विज्ञान: काय आहे आणि कशाला म्हणायचे हे जाणण्याचा प्रयत्न

Submitted by उदय on 20 September, 2012 - 10:35

आपण नित्य व्यावहारांत विज्ञान, शास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असे शब्द सहजपणे वापरतो. तर विज्ञान म्हणजे नक्की काय ? कशाला म्हणायचा वैज्ञानिक दृष्टिकोन ? हे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. प्रयत्नातील त्रुटी मनमोकळे पणाने समोर आणल्यास स्वागत आहे.

विज्ञान आणि वैज्ञानिक शाखा:
क्रमबद्ध आणि तर्कशुद्धरितीने, आपल्या आणि सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान एकत्र करुन, त्या ज्ञानाला (माहितीला) पडताळुन बघता येतील अशा नियम आणि सिद्धांतात बद्ध करण्याच्या प्रक्रियेला विज्ञान (Science) असे म्हणतात. Science हा शब्द मुळ लॅटिन scientia (म्हणजे ज्ञान, कौशल्य) पासुन तयार झालेला आहे. [१-२]

विज्ञान आपण का शिकतो ? - मनुष्य स्वभाव हा मुळातच जिज्ञासू आहे. प्रश्न विचारणे, निर्माण करणे हा गुण प्रत्येक मनुष्याचा अंगात उपजतच असतो, उदाहणार्थ लहान मुले अनेक प्रश्न विचारुन मोठ्यांना भंडावुन सोडतात. सभोवतालच्या घटकां बद्दल असलेले अज्ञान दुर करावे अशी उत्सुकता प्रत्येकाकडे असते. त्या औत्सुकते मधुन काही प्रश्न तयार होतात, हे असेच का आणि ते तसे का नाही यांचा मागोवा घेत आपण शंकांचे निरसन करतो किंवा तसे करण्याचा आपल्या परिने प्रयत्न करतो. शंकांचे निरसन होत असतांनाच, मनुष्याला नवी माहिती मिळते, नव्या तंत्रांचा विकास होतो. या नव्या मिळालेल्या माहितीच्या आधाराने आणखीन नवे प्रश्न तयार होतात, नव्या शंका निर्माण होतात आणि विज्ञान विकासाचे चक्र सातत्याने सुरु रहाते. होणारा विकास हा न थांबणारा आहे म्हणुन सातत्याने.

विज्ञानाचा आणि उपलब्द वैज्ञानिक माहितीचा पसारा अवाढव्य, महाप्रचंड आहे. तो अभ्यासतांना त्यांत सुसुत्रता येण्याकरता त्याचे विविध भागांत (शाखांत) विभाजन केले आहे, या शाखांना वैज्ञानिक शाखा (Scientific discipline) असे म्हणतात. वैज्ञानिक शाखेची व्याप्ती आणि आकार हा मर्यादेत सिमीत ठेवलेला असतो जेणेकरुन विषयाची हाताळणी मानवाला अधिक सोपी आणि व्यावहार्य ठरावी. काही दशकांपुर्वी अशी विभागणी करणे सोपे होते (चित्र क्र. १). आज २०१२ मधे निव्वळ रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र यांच्याच अनेक उपशाखा आहेत. अर्थात या उपशाखांच्या सिमा या अस्पष्ट किंवा धुसर आहेत. प्रत्येक शाखा दुसर्‍यां शाखातुन माहिती किंवा तंत्रांचा आधार घेत असतांत. कुठलिही शाखा हि पुर्णपणे अलिप्त नाही आहे. खाण क्षेत्रात (mining) काम करतांना तुम्हाला भूगर्भशास्त्रा सोबत रसायन, भौतिक, धातुशास्त्र असे विविध अंगाचे ज्ञान असायला हवे. नवे औषधे तयार करतांना औषधशास्त्रा सोबतच वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्राच्या ज्ञानाची अवशक्ता आहे. किराणोत्सारी क्षेत्रात (radiology) काम करतांना भौतिक तसेच रसायन आणि जिवशास्त्र विषयक माहिती असणे उपयोगी पडते.

