लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

Submitted by डोंगरवेडा on 28 August, 2012 - 00:51

लोणी भापकर- एक लहानसे खेडेगाव, पुण्यापासून साधारण ६५ किमी दूर, मोरगावच्या पुढे जेमतेम ४ मैलांवर. गाव लहानसेच असले तरी मध्ययुगीन कालातली मंदिरे, प्राचीन अवशेष, वाडे हुडे, गढ्या आणि किल्ला असे ऐतिहासिक दृष्ट्या कमालीचे परिपूर्ण.

कित्येक दिवस लोणी भापकरची मंदिरे आणि तिथल्या वीरगळांना भेट द्यायचा विचार चालूच होता. शेवटी एकदाचा बेत नक्की झाला. पुण्यात अत्रुप्त आत्म्याच्या घरापाशी भेटून त्याच्या गाडीने मी, हर्षद आणि आत्मा असे तिघेजण निघालो. वाटेत हडपसरला सुधांशूला घेतले आणि पुढे मार्गक्रमण चालू केले. सासवडपर्यंत धूम धूम कोसळणारा पाऊस जेजुरीपाशी येईतो प्रायः थांबला होता. मोरगाव मागे टाकून थोड्याच वेळात रूक्षश्या भासणार्‍या लोणी भापकर गावात शिरलो. गावात शिरता शिरताच डावीकडे अनेक समाध्या लक्ष्य वेधून घेत होत्या. लगेचच एका मंदिरापाशी पोहोचलो. ते गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथाचे मंदिर.

मंदिरापाशी गाडी पार्क करून प्रवेशद्वारातून आत शिरलो. मंदिराला तीन प्रवेशद्वारे असून मुख्य द्वार म्हणजे प्रशस्त नगारखाना असून दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शरभाचे शिल्प कोरलेले आहे. पायातळी हत्ती पकडलेले आहेत. मंदिराच्या एका बाजूला देखणी बारव असून तिथल्याच एका कोपर्‍यात कृष्णाची छोटीशी मूर्ती दुर्ल़क्षित अवस्थेत पडलेली आहे. मंदिराच्या पुढयात दोन भव्य दिपमाळा आहेत. मूळचे मंदिर काळवत्री पाषाणात बनवलेले असून शिखर नागरी शैलीचे आहे जे अलीकडच्या काळातील असावे. सबंध मंदिराला ऑईलपेंटने रंगवलेले असल्यामुळे त्याचे मूळचे पाषाणी सौंदर्य जरी उणावले असले तरी ते लपत मात्र नाही. मंदिराचा सभामंडप हेमाडपंथी शैलीच्या अनेक नक्षीदार खांबांवर तोललेला असून त्या खांबांवर वेगवेगळी चित्रे चितारली आहेत. कधी त्यात वादक संगीतात तल्लीन झालेले दिसतात तर कधी रानडुकराच्या शिकारीचा प्रसंग कोरलेला दिसतो. मंदिराच्या स्तंभांवर असलेले नाग आणि नागाच्या वेटोळ्यांपासून बनवलेली नक्षीदार शिल्पे हे मंदिर मूळचे शिवमंदिर असल्याचे सूचित करत जातात, कालांतराने येथे काळभैरवाची स्थापना झालेली असावी. अर्थात काळभैरव हेही शंकराचेच एक रूप. गाभार्‍यात भैरवाच्या दोन तर योगेश्वरीची एक अशा तीन मूर्ती आहेत. भैरवाच्या हातात त्रिशूळ, शंख अशी आयुधे आहेत.

