विषय क्रमांक ३ - मराठी पाऊल पडते पुढे..!

Submitted by तुमचा अभिषेक on 30 August, 2012 - 12:25

वेळ - रात्रीचे दहा-साडेदहा
स्थळ - लाल मैदान - खचाखच भरलेले. (कारण मैदान असे नाव असले तरी दहा बाय बाराच्या चार खोल्या जोडल्या तर जेवढी जागा तयार होईल तेवढाच याचा आकार. लाल रंगाच्या गेरूने थापलेली जमीन म्हणून लाल मैदान.) मैदानभर अंथरवलेल्या सतरंज्या. त्यावर जो तो आपली आवडीची जागा बघून पसरलेला. मंडळाचे सेक्रेटरी आणि दोन-चार पदाधिकारी यांच्यासाठी तेवढ्या मांडलेल्या खुर्च्या. सारे जण एकेक करून रात्रीची जेवणे आटपतील तसे जमत होते.

निमित्त होते माझगावच्या प्रसिद्द मोदक चाळीतील गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्णमहोत्सवाचे. गणपती मंडळाचे सारे सभासद चुणचुणीत असले तरी मंडळ नेहमीसारखेच आर्थिक चणचणीत होते. तरी देखील यंदाचे ५० वे वर्ष जमेल त्या बजेट मध्ये जमेल तसे भव्यदिव्य करण्याचा सर्वांचा मानस होता. अर्थात हे भव्यदिव्य म्हणजे बावीस फूटी मुर्ती किंवा नाक्यापासून केलेली रोषणाई नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे चालू होते. सर्वात स्वस्तातला कार्यक्रम म्हणजे चाळीतीलच पोराटोरांना स्टेजवर काहीतरी कर म्हणून पुढे ढकलायचे, जे दरवर्षीच चालायचे, तेच यावर्षीही नको असा सूर सार्‍यांनी लावला होता. विभागातील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा परवडण्यासारखे नव्हते, जे परवडण्यासारखे होते त्यांची अ‍ॅडव्हान्स बूकींग करायला अजून पुरेशी वर्गणी जमली नव्हती. इतर पर्याय चाचपताना कोणीतरी काल पडद्यावर सिनेमा दाखवायची कल्पना मांडली आणि सर्वांनी ती उचलून धरली. तर आजची ही चाळीच्या मागच्या प्रवेशद्वाराजवळच्या लाल मैदानातील मीटींग त्याचसाठी भरली होती.

पुरेशी सभासदसंख्या आणि ती देखील महत्वाची माणसे जमलीत हे पाहून सेक्रेटरी महोदयांनी आतापर्यंत चालू असलेली इतर चर्चा थांबवून ज्या विषयासाठी आजची मीटींग होती त्यालाच हात घातला.

सेक्रेटरी तात्या : कोणता सिनेमा आणायचा बोला मग?

जोशी : तात्यानू, मी काय म्हणतो, सलमान खानचा नवा सिनेमा आलाय बघा.. "एक था टायगर.." तोच आणूया.. कसे, बच्चेमंडळी खूश होतील सारी..

सावंत (पुटपुटत) : जल्ला, जोशीवहिनींना आवडतो वाटते सलमान..

तात्या : नको रे बाबांनो तो सलमान.. असा उघडावाघडा काही प्रकार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरी नको..

कांबळे : तात्यानो मग अभिषेकला आणूया का.. हल्ली त्याच्या "बोलबच्चन"चे गाणे रोज आमचा बंड्या लाऊन बसलेला असतो.. शेवटी पोरांनाच काय आवडेल याचा विचार केला पाहिजे हो, आपले काय ठेवलेय आता..

तात्या : नको रे बाबा.. बोलबच्चन नको अन त्यातला बालबच्चनभी नको..

पाठीमागच्या कट्ट्यावर बसलेले एक आगाऊ कार्टे (बहुतेक परबांचा गण्या असावा) : तात्या "जिस्म" येऊ द्या.. नवीन हिरोईन आहे.. नव्या चेहर्‍यांना आपल्या मंडळाने संधी दिली पाहिजे.. प्रोग्राम फुल सुपरहिट.. लोक पडदा फाडून आत शिरतील..

पाच-दहा सेकंदाच्या अंतराने डावीकडच्या कोपर्‍यात खसखस पिकली.. याला जोडूनच कोणीतरी कॉमेंट पास केली असावी..

तात्या : नको नको.. हे आताचे हिंदी चित्रपट नकोच.. बजेटही नाही परवडणार आणि त्यात काय दमही नाही..

दळवी : हेच मी आता बोलणार होतो.. जुन्यामध्ये एखादा काकाचा चित्रपट येऊ द्या.. कटी पतंग नाहीतर आराधना.. तेवढीच त्याला श्रद्धांजली ही दिल्यासारखी होईल..

पाठीमागून पुन्हा एक फुसकुली : ए याला काकाकडे घेऊन जा रे, काकाचाच आवडतो याला..
(बिल्डींगबाहेरच्या पानवाल्याला काका बोलायचे, ज्यांना हे समजले तिथून पुन्हा खिदीखिदी आवाज आले.)

