ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा

Submitted by भारती.. on 28 September, 2012 - 07:16

http://www.maayboli.com/node/38112

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा

१. शोकमग्न अर्जुनाची श्रीकृष्णांनी केलेली कानउघाडणी

शस्त्र त्यागून रथाखाली उडी मारून अश्रूपात करणारा महाधनुर्धर .. दुसर्‍या अध्यायात ज्ञानेश्वरांना ऐन युद्धभूमीवर घडणारं एक नाट्यपूर्ण विचारमंथन,जे थेट व्यक्ती अन समष्टीच्या अस्तित्वविषयक गूढ गाभ्यापर्यंत जाते, ते कवीच्या कुंचल्याने चितारायचे आहे.

'जैसे *लवण जळे झळंबले | ना तरी अभ्र वाते हाले |
तैसे सधीर परि विरमले | हृदय तयाचे
|| '
(*लवण- मीठ )
पाण्यात मीठ विरघळू लागावे, वार्‍यात ढगांची पांगापांग व्हावी तसे त्या राजकुमाराचे धैर्ययुक्त पण विरघळू लागलेले कोमल हृदय.त्यात साठलेले अनंत प्रश्न अन असीम उद्वेग.सुविचारी माणसावर युद्धाचा याहून वेगळा काय परिणाम होणार ?

शोकमग्न अर्जुनाला त्याच्या त्या महामोहातून बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम श्रीकृष्णांनी काय केलं असेल तर त्याची सरळसरळ कानउघाडणी.

ते म्हणाले,'तुझे हे वर्तन उचित आहे काय ? तू कोण? हे काय चालले आहे ? तुला काय झाले आहे? काय कमी पडले? काय अडले ? कशासाठी हा खेद ? अरे, अनुचित गोष्टींमध्ये मन न गुंतवता, धैर्य न सोडता झुंजणारा तू वीरवर.तुझ्या नावानेही अपयश पळून जाते.शौर्याचे तू मूळस्थान,क्षत्रियश्रेष्ठ तू, तुझा दबदबा तिन्ही लोकांत गाजतो. '
' तू शूरवृत्तीचा ठावो | क्षत्रियामाजी रावो |
तुझिया लाठेपणाचा आवो | तिही लोकी ||
तुवा संग्रामी हरु जिंतिला | निवातकवचांचा ठावो फेडिला |
पवाडा तुवा केला | गंधर्वांसी
|| '
अशाप्रकारे त्याचं समुपदेशन करताना त्याच्या गतसंग्रामांतील विजयांचेही स्मरण त्याला श्रीकृष्ण देतात.अन हळूच त्याच्या क्षात्रभावाचे उद्दीपन करतात.
ज्याने लढाईत शंकरांवरही विजय मिळवला,निवात कवच या राक्षसांचा पाडाव केला, गंधर्वांचे रणात गर्वहरण केले त्या अर्जुनाचा हा विषाद म्हणजे वार्‍यानेच ढगांना घाबरणे,अंधाराने सूर्याचा घास घेणे,इंधानेच अग्नीला गिळून टाकणे.,पाण्यानेच मिठात विरणे, संसर्गाने उलट विषच मरणे,बेडकाने सापाला गिळणे, सिंहाला कोल्ह्याने झोंबण्याइतका विपरीत हा उद्वेग.

अशा उपमांचा वर्षाव करून श्रीकृष्ण शेवटी म्हणतात, 'कीर्तिनाश व परलोकनाशही करणारी अशी ही करुणा सोड, अर्जुना, सावध हो,उठ, शस्त्र हाती घे !'
'मोह धरिलिया ऐसे होईल |जे असती प्रतिष्ठा जाईल |
आणि परलोकही अंतरेल| ऐहिकेसी ||
हृदयाचे ढिलेपण | एथ निकयासी नव्हे कारण |
हे संग्रामी पतन जाण | क्षत्रियांसी
||'

