मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना. . .

Submitted by जिप्सी on 5 September, 2012 - 23:09

प्रचि ०१

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."

वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.

लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...

हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....

गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....

किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...

हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?

गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....

गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?

धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?

झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?

कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

(फेसबुकहुन साभार)

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.

पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

=======================================================================
=======================================================================
मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
कुठे आहे कुठे तुझाच सोबती जुना, कळे गावातले विचार हे तुला पुन्हा
जुन्या वाटेवरी नवीन चालणे तुझे, फिरे गावातुनी जणु नवाच पाहुणा
जुने विसरायचे बरे नव्हे अरे मना, असे बदलायचे खरे नव्हे अरे मना
हसावे वाटते फिरून आजही तुला, कशी वळते नजर तुझी पहा पुन्हा पुन्हा

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
सहभोजन
प्रचि १०
वनभोजन
प्रचि ११
शाळेच्या स्नेहसंमेलनातलं कोळी नृत्य
प्रचि १२

प्रचि १३

=======================================================================
=======================================================================
एक होती चिऊ....एक होता काऊ
कावळ्याचे घर होते शेणाचे....चिमणीचे घर होते मेणाचे
एक दिवशी काय झाले...मोठ्ठा पाऊस आला आणि....

=======================================================================
=======================================================================
प्रचि १४

प्रचि १५

=======================================================================
=======================================================================
माझा खाऊ मला द्या
=======================================================================
=======================================================================
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

=======================================================================
=======================================================================
खेळ मांडियेला
=======================================================================
=======================================================================
आया रे खिलौनेवाला खेल खिलौने लेके आया रे...
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास
दिसता दिसता गडप झालास
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का...?

आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पटकन निघुन गेले नाही. अगदी चांदोबा मामाच्या या गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी.
पण.... मला पुन्हा ते दिवस जगायचे आहे. एक घास चिऊचा...एक घास काऊचा करत भरवलेला जेवणाचा घास आईच्या हातातुन खायचा आहे, मला पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या करायच्यात, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचाय, शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा आहे. पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची आहे. बायोस्कोपमधुन दिसणारी रंगबेरंगी दुनिया बघायचीय, चार आण्यात मिळणार्‍या लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाण्याची चिक्की, चन्यामन्या बोरं खायची आहे, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे आहेत, "घोटीव" पेपराच्या होड्या, विमाने बनवायची आहेत, तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा आहे, चंपक, ठकठक्, चांदोबा पुस्तकांचा एका दिवसात वाचुन फडशा पाडायचा आहे. कम्प्युटर से भी तेज दिमाग असणारा चाचा चौधरी, सोबत साबूला घेउन वाचायच आहे, मॅन्ड्रेक्सच्या हातातील अंगठीचा शिक्का उठवायचा आहे. फास्टर फेणे आणि चिंगीच्या साहसी करामती पुन्हा अनुभवायच्या आहेत. साबणाच्या पाण्याचे फुगे उडवायचे आहेत. वाळुत किल्ले बनवायचे आहेत. खुप काही करायचे आहे कारण...

उडणार्‍या त्या म्हातारीने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही त्या म्हातारीला नेता आल्या नाही.

=======================================================================
=======================================================================
तळटिपः
१. यातील काही काही फोटो टेक्निकली तितकेसे खास नसतील पण ह्या थीमसाठी मुद्दाम घेतले आहे. यातील २ प्रचि पूर्व प्रकाशित आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लइ भारि ...................अगदि शालेत जाउन आल्यासारखे वातले..............धन्यवाद

वाचून आणि फोटो बघून डोळे कधी भरून आले कळलेच नाही............... मस्त प्रचि आणि थीम अप्रतिम!! यांपेक्षा दुसरे शब्द नाहीत माझ्याकडे..

जबरदस्त थीम. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी Happy भन्नाट फोटो आणि लिखाण. लगे रहो जिप्सीभाय.

थोडा हमारा, थोडा तुम्हारा
आयेगा फिरसे बचपन हमारा Happy Happy

जागू, वैभव, शांकली, रंगासेठ प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Happy

जिप्सी, काय प्रतिसाद द्यायचा रे.......! शब्दच सुचत नाहीत !! फोटो बघताना डोळ्यात कधी पाणी तरळून आलं कळलंच नाही ! सगळं बालपण समोर उभं केलेस, खरंच तू महान जादूगार आहेस !!!!!!!!!!!!!!!!!!!!

मफो, ________/\________ म हा न!!!!

अफलातुन थीम आणि तितकेच अफलातुन फोटो!!!

