विषय क्रमांक १ : हजारो ख्वाईशे ऐसी...

Submitted by अमृतवल्ली on 29 August, 2012 - 01:58

अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर पाचव्या तासाचा टोल अखेर पडला. चौथ्या तासाच्या मास्तरांनी टेबलावरची पुस्तके गोळा केली आणि संथपणे फळा पुसायला सुरुवात केली. आज काहीतरी वेगळच घडतय. सकाळपासून कसलं तरी विचित्र वातावरण आहे.नुकत्याच पडलेल्या टोलचा आवाज कानांना उगाचच जड वाटू लागला. इतर वेळी तासाची घंटा पडल्यापडल्या सगळ्या वर्गातून कसलेकसले आवाज सुरु होतात. आज घंटेचा आवाज विरला तरी फारशी हालचाल नव्हती. व्हरांड्यात यांत्रिकपणे फिरणारे शिक्षक, उगाचच सुन्न वाटणारा वर्ग आणि माझ्या बाकाजवळच्या खिडकीतून खाली दिसणाऱ्या विहिरीच काळं पाणी. आमच्या वरच्या मजल्यावरच्या सातवीच्या वर्गातून शाळेच मैदान दिसत. मैदान आणि त्याच्या पलीकडच्या वस्तीतल तारेच कुंपण उन्हात चकाकत होत. घाईघाईन मागच्या आठवड्यात हे कुंपण का घातलं? कुंपणाच्या तारा वाकवून रोज मैदानावर येणारी वस्तीतली पोर आज नाहीत. काल घडल ते खरच आपल्या गावात घडल? कुणाच प्रेत पोलीस स्टेशनच्या समोर सापडलं? कुणी मारलं? बाबा-काकांनी काल वाड्याचे दरवाजे स्वत:हून लवकर का बंद केले? रोज कामावर येणारे चंदा ड्रायव्हर आणि गडी का नाही आले? दोन महिन्यापूर्वीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हात जोडून प्रभागात आलेले आमदार कडाडून चिडून कसली भाषा बोलत होते? तेव्हढ्यात इभूना चे कांबळे सर आले. रोज हसणारे आणि वाट्टेल त्या प्रश्नाला उत्तर देणारे मास्तर गंभीर होते. काही न बोलता नागरिकशास्त्र शिकवायला घेतले. ‘लोकशाहीचे तीन स्तंभ.. लोकसभा, नोकरशाही, व न्यायालये आणि चौथा स्तंभ मानला जातो - माध्यमे..’ काल कुठला प्रश्न विचारला म्हणून पत्रकाराला मारलं? तेव्हड्यात कुणीतरी हात वर करून सगळ्यांच्याच डोक्यात असलेला प्रश्न विचारला. “सर.. काल गावात जे झालं ...भीमनगरमध्ये..” सरांनी एकदम भेदक नजरेन त्याच्याकडे पाहिलं. पुढचे शब्द मग त्याच्या तोंडातच राहिले. आज मास्तर आपले नाहीत, कुणीतरी परके आहेत असा वाटायला लागल. चष्म्याआडची त्यांची संतप्त अनोळखी नजर दिवसभर डाचत होती.

