ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला

Submitted by भारती.. on 23 September, 2012 - 14:43

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला

१. गीताटीकेच्या प्रारंभी श्रीज्ञानदेवांनी केलेली वंदने आणि वर्णने-

ॐ या परब्रह्मवाचक शुभाक्षराने श्रीज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेच्या -भावार्थदीपिकेच्या- प्रारंभीच्या वंदनांना सुरुवात केली आहे. ॐ काराने कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करावयाचा या हेतूबरोबरच ज्याला वंदन करायचे तो आत्म्यातच सामावलेला परमेश्वर ही या मंगलाक्षरातच सामावला असल्याची जाणीवही ज्ञानदेवांनी श्रोत्यांना करून दिली आहे .

ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||

पहिले वंदन या ओंकारस्वरूप,वेदप्रतिपादित, आद्य व स्वसंवेद्य अर्थात स्वतःला जाणणार्‍या आत्मरूपाला आहे. हे आत्मरूप हेच परमेश्वरस्वरूप आहे असे सूचित करून ज्ञानेश्वर पहिल्याच वंदनात आपल्या प्रतिपादनाचे वेगळेपण अधोरेखित करतात.
.श्रीज्ञानदेवांनी अतिशय अर्थवाही अशा फक्त चार विशेषणांमध्ये या आत्मरूप परमेश्वराचे वर्णन केले आहे.ओंकारस्वरूप असा हा अंतरात्म्यातच वास करणारा परमेश्वर वेदांनी प्रतिपादिलेला,सनातन व स्वतःला जाणणारा,संपूर्ण ज्ञानमय आहे.

दुसरे वंदन या पहिल्या वंदनातूनच उगम पावते.
देवा तूंचि गणेशु | सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजो जी ||

'देवा तूंचि गणेशु '-हा परमेश्वरच श्रीगणेश आहे . ज्ञानदेवांचा हा गणेश साक्षात तत्वमूर्ती आहे. शब्दब्रम्हाचे अर्थात वेदवाङमयाचे शरीर धारण करणार्‍या या गणेशाचे हे वर्णन म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा सारांशच आहे. हा गणेश रूढ गणेशमूर्तीहून वेगळा आहे.त्या रूढ मूर्तीतच श्रीज्ञानदेवांना अधिक अर्थबहुल अशा ओंकारस्वरूप , आदिबीज अक्षरब्रम्हाचा साक्षात्कार होत आहे.सगुण प्रतीकातून समाजाला निर्गुण ज्ञानोपासनेकडे नेणारा असा हा ज्ञानदेवांचा गणेश आहे. ( येथे स्वतःचा ज्ञानेश्वरीतील पहिलावहिला उल्लेख ज्ञानदेव ' निवृत्तीदास ' असा करीत आहेत. कायम कोणत्याही प्रसिद्धीप्रकाशात न आलेल्या लोकविलक्षण वडील बंधू व गुरु अशा निवृत्तीनाथांना त्या मिषाने ज्ञानदेव हळूच अभिवादन , वंदनाआतले वंदन करत आहेत.)
अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडळ | मस्तकाकार ||
हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
ते मियां गुरुकृपा नमिले | आदिबीज ||

