विषय क्र. ३.- माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट

Submitted by लसावि on 18 August, 2012 - 06:23

मराठी चित्रपटाकडून सर्वात पहिली आणि सर्वात अवघड अपेक्षा म्हणजे त्याला स्वतःचा सूर सापडावा. हिंदी सिनेमाला, दाक्षिणात्य सिनेमाला अगदी भोजपूरी सिनेमालाही स्वतःचा एक आवाज आहे, रंग-रुप आहे. ते चांगलं-वाईट, व्यावसायिक-कलात्मक इत्यादी पैकी काय आहे तो वेगळा मुद्दा. पण स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असणं ही माझ्या दृष्टीने सर्वात मूलभूत गरज आहे. 'कोंबडी पळाली' सारखं गाणं मराठी सिनेमात जरुर असावं पण त्याचं चित्रिकरण इतकं दाक्षिणात्य असणं फार त्रासदायक आहे. अमराठी माणसालाही एका झटक्यात, एका चित्रचौकटीतच 'हा मराठी सिनेमा आहे' हे जाणवलं पाहिजे.

हे तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा मराठी निर्माते आणि दिग्दर्शक स्वतंत्र विचार करु लागतील, मुख्यतः हिंदीचित्रपटनिरपेक्ष विचार. जो भालजींच्या, शांतारामबापूंच्या अगदी दादा कोंडकेंच्या चित्रपटातही होता. आज मराठी कलाकार हिंदीत काम मिळालं की सुखावतो, त्यासाठी जीव टाकतो. हिंदीत यशस्वी झालेले मराठी कलाकार परत ढुंकूनही पहात नाहीत किंवा 'मी उत्तम स्क्रीप्ट् आले तर नक्की काम करेन ' इत्यादी बकवास करतात. हिंदी सिनेमा आपल्यापेक्षा मोठा आहे आपण त्यापुढे क्षुद्र हा न्यूनगंड याच्या मुळाशी आहे. तो झटकून टाकणं ही देखील एक अपेक्षाच.

मराठी मातीतल्या, इथला 'इथॉस' असणार्‍या कथा चित्रपटात येणे अत्यावश्यक आहेत. मराठी साहित्यविश्व यादृष्टीने समृद्ध आहे पण या कथा पडद्यावर आल्याने आपोआप मराठी सिनेमाला त्याचा आवाज मिळेल ही अपेक्षा बालीश आहे. कथा-कादंबर्‍यांच्या शब्दशः, हुबेहूब सादरीकरणाने उत्तम चित्रपट बनत नाही (उदा. कैरी, बनगरवाडी). तसेच इतर भारतीय भाषा, जागतिक साहित्य यातही काही अजोड कथासूत्रे आहेत त्यांचाही धांडोळा घेतला जावा. त्या कथेचा आत्मा चित्रभाषेच्या रुपात मांडता यावा ही देखील अपेक्षा.

मराठी मनावर नाटकाचा प्रचंड पगडा आहे. पण त्यामुळे आमचे चित्रपटही पडद्यावरची नाटकेच बनून राहतात. खणखणीत संवादाच्या आकर्षणात, सिनेमा कॅमेर्‍याच्या भाषेत बोलतो या मुद्द्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. मराठी चित्रपटाची दृष्यात्मकता वाढावी, जास्त प्रभावी व्हावी, सगळं काही संवादातूनच सांगण्याचा सोस कमी व्हावा ही अपेक्षा.

चित्रपटाने सामाजिक-वैचारिक भान आणले पाहिजे, संदेश वगैरे दिला पाहिजे, विचार करायला लावला पाहिजे तर'च' तो ग्रेट.
निव्वळ मनोरंजन करणे, गल्लाभरु असणे, व्यावसायिक असणे वाईट.
मराठी चित्रपट बनवणार्‍यांनी आणि त्याहूनही त्याच्या प्रेक्षकांनी स्वतःवरच लादून घेतलेली ही झापडे गळून पडावी ही अपेक्षा. आम्ही अमुक-तमुक ज्वलंत सामाजिक प्रश्नावर सिनेमा बनवला आहे ज्यात सामाजिक चळवळीत भाग घेणारे/मदत करणारे हे महानट आहेत. एवढ्याचसाठी तो थिएटरमध्ये पहा, त्याने समाजजागृतीच्या कार्यात तुमचा हातभार लागेल (तो सिनेमा म्हणून कसा का असेना आणि महानटाचा अभिनय कसाही असेना). हा ढोंगीपणा संपावा आणि मराठी चित्रपट, चित्रपट म्हणून किती चांगला अथवा वाईट आहे एवढ्याच बळावर गाजावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्फेक्ट! नेमकं मांडलं आहेस.
हल्लीच्या मराठी सिनेमापेक्षा जुना मराठी सिनेमा अधिक भावतो. मी प्रभातच्या सिनेमांबद्दल बोलत आहे. सशक्त कथानक, उत्तम अभिनय, साधे, सरळ प्रसंगानुरुप संवाद. गाणी हा प्रकार भारतीय सिनेमांमधून कधी बाद होईल असं वाटत नाही, पण तीही सुश्राव्य असत.