आमचाच दहावीचा वर्ग. सर अगदी रंगवून रंगवून ‘जालियानवाला’ शिकवत होते. पोर पोरी तल्लीन होऊन ऐकत होती. नुकताच वर्गातून हाकलून दिलेला ‘एषा’ वर्गाच्या मागच्या दारावर काहीतरी कोरत होता. शेवटच्या बाकाजवळच्या खिडकीतून मला ते दिसत होत. त्याच ‘आय लव यू’ कोरून झालेलं. आता कुठल्यातरी पोरीच तो नाव लिहील. माझ्या डोक्यात एकाच वाक्य घुसत होत.. इतिहासाच्या पाचव्या धड्यातल. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवादाचा अंत झाला. आणि अनेक छोटी छोटी राष्ट्रे उदयाला आली. मार्शल टीटो आणि पंडित नेहरूंनी तिसऱ्या जगाचे नेतृत्व करण्याची ग्वाही दिली.’ तेव्हड्यात सरांनी आणि पाठीमागून सगळ्यांनी गजर केला ‘कर्नल डायर मार हंटर’ (डायर = अधिकारी; हंटर = समिती) च्यायला.. हरिनामाचा गजर आहे का हा? किती वेळा तोच तोच स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास. पाचवीतपण तोच. आठवीतपण तोच. दहावीतपण तोच. नेमक कशामुळे स्वातंत्र्य मिळाल? दुसरया महायुद्धानंतर झालेल्या घडामोडी आणि भारत स्वातंत्र्य होण्याचा कुठतरी घनदाट संबध आहे? तेव्हड्यात सरांनी परत एकदा ‘हंटर’चा गजर केला. पेपरमध्ये लिहायचय ना. कसलीतरी चीड डोक्यात गेली.युद्धात तलवारीचा खणखणाट असतो तसे आवाज कानात घुमायला लागले आणि मी इतिहासाच पुस्तक जोरात खाली फेकून दिल. त्याचा धाडकन आवाज झाला. एषा ठोकायचा थांबला. व्हरांड्यात थांबलेल्या शिक्षकांची नजर माझ्याकडे वळली. मी काय केल ते मला उमगलच नाही. जेव्हा उमगल तेव्हा सगळ्याच्या नजरेतील अविश्वास, आश्चर्य आणि काय काय झेलत मी वर्गाबाहेर पडले.

इंजिनिरिंगसाठी मोठ्या शहरात येईतो सगळ वाचून पचवून झालं होत. मृत्यंजय, स्वामी, शिवाजी पासून नाझी भस्मासुरापर्यंत.. सगळ. इतक वाचल्यावर जगातल्या कुठल्याही विषयावर ठाम भाष्य करायचा अधिकार मिळाला आहे अस वाटायला लागल. आता हॉलीवूडचे वेध लागले होते. बेसिक इंग्रजी चित्रपट स्टार वार्स वगैरेच शिक्षण चालू होत. आणि अचानक एका मित्रान ‘हजारो ख्वाईशे ऐसी..’ दिला. सीडी टाकली.अथ पासून इति पर्यंत बघितला आणि.. मुळापासून हादरले. त्यानंतर तीन-चार दिवस तरी कांबळे सरांची दुखरी अनोळखी नजर आणि दहावीच्या वर्गातल ‘कर्नल डायर मार हंटर’च गाणं आलटून पालटून डोक्यात घुमत होत. आपलेच पाय आपल्याच मातीचे नसावेत तशी अवस्था झाली. माझ्याविषयी मलाच कोणीतरी नव्यान सांगाव....

आत्तापर्यंत वाचलेल्या, शिकलेल्या इतिहासाने भारतीय समाजाच फार वेगळ चित्र डोळ्यासमोर उभ केल होत. मिठाच्या सत्याग्रहात गांधींमागे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची रांग, त्यांच्या कुठल्यातरी भाषणाला जमलेली तुडुंब गर्दी, आवेशपूर्ण भाषणे, लढाया, तह इत्यादि इत्यादी. हे सगळे म्हणजेच ‘आपण’ अस वाटायला लागल. लढाया आम्ही केल्या, स्वातंत्र्य आम्ही मिळवले. पण प्रत्यक्षात आत्ताचे आम्ही आणि ‘ते सगळे’ वेगळे आहोत. पण वेगळे कुठे? आणि वेगळे का? हे शोधताना शालेय अभ्यासातले सगळ्यात दुर्लक्षित विषय नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र पुढे आले. स्वातंत्रपूर्व काळातील लोकमानस, आत्ताचे आम्ही आणि मुख्य गेल्या पन्नास साठ वर्षात बदलत गेलेली समाजव्यवस्था यांना जोडणारे आणि एकमेकांपासून तोडणारे दुवे सापडले आणि मग डोक्यात पुन्हा एकदा गोंधळ.. ज्या दृष्टीकोनातून आपण पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास शिकतो तसा स्वातंत्र्यसंग्रामाचा का नाही? पंडित नेहरूंच्या १९४७ च्या भाषणात “आपणा नियतीशी करार केला..” शिकवताना सरांचे डोळे लकाकातात पण त्यानंतर काय घडल याबाबत मौन का? आपण आपल्यालाच दिलेली वचने, शपथा पाळल्या का? मी जन्मायच्या आधीचा तीनशे वर्षे आधीचा इतिहास महत्वाचा का पन्नास वर्षेआधीचा? स्वातंत्र्यानंतरचा भारतीय समाजवाद, शीतयुद्धाचा परिणाम, रशिया-अमेरिका संबंध, भारत-पाक युद्ध आणि मुख्य म्हणजे आणीबाणी याविषयी माझा इतिहास चकार शब्द का काढत नाही? भारताच्या निर्मितीनंतरचा इतिहास हा मी आजची नागरिक म्हणून जास्त महत्वाचा नाही का? याच प्रश्नांचा शोध घेत घेत जयप्रकाश नारायणांची आंदोलन, गांधी घराण्याची एकहाती सत्ता, खलिस्तान चळवळ, जोडीला हिटलरचा नाझीवाद, लेनिन स्टालिनचा कम्युनिझम, आयन रॅंड च फाऊंटन हेड वाचल. त्यावेळच्या माझ्या बौद्धिक कुवतीनुसार तटस्थतेच्या आणि सारासार विचाराच्या सगळ्या कसोट्या लावून काही उत्तरेसुद्धा काढली. ती किती बरोबर किती चूक हा भाग अलहिदा. पण या चित्रपटामुळे कुठल्याही घटनेकडे पाहायची माझी दृष्टी बदलली. रंजकता आणि वास्तव याच्या सीमारेषा अधोरेखित झाल्या.

