विषय क्रमांक १ - 'मै अपनी फेवरिट हूँ' अर्थात 'गीत'!

Submitted by आनंदयात्री on 31 August, 2012 - 10:42

आयुष्य नामक प्रवासाला निघालेल्या प्रत्येक मुसाफिराची कहाणी वेगळी! आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांतून प्रवास करत करत शेवटी एका शाश्वत मुक्कामाला पोचण्याची औपचारिकता! पण तो मुक्काम अटळ आहे, म्हणून प्रवास करायचं थोडीच टाळावं?

गीत - एक अतिशयच बिनधास्त तरीही भाबडी 'भटिंडा की सिखणी'! आयुष्य जगण्याच्या कल्पना अगदीच मोकळ्या-ढाकळ्या! तरीही खानदानी परंपरा, संस्कार, कुटुंब यांना मानणारी! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर मनापासून प्रेम करणारी!

ट्रेनच्या प्रवासात तिला आयुष्याकडून फसवणूक झाल्यामुळे आयुष्यालाच कंटाळलेला 'आदि' भेटतो. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर अनेक चढ-उतारांमधून पडद्यावर अपेक्षित शेवटाकडे पोचतो, पण मनात ठसा उमटवून जाते ते 'गीत'ची व्यक्तिरेखा!

'गीत'मध्ये मला सर्वाधिक भावला, तो प्रामाणिकपणा आणि कुठलाही अभिनिवेश नसणारा खुला स्वभाव! हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला होता, तेव्हा खरं सांगायचं तर मला 'अशी मुलगी प्रत्यक्षात असू शकते' यावर विश्वासच बसला नव्हता. पण 'हा एक चित्रपट आहे' अशी समजूत करून घेणंही मला तेव्हा पटलं होतं. नंतरच्या प्रत्येक पाहण्यात चित्रपटातील 'गीत' अधिकाधिक वास्तववादी वाटत गेली.

गीतचं आपल्यावर पहिलं इंप्रेशन पडलं ते एक अतिच बडबडी, जगाला सिक्रेट वाटाव्यात अशा गोष्टी अनोळख्याशीही शेअर करणारी - 'उथळ' म्हणून घ्यावं हिला अशी मुलगी! अगदी तिचं काहीही ऐकून न घेण्याच्या मनस्थितीत असलेल्या 'आदि'लाही आपण पळून जाणार आहोत, हे सांगणारी! अर्थात मुलींमध्ये एक उपजत शहाणपण असतेच. आदिचं तिकीट ती ट्रेनमध्येच काढून देते, टीसीला कन्विन्स करते, तो मध्येच ट्रेनमधून उतरून जातो तेव्हा त्याच्यामागे 'इन कपडोंमे, स्लीपर्स पहनके बादनगर नामके स्टेशनके प्लॅटफॉर्म' वर धावत जाते - त्याला सांगायला - की ट्रेन छूट रही है! तो रिस्पॉन्स देत नाही, आणि त्या गडबडीत तिचीही ट्रेन मिस होते. त्यावर ती सगळा राग त्याच्याचवर काढते आणि वर त्याला धमकीही देते की 'अब तुम मुझे भटिंडा छोडोगे - मेरे घर तक, और वो भी मेरे सामान के साथ!' गीत केवळ आदिवरच नाही, तर आपल्यावरसुद्धा अशी स्वतःला लादून घेते! या गीतला समजून घेतलं नाही तर 'कुणी सांगितलं होतं हिला या उठाठेवी करायला' हा प्रश्न चित्रपट संपल्यावरही आपली पाठ सोडत नाही. आणि गीत समजली, तर हा प्रश्नच उरत नाही!

