. डॉ.नो या पहिल्या पटासाठी डेव्हिड निव्हेन या ब्रिटिश अभिनेत्याची त्यामुळेच निवड करण्यात आली होती. पण निव्हेन यानी 'मी या भूमिकेसाठी वयामुळे योग्य वाटत नाही...' [डॉ.नो चित्रपटाच्या समयी त्यांचे वय ५२ होते] असे सांगून नकार दिल्यावर मग शोधमोहिमेंतर्गत शॉन कॉनेरी ह्या स्कॉटिश अभिनेत्याची निवड झाली. त्याच्यानंतर आलेला जॉर्ज लेझन्बी जन्माने ऑस्ट्रेलियन असला तरी त्याने लंडन हेच आपले घर आणि कर्मभूमी मानली होती...शिवाय ऑस्ट्रेलिया हे ब्रिटिश साम्राज्याचाच भाग असल्यानेही जॉर्जची त्या भूमिकेसाठीची निवड कट्टर ब्रिटिशांना खटकली नव्हती. त्या नंतरचा रॉजर मूर तर पक्का ब्रिटिश. टिमोथी डाल्टन 'वेल्श' प्रांतातील तर पीअर्स ब्रॉस्नन हा 'आयरिश'....आत्ताचा डॅनिएल क्रेग परत 'इंग्लिश'.

....आता ह्या निवडी इतक्या पक्क्या झाल्या आहेत की इथून पुढे कधीकाळी बाँड अभिनेता बदलायचा झाल्यास प्रथम पसंती ब्रिटिश रक्तालाच जाणार हे नि:संशय. पण हा काही निर्मात्याचा 'नियम' नाही. त्यामुळे उद्या निर्मात्याच्या नवीन पिढीला बाँड महाशयांची 'जन्मभूमी' बदलावीसी वाटली तर ती तसे करूही शकेल.... [शक्यता जरी अंधुक असली तरीही !]

>>जेम्स बाँड ही व्यक्तीरेखा साकारणार्‍या कलाकार निवडीसाठी काही अटी आहेत, त्या सर्व अटी पुर्ण करणारा नटच निवडला जातो असे कधीतरी वाचनात आले होते पण नेमके आठवत नाही. जसे तो कलाकार ब्रिटीश (का स्कॉटिश?) असावा, वगैरे.<<
एक गंमत म्हणून हा धागा बघा Wink

अशोक.,

मतांतर असूनही प्रतिसाद आवडल्याबद्दल धन्यवाद! Happy

बाँडपट मला आकर्षक वाटले नाहीत कारण ते वस्तुस्थितीशी जुळत नाहीत म्हणून. पण एखादा अवचित टीव्हीवर लागला तर पूर्ण पाहीन. कारण हा प्रकार रहस्यपटाच्या थोडा जवळ जाणारा आहे. सोबत चालतीबोलती प्रेक्षणीय स्थळेही आहेत. Wink

जॉन ले कॅरेयने हेरसंस्थांत कार्य केलेले असल्याने त्याच्या मतांना साहजिकच वजन प्राप्त होते. एक गोष्ट खरी की हेरगिरी हा अत्यंत दीर्घसूत्री (म्हणूनच प्रेक्षकांच्या दृष्टीने कंटाळवाणा) प्रकार आहे. अस्सल हेरकथेवर बेतलेल्या चित्रपटापेक्षा काल्पनिक हस्तकपट (वा मारधाडपट) लोकांची गर्दी खेचणार.

त्यामुळे डोके बाजूला पहावेत असे हे बाँडपट आहेत. आंग्लजगतातील सर्वसामान्य माणसाचं स्वप्नरंजन आहेत. एकदा का हे ध्यानी आले की निखळ आस्वाद घेता येतो! Happy

आ.न.,
-गा.पै.

ग्रेट!!! मस्त आहे लेख!!! Happy अशोकजी, तुमचे बाँड ज्ञान अगाध आहे Happy

प्रतिक्रिया पण छान आहेत सगळ्यांच्या Happy

जेम्स बाँड एकदम आवडता आणि अल्टीमेट बाँड फक्त शॉन कॉनेरी!