पण एक प्रश्न मला तेव्हाही पडला आणि आजही पडतो, आपल्या देदीप्यमान भारतीय लोकशाहीच्या हक्कांची गळचेपी ज्या काळात झाली त्याविषयी फक्त ५ चित्रपट असावेत? (संदर्भ : विकी). भारतीय विशेषत: बॉलीवूडच्या चित्रपटांविषयी Nostelgia (स्मरणरंजन) अपरिहार्य आहे. अमिताभचा अंग्री मॅन, देवानंदची तिरपी चाल, मधुबाला-माधुरीच्या अदा. पण It’s not always about loving your parents. माझ्या मते सिनेमा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. आपल्यातलीच वाटावी अशी माणसे, त्यांची भावविश्वे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्यांचे पडसाद, आपल्या चष्म्यातून मांडायला काय हरकत आहे?

आता थोडे चित्रपटाविषयी..
सुधीर मिश्रा आणि रुची नरेन च्या लेखणीतून उतरलेली हजारोची पटकथा अतिशय बांधीव आहे. चित्रपटाच्या सर्व तांत्रिक मुद्द्यांवर संकलन, दिग्दर्शन, कॅमेरा मुव्हमेंट ‘हजारो..’ खुपच सरस आहे. शिवाय के के मेनन, शायनी आहुजा आणि चित्रांगदा सेन (काय होतीस तू..काय झालीस तू!) यांचा अप्रतिम अभिनय. शायनी आहुजाने साकारलेला विक्रम तर केवळ अफलातून. स्वानंद किरकिरेनी लिहिलेली गाणी,शोभा मुदगलचे स्वर आणि शंतनू मोईत्राचे संगीत खूप भारी.

हजारोची कथा घडते ७० च्या दशकात. याच काळात आपल्या देशात कितीतरी अंतर्गत प्रवाह अस्तित्वात होते.लायसन्सराज, त्या मुळे नव्याने प्रबळ झालेला नोकरवर्ग, एकाच पक्षाकडे आणि त्यातही एकाच घराण्याकडे असणारी अनिर्बंध सत्ता, बेबंद नोकरशाही, पोलीसदले, स्वातंत्र्यसंग्रमात लढलेली गांधीवादावर गाढ विश्वास ठेवणारी आणि अजूनही भाबडा आदर्शवाद असणारी पिढी, मार्क्स आणि माओने प्रभावित नवा समाजवाद, बाहेरच्या जगात प्रबळ झालेला भांडवलवाद. अश्या अनेक प्रवाहामुळे सर्व दिशांनी ओढल्या जाणाऱ्या पिढीतल्या तीन व्यक्तिरेखा सिद्धार्थ, विक्रम आणि गीता. तिघांचाही पिंड वेगळा. खानदानी श्रीमंत असलेल्या निवृत्त न्यायाधीशाचा मुलगा, सिद्धार्थचा ज्वलंत क्रांतीवर विश्वास आहे. ‘आहे रे’ गटाची वर्षानुवर्षे गुलामी करणाऱ्या दलितांसाठी त्याला क्रांती हवी आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवत, भूमिगत होत सहकाऱ्यांच्या साथीने तो लढतो आहे. लंडनहून शिकून आलेली, सिद्धार्थवर मनापासून प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी घरदार, संसार मोडून त्याच्या मागे जाणारी, पण स्वतःची क्षितिजे स्वतः शोधणारी गीता. आणि गांधीवादाच बाळकडू पिऊन (आणि त्यातूनच सद्य परिस्थितीत त्याचा फोलपणा जाणवून) सत्ता आणि पैश्याच्या बळावर कुठलेही सरकारी प्यादे हलवणारा, गीतावर नितांत प्रेम करणारा विक्रम. याशिवाय अनेक लहान मोठी पात्रे, त्यांच्या प्रेरणा आणि एकमेकात गुंतलेले हितसंबंध.

