मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला?

Submitted by सावली on 25 April, 2011 - 00:09

यावेळच्या भारतवारी मध्ये अशा अनेक गोष्टी दिसल्या त्याबद्दल काही बोलावसं वाटलं, काही करावसं वाटलं.
जास्त दिवस राहिल्याने गोष्टी जुन्याच पण नव्या दृष्टीने बघितल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी बोलावसं वाटूनही भिडेपोटी बोलता आलंच नाही.

असेच काही प्रसंग
गेल्यागेल्या रंग पंचमी होती. त्याची आठवण मात्र मला फार खराब प्रकारे झाली. दोन तीन दिवस आधीपासून रस्त्यावर, आजूबाजूला सगळीकडेच छोट्या छोट्या प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्या आणि त्याभोवती पाण्याचे ओघोळ दिसायला लागले. आधी कळेना कि सगळीकडे हा असा कचरा काय आहे? पण मग रंगपंचमी जवळ आल्याचे कळले. आता पिशव्या टाकायच्या आणि मग पावसाळ्यात पाणी तुंबले म्हणून रडायचे!!

रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे रंगच रंग. रंगीत आयुष्य जगण्यासाठी अशा खोट्या रंगाची जरुरी असतेच का हा प्रश्न पडलाच.

नंतर आलं क्रिकेट. पाकिस्तान विरुद्ध आणि फायनल मॅच दोन्ही साठी बऱ्याच सोसायट्यामध्ये मोठे स्क्रीन लावून एकत्र मॅच बघायचे प्रोग्राम झाले. वा वा! छान त्या निमित्ताने सगळे लोकं एकत्र येणार! मग जेवणखाणेही झाले एकत्रच.
दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी जाऊन बघितल्यावर खायच्या प्लेट्स, कागदी/ प्लास्टिकचे कप, फटाक्याचे तुकडे आणि त्याचा कचरा अशी घाण ! तीही स्वत:ची मुलं जिथे संध्याकाळी खेळतात त्या ग्राउंडमध्येच.

स्टेशन वर गेलो होतो काही कामासाठी. तिथे तर डोळे बंद करूनच चालायचे. रुळ आणि प्ल्याटफॉर्म दोन्ही अत्यंत गलीच्छ. आणि लोक अजून कचरा टाकतातच आहेत. कोणालाच काही वाटत नाही.

शाळा शोधनाचाही कार्यक्रम केला यावेळी. काही शाळा बघून त्याच्या गेटमधूनच परत आले. इतका कचरा, घाण आणि दुर्गंधी.

ज्युपिटर हॉस्पिटल म्हणून एक नवीन हॉस्पिटल झालंय. तिथे गेल्यावर आश्चर्य वाटावं इतकं स्वच्छं, सुंदर. कुठे साधी धूळ नाही. हॉस्पिटलचा टिपिकल वास नाही. मात्र टॉयलेट मध्ये गेले तर लोकांनी सगळे टिश्यूपेपर इतस्तत: टाकून पाणी सांडवून घाण केलेलं. तिथले मॅनेजमेंट साफ करत असणारच. बाहेर बघून ते कळतच होतं. पण आलेल्या लोकांना इतकीही जाणीव नाही कि इतक्या स्वच्छं ठिकाणीही आपण घाण करतोय.

आपले एअरपोर्टही बऱ्यापैकी स्वच्छ आहे आता. लोकांनी तिथेही कचरा टाकू नये अशी अपेक्षा होती. तिथे विमानाची वाट बघत असताना, एक अगदी चांगल्या स्थितीतले दिसणारया कॉलेजला जाणाऱ्या वयातल्या मुलामुलींचा ग्रुप आला. बराच वेळ बसले होते. जाताना विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या संपवून रिकाम्या बाटल्या अक्षरश: सीटवर फेकून निघून गेले. कचऱ्याचा डबा अगदी समोरच होता. पण एकानेही त्रास घेतला नाही त्यापेक्षा फेकण्यात जास्त मजा आली त्यांना. नंतर तिथे बसणाऱ्या लोकांची पर्वा वगैरे नाहीच पण कचरा फेकल्याची लाजही नाही. मागे जाऊन सांगावसं वाटलं पण पुन्हा तेच. तसं करता आलं नाही.