1_vaiGnyaanik_shaakhaa_vibhaagaNi.jpgवैज्ञानिक संशोधन (Scientific Research) आणि तंत्रज्ञान (Technology):
वैज्ञानिक संशोधन कशाला म्हणायचे ? वैज्ञानिक संशोधन अशी प्रक्रिया आहे ज्यामधे एखाद्या विषयाचा नियमबद्ध रितीने मागोवा घेताना त्या विषयाबद्दल नवी माहिती शोधली जाते. अशी माहिती / ज्ञान इतरांना पडताळता यायला हवी अशी अत्यंत महत्वाची पूर्वअट आहे. संशोधन इतरांना पडताळता यावे म्हणुन केलेल्या संशोधनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे हे संशोधन करण्या एव्हढेच महत्वाचे आहे. वैज्ञानिक संशोधनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. (अ) मुलभुत संशोधन (basic or fundamental research), (ब) व्यावहारिक संशोधन (applied research).

मुलभुत संशोधनांत सृष्टीचे मुलभुत नियम शोधण्याचा, ते जाणण्याचा प्रयत्न असतो. हे असे का होते, ते तसेच का होत नाही - येथे कुठला एक उद्देश मनांत बाळगुन अभ्यास होत नाही. या प्रकारच्या संशोधनातुन मिळालेल्या माहितीचा उपयोग नजिकच्या भविष्य काळांत होतोच असेही नाही पण या माहितीच्या आधारे भविष्यांतील संशोधन कार्याला आणि नवे शोध लागायला मदतच होते. मुलभुत संशोधन हे मनुष्याची ज्ञानलालसा पुर्ण करण्यासाठी आणि निव्वळ ज्ञाना मिळवण्यासाठी ज्ञान या प्रकारांत मोडते. मंगळावर पाणि असेल का ? अणूच्या गर्भात असणार्‍या मुलभुत घटक कशाचे बनले आहेत? मनुष्याच्या त्वचेवर रंग कोणत्या घटकांवर अवलंबतो? मेंदु कार्य कसा करतो? जवळ जवळ प्रत्येकालाच पडणारा (अजुनही समाधानकारक उत्तर सापडले नसणारा) प्रश्न - पृथ्वीवर सजिव सृष्टी निमाण कशी झाली ? सजिव सृष्टी बाहेरच्या अवकाशातुन पृथ्वीवर आली का ते येथेच निर्माण झालेत ? आपल्याला विश्वात कुणी सोबती आहेत का सजिव केवळ पृथ्वीवरच आहेत?

मुलभुत संशोधन करणे खरोखरच गरजेचे आहे का ? आपण मंगळावर पाणि शोधायची, त्या संशोधनावर अमाप पैसा खर्च करायची गरज आहे का ? मुलभुत संशोधन खुप महत्वाचे आहे. अ‍ॅमरेशियमचा शोध १९४४-४५ लागला [३], त्यावेळेला त्याचा काही उपयोग होईल या बाबत शोध लावणार्‍यांना कुठलाही अंदाज नव्हता. पण आज कोट्यावधी घरांमधे जे smoke detectors [४]बसवलेले आहेत त्या मधे अमरेशियम अत्यंत महत्वाचे कार्य करतो. मुलभुत संशोधन केल्यामुळेच आपल्याला आज आगी पासुन पुर्व सुचना मिळते आणि लाखो लोकांचे प्राण वाचतात.