नंतर नंतर निव्वळ गल्लाभरु सिनेमांची लाट आल्यासारखी जाणवते. दादा कोंडकेंचे चित्रपट यशस्वी ठरले, मग तीच पठडी! तमाशाप्रधान सिनेमे येऊ लागले, मग प्रत्येक सिनेमात तमाशा आणि निळू फुलेंनी लोकप्रिय केलेला खलनायक. निळू फुलेंसारख्या गुणी कलाकाराला तर मराठी सिनेमात बर्‍यापैकी वाया घालवलं, असं वाटत. बर्‍याचदा एकाच प्रकारच्या त्याच ठराविक खलनायकी भूमिका.
मग नंतर विनोदी चित्रपटांची लाट. आता काय तर आयटम साँग!

वेगळ्या विषयांवरचे आणि संयतपणे हाताळलेले चित्रपट ह्या अशा गल्लाभरु याद्यांमध्ये उठून दिसतात, चित्रपट पहायची इच्छा शाबूत ठेवतात.

अगदी थोड्याच पण नेमक्या अपेक्षा आहेत.
मराठी कलाकार(अभिनेते/अभिनेत्री) विशेषतः नाटकातून, आलेले हिंदीत जातात, तेव्हा एवढ्याच गोष्टीसाठी त्यांना आधीच आदर मिळतो, असे बरेचदा मुलाखतींतून कानावर पडते. तीच आठवण मराठी चित्रपट पाहताना व्हावी.
शेवटच्या परिच्छेदासाठी उभे राहून जोरदार टाळ्या.

लेख ठीक आहे, पण किरकोळीत लिहून मोकळे झाल्यासारखा वाटला.

>>>कोंबडी पळाली' सारखं गाणं मराठी सिनेमात जरुर असावं पण त्याचं चित्रिकरण इतकं दाक्षिणात्य असणं फार त्रासदायक आहे.<<<

मराठी चित्रिकरण म्हणजे कसे, काय असेल असे अपेक्षित आहे?

==============

बाकी मराठी माणसाला एक उगाचच 'यात मराठीचा सुगंध यावा, दर्जा असावा' इत्यादी वाटत असते. जे श्रेष्ठ आहे ते श्रेष्ठ आहे म्हणायला जीभ रेटावीशी वाटत नाही याचे कारण मत्सर मातीतच रुजलेला असतो आणि श्रेष्ठ असणार्‍या कलाकृतीच्या पावलावर पाऊल ठेवले तर 'हा अनुकरण करतो' ही टीका होते.

==============

'माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट' या विषयावर हळवे लेख येणार असे वाटत आहे.

मराठी माणसाचाच स्वताचा सूर हरपलाय मग मराठी चित्रपटाला कुठुन सापडणार स्वताचा सूर?
जरा चकचकाट दाखवला तर ग्रामीण प्रेक्षकाला ते परके वाटणार आणि गावकारण, तमाशा वगैरे असले की शहरी लोक नाके मुरडणार!
काही चित्रपट मल्टीप्लेक्ससाठीच निघतात तर काही जत्रांमधल्या तंबूत लावायलाच... सगळ्याचा मेळ घालायचा कसा?