१. काळभैरवनाथ मंदिर

२. नगारखान्यावरील शरभाची शिल्पे

३. स्तंभांवर असलेली नागशिल्पे

४. मंदिराच्या आतील कोरीव स्तंभ

५. स्तंभांवर कोरलेली विविध शिल्पे

६. काळभैरवाची मूर्ती

दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गंडभेरूंडाचे शिल्प आहे. पशूचे शरीर आणि पक्ष्याचे तोंड असा आकार असलेला हा काल्पनिक पशू. ह्यानेही पायातल्या नख्यांत हत्ती पकडलेले असून शेपटीनेही एक हत्ती पकडलेला दिसतो आहे. त्याच्या शेजारीच सहस्त्रदलकमलाचे नक्षीदार शिल्प कोरलेले आहे. गंडभेरूंड, सहस्त्रदलकमल, आणि सर्पांकित नक्षीदार स्तंभ हे मंदिर यादवकालीन असल्याचे निं:सशय सिद्ध करतात.

७. गंडेभेरूंड

८. मंदिराचा बाह्यभाग जो अर्वाचीन काळातला आहे.

मंदिराच्या उजवीकडेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलो. समोरच एक छोटेखानी मंदिर असून आतमध्ये मारूतीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या चौथर्‍याला लागूनच एक पुरूषभर उंचीचा वीरगळ आहे. वीरगळाच्या सर्वात वरच्या बाजूला वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेला आहे. वीर मृत्युलोकातून कैलासास शंकरापाशी पोचला आहे असे याचे सूचन. त्याच्या खालच्या चौकटीत तोच वीर दोन स्त्रियांसह दाखवलेला असून ते त्याचे कौटुंबिक जीवन किंवा स्वर्गपाप्ती झाल्यावर अप्सरांसहित जीवन सूचित करतात. त्याखालच्या चौकटीत वीर हा शस्त्रधारी सैनिकांशी लढताना दाखवलेला आहे. वीराने थोर युद्ध केल्याचे हे प्रतिक. तर सर्वात खालच्या चौकटीत वीर धारातीर्थी पडलेला दाखवलेला असून त्याच्याबरोबर बैलाचे शिल्प कोरलेले दिसते. याचा अर्थ हा वीर नंदीगणांपैकीच एक झाला असा असावा. सर्वसाधारणपणे सर्वच वीरगळांची रचना काहीशी अशीच.

९. हनुमान मंदिराच्या चौथर्‍यापाशी असलेला वीरगळ

काळभैरवनाथाचे मंदिर पाहून त्यापासून जवळच असलेल्या सोमेश्वर मंदिरापाशी आम्ही निघालो. हे मंदिर तसे अगदी साधेच. मंदिराच्या समोरच देखणा नंदीमंडप असून आतमध्ये स्तंभ व गाभार्‍यात मोठ्या आकाराचे देखणे शिवलिंग आहे. इथल्या स्तंभांवर फारसे कोरीव काम आढळत नाही. या मंदिराचे वेगळेपण आहे ते मंदिराच्या आवारात असलेल्या कित्येक वीरगळांत. एकाच ठिकाणी असलेले १३/१४ वीरगळ मी तरी पहिल्यांदाच पाहिले. येथल्या वीरगळांमध्ये लढाईचे विविध प्रसंग कोरलेले आढळतात. वीर कधी एकाचवेळी दोन जणांशी लढतो आहे तर कधी अनेकांशी लढतो आहे, कधी खड.गयुद्ध करतो आहे तर कधी अश्वावर स्वार होऊन युद्ध करत आहे. हे सर्व वीरगळ ४/५ फूट उंचीचे पण आज निम्मेअधिक जमिनीत गाडले गेले आहेत. वीरगळांची इतकी मोठी संख्या लोणी भापकर हे गाव लढावांचे असल्याचे सूचित करते. आणि जे अर्थातच वाजवीही आहे. विजापूरहून पुण्याला येणार्‍या प्रमुख मार्गावरील हा प्रदेश. साहजिकच मूर्तीभंजकांची परचक्रे इथे सतत होतच असावीत. इस्लामी आक्रमकांशी संघर्ष करतांना येथले वीर धारातीर्थी पडत असावेत.