सोसायटी मध्ये सॅंडपिट आहे. तिथे खेळायला गेलो तर थर्मोकोल ते प्लास्टिक हा सगळा कचरा मिक्स. दुसऱ्या दिवशी मीच एक पिशवी घेऊन गेले सगळा कचरा उचलून भरून डब्यात फेकला. आणि थोड्या वेळानेच एक शाळेतली मुलगी आणि तिची आई आल्या. मुलीला खायला एक कसलातरी खाऊ आणला होता. त्याची पिशवी फाडून वरचे टोक तीथेच टाकले तिने. खाऊ संपल्यावर रिकामी पिशवीही तिथेच सॅंडपिट मध्ये ! आताच मी मूक पणे इथला कचरा उचलला होता. या मुलीलाही बोलायला हवं होतं पण माझा धीर झालाच नाही. पण जाणवलं कि नं बोलता केलं तर ते वाया जाणार. कचरा टाकू नये याची जाणीवही करून द्यायला हवी.

घरात असं करतात का? घर आरशासारखं स्वच्छं हवं मग बाहेर घाण का चालते? घरात फळांची सालं , रिकाम्या पिशव्या आपण खाल्ल्याठिकाणी टाकत नाही ना? मग बाहेर का टाकतात? कळत नाही म्हणून? चुकून? कचरा दिसत नाही म्हणून? काही कायदा , दंड नाही म्हणून? जाणीव नाही, दुसऱ्याचा विचार नाही म्हणून?

बहुतेक शेवटचं खरं असावं. पण एक व्यक्ती म्हणूण मला जाणीव असली तरी काय करता येईल? मी स्वत: कचरा नं फेकून , किंवा अगदी स्वत: साफ करूनही लोकांना जाणवणारच नसेल तर अजून काहीतरी करायला हवं. वर उल्लेखलेल्या प्रसंगी मला काही बोलताच आले नाही ही माझी चूक आहेही. पण एक व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष न सांगता अजून काही मार्गांनी किंवा एक ग्रुप , संघटना म्हणून सांगणे सोपे जाईल का?

मला सुचलेली कल्पना अशी कि
एखादी वेबसाईट बनवून त्यावरून लोकांमध्ये जागरुकता वाढवायची. आजकाल बरेचजण इंटरनेट वापरतात. तर कधी ना कधी त्यांच्या कडून हे वाचलं जाईल. सारखं वाचलं गेलं तर कुठेतरी जाणीवही होईल. वेबसाईट हा एक प्लाटफॉर्म असेल तर त्या नावाखाली अनेक छोटे छोटे ग्रुप बनवून आपापल्या सोसायट्यामध्ये, आपल्या मुलांच्या शाळांमध्ये या बद्दल बोलता येईल. आणि एकटेपणी बोलण्याची भीड पडणार नाही. शाळा कॉलेज मधील मुलांना याची जाणिव करुन दिली तर मुळातुनच स्वच्छतेची आवड असणारी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असं मला मनापासुन वाटतं.

तुम्हाला काय वाटतं? अजून काय करता येईल? तुमच्या पैकी किती जणांना यात काही भाग घ्यायला आवडेल? तुमच्या पैकी किती जणांना स्वच्छ भारतात राहायला आवडेल?

विनंती: परदेशात आपलेच लोक कसे वागतात पण भारतात कसे वागत नाहीत वगैरे वाद जरा बाजूला ठेवून, आपल्याला काय करता येईल यावर चर्चा करायला आवडेल.