दळवी (चिडून) : कोण आहे रे तिथे, काय बोल्ला रे हा..

परबांचा गण्या (साळसूदपणाचा आव आणत) - मी काय म्हणतो दळवीकाका, काकांचा चित्रपट आणण्यापेक्षा आपण दादांचा आणूया ना.. दादा म्हणजे आपले दादा कोंडके हो.. हिंदी चित्रपट आणण्यापेक्षा मराठी आणूया ना..

तात्या (मिष्किलपणे) : दादांचे सिनेमे तुम्हा आजच्या पोरांना झेपतील का रे..?
आता दळवींनी दात काढायची हौस भागवून घेतली..

गण्या (आता पेटूनच उठला) : ओ तात्या, "क्या सूपरकूल है हम"चा जमाना आहे आमचा.. तुम्ही दादा कोंडकेंचे काय कौतुक सांगता.. (बंड्याकडे बघत) ए बंड्या, त्या दिवशी आपण तो पोस्टर पाहिला तो सिनेमा कोणचा रे?

बंड्या : कोणचा पोस्टर रे?

गण्या (डोळे मिचकवत) : आपल्या सईचा रे..

बंड्या (लक्षात येते तसे डोळे चमकवत) : आह.. तो काय.. नो एंट्री के बाद धोका की काय तरी नाव आहे त्याचे..

तात्या : का रे बाबानो, एवढे काय विशेष आहे त्या चित्रपटात जे मराठी चित्रपटाला तयार झालात..

गण्या : इशेष म्हणजे तसे काही नाही तात्यांनू.. बस पोस्टssर भारी दिसला..

तात्या : अरे वा, मराठी चित्रपटांना एवढे चांगले दिवस आले आहेत माहीत नव्हते. पोस्टर दाखवूनच चित्रपटाकडे प्रेक्षकांना आकर्षित करू लागले. तसे असेल तर आणूया की, इतरांचे काय म्हणने आहे?

बंड्या आणि बरोबरची पोरे एकसुरात : आम्हाला चालेल तात्या.

एवढा वेळ शांत असलेले जाधव काका आता हस्तक्षेप करत चर्चेत उतरतात.

जाधव काका : एक मिनिट थांबा तात्या, आधी तुम्हाला आजच्याच पेपरातील एक बातमी वाचून दाखवतो. याच चित्रपटा संबंधित आहे. मग तुम्हाला समजेल की ही पोरे एवढी उत्सुक का आहेत. त्यानंतर तुम्हीच काय ते ठरवा हा चित्रपट आणायचा की नाही?

जाधवकाका सवयीप्रमाणे काखोटीला मारलेला पेपर काढतात आणि मोठ्याने वाचायला घेतात,

"मराठीत बिकीनी... हो आता आपल्या मराठी चित्रपटातही बिकिनी दिसणार आहे.
मराठी अभिनेत्री सई आता आपल्याला बिकिनीत दिसणार आहे.
"नो एंट्री" या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचा मराठी रीमेक असलेल्या "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटात सईने बोल्ड अवतार धारण करत चक्क बिकिनी परीधान केली आहे."

जाधव काका : आता बोला तात्या? आणायचा का हा चित्रपट?

तात्या (पोरांकडे एक नजर फिरवत) : काय बोलू आता?

दळवी (पुढाकार घेत) : बोलायचे काय? प्रश्नच उद्भवत नाही असला काही चित्रपट आणायचा.. एकदा का या अश्या चित्रपटांना आपण डोक्यावर घेतले तर मराठीत देखील लाटच येईल बोल्ड चित्रपटांची.

जाधव काका : लाट येईल? ती यापूर्वीच यायला सुरुवात झाली आहे. आहात कुठे? थांबा पुढचे ही वाचून दाखवतो.

"तेजस देउस्कर दिग्दर्शित "प्रेमसूत्र".
हा सिनेमा तरुणाईच्या मानसिकतेभोवती फिरतो.
करीअर, सेक्स आणि मजा ही त्रिसुत्री घेऊन जगणार्‍या आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व हा सिनेमा करतोय.
संदीप सह या सिनेमात पल्लवी आणि श्रुती या दोन अभिनेत्री झळकणार आहेत.
त्यातली पल्लवी ही मॉड कॅथलिक मुलगी आहे. तर श्रुती श्रीमंत बापाची बिनधास्त मुलगी बनली आहे.
भुमिकांची गरज म्हणून दोघींनाही... पुरेसे... ‘एक्स्पोजर’... देण्यात... आले... आहे."

जाधव काका : आता हे "एक्स्पोजर" म्हणजे काय आणि केवढे हे चित्रपट आल्यावरच समजेल. तोपर्यंत तुम्ही पुढची बातमी ऐका. या "पुणे ५२" ची ही जोरदार चर्चा चालू आहे बरे का.. ऐका,

"गिरीश, सोनाली आणि सई या तिघांच्या मुख्य भुमिका असलेल्या "पुणे ५२" या सिनेमातही सईने अनेक बोल्ड दृश्य दिल्याची चर्चा आहे.
या सिनेमात असलेली एक्स्पोजरची गरज लक्षात घेऊन यापूर्वी इतर अनेक मराठी तारकांनी ही भुमिका नाकारली होती.
यातल्या गरम दृश्यांबद्दल बोलताना हा सिनेमा मराठीतील "जिस्म" असेल... असे... जाणकार... सांगतात."