2_smoke_detector.jpg

व्यावहारिक संशोधन या प्रकारांत मोडले जाणारे संशोधन या मधे एक ठराविक असे ध्येय असते. संगणकाचे कार्य अजुन वेगवान कसे करता येईल ? गाडीला लागणारे इंधन कसे वाचवता येईल? (fuel economy) सुर्या पासुन मिळणारी सौर उर्जा आपल्या वापरांत अधिकाधिक कशी आणता येईल? बहुतेक शास्त्रज्ञ हे व्यावहारिक किंवा applied या प्रकारांतच संशोधन करत असतांत. अर्थात त्यांच्या संशोधनाचा पाया हा आधी झालेल्या मुलभुत संशोधनात आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी दोन्ही प्रकारचे संशोधन सारखेच महत्वाचे आहे. यशस्वी ठरलेली व्यावहारिक संशोधनाची काही उदाहरणे. (अ) प्लॅटिनम संयुगांचा (सिसप्लॅटिन) वापर कँसरशी सामना करण्या औषधांमधे होतो. Satraplatin तसेच रुथेनियम (Ruthenium Ru) चा वापर कँसरशी सामना करण्या औषधांमधे करण्याबाबत च्या चाचण्या (clinical trials) अंतिम टप्यात आहेत. [५, ६]

अनेक महत्वाचे शोध हे निव्वळ अपघाताने लागलेले आहेत उदा: हेन्री बेक्वेरेल यांनी लावलेला किरणोत्साराचा शोध [७], अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा सुप्रसिद्ध पेनिसीलिन चा शोध [८] किंवा रोंजन यांनी लावलेला क्ष किरणांचा शोध [९]. इच्छुक वाचकांसाठी अपघाती संशोधनाची अजुन काही उदाहरणे येथे वाचायला मिळतील [१०]. हे सर्व काय दर्शवते ? या व इतर अनेक शोधांना निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. रोंजन यांच्या अगोदरही शास्त्रज्ञांनी क्ष किरणे बघितली होती (पण दुर्लक्ष केले असेल किंवा निरीक्षणांत कमी पडले असतील). अपघाती शोधाबाबतचे लुई पाश्चर (1822-1895 ) यांनी व्यक्त केलेले मत, “In the fields of observation, chance favours only the prepared mind”, अगदी चपखल बसते [११]. तुमची योग्य प्रकारे तयारी झाली असेल तर झालेल्या अपघाताचा तुम्हाला पुरेपुर फायदा घेता येईल अन्यथा महत्वाच्या निकालांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

तंत्रज्ञान (Technology) - यशस्वी व्यावहारिक संशोधनाची परिणिती नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यांत होते. मनुष्याचे आयुष्य आहे त्यापेक्षा दर्जेदार तसेच सुखकर बनवण्यासाठी जेव्हा नव-नव्या वस्तू बाजारांत येतांत त्याला तंत्रज्ञान जबाबदार असते. वेगवान संगणक, आय फोन (I-phone), वेगवान विमान, कार, कँसरशी सामना करणारे औषधे/ उपचार... हे सर्व तंत्रज्ञान विकासाची फळे आहेत. आपण आजपासुन १०० वर्षापुर्वीचे आणि आजचे मानवाचे जिवनमान यामधे तुलना केल्यास जो बदल दिसतो तो केवळ तंत्रज्ञानामुळे आणि त्यामधे झालेल्या विकासामुळेच.

वैज्ञानिक पद्धती:
निसर्गाचे रहस्य जाणुन घेणे हा विज्ञानाचा उद्देश आहे. विशिष्ट परिस्थितीमधे, वायूचा दाब (pressure) वाढवल्यावर आकारमान (volume) कमी होते हे कळणे महत्वाचे आहे पण त्यापेक्षाही ते कुठल्या निसर्ग नियमानुसार घडते हे कळणे जास्त महत्वाचे आहे. निसर्गाचे नियम जाणण्यासाठी शास्त्रज्ञ तत्व/ सिद्धांत (Theory), गृहितक/ कल्पना (hypothesis), प्रयोग (Experiment), नियम (law), पद्धती (method), निरीक्षण यांचा वापर करतांत आणि या सर्वांतुन वैज्ञानिक पद्धत तयांर होते.