२.अर्जुनाचा युक्तीवाद

ज्ञानदेव आता अर्जुनाचे प्रत्युत्तर, त्याचा त्याच्या परममित्राशी वाद-युक्तीवाद साक्षात आपल्या मनःश्चक्षुंसमोर उभारत आहेत. पहिल्या अध्यायातल्या व्यापक कारणांपेक्षा अधिक व्यक्तिगत कारणे अर्जुन युद्धत्यागासाठी इथे देत आहे..
अर्जुन म्हणतो,' परमेश्वरा इतके काही मला बोलण्याआधी तूच या युद्धाचा विचार कर.
'हे झुंज नव्हे प्रमादु | एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु | '
हे युद्धरूप महापाप आहे. मातापित्यांची पूजा करून त्यांना संतोष द्यावा की त्यांचा वध करावा ? संतवृंदाला नमस्कार करावा की त्याची निंदा करावी ?हे आमचे गोत्रगुरु द्रोण, हे पितामह भीष्म. यांच्या किती पूज्यस्मृती सांगाव्या ? किती आठवणींचे लाघव वर्णावे ?
'तैसे गोत्रगुरु आमुचे | हे पूजनीय आम्हा नियमाचे |
मज बहुत भीष्म द्रोणांचे | वर्ततसे ||..
'
यांचे वैर मी स्वप्नातही करू शकत नाही.या द्रोणांचा मी लाडका शिष्य.कसे वर्णावे हे नाते ?मी जणू त्यांचीच निर्मिती. त्यांनी घडवले मला. यांनीच शिकवलेला धनुर्वेद आभारप्रदर्शन म्हणून यांच्यावरच धनुष्य रोखून, यांना वधून उलटवू ? अरे मग माझ्यात आणि भस्मासुरात फरक काय ?
'मी पार्थु द्रोणाचा केला | येणे धनुर्वेदु मज दिधला |
तेणे उपकारे काय आभारैला | वधी तयाते ||
जेथीचिया कृपा लाभिजे वरु | तेथेचि मने व्यभिचारु |
तरी मी काय भस्मासुरु | अर्जुन म्हणे
||'
अर्जुनाचे द्रोणांवरचे प्रेम अपरंपार आहे. तो म्हणतो,' या कारुण्यमय विद्यासिंधू द्रोणांना समुद्राचीही उपमा देववत नाही कारण यांच्या मनात क्षोभच नाही.गगनाहून गहनगंभीर हृदयाच्या या महात्म्यांच्या वधाने रक्तलांच्छित झालेले राज्यसुख मला कसे मानवेल ? ' आणि येथे तो त्याच्यापुरता निष्कर्षाप्रत येतो-
' ना तरी देशत्यागे जाईजे | का गिरिकंदर सेविजे|
परि शस्त्र आता न धरिजे | इयांवरी
||'
इथे ज्ञानदेव म्हणतात, अर्जुनाच्या या क्षोभपूर्ण आवेशाला हवा तो प्रतिसाद श्रीकृष्ण देत नाही आहेत असे पाहून तो पुन: अस्वस्थ होऊन म्हणतो ,'देवा, जे वाटले ते तुला स्पष्टपणे सांगितले.यात उचित काय हे मला समजेनासे झाले आहे.माझ्या व्याकूळ मनाला निर्णय घेणे मोठे अवघड झाले आहे.अंधारात दृष्टीचे तेज निघून जाते.जवळची वस्तूही दिसेनाशी होते. परमेश्वरा भ्रांतीने माझ्या बुद्धीची तीच अवस्था झाली आहे.श्रीकृष्णा , तू माझा सखा,सर्वस्व,गुरु,बंधू,पिता,इष्टदेवता,सर्व काही. या परिस्थितीत माझा धर्म कोणता ? हे पुरुषोत्तमा, तूच सांग.मी तुझा शिष्य आहे.'एवढे बोलताबोलता पुनः भ्रांतीचा उमाळा येऊन' मी लढणार नाही ' असे म्हणत अर्जुन स्तब्ध होत आहे.
हा अत्यंत चित्रमय प्रसंग साक्षात करण्यासाठी ज्ञानदेव मनोहारी उपमा योजत आहेत..
'तयापरी तो धनुर्धरु | जाहलासे दु:खे जर्जरु |
जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरु | वणवला का ||
म्हणोनि सहजे सुनीळु | कृपामृते सजळु |
तो वोळलासे श्री गोपाळु | महामेघु
|| '
ग्रीष्मझळांमध्ये वणव्यात सापडलेल्या पर्वतासारखा तो शोकसंतप्त धनुर्धर .. आता हा निळ्या कृपासुधेचे सिंचन करणारा महामेघ- हा मेघःश्याम गोपाळकृष्ण या पर्वताचा दाह शांतवण्यासाठी भरून आला आहे ..या कृष्णमेघामध्ये सुदर्शनचक्ररुपी विजा झळकताहेत,त्याचा धीरगंभीर शब्द जणू गडगडाट व्ह्यावा तसा घुमतो आहे.. आता हा वर्षेल आणि अर्जुनाच्या मानसात नव्या उन्मेषाची पालवी फुटेल.