२६-एप्रिल- अपडेट
मी काय ठरवले आहे

  • - पुन्हा परत जाईन तेव्हा सोसायटी मध्ये ग्रुप तयार करून आधी सोसायटी मध्येच सफाई करणे आणि त्या बद्दल जाणीव निर्माण करणे.
  • - सो. मध्ये जे शिक्षक असतील त्यांच्याशी या बाबत बोलणे. त्यांना जाणीव करून देणे. * हे आधीच सुरु केले आहे.
  • - फेसबुकवर एक ग्रुप तयार केला आहे. http://www.facebook.com/idonotlitter या ग्रुप मधून थोडा अवेअरनेस कदाचित करता येईल.
  • - या ग्रुप मार्फत सेलेब्रिटीना ही फेसबुक अकाउंट असल्यास संपर्क साधता येईल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायकीन्ग ला गेलो असताना माझ्या फ्रेन्च मित्राने strawberry चे मि फेकलेले हिरवे देठ मला उचलायला लावले. स्वछते च्या बाबतित असा काटेकोरपणा आवश्यक आहे.>>> गुरूजी, हे कळाले नाही. हायकिंग ला म्हणजे मातीचे रस्ते, आजूबाजूला झाडे हे गृहीत धरले तर ती देठे तेथे टाकण्यात काही चुकीचे दिसत नाही. प्लॅस्टिक टाकणे वगैरे समजू शकतो.

मध्ये मी ८ दिवस अंदमानला जाऊन आलो. पहिल्याच दिवसापासून लक्षात आले ते म्हणजे सर्व रस्ते अतिशय स्वच्छ आहेत. कोणीही रस्त्यावर कचरा फेकणे तर दूरच पण थुंकत देखील नाहीत. दुसरे म्हणजे तेथील स्थानीक लोक इतरांशी अतिशय नम्रतेने व आदबीने बोलतात. स्थानीकांशी गप्पगोष्टी करतांना कळले की तिथे मारामार्या सोडाच पण भांडणेही होत नाहीत. समुद्र किनारेही अगदी साफ. सर्व प्रवासी हेच म्हणत होते की इथे अंदमानला असं असू शकतं तर इतर भारतात का असू नये. याचं उत्तर मात्र कोणीच देऊ शकले नाही.

यात एक मुद्दा आहे. बर्‍याचदा इच्छा असतानाही हातातला 'कचरा' टाकायची सोय नस्ते म्हणून बरेच लोक इथे तिथे कचरा टाकतात. पुण्यातल्या बालेवाडी संकुलात निर्मला देवींचा (साध्वी)दरवर्षी कार्यक्रम होतो.तिथे लाखो भक्त ३ दिवस येतात. पण कार्यक्रम संपल्यावर मात्र एक चिठोरेही पडलेले नसते कारण तिथे पावला पावला वर त्यानी काळ्या प्लॅस्तिक पिशव्या घातलेले ड्रम्स ठेवलेले असतात्.बर्‍याचदा फुटपाथव्र काही टाकायचे झाले तर बरेच अन्तर चालून गेले तरी डस्ट बिन दिसत नाही. ही सोय केली तर निदान ५०% कचरा तरी कमी होईल...

>>इथे अंदमानला असं असू शकतं तर इतर भारतात का असू नये.
>>अंदमान म्हणजे भारत नव्हे?

@बाळू जोशी. - ठळक केलेला शब्द कदाचीत तुमच्या नजरेतून सुटला असावा....:डोमा:

किरणजी,
आपण सांगताहात तशी परिस्थीती असेल, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नुसती कन्सल्टिंग रूम असली तरी किमान पिण्याचे पाणी व छोट्या टॉयलेटची सोय करणे (पेशंटसाठी) हे बेसिक कर्टसी आहे..

फारएन्ड, अगदि बरोबर. भारतात मी हेच करतो. बायो डिग्रेडेबल कचरा थोड्या प्रमाणात हरकत नाहि. परन्तु सगळ्यान्नि थोडा थोडा बायो डिग्रेडेबल कचरा वाटेत टाकला तर त्या वाटेचि वाट लागायला वेळ लागणार नाहि.

