उत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी

Submitted by नरेंद्र गोळे on 6 September, 2012 - 10:47

राजकीय अवस्था

९ नोव्हेंबर २००० रोजी, भारतीय प्रजासत्ताकाचे २७ वे राज्य म्हणून उत्तरांचलाचा जन्म झाला. तात्पुरते दिलेले उत्तरांचल हे नाव जानेवारी २००७ मध्ये बदलवण्यात आले आणि मग आजचे उत्तराखंड हे राज्य निर्माण झाले. ते दोन भागांत वसलेले आहे. वायव्येला गढवाल आणि आग्नेयेला कुमाऊँ. गढवालमध्ये हरिद्वार, डेहराडून, उत्तरकाशी, चामौली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि पौडी हे सात जिल्हे आहेत. तर कुमाऊँमध्ये उधमसिंगनगर, नैनिताल, अलमोडा, बागेश्वर, पिथौरागड आणि चंपावत असे सहा जिल्हे आहेत. डेहराडून हे राजधानीचे शहर आहे [१].

या राज्याच्या उत्तरेस नेपाळ आणि चीन हे देश आहेत तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. एकूण ५३,४८४ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळापैकी ३४,४३४ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ वनविभाग असलेले हे नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असे राज्य आहे. सुमारे ९३% भाग डोंगराळ आहे तर केवळ सुमारे ७% भाग सपाटीवर वसलेला आहे.

नैसर्गिक अवस्था

भागिरथी (गंगा), अलकनंदा, मंदाकिनी, पिंढारी, तोन्स, यमुना, काली, न्यार, भिलंगन, शरयू आणि रामगंगा ह्या नद्या राज्यातून वाहतात. थोडक्यात काय, तर गंगा-यमुनेच्या खोर्‍यांचे डोगराळ भागातून मैदानी भागात अवतरण होते तेच हे विख्यात स्थान आहे. गहू, तांदूळ, बार्ली, मका, मंडुआ, हंगोरा इत्यादी पीके इथे घेतली जातात. सफरचंद, लिची, आलुबुखार, नास्पती इत्यादी फळेही इथे होत असतात. चुनखडी, मॅग्नेसाईट आणि जिप्सम ही खनिजे इथे प्राप्य आहेत.  इथे कुमाऊँनी, गढवाली आणि हिंदी ह्या भाषा बोलल्या जातात. ह्या राज्याच्या अधिकृत भाषा हिंदी आणि संस्कृत ह्या आहेत [२]. मार्च महिन्यापासून जूनच्या मध्यापर्यंत उन्हाळा असल्याने हाच काळ इथल्या पर्यटनास सोयीचा असतो.

नैनिताल, मसूरी, पौडी, अलमोडा, रानीखेत, किर्सू, चंपावत, दयरा, औली, खटलिंग, वेदिनी बुग्याल, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, लॅन्सडॉन, लखमंडल पाताळ-भुवनेश्वर, गंगोलीहाट, जोलजीवी, कतारमाल, कोसिनी, जागेश्वर, द्वारहाट, सोमेश्वर, बैजनाथ, पिंढारी हिमनद इत्यादी पर्यटन स्थळे येथे आहेत. शिवाय, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, पंचकेदार, पंचबद्री, पंचप्रयाग, हरिद्वार, हृषीकेश, हेमकुंडसाहिब, रेठ्ठासाहिब इत्यादी तीर्थक्षेत्रेही इथे भेटीस सिद्ध आहेत. इथे झुमालो, थड्या, चौन्फ्ला, रसौ, पंडवाना, तांडी, भादगीत, जागर, चांचरी, छोलिया इत्यादी लोकगीते वा लोकनृत्य लोकप्रिय आहेत.

पौराणिक संदर्भ

कुमारसंभवात महाकवी कालिदास म्हणतातः

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधीवगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

म्हणजे उत्तर दिशेला देवतांचा आत्माच असलेला हिमालय नावाचा पर्वत आहे. पृथ्वीचा जणू मानदंडच असलेला, पूर्वापार चालत आलेला हा जलनिधी आहे.

स्कन्द पुराणात हिमालयाचे पाच भौगोलिक भाग सांगितले आहेत.