३.श्रीकृष्ण उपदेशाचा आरंभ : आत्म्याचे खरे स्वरूप

श्रीकृष्ण या अनपेक्षित अवसानघाताकडे थोडे खोचकपणे पहातात.
'जात्यंधा लागे पिसे | मग ते सैरा धावे जैसे |
तुझे शहाणपण तैसे | दिसतसे ||
तू आपणपे तरी नेणसी | परी या कौरवांते शोचू पाहसी|
हा बहु विस्मय आम्हासी | पुढतपुढती
|| '
ते पुढे म्हणतात, 'अर्जुना, मोठे ज्ञात्यासारखे बोलतोस,पण अज्ञान तर सोडत नाहीस.मी मारणारा ,हे मरणारे असे अज्ञान व अहंकारामुळे तुला वाटत आहे. येथे मी,तू,हे राजे आहोत, नित्य असणार किंवा नाश पावणार हे विचारविकल्पच भ्रांतीमय आहेत. वार्‍यामुळे पाणी हालते तेव्हा काय तरंग जन्माला येतात ? वार्‍याचे स्फुरण थांबले की पाणी निष्कंप होते तेव्हा काय ते तरंग मरून जातात ?
'जैसे पवने तोय हालविले|आणि तरंगाकार जाहले|
तरी कवण के जन्मले | म्हणो ये तेथ||
तेचि वायूचे स्फुरण ठेले| आणि उदक सहज सपाटले|
तरी आता काय निमाले |विचारी पां||
'
मायावश नजरेला किती भ्रम होतात.. अरे, हे नित्यपरिचयाचे आपले शरीरच बघ . एकच ना हे? पण वयपरत्वे याची किती रुपांतरे..बाळपण,तारुण्य वगैरे. जसे हे रुपांतर, अगदी तसेच चैतन्याचे शरीरांतर होत असते हे तत्त्वतः लक्षात घे. आणि भ्रांतीमय शोकातून बाहेर ये. हे लक्षात न येण्याचे कारण म्हणजे तुझे इंद्रियाधीनत्व.ही इंद्रिये विषयसेवन करतात तेव्हा जे हर्षशोकादि विकार उपजतात त्यांमध्ये अंतःकरण पुरते बुडून जाते.विषयांमध्ये आसक्ती नसेल तर सुखही संपले अन दु:खही.असे पहा, श्रवणाचा विषय शब्द. तो निंदा किंवा स्तुती निर्माण करतो. त्यानुसार आनंद किंवा दु:ख होते. स्पर्शाचा विषय मृदुता किंवा कठीणता. त्या अनुषंगाने संतोष वा खेद.. दृष्टीला दिसते रूप- सुंदर वा भयानक. त्याप्रमाणे नेत्रांना सुखदु:ख होते.घ्राणेंद्रियांना सुगंध किंवा दुर्गंध उल्हास वा पीडा देतो. रसांचे अनुकूल व प्रतिकूल प्रकार जिव्हेला प्रीती किंवा त्रास देतात. या असल्या विषयांपेक्षा काहीच रम्य नाही असे इंद्रिये मानतात त्यातून सदैव आसक्ती व आसक्तीतून सुखदु:खांची निर्मिती होते.
हे सर्व बाजूला सार , तेव्हाच शाश्वत आत्म्याला ओळखू शकशील.तो नित्य अविनाशी,अविकार्य, नाम,आकार,वर्णविहीन,जन्ममृत्यूच्या पैल आहे. याला मारणारा किंवा मरणारा म्हणणार्‍यांना हे कळत नाही की हा मारतही नाही वा मरतही नाही.. अर्जुना, हा शरीराच्या लोपाने लोपत नाही.जागे झाल्यावर स्वप्न संपते तशी ही माया.शस्त्राने सावलीवर आघात केला तर अंगाला जखम होते का ?अर्जुना, जुने वस्त्र सोडून नवे वेढावे तसा हा चैतन्यनाथ आत्मा जीर्ण शरीर त्यागून नवे धारण करतो.
'जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे | मग नूतन वेढिजे |
तैसे देहांतराते स्वीकारिजे | चैतन्यनाथे
||'
हा शस्त्रांनी भेदला जात नाही ,अग्नीने जाळला जात नाही,पाण्याने भिजत नाही,वार्‍याने सुकत नाही.अचल,शाश्वत,सर्वदा परिपूर्ण असा हा आत्मा अनित्य व अशाश्वत अशा मायेपेक्षा सर्वस्वी वेगळा आहे..या दोन गोष्टींची गल्लत करू नकोस. हे सारे तर्काच्या पलिकडले ज्ञान आहे.
'अर्जुना ऐसा जाणावा | हा सकळात्मकु देखावा |
मग सहजे शोकु आघवा | हरेल तुझा
||'
म्हणून शेवटी,शोक त्यागून निजधर्माचे आचरण कर ..अरे हा तुझा करुणार्द्र शोक तुझ्या मूढ शत्रूंच्या आकलनापलिकडे आहे ! ते म्हणतील हा आम्हाला भ्याला आणि युद्धातून पळाला ! तुला आवडेल ??
'हे म्हणतील गेला रे गेला | अर्जुन आम्हां बिहाला |
हा सांगे बोलु उरला | *निका काही||
'
(* चांगला/भला )

