बरेच अवघड असते...........

Submitted by वैवकु on 24 September, 2012 - 04:49

असेच असते जाण माणसा जगणे म्हणजे
असूनही नसल्यागत असते असणे म्हणजे

मी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा
हीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे

किती घेतले किती सोडले हिशेब कसला
जसे घेतले तसे सोडणे..... श्वसणे म्हणजे

पाउस, अश्रू ,पारिजात ना अजून कोणी
मी तर केसांकडून शिकलो गळणे म्हणजे Happy

तन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत
असे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे .........[>>>>>>>माझ्या मनाजोगता बदल सुचवल्याबद्दल धन्स टू सुप्रियातै !!]

जगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला
तुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे

करून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा
बरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे !!

बरेच अवघड असते.......... 'सोपा' करणे म्हणजे !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला
तुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे

करून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा
बरेच अवघड असते सोपा करणे म्हणजे !!
<<<

सुंदर शेर आणि छान गझल

धन्यवाद व अभिनंदन

असेच असते जाण माणसा जगणे म्हणजे
असूनही नसल्यागत असते असणे म्हणजे

मतला अतिशय अर्थपूर्ण...

जगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला
तुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे

व्वा व्वा व्वा ! (नि:शब्द!)

बरेच अवघड असते सोपा करणे म्हणजे !! .....क्या बात !!! ...भन्नाट मिसरा.

पु ले शु. Happy

एक शेर अ‍ॅड करतो आहे ........

तन मन धन माझे पण त्यावर तुझी हुकूमत
असे कसे हे जीव तुझ्यावर जडणे म्हणजे

धन्यवाद

तन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत
असे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे

मी असा वाचला.....( हा इस्लाह नाही Happy )

प्रत्येक शेर आवडला. वा वा वैभव, सुंदर लिहिलंत..

मी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा
हीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे

किती घेतले किती सोडले हिशेब कसला
जसे घेतले तसे सोडणे..... श्वसणे म्हणजे

खूपच मर्मग्राही.

धन्यवाद भारतीताई
(उद्या तुमच्याशी दूरध्वनीवरून सम्भाषण साधीन म्हणतो बरेच दिवस झालेत मन मोकळं करून !! :))

वैभवा!
काही शेर छान वाटले!
शेर नंबर १.....
पहिली ओळ सुंदर!

शेर नंबर २......
संदिग्ध वाटला.

शेर नंबर ३...........
श्वसणे शब्द कानास गोड वाटला नाही. शिवाय श्वसणे शब्दात फक्त श्वास घेणे असा अर्थ माझ्यामते आहे. श्वास सोडणे नाही. बाकी खयाल ठीक आहे. पण अभिव्यक्ती भावली नाही!

शेर नंबर ४........
पाउस.......पाऊस असे हवे. शेर ठीकठाक.

शेर नंबर ५........सुंदर!

शेर नंबर ६.......
दुस-या ओळीत ‘शेर सोपा करणे’ असते, तर शेर थेट व स्पष्ट झाला असता. असो.

तुझी ही गझल वाचल्यावर, वैभवा, मला खालील शेर स्फुरले...........
टीप: हे शेर तुझ्या गझलेला पर्यायी नाहीत. फक्त आणि फक्त आस्वाद घेण्यासाठी म्हणून देत आहे. तुझ्या शेरांचा मला आदर आहे.

असेच असते जाण माणसा, जगणे म्हणजे!
अळवावरचे पाणी असते, असणे म्हणजे!!

स्वत: स्वत:चा मूर्खपणा दाखवून देणे......
शहाण्यासही दीडशहाणा, म्हणणे म्हणजे!

काय जिंदगी जगणे याला म्हणता येते?
श्वासांची येरझा(जा)र नुसती, करणे म्हणजे!

मला वाटते ते झाडाचे रडणे असते.......
पिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे!

निसर्ग देतो जन्म जिवाला! तसे शेवटी......
निसर्गामधे विलीन होणे, मरणे म्हणजे!

स्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या?
उलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे!

..........प्रा. सतीश देवपूरकर

मला वाटते ते झाडाचे रडणे असते.......
पिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे!

स्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या?
उलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे!<<< मस्त शेर आहेत प्रोफेसर साहेब

<<<मला वाटते ते झाडाचे रडणे असते.......
पिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे!