एखाद्या नैसर्गिक घटकाबद्दल स्विकारण्यायोग्य ग्राह्य निरीक्षणाला आपण वास्तुस्थिती म्हणतो. निरीक्षण आणि वास्तुस्थिती मधे फरक काय आहे? एखाद्या निरीक्षणाचे वस्तुस्थिती मधे रुपांतर होण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत:
(अ) निरीक्षणाच्या सत्यतेची पडताळणी - मी एकच प्रयोग सातत्याने करत असेल, तर प्रत्येक वेळी मला एक सारखेच निकाल मिळतील. e. g. एका धातूच्या भांड्यामधे मी पाणि घेतले. या पाण्याला ‘विशिष्ट नियंत्रित परिस्थीती’ मधे उष्णता दिली. एका ठराविक तापमानाला (१०० से.) पाणि उकळायला लागेल. आता याच ‘विशिष्ट नियंत्रित परिस्थीती’ मधे मी दुसर्‍या, तिसर्‍या, दहाव्या दिवशी तोच प्रयोग (पाण्याला उष्णता देण्याचा) केला तर मला निकाल सारखाच मिळायला हवा म्हणजे पाणि १०० से. उकळायला हवे.
(ब) पडताळणी करता येणे याचा अर्थ एखाद्याने माझी कार्यपद्धती वापरली किंवा त्यानुसार प्रयोग केलेत तर त्या व्यक्तीला देखील मला मिळालेले निकालच मिळायला हवेत. वरिल पाणि उकळण्याच्या प्रयोगामधे उल्लेख केलेली ‘विशिष्ट नियंत्रित परिस्थीती’ च्या सर्व नोंदी मी चार भिन्न व्यक्तींना पाठवल्या, आणि त्यांनी माझ्या प्रयोगाचे अनुकरण केले तर त्यांनाही माझ्याच सारखे निकाल मिळायला हवेत. प्रयोगाचे निकाल हे मनुष्य / स्थल निरपेक्ष आहेत, कुणी आणि कुठे प्रयोग केले याला महत्व नाही आहे. निकाल सारखे येणे महत्वाचे.
निरीक्षण क्वचित प्रसंगी चुकीचे असण्याची शक्यता असते पण वस्तुस्थिती नेहेमीच सत्य असते.
निरीक्षणांच्या आधारावर वास्तुस्थिती तयांर होते आणि नियम/ सिद्धांत मांडले जातांत. नियमांची सत्यता पडताळण्यासाठी प्रयोग होतात. सत्यता सिद्ध झाल्यास सिध्दांना मान्यता मिळते. सत्यता सिद्ध करता आली नाही तर सिध्दांतांत दुरुस्ती केली जाते. वैज्ञानिक तत्व कसे विकसित होण्याची प्रक्रिया चित्र क्र. ३ मधे दर्शवली आहे [१]. विज्ञानांत कुठलाही नियम/ तत्वे हा अंतिम सत्य नाही आहे. प्रत्येक तत्वाला सर्व काळात नव्या मिळत असलेल्या माहितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. कोपर्निकस यांनी पृथ्वी सुर्याभोवती वर्तुळाकृती कक्षेत फिरते असे मांडले होते. पुढे नव्या मिळालेल्या माहितीच्या आधाराने केप्लर यांनी त्यांत बदल (elliptical कक्षा) सुचवला आणि तो आजतागायत मान्य आहे. पुढे भविष्यात आपले ज्ञान बदलेल, आणि त्या नव्या माहितीला सामोरे जाण्याची तयारी वैज्ञानिक तत्वांत असायला हवी.

3_Vaijnaanik_tatva_vikasit_hoNyaahcee_kriyaa.jpgविज्ञानाच्या मर्यादा
निकालांची पडताळणी करता येणे हे विज्ञानात बंधनकारक आहे . पडताळणी, फेरतपासणी करता येत नसेल तर संशोधनाला मान्यताच मिळत नाही. माझ्या मनाला गुलाबाचे टवटवीत फुल बघितल्यावर किंव काही छंद जोपासल्यावर आनंद मिळतो, हा आनंद का होतो? (तो सर्वांना सारखांच होईल असे नाही, आणि मोजताही येत नाही - हा भाग वेगळा). मनुष्याच्या शरिरांत आत्मा आहे का? असेल तर त्याचे स्वरुप, आकार काय आहे ? मनुष्याच्या मृत्युनंतर आत्मा (असलाच तर!) कुठे जातो? पुनर्जन्म, मागचा किंवा पुढचा जन्म अशा प्रश्नांची उत्तरे विज्ञानाला देता येत नाही. हे प्रश्न चुकीचे आहेत असे नाही पण पडताळणी, फेरतपासणी करता येत नाही म्हणुन विज्ञानाच्या माध्यमाने अशा प्रश्नांची उत्तरे शोधता येत नाहीत.