आगाऊ अपेक्षा व्यक्त करताना लिहितात "स्वतःचा सूर सापडावा...". यातील सूरापेक्षा तो स्वतःचा असणे फार फार महत्वाचे आहे....उगाच हिंदीत फॅशन आली आहे म्हणून तिला फक्त मराठी शब्दाचे झालर लावून 'हिंदीच्या तोडीची निर्मिती' म्हणवत कॉलम मागून कॉलम लिहवून आणायचे आणि एफ.एम.वर कोकलायचे, यातच सध्याची मराठी चित्रपट निर्मिती गुंतली आहे. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट हे चालणारच, त्याला तोडीस तोड म्हणजे "उस्सेभी ज्यादा" नकोय, तर इथल्या मातीतीलच प्रश्नांची, समस्यांची उकल करू शकणारी मांडणी कल्पक दिग्दर्शकाने केली तर हिंदीशी स्पर्धा करण्याची गरजच नाही. "मराठी चित्रपटगृहे ओसाड पडत आहेत आणि हिंदी मल्टीप्लेक्स वाहून जाताना दिसतात" म्हणून रडायचे काही कारण नाही... शेवटी पुणेमुंबईनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूर येथील मायबाप मराठी प्रेक्षकाला जर हिंदी चित्रपटातून 'पैसा वसूल" समाधान मिळत असे तर त्याला दोष कसा द्यायचा ?

"आज मराठी कलाकार हिंदीत काम मिळालं की सुखावतो...."
~ नक्कीच सुखावत असेल, पण काम मिळते म्हणजे कसले ? तर सलमानच्या गाडीचा फालतू बकवास करणारा ड्रायव्हर, त्याच्या बंगलीतील भांडीवालीवर लाईन मारणारा उल्लू, किंवा गावभर टवळीसारखी हिंडणार्‍या नायिकेच्या टिंगलीस पात्र असलेल्या मामाची. एरव्ही इकडे मराठीत मारे 'नायक' म्हणून रुबाबात मिरवायचे आणि दुसरीकडे हिंदीत असल्या चिल्लर भूमिका स्वीकारून मिशीला पीळ भरायचे ! यात कसली आली आहे मराठीविषयी आपुलकी.

@ आगाऊ
उत्तम लिहीलं. मुद्दे पटले. दिनेशदांच्या लेखातही हेच मुद्दे आलेत. या विषयावर लिहीताना हेच मुद्दे सर्वांच्या मनात आहेत हे मात्र अधोरेखीत झालं. खूप थोडक्यात आणि अचूक !! अभिनंदन

( मलाही स्पर्धेसाठी लिहायचं असल्याने मुद्दामून कुठलाही लेख वाचला नव्हता. पण वाचला असता तर लिहीण्याची गरज नसती पडली इतकं तू नेमकं लिहीलेलं आहेस. वासेपूरच्या धाग्यावरच्या पोष्टीही अशाच वाचनीय )

आगाऊ चांगलं लिहीलयसं .
मी अनेकदा विचार करतो की मराठी चित्रपट सृष्टी नक्की कुठे कमी पडतेय , आणि एकाच निष्कर्शाप्रत येऊन पोहोचतो ते म्हणजे सिनेमातली गुंतवणुक , आम्ही लोक तामीळीं सारखी गुंतवणुक करु इच्छीत नाही म्हणुनच मराठी चित्रपट सृष्टी मागे पडतेय असं माझं प्रांजळ मत आहे.
जर ताजमहल बांधायचा असेल तर तेव्हढा खर्च करण्याची तयारी पाहीजे नाही का ?

लेखातील बरेचसे मुद्दे पटले. विशेषतः स्वतःचा सूर, न्यूनगंड, चित्रभाषेवर/कॅमेर्‍याच्या भाषेवर प्रभुत्व हे अगदीच महत्त्वाचे मुद्दे वाटले.
वेगळ्या विषयांवरचे आणि संयतपणे हाताळलेले चित्रपट ह्या अशा गल्लाभरु याद्यांमध्ये उठून दिसतात, चित्रपट पहायची इच्छा शाबूत ठेवतात.>>>>> शैलजाच्या या मुद्द्याने एका वाक्यात माझ्या सर्व अपेक्षांचा आढावा घेतला आहे Happy

>>>>"मराठी मातीतल्या, इथला 'इथॉस' असणार्‍या कथा चित्रपटात येणे अत्यावश्यक आहेत. >>>> हे विधान ज्या परिच्छेदात आहे त्याच परिच्छेदाचा शेवट
>>> तसेच इतर भारतीय भाषा, जागतिक साहित्य यातही काही अजोड कथासूत्रे आहेत त्यांचाही धांडोळा घेतला जावा. >>>>
या विधानाने झाल्याचे पाहून प्रथमदर्शनी गंमत वाटली, पण तुला काय म्हणायचे आहे ते कळले. हा विरोधाभास प्रथमदर्शनीच आहे. 'मराठमोळी' कथासूत्रे फक्त मराठी भाषेतच सापडतील असे मुळीच नाही. अशी कथासूत्रे शोधणे हे मराठी चित्रपट जागतिक करण्याकडचे पहिले पाऊल म्हणता येईल का?