असे श्रीगणेशाचे मनोहारी शब्ददर्शन आहे. ॐ कार, ज्यात श्रीगणेश सामावले आहेत, ते तर आदिबीज, ईश्वराला विश्वसंकल्प ज्यातून स्फुरला तो हा महाशब्द .त्या शब्दाची प्रतिष्ठा ज्ञानदेवांनी आपल्या प्रतिभेने साहित्यजगतात वर्धमान केली आहे.
वेदमय शरीर असलेल्या या गणेशाची वर्णरचना ही अंगकांतीवर झळाळणारी आभा आहे.स्मृती हे त्याचे अवयव.अर्थशोभा हे त्या अवयवांचे लावण्य.अठरा पुराणांचे अलंकार या मूर्तीने धारण केले आहेत,सिद्धांतरत्नांमुळे तिची शोभा अधिकच खुलली आहे.लाडिक अशा काव्यनाटकांची इवलीइवली घुंगरे या मूर्तीच्या पायात रुणझुणत आहेत . संवाद हा गणेशाचा शुभ्रदंत व बारीक नेत्रद्वय म्हणजे सूक्ष्मज्ञानदृष्टी ! विशाल कान म्हणजे दोन्ही (पूर्व व उत्तर) मीमांसा ही दर्शने.
या हस्तीमुखाच्या गंडस्थळांतून मद पाझरतोय..ते जणू बोधामृत.त्याला लोभून मुनीजनरूप भुंगे आले आहेत.द्वैताद्वैत ही या गजराजाची दोन गंडस्थळे,तत्वार्थ हा त्या गंडस्थळातील गंडमणी.मुकुटात उपनिषदांची सुगंधी फुले आहेत.
या श्रीगणरायाच्या हातात षटदर्शनांच्या भिन्नभिन्न मतांची आयुधे आहेत. त्याचा परशु म्हणजे न्यायशास्त्र,अंकुश म्हणजे अर्थशास्त्र,मोदक म्हणजे रसपूर्ण वेदांत, एका हातातील मोडका दात म्हणजे बौद्धमत खंडन ,वादाचा सत्कार म्हणजे वरदहस्त, धर्मप्रतिष्ठा हा अभयसूचक हस्त आहे. अशा प्रकारे श्रीज्ञानदेवांनी पातंजल,सांख्य,वैशेषिक,न्याय,मीमांसा व वेदांत या भारतीय सहा तत्वज्ञानांना गणेशाच्या सहा भुजांच्या ठिकाणी कल्पून तदनुसार प्रतीकात्म वस्तूंची योजना या सहा हातांमध्ये केली आहे. गणेशाचा इतका भव्य व व्यापक अर्थ भारतभूमीत दुसर्‍या कुणी लावल्याचे ऐकीवात नाही !
( टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवांचा आरंभ करणे ही त्या बुद्धिदेवाचे सामाजिक सांस्कृतिक पूजन,जागरण करण्याची पुढची पायरी होती याचे भान आज राहिले आहे का, विचार करता येईल .. )

तिसरे वंदन जगन्मोहिनी श्री सरस्वतीला एकाच पण अत्यंत उत्कट ओवीत येते.
आता अभिनव वाग्विलासिनी |जे चातुर्यार्थ कलाकामिनी|
ते श्रीशारदा विश्वमोहिनी| नमिली मिया ||
शारदेच्या अनुपम लावण्याच्या वर्णनासाठी श्रीज्ञानदेवांनी 'अभिनव वाग्विलासिनी' ,'चातुर्यार्थ कलाकामिनी' व 'विश्वमोहिनी' अशी तीनच सुंदर विशेषणे वापरली आहेत. त्यातून वाग्देवीची महत्ता, अमोघ सुंदरता व ज्ञान आणि कलांच्या उपासकांवर असलेली तिची कालातीत मोहिनी व्यक्त होते. येथे ही शारदा म्हणजे जणू त्यांचीच समूर्त शब्दकळा असे वाटल्याशिवाय राहत नाही.