पहिल्या भेटीत आदिला कितीही जवळ केल्यासारखं दाखवलं तरी, स्वत:च्या 'इज्जत' नावाच्या गोष्टीची तिला पुरेपूर जाणीव आहे. गीत स्वभावाने जितकी मोकळी आहे, तितकीच आत्मकेंद्रितही आहे! तिच्या प्रत्येक वागण्याला 'मै वही करती हूँ, जो मेरा दिल कहता है' चं समर्थन आहे. 'अकेली लडकी खुली हुई तिजोरीकी तरह होती है' म्हणणार्‍या स्टेशनमास्तरच्या वयाचा विचार न करता त्याला 'बुढ्ढे! तू अपना काम कर! बाकी मेरी प्रॉब्लेम है, मै संभाल लूंगी' असं तोडफोड उत्तर देण्याची हिम्मत तिच्या या मोकळेपणाने दिली आहे, आणि वेश्यांच्या रांगेतून सुटल्यावर आदिला भेटल्यावर पुन्हा त्याच्यावर स्वतःची जबाबदारी ढकलण्याची हिम्मत या आत्मकेंद्रितपणाने! 'तुम अपने कामसे काम नही रख सकती?' असा आदिने तिला विचारलेला प्रश्न आपल्याही ओठांवर येतो, आणि गीत तिच्या उपजत बिनधास्त उत्तराने तो मारून टाकते.

'डिसेंट' हॉटेलवाल्याच्या 'आपको रूम घंटोंके हिसाबसे लेंगे?' या प्रश्नाचा रोखच न कळलेली गीत 'हम रूम घंटों के हिसाबसे लेंगे' बोलून जाते, आणि आपण आदिच्या नशिबाला बोल लावतो. आणि या सर्वात कडी म्हणजे हीच गीत आदिला 'क्या खुसुरफुसुर कर रहे थे उसके साथ?' अशी हजेरी घेते आणि 'मै बस क्लीअर कर रही हूँ, तुम्हे कोई राँग सिग्नल न मिले' असं सुनावते. गीत इतकी प्रामाणिक आणि भाबडी आहे. जगाचे नियम, समज-गैरसमज यांची पर्वा न करता, स्वत:च्या विश्वात स्वतःच्याच समजुतींचे पंख लावून उडणारी!

तिच्या जगण्याच्या कल्पना जितक्या ओबडधोबड तितक्याच प्रभावीही आहेत. हॉटेल डीसेंट मध्ये आदिला ती "इस लडकीने तुम्हे डिच किया, जला दो इस फोटो को और हमेशा के लिये उसे अपनी जिंदगी से फ्लशआऊट कर दो" असा सोप्पा उपाय सुचवते! (आपलं भूतकाळात रमणारं मन 'ह्यॅ! याने काय होणार' असा बेकाम विचार करत राहतं!) एवढेच नव्हे, तर 'तुम्हे इससे अच्छी लडकी मिल जाएगी' असं दिलासाही देते! आदि आणि गीत यांचा तो सीन आत स्पर्शून जातो. उत्साहात सळसळणारी गीत आपल्यालाही आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देऊन जाते.

तळ्याच्या वर अर्धवट डोकावणार्‍या फळीवर बसून दोघे सफरचंद खात असतात, तो सीनही असाच! 'मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्यायला हवा' हे ती किती सहज सांगून टाकते, आणि 'अब पागलपन ट्राय करो' असं म्हणून आदिला त्या तळ्याच्या पाण्यात उडी घ्यायला लावते. कारण? - काहीच नाही! पागलपन!! जगाच्या लेखी अशी माणसं खरंच विचित्र असतात नाही का?

'अंशुमन' नावाच्या विश्वात ती लवकरच स्वतःला सामावून टाकणार आहे, हे ती आदिला सांगून टाकते. पण "बाऊजी मानेंगे नही, लडका सीख नही है" ही अडचण आहे. यावर उपायसुद्धा तिने शोधला आहे - पळून जाऊन लग्न करणे! तिची चुलतबहीण रूपसोबत त्याने पळून जाऊन लग्न करावं आणि "फिर चारो इकठ्टे रहेंगे - पहाडोंमे! बडा मजा आयेगा!" अशी तिची कल्पना (जगाच्या दृष्टीने बकवास) आहे! ती याबाबतीत इतकी क्लीअर आहे, की जेव्हा आदि तिला सोडायला भटिंडा जातो, तेव्हा ती आदिला माघारी जाऊ देत नाही - कारण त्याने रूपला भेटावं!