सुलभतेने उपलब्द असणारे संदर्भः

१ Introduction to Chemical Principles/ H Stephen Stoker – 10th edition, Pearson Prentice Hall, New Jersey, 2011, Chapter 1
२. http://www.aps.org/policy/statements/99_6.cfm
३. http://en.wikipedia.org/wiki/Americium
४. http://www.epa.gov/radiation/sources/smoke_ion.html
५. http://www.cancer.gov/drugdictionary?cdrid=709242
६. http://en.wikipedia.org/wiki/Satraplatin
७. http://www.aps.org/publications/apsnews/200803/physicshistory.cfm
८. http://www.bbc.co.uk/history/historic_figures/fleming_alexander.shtml
९. http://www.nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/1901/rontgen-bi...
१०. http://science.discovery.com/brink/top-ten/accidental-inventions/inventi...
११. http://www.pasteurbrewing.com/
१२. इंग्रजी - मराठी भाषांतरा साठी http://www.khandbahale.com/englishmarathi.php

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदय, इतक्या त्रोटकपणे मांडायचा विषय नाहि हा.

आम्हाला ( कॉमर्सवाले असूनही ) सायन्स, सायंटीफिक मेथड अँड टेक्नॉलॉजी असा एक विषय अभ्यासाला होता. त्यात बर्‍यापैकी या बाबतची चर्चा होती. पुढे आयूष्यात त्याचा फायदा झाला, एवढे नक्की.

उदय, खरंच खुप मेहनत घेतली आहे, लेखात.
विज्ञानाच्या बाबतीत स्वा. सावरकरांनी जितक्या तळमळीने लिहिले, ती तळमळ पुढे राहिली नाही.
नारळीकर वगैरेंनी विज्ञानकथा लिहिल्या पण त्यांचा वाचक मर्यादीत राहिला. डॉ कमला सोहोनी यांनी जाहीर खंत व्यक्त केली होती, कि त्यांचे संशोधन सामान्य वाचकापर्यंत पोहोचले नाही.

तर माझा मुद्दा असा आहे, सामान्य माणूसच काय, माझ्यासारखा एखादा वेगळ्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेला
माणूसही, विज्ञानातील घडामोडींपासून अनभिज्ञ राहतो, कारण त्याला समजेल असा भाषेत, या संकल्पना
मांडल्या जात नाहीत. उत्तम शास्त्रज्ञ आणि उत्तम लेखक हा संयोग फारच क्वचित वेळा होताना दिसतो.
आपण एखाद्या क्षेत्रातील संकल्पना समजून घेण्यासाठी भरपूर वाचन केलेले असते आणि अर्थातच आपल्याला मार्गदर्शनही लाभलेले असते, पण परत ही पुटं बाजूला सारुन, अगदी सामान्य माणसाच्या पातळीवर जाउन, या संकल्पना समजावून देण्यात, संशोधक आणि शास्त्रज्ञ रस दाखवत नाहीत. कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा.

मी कालच एक बीबीसीचा माहितीपट पाहिला. अणूगर्भातील एका कणाच्या संशोधनाची कथा होती ती.
या क्षेत्रात गणिती पद्धतीने मांडलेला निष्कर्श आणि प्रत्यक्ष प्रयोग यात बरीच तफावत होती. यामागचे कारण
कळत नव्हते. तरीही याबाबतचे संशोधन थांबले नाही. तब्बल ४० वर्षांनी, अथक प्रयत्नानंतर सत्य समोर आले.
या संकल्पना समजण्यास कठीण होत्या ( उदा. वस्तुमान नसलेली वस्तू जर प्रकाशाच्या वेगाने जात असेल, तर ती बदलू शकत नाही, कारण या स्थितीत बदलासाठी लागणारा कालावधीच, त्या वस्तूला उपलब्ध नसतो.)