चौथे वंदन सद्गुरुला केले आहे.. श्रीज्ञानदेव हे वंदन अतिशय आदराने करतात कारण संसारसागरातून त्यानेच श्रीज्ञानदेवांना तारुन नेले आहे.डोळ्यात दिव्यांजन घातल्यावर गुप्तधनाचा साठा दिसू लगतो तसे गुरुकृपेमुळे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. चिंतामणी हाती आलेला माणूस जसा सर्व मनोरथांबद्दल विजयी भाव बाळगतो तसाच गुरुकृपा झालेलाही पूर्णकाम होतो. झाडाच्या मुळाला पाणी घालण्याने सर्व शाखापल्लवांचे पोषण होते,एका समुद्रस्नानाने सर्व तीर्थांचे पाणी अंगावर घेतल्याचे पुण्य मिळते तसे सद्गुरुमुळे पूर्णज्ञानाचे अवगाहन घडते. सर्व रसांचा स्वाद एका अमृतपानात सामावला आहे तसेच एका सद्गुरुमध्ये आपला संपूर्ण उद्धार सामावला आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात.
येथे ज्ञानेश्वरीय वंदने संपतात,पण वंदनांच्या व्याख्या बदलतील इतके मूलगामी चिन्तन आपल्याला करावयास लावतात.

२. श्रीज्ञानदेवांनी केलेले महाभारताचे वर्णन-
'म्हणऊनि महाभारती जे नाही | ते नोहेचि लोकी तिही |
येणे कारणे म्हणिपे पाही| व्यासोच्छिष्ट जगत्त्रय || '

महाभारताला ज्ञानेश्वर सर्व कथांची जन्मभूमी,विचारवृक्षांचे उद्यान,तत्वाचे भांडार, नवरसांचा सागर अशा उपमांचा ,दृष्टांतांचा पाऊस पाडून गौरवतात. ही कथा म्हणजे शारदेला शृंगारणारे अलंकारांचे भांडार आहे्.हा काव्यांचा, ग्रंथांचा राजा,हा तर रसांनाच रसाळपणा प्रदान करणारा आहे.. शास्त्रांना शब्द्सौंदर्य आणि महाज्ञानाला कोमलता देणारा हा अलौकिक ग्रंथराज.
'एथ चातुर्य शाहणे झाले |प्रमेय रुचीस आले |
आणि सौभाग्य पोखले | सुखाचे एथ ||'

- याने जणू चातुर्याला शहाणे केले, सिद्धांतांमध्ये गोडी पेरली,सुखालाच सौभाग्यवंत केले.. जितके पुनः पुनः निरखावे तो तो याचे रंग अधिकच झळाळतात,शब्द अधिक सामर्थ्यवंत वाटतात. नगरात राहणारा मनुष्य नागर होतो तसे व्यासवचनतेजाने वाचकाचे होते !
वयात येताना किशोरीच्या कायेवर जे पहिल्या बहराचे तेज प्रकटते किंवा वसंतागमनाबरोबर उद्यानात जी वनश्रीची शोभा दाटते ,सोन्याला अलंकाररूपात जे रूपवैभव मिळते ते सर्व या कथेच्या रूपाने अवतरले आहे. हिच्या निमित्ताने धाकटेपण धरून पुराणेच पुनः जगात आली आहेत.. व्यासांच्या सर्वगामी प्रतिभेमुळे तिन्ही लोक उष्टे झाले आहेत, काहीच अस्पर्श राहिले नाही..

३.श्रीमदभगवतगीतेचे श्रेष्ठपण -
महाभारताची महती वर्णन केल्यावर श्रीज्ञानदेव गीतेची महती वर्णन करतात. गीतेला ते भारतरूप कमळाचा पराग म्हणून वर्णितात.
ना तरी शब्द्ब्रह्माब्धि | मथिलेया व्यासबुद्धी |
निवडिले निरवधि| नवनीत हे ||

