"ते" - २

Submitted by मुरारी on 25 September, 2012 - 00:56

भाग १: http://www.maayboli.com/node/38066

पीसी उघडला. DVD तले फोटो ओपन केले .. सुरुवातीला . समुद्राचे.. टेकड्यांचे, शेतांचे, फोटो होते. सुंदरच साईट आहे ..
सातव्या फोटोत ती गढी दिसली आणि मी हादरलोच .. पुढचे सगळे फोटो मी अधाश्यासारखे पहिले ..
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .. हो तीच ती गढी..जळलेली. भेसूर. विद्रूप..

गेल्या २५ वर्षांपासून जे अगम्य कोडं स्वतःशी बाळगून होतो .. ते आज अनपेक्षित पणे माझ्या समोर आलेल होतं

***********************************

अचानक स्वतःवरचा ताबा सुटतोय की काय अस वाटायला लागलं, गरगरायला लागलं , पीसी बंद केला . ऑफिस मध्ये बसणे शक्यच नव्हते , कसाबसा हातातल्या कामाचा मेल केला आणि रिप्लाय ची वाट न बघताच निघालो .. बाईक ला किक मारली आणि सुटलो.. घरी येईपर्यंत डोक चांगलंच दुखायला लागलेलं होत बऱ्याच महिन्यांनी हा त्रास झाल्यासारखा वाटतोय , लहानपणापासून हा डोकेदुखीचा झटका मध्ये मध्ये येतो , डॉक्टरी इलाज मनाच्या समाधानाकरता , औषध घेतली किंवा नाही घेतली काही फरक पडत नाही , ४ दिवस डोकं दुखत राहतच.. आणि त्याच दरम्यान ती ... ती भयानक स्वप्न पडायला सुरुवात होते .
ठरावीक साचा. ठराविक गती, ठराविक दृश्य, आणि ठराविक पात्र .. जसा आपण एखादा चित्रपट वारंवार पाहतो , आपल्याला पुढे काय होणार हे माहितच असतं पण इथे पुढे काय होणार हे माहीत असूनही प्रत्येक वेळी अनुभव मात्र तितकाच ताजा, भयाण , रक्त गोठविणारा आणि खरा .. लहानपणापासूनच मला विचित्र स्वप्न पडायची . तेंव्हा फक्त मी रडत ओरडत उठायचो . हळू हळू मोठा झाल्यावर.. काही काही तुकडे लक्षात राहायला लागले . कधी ताऱ्यांनी खच्चून बहरलेले आभाळ दिसायचं , किंवा एक जुनाट प्रयोगशाळा . एका उंच उंच इमारतीत प्रचंड उपकरणे .. नंतर नंतर या स्वप्नांची जागा.. भयानक स्वप्नांनी घेतली.. विचित्र.. अंधाऱ्या जागा .. कोणीतरी सतत पाठलाग करताय अस जाणवायचं .. गुलाबी सर प्रकाशाच्या छोट्या छोट्या खोल्या. मोठे मोठे काचेचे संच. त्यात कसली कसली उकळणारी भयानक द्रव्य. आणि भयानक आकार असलेले प्राणी, विचित्र आकाराच्या चमकणाऱ्या नक्ष्या , भिंतींवर वाढलेलं विचित्र शेवाळ . . एका खोलीत. तर ओळीने उलटी टांगून ठेवलेली मानवी शरीर दिसलेली होती ..नंतर नंतर आजूबाजूचा प्रदेश दिसायला लागला. एक उंच टेकडी .. त्यामागे उधाण आलेला समुद्र . एक जुनाट उंच इमारत .. आजूबाजूची भयाण वाढलेली विचित्र आकाराची झाड .. केशरी रंगाच भेसूर चंद्रबिंब .. स्वप्नांची मालिका सुरु झाली कि संपता संपायची नाही... कधीतरी मग परत नॉर्मल आयुष्य सुरु व्हायचं .. मी तर हल्ली त्याकडे दुर्लक्षच करायला शिकलो होतो . मी नुसता एक प्रेक्षक म्हणून ते बघत बसायचो .. पण ते दबा धरून बसलेले विकृत अमानवीय आकार दिसले , त्या गढीभर वावरत असलेल्या सावल्या दिसल्या कि जिवाचा थरकाप उडायचा.. रात्र रात्र जागून काढायचो.