आता हे विधान, सामान्य माणसाला सहज समजेल का ? पण बीबीसीने हा माहितीपट काढताना, इतकी मेहनत घेतली आहे, इतकी उदाहरणे दाखवली आहेत, कि हे तत्व कळायला अजिबात त्रास होत नाही.
या उदाहरणात नृत्य, खाद्यपदार्थ, जगलर्स, अ‍ॅनिमेशन... सर्व वापरले आहे.

पण असे प्रयत्न आपल्याकडे होत नाहीत. चमत्कारांना जितकी प्रसिद्धी मिळते ( साहित्य, प्रचार पत्रके, खास दूरचित्रवाणी कार्यक्रम ) तितकी, विज्ञानाला मिळत नाही. खास मार्केटींग आहे हे. आजही तूला एखाद्या बाबाचे फोटो असलेले कॅलेण्डर, डायरी अनेक घरात दिसेल, पण त्याच बाबाच्या चमत्कारामागची चलाखी उघड करणारा माणूस मात्र, अप्रसिद्धच राहतो.

आणखी एक सुन्न करणारा अनुभव म्हणजे, विज्ञानातील सर्वमान्य सोध, हे कुणालाही पडताळून बघता येतात, अनुभवता येतात. त्याला खास साधना लागत नाही.

मला स्वतःला अनुभव नसला तरी, अधात्म असा उच्च कोटीचा अनुभव देऊ शकते, हे मला मान्य आहे आणि त्याला महत्वाचे कारण आहे, ते ज्ञानेश्वरांचे लेखन. त्यांचे आध्यात्मिक अनुभव सच्चे आहेत, याबाबत मला
अजिबात शंका नाही, पण तसा अनुभव प्रत्येक सामान्य माणसाला येऊ शकेल का,याबाबर्त मात्र शंका आहे.
पण नवलाची गोष्ट म्हणजे, तो आला, असा दावा करणारी माणसे अनेक दिसतात.

या पातळीवर मात्र वाद घालण्यात आपण ( मी तरी ) नेहमीच अयशस्वी ठरतो. तूला अनुभव येत नाही, कारण तूझा विश्वास नाही, मनात भाव नाही, भक्ती नाही वगैरे वगैरे..

वैज्ञानिक पद्धती हा शोध लावण्याचा, नवे ज्ञान संपादण्याचा केवळ एक प्रकार आहे आणि तो ही संपूर्णपणे त्रुटीविरहीत नाही.
विज्ञानाच्या मर्यादा म्हणून जी उदाहरणे दिली आहेत ती मला मान्य नाहीत. त्यातील काहींची उत्तरे शास्त्राने अजून दिलेली नाहीत, काहिंची शास्त्राने दिलेली उत्तरे सर्वसामान्य जनता स्वीकारीत नाही त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देता न येणे ही शास्त्राची मर्यादा नाही.

कॉमर्सवाले असूनही
कॉमर्स हेहि एक विज्ञानच आहे, कारण विज्ञानाचे सगळे नियम तिथेहि लागू पडतात.
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असा अर्थ घेतला तर क्रिकेटचे ज्ञान, राजकारणाचे ज्ञान यालाहि विज्ञान म्हणता येईल.
सगळेच नियम तिथे इतक्या शास्त्रशुद्ध रीतीने तयार केले तर त्याचा जास्त उपयोग होईल, त्यात प्रगति होईल. " जाउ दे, मला राजकारणातले काही कळत नाही, क्रिकेटमधले काही कळत नाही, अमुक समजत नाही, " वगैरे म्हणून अभ्यास केल्या जात नाही, म्हणून ते लक्षात येत नाही.