तुझ्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल. एक दृष्टीकोन असा आहे की चित्रपट या माध्यमाकडे त्या माध्यमाच्याच नजरेने पहावे, त्यासाठी कुठला अतिरिक्त चष्मा घालण्याची गरज नाही. हे मान्यच. विशेषतः त्याला भलतीच काहीतरी लेबले लावून त्याचे विपणन करणे हा ढोंगीपणा होय, हे पटले. त्याचबरोबर प्रेक्षक म्हणून आपणसुद्धा झापडे काढून बघायला पाहिजे यालाही अनुमोदन. (याच प्रकारचा दृष्टीकोन सचिन कुंडलकरने त्याच्या 'सकाळ'मधील लेखमालिकेतसुद्धा मांडला होता). त्याचबरोबर मी अजून एका दृष्टीकोनातून विचार करतो. चित्रपट हे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणूनसुद्धा बघता येईल का? मला एखादी विशिष्ट गोष्ट/बाब/विचार/.... या माध्यमातून व्यक्त करायचे असेल तर मी जे सांगायचे आहे त्याला आधी महत्त्व देईन. पण माझी चित्रपट या माध्यमावर पकड नसेल तर व्यक्त होण्याचा दर्जा म्हणजेच चित्रपट म्हणून त्या अभिव्यक्तीचा दर्जा खालचा असेल. ते मान्यच करू. तरीसुद्धा मी तो चित्रपट करेन आणि 'मला अमुक गोष्ट सांगायची आहे म्हणून मी चित्रपट केला, तो चित्रपट म्हणून कसाही असू दे' असे स्वच्छ सांगेनसुद्धा. अनेक वेळा कलाकृतींकडे/माध्यमांकडे बघताना त्यांच्या कलामूल्यांकडेच आपले इतके लक्ष असते की ते 'अभिव्यक्तीचेसुद्धा साधन' आहेत हे आपण विसरतो असे वाटते.

यात आणखी एक खोच आहे. कलामाध्यमांमध्ये असंख्य प्रयोग होत असतात. त्यात अनेकवेळा अभिव्यक्तीचे प्रयोग असतात. केवळ नवीन प्रकारे केलेली अभिव्यक्ती म्हणून आपण बघायला जातो, कळले नाही तरी 'काहीतरी नवीन/वेगळे आहे' एवढे मान्य करतो. एवढेच नाही, तर असे प्रयोग अनेकांनी बघावेत असेही कैकदा आपल्याला वाटते. काही उदाहरणे. पहिले म्हणजे वोल्फगांग पीटरसनचा पाच तासांचा 'दास बूट' हा चित्रपट. हा संपूर्ण एका पाणबुडीत घडतो. पाणबुडीचा 'क्लॉस्ट्रोफोबिआ' कळण्याचा याहून दुसरा उत्तम मार्ग नसेल. पीटरसनला तेच दाखवायचे होते. म्हणून त्याने चित्रपट केला. त्या चित्रपटाचा अर्थ मात्र दुसराच घेतला गेला. खूप गदारोळ झाला. दुसरे उदाहरण आहे अँडी वॉरहोलच्या 'स्लीप' या चित्रकृतीचे. अक्षरशः एका माणसाची ६ तासांची झोप फक्त. तेवढेच. ते चित्रण म्हणजे 'स्लीप'. ही एक महत्त्वाची चित्रकृती मानली जाते. (मी एक तासही पाहू शकलो नाही!) हे बघायला जाताना 'मी काहीतरी भारी/महत्त्वाचे बघायला जात आहे' या अभिनिवेशापेक्षा 'मी काहीतरी वेगळे बघायला जात आहे' एवढेच महत्त्वाचे नाही काय? असे प्रयोग आपण नेहमीच स्वीकारले आहेत.