ती अंशुमनसाठी वेडी आहे. आदिला तिची काळजीही वाटतेय आणि थोडं प्रेमही! अंशुमनशी कुठलाही संपर्क झालेला नसताना ती कायमची त्याच्याकडे जायला निघते तेव्हा ती आणि आदिचा टेरेसवरचा सीन - असाच! स्पर्शून जाणारा! आदि 'तिचं काय होणार' व्यावहारिक विचाराने बैचेन आहे, आणि ती त्याला 'कंसोल' करते. ती खरंच वेडी आहे, भाबडी आहे! अतिशय सोप्या शब्दात ती स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडते. 'ये जो वक्त है ना, ये बहुत अच्छा टाईम है! देखो, आगे चलकर हम इसे याद करेंगे और हसेंगे!' - झालं! न सांगता घरातून पळून जाण्याची चूक करत असल्याची थोडीफार भावना आहे, पण त्यावर 'आके उनके पैरोंपे गिर जाऊंगी' असं म्हणत फॅमिलीकडे परत यायचा प्रामाणिकपणाही आहे.

आदि तिला मनालीला अंशुमनच्या घराजवळ सोडतो आणि अंशुमनला न पाहताही स्वतःवर काबू ठेवत परततो तो एक नवीन आदि बनून! गीत नावाच्या दैवी स्पर्शाने त्याच्या आत्महत्येकडे निघालेल्या आयुष्याला पुन्हा झेप घेण्याची उभारी दिली आहे. प्रत्येक गोष्ट करताना त्याला आता "गीत असती तर तिने काय निर्णय घेतला असता" असा प्रश्न पडतोय आणि तो तसाच डिसीजन घेऊन मोकळा होतोय. त्याची कंपनी, त्याचे छंद, या सगळ्यांमध्ये तो आता मनापासून सामील झालाय. ती, तिचे विचार, तिचं वागणं जणू त्याच्यासाठी आता एक प्रेरणा बनलंय! काही माणसं इतकी प्रभावशाली असतात खास!

तिच्या नशिबात मात्र नियतीने वेगळंच वाढून ठेवलंय. तिचं प्रेमही तिच्यासारखंच आहे - भाबडं, मोकळंढाकळं, स्वत:च्या विश्वात रममाण झालेलं आणि जगाच्या दृष्टीने अव्यवहारी! अंशुमनबद्दलच्या तिच्या भावनेला ती प्रेम म्हणतेय, त्याच्यासोबतच्या संसाराची स्वप्नं, पडदे, ती रंगवून तयार आहे. या जगात अतिप्रामाणिक असणं, अतिशय सरळमार्गी असणं हा गुन्हाच आहे. समोरच्यावर आश्वासून प्रेम करणं हाही गुन्हाच! समोरच्याला गृहीत धरून त्याच्यावर प्रेम करणं हा तर सगळ्यात मोठा गुन्हा! गीतने हे तीनही गुन्हे कायमच केलेत! अंशुमन समाजाच्या सो कॉल्ड दबावामुळे तिला नाकारतो आणि त्याच्यासाठी अख्खं घरदार सोडून आलेली गीत उघडी पडते. स्वप्नांच्या दुनियेतून फेकली गेलेली गीत व्यावहारिकतेच्या या पहिल्या चटक्यातून सावरू शकत नाही! ती शिमल्यामध्ये एकाकी जगणं पत्करते. 'आओगे जब तुम साजना' या गाण्यातली आर्तता शब्दश: थेट पोचते.

एकीकडे आदि त्याला भेटलेल्या गीतसारखं जगायला लागतोय आणि गीत अपरिहार्यपणे आणि असहायपणे त्याला भेटलेल्या आदिसारखं! ती आदिलाही बोलवत नाही, आणि घरच्यांनाही. 'ये मेरी जिंदगी है' चं भूत अजून मानगुटीवरून उतरलेलं नाहीये! 'अंशुमन स्वीकारेल' या एकमेव भाबडी आशेवर ती अजूनही जगतेय.