स्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या?
उलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे!<<< मस्त शेर आहेत प्रोफेसर साहेब>>>>

+१००.

'श्वसणे' नीटसं झेपलं नाही..

उर्वरित गझलेसाठी -

____/\____ !!

खासकरून गळणे, जडणे आणि मरणे.... फारच भारी !

DesiSmileys.com

पाउस, अश्रू ,पारिजात ना अजून कोणी
मी तर केसांकडून शिकलो गळणे म्हणजे

तन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत
असे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे ........

जगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला
तुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे

देवसर :आधी मी आपली रचना पर्यायी म्हणूनच वाचली (सवयीप्रमाणे!!) अन् जरा दुखावलोच !

त्यातही आमच्या विठ्ठलाच्या शेरातून तुम्ही त्यालाच गायब केलेत (नेहमीप्रमाणे )हे पाहून जास्तच वाईट वाटले

मग मी ती वरची ठळक टिपेची ओळ नीट वाचली ................व रचना वाचू लागलो

अन आता पाहतोय तर काय ...ही तर एक उत्तम तरही आहे !! शेवटचे ३ शेर ग्रेटच आहेत !! (पहिले तीन जरा पर्यायीछाप झालेत !!)
सर खरे पाहता आपण ही रचना स्वतन्त्रपणे एक तरही म्हणून सादर करायला हवीय .अजून काही शेर सुचले तर तेही अ‍ॅड कराच
मला तुमची ही तरही खूप आवडली ,आजवरच्या तुमच्या तरहीन्मधली दी बेस्ट तरही आहे ही.

धन्यवाद सर ............

____________________

बेफीजी सुप्रियातै धन्स अगेन

____________________

डॉ. साहेब कणखरजी अनेक दिवसानी आपले प्रतिसाद आले हे पाहून किती बरे वाटते आहे म्हणून सान्गू!!!!!!...........
मध्यन्तरी आपणदोघे व बेफीजी.... तुमचे प्रतिसाद येतच नव्हते .....मनाला एक घोर लागून राहिला होता
माझ्याकडूनच काहीतरी चुकले असणार या विचाराने स्वतःचा खूप राग यायचा...........

असो ; आता खूप बरे वाटते आहे !!

केस गळणे हा हझलेचा शेर झालाय .इथे दिला नसता तरी चालले असते हे खरेच आहे !!
पहिली ओळ बरीच उजवी आहे दुसरीत केस हा शब्द्/सन्दर्भ मजा किरकिरी करतो ......

पाउस अश्रू पारिजात यान्चे गळणे यात एक सौन्दर्य दडलेय त्याचा आपण कवी लोक अनेकदा वापर करून घेतोच
केस गळणे याशब्दरचनेत सौन्दर्य नाही उलट त्या प्रक्रियेत व नन्तर एक भयाण विद्रूपपणा व्यापून राहतो

पण हा शेर मी प्रत्यक्ष जीवनात अनुभवलाय.........त्यासाठी माझ्या टकलाची किम्मतही मोजली आहे मी :)....त्यांमुळे हा शेर जसा सुचला तसा आपंणा सर्वापुढे माण्डण्यात मला काही वावगे वाटले नाही

माझे असे करणे कोणास रुचले नसल्यास मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...........क्षमस्व!!

______________________

जितू धन्स रे
मु.कु.धन्यवाद
______________________

श्वसणे बाबत आधी माझ्या मनात सम्भ्रम नव्हता आता उत्पन्न झालाय
बघू काही करता येतेय का ते .................
लक्षात आणून दिल्याबद्दल देवसर व जितू यान्चे शतशः आभार !!

गळणे चा शेर असा करता येईल का ........................

पारिजात, पाऊस न डोळ्यांमधले पाणी
मी तर दंभाकडून शिकलो गळणे म्हणजे

ऑर

पारिजात, पाऊस न डोळ्यांमधले पाणी
माझ्या दंभाकडून शिकलो गळणे म्हणजे

अवश्य कळवा ......
.............प्रतिक्षेत

आपला
-वैवकु

सुंदर गझल वैभवराव..

सर्व प्रथम आपण वापरलेला नवीन रदीफ भावला...( माझ्यासाठी नवीन...)

मतला खूप आवडला...