घरी येऊन बराच वेळ झालाय .. साधा दिवा देखील लावलेला नाही खोली अंधारात बुडून गेलीय.. फोन वाजायला लागला .. "शिरीष "! हा बोल रे ... कुठेस तू? मी घरी आलोय .. हो लवकर आलो. न्यूज तुला कळली तर .. ठीक ये तू .. जेवण आज घरीच करतो मी काहीतरी . बाहेरून नको मला थोडं बर वाटत नाहीये . शिरीष ला ऑफिस मधून सर्व प्रकार कळलेला होता , आता येईलच तो . मी शिरीष आणि अन्ना म्हणजेच मुरली आम्ही तीघ मुंबईत इथे खोली घेऊन राहतो . माझे आई बाबा कोल्हापूरला असतात . मुरली केरळातून इकडे आलाय , पण तो सतत टूर वरच असतो . आणि शिरीष . माझा सर्वात जवळचा मित्र .. आई- बापाविना वाढलेला पोर .. काकाने छळ करायला सुरुवात केली म्हणून पट्ट्या दहावी झाल्यानंतर पळून मुंबईला आला , पडेल ते काम केलं.. पण शिक्षण मात्र उत्तम घेतलं. पुस्तकाबाहेरच शिक्षण जास्त घेतलेलं असल्याने असेल कदाचित पण तो माझ्यासारखा भित्रट नाही .. मी प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी दहादा विचार करणारा तोपर्यंत ती गोष्ट करून तो परत येणारा .. एका वेळी २ -२ साईट सुद्धा तो सहज सांभाळतो. कशा काय देवच जाणे.. पण तो माझ्याबरोबर येणारे हेच माझा धीर वाढवणार आहे . हा प्रवास नक्कीच साधा नसणार .. नक्की माझ्या भूतकाळाच कोड उलगडणार होत.. माझं अंतर्मन मला सतत याची आठवण करून देत होतं.
११ वाजता शिरीष आला ..जेवता जेवता नेहमी प्रमाणे तो काय काय गप्पा मारत. साईट च्या लोकांना शिव्या घालत बडबडायला लागला, पण माझं कशातच लक्ष नव्हत त्यालाही ते जाणवलं असावं.. त्याने विचारल "काय झालाय बे पश्या .. असा गप्प का आज.. " तनयाला बघायला मिळणार नाही म्हणून पिचलास का रे लेका.. भेंडी तुझ्या जागी असतो तर १० वेळा विचारून मोकळा झालो असतो बघ.. साले तुम्ही गांडू ते गांडूच .. लेका हातची पोरगी जाईल.. विचारून मोकळा हो .. ती पण साली फिदा है रे तुझ्यावर,
" गप्पे शिर्या ... काहीतरी बडबडून नकोस.. माझं डोकच सटकलं.. चायला इथे विषय काय ..तू बडबडतो काय आहेस.. तुझं फाटक तोंड जरा बंद कर ., आणि मी काय सांगतो ते ऐक . प्रकरण विचित्र आहे खूप.. तुला आज कळलच असेल. आरेकरांच्या साईट बद्दल .. लोचा आहे लेका .. "साईट च नाव ऐकल्यावर शिरीष .. जरा सावरून बसला" . मी त्याला सुरुवातीला YZ आणि माझ्यात काय बोलणं झालं ते सांगितलं .. त्यानंतर मग हळू हळू त्याला माझ्या स्वप्नांबद्दल आणि त्या गढी बद्दल सांगितलं. हे ऐकून तो पण जरासा सावरून बसला.. २ सिगरेट प्यायल्यावर त्याने तोंड उघडलं.. "अस खरच झालंय का बे.. ".. हो शिरीष .. अरे गेली २५ वर्ष हा त्रास सहन करतोय मी .. तो प्रदेश मला आता मी तिथेच राहतो कि काय.. अस वाटण्या इतका परिचित झालाय . अरे यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मला माहितेय ,, पण तिथे नक्की काहीतरी घडतेय.. आणि त्याचा संबंध माझ्याशी आहे .. मी त्याला ते फोटो दाखवले. .आणि त्याच्या आसपास काय असू शकेल तेही सांगितले .. तो पक्का चक्रावून गेलेला होतां.. अचानक तो परत नॉर्मल मूड वर आला पशा आपल्याला जायचं आहे हे नक्की.. काम तो करनाही पडेगा.. पण यावेळी काहीतरी adventurous घडणार हे नक्की .. कधी निघायचं ते बोल.. मी असताना तू काहीच टेन्शन घेऊ नकोस.. इथेच चर्चा थांबवून.. मी झोपायला गेलो . शिरीष उगाच खिडकीत उभा राहून धूर सोडत बसला ..