दळवी : म्हणजे येत्या काळात येणार्‍या "अनसेन्सॉर्ड ट्रेंड" ची ही नांदीच म्हणायची.

तात्या : थोडक्यात काय, तर आता मराठी चित्रपटही घरच्यांबरोबर पाहायची सोय राहणार नाही.

दळवी (उपहासाने) : घरी नाही, पण निदान प्रेक्षक थिएटरकडे खेचले जातील असा काहीसा हेतू असावा बुवा.

जाधव : हे मात्र बाकी खरे आहे, तसेही मराठी माणूस मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवूनच आहे. निदान काहीतरी गर्दी होईल अश्याने.

तात्या : अरे पण मग थिएटरात काय वेगळे वेगळे जायचे का?

दळवी : हल्लीचे सिनेमे तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेऊनच बनवले जातात तात्या..

तात्या : तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवले ते दिसतेच आहे, पण तरुण पिढीला चुकीच्या मार्गाला लावणारेही हे असेच चित्रपट आहेत.

जाधव : तात्या तुम्ही म्हणता ते ठिक आहे, पण आताच्या सार्‍या हिंदी चित्रपटांमध्येही हेच चालते. तरुण पिढी असे ना तसे हे बघतेच. मग मराठी चित्रपटांनीच का संस्कृती रक्षणाचा ठेका घ्यावा?

तात्या : हिंदी सिनेमा बनवणार्‍यांना आपण रोखू शकत नाही पण आपल्या मराठी चित्रपटात तरी ही कीड नको. अरे आपल्याच मराठी मुली अश्या चित्रपटांत अंग उघडे टाकून फिरणार आणि आपण ते रोखायचे सोडून मिटक्या मारत बघणार हे कितपत योग्य आहे.

गण्या (चर्चा गंभीर होत चालली आहे हे बघून, न राहवून) : तात्या तुम्ही पण ना उगाच भावनिक होत आहात. अहो, आजकाल हे चालते सर्रास. जी मुलगी कमीत कमी कपडे घालेल ती मॉडर्न समजली जाते. मग हिरोईनला मॉडर्न न बनून कसे चालेल?

बंड्या : मी सुद्धा गण्याशी सहमत आहे. आपल्या मराठी पोरी हिंदीमध्ये जाऊन अंगप्रदर्शन करतात तेव्हा मात्र आपण ते चालवून घेतो पण तेच मराठी चित्रपटांमध्ये नको.. हा तर मराठी चित्रपटांवर सरळसरळ अन्याय झाला.. आणि मग वरतून मराठी चित्रपट चालत नाही असा आरडाओरडा आहेच.

गण्या : तेच म्हणतो मी... आणि तुम्ही एखाद्या बिकिनी दृश्याचे भांडवल करून घरच्यांबरोबर हा सिनेमा बघता येणार नाही असे कसे म्हणू शकता तात्या? घरी कौटुंबिक मालिका बघतानाही अश्या काही एकेक जाहिराती येतात की विचारू नका. जे ३ तासांच्या सिनेमात दाखवले जात नाही ते ३० सेकंदांच्या जाहीरातीत पुरेपूर दाखवतात. ईच्छा नसतानाही का होईना आपण ते बघतोच ना..

तरीही तुम्हाला मराठी मुलीने अशी भुमिका करणे नकोच असेल तर मराठी चित्रपटांचे बजेट वाढवा म्हणजे मराठी दिग्दर्शक देखील महेश भट प्रमाणे सनी लिऑन सारखे पॉर्नस्टार मराठीत घेऊन येतील जेणे करून मराठी मुलींना अंगप्रदर्शन करण्याची गरज भासणार नाही... (गण्याच्या या वाक्यावर पुन्हा एकदा खसखस पिकली.)

तात्या : झाले हसून... आता मला सांगा, मुळात बिकिनी परीधान करायची गरजच काय? जर तुम्ही बिकिनी मधील हिरोईन बघायला प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा करत असाल तर तसे खरेच होईल का? हिंदी चित्रपटांमध्ये यापेक्षा जास्त अंगप्रदर्शन केले जात असताना त्यासाठी म्हणून मराठी चित्रपट कोण आणि का बघायला येईल?

गण्या : का नाही जाणार? आमचेच उदाहरण घ्या ना. आमच्या मनात त्या एका पोस्टरने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली ना? नाहीतर तो मराठी चित्रपट आमच्यापर्यंत पोहोचलाही नसता.