व्यासांच्या बुद्धीने वेदवाङमयाचा समुद्र घुसळून हे लोणी काढले व ते ज्ञानाच्या अग्नीवर विवेकपूर्वक कढवले तेव्हा ते परिपक्वतेच्या सुगंधाने दरवळू लागले.. विरक्तांना ते सदैव हवेहवेसे वाटते,योगीजनांना रममाण करते असे हे गीतेचे तत्त्वज्ञान भीष्मपर्वात प्रकट झाले आहे. श्रीज्ञानेश्वर येथे अतिशय कोमल दृष्टांताची योजना करतात-
'जैसे शारदियेचे चंद्रकळे | माजि अमृतकण कोवळे |
ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||
'
शरदाच्या चांदण्यातले कोवळे अमृताचे कण चकोराची पिले अतिशय मृदू होऊन सेवन करतात तसेच श्रोत्यांनी चित्ताला हळूवारपणा आणून गीतेचे श्रवण करावे ! हे रससेवन कसे असावे ?
'जैसे भ्रमर परागु नेती | परी कमळदळे नणती |
तैसी परी आहे सेविती | ग्रंथे इये ||
का अपुला ठावो न सांडिता | आलिंगिजे चंद्रु प्रगटता |
हा अनुरागु भोगिता | कुमुदिनी जाणे ||'

कमळपाकळ्यांना धक्काही न लावता भुंगे परागकण नेतात ,आपली जागाही न सोडता चंद्रविकासिनी कमलिनी चंद्राला मिठी घालते, प्रेमाची ही तर्‍हा तिलाच जमते ,तसेच श्रोत्यांनी अतीव प्रेमपूर्ण सखोल स्थिरभावनेने भगवद्गीतेचे श्रवण व आकलन केले पाहिजे..
इथे श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांकडून असलेली त्यांची अपेक्षा प्रकट करत आहेत.श्रोत्यांकडून एका उच्च पातळीवरची रसग्राह्यता ,उत्कट प्रेमपूर्ण अवधान त्यांना हवे आहे कारण त्यांचा वर्ण्यविषय तसाच सूक्ष्मतरल अन गहन आहे.. कसा , तर-
'हे शब्दाविण संवादिजे| इंद्रिया नेणता भोगिजे |
बोलाआधि झोंबिजे | प्रमेयासी
||'
शब्दांच्या पलिकडला संवाद,इंद्रियांच्या पलिकडला भोगविषय असा हा गीतार्थ. उच्चाराच्या अतीत असलेले त्याचे सारस्वल्प समजून घ्यायचे आहे.
अशा आत्यंतिक कोमल, आर्जवी पण प्रभावी शब्दात ज्ञानेश्वरांनी गीतेचे श्रेष्ठत्व तर वर्णिले आहेच, पण तिच्या श्रवणासाठी लागणारी योग्यताही समजावून सांगितली आहे.