दुसरा दिवसही तसाच गेला .. तिसऱ्या दिवशी. आम्ही YZ ची कार घेऊन निघालो , सकाळी १० च्या दरम्यान निघालो.. अंतर जवळ जवळ ३५० - ४०० किलोमीटर होत. आम्ही जवळ आमचे कपडे . laptop , क्यामेरा , काही रीडिंग मशीन , पेपर , खायचे सुखे पदार्थ . . सोबत शिरीष चा लाडका लांब असा एक स्विस नाईफ . दोन आर्मी टॉर्च अस बरंच काय काय घेतलेलं होत.... दुपारी जेवणाचा एक ब्रेक वगळता आम्ही कुठेच थांबलो नाही . साधारण ४ पर्यंत पोचू असा अंदाज होता .. पाऊस मध्ये मध्ये लागत होता.. पण मधेच YZ च्या गाडीने विचका केला.. पुढचा एक टायर पंक्चर झाला . तो बदलण्यात वेळ गेला. काही अंतर गेल्यावर पुन्हा अचानक आचके देत त्याची जुनाट इंडिका बंद पडली .. आता शिरीष ला सुद्धा काय करावे ते कळत नव्हते.. चांगलंच अंधारून आलेलं होत तालुक्याचं ठिकाण जवळ जवळ १५ - २० किलोमीटर वर होत .. आणि तिथून अजून २० किलोमीटर वर मुक्काम पोस्ट "पोळ" .. बरंच वेळ त्याने काहीतरी खटपट केली आणि गाडी सुरु झाली ..
तालुक्याला पोचेपर्यंत ८ वाजून गेलेले होते ..सर्वकडे अंधार पसरलेला होता. बाजारात तुरळक गर्दी होती . दुकानात दिवटी पेटलेली होती, त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात हळू हळू दिवसभराचे व्यवहार बंद व्हायला आलेले होते .. आम्हाला प्रचंड भूक लागलेली होती .. आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि अचानक प्रचंड गलका झाला.. बरीच लोक सामानासकट पळायला लागली. आम्ही जरा बावरलोच . . एक माणूस बाजूला उभ राहून आमच्याकडे पाहत होता, आम्ही त्याच्याकडे बघतच तोच म्हणाला .. 'पावण्यांनु, घाबरतां कित्यां ?ही शेवटच्या गाडीसाटी गडबड चल्लीहां.' " तो बोलल्याप्रमाणेच ५ मिनिटात कुठूनशी एक चिखलाने भरलेली बस चिखलातून कशीबशी आली.. त्याच्या मागोमाग दुसरी अजून एक बस आली. बहुतेक ह्या आधीच्या असाव्यात.. उशीर झाल्याने एकाचवेळी आल्या असाव्यात. सर्व गलका त्या बस मध्ये स्थिरावल्यावर पंधरा मिनिटात दोन्ही बस पेकाट मोडलेल्या म्हाताऱ्यागत खुडखुडत अंधार्या रस्त्यात दिसेनाश्या झाल्या..
आता अचानक तो नाका सुमसान वाटायला लागला. एक खानावळ उघडी होती.. आम्ही जाऊन त्यात बसलो .. आणि बाहेर पावसाने जोर धरला .. जे काय समोर आलं त्यावर तुटून पडलो. आता अजून गाव गाठायचं आहे हे डोक्यात होतंच.. एका पानवाल्याला बाहेर पत्ता विचारला.. तो म्हणाला साहेब उद्या सकाळीच जा.. आता रस्ता तुम्हाला सापडणार नाही .. मधेच कुठे चकवा लागला तर शोधत बसाल.. रस्ता अतिशय वाईट आहे .. त्यात आता पाऊस लागलाय. आम्हाला तशीही घाई नव्हतीच .. उगा हिंदी चित्रपटातल्या हिरो सारख.. अंधारातून मिरवत जाण्याची अजिबात हौस नवती.. शिवाय दोघेही तसे दमलेलो होतो .. शिवाय त्या गावात आम्हाला ओळखणार कोणीही नव्हत, त्यामुळे इतक्या रात्री तिकडे जाऊन तसाही आमचा काहीच उपयोग नव्हता.. ११ वाजले तसे उरलेली दुकानही बंद झाली.. आम्ही हॉटेल वगरे काही आहे का याची चौकशी केली .