करून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा
बरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे !!

वरील शेर अप्रतिम...

बाकी शेरही मस्त झाले आहेत..
शुभेच्छा...

प्रोफेसर साहेब,

तुम्ही इथे दिलेली गझल स्वतंत्र रचना म्हणून पोस्ट करायला हवी होतीत. ('प्रेरणा: वैवकु' असे लिहून) - असे मला वैयक्तिक पातळीवर वाटले कारण तुमची गझल फारच वेगळ्या 'पिंडा'(सर्व हक्क : प्रो. सतीश देवपूरकर)ची आहे.

मला वाटते ते झाडाचे रडणे असते.......
पिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे!

निसर्ग देतो जन्म जिवाला! तसे शेवटी......
निसर्गामधे विलीन होणे, मरणे म्हणजे!

स्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या?
उलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे!

ह्या तीन शेरांसाठी तुम्हाला प्रत्येकी शंभर सलाम !!

प्रोफेसर साहेबांच्या गझलेत..

मला वाटते ते झाडाचे रडणे असते.......
पिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे!

वरील शेरात 'मला वाटते' वगैरे भरीचा भाग वाटला... वृत्तपूर्तीसाठी.
वरचा शेर
ते झाडाचे रडणे असते
पिकली पाने गळणे म्हणजे...... एवढ्याच शब्दात ही सांगता येईल... ( वैयक्तिक मत)

'मला वाटते' मध्ये कवीचा दृष्टिकोन येतो.
पान गळणे, ही क्रीया प्रत्यक्षात खूप सहज आणि सामान्य आहे; पण तरीही कवीला तसे वाटते आहे. - असं विधान 'ते झाडाचे रडणे असते' ह्यात होत नाही. इथे असं म्हटलं जातं आहे की, 'हे असंच आहे.'

आम्हास असे वाटते की गझलेच्या धाग्यांवर प्रथम सर्वांनी आपापले प्रतिसाद लिहून, पुरेश्या अर्वाच्य शिव्या देऊन झाल्यानंतर मग मूळ गझल प्रकाशित केली जावी

कवी वैभव कुलकर्णींचा हा मक्ता गझलकारांना अनेकदा शोभणार्‍या पण येथे फारसे शोभत नसलेल्या अंहकाराने ओतप्रोत भरलेला असून त्यातील दुसरी ओळ पुन्हा एकदा खाली लिहिण्याचे प्रयोजन ज्याला समजेल त्याला 'प्रोफेसर देवपूरकर अनाकलनीय सौंदर्यबोध पुरस्कार' देण्यात येईल.

>>>करून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा
बरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे !!

बरेच अवघड असते.......... 'सोपा' करणे म्हणजे !!<<<

वैभवा! आभारी आहे!
रणजीता! तुझाही मी आभारी आहे.
धन्यवाद बेफिकीरजी! आमचा उत्साह वाढवल्याबद्दल!

सुप्रियाताई मनापासून आभारी आहे आपला!
पामरावर असाच लोभ असू द्या.

समस्त कनवाळू मायबोलीकरांचे मनापासून आभार!
........प्रा. सतीश देवपूरकर

काय हे देवसर ....................असंss नसतंsssss..................................
........................
...................................
.......................................
.................................................
प्रतिसादातही सगळे काफिये संपवता बुवा तुम्ही !! अन तेही नेमकी आम्हाला ज्या दिवशी त्या कावाफीची गझल सुचत असते तेंव्हाच !!

या "कनवाळू" च्या कावाफीची गझल आज नुकतीच करायला घेतली होती मी

हा पहा तो शेर असा होता ...............

शेर कितीही केले तरिही विठ्ठल उरतो उरात माझ्या
वाण लागला आहे त्याचा मी कनवाळू झालो आहे

असो बाकीचे २ शेर तयार आहेत (त्यातला एक जमीनीचा आहे ...मतला!! )

बाकीचे झाले की "आपल्या सेवेत" हजर करीनच !!;)

असो
धन्यवाद !!

तोवर आपली रजा घेतो
आपला नम्र
वैवकु

धन्स रिया

वैवकु तुम्हीही मोठे मोठे प्रतिसाद द्यायला लागलाय >>>> Proud

वाण लागला देवसरान्चा ..................!! दुसरे काय ?? Wink

Pages