लिखाण पण किती सुंदर आणि तरलं!!!

लहानपणीच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या.... त्या गाभुळलेल्या चिंचा, चण्यामण्या बोरं, बर्फाचा गोळा, व्यापार, चंपक, सागरगोटे, भातुकली, सुट्टे पैसे..... कित्ती कित्ती आठवणी..... Happy

कसं रे सुचतं तुला हे ???

जिप्सी...

काय लिहू मित्रा ? मन तब्बल ५० वर्षे मागे धावत गेले तुझ्या प्रकाशचित्रांच्या समवेत अन् तसेच तुझ्या विलक्षण अशा शब्दांच्या मोरपिसार्‍यांसंगतीने.

निसर्गाचे अव्याहतपणे चालणारे चक्र म्हणजे माणसाच्या वयाची वाढ. जी अटळ असल्याने मानव प्राण्याने कितीही शोध लावले तर तो 'बॅक टु दोज गोल्डन डेज' सशरीर जाऊ शकत नाही, हे पक्के. तसे जरी असले तरी तुझ्यातील 'पोरगा' ज्यावेळी त्या दिवसांना असे सुंदर रूप देतो त्यावेळी भावते हे की अरेच्या काय गरज आहे आपण प्रत्यक्ष पुन्हा त्या दिवसाकडे जाण्याची ? इथे तर आहे ती सारी काजळमाया !

माझ्या 'त्या' दिवसात आमच्या वस्तीजवळून जाणारी 'झुकझुक गाडी' सातत्याने असायची....कुईsssssss कूकss अशी जादुभरी शीळ घालत, पांढर्‍या काळ्या धुराचे लोटच्या लोट सोडत जाणारी, हिरव्या पार्श्वभूमीवर चॉकोलेटी रंगाचे बारा डबे घेऊन कसल्याही घाईत नसणारी, तरीही चालत राहणारी आगगाडी आम्हा पोरांच्या आकर्षणाचा केन्द्रबिंदू होती. तिच्या येण्याजाण्यावर वस्तीतील सार्‍या घरांचे वेळापत्रक बेतलेले असायचे.

king-edward-steam-train-1.jpg

मस्त मस्त वाटले, आठवले सारे ते सोनेरी क्षण....तुमच्या या लेखामुळे.

अशोक पाटील

अप्रतिम....
लहान पणाची आठवण झाली खुप वाईट वाटत.....आपण मोठे का झालो...असा प्रश्न मनाला सतावत साहतो... असच आयुष्यात कधीतरी शाळा किंवा मुलं खेळताना दिसली कि त्या आठवणी ताज्या होतात....
मी अजून गावी गेलो कि माझ्या शाळेत एक तरी फेरी मारतोच........
मी -अमृता (पत्नी ) तासन-तास गप्पा मारतो त्या दिवसातल्या......
पुन्हा एकदा आठवणी ताज्या केल्या बद्दल खुप-खुप धन्यवाद...........

खूपच सुंदर प्रची आणि थीम...लेखन पण फार सुंदर केलेय जिप्सी...
पैसे, चंपक-चांदोबा, बोरं...मस्तच..
जिप्सी फॅन क्लबला १००% अनुमोदन..

मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना. . . >>

हेच तर माझे जीवन आहे, अरे हेच तर मी जगलोय ...
पुन्हा त्या दिवसात नेल्या बद्द्ल काय मी तुला देऊ
बोर, गुलाबी मऊशार कापुस ,लिंबाच्या गोळ्या चालतील का की कुरकुरीत नळ्या देऊ.
अरे पण हे सर्व मी आता खात नाही ईच्छा असुनही त्याच्या कडे पहात नाही,
मी आता मोठा झालोय, मनाने खोटा झालोय.
आता दुसर्‍याने वाजवलेल्या पत्र्याच्या शिट्टीचा आवाज मला आवडत नाही,
चन्यामन्या बोरांकडे मी ढुंकुनही पहात नाही.
धुरवाला दिसताच मी नाकाला रुमाल लावतो, गोळा ,चिक्की,लाडवापेक्षा बर्गर पिझ्झा मला भावतो.
कधी आवडत होत चंपक, टकटक फास्टर फेणे आणि पंचतंत्र,
मोबाईल ,टॅब आणि अॅंग्री बर्ड पुढे विसरलो पाढे, श्लोक आणि मंत्र.
बालमित्राला भेटण्याचा आनंद मी फेसबुकवर मिळवतोय, आई मी बरा आहे हे एस एम एस वर कळवतोय.
चिल्लरीची नाणी मागेच हरवलीत ,कमवतोय आता नोटा,जमवतोय का हिसाब बेगडी बघतोय नफा तोटा.
पण पुन्हा एक दिवस असच मला जगायचय, रंगीबेरंगी जग पुन्हा त्याच नजरेने बघायचय.