थोडंफार साहस गोळा करून अंशुमन परततो आणि स्वतः तिच्या घरी जाऊन मागणी घालण्याचं तिला वचन देतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा आदि दोघांना घेऊन शिमल्याहून घरी भटिंडाला जातो. घरी निघण्यापूर्वीचा त्या दोघांचा हॉटेलमधला सीन असाच! - स्पर्शून जाणारा! पहिल्यांदाच आदि भाव खाऊन जातो. 'शादी के बाद अपना पहला अफेअर तुम मेरे साथ कर लेना' हा त्याचा ड्वायलॉक काळजात अक्षरशः खोल जातो! पण 'तिला अंशुमनबद्दल अजूनही फीलींग आहेत' हे माहित असल्यामुळे स्वतःच्या भावना बोलून दाखवू शकत नाही. अखेर शेवटी गीत तिच्या जुन्या 'एक अजीबसा डर लग रहा था... कुछ गलत हो रहा है.. जैसे कोई ट्रेन छूट रही है' या स्वप्नातून बाहेर येते आणि 'सही ट्रेन 'पकडते'.

शेवटी चित्रपट म्हणजे दुसरं काय असतं? समाजमनाचं थोडं स्वप्नील, थोडं वास्तविक, थोडं भावुक, थोडं वेदनादायी असं प्रतिबिंबच ना? गीतच्या व्यक्तिरेखेला वास्तवाच्या धगीवरूनही चालायला लावून दिग्दर्शक इम्तियाज अलीने खूप छान बॅलन्स साधला आहे. 'जब वी मेट' या चित्रपटाने आणि त्यातल्या गीतने मला काय दिलं हे शब्दांत सांगताच येत नाही. काम करता करता कंप्युटरची विंडो मिनिमाईज करून 'जब वी मेट' केवळ 'ऐकणं' हाही आता सरावाचा भाग झालाय. अर्थात सकारात्मक दृष्टिकोन, आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा, खुलेपणा, प्रामाणिकपणा हे तिचे सगळे गुण आदिच्या असण्यामुळे निष्ठूर व्यावहारिक जगात सावरून घेतले जातील हेही खरेच! गीत पूर्ण चित्रपटभर व्यापून राहिली असली तरी वास्तविक आयुष्यातही गीतला समजून घेणारा आदि भेटायलाच हवा, अन्यथा गीतसारख्या मनस्वी, मूडी आणि फक्त स्वत:च्याच मनाचं ऐकणार्‍या मुलीच्या स्वप्नांची राख होणार हेही कटू सत्य आहे! कदाचित त्याचमुळे काही कहाण्या पडद्यावरच पहायला चांगल्या वाटतात. गीत प्रत्यक्षात भेटलीच तर तिला आदिच्या नजरेतूनच बघता यायला हवं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. अन्यथा गीत पडद्यावरच बरी!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/11/blog-post.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजब! Happy

छान लिहीलेस, नचिकेत, शुभेच्छा!

हा चित्रपट कितींदा पाहिला तरी मला 'आदि' आवडत जातो, गीत पेक्षा कैक पटीने जास्त!
गीत संपूर्ण चित्रपटभर रुंजी घालत असली तरी, आदिचं समंजस, शांत, प्रसंगी अ‍ॅग्रेसिव्ह कॅरेक्टर जास्त भावलं!

तिला सुखरुपपणे तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचवून स्वगृही परतलेला आदि "मै तेरा सरमाया हू" किती सहज म्हणून जातो, ते भावतं!

गीत सारख्या 'मनात आलं की मार उडी' सारख्या व्यक्तीमत्वाला आदिसारखंच गोंदण हवं, जो गीतचा 'जिवंतपणा' जपू शकला/तो, हे जाणून ह्या चित्रपटाच्या स्क्रीप्ट आणि दिग्दर्शनासाठी दाद निसटतेच!

कास्टींग अर्थातच सुंदर Happy

बागेश्री+१०००००

आदित्य ये इष्क हाये मघला वेगळा तर मौजा ही मौजा मधे वेगळा वाटतो, त्याने त्याच कॅरेक्टर रंगवत नेले आहे

लेख छान जमलाय.

मी उडत उडत बघितलाय हा, आता नीट बघायला पाहिजे.
दोघांचे कौतूक म्हणजे त्यांच्यात बेबनाव झाल्यावर त्यांनी हा चित्रपट केला, पण कुठे जाणवू दिले नाही.