खण्डाः पञ्च हिमालयस्य कथिताः नैपालकूमाँचलौ।
केदारोऽथ जालन्धरोऽथ रूचिर काश्मीर संज्ञोऽन्तिमः॥

अर्थात्‌ हिमालय क्षेत्रात नेपाळ कुर्मांचल (कुमाऊँ) केदारखण्ड (गढ़वाल) जालन्धर (हिमाचल प्रदेश) आणि सुरम्य कश्मीर असे पाच भाग आहेत [३]. पौराणिक ग्रंथांत कुर्मांचल क्षेत्रास मानसखण्ड या नावानेही पसिद्धी प्राप्त झालेली होती. त्यांत उत्तर हिमालयात सिद्ध, गन्धर्व, यक्ष, किन्नर, इत्यादी जातींची, सृष्टी असून तिथला राजा, कुबेर, असल्याचे सांगितले आहे. कुबेराची राजधानी अलकापुरी असल्याचे सांगितले आहे. शैक्षणिक वारसा पुराणांनुसार कुबेराच्या राज्यात, ऋषि-मुनि तप व साधना करत असत. म्हणून ह्या क्षेत्रास देव-भूमी किंवा तपोभूमी समजले जाते. उत्तराखंड ही वेद, शास्त्रे व महाभारत जिथे रचले गेले ती पुण्यभूमी आहे. सुदैवाने अर्वाचिन काळातही उत्तराखंड, तपःसाधनेची भूमी बनून राहिलेली आहे. हृषीकेशला आजमितीसही योगसाधनेकरताची जागतिक राजधानी मानले जाते. स्वामी रामदेव यांचे पतंजलि योगपीठ आणि दिव्ययोग मंदिरही उत्तराखंडातच हरिद्वार येथे आहे.

भारतीय प्रशासकीय-अधिकाऱ्यांकरिता लाल-बहादूर-शास्त्री नॅशनल-ऍकॅडमी-ऑफ-ऍडमिनिस्ट्रेशन, मसुरी ही संस्था १९५९ मध्ये प्रस्थापित करण्यात आली. भारतातील सर्वात जुनी (१८४७) अभियांत्रिकी संस्था उत्तराखंडातील रूरकीमध्ये आहे. डेहराडून येथे भारतीय लष्करी अकादमी आहे. तसेच भारतीय वनसंशोधन[४] संस्थाही डेहराडूनमध्ये प्रतिष्ठित आहे. ही संस्था मुळात (१८७८ मध्ये) ब्रिटिश इंपिरिअल फॉरेस्ट स्कूल म्हणून स्थापन झालेली विख्यात संस्था आहे. भारतीयांना ज्या शैक्षणिक संस्थांचा अभिमान वाटावा अशा ह्या अग्रगण्य संस्था हल्लीच्या उत्तराखंडातच स्थित आहेत.

वन-संशोधन-संस्था, डेहराडून

मे महिन्यातील उत्तराखंडातील सरासरी हवामान

वरील आलेखावरून, सर्वसामान्य मुंबईकरास, कमाल किमान-तापमान आणि किमान-पर्जन्य वृष्टीचा काळ सोयीचा असल्याचे दिसते. यास्तव मे महिन्याचा पूर्वार्धच ह्या सहलीकरता निवडला होता [६]. मुंबई नैनिताल हा एकूण सुमारे २०-२५ तासांचा एकतर्फी प्रवास करावा लागणार असल्याने निदान दोन दिवस तरी प्रवासातच खर्ची पडणार होते. त्यामुळे सहलीचा एकूण कालावधी त्याच्या किमान पाचपट असल्याखेरीज आर्थिकदृष्ट्या तो काटकसरीचा ठरला नसता. मात्र, साधारण दहा दिवसांनंतर सहल एकसुरी आणि क्वचित कंटाळवाणीही होऊ शकत असल्याने सहलीचा कालावधी अंदाजे दहा दिवसांचा ठरवला. जाता-येता दिल्लीवरूनच प्रवास करायचा असल्याने किमान एका वेळेस तरी अक्षरधाम बघण्याचे नक्की केले. मे महिना असल्याने, दिल्लीला इतर पर्यटन करण्याचा मोह टाळणेच श्रेयस्कर होते. कारण मे महिन्यात दिल्लीचे तापमान शिगेला पोहोचलेले असते. शिवाय या काळात दिल्लीला धुळीची वादळे आणि लू लागण्याची भीतीही असतेच. मग पाहण्याची स्थळे नक्की केली. नैनिताल आणि मसूरी आधीच पक्की होती. त्यात अभयारण्य असावे म्हणून कॉर्बेटचा समावेश केला. हरिद्वार आणि हृषीकेश ह्यांचीही त्यात भर पडली. घरचे आम्ही चौघेच जाणार. त्यामुळे समूहासोबत सहलीचा आनंद साजरा करणे शक्य व्हावे म्हणून, पर्यटक संस्थेसोबत जाण्याचा विचार आला. केसरी, सचिन इत्यादींचे सहल कार्यक्रम तपासून आमच्या अपेक्षा अधिकाधिक पूर्ण करेल आणि काटकसरीचाही ठरेल असा सचिनच्या नैनिताल सहलीचा कार्यक्रम नक्की केला. मात्र, त्याची नोंदणी लगेचच केली नाही. नोंदणी मिळण्याची खात्री केली. मुंबई-दिल्ली व दिल्ली-मुंबई ऑगस्ट क्रांती राजधानीने प्रवासाची तिकिटे आरक्षित केली आणि मगच सचिनकडे नोंदणी केली. आता आमचा कार्यक्रम निश्चित झालेला होता.

