हे मृत्यो

Submitted by विस्मया on 23 August, 2012 - 13:06

हे मृत्यो...
==========

१.

वीजेने थोडंस क्षितिज किलकिलं करावं
तेव्हां अथांग निळाई अंगावर येईल
कदाचित
तेव्हां क्षितिजाची रेषा
निळसर जांभळी होत जाईल
तिथे कदाचित तू असशील..
आज म्हटलं बसावं
तुझ्याशी निवांत बोलावं
गप्पा टाकाव्यात
आणि थेट तुझ्याशीच
मैत्री करावी

--------------------------------------------------

लाल पिवळा नारंगी भगवा
सगळ्या रंगात रंगायचंय अजून
हिरव्या कांचनमृगाने हाक दिलीये
तू कुठेतरी वाहत असशील नदीतून
आताच नकोय तुझाशी
निळी जांभळी नजरानजर

--------------------------------------------------

एक पान पिकलेलं
उन्हामधे सुकलेलं
सुरकुतलेलं.. थकलेलं
टक्क उघड्या डोळ्यांमधे
चक्क तुझा धावा
आणि तुझा नेमकाच कंटाळा
तू असा अगम्य कसा

--------------------------------------------------

तू इथं ?
मी साशंक..
इवल्या इवल्यापावलांचे
न उमटलेले ठसे
आणि तुझ्या डोळ्यांतली
वेडसर झलक
सगळं मिटवण्याची
आणि माझ्या अंगावर आलेला
थंडगार शहारा ..
काय केलंस हे ?
प्रवासाच्या आरंभालाच झडप घातलीस ?

--------------------------------------------------

५.

हे बघ
एक बंद पडलेलं घड्याळ
ना कसलीच टिकटिक
ना कसल्याही जाणिवा
आणि कसल्याही नेणिवा..
बस्स एक भयाण शून्य.
तुझं शिक्कामोर्तब व्हायचंय
तू मात्र
बोलावलं कि नेम़कं येत नाहीस
आणि जा म्हटलं कि
येतोस हटकून.....

Maitreyee Bhagwat

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृत्युवर कविता करायचा मोह कधीकधी आवरत नाही हे खरं पण मरणमोह असू नये कारण जीवन हीच आपली ओळख असे काहीसे ही सुंदर कविता वाचताना वाटले. ले.शु.

मैत्रेयी, कोणत्या क्रमांकाचं कौतुक जास्त करु हे बघण्यासाठी परत वर गेले. मग परत परत वाचतच राहिले. अशक्य सुंदर ! क्रम ठरवणं अगदीच अवघड.

मी पण .. मी पण Wink

माझ्याइतका तुला कुणी
ओळ्खत नसेल
एकदा नाही सहादा कुणी
भेटलाही नसेल
थँक्स अरे दोस्ता पण
शिकवून गेलास
शेकहँड करून जिणं
दान देऊन गेलास..

- Kiran..

तुझा तो बर्फाळ स्पर्श
अनुभवलाय मी ही
क्षितिजाच्या अल्याडपल्याड
झुललोय मी ही
हिरवाईच्या रानामधे
भुलला मानसपक्षी
तुझ्या अंगाईने दिसली
निळसर नक्षी
तरी अजून चुकतो
म्हणून
सर्वत्र तू दिसतो
फुटाफुटावर ब्रेक्स लावत
शहाण्यासारखा चालतो..

_ Kiran..

मस्तच....
"जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत अपनी मेहबुबा है साथ लेकर जायेगी" - मुकद्दर का सिकंदर मधले हे गाणे आठवले...

किरण (इंग्रजी) - सुरेख कविता आहेत, पण वेगळ्या द्यायला पाहिजे होत्या असे उगाचच वाटून गेले..