दोघांचे कौतूक म्हणजे त्यांच्यात बेबनाव झाल्यावर त्यांनी हा चित्रपट केला, पण कुठे जाणवू दिले नाही.
>> बेबनाव झाल्यावरचे मुलगी अधिक मोकळी (सुटले एकदाची) आनि मुलगा बिचारा दिसू लागतात, ते आपोआपच साधले म्हणा मग Lol

चित्रपट विशेष आवडीचा, अनेक पारायणं केलेला, गीत-आदि ही कॅरॅक्टरं पुन्हा पुन्हा तपासावीत अशी. छान लिहिलं आहेस नचिकेत, गीत बद्दल Happy

आनंदयात्री... लेख फारच मस्तं झालाय...
एकदम मनापासुन लिहिला गेला आहे.. वाचकांपर्यंत थेट पोहोचणारा...

हा चित्रपट, चित्रपटातली गीत आणि चित्रपटातली गीतं.... सगळच आवडीचं असल्याने वाचायला छान वाटल..

शुभेच्छा

>>>>>> प जो + १

माझाही खूप आवडत्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा.
खूप छान लेख.

"समोर आलेल्या क्षणाला मागचा-पुढचा विचार न करता समरसून जगणं" इतका साधा-सोपा मूलमंत्र गीत जगते आणि त्यामुळेच विशेष भावते. गाणी खरंच एक से एक!

"ना है ये पाना...." क्लासच! अर्थासकट!

"आओगे जब तुम ओ साजना" हे गाणे बघताना माझ्या डोळ्यांत पाणी हमखास ठरलेले. दूर गेलेल्याला परत बोलावण्यामागची आर्तता भिडते अगदी!

<<<या जगात अतिप्रामाणिक असणं, अतिशय सरळमार्गी असणं हा गुन्हाच आहे. समोरच्यावर आश्वासून प्रेम करणं हाही गुन्हाच! समोरच्याला गृहीत धरून त्याच्यावर प्रेम करणं हा तर सगळ्यात मोठा गुन्हा!>>> अप्रतीम Happy सुंदर झालाय लेख. आवडला Happy

दिनेश दा..........जब वी मिट मधे नाही त्यांचे तुटले....बहुतेक.. "मिलेंगे मिलेंगे" या चित्रपट चालु असताना तुटले... तो अर्धवट राहीलेला चित्रपट नंतर पुर्ण केला त्यांनी.. फक्त हा चित्रपट उशीराने प्रदर्शित झाला...

उदयन., बरोबर.

माझा अत्यंत आवडता सीन म्हणजे हॉस्टेलवर एकटी राहणारी गीत आदि येतो तेव्हा त्याला म्हणते "तुम्हे क्या लगा अब तुम्हारा चान्स है?" कल्लास आहे तो अख्खा सीन. गीत आयुष्याशी हारूनसुद्धा, चुकीचा निर्णय घेऊनसुद्धा आधी जशी होती तशीच आहे..

या चित्रपटामधे करीना कपूर छान दिसली आहे. तिचा मेकप आणि ड्रेसेस कॅरेक्टरला सूट होतात.

मस्तच रे.. ह्रदयाच्या कुठल्यातरी कप्प्यात हा चित्रपट नि ती व्यक्तिरेखा घर करुन बसलिये.. छान लेख !

आता बघेन, तेव्हा तुमच्या नजरेनेच पाहिला जाईल.प्रभावी लेख.

होय,अशा मुली असतात..त्यांची ऊर्जा संसर्गजन्य असते..

शुभेच्छा.

धन्यवाद दोस्तहो! Happy

गीत आयुष्याशी हारूनसुद्धा, चुकीचा निर्णय घेऊनसुद्धा आधी जशी होती तशीच आहे..
+१

अजून एक आवडता सीन म्हणजे, ती त्याला म्हणते, "तुम तो बिलकुल मेरे जैसे हो गये हो".. मी त्या चित्रपटात इतका गुंतून जातो, की मला ती अगदी आदिला मिळालेली "best compliment" वाटते... Happy

फोनवरून शिव्या देण्याचा प्रसंग ट्रेलरमध्ये सतत बघून उथळ आणि लाऊड काहीतरी! असा विचार करून सतत हा सिनेमा बघण्याचं टाळलेलं. गाणी आवडत होती, पण गाण्यांसाठी अख्खा सिनेमा सहन करायचा....