जाधव : हे मात्र खरे आहे तात्या.. मराठी चित्रपट आजकाल कधी येतात कधी जातात हे समजतही नाही. अनुदान घेऊन कमीत कमी खर्चात सिनेमे बनवायचे म्हणून बनवले जातात पण ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी निर्मात्याचे काहीच प्रयत्न नसतात. मराठी सिनेमा जाहीरात करण्याबाबत खूप उदासीन असतात. कदाचित जाहीरातीचे असे त्यांचे बजेटही नसावे. मग असे एखादे गरम दृष्य घातले की त्याची चर्चा होऊन आपसूकच सिनेमाची जाहीरातही होते.

तात्या : तु्मचा मुद्दा पटण्यासारखा असला तरी जे चूक ते चूकच.. जाहीरात करण्यासाठी म्हणून असे करणेही चूकच. आज एवढ्या मराठी वाहिन्या झाल्या आहेत, लोक त्यांच्यावरील कार्यक्रम नियमित बघतातही. किमान तिथे तरी प्रत्येक मराठी चित्रपटाची जाहीरात झाली पाहिजे. मराठी वाहिन्यांनीनी जमल्यास अश्या जाहीरातींना विशेष सूट दिली पाहिजे. नवीन चित्रपटांची ओळख करून देणारे आणि जाहीरात करणारे कार्यक्रम बनवले गेले पाहिजे. कितीतरी रीअ‍ॅलिटी शो दाखवले जातात अश्यांमध्ये पाहुणे म्हणून नवीन झळकणार्‍या चित्रपटातील कलाकारांना बोलवायला हवे. इच्छा असेल तर मार्ग हे सापडतातच.

गण्या : ओ तात्या.., त्या मराठी वाहिन्यांवरचे अपवादात्मक कार्यक्रम सोडले तर ते बायकांकडूनच बघितले जातात. त्यावर चित्रपटांची जाहिरात करायची म्हणजे त्यांना भावतील असे "ताईच्या बांगड्या" आणि "वहिनीच्या पाटल्या" बनवायचे का... आजकाल ऑर्कुट-फेसबूक या सोशल साईट्स जाहिरात करायचे बेस्ट माध्यम आहे बघा.. आणि तिथे आम्हाला अभिमानाने "हा मराठी सिनेमा आहे, नक्की बघाच" असे आमच्या मित्रांना सांगता येईल असा चित्रपट आला तरच त्याची जाहिरात होईल.

जाधव : गण्या अगदीच काही चुकीचे बोलत नाहीये आणि वाहिन्यांवरील जाहीरातीबद्दल म्हणाल तर हे तसे थोड्याफार प्रमाणात चालतेच. पण याचेही पैसे मोजावे लागत असणारच. कसल्याही प्रकारची जाहीरात अगदी नि:शुल्क तर होत नाही ना..
वाहिन्या मराठी असल्या तरी एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाची धंद्यात मदत करतो अशी आपली परंपराही नाहीये तात्या..
(या वाक्यावर तात्या मनापासून मान डोलावतात.. काय कसे ठाऊक, मराठी माणसाला हे पटतेही बरे लगेच..)

तात्या (उसासा सोडल्यागत) : थोडक्यात हे एक दुष्टचक्र आहे तर.. म्हणजे तुम्ही कमी खर्चात सुमार दर्जाचे चित्रपट बनवणार, त्यांची पुरेशी जाहीरातही नाही करणार, परीणामी तुमचा चित्रपट पुरेसा नफा मिळवून देऊ शकणार नाही.. जर कमावणारच नाही तर पुढच्या चित्रपटात काय घालणार.. डोंबलं.. मग बनवा पुन्हा एक कमी खर्चातला सुमार दर्जाचा चित्रपट.

जाधव : अगदी बरोबर तात्या, आणि हेच दुष्टचक्र तोडायचा एक मार्ग, काळाची गरज म्हणून या अंगप्रदर्शनाकडे बघा.

दळवी (पुन्हा आवेषात येत) : काहीही काय जाधव, काळाची गरज म्हणायचे का आता याला... आणि दर्जाचे काय? बिकिनी घालून सिनेमांचा दर्जा वाढतो का?

जाधव : तसा तो न घातल्यानेही कुठे वाढतो..? मी अश्या दृष्यांचे समर्थन नाही करत पण त्यात फारसे गैर आहे असेही मला नाही वाटत. मुळात असा शॉट देणे हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी सोपे नसते. बिकिनी शोभायला शरीर व्यवस्थित आकारात हवे, देहबोली आणि हालचाली आश्वासक हव्यात, त्यातून भुमिकेलाही न्याय द्यायचा असतो. अख्ख्या शूटींग क्र्यू समोर असा एखादा शॉट देणे एखाद्या स्त्री कलाकाराला किती अवघड जात असेल याचाही विचार करा. खास करून आपल्या मराठमोळ्या वातावरणात आणि संस्कारात वाढलेल्या मुलींसाठी हे सारे तितकेसे सोपे नसते. तिची मानसिकता बदलून ती तयार होते याला फक्त पैसा हाच क्रायटेरीया लावला जावा का?

दळवी : मग आता यासाठी दाद द्यावी असे म्हणता का?