'देवराई'सारखा चित्रपट केवळ कलाकृती म्हणून बघताच येत नाही. किंबहुना, कलाकृती म्हणून तो बघणे अपेक्षितच नाहीये, हे त्या चित्रपटाच्या निर्मात्यांचे नाव पाहिले की लक्षात येतेच. तीच गोष्ट 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाची. एक नाट्यकृती म्हणून ते वरच्या दर्जाचे नसेल, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. त्यांना जे सांगायचे आहे ते दुर्लक्षून चालणार नाही. तेव्हा हा फरक आपल्याला कळणे महत्त्वाचे होय. सारांश, झापडे/लेबले न लावता बघणे याबरोबरच कधीकधी त्या कलाकृतीचीच अंगभूत गरज म्हणून काही विशिष्ट चष्म्याने बघता येणे हे दोन्ही दृष्टीकोन मला तितकेच महत्त्वाचे वाटतात. (हरेक कलाकृती फक्त कला म्हणूनच बघायची नसते, हे मला फारच उशीरा कळले! तेही असले 'अचाट' प्रकार पाहिल्यावरच.)

या सगळ्याच्या शेवटी 'शेवटच्या परिच्छेदाबद्दल टाळ्या' छाप. प्रतिक्रिया पाहून जामच गंमत वाटली. आगाऊने लिहिलेला शेवटचा परिच्छेद हा त्याच्या लेखाच्या शेवटी आहे, त्याच्या विचारओघातून तो आला आहे. त्यामुळे त्याला जे काही म्हणायचे आहे त्याचे संदर्भ व उद्देश कळायला मदत होत आहे. प्रतिसादांच्या मागेसुद्धा आगाऊच्या विचारप्रक्रियेएवढी प्रक्रिया आहे असे गृहित धरतो. असो.

'धैर्याबद्दल थॅंक्यू' हा प्रतिसाद मात्र औचित्यभंग करणारा आहे. असले निखालस दांभिक प्रतिसाद मिळणे दुर्दैवी आहे.

'धैर्याबद्दल थॅंक्यू' हा प्रतिसाद मात्र औचित्यभंग करणारा आहे. असले निखालस दांभिक प्रतिसाद मिळणे दुर्दैवी आहे. >> तसं तर तसं. मला ते पटले आणि आवडले. आणि प्रयत्न करुनही मला ते तसे लिहीता आले नाही, त्यासाठी खास दाद.

आम्ही मराठी कवितेला पुनरुज्जिवन दिले, आम्ही मराठी कादंबरीचा उद्धार केला, आम्ही मराठी चित्रपटाला सामाजिक भान दिले- हे दांभिक आहे. असे सांगायची का गरज पडते. कुठेतरी काहीतरी चुकते आहे. त्याचा मला त्रास होतो एक प्रेक्षक म्हणुन. कराकी काय करायचेय ते सादर. आम्ही पाहुच, पाहतोच. जिथे 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' पाहतो तर तिथे हे सिनेमे तर आवडीने पाहुच की. पण हा अ‍ॅटिट्युड दाखवून ते काही प्रेक्षकांना उलट दूर फेकतायत. उदा-संदीप-सलील ने अ‍ॅटिट्युड दाखवणे बंद केले तर आबोका मी अजून समरसून पाहीन. हेच चित्रपटांबाबत. असो..

आगाऊच्या विचारप्रक्रियेएवढी प्रक्रिया आहे असे गृहित धरतो. असो. >> नाहीच/नसेलच हे गृहितक मजेशीर वाटले.
बरं बुवा. तुमची ती विचारप्रक्रिया.. इतरांचे निव्वळ दंभ. Happy

एनीवे, पोस्ट छान नेहमीप्रमाणेच.

'मी काहीतरी भारी/महत्त्वाचे बघायला जात आहे' या अभिनिवेशापेक्षा 'मी काहीतरी वेगळे बघायला जात आहे' एवढेच महत्त्वाचे नाही काय? >>> नक्कीच आहे! पण मराठी प्रेक्षकात तू म्हणतोस तो अभिनिवेष आणि त्यातूनच पुढे 'आम्ही हे बघतो' हा स्नॉबिशनेस जास्त जाणवतो.
हरेक कलाकृती फक्त कला म्हणूनच बघायची नसते>>> हे ही मान्य पण हे सवलत द्यावी अशा कलाकृती फार थोड्या असतात, त्याहूनही महत्वाचे हे की अशा कलाकृतीचे वेगळेपण प्रेक्षकाला स्वतःला जाणवणे आणि 'या सिनेमाला वेगळ्या नजरेनेच पहा' असा डंका आधीच पिटणे यात फरक पडतो ना! माझा प्रॉब्लेम त्या स्टान्सशी आहे.