जिप्स्या अजुन काय लिहु ___/\___ Happy हि थीम आयुष्याच्या निवडक दहात.

अप्रतिम अप्रतिम अप्रतिम....... निवडलेली थीम, त्यासाठी अत्यंत काळजीपुर्वक काढलेल्या देखण्या प्रचि, त्यावर तुम्ही केलेले सुंदर भाष्य..... अहाहा.... जणु पंचपंक्वान्नाचे ताट जेउन तृप्त झाल्यासारखे वाटत आहे..... really hats off to you Happy

अ‍ॅडमिन प्रतिसादाला सुप्परलाईकचे बटण असु द्या. Happy

प्रज्ञा, लाजो, अशोकमामा, मनोज, मानस, खारूताई आणि वर्षा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

धन्स अशोकमामा,

नितिन _____/\_____ Happy सुरेख प्रतिसाद रे. Happy

जिप्सि,
नि:शब्द केलस रे तू खरच!
वाचता वाचता डोळ्यांना धारा कधी लागल्या ते कळलच नाही बघ.
इतक सुंदर वाचायला का बर ऊशीर झाला माझ्याकडून अशी बोच सलत राहणार बघ आता मनाला बरेच दिवस.
नितीन, सुंदर प्रतिसाद.

<<<शाळा, गोष्टी, खाऊ आणि खेळ या चार संकल्पनेवर आधारीत आपलं हे बालपण. >>> अप्रतिम..
आठवणी ताज्या केल्या बद्दल खुप-खुप धन्यवाद !!!

मस्तच.. तुफान...अफाट थीम आहे ही :).. प्रचि ७ मस्त्च
माझ्या भाची बरोबर नाव गाव फळ फुल खेळत होते...ती हरल्यावर म्ह्णे...असला कसला खेळ हा... Sad ???
मनापासुन ___/\___ Happy

जिप्सी, तुझी ही थीम इतकी लोकप्रिय झालिये की सगळ्या जगभरच्या मराठी मंडळीत फिरतीये बहुतेक.... नुकतीच उसगावच्या एका मित्राने मला ती पाठवलीये - काय अभिमान वाटला म्हणून सांगू त्यावेळेस की- अरे हा जो थीम बनवणारा जिप्सी आहे ना तो माझा दोस्त आहे .....

लेख मस्तच आहे. त्यातील काही ओळी मला जास्तच पट्ल्या.

" सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही "
याची प्रचिती मला परवा माझ्या पुतण्याबरोबर सर्कस पहायला गेल्यावर आली. खरेच माझा पुतण्या इतका हसत होता पण मला काहीच वाटत नव्ह्ते त्या विदुषकाचे.

"जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते."
आपण लहान असताना सर्वजण म्हणायचे की तु अजुन लहान आहेस. त्यावेळी वाटायचे आपण लवकर मोठे व्हावे.

"आपलं मनही किती विचित्र असतं ना."
जी गोष्ट आपल्याकडे नसते तोवर आपल्याला त्याचे फार कौतुक असते व जी गोष्ट आपल्याकडे असते त्याची किंमत आपल्याला ती गोष्ट आपल्यापासुन दुर गेल्यावर कळते.

"उडणार्‍या त्या म्हातारीने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही त्या म्हातारीला नेता आल्या नाही."
लेखकाने जगण्याची आशा जिवंत ठेवली आहे जाता जाता.....

मस्तच रे...

१६ फोटो पाहताच लाळ सुटली तोंडात... आणि एक काटा... ती गाबूळलेली चिंच पाहून...

मिळतच नाही अशे कुठे.

जिप्सी आपला हा लेख मेल्स मधुन आपल्या प्रचिंसकट फिरतो आहे. तेही आपल्या नावाचा कुठेही उल्लेख न करता. मी आपल्याला व्यक्तीशः ओळखत नाही. परंतु आपल्या प्रचिंची फॅन आहे. मेल मध्ये फिरणार्‍या प्रचिंवर आपले नाव असल्याने आपला लेख मी ओळखला. आपल्याला मेलची प्रत हवी असल्यास मला संपर्क करू शकता.

सुंदर ! अ प्र ति म !! खुप कल्पक !!!
जुने दिवस पुन्हा अनुभवायला मिळाले.. डोळ्यात नकळत पाणी दाटल Happy
धन्यवाद !!!

Pages