४. सांख्ययोग व बुद्धियोग यातील ज्ञानेशांनी स्पष्ट केलेला भेद -

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील ३८ व्या श्लोकाच्या विवरणापर्यंत ज्ञानेशांनी सांख्ययोग सांगितला आहे. त्यात आत्मानात्मविवेक,आत्म्याचे स्वरूप, इंद्रियाधीन व विकारवश बुद्धीला ग्रासणारी मायेची भ्रांती हा सांख्ययोगाचा प्रमुख विषय ज्ञानेशांनी अनेक उपमा व दृष्टांतांच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. वार्‍याने उमटणारे व वारा थांबल्यावर मिटणार्‍या तरंगांसारखेच, अविनाशी अविकारी चैतन्यावर जन्ममृत्यूचे आभास निर्माण होतात अशा यथार्थ दृष्टांतांमधून भगवंतांना गीतेत जे म्हणायचे आहे ते ज्ञानेशांनी अधिक सोपे केले आहे.
३९ व्या श्लोकापासून भगवंतांनी वर्णिलेल्या बुद्धियोगा(कर्मयोगा)वरील ज्ञानेशांचे भाष्य वाचावयास मिळते.
वज्रकवच घातल्यावर शस्त्रांचा मारा चुकवता येतो तसेच निष्काम बुद्धीचे कवच घालून कर्मबंधापासून मुक्तता मिळवता येते. कर्मयोगाच्या आचरणाने ऐहिकातच राहून मोक्षसाधना करता येते.
'तैसे ऐहिक तरी न नाशे | आणि मोक्षु तो उरला असे |
जेथ पूर्वानुक्रम दिसे | चोखाळत ||
'
अशाप्रकारे सांख्ययोग हा आत्मतत्त्वज्ञान सांगणारा ज्ञानयोग आहे तर कर्मयोग हे आत्मतत्त्वज्ञान अंगी बाणण्यासाठी केलेले बौद्धिक तपाचरण आहे.. हे तपाचरण नित्यकर्मे न सोडता या संसारातच राहून करावयाचे आहे. ही जाणीव पूर्वपुण्याईने हृदयात प्रकट होते.
'अर्जुना ते पुण्यवशे | जरी अल्पचि हृदयी बुद्धि प्रकाशे|
तरी अशेषही नाशे | संसारभय
||'
'व्यवसायात्मिका बुद्धिरेकेक कुरुनंदन' या ४१ व्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी एक नितांतसुंदर ओवी लिहिली आहे ,बुद्धियोगाचे सार पुन; एकदा सोपे केले आहे. ते म्हणतात-
'जैसी दीपकळिका धाकुटी | परी बहु तेजाते प्रकटी |
तैसी सद्बुद्धी हे थेकुटी | म्हणो नये
||"
या ओवीतून ज्ञानदेवांनी प्रापंचिक असूनही अध्यात्मनिष्ठा मनी ठेवणार्‍यांना मोठाच दिलासा दिला आहे. सर्व कर्मांचा ,कर्मबंधांचा निरास करणे ही गोष्ट सोपी नव्हे. जन्मजन्मांतरीचे ओझे वाहणार्‍या जिवाला हा शब्दांचाच खेळ असे वाटल्यास नवल नाही.ज्ञानदेवांनी या सर्व बंधनांना ,मोहांना,प्रपंचत्रासांना अंधाराची अप्रकट उपमा दिली आहे. अंधाराची व्याप्ती कितीही असली तरी एक इवलीशी दिव्याची ज्योत ( ज्ञानेशांची 'दीपकळिका'- किती गोड शब्द! ) आपल्या शांत तेजाने त्याचे साम्राज्य संपुष्टात आणते. निष्काम बुद्धीचा मनात उदय होणे म्हणजे असा दीपत्कार होणे ! म्हणून सद्बुद्धीला लहान,अल्पप्रभावी मानू नये.तिचा अभ्यास केल्याने चंचल मन स्थिर,सूक्ष्म होते.संसाराच्या महाभयातून निघून ज्ञानसंपादनासाठी सिद्ध होते.
सद्बुद्धी म्हणजे काय ? तर
'तैसी ईश्वरावाचूनि काही | जिये आणिक लाणी* नाही |
ते एकची बुद्धी पाहीं | अर्जुना जगी
||"
(*लाणी-प्राप्यस्थान)
मग दुर्बुद्धी म्हणजे काय ? श्लोक ४२ ते ४६ यांवरील विश्लेषणात श्रीकृष्णांनी स्वर्गसुखाच्या इच्छेने यज्ञादि कर्मे करण्याला दुर्बुद्धी म्हटले आहे !ज्ञानेश्वरांनी त्यासाठी योजलेली अजून एक सुंदर उपमा-
'जैसी रांधवणी रससोय निकी | करुनिया मोले विकी |
तैसा भोगासाठी अविवेकी | धाडिती धर्मु ||"
अन्नदान हे परमदान, पण स्वयंपाकी रसपूर्ण अन्न रांधतो विक्रीसाठी. त्यात धर्म कोठला ? स्वर्गसुखासाठी यज्ञादि कर्मे करणारे वेदवादरत हे अशा दुर्बुद्धीत ग्रस्त असतात !