जाधव : काय हरकत आहे दाद दिल्यास.. जर तुम्ही यांस अश्लीलता म्हणून बघाल तर तुम्हाला हे पटणार नाही पण जर कला म्हणून बघितले तर दाद दिलीच पाहिजे. कला, सौंदर्य आणि सामाजिक नितीमुल्ये यांचा मेळ बहुतेक वेळी बसवावा लागतो. तो आपोआप नाही बसत. समाजशीलतेला आपण फार पूर्वीपासून महत्व देत आलो आहोत. म्हणून तर कामसुत्राला आपण ग्रंथ आणि वात्सायनाला महर्षी म्हणतो. जर आपण सार्‍यांना सरसकट एकच निकष लावत असाल तर कामसूत्र लिहिणार्‍या वात्सायनाला, मेघदूत लिहिणार्‍या कालिदासाला, जगातील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक राजा रविवर्मा याला त्याच्या न्यूड पेंटींग्जबद्दल अश्लीलतेच्या पारड्यातच टाकणार का? उद्या जर एखादा उत्सव किंवा कामसूत्र सारखा चित्रपट मराठीमध्ये काढायचे ठरवल्यास खरेच आपण त्यासाठी पात्र असू का?

दळवी : हे कलेच्या नावाने समर्थन झाले जाधव. माझ्यामते तरी या सीनला जोरदार विरोध झाला पाहिजे जेणेकरून पुन्हा असली दृश्ये मराठी सिनेमात तरी येणार नाहीत.

जाधव : पण जर सेन्सॉरने हा सीन मान्य केला तर विरोध करायचा प्रश्न येतोच कुठे? काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना, राजकीय पक्षांना यातून प्रसिद्धी मिळवायची असल्यास ते तेवढे फक्त आपली पोळी भाजून घेतील.

दळवी : सेन्सॉर काय मान्य करते आणि काय नाही हे सर्वश्रुतच आहे, त्यांच्यासमोर बिकिनी शूट कीस झाड कि पत्ती..

जाधव : मग आपण का अमान्य करत आहोत? आपण सेन्सॉरवर विश्वास ठेवायला हवा. आपल्या मराठी कलाकारांवर विश्वास ठेवायला हवा. आपण त्यांच्याकडून मराठी सिनेमा सातासमुद्रापार घेऊन जायच्या अपेक्षा करतो, आणि त्याच वेळी त्यांना संस्कार-संस्कृतीच्या बंधनात जखडतो हे चूक नाही का?

तात्या (मध्येच हस्तक्षेप करत) : अरे पण जाधव, सातासमुद्रापलीकडे जाणार्‍या आपल्या मराठी सिनेमाचे मराठीपणही जपायला नको का? अन्यथा मराठी संस्कृतीची चुकीची इमेज नाही का जगभरात पोहोचणार.

जाधव : तात्या, मराठी सिनेमा हा सध्यातरी फक्त मराठी भाषिकच बघतात. पण आपल्या बोलण्यातही तथ्य आहे. मर्यादा ही आपण राखलीच पाहिजे. पण त्याचवेळी मराठी माणसाची, मराठी सिनेमांची डाऊनमार्केट ही इमेजही पुसून काढायला हवी.

दळवी (थोडेसे मवाळ होत) : तुमचेही पटतेय जाधव, पण तरीही तुम्ही म्हणता तसे केवळ डाऊनमार्केट हा शिक्का पुसून काढायला बिकिनीचे समर्थन करणे म्हणजे...

जाधव : अहो दळवी तुम्ही तर असे बोलताय जसे ती पूर्ण चित्रपटभर बिकिनी घालून फिरणार आहे.. (आता मात्र सारेच हसायला लागतात.)

तात्या (मान डोलावत) : हे ही खरेच आहे, आपण मराठी माणसे हिंदी चित्रपटांमध्ये बिकिनी घातलेल्या नायिका बघतोच. तसेच आपल्या कित्येक मराठी मुलीही अशी दृष्ये हिंदी चित्रपटातून करतात त्यांनाही रोखत नाही. तर मग मराठी चित्रपटांमध्ये अशी दृष्ये आल्यास त्यात तितकेसे वावगे नसावे.

जाधव : एवढेच नाही तात्या, तर माधुरी सारख्या नट्या कधी मराठी चित्रपटांमध्ये काम करायला नाही आल्या म्हणून आपण गळा काढतो पण मला सांगा, तिने स्वताहून यावे असा मराठीचा दर्जा आपण राखला का? तिचे मानधन परवडते की नाही हा पुढचा प्रश्न झाला, पण तिच्या इमेजला साजेसा चित्रपट बनवायची ताकद आपल्यात खरेच होती का तेव्हा? एवढेच नाही, तर प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तिच्या उमेदीच्या काळात नायक म्हणून तिच्या समोर उभा करावा असा एखादा सशक्त उमेदवारही आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत शोधावा लागला असता. आणि अपवादाने सापडला असताच तर तो देखील हिंदी सिनेमांमध्ये बस्तान मांडून बसलेलाच दिसला असता.