शेवटचा परिच्छेद मलाही पटला नाही, पण बाकी लेख चांगला वाटला. काही मूलभुत संज्ञांची उत्तम तोंडओळख करून दिली गेली आहे. (इकडे अनेकांना याची गरज आहे.)

उदय, त्रोटक पण चांगली ओळख आहे. (दुसरे चित्र मला दिसत नाही - कृपया तपासुन बघणे)

शेवटचा मुद्दा (विज्ञानाच्या मर्यादा) या प्रकारे मांडलेला खटकला. First principles ना जाऊन देता येऊ शकतात त्या प्रश्नांची उत्तरं.

सुरेख लेख.
शेवटच्या परिच्छेदाबद्दल अनेकाना सहमती.
उदा. हल्ली पेट स्कॅन स्पेक्ट स्कॅन इ सारखे अनेक डिवाईसेस वापरुन खरोखर आनंद होतोय का? होत असल्यास मेंदूचा नेमका कुठला भाग उद्दिपीत होतोय हे पाहता येते.
हळुहळु बाकीचे अज्ञात उलगडेही होतील.
विज्ञानापासून भावनांना श्रद्धांना वेगळे ठेवावे हेच उत्तम.

झक्की, अकाऊंटन्सी ची व्याख्या करताना, इट इज अ‍ॅन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डींग बिझिनेस ट्रान्झॅक्श्नस... अशी सुरवात केली होती खरी. तसे अर्थाशास्त्रालाही, शास्त्रच म्हणतात, पण त्यातले नियम, प्रत्यक्षात सिद्ध होताना दिसत नाहीत ना ! म्हणून !

साती,

जास्तीत जास्त फॅट असलेले दूध पिऊन, मेंदूचा नेमका कुठला भाग उद्दीपीत होतोय, ते हल्लीच ( डीड कूकिंग मेक अस ह्यूमन ?) या माहितीपटात बघितले. तशा प्रकारच्या माहितीपटात, ते लोक, आपली गृहितके कशी पडताळून बघतात, हे पाहणे खुप रंजक असते. तिथे तर्कशास्त्राचा छान उपयोग करतात. आम्हालाही तर्कशास्त्राचे
प्राथमिक शिक्षण दिले गेले होते. त्यावेळी ते अनावश्यक वाटले पण पुढे मात्र त्या नियमांचा छान उपयोग झाला.

मी वर ज्या विषयाचा उल्लेख केला होता, त्यात ही निष्कर्शापर्यंत येण्याची प्रक्रिया छान समजावली होती. प्रा, रामजोशी यांनी त्या विषयाचा आग्रह धरला होता. आमच्या कॉलेजमधे तो विषय शिकवू शकतील असे प्राध्यापकच नव्हते, त्यामूळे खास रुईयामधून प्राध्यापकांना आमंत्रित केले होते.

उदय उत्तम तोंडओळख पण विस्तॄत वाचायला आवडेल. विज्ञानाच्या व्याख्येत होणारे बदल का व कसे झाले माहितीचे आकलन, लॉजिक मानवाच्या आकलन पद्धती मुळे येणारी बंधने ह्यासारख्या विषयातील नव्या शोधाने ह्या व्याख्यांवरचे परिणाम, वैगेरेचा उहापोह व्हायला हवा असे वाटले.

लॉजिक, हे खुपदा आपल्या जीवनाचा भाग झालेले असते पण आपल्याला ते जाणवत नाही.
अनेकदा विनोदाचा पाया हा लॉजिक ( म्हणजे त्याचे नसणे ) हाच असतो.

त्या विषयातले एक सुंदर तत्व मला अजूनही आठवतेय. क्रिया आणि प्रतिक्रिया, यांच्या मधे अजिबात अवधी नसतो असे आमच्या प्राध्यापकांनी सांगितले त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी शंका विचारली कि प्रत्यक्षात असा अवधी दिसतो... त्यावर प्राध्यापकांचे उत्तर फार सुंदर होते.. ते म्हणाले हा अवधी देखील क्रियेचा किंवा प्रतिक्रियेचा भाग असतो.... अगदी सोपे तत्व, पण असे समजावल्याशिवाय समजत नाही.