१०. सोमेश्वर मंदिर

११. सोमेश्वर मंदिराच्या आवारातील असंख्य वीरगळ

१२. सोमेश्वर मंदिराच्या आवारातील असंख्य वीरगळ

पेशव्यांचे भापकर हे सरदार. त्यांची प्रचंड भुईकोट किल्लेवजा गढी आज गावात बेवसाऊ अस्वस्थेत आहे. भक्कम बुरुज आणि तटाचे अवशेष झाडाझाडोर्‍यांत लुप्त होऊन गेले आहेत. हे सर्व पाहातच आम्ही थोड्या पुढे असलेल्या इथल्या सर्वाधिक चर्चेतल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचलो.

मल्लिकार्जुन मंदिर हे बहुधा इथले सर्वात प्राचीन मंदिर असावे. संपूर्ण हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर, कोरीव प्रवेशद्वारे, सभामंडपात कोरलेले नक्षीदार स्तंभ आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पुढ्यात पुष्करीणी अशी या मंदिराची रचना. हेही मंदिर यादवकालीनच.
सुदैवाने या मंदिराचा फक्त दर्शनी भागच तैलरंगात रंगवलेला आहे आणि उर्वरीत मंदिर अजूनतरी काळ्या पाषाणातच आहे त्यामुळे हे मंदिर सर्वाधिक देखणे दिसते. मंदिराचे प्रवेशद्वार व्याल, नक्षीदार वेलबुट्टट्या आणि काही मूर्ती कोरलेल्या आहेत, जाळीदार खिडक्या आहेत. प्रवेशद्वार बघून सभामंडपात प्रवेश केला. सभामंडप कोरीव नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. प्रत्येक स्तंभांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्षिणी आहेत. या य़क्षिणींना चार हात दाखवलेले असून त्या हातांवर त्यांनी ते स्तंभ तोललेले आहेत प्रत्येक य़क्षिणीमध्ये काही ना काही फरक आहेच. एक यक्षिणी मात्र वेगळ्या प्रकारची दाखवली आहे. तीने तो स्तंभ तीन हातांवर तोललेला असून एक हात मात्र कानावर ठेवलेला आहे, जणू मंदिराच्या सभामंडपात चाललेले गायन, वादन ती तन्मयतेने ऐकत्ये आहे. स्तंभांच्या मधल्या चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत. कधी वादक वाद्य वाजवतांना दाखवलेले आहेत तर एका खांबांबर सीताहरणाचा प्रसंग कोरलेला आहे. एका स्तंभावर नर्तिका नृत्यमुद्रेत दाखविलेल्या आहेत तर दुसरीकडे कुस्तीचा प्रसंग कोरलेला आहे. कधी नागकन्यांबरोबर नृत्य दाखवलेले आहे तर कधी हंस आणि व्यालमुखे कोरलेली दिसतात. एका स्तंभावरचे कोरीव शिल्प तर मला सर्वात आगळे वाटले. त्या शिल्पात शरभ हत्तीचा पाठलाग करताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिराच्या पायर्‍यांच्या कडेलाही अगदी असेच एक लहानसे शिल्प आहे.

१३. मल्लिकार्जुन मंदिर

१४. मंदिराचा दर्शनी भाग

१५. सभामंडप

१६. भारवाहक यक्षिणी

१७. कानावर हात असलेली यक्षी

१८. स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती

१९. स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती

२०. शरभ हत्तीचा पाठलाग करत असतानाचे शिल्प

सभामंडपाचे छत तर अगदी निरखून बघण्यासारखेच. फुलाफुलांचे अतिशय सुंदर कोरीवकाम इथल्या छतावर केले आहे. छताच्या चौकटीच्या भागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. हे बहुधा कृष्णाच्या जीवनातले प्रसंग असावेत. अंधार आणि उंचीमुळे ते नीटसे पाहता येत नाहीत. पण गोपगोपी आणि गाईगुरांसह असलेला कृष्ण नजरेत भरतोच. युद्धातील काही प्रसंगही येथे कोरलेले आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वारही कोरीव खांब,विविध मूर्ती आणि व्यालमुखांनी नटलेले आहे. गर्भगृह अगदी भुलेश्वर मंदिराचीच आठवण करून देते. आतमध्ये मात्र दोन शिवलिंगे आहेत मल्लिकार्जुन म्हणजे शिव-पार्वती यांचे हे प्रतिक.