गेल्या दोन दशकात काही सन्माननीय चित्रपटांचा अपवाद वगळता मराठी सिनेमासृष्टीने जराही प्रगती केली नाही. ना नवीन तंत्रज्ञान अंगिकारले ना बदलत्या काळानुसार पटकथेत नावीन्य आले. प्रगती न करणे ही देखील आजच्या जमान्यात एक प्रकारची अधोगतीच आहे. त्यामुळे ज्यांच्यात धमक होती त्यांनी संधी मिळताच हिंदी चित्रपटसृष्टीचा रस्ता धरला. आज हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माधुरी दिक्षित, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रेसारख्या नट्यांनीच नव्हे तर रीमा लागू सारख्या चरीत्र अभिनेत्रींनीही नाव कमावले. आपल्या मराठी कलाकारांपैकी तिथे नाना पाटेकर आहेत, मोहन जोशी आहेत.. विक्रम गोखले.. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, मिलिंद गुणाजी.. अजून आपला तो... अतुल कुलकर्णी.. संजय नार्वेकर, वंदना गुप्ते, पल्लवी जोशी, सोनाली कुलकर्णी.. नाही तात्या मला बोलू द्या.. आपले ते, दिलीप प्रभावळकर.. पद्मिनी कोल्हापुरे, सयाजी शिंदे, अशोक सराफ....... आठवायला गेल्यास बोटांवर मोजता येणार नाहीत इतकी नावे चटचट आठवतील.. आपल्या अमराठी मित्रांना एखाद्या हिंदी चित्रपटातील कलाकार मराठी आहे हे सांगताना अभिमान जाणवतो पण त्याचवेळी एवढ्या चांगल्या कलाकारांना न्याय मिळेल असे चित्रपट आपण मराठीत काढू शकलो नाही याचे शल्य ही बोचते. यातील बरेच जण असेही आहेत ज्यांना हिंदी चित्रपटांमध्ये अक्षरश: टुक्कार भुमिका करून समाधान मानावे लागले. तर याउलट सयाजी शिंदेसारखा एखादा दक्षिणेत गेला आणि तिथे शेकडोने सिनेमे करून तेथील सुपरस्टार बनला. आता याचा अभिमान बाळगायचा की आणखी काय हे समजत नाही. गरज आहे असे चित्रपट बनवायची की आजच्या घडीला हिंदीमध्ये काम करणार्‍या कलाकारांना मराठीची ओढ लागली पाहिजे आणि नवोदित कलाकारांनीही मराठी चित्रपटांकडे पहिला पर्याय म्हणून बघितले पाहिजे. जर आपण हे टॅलेंट पुरेपूर वापरू शकलो नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच.

आणखी किती दिवस आपण दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत गायकवाड हा मूळचा मराठी आहे अशी शेखी मिरवून स्वताचे समाधान करणार, किंवा दादासाहेब फाळक्यांचे नाव पुढे करणार..
नाही तात्या, मला मराठी चित्रपटसृष्टीची तुलना हिंदी किंवा दक्षिणेशी करायची नाही. जसा हिंदी सिनेमा देशभर नाही तर जगभर पोहोचतो तसा मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग नाही हे मला मान्य आहे. दक्षिणेकडे जसे स्वताच्या भाषेचा कट्टर अभिमान बाळगून हिंदीच्या आधी तिला स्थान दिले जाते तशी परीस्थिती आपल्याकडे नसल्याने आणि मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग मराठीच असल्याने व्यावसायिक यशाच्या बाबतीत त्यांच्याशी तुलना आणि स्पर्धा आपण नाही करू शकत हे देखील मला मान्य आहे. पण कलेचा दर्जा तर राखू शकतो. त्यासाठी खर्चिक तत्रंज्ञान वापरणे गरजेचे असतेच असे नाही. गरज असते ती कल्पकतेची, नावीन्याची कास धरायची आणि ती धमक आजच्या या पिढीत दिसतेय मला.. श्वास, नटरंग, वळू, देउळ, शाळा, डोंबिवली फास्ट आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या सारख्या पुरस्कार विजेत्या आणि पठडीबाहेरच्या दर्जेदार चित्रपटांची उदाहरणे हे सिद्ध करण्यास ही पुरेशी बोलकी आहेत.

.........पण केवळ राष्ट्रीय पुरस्कार मिळवने पुरेसे नाही आता गरज आहे ती व्यावसायिक यश मिळवायची. काही जण आधी व्यावसायिक यशाचा मार्ग चोखाळतात आणि तिथे एकदा पाय घट्ट रोवले की हळूहळू कल्पक प्रयोग करायला घेतात. आपण आपली कल्पकता सिद्ध केली आहे पण आता त्याचबरोबर पुरस्कार मिळवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सिनेमे न काढता प्रेक्षकांना थिएटरमध्ये कसे खेचता येईल हे बघायला हवे. त्या दृष्टीने प्रयोग करायला हवेत. सर्व प्रकारच्या चित्रपट रसिकांची गरज भागवण्यासाठी चित्रपटही तसेच वेगवेगळ्या पठडीतील हवेत. पण कधी विचार केला आहे की वर उल्लेखलेल्या चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक का नाही एखादा तद्दन व्यावसायिक सिनेमा काढायचे धाडस दाखवतात. कारण त्यांना बॉक्स ऑफिस यशाची खात्री नाही. जबाबदार आहोत आपण प्रेक्षक मायबाप जे हिंदीमधील तद्दन भंगार सिनेमे बघायला पहिल्या दिवसाचे तिकिट काढून जातो, पण तेच मराठी सिनेमा मात्र पुरस्कार विजेता झाला, चांगला आहे असे समजले की मग घरीच पाहू असा विचार करतो. त्यामुळे मराठीत व्यावसायिक सिनेमाची व्याख्या देखील अनुदान वसूल करण्यापुरते पाणचट विनोदाची बनवलेली मिसळ यापलीकडे जात नाही. जर हे दुष्टचक्र त्यात अडकलेल्या मराठी कलाकारांनी आतून भेदायला घेतले तर आपण ही ते आपल्या परीने बाहेरून भेदायचा प्रयत्न करायला हवा तरच यातून सुटकेचा सुवर्णमध्य साधला जाईल.