@बाळू जोशी. | 12 August, 2012 - 12:43
>>>अंदमान म्हणजे भारत नव्हे? <<
फक्त स्वच्छतेच्या सम्दर्भात हे आपले भाष्य असावे.
पण अंदमान हा बर्‍याच प्रमाणात मिनि भारतच की.
पर्यटन हा तेथल्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असल्याने आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील कडक ब्रिटिश शासनव्यवस्थेमुळे अंदमान स्वच्छ राहिले असावे. तेथे प्रचंद गर्दी जमवणारी पारंपारिक धार्मिक स्थळे नसने हेही एक वरदानच. आता 'इतर' भारत त्याच्या स्वच्छतेची वाट न लावो अशी आपन प्रार्थना करू.

<<बर्‍याचदा इच्छा असतानाही हातातला 'कचरा' टाकायची सोय नस्ते >>

अगदी अगदी....कालच 'राहूल सिनेमा' ला गेलो होतो. २ नंबरच्या थिएटअरमधून बाहेर पडल्यावर अगदी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कुठेही कचरापेटी नव्हती. तिथल्या माणसाना सांगून आलेय काल कि सोय केलीत तर थोडीतरी माणसे कचरा टाकतील. आता तुम्ही कोणी गेलात, तर बघा तिकडे ठेवली का कचरापेटी...कारण मी परत तिकडे कधी जाईन, सांगता येत नाही.

वर्षा, लिंक मस्त आहे.

त्या लेखाच्या खाली लेखकाचा ईमेल आयडी दिलेला आहे. 'सहकार भांडार'ची चौकशी त्या आयडीला ईमेल पाठवून करता येईल का?

आज स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने हा धागा वर आणतेय.
अडीच वर्षापूर्वी आपण आपल्याकडुन जमेल तसा प्रयत्न करु असे मी म्हणाले होते. माझे प्रयत्न अगदी छोट्या पातळीवर चालुच होते. फेसबुकच्या माध्यमातुनही काही ना काही चालु होते. तिथे जाणवले ते हे की 'आज जेवायला काय केले' अशा पोस्ट आणि फोटोवर सतराशेसाठ लाईक आणि कमेंट्स येतात मात्र idonotlitter च्या पोस्ट मात्र शेअर केल्या जात नाहीत.
मला वाटत त्याची दोन / तीन कारणं असावित, एकतर इतका फालतु विषय काय शेअर करायचा, हा काही महत्वाचा विषय नाही असे लोकांना वाटत असावे. किंवा मग आपल्या वॉलवर कचर्‍याचा फोटो आणि कमेंट कशाला असाही विचार असेल( घरासमोर नको च्या धर्तीवर) . अगदीच नाहीतर मग 'मी स्वतः फॉलो करत नाही तर कशाला शेअर करु' असा प्रामाणिक विचारही असावा!!

आज पंतप्रधानांनी जी देशव्यापी मोहीम हातात घ्यायचे आवाहन केले आहे. देशाचे पंतप्रधान असुन ते झाडु हातात घेऊन साफसफाई करु शकतात तर आपण आपल्या आजुबाजूला साफसफाई करायला, आसपासच्या कचरा टाकणार्‍या माणसाला हटकायला काय हरकत आहे? आणि हो तुम्ही एखादा असा उपक्रम हाती घेतलात तर बिफोर / आफ्टर चे फोटो फेसबुकवर आणि इथेही शेअर करायला विसरु नका.

या संकल्पनेचा जितका जास्त प्रसार होईल तितका आपला देश स्वच्छ होईल.

मागच्या जवळ जवळ सर्व पोस्ट वाचल्या. सर्वांचीच भावना स्वच्छता राखली पाहिजे अशी आहे, त्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन!

दिनेश, तुमची कचरा वर्गीकरणाची पोस्ट आवडली. ती अशासाठी की कुठला कचरा निर्माण होतो हे ध्यानात आले तर उपाययोजना करता येते.

मी फक्त माझ्यापुरते सांगू शकतो. महिन्या दीड महिन्यापूर्वी उरळी-कांचनकरांनी असहकार पुकारल्यानंतर पुण्यातील कचरा वाहून नेण्याची पद्धत बंद झाली. आमच्या घरी आम्ही ओला आणि कोरडा कचरा वेगळा करत होतो. कचरेवाला तो घेऊन जात होता; ते बंद झाले. मग मी ठरवले की आपल्या कचर्‍याचे निर्मूलन आपणच करायचे.