मग एक दिवस बघायला इतर काहीच नसल्याने नाईलाज म्हणून बघितलेला हा सिनेमा चक्क आवडत गेला. गीत बघून 'कसं होणार या बयेचं!' असा विचार सतत मनात येऊनही ती आत कुठेतरी पटत गेली चक्क! आपल्यामधील 'दुनियाको गोली मारो' या हिशोबाने मनमौजी, मनस्वी, मूडी, 'करो दिलकी' चा नारा जपणार्‍या अतीस्वप्नील रोमँटीक गीतला मनाच्या कोपर्‍यात आपण कुठेतरी दडवून ठेवल्याचा चक्क भासबिस झाला... Happy

फसफसणारी शॅम्पेन आणि तरल वाईन यांचा संगम म्हणजे गीत आणि आदीची जोडी प्रचंड भावली. बागी आणि आनंदयात्री यांनी लिहील्याप्रमाणे गीतसारख्या मनस्वी मुलीला आदीसारख्या मॅच्युअर्ड समंजस मुलाचे कोंदण हवे.

ऐतराजमधील संयत भूमिकेनंतर करीनाची ही स्वप्नील, मनस्वी गीत प्रचंड आवडली. गाणी तर एकसो एक! आओगे जब तुम ऐकत तर खिडकीत बसून एकटीने कितीतरी वेळा रडलेय विनाकारणच!!!

आनंदयात्री तुमचा हा स्वप्नील तरल लेख आधी वाचला असता तर 'जब वी मेट' खूप आधीच बघितला असता. अप्रतिम उलगडलाय सिनेमा, गीत आणि आदी! शेवटचा पॅरा उच्च! शुभेच्छा!!

अवांतरः आनंदयात्री आणि नचिकेत दोन्ही अतिशय सुरेख नावे आहेत.

लेख आवडला. मला करीना आवडत नसल्याने हा चित्रपट पाहिला नव्हता. आता मात्र पहावासा वाटू लागलाय Happy

वाटत असचं जगणं हवयं...+१ १११

आदित्य आपल्याच आईला नाव ठेवत असताना ती मात्र त्याच्या न पाहिलेल्या आईची बाजू घेउन त्यालाच समजावते , ''क्योंकि वो प्यार में थी'' म्हणून...
प्रेमाचा खरा अर्थ समजल्या सारखी.......
( मनातल्या उद्रेकाला जागा करुन देण्यासाठी म्हणून आदि, अंशुमनला फोन लावतो आणि गीतच्या हातात देतो.तिला सांगतो, तुला येत असतील नसतील तेवढ्या सगळ्या शिव्या देवुन टाक. आधी थोडीशी बावरलेली गीत मग आत्मविश्वासाने अंशुमनला शिव्या देत जाते. करीनाच्या चेहर्‍यावरची ती स्थित्यंतरं फार मजेशीर आणि एक मस्त, सुखद अनुभव देणारी आहेत ))))+१०००००

पण "गीत पडद्यावरच बरी.....कारण प्रत्यक्ष आयुष्यात अस कोणी मुलगी वागायला गेली तरी तिला आदिच भेटेल कशावरून? कोणी तिचा गैरफायदा घेण्याची शक्यताच जास्त .....
( अन्यथा गीतसारख्या मनस्वी, मूडी आणि फक्त स्वत:च्याच मनाचं ऐकणार्‍या मुलीच्या स्वप्नांची राख होणार हेही कटू सत्य आहे!))+१

Mala hyatla to scene pan khup aavadla...jyat anushumanla shivya dilyanantar geet aani aditya ekmekanjaval yetat....geet bhanavar yeun mage hote....adi tila mhanto 'aisa hota hain'....kiti maturity aahe hya scene madhye....
Geet aaplya pratyekat kuthena kuthe dadleli aahe...pan aapan tila moklepanane vavru det nahi....satat kuthletari alikhit niyamanche oze ghuen te satat palat asto...tyachipan garaj aahe mhana...pan kadhitari asa vedyasarrkha vagla ki aayushyat majja tikun rahte....

Pages