इथे लिहायचे धैर्य दाखवल्याबद्दल थॅंक्यु.>>> ही प्रतिक्रिया मी आधी वाचलीच नव्हती. यातल्या 'इथे' शब्दाचे रंग मला माहिती आहेत. पण माझ्या लेखाचा त्यांच्याशी संबंध नाही!

मस्त लिहिलंय.....
हा विषयच खूप गुंतागुंतीचा आहे कारण - "माझ्या" अपेक्षेतला मराठी चित्रपट - सहाजिकच "तुला" हे पटेलच असं नसणारच..

अवांतर - प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातूनच पहात असतो, जसजसा काळ बदलतो तसतसा चष्मा बदलत रहातो, तर कधी कधी असं होतं की चष्म्याच्याच प्रेमात पडून चष्माच घट्ट पकडला जातो - असो. हा ही "माझा" चष्माच की.....

'मराठी प्रेक्षक' आणि 'मराठी चित्रपट निर्माते' हे दोघे या ग्रुपमधल्या चर्चा- एकतर सामान्य लोकांच्या डोक्याबाहेरच्या, बॉक्स ऑफिसच्या हिशेबांपलीकडच्या, किंवा वास्तवात न येण्याजोग्या- म्हणून सोडून देतील, अशी भिती क्षणभर वाटली वरून खालीपर्यंत सारं वाचताना. नंतर पुन्हा मूळ लेख वाचला तेव्हा किंचित समाधान वाटलं.

समाधान यासाठी की सामान्य पण बुद्धीवादी मराठी प्रेक्षकाच्या मनातलं कमी शब्दांत नेमकं पकडलं आहे. अनेक ठिकाणी 'अगदी अगदी' म्हणावंसं वाटलं. 'किंचित' यासाठी, की या अपेक्षा आणि 'वास्तव' यामध्ये पूल दिसतो आहे. तो कधी नि कसा ओलांडला जाईल ते एक मायबाप प्रेक्षकालाच ठाऊक.

मुळात 'प्रचंड यश' काय असतं याचीच आपल्या चित्रपटाला अजून ओळख व्हायची आहे. बॉलिवुडमध्ये आधी सिंघम, दबंग, रावडी राठोड दणकेबाज चालतात, त्यांच्या कलेक्शनच्या आकड्यांनी आपल्यासारख्या सामान्याला आकडी येते. मग आपण मोठे डोळे अन धपापतं ऊर घेऊन हे सिनेमे बघायला जातो. अशा प्रकारे सारे खाऊन पिऊन सुखी झाल्यावर एखादा अनुराग कश्यप उठतो, देवडी किंवा वासेपूर नावाचं एखादं अफाट रसायन काढतो, मग कडू तोंड करून सांगतो- हे कसं बघायचं हे आपल्या प्रेक्षकाला सांगायची गरज आहे, शिकवायची गरज आहे. त्याच्या या कडू तोंडाला प्रसिद्धी मिळते. त्याची वाक्ये सोन्याची असल्यागत सगळीकडे छापली जातात. ही वासेपूर भानगड आहे तरी काय म्हणून लोक ग्य्प्चूप बघायला जातात. ते अभिजात अन भन्नाट अन रसायन काय असेल ते असो, पण वासेपूर अनेक लोकांच्या नजरेखालून जातो. गल्ला जमतो. प्रसिद्धी मिळते.

'कोंबडी पळाली' असायला हरकत नाही- हे लेखातलं विधान मला महत्वाचं वाटतं. पण दाक्षिणात्यच काय, पण श्रीलंकन पद्धतीने, संगीताने वगैरे चित्रित केलेलं असायलाही काहीच हरकत नाही. मुळात लोकांनी त्यावर पैसेच फेकले नाहीत तर ते दाक्षिणात्य असो, की कोरियन- काय फरक पडतो?! एकदा का कलेक्शनचे आकडे तुमच्याकडे जमले, की मग तुम्ही खमक्या सुरांत सांगू शकता- हे बघा, अशा पद्धतीने बघा, या कोनातून बघा. 'कलेक्शनचे आकडे' ही अक्षरशः जादू असते. हे आकडे बॉक्स ऑफिसवर वाजवून घ्यायच्या आधी तुम्ही कितीही गंध, श्वास, देऊळ, वळू, विहिर नि वजीर काढले तरी काहीही फरक पडणार नाही. पण भरलेला गल्ला हातात धरून लोकांना अभिरूचीच्या गोष्टी सांगा, अभिजात काय असतं ते सांगा, मराठी साहित्य किती समृद्ध आहे ते सांगा, मराठी रंगभूमी किती जुनी नि श्रीमंत आहे ते सांगा, जगातल्या चित्रपटांत होणारे नवीन प्रयोग सांगा. लोक ऐकतील. गांभीर्याने घेतील.

