मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना. . .

Submitted by जिप्सी on 5 September, 2012 - 23:09

प्रचि ०१

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."

वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.

लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...

हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....

गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....

किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...

हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?

गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....

गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?

धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?

झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?

कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

(फेसबुकहुन साभार)

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.

पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

=======================================================================
=======================================================================
मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
कुठे आहे कुठे तुझाच सोबती जुना, कळे गावातले विचार हे तुला पुन्हा
जुन्या वाटेवरी नवीन चालणे तुझे, फिरे गावातुनी जणु नवाच पाहुणा
जुने विसरायचे बरे नव्हे अरे मना, असे बदलायचे खरे नव्हे अरे मना
हसावे वाटते फिरून आजही तुला, कशी वळते नजर तुझी पहा पुन्हा पुन्हा

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
सहभोजन
प्रचि १०
वनभोजन
प्रचि ११
शाळेच्या स्नेहसंमेलनातलं कोळी नृत्य
प्रचि १२

प्रचि १३

=======================================================================
=======================================================================
एक होती चिऊ....एक होता काऊ
कावळ्याचे घर होते शेणाचे....चिमणीचे घर होते मेणाचे
एक दिवशी काय झाले...मोठ्ठा पाऊस आला आणि....

=======================================================================
=======================================================================
प्रचि १४

प्रचि १५

=======================================================================
=======================================================================
माझा खाऊ मला द्या
=======================================================================
=======================================================================
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

=======================================================================
=======================================================================
खेळ मांडियेला
=======================================================================
=======================================================================
आया रे खिलौनेवाला खेल खिलौने लेके आया रे...
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास
दिसता दिसता गडप झालास
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का...?

आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पटकन निघुन गेले नाही. अगदी चांदोबा मामाच्या या गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी.
पण.... मला पुन्हा ते दिवस जगायचे आहे. एक घास चिऊचा...एक घास काऊचा करत भरवलेला जेवणाचा घास आईच्या हातातुन खायचा आहे, मला पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या करायच्यात, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचाय, शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा आहे. पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची आहे. बायोस्कोपमधुन दिसणारी रंगबेरंगी दुनिया बघायचीय, चार आण्यात मिळणार्‍या लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाण्याची चिक्की, चन्यामन्या बोरं खायची आहे, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे आहेत, "घोटीव" पेपराच्या होड्या, विमाने बनवायची आहेत, तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा आहे, चंपक, ठकठक्, चांदोबा पुस्तकांचा एका दिवसात वाचुन फडशा पाडायचा आहे. कम्प्युटर से भी तेज दिमाग असणारा चाचा चौधरी, सोबत साबूला घेउन वाचायच आहे, मॅन्ड्रेक्सच्या हातातील अंगठीचा शिक्का उठवायचा आहे. फास्टर फेणे आणि चिंगीच्या साहसी करामती पुन्हा अनुभवायच्या आहेत. साबणाच्या पाण्याचे फुगे उडवायचे आहेत. वाळुत किल्ले बनवायचे आहेत. खुप काही करायचे आहे कारण...

उडणार्‍या त्या म्हातारीने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही त्या म्हातारीला नेता आल्या नाही.

=======================================================================
=======================================================================
तळटिपः
१. यातील काही काही फोटो टेक्निकली तितकेसे खास नसतील पण ह्या थीमसाठी मुद्दाम घेतले आहे. यातील २ प्रचि पूर्व प्रकाशित आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळा, गोष्टी, खाऊ आणि खेळ या चार संकल्पनेवर आधारीत आपलं हे बालपण.
हि थीमही तुम्हाला नक्कीच आवडेल. Happy

वा सुरेख.. मधलं वाचायचं राहिलं आहे.. फक्त प्रचि बघितलेत.. पेन्सिलचं प्रचि खासच. ५, १०, २० पैशे असलेलंपण सहीच.. सगळीच प्रचि सुरेख आहेत.. थीम आवडली Happy

