'संहिता', 'पुणे ५२' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात

Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 October, 2012 - 02:37

मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.

१८-२५ ऑक्टोबर, २०१२ हा या महोत्सवाचा कालावधी आहे. दोनशेहून अधिक चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. यंदाच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे 'इंडिया गोल्ड' हा नवीन स्पर्धाविभाग. भारतीय चित्रपटसृष्टीचं शतकमहोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी यावर्षीपासून या खास विभागाचा समावेश स्पर्धेत करण्यात आला आहे. या स्पर्धाविभागात भारतात यावर्षी तयार झालेले सर्वोत्कृष्ट तेरा चित्रपट दाखवले जाणार आहेत. या तेरा चित्रपटांपैकी 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' हे तीन चित्रपट मराठीत व 'मुंबईचा राजा' हा चित्रपट मराठी - हिंदी भाषांत आहे.

मायबोली.कॉम 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तिन्ही चित्रपटांची माध्यम प्रायोजक आहे.

***

साल १९९२.
एक गुप्तहेर आणि तो तपास करत असलेली कमालीची गुंतागुंतीची केस.
मध्यमवर्ग नुकताच पैसे मिळवू लागलाय आणि ते खर्च करायला घराबाहेर पडलाय.
भवताल बदलतोय, तसे नातेसंबंधही बदलतायेत.
तो गुप्तहेर आणि तो तपास करत असलेली कमालीची गुंतागुंतीची, आणि त्यालाही आपल्या कह्यात घेणारी केस.
पुणे ५२.

pune521.jpg

निर्माते - इंडियन मॅजिक आय प्रा. लि. आणि अरभाट निर्मिती
दिग्दर्शन - निखिल महाजन
कथा - पटकथा - निखिल महाजन
संवाद - गिरीश कुलकर्णी
छायालेखन - जेरेमी रेगन
संकलन - अभिजीत देशपांडे
पार्श्वसंगीत - अतीफ अफझल

कलाकार - गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, भारती आचरेकर, किरण करमरकर आणि स्वानंद किरकिरे

***

एक चित्रपट दिग्दर्शिका, आणि तिच्या चित्रपटातली पात्रं.
तिचं आयुष्य आणि त्यांची आयुष्यं.
प्रेम, समर्पण, अभिलाषा आणि विरक्ती.
चित्रपटाची आणि जगण्याची ’संहिता’.

Copy of samhita_1.jpg

दिग्दर्शन - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर
कथा - पटकथा - संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - संजय मेमाणे
संकलन - मोहित टाकळकर
संगीत - शैलेंद्र बर्वे
गीते - सुनील सुकथनकर
पार्श्वगायन - आरती अंकलीकर - टिकेकर

कलाकार - देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेवा, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठ्ये, नेहा महाजन

***

पैशाच्या मागे जीव खाऊन धावणारी आजची तरुण पिढी.
त्यातून येणारा उन्माद व सत्तेचा माज.
ज्येष्ठ लेखक व नाट्यकर्मी रत्नाकर मतकरींनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ’इन्व्हेस्टमेण्ट’ आजचं धगधगीत वास्तव समोर आणतो.

investment poster.jpg

दिग्दर्शन - रत्नाकर मतकरी
सहदिग्दर्शन - गणेश मतकरी
छायांकन - अमोल गोळे
संकलन - सागर वंजारी
कार्यकारी निर्मात्री - पल्लवी मतकरी
सहनिर्माता - मंदार वैद्य, अनीश जोशी
निर्मात्री - प्रतिभा मतकरी ('महाद्वार प्रॉडक्शन्स'साठी)

कलाकार - तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संजय मोने, संदीप पाठक, भाग्यश्री पाने, सोहम कोळवणकर, मिलिंद फाटक आणि प्रहर्ष नाईक

***

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षात निर्माण झालेले हे तिन्ही चित्रपट आशयघन चित्रपटांची परंपरा पुढे नेणारे आहेत. या चित्रपटांच्या तंत्रज्ञांच्या व कलावंतांच्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रेक्षकही साथ देतील, याची खात्री आहे.

मायबोली.कॉमतर्फे 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तिन्ही चित्रपटांशी संबंधित सर्व तंत्रज्ञांचे व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व स्पर्धेसाठी शुभेच्छा !!!

***
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गामापैलवान,

उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांच्या निर्मितीसंस्थेचं नाव 'अरभाट निर्मिती' असं आहे.
मायबोलीवरील अरभाट वेगळे. Happy

न्यू यॉर्क येथे होणार्‍या नवव्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धाविभागात 'पुणे ५२'ची निवड झाली आहे.

७ ते १४ डिसेंबर, २०१२दरम्यान तिरुवनंतपुरम इथे होणार्‍या केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात 'संहिता'ची निवड झाली आहे.

खुप खुप अभिनंदन... आणि मायबोलीसाठी हे प्रयोजन फारच अभीमानास्पद आहे. परंतू या मोहत्सवाच्या प्रवेशिका
कुठे मिळतील का? मायबोलीकडून तशी सोय झाल्यास खुप बरे होईल.