४. ज्ञानेश्वरांनी मांडलेली भावार्थदीपिकालेखनामागची त्यांची भूमिका-
महाभारताचे व विशेषत : गीतेचे गुणवर्णन करून श्रीज्ञानेश्वर आपल्या भावार्थदीपिकालेखनामागची भूमिका अतिशय नम्रतेने मांडतात. खरे तर प्रथमच ते स्वतःबद्दल काही निवेदन करतात. ते म्हणतात- परमेश्वरा, आपले हृदय सखोल आहे म्हणून लडिवाळपणे चरणी लागून मी काही विनवीत आहे.बाळ बोबडे जरी बोलले तरी आईबापांना केवढा संतोष होतो ! तसेच तुम्ही मला स्वीकारले आहे,सज्जनांनी मला आपले म्हटले आहे. तेव्हा माझे उणेअधिक साहून घ्यावे.
' तरी न्यून ते पुरते | अधिक ते सरते |
करून घेयावे हे तुमते | विनवितु असे ||
'
चोचीने समुद्र मापू निघालेल्या इवल्याश्या टिटवीसारखे माझे साहस- वेदवाङमय हे ज्याचे निजेतले घोरणे त्या सर्वेश्वराचे गीता म्हणजे जागेपणीचे बोल मी अनुवादले आहेत-
'हा वेदार्थसागरु | जया निद्रिताचा घोरु |
तो स्वये सर्वेश्वरु | प्रत्यक्ष अनुवादला ||
'
या साहसाचे ज्ञानेश्वरांना पूर्ण भान आहे पण त्यांच्या जात्या विनयशीलतेने ते या साहसाचे श्रेय पुनःपुनः आपल्या गुरुंना देतात. मी जरी लहान अल्पमती असलो तरी श्रीगुरुकृपेने हे साहस करू शकलो..
'परी एथ असे एकु आधारु |तेणेचि बोले मी सधरू |
जे सानुकूळ श्रीगुरु | ज्ञानदेवो म्हणे
||'
गुरुकृपा झाल्यावर काय अशक्य आहे ? सरस्वतीच कृपावंत झाल्यावर काय शिल्लक राहिले ? जेव्हा मुक्याला वाग्देवी प्रसन्न झाली, तेव्हा त्याचे मोनेपणच संपले !
'जरी प्रकटे सिद्धसरस्वती | तरी मुकया अथी भारती |
एथ वस्तुसामर्थ्यशक्ती | नवल कायी
||'
'मी' अन 'माझे' याबद्दल आयुष्यभर आश्चर्यकारक एकांतिक मौन राखणारे ज्ञानदेव इथे केवळ श्रीगुरुंना - निवृत्तीनाथांना -श्रेय समर्पण करण्यापुरताच प्रथमपुरुषी एकवचनाचा उच्चार करत आहेत.
५. अर्जुन विषाद..अर्जुनाच्या मोहाचे ज्ञानेश्वरांनी केलेले वर्णन-
विविध संकल्पना व भूमिका स्पष्ट केल्यावर ज्ञानेश्वर गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयोग याच्या वर्णनात्मक निरुपणाकडे येऊन ठेपतात . धृतराष्ट्र अन संजय यांच्या संवादातून कुरुक्षेत्रावर पसरलेला कौरवपांडवांचा तो सैन्यसागर ,त्यातील विजिगिषु योद्धे, त्यांची भयावह युयुत्सू ऊर्जा याचे जिवंत शब्दचित्र तपशिलांसह उभे करून ज्ञानेश्वर गीतेचा जेथे खराखुरा आरंभ होतो त्या प्रसंगाकडे येतात.
भारतीय युद्धाच्या प्रसंगी दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करून अर्जुनाने तो युद्धप्रेरित स्वजन सागर पाहिला ..
'इष्टमित्र आपले | कुमरजन देखिले|
हे सकळ असती आले \ तयांमाजि ||
सुहृज्जन सासरे | आणिकही सखे सोईरे |
कुमर पौत्र धनुर्धरे | देखिले तेथ
||'
...व जणु एखादा मांत्रिक मंत्रोच्चारात चुकून स्वतःच भ्रमिष्ट होतो तसा तो वीरश्रेष्ठ महामोहाच्या आहारी गेला अशी उपमा ज्ञानेश्वर देतात.