संदर्भः

१. http://www.gmvnl.com/newgmvn/facts/index.aspx गढवाल-विकास-निगम-लिमिटेडचे अधिकृत संकेतस्थळ
२. http://www.uttara.gov.in/ उत्तराखंड सरकारचे अधिकृत संकेतस्थळ
३. http://www.merapahadforum.com/religious-places-of-uttarakhand/mention-ab... मेरा पहाड डॉट कॉम हे संकेतस्थळ
४. जंगलची वाट, डॉ.आनंद मसलेकर, भारतीय वनसेवा, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, काँटिनेंटल प्रकाशन, प्रथमावृत्तीः २००४, किंमत रु.२००/- फक्त.
५. http://en.wikipedia.org/wiki/Uttarakhand उत्तराखंडावरचे विकिपेडियावरील इंग्रजी पान
६. http://www.mustseeindia.com/Rishikesh-weather सरासरी हवामान देणारे एक संकेतस्थळ

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती दिलीयेत काका

इथे कुमाऊँनी, गढवाली आणि हिंदी ह्या भाषा बोलल्या जातात. ह्या राज्याच्या अधिकृत भाषा हिंदी आणि संस्कृत ह्या आहेत [२]>> हे भारीच......

नरेंद्र, थँक्स ! अगदी योग्य वेळी हा धागा काढलात. खुप छान माहिती दिली आहेत.

मी १६ ते २६ नोवेंबर नवकुचियाताल - क्लब महिंद्राला जाते आहे. ( नैनिताल पासुन २३ किमि वर हा रिसॉर्ट आहे.) मला रिसॉर्टकडुन साइट सिइंगला नेतीलच, पण तुम्ही अजुनही काही छान जागा सुचवा ना.

मी १६ ते २६ नोवेंबर नवकुचियाताल - क्लब महिंद्राला जाते आहे. ( नैनिताल पासुन २३ किमि वर हा रिसॉर्ट आहे.) मला रिसॉर्टकडुन साइट सिइंगला नेतीलच, पण तुम्ही अजुनही काही छान जागा सुचवा ना.>> तेथुन जवळच मुक्तेश्वर आहे. ते पण छान आहे.

अतुल, जिप्सी & मंदार, थँक्स. चला यादीला सुरुवात झाली आहे.

मुक्तेश्वर, बिनसर आणि कौसानी. Happy सेनाने पण बिनसर सुचवलं आहे.

जिप्सी, कौसानी ते १९४२ लव स्टोरी मधलं का रे? Happy

२०१० च्या मे महिन्यात आम्ही पण नैनीताल कॉर्बेट ला जाउन आलो. ट्युलिप हॉलीडेज तर्फे. अप्रतिम ट्रीप.... खुप छान नियोजन आणि मस्त हॉटेल्स. परत नैनीताल ला नैनी लेक समोरच हॉटेल होतं. दिल्ली अक्षर धाम मधे प्रचंड गर्दी, उन, आणि लांबच लांब रांगा. खुप वैताग आला. नैनीताल ला ही माझी ३री खेप होती. लग्ना आधी २ वेळा जाउन आले होते.

नैनी लेक मधे मनसोक्त बोटींग केलं, खुप मोमोज खाल्ले, सायकल रिक्षा ने फिरलो. खरेदी केली, थंडी सडक वरुन पहाटे रपेट केली.... ५ दिवस मजेत गेले.

कॉर्बेट ला सुध्दा मजा आली.

ट्युलिप वाल्यांची व्यवस्था खुपच मस्त होती. जेवण तर फर्मास.....

सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

@ अतुलनीय
तसेच पंतनगर येथील आशिया खंडातली सर्वात मोठी अ‍ॅग्रीकल्चर युनिवर्सिटी पण छान आहे.>>>>
हे मला माहीतच नव्हते. धन्यवाद!

@ मोहन कि मीरा
नैनी लेक मधे मनसोक्त बोटींग केलं>>>> खरंच छान वाटते तिथे.
मला तर आमच्या सहलीतला तो फार आनंदाचा प्रसंग वाटला.

@ दिनेशदा
मी कधी बघणार हे सगळे >>>> काय सांगता? तुम्ही हे पाहिलेच नाही अजून. कमाल आहे.

मस्त Happy