पुढे या पात्रांच काय होत हे मुद्दामच लिहीत नाही.त्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.

इथे दुष्ट विरुद्ध सुष्ट असा संघर्ष नाही. या सगळ्या व्यक्तीरेखांच्या काहीतरी इच्छा आहे, त्या पूर्ण करण्याची त्यांची धडपड आहे. परिस्थिती कठीण आहे आणि कुठलाच मार्ग शाश्वत नाही. गालिबच्या या ओळी तत्कालीन स्थितीसाठी अगदी समर्पक आहेत.

“हजारो ख्वाईशे ऐसी कि हर ख्वाईशपे दम निकले
बहोत निकले मेरे अरमान फिर भी कम निकले.”

या चित्रपटातील मला भावलेली अजून एक गोष्ट म्हणजे “Reading between scenes”. कुठलातरी एक लहानसा प्रसंग, हलकीशी शांतता, कॅमेरा अँगल, बरच काही बोलून जातो. वानगीदाखल काही उदाहरणे देते..3.PNG
बऱ्याच वेळा कॅमेरा त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टीकोनातून जातो. एखाद्या मोर्चाचे किंवा जाळपोळीचे चित्रण करताना, दगडी भिंतीच्या वरून घेतलेला कॅमेरा आपल्याला नकळत त्या घटनेचा कृतीहीन साक्षीदार बनवतो.

एका प्रसंगात सिद्धार्थचे वडील नक्षलवादी ठरवल्या गेलेल्या सिद्धार्थ आणि गीताच्या सुटकेच्या प्रयत्नात इंदिरा गांधींच्या निवासस्थानी जातात तेव्हा तिथे पांढऱ्या साडीतल्या इंदिरा गांधींचे आगमन होते. त्यांचे कार्यकर्ते “देशकी जनता कैसी हो हमारी नेता जैसी हो” चा गजर करतात आणि त्यांच्या घरातल्या कुत्र्याला पकडण्यासाठी दहा-बारा सेवकांची जंत्री इकडे तिकडे पळत असते. हा पॅन शॉट त्या काळाच्या परिस्थितीवर खूप मोठ्ठे भाष्य करतो.
1.jpg विक्रमच्या लग्नाच्या वरातीमध्ये जयाप्रकाश नारायणांना समर्थन करणारा मोर्चा घुसतो. विक्रम घोड्यावर आहे तर पाठीमागे “जयप्रकाश नारायण हम तुम्हारे साथ है” चे फलक.

दलाल म्हणून काम करताना विक्रम राजस्थानमधील एका गढीचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा घाट घालतो तथाकथित दुर्दम्य इतिहासाची लायकी काढत.

या काळातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या संभ्रमित गांधीवाद्यांच्या अस्वस्थतेचे चित्रण अतिशय तरलतेने केले आहे. विक्रमचे वडील त्यांच्यातलेच एक. सत्ता आणि पैसाकेंद्रित राजकारण त्यांच्या गावीही नाही. विक्रमला मात्र सत्तेच गणित सुटल होत त्याला याच व्यवस्थेचा भाग होऊन सत्ता मिळवायची आहे. तो आपल्या वडिलांविषयी म्हणतो “These state of affairs worries my father, 30 of his gandhian collegues, 70 of socialists and 102 others to no end. Being worried is my fathers main profession. He should’ve worried more about us though.. and we would not be stuck at lower end of the great middle class. Which is why I can’t understand you rich kids playing lets change the world game. While you are looking for a way out I’m looking for a way in”.. आणीबाणी अटक होऊनही विक्रमच्या वडिलांचा दुर्दम्य गांधीवाद संपत नाही. अजूनही त्यांना आशा आहे पण बदलत्या परिस्थितीवर नियंत्रण नाही. विक्रम तुरुंगाच्या दारातून त्यांना अविरतपणे चरखा चालवताना पाहतो.