क्रिया आणि प्रतिक्रिया या वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. भौतिकशास्त्रात त्यांच्यात वेळ असण्याचा प्रश्नच नसतो कारण त्या 'फिल्ड'शी संबधीत असतात उदा. पृथ्वीचा चंद्रावरील फोर्स आणि चंद्राचा पृथ्वीवरील. केमीकल रिअ‍ॅक्शन्स वेगळ्या प्रकारात मोडतात - त्यात काहीतरी 'पचवले' जाऊन काहीतरी होत असते (औषधांची रिअ‍ॅक्शन पण याच प्रकारात मोडावी).

अस्चिगजी, एक निरिक्षण -
औषधांची 'रिअ‍ॅक्शन' हा शब्द आपण बहुधा त्या औषधामुळे उत्पन्न झालेली नकोशी/अनपेक्षित अ‍ॅक्शन या अर्थाने वापरतो. फार्म्याकॉलॉजीमधे याला 'अनटोवर्ड अ‍ॅक्शन'च म्हणतात.
केमिकल रिअ‍ॅक्शन मधील तोच शब्द वेगळ्या अर्थाने, -'इन्टरअ‍ॅक्शन' अशा अर्थाने- वापरला जातो. यात रिअ‍ॅक्शनचे फलित हवे तेच असते.

उत्तम शास्त्रज्ञ आणि उत्तम लेखक हा संयोग फारच क्वचित वेळा होताना दिसतो.>>>> अगदी अगदी... आणि म्हणुनच विज्ञानाचे पुस्तकं आणि शिक्षक निरुस्साही वाटतात. १२ वीला तर सरळ University Physics, किंवा fundamentals of physics -Resnick, Halliday वापरावे म्हणतो मी. ही मंडळी कशी काय या विषयाला रंगतदार बनवतात ?ते आपल्याला का जमु नये?

आज हा लेख पाहिला तेव्हाच डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचं सावट मनावर आहे हा एक विचित्र योगायोग.

विज्ञान काय आहे याबद्दल छान विवेचन केलं आहे. लिंक्स आता पाहिल्या नाहीत. माझ्यासारख्यांना सहज समजावं यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोणाबद्दल थोडंसं विवेचन हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संस्थळावर काही उत्तम लेख आहेत.

बीबीसीचे माहितीपट खरंच फार छान असतात. आपल्या इथल्या एखाद्या चॅनेलने जशाच्या तशा दाखवल्या तरी बरंच कल्याण होईल.

अतिशय सुंदर आणि उपयुक्त लेख! बर्‍याच वेळा 'स्युडो सायन्स' हे सायंटिफिक म्हणून लोक उल्लेख करतात. तांबे पॉझिटिव्ह आयन्सचे असल्यामुळे त्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते वगैरे महान शोध ऐकायला मिळतात. बरं एवढ्यावर हे थांबत नाहीत, तर त्यात 'आयन्स, एनर्जी, लहरी, फ्रिक्वेन्सी' वगैरे शब्द आले की ते सायंटिफिक एक्स्प्लेनेशन आहे अशी त्यांची आणि अनेक सामान्य वाचकांची समजूत असते. ह्यात पूर्ण दोष त्या लोकांचा नाही, पण वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय हे न शिकवणार्‍या आपल्या शिक्षण पद्धतीचाहि असावा.
अश्या वेळी आपल्याला सायन्स म्हणजे काय, वैज्ञानिक पद्धती काय असतात - वगैरे गोष्टी मुळापासून कळणे महत्त्वाचे आहे. हा लेख सोप्या शब्दात ती गरज पूर्ण करू शकेल. शिवाय इथल्या अनेक वैज्ञानिक/अवैज्ञानिक/अतिवैज्ञानिक चर्चांमध्ये महत्त्वाचा दुवा ठरू शकेल.