२१. छतावरील नक्षीदार फुलांचे कोरीव काम

२२. छतावरील चौकटीत कोरलेले शिल्पपट

श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या समोरच भलीमोठी पुष्करिणी खोदलेली आहे. चतुष्कोनी अशा ह्या पुषरिणीत ठिकठिकाणी कोनाडे खोदलेले असून त्यावर लहानसे कळस उभारलेले आहेत. पूर्वी ह्या कोनाड्यांत मूर्ती असाव्यात. पुष्करणीच्या एका बाजूलाच भव्य असा नंदिमंडप आहे आणि त्याच्या चारही बाजूंना विविध शिल्पे कोरलेली आहेत.शिल्पांमध्ये धनुर्धारी राम, लक्ष्मण, गदाधारी भीम, हनुमान आदी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर दोन बाजूंना मैथुनशिल्पेही आढळतात. नंदीमंडपांचे छतही फुलाफुलांच्या अतिशय देखण्या नक्षीकामाने सजलेले आहे. आज येथे नंदीची मूर्ती नाही व नंदीमंडपाच्या पुढ्यातल्या मंदिरात दत्तमूर्ती स्थापन झालेली आहे. पण पूर्वी हे शंकराचे मंदिर असावे हे निश्चित. तशा अनेक खाणाखुणा येथे दिसतातच.

२३. पुष्करिणी व नंदीमंडप

२४. नंदीमंडप व मूळच्या शिवमंदिराचे दत्तमंदिरात रूपांतरीत झालेले मंदिर

२५. नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

२६. नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

२७. नंदीमंडप जवळून

२८. मंडपाचे नक्षीदार छत

आता आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या इथले सर्वाधिक चर्चित शिल्प बघायला निघालो. किंबहुना याच कारणासाठी येथे येण्याचा अट्टाहास केला होता. हे शिल्प आहे यज्ञवराहाचे. हे पूर्वी मंदिराच्या जवळच असणार्‍या एका शेतात पडिक अवस्थेत होते, ते हल्लीच मंदिराच्या आवारात नेऊन ठेवलेले दिसते.
यज्ञवराह म्हणजे वराहमूर्ती., विष्णूच्या वराहवताराचे हे प्रतिक. वराहवताराचे कार्य संपुष्टात आल्यानंतर विष्णूने वराह शरीराचा त्याग केला व त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगे बनली असे म्हणून हा यज्ञवराह अशी विष्णूपुराणातली आख्यायिका आहे.
हे शिल्प अतिशय देखणे आणि भव्य. वराहाच्या शरीरावर त्याने दगडाचीच झूल पांघरलेली असून त्यावर छोट्या छोट्या चौकोनांत असंख्य विष्णूमूर्ती कोरलेल्या आहेत. त्या झूलीवर त्याने शिवलिंगे धारण केली आहेत. वराहाच्या चारही पायांवरही विष्णूमूर्ती कोरलेल्या असून पायातळी विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधेही कोरलेली आहेत. वराहाची शेपटी गुंडाळालेल्या अवस्थेत असून त्यात त्याने पृथ्वी धरून ठेविली आहे. वराहाच्या शरीराखाली एक नमस्कार करणार्‍या अवस्थेतली एक मानवी धड असलेलीमूर्ती असून तीचे शरीर लांबलचक निमुळते दाखवले आहे. एकंदर ठेवणीवरून ही शेषनागाची मूर्ती दिसते. मूर्तीभंजकांनी याचे मस्तक तोडलेले आहे. खुद्द यज्ञवराहाचे मुखसुद्धा मूर्तीभंजकांच्या तडाख्यातून सुटलेले नाही. तरीही त्याचे देखणेपण मात्र वादातीत आहे.
यज्ञवराहाचे असे शिल्प इतरत्र कुठेही आढळात आलेले नाही.