सिद्धार्थला अपेक्षित क्रांतीचा क्षण येणार असा वाटत असताना कुठल्यातरी अनिवार इच्छेने सगळे गावकरी परत त्यांच्या उन्मत्त मालकाला शरण जातात. गीता नक्षलवादी भागातील लोकांसाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवते तेव्हा कॅमेरा तिथे उपस्थित जर्जर बायकांवरून फिरतो आणि आपल्याला कुठयाही संवादाशिवाय गीता, सिद्धार्थचे ध्येय आणि वास्तव याची तफावत दिसते.

या चित्रपटातील बरेचसे संवाद,एकमेकांना लिहिलेली पत्रे इंग्रजीमधून आहेत कारण प्रमुख पात्रे त्यांची स्वतःची भाषा बोलतात. सिद्धार्थ आणि गीता उच्चभ्रू समाजातील आहेत तर विक्रमला या समाजाचा भाग बनायचे आहे.फिडेल कास्त्रो,मार्क्स वाचून आणि चर्चा करून सिद्धार्थला ज्या भारतात बदल घडवून आणायचा आहे त्या भारताविषयी त्याला काहीच माहित नाही. दांभिक बुद्धिवादाच सुरेख विश्लेषण दिग्दर्शकाने त्याच्या व्यक्तीरेखेतून दाखवले आहे.

अशा अनेक plot devices ची दिग्दर्शकाने कमाल योजना केली आहे.

या चित्रपटात एक वाक्य आहे सिद्धार्थच्या तोंडी. “I am Siddharth Tayyabji. son of Muslim father and Hindu Bengoli mother neither can speak urdu nor bengoli. My parents could not even give me the single thing which they could have”. हे वाक्य बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या बाबतीत खरे वाटायला लागते. खरच ओळखतो का आपण आपल्या देशाला. इथल्या लोकांना..ज्या समाजाचा परिपाक म्हणून आपण आज जे काही आहोत त्या समाजाची आपल्या जन्माच्या आधीची ही आंदोलने आपल्याला कोSहम हा प्रश्न विचारायला नक्की भाग पाडतात.

[सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट! मस्त लिहीले आहे! चित्रपटही जबरदस्त आहे. पूर्वी पाहिला होताच आणि त्यातील कथा, प्रसंगांचे डीटेलिंग जाणवले होते.

वॉव ! फार सुरेख चित्रपट!
या चित्रपटावर लिहिल्याबद्दल प्रथम अभिनंदन.
फार अवघड काम! खुप छान जमलय. पुन्हा अनुभवला Happy
सुरुवात फार छान केलीत.
>>>पण एक प्रश्न .... त्याविषयी फक्त ५ चित्रपट असावेत? <<< मनातलं मांडलत. कित्ती पोटॅन्शिअल आहे तो संपूर्ण काळात ....
>>>“Reading between scenes”. <<< अगदी, अगदी.
>>>कॅमेरा आपल्याला नकळत त्या घटनेचा कृतीहीन साक्षीदार बनवतो <<< वा ! पर्फेक्ट !
अगदी तो शेवटचा शॉटही .... अप्रतिम सुंदर चित्रपट. धन्यवाद अमृतवल्ली पुन्हा अनुभव दिल्याबद्दल.

छान लेख.

त्या काळातल्या अनेक घटना, मग पुढे काळाच्या ओघात विसरल्या गेल्यात.

मला आठ्वतेय एका बातमीत असे होते कि एक कालकुपी खोल पुरण्यात आली होती. त्यामधे इतिहासाचे काही संदर्भ होते, मग जनता राजवटीत ती पुन्हा उकरून काढण्यात आली, त्यात काय होते ते मात्र कधी वाचल्याचे आठवत नाही.