मला मराठी चित्रपटसृष्टीची इतरांशी तुलना नाही करायची. कारण आपली रेष मोठी करण्यासाठी दुसर्‍यांची छोटी दाखवणे मला पटत नाही. आपण आपली रेष कशी मोठी होईल हे बघितले पाहिजे. यासाठी आजची पिढी सक्षम आहे असे खरेच मला वाटते. त्यांना आज कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. खरे तर जी पिढी स्वता चाकोरीबाहेर जाऊन काही करू शकली नाही ती आताच्या पिढीला काय मार्गदर्शन करणार. गरज आहे ती त्यांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ द्यायची, आर्थिक पाठबळ नाही देऊ शकलो तरी त्यांच्या पाठीशी उभे राहायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या क्षेत्रात चालत असलेल्या राजकारणापासून दूर ठेवायची.

हे जे आता मी काही प्रवचन देतोय असे तुम्हाला वाटत असले तरी कुठेतरी तुमच्याही आत ही कळकळ लपली असेल. तरी सुद्धा आपण सारे मराठी चित्रपटांबाबत उदासीनता दाखवतो. मराठी चित्रपट आहेच डाऊनमार्केट, त्यांचा दर्जा कधीच नाही सुधारणार, ते कधीही हिंदी चित्रपटांशी स्पर्धा नाही करू शकणार, उगाच त्यांना अनुदान दिले जाते.. वगैरे वगैरे... ही जी काही विधाने आपल्याकडून येतात ती चित्रपटक्षेत्र हे किती महत्वाचे आहे हे न कळल्यामुळेच.. आज आपण हिंदी, ईंग्लिश तसेच इतरही प्रादेशिक चित्रपट बघतो. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, यश चोप्रा, श्रीदेवी, कमल हसन, नागार्जुन, टॉम क्रूझ, जेनिफर लोपेझ हे सारे परप्रांतिय किंवा परदेशी आपले आवडीचे कलाकार आपल्याला चित्रपटांच्या माध्यमातून नकळतपणे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. जे लोक कुठलीही पुस्तके, पेपर वाचत नाहीत त्यांनाही आज वॅलेंटाईन डे, करवा चौथ, मकई दी रोटी आणि सरसो दा साग, सलाम वालेकुम, शब्बाखैर हे सारे माहीत असते ते केवळ चित्रपटांमुळेच. संस्कृती, विचार आणि इतिहास पोहचवण्यासाठी चित्रपटाइतके महत्वाचे साधन किंवा हत्यार नाही. माझे स्वप्न, माझ्या आशा, माझ्या अपेक्षा बस एवढ्याच आहेत की मराठी चित्रपटांच्या माध्यमातून उद्या देशाच्या कानाकोपर्‍यात, जमल्यास जगभरात महाराष्ट्रीयन संस्कृती पोहोचावी. कांदे पिठले आणि बाजरीच्या भाकरीची चव दूरदूरवर रेंगाळावी, गुडीपाडवा आणि वटपौर्णिमा कसे साजरे होतात हे भारताच्या इशान्य कोपर्‍यात वसलेल्या गावीही एखाद्याला माहीत असावे, महाराष्ट्राच्या खेड्यातील चित्रण भारताच्या खेड्याखेड्यात जावे, शिवाजी महाराज आणि त्यांचा शिलेदार बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास सार्‍या जगाला समजावा जेणेकरून त्यांचे नाव घेताच कोणाचेही हात जोडले जावेत आणि मान आदराने झुकावी.. आणि तेव्हाच खरे मराठी पाऊल पडले पुढे असे अभिमानाने म्हणता येईल..!!

गण्या : टाळ्या...

आणि दुसर्‍याच क्षणी खरेच टाळ्यांचा कडकडाट झाला...

"मराठी पाऊल पडते पुढे" च्या गजरातच सभेचा समारोप झाला...

---------------------------------------------------------------------------------

मोदक चाळीच्या गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सईचा "नो एंट्री पुढे धोका आहे" आणायचे नक्की केलेय.
चाळीतील मराठी चित्रपटरसिकांनी उचललेले पहिले पाऊल पाहता लवकरच हाऊसफुल्ल्ल बोर्ड लागण्याची शक्यता आहे.
तेव्हा आणखी वाट बघू नका... आपापली सीट आताच बूक करा.. अ‍ॅडव्हान्स बूकींगला सुरुवात झाली आहे..!