५. ज्ञानेश्वरप्रणित स्थितप्रज्ञलक्षणे-

बुद्धीयोगाचा सारांश सांगताना 'योगः कर्मसु कौशलम' असे ५० व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात.ज्ञानदेवांनी यावर भाष्य करताना -
'अर्जुना समत्व चित्ताचे | तेच सार जाण योगाचे |
जेथ मना आणि बुद्धीचे | ऐक्य आथि
||'
-अशा एका संतुलित स्थितप्रज्ञ अवस्थेचे वर्णन केले आहे. या विवेचनात रंगत चाललेल्या अर्जुनाने जेव्हा असा स्थितप्रज्ञ कसा असतो, कसा दिसतो हे औत्सुक्याने विचारले तेव्हा श्रीकृष्णांनी
स्थितप्रज्ञलक्षणे वर्णन केली. त्यांचे विवरण करताना ज्ञानदेव म्हणतात-
अभिलाषा हेच दु:खाचे कारण होय. तिचे निरसन करून जो स्वसुखाने अंतःकरणातच परिपूर्ण राहतो तो स्थितप्रज्ञ . जो दु:खामुळे उद्वेग पावत नाही व सुखाच्या आशेत गुंतत नाही ज्याची बुद्धी उपाधिरहित, म्हणून स्थिर असते,जो सर्वांशी समभावयुक्त सदय असतो,कासवाप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात, तो स्थितप्रज्ञ .. विषयाच्या स्मरणातून काम,कामातून क्रोध,त्यातून अविचार, स्मृतीभ्रंश व शेवटी बुद्धीनाश हे दुष्टचक्र भेदून जो चित्तातल्या मूळ प्रसन्नतेत रममाण झाला, तो स्थितप्रज्ञ ..' प्रसादे सर्वदु:खानाम हानिरस्योपजायते' या अद्भुत संस्कृत श्लोकावर पुनः दोन निरंतर सुंदरशा ज्ञानेश्वरीय उपमा -
'जैसा अमृताचा निर्झरु| प्रसवे जयाचा जठरु |
तया क्षुधेतृषेचा अडदरु| कहींचिं नाही ||'
'जैसा निर्वातीचा दीपु | सर्वथा नेणे कंपु |
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरुपु | योगयुक्तु
||'
एखाद्याच्या जठरातच अमृत स्त्रवत असेल तर त्याला क्षुधा तृषा कोठली ? निर्वात पोकळीत तेवणार्‍या दिव्याला कंप कोठला ? तसाच योगयुक्त स्थितप्रज्ञ .
अशाप्रकारे 'विचरे विश्व होऊनि |विश्वाचिमाजीं ||' अशा स्थितप्रज्ञाची लक्षणे वर्णून ज्ञानदेव दुसर्‍या अध्यायाची, सांख्ययोगाची इतिश्री करतात पण कुशल कथाकाराप्रमाणे अर्जुनाच्या मनःस्थितीची चाहूल घेत-घेतच.