तर सांगायचा मुद्दा असा, की 'व्यावसायिक यश' ही सर्वात महत्वाची वस्तू आहे आणि तोच परवलीचा शब्द आहे. या व्यावसायिक यशासाठी आपले लोक प्रेक्षक म्हणून आणि निर्माते म्हणून काय करतात- याचा विचार कधी होईल देव जाणे. या घडीला ज्याच्यामुळे मराठी चित्रपटाचं पोस्टर श्रीमंत दिसेल असा एकही तगडा स्टार आपल्याकडे नाही. गर्दी खेचू शकणार्‍या अतुल कुलकर्णी सारख्या लोकांनी 'मी हेच करेन, तेच करणार नाही..' अशी बंधने इतकी वर्षे घालून घेतली आहेत, की आता त्याने गल्लाखेच कमर्शियल सिनेमा केला तरी सारंच प्रकरण भयंकर विनोदी होईल. अनासपुरेसारख्या कॅमेर्‍याचं प्रचंड भान असणार्‍या स्टारने एकसूरीपणामुळे आणि त्याच त्याच पातळीवरच्या विनोदामुळे अभिनयामुळे स्वत:तला व्यावसायिक यश मिळवू शकणारा स्टार अनेक निर्मात्या-दिग्दर्शकांच्या मदतीने मारून टाकला आहे. सुरुवातीला प्रचंड 'प्रॉमिसिंग' वाटणारा नार्वेकर आता बघवतही नाही. अशी अनेक उदाहरणे.

कमी निर्मितीमुल्ये असलेला, पण 'मला काय सांगायचं आहे' ते फक्त व्यक्त करणारी कलाकृतीही अशा वेळी कुचकामी ठरते. ती त्या 'ह्युज' पातळीवर कधीच पोचू शकत नाही. खूप सार्‍या लोकांनी पैसे देऊ करणे ही मोठी गोष्ट आहे. पण बॉलिवुडचा अनुभव बघता आणि मराठीतल्या निर्मात्या-दिग्दर्शकांचा बदलता अ‍ॅटिट्युड बघता ती खूप अवघड असेल असं काही वाटत नाही. आपले निर्माते दिग्दर्शक प्रचंड ब्रँडिंग आणि प्रमोशन कधी करतील? त्यासाठी चित्रपट निर्मितीइतकाच खर्च कधी करतील? नवीन माध्यमांचा आधार त्यासाठी कधी घेतील? जगप्रसिद्ध मराठी अर्थतज्ज्ञ आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ब्रँडिग करणार्‍या संस्था यांची मदत कधी घेतील? देऊळ एका बाजूला सिनेमागृहांत चालत असलेला पण त्याची जाहिरात वर्तमानपत्रांत (फक्त वर्तमानपत्रांत. इतर कुठच्याही माध्यमात नाही.) चार बाय सहा सेंटीमीटरची आणि त्यानंतर सिनेमा चालू असूनही जाहिरातच बंद- हे बघून आश्चर्य वाटलं.

मी प्रेक्षक म्हणून नंतर काय ते ठरवेन नक्की. माझय बौद्धिक पातळीप्रमाणे, माझ्या गरजेप्रमाणे. त्याआधी मला नेत्रदीपक यश दाखवा. तुमचे भरलेले खिसे दाखवा. त्या मराठी सिनेमात काहीही असू दे. पण आधी आकडे दाखवा. ते आकडे मोठ्या जनाधाराचा पुरावा असतात. तुमच्या कुवतीचे प्रवक्ते असतात. मग तुम्ही प्रयोग करा. अभिरुची शिकवा. अभिजातता दाखवा. कान धरून सांगा- आम्ही हे असं बनवलं आहे, असं बघ, या अँगलने बघ. मी मांडी घालून तोंडावर बोट ठेऊन ऐकेन शांतपणे. एवढीच अपेक्षा आहे. बास.

कुंडलकर, मांजरेकर, कुलकर्णी- तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. पण तुम्हीही स्वतः आणि स्वतःच्या अ‍ॅटिट्युडने उभ्या केलेल्या चौकटीत अडकलात की संपलं. मग मी पुढच्या लोकांची वाट पाहीन किंवा डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट बघेन.