त्याच्यनंतर नंबर पीअर्स ब्रॉस्नन... आणि मग रॉजर मूर...

टिमोथी डाल्टन आणि डॅनिअल क्रेग हे बाँड वाटतच नाहित... तो चार्मच नाही त्यांच्यात...

आमच्याकडे बाँडपट मॅरेथॉन सुरु झालिये Happy परवाच 'गोल्डन आय' बघितला आणि या आठवड्यात 'द स्पाय व्हू लव्हड मी' ...

सगळेच बॉंडपट आवडतात पण मला जास्त आवडलेले - गोल्डफिंगर, यू ओन्ली लिव्ह ट्वाईस, डायमंडस आर फॉरेव्हर, आक्टोपसी, टुमारो नेव्हर डाईज....

धन्यवाद लाजो जी [हे नाव टंकताना अचानक 'बुनियाद' मालिका आठवली]

~ शॉन कॉनेरीला तुम्ही 'वरचा सा' दिल्याबद्दल आभार. हल्लीच्या बर्‍याच चित्रप्रेमींना कॉनेरी तितकासा पसंत पडत नसल्याचे मला आढळले, पण असो....व्यक्ती तितक्या प्रवृत्ती....आवडनिवड ही नेहमी दोलायमान स्थितीत असते. काल कॉनेरी न आवडणार्‍याला मी जर आज फ्रॉम रशिया वुईथ लव्ह दाखविला तर त्याचे मत बदललेले दिसून येईल....आणि मुळात आपण प्रेम करतो ते 'जेम्स बाँण्ड' या व्यक्तिरेखेवर....ती पडद्यावर कोण साकारतो ही बाब नक्कीच मतभेदाची होऊ शकते.

तुमच्याकडे 'बाँड मॅरेथॉन' सुरू झाले, पण अजून इकडे भारतात कोणत्याच चॅनेलने हा इव्हेन्ट 'स्पेशल' आहे असे मानले नसल्याचे दिसत आहे.

अशोक काका,
मध्यंतरी स्टार टीव्हीवर बाँड पटांची सिरिज दाखवली गेली होती. बाँडच्या टायटल साँगचे इंडिजिनायझेशन लै भारी होतं त्याच्या जाहिरातीत. मी रिंगटोन बसवला होता तो. सापडला तर लावतो इथे.

हे घ्या : http://www.mediafire.com/?3j9t96dzbx6mrdl
डालो करून ऐकावे लागेल. mp3 आहे.

टिमोथी डाल्टन आणि डॅनिअल क्रेग हे बाँड वाटतच नाहित... तो चार्मच नाही त्यांच्यात... >>> डाल्टनने (आणि त्याच्या टीमने) त्याच्यामते ठरवून झगमगाट आणि स्टाईलमध्येच अडकलेल्या बाँडचा माणूस म्हणून व्यक्त होण्यासाठी त्याच्यातला अ‍ॅरोगन्स आणि खुनशीपणा दाखवत स्टाईल आणि झगमगाटाला कमी करत 'बाँडच्या' व्यक्तीमत्वाचे कंगोरे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण प्रेक्षकांना तो रूचला नाही.
त्याच्या ह्या दृष्टीकोनातून एवढ्यातच 'लायसेंस टू कील' बघितला आणि तो म्हणतो तसे नक्कीच जाणवले.

'कॅसिनो रोयाल' मध्ये हाच सुवर्णमध्य साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
ब्रॉस्ननच्या बाँडच्या सगळ्यात जास्त आयएमडीबी रेटींग पेक्षा क्रेगचा 'कॅसिनो रोयाल' जवजवळ दोन्-तीन स्टँडर्ड डेवीएशनने वर गेला. अर्थात एकाच सिनेमाच्या रेटींगने काही अनुमान काढता येत नाही म्हणा.

'क्वांटम ऑफ सोलेस' बकवासच होता. त्यात ना बाँड दिसला ना त्याची स्टाईल ना झगमगाट.

Pages