हे किती किती छान्............सर्व या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या...... Happy
सोनेरी दिवस असतात ते आयुष्यातले........ Happy
जिप्सी ________/\________

थीम साठी सलाम. Happy
फोटोंमध्ये दिसणार्‍या गोष्टीसाठी (जी नाट्यमयता, कथा सांगण्यासाठी फोटो काढलाय ती गोष्ट ह्या अर्थी) सलाम Happy
फोटोंच्या क्वालिटीसाठी सलाम Happy

पर्फेक्ट..... Happy

फारच सुंदर Happy

नाव-गाव-फळ-फूल आणि जुनी नाणी पाहून तर मी पार हरवून आणि हरखून गेले.
जोकर गमची डबी पाहूनही असंच काहीसं वाटलं. तरी जोकर गम आमच्या हातात बराच उशीरा आला. शिवाय तो आईच्या ताब्यात असायचा. त्याचं रेशनिंग असायचं. Lol

माझी पहिली ते तिसरीची शाळा प्रचि १० (सहभोजन) मधे दाखवल्यासारखीच होती. (आणि माझे वर्गमित्र-मैत्रिणीही सगळे असेच होते Lol ) सहभोजन नसायचं, पण रोजच्या प्रार्थनेच्या वेळेस आम्ही त्या व्हरांड्यात ओळीने उभं रहायचो.
आमच्या शाळेत १ली ते ४थीसाठी एक एकशिक्षकी वर्गही होता. त्या वर्गाचं भारी अप्रूप आणि आकर्षण वाटायचं तेव्हा.

एकदम मस्त थीम. सकाळी सकाळी जुने दिवस पुन्हा अनुभवायला मिळाले - विशेषतः प्रचि ४-५, ६, १३, १५, २२-२३, २५, २६, २९. जोकर गम अनेक वर्षांनी पाहिला आणि ते सुटे पैसे तर एकदम सह्ही. किती मस्त मस्त कल्पना सुचतात तुला जिप्सी!!!

जिप्सी, यातल्या बर्‍याचशा गोष्टी तुला पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांबद्दल काळजी नसावी. Happy

प्रचि ३ मधल्या रिसायकलेबल मटेरियलने घरी एक मोठ्ठा डबा भरलाय. Happy

'द वन अँड ओनली' जिप्स्या !
तुझ्या या अफलातून थीम आणि प्रची साठी हॅटसॉफ आणि धन्यवाद !

खूप सुरेख.. मुलात मुल होता येतं पण आपल्यातलं मुलं मात्र आतचं रहातं.....

तो समुहनृत्यातला काळा टी शर्ट पाहून खूप आठवणी दाटून आल्या... मी पण असाच कितीही रिहसल झाल्या तरी इतरांहून वेगळं करणार म्हणजे करणार...खूप हसलो .. गहिवरलोही.... खूप जबराट थीम

ये पण कागदी विमाणं राहिलीच की रावं Happy

खूपच छान थीम व फोटोसुद्धा..... सकाळी सकाळी बालपणीच्या आठवणी, अजुन काय हवं दिवसाच्या सुंदर सुरवातीसाठी Happy

जिप्सी तु प्रचंड कल्पक आहेस.
आणि वाईट्ट आहेस, पुन्हा त्या दिवसात घेऊन जाऊन नॉस्टॅल्जिक केलस. Happy

जिप्सी, प्रचि तर सुंदर काढतोसच पण या थीम्स...... अप्रतिम ! प्रचंड कल्पक आहेस. तुफान आवडली सगळीच प्रचि. आता पर्यंतच्या सगळ्या थीम्समधली ही द बेस्ट ! आणि लिहितोस पण किती समर्पक आणि सुंदर !