२९. यज्ञवराह (शंख, चक्र, शेषनागासह)

३०. यज्ञवराहाच्या पायाजवळील कौमोदकी गदा

३१. शेपटीत अडकलवेली पृथ्वी.

३२. शरीरावरील विष्णूमूर्तींची झूल

३३. श्री मल्लिकार्जुन मंदिर

मंदिराच्या ह्या देखणेपणाचा पुरेपुर आस्वाद घेऊन आम्ही तिथून निघालो ते मोरगांवच्या जवळच असलेल्या अजून एका शिल्पसमृद्ध मंदिराकडे, पांडेश्वराकडे. त्याविषयी पुढच्या भागात.

(इतरत्र पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोणी भापकरमधुन आजवर बर्‍याच वेळा गेले आहे पण तिथे थोडंफार बघण्याजोगं आहे असं माहित होतं पण इतकं काही असेल असं वाटलं नव्हतं... खुप खुप धन्यवाद.. खुपच माहितीपुर्ण लेख.. फोटो अप्रतिम..

सुंदर प्रचि आणि फार छान माहीती.

आमच्या घरापासून साधारणत: २० किमी वर लोणी-भापकर गाव आहे. कित्येक वेळा गेलो असेन तिथे.
पण इतकी अभ्यासपुर्ण माहीती नसल्यामुळे फक्त दर्शन घेऊनच माघारी फिरायचो.

पण आता तुम्ही जी माहीती करून दिलीत ती पाहण्यासाठी खास जाणारेय.

सुंदर Happy

Happy

यज्ञवराहावरील विष्णु वेगवेगळ्या प्रकारचे आहेत का?
वराहाने शेपटीत का धरले होते पृथ्वीला? (आणि केंव्हा)?

सुंदर प्रचि आणि वर्णन ,
रैना वीरगळ म्हणजे लढाईत मरण पावलेल्या योध्यांचं स्मारक (? ) वरदाच्या एका लेखात वीरगळ विषयी छान माहीती दिली आहे.
रच्याकने आमच्या सोलापुर जिल्ह्यात अशी मंदिर खुप आहेत.

@aschig: यज्ञवराहावरील विष्णू एकाच प्रकारचे आहेत.
हिरण्यकश्यपाचा भाऊ हिरण्याक्षाचा वध करताना विष्णूने पृथ्वीला पकडून ठेवले होते अशी दशावतांरामधली एक कथा आहे.

@रैना: वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्‍यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई.

एका अपरिचित जागेचा परिचय झाला. जमले तर नक्की जाईन. आपल्या प्राचीन शिल्पवैभवाची एक झलक दिसली.
इतक्या सुंदर शिल्पांना इतका बटबटीत रंग कुणी दिला त्याची कीव करावीशी वाटते. हिरवा काय, आकाशी काय, सौंदर्यदृष्टीचा पूर्ण अभाव!
मूळ दगडी रंगातच हे शिल्प खुलुन दिसते. कुणीतरी पुढाकार देऊन जी उरली शिल्पे आहेत ती जतन करावीत.
अतिशय सुंदर शिल्पकला आहे. कधीतरी ह्यामागचा इतिहासही उलगडेल ही आशा.
परिचय करून दिल्याबद्दल आभार.

धन्यवाद श्री आणि डोंगरवेडा.

डोंगरवेडा,
तुमच्या आवडीचा विषय असल्यास, तुम्हाला योग्य वाटल्यास दशावतारांवर लिहिणार का कृपया?
विनंती.

सर्व माहिती, म्हणजे स्थान, बघण्याच्या गोष्टी,त्यातील संकल्पना,पुराणकथा व उत्कृष्ट फोटो ह्यामुळे लेख अतिशय उत्तम झाला आहे.

मस्त लेख आणि अप्रतिम मूर्ती. ह्या देवळाचे, मूर्तीचे फोटो टाकल्याबद्दल आणि इतकी छान माहिती दिल्याबद्दल शतशः आभार Happy