'देखा मंत्रज्ञु बरळु जाये | मग तेथ का जैसा संचारु होये |
तैसा तो धनुर्धर महामोहे | आकळिला
||'
चंद्र किरणांच्या स्पर्शाने सोमकांतमण्याला पाझर फुटावा तद्वत अनिवार स्नेहभावनेच्या स्पर्शाने अर्जुनाचे हृदय द्रवू लागले..विषयलंपट पुरुष नव्या स्त्रीच्या मोहात सापडून पत्नीला विसरतो तसा अर्जुन करुणेच्या भरात वीरवृत्तीला विसरला व त्याची ती अभिमानिनी उच्चकुलोत्पन्न तेजस्वी स्वस्त्री- वीरवृत्तीही जणू या अपमानामुळे त्याला सोडून गेली अशी अतिशय सार्थ उपमा येथे ज्ञानेश्वर योजतात.
'जिया उत्तम कुळीचिया होती |आणि गुणलावण्य आथि |
तिया आणिकीते न साहती | सुतेजपणे ||
'
येथे अजूनही एक सुंदर उपमा येते- भुंगा, जो कठीण लाकूडही सहज फोडतो तो रात्रौ कोवळ्या कमळकळीत अडकला तर गुदमरून प्राण गेला तरी पाकळी चिरून बाहेर येत नाही..स्नेह हा असा कोवळेपणाने कठीण असतो.. किती शाश्वत सत्य !
'जैसा भ्रमर भेदी कोडे | भलतैसे काष्ठ कोरडे |
परि कळिकेमाजि सापडे | कोवळिये ||
तेथ उत्तीर्ण होईल प्राणे| परी ते कमळदळ चिरू नेणे |
तैसे कठीण कोवळेपणे | स्नेह देखा
||'
अर्जुनाच्या करुणेत एक व्यथाही मिसळली आहे.मूलतः सात्विक अशा अर्जुनाला आपल्या प्रियजनांचा वध करणे असह्य तर वाटतेच पण या वधांच्या महादोषामध्ये सापडून आपण श्रीहरीलाही दुरावू असे त्याला वाटते. आयता नात्याने लाभलेला व स्नेहाने बद्ध केलेला असा हा परम सुहृद या पापमय हिंसामय युद्धामुळे आपल्याला पारखा होईल ही अर्जुनाची व्यथा त्याच्या श्रीकृष्णावरील निस्सीम प्रेमाची खूण आहे..
'जरी वधु करुनी गोत्रजांचा | तरी वसौटा होऊनि दोषांचा |
मज जोडलासि तू हातीचा | दूरी होसी
|| '
हा दोषांचा 'वसौटा ' म्हणजे 'आश्रयस्थान ' म्हणजे नक्की कायकाय ? त्यात दोन्हीकडे होणारा कुळनाश, अराजक आणि अधर्माचे राज्य,त्यात बोकाळणारा व्यभिचार व पापांचा भार हे सारे त्या वीरवराला आधीच दिसत आहे.. महायुद्धाचे इहलोकीचे भयाकारी परिणाम अन परलोकी केवळ नरकमय पातकांची जोडणी याची जाणीव अर्जुनाला दु:खाने जर्जर करते आहे..असल्या युद्धात कसला विजय ? त्यापेक्षा युद्धात शत्रुचे बाण झेलून मरून जावे असे म्हणत तो व्याकूळ महाधनुर्धर धनुष्यबाण टाकून रथाखाली उडी मारून रडतो आहे.. ज्ञानेश्वरांच्या परमसंवेदनाशील प्रतिभेने हे दृष्य उत्कटतेने चितारले आहे-
' आता यावरी जे जियावे | तयापासूनी हे बरवे |
जे शस्त्र सांडूनि सहावे | बाण यांचे || '
' मग अत्यंत उद्वेगला | न धरत गहिवरु आला |
तेथ उडी घातली खाला | रथौनिया ||
जैसा राजकुमरु पदच्युतु | सर्वथा होय *उपहतु |
का रवि राहुग्रस्तु | प्रभाहीनु
||'
*(भानरहित)
या नाट्यपूर्ण चरमबिंदूवर ज्ञानेश्वरांची वाणी व त्यांचे लेखनिक सच्चिदानंदबाबांची लेखणी पहिल्या अध्यायाची लेखनसीमा करते.