कंपोस्ट खतासाठी पिट तयार केले. मायबोलीवरच शोधून काढले आणि मॉडर्न कॉलनीतील श्यामा देसाई (1118 Shivaji Nagar,vishwa shobha Pune 411016. Land mark - Near Autoline petrol pump/Central bank
opp.lane of Amrut banglow Last house to the left is Vishwashobha. before kedar nath temple. मोबाईल : 9823459881) यांना संपर्क करून कॉम्पोस्ट करण्यासाठी माध्यम विकत आणले आणि कचरा निर्मूलन सुरू केले. माझे घर आणि ऑफिस एकाच ठिकाणी असल्याने, घरात केसाळ कुत्री (ग्रेस तिचे नाव) असल्याने आणि बाग असल्याने साधारणतः सहा प्रकारचा कचरा होतो . १. किचन वेस्ट (४०%). २. प्लॅस्टिकच्या पिशव्या (५ टक्के) , ३. ऑफिसची कागदपत्रे (४०%) , ४ बागेतील पाने फुले आणि निर्माल्य (१०%) ५. ग्रेसचे केस (३ टक्के) ६. इतर बाटल्या वगैरे. (२ टक्के)

यातील १, ४ आणि ५ कुजतात. कागद दर तीन दिवसांनी जाळतो आणि ती राख पण कॉम्पोस्ट मध्ये टाकतो. बाकीचे प्लास्टिक, बाटल्या वगैरे (कचराकुंडीत टाकावे,पण सध्या सर्व कचराकुंड्या काढून टाकल्या आहेत) एकत्र करून कचर्‍याच्या पिशवीत बांधून रस्त्यावर ठेवतो. रस्ता झाडणारी बाई उचलून नेते. तिच्याशी बोलणे झाले आहे. ग्रेसला फिरायला नेल्यावर तिची 'शी' कागदात गुंडाळून आणतो आणि संडासात फ्लश करून टाकतो. ही पूर्णतः पर्यावरण पोषक व्यवस्था नाही याची मला जाणीव आहे; पण सध्याच्या परिस्थितीत हाच उपाय मला बरा वाटतो.

तर मुद्दा असा की, वर्गीकरण करता आले तर ८०% प्रश्न सोडवता येईल.

तुझ्या बापाचा रस्ता आहे का? तुझ्या घरात टाकतो का? वगैरे प्रश्नांच्या उत्तरांवरून कुणाशी वाद घालण्याची माझी मानसिकता नसल्याने मी कुणाला थांबवत वगैरे नाही. हे चूक आहे याचीही मला जाणीव आहे. पण मी काही बोलायला गेलो तर शांतपणे बोलू शकत नाही; बोलण्याचे भांडणात, कदाचित मारामारीत सुद्धा रुपांतर होईल असे मला वाटते. मी मार नक्कीच खाणार नाही; समोरच्याला चार देऊनच येईन याची मला खात्री आहे. पण नकोच ते!

कागद दर तीन दिवसांनी जाळतो आणि ती राख पण कॉम्पोस्ट मध्ये टाकतो >> यावर दुसरा कुठला उपाय नाही काय? कागदपण कुजतात माझ्या मते.

<<कागदपण कुजतात माझ्या मते.>>

सर्वच कागद कुजत नाहीत. वर्तमानपत्रांचे वगैरे कुजू शकतात. पण आमच्या कडे जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची पाकिटे असतात. ती सहसा कुजत नाहीत असे मला वाटते.