पण काहीच सोय झाली नाही .. शेवटी बस स्थानक नामक प्रकार तिकडे दिसला .. जेमतेम २ चार बाकडी होती. YZ ला शिव्या घालत भिकार्यागत तिकडेच आडवे झालो.
"साला पश्या पै न पै वसूल करणारे मी .. साला साईट वर जातो.. काय ऐश असते . एक से एक हॉटेल मध्ये राहिलेलो आहे मी.. आणि हे काय .. मच्छर जीव घेतील साले" शिरीष पक्का कावलेला होता.. पण पर्याय नव्हता.. अशी गैरसोय होणार याची आधीच कल्पना मिळालेली होती.. आणि त्याची भरपाई YZ देणार होता. शिवाय माझी चिंता वेगळीच होती..
कधीतरी डोळा लागला.. तेवढ्यात एक माणूस प्रचंड वेगाने धावत जाताना दिसला .. मला कळेनाच हा असा का पळतोय .. मी शिरीष ला हाक मारायला बाजूला पाहिलं..
आणि आणि देवा रे .. बाजूला कोणीच नव्हत.. आजूबाजूला रान माजलेलं होतं. तोंडात माती गेलीये .. समोर तीच ती भयाण गढी . शिरीष कुठे गेला? ते बस स्थानक ? ते गाव ? काहीच कळेनासं झालेलं .. मी त्या माणसामागे पळतोय.. आता मला मला पर्यायच नाहीये .. कोणीतरी वाईट पाठलागावर सुटलेलं आहे .. मी एका टेकाडावर चढलोय ... मी काय करतोय मला कळत नाहीये.. तो माणूस आता समोरच बसकण मारून रडतोय .. भयानक पाऊस सुद्धा पडतोय.. त्याला जाऊन विचारू का.. मदतीसाठी त्याला हाक मारावीच लागेल.. पण तोच कुठल्यातरी संकटात सापडलेला आहे.. परमेश्वरा कुठे अडकलोय मी.. मी तसाच चालत पुढे गेलो. तो तसाच बसून होता.. माझं समोर लक्ष गेलं.. भयानक समुद्र लाटांच तांडव करत गर्जत होता . मी त्याला हलवलं.. " अहो प्लीज मला मदत करा .. माझा मित्र दिसेनासा झालाय .. मी कुठेय मला माहिती नाही.. मला प्लीज वाचवा.. ".. पण त्याला मी काय बोलतोय ते ऐकू येत नाहीये.. तो चालू लागलाय टोकाला .. अहो थांबा.. मी मागे धावतोय . विजांचा कडकडाट काही थांबत नाहीये .. अरे हा कुठे जातोय ? समोर काहीच नाहीये .. मी ओरडून माझा आवाज त्याच्या पर्यंत पोचत नाहीये.. अचानक वीज चमकली आणि त्याच वेळी त्याने मागे पहिले ... माझ्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली .. त्या समोरच्या माणसाचा चेहरा.. तो चेहरा माझाच होता..
तो मीच होतो??? ... दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला समोरच्या उधाणलेल्या समुद्रात झोकून दिलं... मी हादरून बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हतो

क्रमश :

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली चाललेय गोष्ट.. पण वेळ फार लावताय बुवा..
>>> +१००

पण भाग फार छोटे आहेत. थोडे मोठे भाग टाका की राव Happy

पु.ले.शू.

.

काही कारणा स्तव " ते" थांबवली आहे
डिसेंबर नंतर लिहिण्याचा प्रयत्न करेन
Sad