इथे तर अर्जुनाला नवे प्रश्न पडत आहेत, इतकेच नव्हे तर श्रीकृष्णाला अडचणीत आणण्यासारखे काही मुद्दे हाताशी आल्यासारखेही वाटताहेत ! या वाद-संवादातून आपला स्वधर्म कोणता या प्रश्नाने व्याकूळ होणार्‍या समस्तांना उत्तरे मिळणार आहेत ..पुढल्या अध्यायाचे असे उत्कंठावर्धक सूतोवाच करून ज्ञानदेव दुसर्‍या अध्यायाचे निरुपण समाप्त करतात.

'तो प्रसंग असे नागरु| जो सकळ धर्मासि आगरु|
की विवेकामृतसागरु | प्रांतहीनु||
जो आपण सर्वज्ञनाथु | निरुपिता होईल श्रीअनंतु|
ते ज्ञानदेवो सांगेल मातु | निवृत्तीदासु
|| ' ..

भारती बिर्जे डिग्गीकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानेश्वरीचे अतिशय छान विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद. खुपच सुंदर आहे त्यामुळेच अजून एकदा वाचायचे आहे.

धन्स सुधाकर, ज्ञानेश्वरी आपण सामान्य माणसे वाचतच नाही - तो फक्त विद्वानांचा किंवा आध्यात्मिकांचा प्रांत मानतो व एकप्रकारे स्वतःवर अन त्या महान ग्रंथराजावर अन्याय करतो म्हणून केवळ हा लेखन प्रपंच..

पुन्हा एकदा छान... भारतीजी... जर तुम्हाला वेळेचं बंधन नसेल तर लेखाखाली काही कठीण/ नवीन प्राकृत शब्दांचे (लवण, निका ...) मराठी अर्थ लिहाल का?

वा भारतीताई, या अध्यायावरील विवेचनही अतिशय रसाळ, अभ्यासपूर्ण, सौंदर्ययुक्त..........
असेच इतरही सर्व अध्याय येऊं द्यात .........

आताच हा दुसरा भाग वाचला.
भग्वत्गीतेच्या जन्माची पार्ष्वभूमीच किति नाट्यपूर्ण आहे? आपले पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य यांच्यावर शस्र उगारण्याच्या कल्पनेने व्याकुळ होण्याची अर्जुनाची स्थिती किति नैसर्गिक! त्यातून त्याला युद्धाला प्रवृत्त करण्याचे काम किति कर्मकठीण! पण ते करण्याच्या निमित्ताने संपूर्ण तत्वज्ञान्च मांडण्याची व्यासांची योजना म्हणजे अद्वितीयच! ते सर्व मराठीत आणणे देखील कठीणच! पण ज्ञानदेवांनी ते किति रसाळपणे केले आहे त्याचे सौदर्य तुमच्या या लेखातून समजते.
धन्यवाद!
" अरे हा तुझा करुणार्द्र शोक तुझ्या मूढ शत्रूंच्या आकलनापलिकडे आहे! ते म्हणतील हा आम्हाला भ्याला आणि युद्धातून पळाला ! तुला आवडेल ??"
यावरून श्रीकृश्ण किति श्रेष्ठ मानसोपचारतज्ञ असला पाहिजे.
छान.
आता तिसरा भाग वाचून झाला कि तेथे भेटेन.