लेख प्रचंड आवडला.
एका अत्यंत विचारी, सखोल सिनेमाचे तितकेच सखोल विश्लेषण वाचून फार आनंद झाला.
माझ्या मते पहिला नंबर

लेख खरंच प्रचंड आवडला!!
मी चित्रपट पाहीला नाहीये पण खूप ऐकून आहे त्याबद्दल. तुमच्या लेखाने मात्र लवकरात लवकर पाहीलाच पाहिजे अशी जाणीव झाली!

लेख अतिशय आवडला. Happy

मी हा सिनेमा पाहिलेला नाही. विश-लिस्टमधे अर्थातच आहे.

(या स्पर्धेनिमित्त मी 'पहायचे विनाकारण राहून गेलेले सिनेमा' अशा विषयावर काही दिवस विचार करत होते. त्यात हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता.)

लेख मस्तच .. मीही हा सिनेमा खूप ऐकलं असूनही अजून पाहिलेला नाही ..

विकी चा जो संदर्भ दिला आहे त्याची लिंक मिळू शकेल का? ते कुठले पाच चित्रपट हे जाणून घ्यायचं आहे ..

@सशल : http://en.wikipedia.org/wiki/The_Emergency_(India)#Films हा दुवा बघा.
@दिनेशदा: हो तुम्ही म्हणत आहात त्या बातमीचा संदर्भ आठवला. याच विषयावर जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा ही वाचल्याचे स्मरते.
बस्के, ललिताप्रीती, गौरी, सशल, माझ्या मते हा आपल्या भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील महत्वाचा चित्रपट आहे. नक्की बघा.

लेख वाचल्याबद्दल आभार!

आत्तापर्यंत वाचलेल्या सर्व लेखांमधे मला सगळ्यात जास्त आवडलेला लेख!
एखादी कथा वाचतोय की काय असा संशय येऊ लागेपर्यंत लेखाची गाडी सिनेमावर आणण्याचा प्रकार आवडला. तसंच गेल्या पन्नास वर्षांतल्या इतिहासाबद्दलचं मतही!

--------------
'हजारों .. ' मी रात्री एकटा शांतपणे बघत बसलो होतो.
पहाटे तीनच्या सुमारास सिनेमा पूर्ण झाल्यावरच जागचा उठलो !

के.के. मेनन नावाचा अ‍ॅक्टर भन्नाट आवडायला लागला.
'दैव देतं आणि कर्म नेतं' ही म्हण पडद्याबाहेरच्या आयुष्यात शायनीपेक्षा अजून कुणी सार्थ करू शकेल?
चित्रांगदा सिंग -- उप्फ! पण >>काय होतीस...>> बद्दल एकदम सहमत!
स्मिता पाटीलची निदान सावली तरी आता हिंदी सिनेमात येतेय म्हणून खूष होत असतानाच आता 'जोकर' तिच्या आयटम नंबरसाठी तरी नक्की बघूया इथपर्यंत उलटा प्रवास आहे तिचा! पण तरीही 'उप्फ' !! Happy

अफाट! मस्त लिहीले आहे! चित्रपटही जबरदस्त आहे. पूर्वी पाहिला होताच आणि त्यातील कथा, प्रसंगांचे डीटेलिंग जाणवले होते. >> ++१

आता हा लेख वाचून पुन्हा एकदा हा सिनेमा पाहावा असे वाटते आहे.

माझ्यासाठी हा लेख, भारतींचा लेख आणि शामचा लेख यांच्यात झुंज होणार!

जब्बरदस्त लेख. विषय पुढे नेताना कुठून कुठे कसा न्यायचा याची नकळतपणे उत्तम शिकवण या लेखातून मिळाली. कसे लिहावे याचीही शिकवण मिळाली. शुभेच्छा

===================

इथे दुष्ट विरुद्ध सुष्ट असा संघर्ष नाही. या सगळ्या व्यक्तीरेखांच्या काहीतरी इच्छा आहे, त्या पूर्ण करण्याची त्यांची धडपड आहे. परिस्थिती कठीण आहे आणि कुठलाच मार्ग शाश्वत नाही.<<< व्वा

बऱ्याच वेळा कॅमेरा त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टीकोनातून जातो. एखाद्या मोर्चाचे किंवा जाळपोळीचे चित्रण करताना, दगडी भिंतीच्या वरून घेतलेला कॅमेरा आपल्याला नकळत त्या घटनेचा कृतीहीन साक्षीदार बनवतो.<<< पुन्हा व्वा

त्यांच्या घरातल्या कुत्र्याला पकडण्यासाठी दहा-बारा सेवकांची जंत्री इकडे तिकडे पळत असते. हा पॅन शॉट त्या काळाच्या परिस्थितीवर खूप मोठ्ठे भाष्य करतो.<< पॅन शॉट या संज्ञेचा अर्थ कृपया सांगावात. हे विधानही भारी आहे.