वेडं झालं मन हे सगळं परत पाहताना.. सगळं अस्सच होतं... कसलं लिहिलं आहेस.. खरचं 'नादखुळा' म्हणतात तेच हे लिखाण अन प्रचि... सुरवातीची कविता.. अहा... Happy

जिप्स्या
कस्सलं लिहिलंस! आणि ती जुन्या पुस्तकांची पानं पाहून आणि मजकूर (खूपच गद्द्य शब्द आहे!!!!) वाचून आत काहीतरी हललं बघ!
पुस्तकं तर माझीच रे! चंपक, टकटक आणि फास्टर फेणे.............कुठे तरीच नेऊन सोडलंस बघ!
त्या गिरमिटाने.........(हो आम्ही शार्पनर म्हणत नसू.........हा शब्दही त्यावेळी माहिती नव्हता.)
टोक काढल्यावर जे निघायचे त्याचा उपयोग ग्रीटिंग कार्ड बनवताना बाहुली(ह्युमन फिगर)च्या फ्रॉकचा घेर म्हणून चिकटवून करत असू....किंवा मग फुलं म्हणून!
खूप काहीतरी मागे सोडल्याचं फीलिंग आलं बघ हे सगळं अनुभवताना!
धन्य आहेस!

कमाल आहे पण तुझी.. प्रत्येकाने आपले बालपण पाहिले प्रत्येक प्रचित... एकदम मस्त.. सकाळी सकाळी बालपणात नेलेस.. एखादा लघुपट पहावा तसेच वाटले. कविता, प्रचि, ललित.. सगळे खुप छान अ‍ॅरेंज केलेस.. ____/\____

३, ७ ,१५, १९, २९, ३४............ मस्तच.

जिप्सी फॅन क्लब काढावा म्हणतो आता.:)

जिप्सी सर्व फोटो खूपच छान आहेत. सगळ्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा दिलात.
बर्फाचा गोळा माझा अजूनही सुटला नाही, पण हल्ली रोजच्या सारखा खायला नाही मिळत. Sad
१ ली ते MBA रोज शाळा / कॉलेज सुटल्यावर बर्फाचा गोळा खाणे हे मस्ट होत. Happy

योगेश, नाव, गाव, फळ, फुल ----- चंपक, चांदोबा खरच आपण हे आता "मिस" करतोय.

एकदम मस्त.. सकाळी सकाळी बालपणात गेले. एखादा लघुपट पहावा तसेच वाटले. कविता, प्रचि, ललित.. सगळे खुप छान अ‍ॅरेंज केलेय.. अप्रतिम थीम, Happy

कस्ली भारी कल्पना आहे!! सगळं लहानपण डोळ्यांसमोर उभं राहिलं.... आणि परत एकदा ते सगळं सगळं अनुभवावं असं फार फार वाटलं... मस्तच!! Happy

जिप्स्या !!जिप्स्या!!!! ___/\___
कुठेच गेले नाही रे आपले बालपण... आठवणींच्या विहीरीत खोलवर तळाशी तसेच्यातसेच जपून ठेवलेय ना..
आज तू बाहेर ही काढलेस...सुप्पर्ब थीम...
नेम प्लेस अ‍ॅनिमल थिंग्स.. वॉव्...आणी ती मॅग्स्..टू नॉस्टेल्जिक

जीप्स्या आचाट, अफाट भयानक आहेस तू , Happy

मला माझ्या शाळेत नेऊन सोडलास, कोळी डांन्स मी केलेला खूप धमाल पहिल्याच रांगेत असल्याने माझ्यावरच सगळ्याची भिस्त त्यात मधेच लुंगी सुटली ऐका हाताने ती पकडून केलेला डान्स आठवला,

ठकठक, चंपक यांचा तो में महिन्यातला रतीब आठवला, क्लासला जाताना खालेले आवळे, चिंचा, चन्यामन्या बोरे, वा क्या बात है

किल्ला करणे, फार धमाल असायची:)

अजून सुद्धा माझ्याकडे मी साठवलेली नाणी, पोस्टल स्ट्म्प आहेत फक्त काडेपेट्याचे खोके गाय्प आहेत Happy

आता हे सगळे हरवलेले सगळे क्षण माझ्या मुलीबरोबर परत जगावेसे वाटतात Happy
Flower Lavendar Baket.gif

Pages