कुळीथ पिठाची गट्टे की सब्जी..

Submitted by सुलेखा on 12 September, 2012 - 03:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुळीथ पिठाचे पिठले आपण नेहमीच करतो. काही हिंदी भाषी मंडळींकरता काहीतरी वेगळे करायचे म्हणुन हा प्रयोग केला आणि तो सर्वाना आवडला .त्यांना कुळीथ हा प्रकार अजिबात माहीत नव्हता .
कुळीथ गट्टे बनविण्यासाठी--
१ वाटी कुळीथ पिठ.
अर्धी वाटी बेसन. [यापेक्षा कमी घेतले तरी चालेल.]
तिखट-मीठ-ओवा १ टी स्पुन.
हळद अर्धा टी स्पुन.
तेल २ टी स्पुन मोहनासाठी.
कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली ..[साधारण १ टेबलस्पुन].
भिजवुन गोळा बनविण्यासाठी पाणी लागेल तसे .
रश्शासाठी-
१ मध्यम आकाराचा उकडलेल्या /मावेत भाजलेल्या बटाट्याचा लगदा.
१ मध्यम कांदा बारीक चिरलेला.
१ टेबलस्पुन किसलेले सुके खोबरे.
२ मोठे टोमॅटो बारीक चिरलेले.
१टी स्पुन किसलेले आले.
२/३ लसुण पाकळ्या बारीक चिरलेल्या.
हिरवी मिरची बारीक चिरलेली..
हिंग व हळदपाव टी स्पुन.
पंचफोडण १ चमचा किंवा २ टी स्पुन
कढीपत्ता पाने ४-५
धने-जिरे पुड १ टी स्पुन.
गरम मसाला १ टी स्पुन .
काश्मिरी लाल तिखट १ टी स्पुन.
रसासाठी पाणी अंदाजे ३ वाट्या.
वरुन घालायला कोथिंबीर.
फोडणीसाठी तेल १ टेबलस्पुन.

क्रमवार पाककृती: 

गट्टे --
कुळीथ पिठ्,बेसन्,तिखट,मीठ,ओवा, मोहनाचे तेल ,कोथिंबीर लागेल तसे पाणी घालुन गोळा करुन घ्या.वरुन तेलाचा हात फिरवा.
या गोळ्याचे ४ भाग करा.प्रत्येक लहान भागाचा गोल गोळा करुन त्याचे लांबट रोल तयार करा.हे रोल १० मिनिटे वाफवुन घ्या.
थंड झाल्यावर त्याचे अर्धा ईंचाचे काप करा्. हे गट्टे तयार झाले.
kuleeth 1111.JPG
मी हे गट्टे हळदीच्या पानांवर ठेवुन वाफवले आहेत्.त्याचीही चव छान आली .
रस्सा--
पाव वाटी पाणी घेवुन त्यात काश्मिरी ति़खट्-धनेजिरेपुड्-गरम मसाला कालवुन ठेवा.
कढईत फोडणीसाठी तेल गरम करा.त्यात पंचफोडण ,हिग ,हळद ,कढीपत्ता घाला.
आता त्यात बटाट्याचा लगदा,कांदा,लसुण,खोबरे छान परतुन त्यात टोमॅटो च्या फोडी ,आले,हि.मिरची ,त्यानंतर पाण्यात कालवलेली पेस्ट घालुन मिश्रण एकजीव होईपर्यन्त परता.
रश्शासाठी पाणी घाला.चवीसाठी मीठ घाला व एक उकळी आली कि त्यात तयार केलेले गट्टे सोडुन मध्यम आचेवर पुन्हा एकदा उकळवा.
वरुन कोथिंबीर पेरा.
kuleeth22222.JPG
मका,ज्वारीची भाकरी किंवा लहान लहान तवारोटी बरोबर लिंबु ,कांदा-टोमॅटो च्या फोडींवर चाट मसाला घालुन आस्वाद घ्या.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे.
अधिक टिपा: 

गट्ट्याचा गोळा एका तेल लावलेल्या ताटलीत थापुन वाफवले व त्याचे सुरीने लहान लहान तुकडे केले तरी चालेल..
पाण्यात कालवलेल्या मसाल्याची वेगळी चव येते.
बटाटा घातल्याने रस्सा दाट होतो.
पंचफोडण व कढीपत्ता भाजीची चव वाढवतात.
अजुन एक सर्वाना आवडलेला प्रकार-
एक वाटी कुळीथ पिठ ,अर्धी वाटी मका पिठ[ज्वार/बेसन, चालेल] व अर्धी वाटी जाड रवा.]
आले-लसुण्-मिरची-लसुण,कोथिंबीर पेस्ट २ टेबलस्पुन.
२ टेबलस्पुन मोहनाचे तेल.
पानकोबी,गाजर,कांदा,पालक/मेथी यांची मिक्सरमधे वाटुन केलेली पेस्ट.
हळद,हिंग,ओवा,जिरे,मीठ.लिंबुरस/आमचुर चवीप्रमाणे .
हे सगळे एकत्र करुन गोळा तयार करावा.लागले तर च अगदी थोडेसेच पाणी वापरावे.त्याच हा जाड रोल तयार करुन तो वाफवुन घ्यावा . थंड झाला कि त्याचे जाड्सर [अर्धा इंच्]काप करुन ते तव्यावर तेल सोडुन खरपुस भाजावेत किंवा तेलात तळावे.टोमॅटो सॉस वा पुदिना-आमचुर-कच्चा कांदा-कोथिंबीर-हि .मिरची -जिरे एकत्र वाटुन केलेल्या चटणी बरोबर खावेत.

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सुलेखा ताई, मस्त रेसीपी.. आईनी चांगल दोन अडिच किलो पीठ दिलय कुळिथाच. उद्याच करुन बघते. कारण नुसत पिठल खाऊन कंटाळा येतो.

वा सुलेखा, मस्त फ्यूजन. असा प्रकार आपल्याकडे शेंगोळे म्हणून करतात.

पण माळव्यात नाहीच का वापरत कुळीथ ?

दिनेशदा,
कुळीथ मिळतच नाही किंवा उगवत नाही त्यामुळे माहीत नाही.
अजुन एक असाच नवा शोधलेला न सर्वांना आवडलेला चटकमटक प्रकार याच पाक्रु.मधे अधिक टिपा मधे लिहीत आहे.

सुलेखातै, पीठ संपवायच कसे हा विचार करत होते, आता वाटतय, आईला सांगुन परत मागवायला लागेल. मका नाहिये पण ज्वारी, बाजरी मिळेल इथे. दोन्ही प्रकार सोप्पे आहेत.

दिनेशदा, ज्वारी आणि बाजरी चे गुणधर्म काय आहेत? म्हण्जे नक्कि आठवत नाहि एक थंड आहे, एक गरम आहे.

ज्वारी थंड व बाजरी गरम. म्हणजे साधारण उन्हाळ्यात ज्वारी खातात तर थंडीत बाजरी... पण मला हे वर्गीकरण लागू होत नाही.

मस्त!!

हं.......छानच!
आमच्या कोकणात कुळथाचं फक्त पिठलं होतं आणि मला वाटतं कुळिथांना मोड आणून उसळही असावी. पण कोकणात कधी उसळ खाल्याचं आठवत नाही. पण इथे नगरात दिनेशदांनी वर म्हटल्याप्रमाणे शेंगोळ्या होतात. तूप घालून गरमगरम ओरपणे.