.
.

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चित्रपटांचा फार मोठा परीक्षक नाही किंवा प्रामाणिकपणे सांगायचे तर मराठी चित्रपटांचा फार मोठा फॉलोअर नाहिये..
पण एक मराठी माणूस आणि चित्रपटप्रेमी म्हणून कळकळ आहेच.
त्यामुळे या विषयावर मला लिहायचे होतेच.

जमेल तसे जमेल तेवढे लिहिलेय,
नुसते माझेच मत नाही तर माझे चार मित्र मराठी चित्रपटाबद्दल काय विचार करतात हे जाणून घेऊन,
माझ्या बालबुद्धीला झेपेल तसे लिहिलेय.
माझ्यासाठी हा विषय तसा कठीणच होता,
म्हणून
सांभाळून घ्या..:)

अभिषेक, पूर्ण वाचले. अतिशयच सुंदर पद्धत आहे मुद्दे सांगण्याची, काल्पनिक पात्रांच्या संवादांमधून! (मला खरंच असे वाटत होते की कोणीतरी असे कथानक स्वरुपातूनही लिहावे, फक्त लेख असे न लिहिता).

आर्टिकल आवडले. सर्व मुद्दे जवळपास पटले. सर्वात म्हणजे माधुरीसाठी आपल्याकडे कथानक असते का हे फार्फार आवडले.

अभिनंदन व शुभेच्छा Happy

-'बेफिकीर'!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बेफीजी,
हे असे संवादातून लिहिण्याचा माझ्यासाठी ही पहिलाच प्रयत्न.

खरे तर मी आपल्या लेखाच्या प्रतिक्षेत होतो.
स्पर्धेसाठी म्हणून नाही लिहिले तरी विषय क्रमांक २ किंवा ३ वर आपण काहीतरी लिहायला हवे होते,
असो, आता शेवटच्या दिवशी काही आपण वाचकांना एखादा सुखद धक्का द्याल असे वाटत नाही.. Sad

अवांतर - माधुरीचा मुद्दा मी तिच्यावरून वाद झाला की न चुकता मांडतोच.. Happy

छान लिहिलय अभिषेक , मुळात त्या मागची कळकळ आवडली .
पण लोच्या बेसिक मध्ये आहे , बॉडीगार्ड आणी दबंग (यांची कथा (?) लिहणे अशक्य आहे ) सारखे अचाट सिनेमे मन लावून First Day First Show पाहणारे आपलेच लोक देऊळ ची स्टोरी कशी २ ओळींचीच आहे हे घरात केबल वर पाहताना बोलतच राहतील तोवर अवघडच आहे रे !

अभिषेक खुप छान लिहिलयसं.
दोन्ही बाजुंचे मुद्दे पटण्यायोग्य. माधुरी सबंधित उल्लेख आवडला. +१
पण....... नो एंट्री - मराठीचं ट्रेलर बघुन - सई ला बिकीनीत बघुन मी पण थबकलेच होते काही क्षण.

शुभेच्छा.

आता शेवटच्या दिवशी काही आपण वाचकांना एखादा सुखद धक्का द्याल असे वाटत नाही..>>>>>>>>>>>> का रे? मला तर अजुनही असंच वाटतय.

छान! नवीन मुद्दा आणि नव्या पध्दतीचं सादरीकरण. मुद्दा मांडणं फार फार महत्वाचं आहे. तो बरोबर -चूक- ही चर्चा यथावकाश होईलच. काळाच्या पुढे बघून मांडलेले ज्यांचे मुद्दे आणि दृष्टीकोन काही काळाने बरोबर ठरतात त्यांच्याकडे आपोआप वैचारिक पुढारपण (थॉट लीडरशिप) येते. ही (किमान आपले मुद्दे मांडण्याची) सुरूवात हळुहळू होते आहे, ही चांगली गोष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ते ठळकपणे पुढे आलं आहे.

पण लोच्या बेसिक मध्ये आहे , बॉडीगार्ड आणी दबंग (यांची कथा (?) लिहणे अशक्य आहे ) सारखे अचाट सिनेमे मन लावून First Day First Show पाहणारे आपलेच लोक देऊळ ची स्टोरी कशी २ ओळींचीच आहे हे घरात केबल वर पाहताना बोलतच राहतील तोवर अवघडच आहे रे ! >>> +100

काल्पनिक पात्रांच्या संवादांमधून लिहायची idea फारच आवडली!

माधुरीचा उल्लेख आवडला!

अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

आबासाहेब, बागुलबुवा, सखी माउली, मुक्तेश्वर.. धन्यवाद..

विशालभाऊ धन्स..

साजिरा, अगदी सहमत
स्पर्धेच्या निमित्तानेच... चुकीचे असो वा बरोबर, मुद्दे समोर आले.. आणि एखादा माझ्यासारखाही याबाबत उथळपणे विचार न करता मुद्देसूद विचार करू लागला.