असे वाटत आहे की दिग्दर्शकाने जे दाखवले त्याहीपलीकडे तुम्ही या चित्रपटातून काहीतरी घेतलेत की काय!

उत्तम मांडणी.. प्रभावी विषय!

चित्रपट पहायचा योग आला नाही अजुन पण खुपच ऐकलं आहे त्याबद्दल! विश-लिस्ट मधे आहेच!

इतर स्पर्धकांना टक्कर देणारा लेख!

शुभेच्छा!

मस्त लिहिले आहे.

विषय (चित्रपट) आणि ज्या विषयांबद्दल जास्त चर्चा व्हायला हवी त्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न त्याच विषयातुन येणे हे सोपे नसलेले काम उत्तम प्रकारे केले आहे.

> सिद्धार्थला ज्या भारतात बदल घडवून आणायचा आहे त्या भारताविषयी त्याला काहीच माहित नाही
हे महत्वाचे आहे. आपल्यातल्या अनेकांना भारताबद्दल माहीत नाही (आजच्या - दोन हजार वर्षांपुर्वीच्या भारताबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे). माहीत करुन घ्यायची अनेकांना गरज वाटत नाही, आणि गरज वाटत असल्यास सहज शक्यही नाही.

> माझ्या मते सिनेमा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे.
करमणुकीपलिकडे जेंव्हा सर्व लोक हक्कानी मागतील तेंव्हाच हे सरसकटपणे शक्य होऊ शकेल.

खासच !

उत्तम मांडणी.. प्रभावी विषय!

चित्रपट पहायचा योग आला नाही अजुन पण खुपच ऐकलं आहे त्याबद्दल! विश-लिस्ट मधे आहेच! >>> +१०००...

जबरदस्त लेखनशैली, सिनेमा कसा पहावा याची अचूक जाण असलेली नजर... हॅट्स ऑफ....

@बेफिकीर : पॅन शॉट म्हणजे जास्ती जास्त सभोवताल दाखवणारी कॅमेराची हालचाल. आता या शॉट मध्ये इंदिरा गांधीच्या निवासस्थानी एका लहानसे कुत्रे इकडून तिकडे पळत आहे.त्याच्या मागे सेवक. म्हणतात ना ‘श्रीमंताच्या घरचें हो श्वान । त्यासी अवघे देती मान । तैसी मी तुमची दासी दीन । ठेवा चरणापाशी हो | ’ तेव्हा (आणि आजही) असणारी नोकरशातील लाचारी. हा शॉट बघून खरच दिग्दर्शकाला दाद द्यावी वाटते.

@ aschig > माझ्या मते सिनेमा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे.
>>करमणुकीपलिकडे जेंव्हा सर्व लोक हक्कानी मागतील तेंव्हाच हे सरसकटपणे शक्य होऊ शकेल.
करमणूकप्रधान किंवा व्यावसायिक चित्रपट करू नये असे माझे म्हणणे नाही. जाने भी दो यारो सारखे चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. पण निदान निर्माता-दिग्दर्शकांनी निदान प्रेक्षकांच्या बुद्धीला कमी लेखून चित्रपट बनवू नये.. खर दोष आपलाच आहे एखादा दबंग चालतो कारण डोक बाजूला ठेवून चित्रपट बघायची खुमखुमी येते आणि मग त्या सारख्याच चित्रपटांची रंग लागते. यात दोष कोणाचा.. Godfather मध्ये एक वाक्य आहे “If you are saying you are innocent you are doubting my intelligence”.
शिवाय सिनेमा हे अभिव्यक्ती व्यक्त करायचे माध्यम मानले तर जे मला वाटत ते माझ्या पद्धतीने मांडायला हवे.काही चित्रपट तरी असे हवे...

Pages