धन्स मी भास्कर, ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा व सोपी करून मांडण्याचा हा प्रयत्न.कविकुलगुरुंच्या महाराष्ट्रात कवी म्हणवून घेताना करावासा वाटला.
दुसर्‍या अध्यायाचा आवाका तत्वज्ञानदृष्ट्या खूप प्रचंड, पण सोपे करणे हा हेतू असल्याने विवेचन फार विस्तारू दिले नाही.

श्री ज्ञानेश्वरांच्या भाषाप्रभुत्वापुढे सदा नतमस्तकच व्हायला होते.
पण...
स्थितप्रज्ञ हा शब्द जरी मनात उमटला तरी विनोबांच्या या ओळींची प्रकर्षाने आठवण होते
"कामना अंतरातील सर्व सोडोनि जो स्वयें
आत्म्यातची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला ||" गीताई - आ. विनोबा.
स्थितप्रज्ञलक्षणे हा विनोबांचा ग्रंथही अप्रतिमच आहे.

भारती बिर्जे डि... | 18 January, 2013 - 19:55
दुसर्‍या अध्यायाचा आवाका तत्वज्ञानदृष्ट्या खूप प्रचंड, पण सोपे करणे हा हेतू असल्याने विवेचन फार विस्तारू दिले नाही. <<

अत्यंत योग्य गोष्ट! तसे केले नाही तर माझ्यासारखे जे लोक अध्यात्म, तत्वज्ञान या क्षेत्रांशी फारसे परिचित नाहीत ते अशा तंतूंपासून दूरच राहाण्याची शक्यता फार.

ज्ञानेश्वरी सोपी करून मांडण्यासाठी आपण घेत असलेले परिश्रम अत्यंत स्तुत्य आहेत. मला स्वतःला, खूप दिवसांपासून एक ग्रंथ म्हणून, ज्ञानेश्वरी वाचायची आहे आपला लेख वाचून ती इच्छा आता अजून प्रबळ झाली आहे. धन्यवाद!

शशांकजी, 'गीताई' ही एका समाजप्रवर्तक संताने मराठीत -प्राकृतात -आणलेली गीता.उद्देश कुठेतरी सारखे अन थोडे वेगळेही.. हे वैविध्य आपल्याला संपन्न करणारे आहे, त्यामागे विशाल व्यक्तिमत्वे आहेत.
हर्पेन, मी-भास्कर, हाच तर हेतू होता.. वाचन शुभेच्छा. स्वामी स्वरूपानंदांची 'अभंग ज्ञानेश्वरी' मिळाली तर जरूर वाचा. समकालीन मराठीत अजून एका प्रतिभावंत संताने लिहिलेली अभंगवृत्तीय समश्लोकी.

खूप छान.
आपण सधीरचा अर्थ (बहुधा) धर्मयुक्त असा केला आहे. तो धैर्यवान, संयमी इत्यादी .... असावा असे वाटते..

आकाशनील, तसेच म्हणायचे होते, अनाहूतपणे आलेल्या त्या शब्द्योजनेमुळे तसा गैरसमज होतोय हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्स. ती सुधारतेय.आणखीही एक.. शशांकजींच्या दिवाळी अंकातील ललित लेखातल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही 'म्हणजे विवेकानंदादि शिष्य का' असे विचारले होते त्याचे उत्तर होय असे आहे !

सुरेख लिहीले आहे धन्यवाद!
जानेश्वरी समजुन घेण्याचा खुप वेळा प्रयत्न केला . कदाचित या तुमच्या लेखमालेमुळे आता जमेल . पुन्हा एकदा धन्यवाद!!