सगळ्याच आवडल्या Happy

गेल्या वर्षी झालेली आपली भेट
अगदी परवा झाल्यासारखी वाटते

तुला घाबरणार्‍यांना चिडवणारी मी
प्रत्यक्ष भेटीत घामाघुम झाले होते

तुही बहुदा मला धडा शिकवायलाच
आला होतास
व्यवस्थीत टर्ण मारुन निघुन गेलास

मला दिसली होती तुझ्या चेहर्‍यावरची
मिश्कील छटा

त्यानंतर मी तुला
समजुन घेण्याचा प्रयत्न केलाय
आणि निर्माण झालाय
तुझ्याबद्दल नितांत आदर

आता आलास तरी मी
न घाबरता तुझे स्वागतच करेल

तु तुझे काम करतोस
कपडे बदलावेत तसे
आमची शरीरं बदलतोस

आवडेल पुन्हा नवा जन्म घेउन
नवी सुरुवात करायला
तो बालपनाचा आनंद पुन्हा अनुभवायला

मग कधी येतोयेस?
वाट पहातेय..

Proud

तुही बहुदा मला धडा शिकवायलाच
आला होतास
व्यवस्थीत टर्ण मारुन निघुन गेलास

मला दिसली होती तुझ्या चेहर्‍यावरची
मिश्कील छटा

वर्षा... सुंदरच लिहीलंय.

सर्वांचे आभार

शशांक तुम्ही पण लिहा ना..प्लीज !

४ आणि ५ विशेष आवडली.
मृत्यूला उद्देशून लिहिलेली एका महान कवीची 'मरणोन्मुख शय्येवर' ही दीर्घ कविता यानिमित्त आठवली. तिची सुरुवातच
'ये मृत्यो!' अशी होते.
पहिल्या ओळी आहेत :
'ये मृत्यो! ये तू ये, यावया प्रती
निघालाच असशिल जरि ये तरी सुखे!'

आपण स्वतः काव्य लिहिता. त्यामुळे आपणही ती वाचली असेलच.

मैत्रेयी!
निर्भयतेचे आकर्षण आहे मला फार म्हणून जास्तच अपील झालीये कविता!
आणि त्या व्रूद्धजीवासाठी लिहेलेले तर अगदी शहारा आणून गेले.

आताच नकोय तुझाशी
निळी जांभळी नजरानजर>> आह!! ह्यापेक्षा सुंदर उपमा आणि शब्दप्रयोजन असूच शकले नसते... क्लास!

काय केलंस हे ?
प्रवासाच्या आरंभालाच झडप घातलीस ?>> झडप पडणारच आहे... खाटकन! ती जितकी नकळत तितकी सुखद!!

हे मृत्यो
=====

६.

निर्जन ओसाड वाटेवरती
अस्ताव्यस्त पसरलेला तू
आणि मी अनवाणी अनभिज्ञ
सभोवारच्या काट्याकुट्यांनी
आणि दगडाधोंड्यांनी
श्वास रोखून पाहीलं तेव्हां
तुला पायांवरून सरपटतांना
युगं आणि पळांतलं अंतर नाहीसं होतांना
निळाईची अगाध व्याप्ती
शिकवून गेलास तू
थंडगार स्पर्शाने ..
ही जीवघेणी थट्टा कि
तुझा बर्फाळ मिस्कीलपणा !

- मैत्रेयी

हे मृत्यो - ७
=========

एक शहर सुनं पडलेलं
घट्ट बंद खिडक्या नि दारं
मी किलकिल्या कवडशात पाहीलं तुला
वाटलं, इतकं थैमान घातल्यावर
तुझ्या डोळ्यातली ती
निळी वेडसर झाक
गडद झाली असेल...
पण
थक्क होण्याची पाळी माझी होती
तुझ्या कपाळावर आठ्यांचं जाळं
आणि डोळ्यातली चिंता
मला अगदीच अनपेक्षित !!!

- मैत्रेयी

हे बघ
एक बंद पडलेलं घड्याळ
ना कसलीच टिकटिक
ना कसल्याही जाणिवा
आणि कसल्याही नेणिवा..
बस्स एक भयाण शून्य.
तुझं शिक्कामोर्तब व्हायचंय
तू मात्र
बोलावलं कि नेम़कं येत नाहीस
आणि जा म्हटलं कि
येतोस हटकून.....

कविता आवडली.