>>हे सवलत द्यावी अशा कलाकृती फार थोड्या असतात, त्याहूनही महत्वाचे हे की अशा कलाकृतीचे वेगळेपण प्रेक्षकाला स्वतःला जाणवणे आणि 'या सिनेमाला वेगळ्या नजरेनेच पहा' असा डंका आधीच पिटणे यात फरक पडतो ना! माझा प्रॉब्लेम त्या स्टान्सशी आहे. >> +१

लेख आवडला पण मराठी(च) सूर असावा हे तितकेसे पटले नाही. हिंदी मधे अनेकदा इतर भाषिक पात्रे असतात, ते
वातावरण मस्त उभे राहते ( ताजे उदाहरण - फेरारी कि सवारी.. यात पारसी / मराठी वातावरण आहे. पेस्तनजी मधे पारसी होते, मंथनमधे गुजराथी होते.. पंजाबी तर नेहमीच असते.)

भारत एक खोज मधे प्रत्येक भागात त्या त्या प्रांताचे वातावरण होते. शाकुंतल च्या भागात मराठी वातावरण होते ( अजित कडकडे आणि फैयाज यांची गाणी होती. ) या सर्व कलाकृती उत्तमच होत्या.

त्यामूळे कथेला अनुसरुन वातावरण असावे. शब्द संवादही दोन्हीचा तोल संभाळणारे असावे.
उद्या हमिदाबाईची कोठी वर चित्रपट आला, तर त्यातला मादरे-जबान च्या जागी, मातृभाषा असा शब्द घातला, तर
सत्तारला ती शिवी वाटणार नाही !!

आगाऊ,
आवडले... बरेचसे मुद्दे पटण्याजोगे.
पण मुळात आता "ठसठशीत" मराठी संस्कृती (पूर्वीच्या संदर्भाने) शिल्लक आहे का, निदान शहरांतून याचेच ऊत्तर शोधावे लागेल.. अर्थातच ते बहुतांशी नकारार्थी यायची शक्यता असल्याने सद्द मराठी चित्रपटांमधून "कॉस्मोपॉलिटन" मराठी विषय, संस्कृती, प्रश्ण, वातावरणच जास्ती डोकावणार हेही मान्य करावे लागेल. त्यामूळे या खालील विधानात मला थोडी संदीग्धता वाटते आहे:
>>मराठी मातीतल्या, इथला 'इथॉस' असणार्‍या कथा चित्रपटात येणे अत्यावश्यक आहेत.

बॉलीवूडशी तुलना करायची तर सध्याचा ट्रेंड हा "पॉपकॉर्न" चित्रपटांचाच आहे, अन्यथा सुपरअ‍ॅक्शन पटाचा. मध्येच एखादा संदेश देणारा मुन्नाभाई वा अंतर्मुख करायला लावणारा तारे जमिन पर वा एखादा अपवादात्मक "थ्री ईडीयट्स" येवून जातो. ऊरलेल्या बाकी सर्व चित्रपटांच्या बूडाशी "एंटरटेनमेंट" आहे. ("एंटरटेनमेंट" तीन वेळा म्हटल्याने डर्टी पिक्चर सुपरहीट झाला असे मात्र नाही!)

थोडक्यात साजिरा ने लिहीले तसे घवघवीत छप्पर फाड व्यावसायिक यश आधी महत्वाचे... नेमका हाच संपूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन मराठी चित्रपट निर्मात्यांनी ठेवला तर त्या अनुशंगाने चित्रपटाची ईतर व्यावसायिक व निर्मिती अंगे देखिल (eye value या अर्थी!) नक्कीच वरच्या दर्जाची होतील या शंका नाही.
तेव्हा निर्मात्यांनी व्यावसायिक भूक (पैसे कमावणे या अर्थी नव्हे तर, माझ्या चित्रपटाच्या कलेक्शन ने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडावे वगैरे असल्या अर्थी... ) अजून वाढवावी.. किंबहुना त्याची नशाच चढायला हवी असे मला वाटते.. निव्वळ कलात्मक वा ऊपदेशात्मक चित्रपट निर्मीतीची नको तर व्यावसायिक यश देणार्‍या चित्रपट निर्मितीची नशा चढायला हवी आहे. बाकी गोष्टी आपसूक येतीलच...
"मूल्ये" असली तर व्यावसाय असेल आणि व्यावसाय वाढला तर मूल्येही वाढतील (दोन्ही अथी!) असे हे समीकरण आहे.

Pages