कागद दर तीन दिवसांनी जाळतो>>> शरद राव कागद जाळण्यापेक्षा तो पेपर श्रेडर मधुन काढुन रिसायकल करा.
बाकि जे करताहेत त्याबद्दल अभिनंदन. आणि शुभेच्छा. स्मित

बाकि जे करताहेत त्याबद्दल अभिनंदन. आणि शुभेच्छा >> हे सांगायचे राहिले मघाशी Happy

तो पेपर श्रेडर मधुन काढुन रिसायकल करा >> हे पण डोक्यात आले होते. पण भारतात असं रिसायकल करण्यासाठी काय व्यवस्था आहे हे माहिती नाही म्हणून लिहिलं नाही. Happy

हो घेतात. पोत्यात घेउन जातात. न घ्यायला काय झालं. तो कागद सरळ रिसायकलला जातो (कधी कधी पॅकिंगला जातो तेथुन रिसायकल).

तो पेपर श्रेडर मधुन काढुन रिसायकल करा >>> पेपर श्रेडर घरी विकत घ्यायचे का? आणि कितीला पडते ते?

पेपर श्रेडर घरी विकत घ्यायचे का?>>>

आमचे ऑफिस आहे. त्यामुळे घ्यायला हरकत नाही. शिवाय ते फारसे महाग नसावे. पण माझी गोची अशी आहे की; बायकोला पटवून दिल्याशिवाय ते विकत घेता येणार नाही. अगोदरच आमच्या ऑफिसमध्ये काही गोष्टी अडगळ होऊन बसल्या आहेत - म्हणजे काम करतात पण त्यांना काम नसते (फॅक्स मशीन, कलर प्रिंटर, सिंगल पेज फ्लॅट बेड स्कॅनर वगैरे) त्यात आणखी एक भर पडेल असे तिला वाटले तर नवल नाही. पण आयडिया चांगली आहे. कायतरी करून तिला पटवतोच! Happy

आपल्याला अजून टॉयलेट पेपर्सची सवय नाही. इथे आफ्रिकेत ती अति आवश्यक वस्तू आहे आहे आणि तिची निर्मिती वेस्ट पेपर पासूनच होते. पण त्या कामात भरपूर पाणी लागते आणि रसायनेही.

कागद रिसायकल करणे चांगलेच. श्रेडरचा कचरा दाबून दाबून पोत्यात भरावा लागतो ( "आकारमान" वाढते ) हाताने फाडणे चांगले ना.

मॅकडोनाल्ड सारख्या काही दुकानात बिल नाही मिळाले तर माल फुकट अशी पाटी लावलेली असते. त्याउलट
इथल्या काही दुकानात (प्रिंटेड) बिल हवे का असे विचारतात. नाही सांगता येते. बिल दिले नाही म्हणून सरकारी
टॅक्स वाचवता येतो असे नाही. कारण तो बिलात असतोच. बिल प्रिंट केले नाही तरी बिल नोंदवले जातेच.

रच्याकने, बिलाला इथे फाटूरा म्हणतात Happy

हाताने फाडणे चांगले ना.>>> काहि गोपनिय कागदपत्रे हाताने फाडुन देखिल गोपनियता भंग होउ शकते Wink म्हणुन मशिन. बस्स...

मी कधीही रस्त्यावर कचरा टाकत नाही आणि माझी मित्रमंडळींनाही कचरा कुठेही फेकू देत नाही. यावरून अनेकदा मित्रांशी वादही होतो.
त्यांच्यामते सगळेच घाण करतात, मग आपण केली तर काय बिघडणार आहे? हे माझ्या मित्रांनाच नाही, तर बर्याच जणांना वाटते.

मग त्यांना सांगावे लागते की प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासुनच होते...

आणि आश्चर्याची बाब म्हणजे याच व्यक्ति चुकुनही एक कागदाचा तुकडाही रस्त्यावर टाकत नाहीत, पण परत आलो की एअरपोर्टपासुनच सुरुवात करायच्या. आणि वर म्हणणार की आपल्या देशात खुप कचरा आहे.

पुर्वी घरोघरी पाण्याचा बंब असायचा ( त्यावेळी बाथरुम्सना छप्पर नसायचे. किमान बंब तरी उघड्यावर असायचा ) त्यावेळी अशा सटर फटर वस्तू जाळायाला त्याचा मस्त उपयोग व्हायचा. शिवाय पाणी तापायचे ते वेगळेच.

Pages