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद राजू, होय, लिहायचा मानस आहे. एक सामान्य, पण कविमनाची वाचक या भूमिकेतून महाराष्ट्राच्या कविकुलगुरुंकडे पहावेसे वाटले.

वा वा वा भारतीताई, किती प्रासादिक, रसाळ व मर्मग्राही निरुपण.......

तुमच्याकडे शब्दसंपदा तर अपार आहेच पण त्याची नेमकी मांडणी करणे हे खरे कौशल्य - जे तुम्ही सहजतेने केले आहे......

ज्ञानाचे बोलणे | आणि येणे रसाळपणे...... मग आता नको / बास का बरं म्हणायचे......

असेच पुढचे सगळे अध्याय येउंद्यात..... नक्कीच त्यात रसाळता, मार्मिक विवेचन, नेमकी शब्दयोजना असणारच....

वाचे बरवे कवित्व | कवित्वी रसिकत्व | रसिकत्वे परतत्व | स्पर्शु जैसा | - या विवेचनाला असलेला तो परतत्व स्पर्श नक्कीच जाणवतोय..

भारतीताई,

साष्टांग दंडवत! आपली शब्दयोजना कैच्याकै समर्पक आहे! Happy

उगमे गीता गाऊली (*१) ॥
निरूपिती स्वयं माउली ॥
ऐसी शब्दब्रह्मचाहुली ॥
लागिली 'भारती'भाषे ॥

*१. गाऊली = गाय

आपला वाग्विलास आम्हांस सतरापटीने अनुभवास येवो! बाकीचे अध्याय पण येउद्यात! Happy

आ.न.,
-गा.पै.

शशांकजी, दिनेशदा, गामापैलवान, आंग्लभाषेचा आधार घेऊन म्हणते, I am humbled !!
होय, सर्व अध्यायांवर लिहिण्याचा प्रयत्न करते आहे, तुमच्या शुभेच्छा असू द्यात.

संतवाङ्मय अभ्यासक मंडळ मराठवाडा यांच्या मदतीने मी केलेला हा प्राथमिक अभ्यास, श्री सि.ब. महाराज माझे परीक्षक होते. हेतू एकच, स्वतःला मराठी कवयित्री म्हणवताना आपल्या उत्तुंग वारशाची थोडी जाणीव असावी.........

वा भारतीताई
खूप आनन्द होतो आहे
ज्ञानेश्वर हा तर आमच्या आवडीचा विषय
लिहीत रहा आम्हाला खूप काही शिकयला मिळते आहे

धन्यवाद

भारती जी
परवा तुमचा लेख पाहिला . त्यावरून तुम्ही आधी दोन भाग लिहिल्याचे समजले. तेव्हां पहिल्या भागापासून वाचायचे ठरवले.मी दासबोध आणि गाथा वाचली आणी थोडीफार समजली. पण ज्ञानेश्वरीची भाषा सातशे वर्षांपूर्वीची. त्यामुळे वाचण्याचा प्रयत्न सोडला होता.
" ...........हेतू एकच, स्वतःला मराठी कवयित्री म्हणवताना आपल्या उत्तुंग वारशाची थोडी जाणीव असावी....... " हा तुमचा विचार मनाला स्पर्श करून गेला.
हा पहिला भाग छानच आहे. शशांक पुरंदरे यांनी त्याविषयी यथार्थ लिहिले आहे त्याशी मि सहमत आहे.
आता पुढील भाग वाचल्यावर लिहिन. या लिखाणाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा!

भारती जी

तुमचा हा लेख मी मिसला होता, आता तो परत वर आला त्या निमित्त्याने !!

पहीले धन्यवाद !!

ज्ञानदेव हे मराठी जनतेचे आराध्य दैवतच, आ म्ही सर्वांनी त्यांना पुजीले पण ज्ञानेश्वरीचे रस ग्रहण आणि अनुकरण जाणिव पुर्वक केले गेले नाही.

ज्ञानेश्वरी ज्ञानाची खाणच आहे. हे द्वार आम्हाला ऊघडे केल्या बद्दल धन्यवाद.

ज्ञानदेवाची उंची आपल्याला माहीत आहे पण त्यांचे गुरु निवृत्तीनाथ किती महान असतील ?

तुमच्या पुढच्या लेखा बद्दल शुभेच्छा

हे अमृतकण धरुन ठेवतानाही कोण कसरत होतेय...तुम्ही ते आमच्या सारख्या पर्यंत पोहचवताय...
खूप धन्यवाद...